Friday, August 16, 2019

सर हम्फ्री डेव्ही


गे ल्यूसॅक आणि जॉन डाल्टन या शास्त्रज्ञांचा समवयस्क असलेल्या हम्फ्री डेव्ही यानेही रसायनशास्त्राच्या विकासाच्या सुरुवातीच्या काळात त्यात मोलाची भर टाकली. व्होल्टाने त्याच्या पाइलचा शोध लावल्यानंतर शास्त्रज्ञांना मिळालेल्या या नव्या साधनावर काम करणे हम्फ्रीने सुरू केले आणि अनेक पदार्थांमधून वीजेचा प्रवाह सोडून त्याचे रासायनिक तसेच भौतिक परिणाम पाहिले. त्याला विद्युत रसायनशास्त्रज्ञ आणि सुरक्षा दिव्याचा संशोधक म्हणूनही प्रसिद्धी मिळाली.

हम्फ्रीचा जन्म सन १७७८ मध्ये इंग्लंडच्या नैऋत्य टोकाला असलेल्या मागासलेल्या भागातल्या पेन्झन्स नावाच्या गावात झाला. त्या गावठी भागातल्या लोकांना ज्ञानविज्ञानाची आवड नव्हतीच. हम्फ्रीच्या घरातली परिस्थिती तितकीशी चांगली नसल्याने तो सहा वर्षांचा झाल्यानंतर डॉन टॉन्किन नावाच्या सद्गृहस्थाच्या आश्रयाला गेला आणि त्याने त्याचा सांभाळ केला. त्याच्याकडे राहून शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो एका डॉक्टरकडे औषधे बनवून देणारा सहाय्यक म्हणून कामाला लागला. पण तो त्याशिवाय वाचनालयांमध्ये जाऊन अनेक विषयांवरील पुस्तकांचा अभ्यास करत होता आणि त्यातून ज्ञान मिळवत होता. तो टॉन्किन्सच्या गॅरेजमध्ये काही रसायनांवर प्रयोग करायला लागला. त्याचे असले भलती सलती रसायने आणून त्यांच्याशी खेळणे इतर लोकांना धोकादायक वाटत असे, पण हम्फ्रीने आपले प्रयोग करणे सुरूच ठेवले. त्याची अंगभूत हुशारी, चिकाटी, बोलण्यातली चतुराई आणि त्याने स्वकष्टाने मिळवलेल्या ज्ञान आणि अनुभव यांच्या आधाराने त्याला आधी ब्रिस्टल येथील न्यूमॅटिक इन्स्टिट्यूटमध्ये आणि नंतर लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूटमध्ये शास्त्रीय संशोधनावर काम करण्याची नोकरी मिळाली.

न्यूमॅटिक इन्स्टिट्यूटमध्ये असतांना त्याने अनेक प्रकारच्या वायूंवर निरनिराळे प्रयोग केले. प्रीस्टले, कॅव्हेंडिश यासारख्या शास्त्रज्ञांनी प्राणवायू, नायट्रस ऑक्साइड वगैरे वायू कृत्रिम रीत्या प्रयोगशाळेत तयार केले होते. तसेच ते स्वतः तयार करून त्यांचे गुणधर्म पहायचे संशोधन डेव्ही करत होता. त्यात त्याने अनेक धोके पत्करले. एकदा नायट्रिक ऑक्साइडने त्याचे तोंड भाजले होते, प्रयोग करतांना एका रसायनाचा स्फोट झाला होता आणि कार्बन मोनॉक्साइड या विषारी वायूचा श्वास घेऊन पाहतांना तर तो एकदा काही तास बेशुद्ध पडला होता आणि त्याच्या जिवावर बेतले होते. अशा प्रकारची धोकादायक कामे करतांनासुद्धा तो डगमगला नाही. त्यानेच नायट्रस ऑक्साइड वायूच्या वासाने नशा चढतो आणि हसू येते हे पाहिले आणि त्या वायूला हास्यवायू (लाफिंग गॅस) असे नावही दिले.

वायूंवर संशोधन करत असतांनाच त्याचे लक्ष त्या काळात नव्याने पुढे आलेल्या वीज या विषयाकडे गेले. व्होल्टा या शास्त्रज्ञाच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या पाइलवर त्याने काम करायला सुरुवात केली आणि स्वतः त्या काळातली सर्वात मोठी बॅटरी तयार केली. त्या उपकरणातून निघालेल्या विजेच्या प्रवाहाने प्लॅटियम धातूच्या अत्यंत पातळ पट्टीला खूप तप्त केले आणि अशा प्रकारे विजेपासून कृत्रिम रीत्या प्रकाश निर्माण करण्याचा जगातला पहिला प्रयोग केला. पण त्या बॅटरीमधून निघणारा प्रवाह आणि ती पट्टी जास्त वेळ टिकू शकत नसल्यामुळे त्या प्रकाशाचा काही प्रत्यक्ष उपयोग नव्हता. पुढे डेव्हीनेच ग्राफाइटच्या इलेक्ट्रोडमधून विजेच्या ठिणग्या टाकून जगातला पहिला आर्क लाइटही तयार करून दाखवला. त्याचाही लगेच काही उपयोग करण्याची संधी नव्हती.
 
विजेचे रासायनिक परिणाम हे डेव्हीच्या संशोधनाचे मुख्य क्षेत्र होते. त्याने निरनिराळ्या रसायनांमधून विजेचा प्रवाह सोडून त्यांचे पृथक्करण केले आणि सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, बेरियम, क्लोरिन यांच्यासारखी महत्वाची मूलद्रव्ये त्यांच्या शुद्ध स्वरूपात सर्वात प्रथम उत्पन्न केली. या कामात मायकेल फॅरडे हा त्याचा प्रयोगशाळेतला सहाय्यक होता. फॅरडे हा माझा सर्वात मोठा शोध आहे असे एकदा डेव्ही म्हणाला होता. त्याचे ते बोल पुढे खरे झाले.

त्या काळातल्या खाणींमध्ये कधीकधी मीथेन वायू तयार होऊन साठून रहात असे आणि तिथे उतरणाऱ्या कामगारांनी उजेडासाठी नेलेल्या मशालीमुळे मीथेन व हवा यांच्या मिश्रणाला आग लागली तर त्याचा भडका उडत असे. सन १८१२ मध्ये झालेल्या अशा एका अपघातात ९२ कामगार दगावल्यामुळे खाणकामगारांमध्ये दहशत बसली होती. डेव्हीने त्यावर उपाय शोधण्याचे काम हातात घेतले आणि एक सुरक्षित दिवा तयार केला. त्याने त्यात दिव्याच्या ज्योतीच्या सर्व बाजूंना एक लोखंडाची जाळी बसवली होती. हवेबरोबर जाळीच्या आत गेलेल्या वायूमुळे तो दिवा भगभग करे आणि धोक्याची सूचना देत असे, पण ज्वलनातून निघालेली बरीचशी ऊष्णता जाळीमध्ये शोषली गेल्यामुळे त्याचे तापमान लगेच खूप वाढत नसे आणि त्यामुळे बाहेरचा वायू पेट घेत नसे.

डेव्हीने केलेल्या बहुमूल्य संशोधनाची त्या काळातल्या समाजाकडून आणि इंग्लंडच्या राजाकडूनही कदर केली गेली. सन १८१८ मध्ये हम्फ्री डेव्हीलाही सर फ्रान्सिस बेकन आणि सर आयझॅक न्यूटन यांच्याप्रमाणे सरदारपद दिले गेले आणि तो सर हम्फ्री डेव्ही झाला. सन १८१९ मध्ये त्याला प्रख्यात रॉयल सोसायटीचे अध्यक्षपदही मिळाले.

हम्फ्रीकडे चतुरस्र प्रतिभा होती. कोणी म्हणतात की तो शास्त्रज्ञ झाला नसता तर कवि झाला असता, तत्वज्ञ झाला असता किंवा फर्डा वक्ता झाला असता. प्रत्यक्षात तो हे सगळे झाला. त्याने विज्ञानामधले अनेक महत्वाचे शोध लावलेच, प्रख्यात कवि वर्डस्वर्थ याच्या कवितांची पुस्तके छापून आणण्यात मदत केली. त्याच्या लहानपणापासूनच त्याने स्वतःही कविता लिहिल्या होत्या आणि त्या प्रकाशितही झाल्या होत्या. आपल्या व्याख्यानांमध्ये शास्त्रीय माहिती देत असतांना तो मनोरंजक प्रात्यक्षिके दाखवत असे, त्याला तत्वज्ञानाची जोड देऊन आणि त्यात थोडा धार्मिक विचारांचाही अंश मिसळून तो आपल्या काव्यमय आणि बेजोड वक्तृत्वाने श्रोत्यांना भारावून टाकत असे. त्याने इंग्लंडमध्ये अनेक व्याख्याने दिली आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला.

त्याच्या हुषारीची कीर्ती सगळीकडे पसरली होती. त्या काळात इंग्लंडचे शत्रूराष्ट्र असलेल्या फ्रान्समध्येही त्याचा सन १८१३ मध्ये गौरव करण्यात आला. त्यावेळी तो न घाबरता फ्रान्सला गेला आणि तिथे त्याने फ्रेंच शास्त्रज्ञांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर तिथून पुढे इटली, स्विट्झर्लँड, जर्मनी आदि देशांचा दीर्घकाळ दौरा करून त्याने तिथल्या प्रयोगशाळांमध्येही जाऊन तिथे संशोधन कार्य केले आणि जागतिक प्रसिद्धी मिळवली. अशा संशोधनामध्येच त्याने हिरा हे शुद्ध कार्बनचे एक रूप असल्याचे इटलीमधल्या फ्लॉरेन्स इथल्या मुक्कामात सिद्ध केले.  सन १८२९ मध्ये तो स्विट्झर्लँडला फिरायला गेला असतांना तिथेच आजारी पडून त्याचा जिनिव्हा इथे दुःखद देहांत झाला.      

Friday, August 02, 2019

चंद्रयान आणि अपोलो


बावीस ऑक्टोबर २००८ हा दिवस भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिण्यासाऱखा आहे कारण त्या दिवशी चंद्रयान-१ या यानाने पृथ्वीवरून उड्डाण केले आणि भारताला अमेरिका व रशीया यासारख्या प्रगत राष्ट्राच्या पंक्तीत बसवले. त्यानंतर सन २०१४ मध्ये मंगळयान उडवून भारताने ते स्थान अधिक पक्के केले. या मालिकेमधील चंद्रयान-२ हे यान दि. १५ जुलैला पाठवण्याचे ठरले होते. त्या योजनेला भरपूर प्रसिद्धी दिली गेली होती. त्यात इस्रो या संस्थेमधील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे खूप कौतुक केले होते. त्यांनी आतापर्यंत केलेली कामगिरी गौरवास्पद आहेच.

चंद्राला भेट देण्याची योजना अत्यंत कठीण आहे. अचाट बुद्धिमत्ता, सखोल ज्ञान, विशेष कौशल्य आणि कठोर परिश्रम या सर्वांचा कस लावणारे असे हे काम आहे. ते करण्यामध्ये देशभरातल्या आणि परदेशामधल्या अनेक शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांचा सहभाग असतो. त्या सर्वांच्या कामात सुसूत्रता आणण्याचे व्यवस्थापकीय काम देखील कौशल्याचे असते. यात सहभागी असलेल्या शेकडो लोकांपैकी कुणाकडूनही अनवधानाने कसलीही क्षुल्लक कसूर राहू नये याची खूप काळजी घ्यावी लागते. यासाठी अनेक परीक्षणे आणि चाचण्या घेतल्या जातात.

१४ जुलैला चंद्रयान-२ या यानाचे काउंटडाऊन सुरू झाल्यानंतर त्याच्या अखेरच्या टप्प्यातल्या अॅक्टिव्हिटीज सुरू असतांना हीलियम वायूचा दाब अपेक्षेनुसार नाही असे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्यांना त्या वायूची किंचित गळती होत असल्याची शंका आली. अशा गोष्टीकडे दुर्लक्ष न करता तिची सखोल चौकशी करून आवश्यक ती दुरुस्ती करणे शहाणपणाचे असल्यामुळे त्या दिवशी होणारे यानाचे उड्डाण थांबवण्यात आले आणि आठवड्यानंतर दि.२२ ला ते यशस्वीरीत्या करण्यात आले.

पण दरम्यानच्या काळात दि.२० जुलैला एक आंतरराष्ट्रीय महत्वाची गोष्ट घडली. अमेरिकन अवकाशवीर नील आर्मस्ट्राँग याने अपोलो-११ या मोहिमेमधून अवकाशात जाऊन चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल ठेवले या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचा सुवर्णमहोत्सव साजरा केला गेला. या निमित्याने त्या ऐतिहासिक घटनेच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. साहजीकपणे अमेरिकेचा अपोलो प्रोजेक्ट आणि आपले चंद्रयान यांची तुलना होणे अपरिहार्य होते.

अपोलो -११ च्या कार्यक्रमात खालील गोष्टी होत्या.
१. पृथ्वीवरून उड्डाण
२. पृथ्वीभोवती घिरट्या घालत असतांना आपली कक्षा विस्तारत जाणे
३. चंद्राजवळ जाऊन पोचणे
४. चंद्राभोवती घिरट्या घालत घालत आपली कक्षा घटवत जाऊन एका कक्षेत फिरत राहणे
५. तीनपैकी दोघा अवकाशवीरांनी एका वेगळ्या लहान यानात बसून चंद्राकडे प्रस्थान करणे
६. तिसऱ्याने यानातच बसून चंद्राभोवती घिरट्या घालत राहणे
७. दोघा अवकाशवीरांनी चंद्रावर जाऊन उतरणे, यानाचा दरवाजा उघडून जमीनीवर उतरणे
८. तिथे अमेरिकेचा झेंडा रोवणे, तिथली दगड माती गोळा करून यानात भरणे
९. दोघा अवकाशवीरांसह लहान यानाने चंद्रावरून उड्डाण करणे.
१०. चंद्राभोवती घिरट्या घालत राहिलेल्या मोठ्या यानाला गाठून त्याच्याशी जोडून घेणे
११. दोघा अवकाशवीरांनी लहान यानामधून मोठ्या यानात जाणे
१२. मोठ्या यानाने चंद्राभोवती घिरट्या घालता घालता पृथ्वीकडे जाणे
१३. पृथ्वीभोवती घिरट्या घालत असतांना आपली कक्षा घटवत जाणे
१४. पृथ्वीवर ठरलेल्या जागी येऊन अलगदपणे उतरणे

पहिल्या चंद्रयानाने यातली फक्त पहिली चारच कामे केली होती. चंद्राभोवती फिरत असतांना त्याने एक लहानसा गोळा चंद्राच्या दिशेने फेकला आणि तो चंद्रावर जाऊन पडला. त्यावरच भारताचा झेंडा होता. ते यान काही दिवस चंद्राभोवती फिरत राहिले आणि संदेश पाठवत राहिले. त्या यानाचा संपर्क तुटल्यानंतर त्याचे काय झाले ते समजायला मार्ग नाही. ते कदाचित चंद्रावर जाऊन कोसळले असेल किंवा अजूनही चंद्राभोवती फिरत राहिले असेल.

दुसऱ्या चंद्रयानाकडे याहून जास्तीची आणखी एक कामगिरी सोपवली आहे. ती म्हणजे विक्रम नावाचा एक लँडर चंद्रयानाच्या मुख्य ऑर्बिटरपासून वेगळा होऊन हळूच चंद्राच्या दिशेने जाईल आणि तो चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील एका विशिष्ट ठिकाणी अलगदपणे चंद्रावर उतरेल. त्या लँडरमधून प्रग्यान नावाचा एक रोव्हर बाहेर निघून चंद्रावर फिरेल. ही एक सहा चाकांची गाडी असून ती चंद्रावरील ओबडधोबड जमीनीवरून चालण्यासाठी सक्षम आहे. ती सेकंदाला एक सेंटीमीटर एवढ्या संथपणे चालत राहील. तिच्यावर बसवलेल्या उपकरणांकडून मिळालेली माहिती पृथ्वीवरील प्रयोगशाळांकडे पाठवली जाईल. चंद्रावरचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील चौदा दिवस हे काम चालेल आणि संपेल. ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत राहील आणि ज्याप्रमाणे पहिल्या चंद्रयानाने दुरूनच माहिती गोळा करून पाठवली होती त्याप्रमाणे तो आणखी काही दिवस ती पाठवत राहील.

यावरून असे दिसेल की अमेरिकेने पन्नास वर्षांपूर्वी पाठवलेल्या अपोलो यानाने जेवढे काम केले होते त्याचासुद्धा अगदी लहानसा भाग आपले हे दुसरे चंद्रयान करणार आहे. मुख्य म्हणजे अवकाशात माणूस पाठवायचा झाला तर त्याच्यासाठी बंदिस्त केबिन बनवावी लागते आणि तिचे तापमान आणि दाब नियंत्रित ठेवावे लागतातच, त्या माणसासाठी कित्येक दिवस पुरेल असे अन्न, पाणी आणि हवासुद्धा इथूनच न्यावी लागते. तसली काही व्यवस्था यात नाहीच, या यानाला सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्याचीही कसली व्यवस्था नाही. आपले हे अभियानच अगदी लहान आहे. तुलना करायची झाल्यास चंद्रयानाला घेऊन जाणारे जीएसएलव्ही रॉकेट ४ मीटर व्यास असलेले, ४४ मीटर उंच आणि ४ टन वजन अवकाशात नेण्याची क्षमता असलेले आहे तर अपोलोला घेऊन जाणारे सॅटर्न रॉकेट १० मीटर व्यास, ११० मीटर उंच आणि ४८ टन क्षमतेचे होते. त्यामुळे आपण हे काम अगदी कमी खर्चात करीत आहोत या म्हणण्याला फारसा अर्थ नाही. या क्षेत्रातली आपली प्रगति स्पृहणीय असली तरी आपण प्रगत राष्ट्रांच्या तोडीचे आहोत अशा वल्गना एवढ्यातच करण्यात अर्थ नाही. अपोलोसारखी मिशन्स पाठवणे ही अत्यंत खर्चिक बाब आहे आणि ती चैन आपल्या देशाला परवडण्यासारखी नाही हे आहेच.

Wednesday, July 17, 2019

डाल्टन आणि अणुसिद्धांत"जगातील सर्व पदार्थ कणांपासून तयार झाले आहेत." असे काहीसे कणाद ऋषींनी प्रतिपादन केले होते. पण त्यांचे ते विचार बहुधा त्यांच्या ग्रंथातच राहिले. पुढे त्या विचारांचा प्रसार भारतातही झाला नाही. निदान मला तरी या एका वाक्याच्या पलीकडे फारशी माहिती अजूनपर्यंत मिळालेली नाही. डेमॉक्रिटस या ग्रीक विचारवंतानेही अशी कल्पना मांडली होती. तीही कल्पना तशीच राहिली. अणू हा इतका सूक्ष्म असतो की तो कुठल्याही सूक्ष्मदर्शक यंत्रामधूनसुद्धा प्रत्यक्ष डोळ्यांना दिसूच शकत नाही. अठराव्या शतकातल्या जॉन डाल्टन या शास्त्रज्ञानेसुध्दा कल्पनेमधूनच पण सविस्तर असा अणुसिद्धांत मांडला, अणूच्या स्वरूपाबद्दल आणि गुणधर्माबद्दल काही ठाम मते मांडली, तिच्यावर तत्कालीन शास्त्रज्ञांनी विचारविमर्श करून त्याला मान्यता दिली, त्या सिद्धांताच्या आधारावर रसायनशास्त्राची उभारणी केली गेली आणि विज्ञानाच्या प्रगतीमध्ये तो एक अत्यंत महत्वाचा टप्पा ठरला.

जॉन डाल्टन या शास्त्रज्ञाचा जन्म इंग्लंडमधल्या एका लहान गावातल्या एका विणकराच्या घरात सन १७६६मध्ये झाला. त्याचे कुटुंब क्वेकर नावाच्या एका बंडखोर पंथाचे होते. त्या काळातल्या रूढीवादी ख्रिश्चनांनी या पंथातल्या लोकांना जवळ जवळ वाळीत टाकले होते आणि तिथली शिक्षणव्यवस्था त्यांच्या आधीन होती. त्यामुळे डाल्टनला सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी असलेल्या कॉलेज आणि युनिव्हर्सिटीत जायला मिळाले नाही. पण त्या तल्लख बुद्धी असलेल्या मुलाला मनापासून विद्येची अतीव ओढ असल्यामुळे त्याने इतर क्वेकर विद्वानांकडून शिकून आणि पुस्तके वाचून स्वतःच्या प्रयत्नामधूनच अनेक विषयांचे खूप सखोल ज्ञान संपादन केले. इतकेच नव्हे तर त्याने पंधरा वर्षांच्या लहान वयातच क्वेकर पंथाच्या खास संस्थांमध्ये ते विषय शिकवायला सुरुवात केली.

सुरुवातीला डाल्टनला गणित आणि हवामानशास्त्राचा अभ्यास करण्याची गोडी लागली होती. त्याने हवेचा दाब, तापमान, आर्द्रता वगैरेंचा अभ्यास करून आपली निरीक्षणे एका डायरीच्या स्वरूपात प्रसिद्धही केली. त्यात होत असलेल्या बदलांच्या निरीक्षणांसाठी त्याने अनेक उंच डोंगरांवर चढाई केली. हवेच्या दाबामधील फरकावरून डोंगराच्या उंचीचा अंदाज करण्याचे एक तंत्र त्याने तयार केले आणि त्या काळात अशी उंची मोजण्याची दुसरी कसली सोय नसल्याने ते तंत्र लोकांना आवडले. डाल्टन जन्मतःच थोडा रंगांध (color blind) होता. तरीही त्यांने रंगांधळेपणा किंबहुना रंग आणि दृष्टी याच विषयावर संशोधन केले आणि ते प्रसिद्ध केले. एका प्रकारच्या दृष्टीदोषालाच डाल्टनिझम असे नाव पडले.

हवेच्या गुणधर्मांचा अभ्यास करतांना त्याने अनेक प्रयोग करून पाहिले. चार्ल्स आणि गे ल्यूसॅक या फ्रेंच शास्त्रज्ञांप्रमाणेच त्यानेही निरनिराळ्या वायूंना वेगवेगळे किंवा एकत्र तापवून त्यांचे आकारमान आणि दाब यावर ऊष्णतेचा काय परिणाम होतो याचा अभ्यास केला आणि त्याच्या नोंदी करून ठेवल्या. पण चार्ल्सप्रमाणेच डाल्टननेही त्या लगेच प्रसिद्ध केल्या नाहीत. पुढे गे ल्यूसॅकने चार्ल्सच्या नियमाला प्रसिद्धी मिळवून दिली आणि त्याच्या आधाराने स्वतःचा सिद्धांतही मांडला. डाल्टनच्या बाबतीत तसे काही झाले नाही. पण त्याने एक जास्तीची गोष्ट केली होती. निरनिराळे वायू आणि निरनिराळ्या द्रव पदार्थांच्या वाफा यांचा अभ्यास केल्यावर ते सगळे वायूरूप पदार्थ निरनिराळ्या तपमानांना सारख्याच प्रमाणात प्रसरण पावतात आणि बंद पात्रातला त्यांचा दाब तितक्याच प्रमाणात वाढतो हे त्याच्या लक्षात आले. त्यावरून सन १८०३ मध्ये त्याने आपला सुप्रसिद्ध आंशिक दाबाचा सिद्धांत  (Law of Partial Pressures) मांडला. या नियमानुसार वायूंच्या मिश्रणाचा दाब हा त्यामधील प्रत्येक वायूच्या आंशिक दाबांच्या बेरजेइतका असतो. हवेमधील वाफेचा आंशिक दाब शून्य अंशापासून १०० अंशांपर्यत कसा वाढत जातो हे डाल्टनने प्रयोग करून पाहिले आणि कोष्टकांमधून सांगितले.

निरनिराळ्या वायूंमधील रासायनिक क्रियांमुळे होणारे संयोग त्यांच्या आकारमानांच्या ठराविक प्रमाणातच होतात असे गे ल्यूसॅकने दाखवून दिले होते. त्याच्या पुढे जाऊन वायुरूप, द्रवरूप किंवा घनरूप अशा कोणत्याही दोन मूलद्रव्यांमधील रासायनिक क्रियांमुळे होणारे संयोग त्यांच्या वजनांच्या ठराविक प्रमाणातच होतात असे डाल्टनने सप्रयोग दाखवून दिले. असे का होत असेल यावर खूप विचार करून त्याने सन १८०८ मध्ये अत्यंत महत्वाचा अणुसिद्धांत मांडला. हा सिद्धांत असा आहे.
१. सर्व मूलद्रव्ये अत्यंत सूक्ष्म अशा अणूंची बनलेली असतात.
२. प्रत्येक मूलद्रव्याचे सर्व अणू एकसारखे असतात.
३. निरनिराळ्या मूलद्रव्यांच्या अणूंचे गुणधर्म वेगवेगळे असतात.
४. अणू निर्माण करता येत नाहीत किंवा नष्ट करता येत नाहीत.
५. रासायनिक क्रियांमध्ये भिन्न मूलद्रव्यांचे अणू एकत्र येतात किंवा वेगवेगळे होतात.
६. दोन अणूंचा ठराविक सोप्या प्रमाणातच संयोग होतो.

डाल्टनच्या या सिद्धांतामुळे C + O2 = CO2 यासारखी रासायनिक क्रियांची समीकरणे लिहिणे शक्य झाले आणि त्यावर आधारलेल्या पद्धतशीर आणि नियमबद्ध रसायनशास्त्राचा विकास होत गेला. काही आम्ले, अल्कली, क्षार यासारख्या निरनिराळ्या रसायनांची निर्मिती आणि त्यांचा उपयोग किंवा त्यांच्यावर प्रयोग करणे ही कामे पूर्वीपासून होत आली होती. पण ती सगळी कामे किमया, चमत्कार, जादू, करणी वगैरेसारखी अद्भुत आणि अनाकलनीय समजली जात होती. लेव्होजियर, बॉइल आणि डाल्टन या शास्त्रज्ञांनी त्यांना मूलभूत सैद्धांतिक बैठक दिली. यामुळेच लेव्होजियरप्रमाणेच डाल्टनलाही आधुनिक रसायनशास्त्राचा जनक समजले जाते. अशा प्रकारे डाल्टनच्या नियमामधून रसायनशास्त्राचा पाया घातला गेला आणि त्याचा पुढे विस्तार होत गेला.


Saturday, June 22, 2019

खगोलशास्त्रज्ञ विलियम आणि कॅरोलिन हर्शलचक्षुर्वैसत्यम् म्हणजे आपण जे जे डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहतो ते खरे असतेच असे समजले जाते आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो. आजूबाजूच्या जगाबद्दल आपल्याला सर्वात जास्त माहिती आपल्या दृष्टीमधूनच मिळत असते आणि आजूबाजूला काय काय आहे, कसे कसे आहे, त्यात काय काय बदल होत असतात हे पाहूनच आपण त्यातून शिकत असतो. पण या जगातल्या सगळ्याच गोष्टी जशा सर्वांना दिसत असतात तशा त्या प्रत्यक्षात नसतात. काही चाणाक्ष शास्त्रज्ञ मात्र वेगळा विचार करतात, त्या विचाराचा पाठपुरावा करून संशोधन करतात आणि त्यामागे असलेले क्रांतिकारक सत्य जगापुढे आणतात.

उदाहरणार्थ रोज सकाळी पूर्व दिशेला सूर्य उगवतो, तो दुपारी डोक्यावर येतो आणि संध्याकाळी पश्चिम दिशेला मावळतो. पण कोपरनिकसने यापेक्षा वेगळा विचार केला आणि खरे तर सूर्य आपल्या जागेवरच असतो, पण पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे आपल्याला सूर्याच्या दिवसभरातल्या चालण्याचा भास होतो हे तर्काने सिद्ध करून दाखवले, तसेच पृथ्वीसहित इतर ग्रह सूर्याभोवती फिरत असतात हेही लिहून ठेवले. पण आपल्या डोळ्यांना तसे होतांना दिसत नाही यामुळे त्याच्या सांगण्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही हे त्याला माहीत असल्यामुळे त्याने त्या माहितीचा फारसा गवगवा केला नाही. तो जीवनाचे अंतिम क्षण मोजत असतांना त्याच्या मित्रांनी त्याचे लेखन दबकत दबकत प्रसिद्ध केले. त्याच्या नंतर आलेल्या केपलर, ब्राहे, गॅलीलिओ, न्यूटन आदि शास्त्रज्ञांनी विरोधाला न जुमानता त्याचे हे मत ठामपणे उचलून धरलेच, त्यावर सखोल संशोधन करून त्यात महत्वाच्या माहितीची भर टाकली. त्यांच्या संशोधनामधून विज्ञानाचे क्षेत्र विस्तारत गेले. त्यांच्याच पठडीमधल्या विलियम हर्शल आणि कॅरोलिन हर्शल या खगोलशास्त्रज्ञांनी आणखी काही महत्वाचे शोध लावले.

फ्रेडरिक विलियम हर्शल आणि कॅरोलिन हर्शल यांचा जन्म जर्मनीतल्या हॅनोव्हर या गावी झाला. पण त्यांच्या कुटुंबाने इंग्लंडमध्ये स्थलांतर केले. त्यामुळे इंग्लंड हे या दोघांचे कार्यक्षेत्र झाले. विलियम अत्यंत हुशार, कुशल, हरहुन्नरी आणि कष्टाळू होता. त्याने आपल्या जीवनाची सुरुवात एक वादक आणि संगीतकार म्हणून केली. तो व्हायोलिन आणि ऑर्गन यासारखी वाद्ये वाजवण्यात निपुण झालाच, संगीतकार म्हणून स्वतःच्या रचनाही करायला लागला. पुढे शास्त्रीय संगीताचा अभ्यास करण्यासाठी त्याने ध्वनिशास्त्राचा अभ्यास केला, तो करत असतांना त्याचे लक्ष विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे वळले आणि त्याला त्या विषयांची आणि त्यातल्या खगोलशास्त्राची गोडी लागली. कलाकुसरीची आवड असल्यामुळे त्याने धातूंना घासून घासून त्यांचे आरसे तयार करण्याच्या कलेचा अभ्यास केला, त्यातही अप्रतिम कौशल्य मिळवले आणि रात्रंदिवस काम करून स्पेक्युलर नावाच्या धातूचे उत्कृष्ट अंतर्गोल आरसे तयार केले, तसेच त्यांचा उपयोग करून लहानमोठ्या अनेक दुर्बिणी तयार केल्या. ते काम करत असतांना त्याने एका नव्या प्रकारच्या दुर्बिणीचे डिझाइनही केले. त्या प्रकाराला हर्शलच्या नावानेच ओळखले जाते. हर्शल भावंडांनी त्या काळातल्या जगामधल्या सर्वात उत्कृष्ट अशा दुर्बिणी तयार करून त्या निरनिराळ्या हौशी किंवा व्यावसायिक ग्राहकांना आणि प्रयोगशाळांना पुरवल्या.

विलियमने सन १७७३मध्येच स्वतः आकाशाचे निरीक्षण करायला सुरुवात केली आणि शनी या ग्रहाभोवती असलेली कंकणे आणि ओरियन तेजोमेघ (नेब्युला) यांची त्याने केलेली निरीक्षणे तज्ज्ञांपुढे मांडली. त्याचे सर्व विद्वानांकडून कौतुक झाले. त्यानंतर त्याने जोडताऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आणि अशा प्रकारचे अनेक जोडतारे शोधून काढून त्यांची जंत्री (कॅटलॉग) तयार केली. त्याने हे दुहेरी तारे फुगडी घातल्याप्रमाणे एकमेकांभोवती फिरत असावेत असा अंदाज केला. तो अधिकाधिक शक्तीशाली दुर्बिणी तयार करत आणि जमवत गेला आणि त्यांमधून आकाशाचे बारकाईने निरीक्षण करून तारांगणाची अधिकाधिक महिती गोळा करत गेला. त्याने तारकांचे समूह आणि तेजोमेघ यांच्यात स्पष्टता आणली. आकाशातले हजारो तारे, तेजोमेघ आणि दीर्घिका (गॅलॅक्सी) यांची समग्र माहिती एकत्र करून त्याने ते सविस्तर कॅटलॉग खगोलशास्त्रज्ञांसाठी उपलब्ध करून दिले. या संग्रहणाच्या आणि त्याच्या मांडणीच्या संबंधातले बहुतेक सगळे किचकट काम त्याची लहान बहिण कॅरोलिन हिने केले.

पूर्वीच्या काही शास्त्रज्ञांना युरेनस हा ग्रह केंव्हा केंव्हा साध्या डोळ्यानेही दिसला होता म्हणे, गॅलीलिओने त्याला आधी दुर्बिणीमधून पाहिले होते, पण तो जागचा हलत नसल्यामुळे त्या लोकांना तो एक अंधुक असा तारा वाटला होता. हा ग्रह सूर्याभोवती ८४ वर्षांमध्ये एक प्रदक्षिणा घालतो. अर्थातच त्याचा वेग मंदगति शनीपेक्षाही कितीतरी कमी असतो. हर्शललासुद्धा तो आधी धूमकेतू असावा असे वाटले होते, पण चिकाटीने त्याचे दीर्घकाळ निरीक्षण केल्यानंतर तो शनीच्या पलीकडे असलेला सूर्याचा सातवा ग्रहच आहे असे हर्शलने ठामपणे सांगितले. यामुळे त्याला युरेनसचा शोध लावल्याचे श्रेय दिले जाते. फ्रेंच लोकांनी तर या ग्रहाला हर्शलचे नावही दिले होते. पुढे सर्व शास्त्रज्ञांनी मिळून त्याला युरेनस हे ग्रीक पुराणातल्या देवतेचे नाव दिले.

सन १८००मध्ये विलियम हर्शलनेच अवरक्त किरणांचा (इन्फ्रा रेड रे) शोध लावला. डोळ्यांना न दिसणारे असेही प्रकाशकिरण असतात ही कल्पनाच त्या वेळी नवीन होती. "दिसते तसे नसते" या प्रमाणेच "दिसत नसलेलेसुद्धा असते" याचे हे एक उदाहरण. जॉन रिटर याने त्याच्या पुढल्या वर्षी अतिनील (अल्ट्रा व्हायोलेट) या अदृष्य किरणांचा शोध लावला. त्यानंतर क्ष किरण, गॅमा रे, रेडिओ लहरी वगैरेंचे शोध लागत गेले आणि अनेक प्रकारांचे किरण असतात हे समजले. पण या वेगळ्या क्षेत्राची सुरुवात हर्शलने करून दिली.

विलियम हर्शलची धाकटी बहीण कॅरोलिन ही जन्मभर आपल्या भावाची मुख्य सहाय्यक होती. तिने आपल्या भावाला आरसे घासून दुर्बिणी तयार करण्यापासून ते आकाशातली निरीक्षणे टिपून ठेवून ती व्यवस्थितपणे लिहून काढण्यापर्यंत सर्व कामात मदत केलीच. रात्री अपरात्रीच्या वेळी अडचणीच्या जागी बसून किंवा उभा राहून अवाढव्य अशा दुर्बिणीमधून बघून विलियमने त्याला काय दिसते ते पहायचे आणि शेजारी असलेल्या कॅरोलिनला ते सांगायचे आणि तिने ते समजून घेऊन अचूक टिपून घ्यायचे अशा प्रकारे त्यांचे संशोधन चालले होते. तिने स्वतंत्रपणे स्वतःही काही धूमकेतूंचे शोध लावले. विलियमच्या मृत्यूनंतरही कॅरोलिन आपले आकाशाचे संशोधन करतच राहिली. विलियम हर्शलला खगोलशास्त्राच्या क्षेत्रातले सर्वोच्च सन्मान मिळत गेले, तसा कॅरोलिनचाही यथोचित गौरव झाला. अशी ही एक पहिलीच संशोधक भाऊबहिणीची जोडी विज्ञानाच्या क्षेत्रात चमकून गेली.


Monday, June 03, 2019

एडवर्ड जेन्नर आणि लसीकरणाची सुरुवात


प्राचीन काळापासून माणसाला आजार होत आले आहेत आणि तो त्यावर उपचारही करत आला आहे. रोगांच्या लक्षणावरून त्यांचे निदान करणे आणि त्यावर योग्य औषधोपचार करणे या बाबतीत भारतीय वैद्यराजांनी खूप मोठे काम करून आयुर्वेद तयार केला. त्यात अनेक रोगांची लक्षणे आणि त्यावरील उपचार सांगितले आहेत. त्यांचा उपयोग आजवर केला जात आहे. योग्य आहार, व्यायाम आणि प्राणायाम वगैरे करून निरोगी राहण्याचे मार्गदर्शनसुद्धा आयुर्वेदामध्ये केले आहे.  चीन, मध्यपूर्व आणि युरोपमध्येसुद्धा डॉक्टर किंवा हकीम या पेशाचे तज्ज्ञ तिथल्या रोग्यांना तपासून त्यांच्यावर निरनिराळ्या पद्धतीचे उपचार करत असत. असे असले तरी एकादा आजार नेमका कशामुळे होतो हे सांगणे त्या मानाने कठीण होते आणि तो होऊ नये यासाठी आधीच प्रतिबंधात्मक उपाय करणे त्याहूनही अवघड होते. त्या बाबतीत फारशी माहितीच उपलब्ध नव्हती. शरीराचे कार्य खाण्यापिण्यामधून किंवा इतर काही कारणाने बिघडले तर व्याधी होतात इथपासून ते पूर्वजन्माचे प्राक्तन असते किंवा चेटूक, करणी वगैरेमुळे रोग होतात इथपर्यंत अनेक कारणे दिली जात होती, पण सूक्ष्मदर्शक यंत्रांचा शोध लागेपर्यंत अतीसूक्ष्म असे रोगजंतू असतात हेच ठाऊक नव्हते. त्यामुळे त्यांच्यामुळे रोग होत असतील असा विचारच कुणाच्या मनात येत नव्हता. गेल्या दोनशे वर्षांमध्ये रोगांना प्रतिबंध करण्याच्या दिशेने बरीच प्रगति झाली आहे आणि जुन्या काळातले बरेचसे साथीचे आजार आता आटोक्यात आले आहेत. इंग्लंडमधले डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांनी या क्षेत्रातले पहिले मोठे पाऊल टाकले. व्हॅक्सिनेशन या रोगप्रतिबंधक क्रियेचे ते जनक मानले जातात.

एडवर्ड जेन्नर (१७४९ ते १८२३) याचा जन्म इंग्लंडमधल्या एका ख्रिश्चन धर्मगुरूच्या घरी झाला. त्या काळातही शिक्षणसंस्था आणि चर्च एकत्र असल्यामुळे त्याला व्यवस्थित शालेय आणि कॉलेजचे शिक्षण मिळाले आणि तो एक तज्ज्ञ डॉक्टर होऊन व्यवसाय करायला लागला. त्याबरोबरच नेहमी इतर डॉक्टरांशी संपर्क ठेऊन आणि त्यांच्याबरोबर चर्चा व विचारविनिमय करून त्या क्षेत्रातल्या संशोधनातही तो भाग घेऊ लागला. त्याशिवाय त्याला पशुपक्ष्यांच्या अभ्यासातही रस होता आणि तो निरनिराळे प्राणी आणि पक्षी बाळगून त्यांच्यासोबत वेळ घालवत असे. त्यांच्यावर त्याने लिहिलेल्या अभ्यासपूर्ण लेखांचे कौतुक होत होते. डॉक्टर असल्यामुळे त्याला माणसाच्या शरीरशास्त्राचे ज्ञान होतेच, पशुपक्ष्यांच्या अभ्यासाबरोबर त्यांची शरीरे, त्यांना होणारे रोग याकडेही त्याने बारीक लक्ष दिले.

अठराव्या शतकातल्या काळात स्मॉल पॉक्स किंवा देवी हा युरोपमधला एक प्रमुख घातक आजार होता. या आजाराच्या साथी येत असत तेंव्हा त्याची मोठ्या प्रमाणात लागण होऊन त्यातले खूप रोगी दगावत असत. बरे झाल्यानंतरही त्याचे व्रण त्यांच्या अंगभर रहात असत. त्यामुळे कायमचा विद्रूपपणा येत असे. या रोगाला कसा आळा घालावा हेच समजत नव्हते. अशक्त, दुर्बळ लोकांचे एकाद्या रोगाला बळी पडणे जरासे समजण्यासारखे असते, पण अनेक निरोगी आणि धडधाकट लोकसुद्धा अचानक या आजाराचे बळी पडत होते. त्यामुळे लोकांमध्ये या रोगाची दहशत होती.

या रोगाचा अभ्यास करतांना असे दिसत होते की जो माणूस एकदा देवीच्या आजारातून जगला वाचला असेल त्याला मात्र हा आजार पुन्हा कधी होत नसे. शिवाय जेन्नर आदि डॉक्टरांच्या असेही लक्षात आले की गवळी, गुराखी यासारख्या गायींच्या जवळ रहाणाऱ्या लोकांना देवीचा आजार कमी प्रमाणात होत असे. त्या काळातल्या जनावरांनासुद्धा काऊपॉक्स या नावाचा एक रोग होत होता आणि संसर्गामुळे हा रोग या गवळ्यांनाही होत असे. तो आजारसुद्धा काही प्रमाणात देवीसारखाच होता, पण त्याची तीव्रता देवीच्या मानाने खूप कमी असायची. तो रोग देवीसारखा प्राणघातक नव्हता. या दोन गोष्टीवर विचार करून जेन्नरने एक निर्णय घेतला आणि तो अंमलात आणला. त्या काळातल्या कायद्यांमध्ये असे प्रयोग करणे शक्य होते.

इसवी सन १७९६मध्ये त्याने एका दूधवालीला (मिल्कमेडला) काउपॉक्समुळे झालेल्या फोडामधला पू काढला आणि तो एका माळ्याच्या मुलाच्या हातावर टोचला. यामुळे त्या मुलाला काउपॉक्स होऊन आधी ताप आला पण त्यातून तो लगेच बराही झाला. त्यानंतर जेन्नरने त्या मुलाला देवीच्या रोग्याशी संसर्ग होऊ दिला, पण त्याला त्या रोगाची बाधा मात्र झाली नाही. त्यानंतर जेन्नरने हा प्रयोग इतर अनेक लोकांवर केला आणि तो पूर्णपणे यशस्वी झाला. लोकांच्या मनात देवीच्या रोगाची प्रचंड भीती बसलेली असल्यामुळे लोकही या प्रयोगासाठी तयार होत होते. त्याने जेन्नरचा आत्मविश्वास इतका वाढला की त्याने स्वतच्या लहान बाळालाही या प्रकारचे लसीकरण करून त्याला देवीच्या रोगापासून संरक्षण मिळवून दिले.

जेन्नरने केलेल्या या प्रयोगांना युरोपातसुद्धा खूप प्रसिद्धी मिळाली. त्या काळात इंग्लंडचा शत्रू असलेल्या फ्रान्सचा राजा नेपोलियन यानेसुद्धा जेन्नरचा सन्मान केला. इंग्लंडच्या राजाने तर त्याला प्रोत्साहन आणि आर्थिक सहाय्य दिलेच. यामुळे आपला वैद्यकीय व्यवसाय सोडून मोठ्या प्रमाणात देवीची लस तयार करणे आणि ती जास्तीत जास्त लोकांना टोचणे हेच त्याचे मुख्य काम झाले. या क्रियेला व्हॅक्सिनेशन हे नावही त्यानेच दिले. लसीकरणाच्या मोहिमेमुळे इंग्लंडमधली देवीची साथ आटोक्यात आणता आली आणि लक्षावधी लोकांचे प्राण वाचले, तसेच त्यामुळे होणाऱ्या यातना आणि येणारी विद्रूपता यातून ते वाचले. म्हणूनच इंग्लंडमधल्या १०० श्रेष्ठ लोकांमध्ये जेन्नरची गणना केली जाते.

इथे हे लक्षात घेणे जरूरीचे आहे की सर्व संसर्गजन्य रोग रोगजंतूंमुळे होतात आणि ते संसर्गामधून इतर लोकांमध्ये पसरतात याचा शोध लुइ पाश्चरने नंतरच्या काळात लावला. पण त्याच्याही आधीच एडवर्ड जेन्नरने प्रयोगामधून  त्यातल्या देवी या एका प्रमुख रोगावर प्रतिबंधक उपाय शोधून काढला होता आणि तो सप्रयोग सिद्ध करून दाखवला होता. असंख्य लोकांना त्याचा फायदा झाला होता. त्यानंतर व्हॅक्सिनेशनचा प्रसार जगभर झाला आणि स्मॉलपॉक्स या रोगाचे संपूर्णपणे निर्मूलन करण्यात आले. शरीरातली रोगप्रतिबंधक शक्ती (इम्यूनिटी) कशा प्रकारे काम करते याचा अभ्यास हे वैद्यकीय शास्त्रामधले एक नवे संशोधनाचे क्षेत्र निघाले आणि त्या संशोधनातून इतरही अनेक रोगांसाठी प्रतिबंधक उपाय योजण्यात आले.

-----------------------------------------------------

Thursday, May 30, 2019

आवारा ते . . . . . Avengers


तारकासुर, नरकासुर, बकासुर, अमकासुर, तमकासुर असा एकादा दैत्य अतीशय बलवान आणि उन्मत्त होतो आणि सज्जन लोकांना पिडायला लागतो, त्यांच्यावर जुलुम जबरदस्ती करायला लागतो. ते बिचारे काही करू शकत नाहीत अशा दयनीय अवस्थेत सापडलेले असतांना एकादी देवता किंवा देव अवतार धारण करतो आणि त्या दुष्टाचा संहार करून गरीब लोकांना त्याच्या तावडीतून सोडवतो. अशा प्रकारच्या अनेक गोष्टींनी आपली पुराणे भरलेली आहेत. रामायण व महाभारत या खंडकाव्य़ांमध्ये दुष्ट आणि सुष्ट प्रवृत्तींचे अधिक सविस्तर वर्णन केले आहे आणि त्यांच्यामधील संघर्षातल्या एकेका प्रसंगाचे तपशीलवार वर्णन केले आहे.

पाश्चात्य पुराणातसुद्धा गोलियाथसारखे राक्षस आहेत आणि अरबी सुरस कथांमध्ये अल्लाउद्दिनचा दुष्ट काका तसेच अलीबाबाच्या गोष्टीतले चाळीस चोर आहेत. ते आधी यशस्वी होत असतात, पण गोष्टींचा शेवट त्यांच्या संहाराने होतो. ख्रिश्चन धर्मात अवतार या कल्पनेला थारा नसल्यामुळे रॉबिनहूडसारख्या वीरांच्या दंतकथा तयार झाल्या. या सगळ्या कथांमधली मुख्य गोष्ट दुष्ट वृत्तीचा पराभव आणि सुष्टांचा विजय इथे संपते कारण लोकांना तसाच शेवट हवा असतो. लोक अशाच गोष्टी  आपल्या मुलांना किंवा शिष्यांना सांगतात आणि ते त्यांच्या मुलांना आणि शिष्यांना सांगतात अशा तीन पिढ्या तर मीच पाहिल्या आहेत. या प्रकारे होत असलेल्या प्रसारातूनच अशा गोष्टी गेली हजारो वर्षे टिकल्या आहेत.

मुद्रणाची सोय नसतांना सगळे हातानेच लिहावे लागत असल्यामुळे पुराणांच्या पोथ्या दुर्मिळ असायच्या. कोणी शास्त्री, पुराणिक त्या वाचून दाखवत असत, तसेच कीर्तन किंवा प्रवचनांमधून गावातल्या लोकांना सांगत असत. ग्रामीण भागात लोकप्रिय असलेले पोवाडे किंवा वग यामधूनसुद्धा अशाच आशयाच्या गोष्टी तिखटमीठ लावून सांगितल्या जात असत आणि तिथे प्रेक्षक त्यांना टाळ्याशिट्यांनी दाद देत असत.

पुस्तकांची छपाई सुरू झाल्यानंतर कथा, कादंबऱ्या, नाटके आदिंमधून नवनव्या गोष्टी लिहून प्रसिद्ध करण्याला बहर आला. मराठी नाट्यसृष्टी निर्माण झाल्यानंतर त्याचच्या सादरीकरणाची नवी सोय झाली. त्यानंतर सिनेमा आला आणि मनोरंजनाचे मुख्य साधन झाला. पुढे टेलिव्हिजन, इंटरनेट वगैरे माध्यमे येत गेली. या सर्व ठिकाणच्या गोष्टींमधला तपशील बदलला तरी सुष्टदुष्ट हा मुळातला गाभा तसाच राहिला. काही ठिकाणी याच्या विपरीत झालेले दाखवले गेले तरी ते लोकांच्या मनाला भावत नाही.

माझ्या लहानपणच्या काळात म्हणजे साठपासष्ठ वर्षांपूर्वी दिलीपकुमार आणि राजकपूर हे नट आघाडीवर होते. त्यातल्या आजाद, गंगाजमुना यासारख्या दिलीपकुमारच्या सिनेमांना उत्तर भारतातल्या ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असायची तर आवारा, श्री ४२०, अनाडी यासारख्या राजकपूरच्या सिनेमातल्या बहुतेच घटना मुंबईतच घडत असत. बदल म्हणून कधी राजकपूरही चंबळच्या खोऱ्यात जाऊन "जिस देश में गंगा बहती है" म्हणायचा किंवा थंड हवेच्या ठिकाणी 'आह' भरायचा तर दिलीपकुमार सुटाबुटात स्मार्टपणे वावरायचा. ते काहीही असले तरी कथानकांमध्ये नायकनायिकांच्या जोडीला खलनायक हवाच. मग तो खेड्यातला जमीनदार, साहूकार किंवा डाकूंचा सरदार असेल किंवा शहरातला दादा, बदमाश, स्मगलर किंवा धनाढ्य व्यापारी, कारखानदार असेल. सुरुवातीपासून पहिल्या नव्वद टक्के भागात खलनायकाची सरशी आणि शेवटी काही चमत्कार होऊन त्याचा पाडाव हा ठरलेला फॉर्म्यूला असायचा.

प्रेक्षकांना काही वेगळी प्रेक्षणीय स्थळे दाखवण्यासाठी गोष्टींमध्ये सिमला, दार्जिलिंग, उटी वगैरे हिल स्टेशन्स किंवा गोवा, केरळ, लक्षद्वीप यासारखे सागरकिनारे आणले गेले. सिनेमा उद्योगाची आर्थिक परिस्थिती जरा बरी झाल्यानंतर थेट काश्मीरची पार्श्वभूमी आणली. त्यात आणखी सुधारणा झाल्यावर स्विट्झर्लंड, पॅरिस, लंडन, टोकियो करत सिनेमा इंटरनॅशनल झाला आणि त्यासोबतच खलनायकांचेसुद्धा प्रमोशन होऊन ते आंतरराष्ट्रीय टोळ्यांचे म्होरके झाले. वेगळ्या जागीही सिनेमातला सुष्टदुष्टांचा संघर्ष राहिलाच.

पण हे फक्त भारतातच होत असते असे नाही. मला जेंव्हापासून इंग्रजी वाचायला यायला लागले त्या काळापासून मी फँटम आणि मँड्रेकच्या कॉमिक्स वाचत आलो आहे. पुढे अॅस्टेरिक्स आणि टिनटिन आवडायला लागले. त्यातच हीमॅन, बॅटमॅन, सुपरमॅन आणिक कोणकोणते मॅन यांचे दौरे आले. या सगळ्या गोष्टींमध्ये 'गुड व्हर्सेस ईव्हिल' याच गाभ्यावर आधारलेल्या निरनिराळ्या गोष्टी असायच्या आणि अखेरीस गुडने बॅडवर मात केली की वाचक खुश ! इंग्रजी सामाजिक सिनेमांच्या गोष्टी त्याच तालावर असायच्या. युद्धपटांमध्ये जर्मनीजपान हे व्हिलन असल्यामुळे ते सगळे वाईट आणि ब्रिटिश अमेरिकन हीरो असे दाखवले जायचे.

युरोपअमेरिकेमधले लोक आपल्या दृष्टीने 'फॉरेन'मधे रहातच असल्यामुळे त्यांना बर्फाचे डोंगर किंवा उंच इमारती, प्रशस्त रस्ते वगैरेंचे काय कौतुक असणार? त्यांच्यासाठी अमेझॉनचे घनदाट जंगल किंवा पॅसिफिक महासागराच्या तळाशी असलेली झुडुपे अशा गोष्टी दाखवल्या गेल्या, पण त्या तरी किती पाहणार? मग त्यांची नजर अवकाशाकडे वळली. परग्रहावरून उडत्या तबकड्यांमधून आलेले माणसांसारखे एलियन्स किंवा विचित्र आकारांचे प्राणी यांच्या फिल्म्स आल्या. जुरासिक पार्कमध्ये लक्षावधी वर्षांपूर्वी नष्ट झालेले अजस्त्र डायनोसॉरस आणि इतर काही सॉरस पुन्हा भूमीवर अवतरले. 

पंचवीस वर्षांपूर्वी आलेली स्टार ट्रेक ही सीरियल चांगली हिट झाली. त्यातले कॅप्टन कर्क, मि.स्पॉक, डॉ.मॅकॉय आणि इतर क्र्यू मेंबर्स स्टारशिप यू एस एस एंटरप्राइज या स्पेसशिपमध्ये बसून निरनिराळ्या ग्रहावरील राक्षसांचे दमन करत असत. त्यांच्याकडे अनेक नवनव्या प्रकारची शस्त्रे असत तसेच हवे तेंव्हा एका ठिकाणी अदृष्य होऊन दुसऱ्याच ठिकाणी जाऊन प्रगट होण्याची कला असायची. या मालिकेत सायन्स फिक्शनचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला.

आल्बर्ट आइनस्टाइनने सापेक्षतावादाचा शोध लावल्यावर त्यातून निघालेल्या निष्कर्षांमधून टाइम मशीनची अफलातून कल्पना निघाली. या मशीनमध्ये बसून नायक, नायिका तसेच खलनायक क्षणार्धात शेकडो वर्षे भविष्यात किंवा भूतकाळात जाऊन वावरायला लागले. मग त्या काळात त्यांनी केलेल्या उचापतींचे वर्तमानकाळात काय परिणाम होतात यावर कल्पनेच्या भराऱ्या मारल्या गेल्या. हेही एक प्रकारचे सायन्स फिक्शन होते.

संगणकक्रांतीमुळे इतर क्षेत्रांप्रमाणेच मनोरंजनाच्या क्षेत्रातही उलथापालथ झाली. पूर्वी निरनिराळ्या पात्रांसाठी चित्रविचित्र पोशाख करावे लागत असत आणि त्याला मर्यादा असायच्या. ट्रिकसीन्ससाठी काही चमत्कार अरेंज करून दाखवावे लागायचे त्यासाठी भरपूर कष्ट करावे लागत असत. आता कॉंप्यूटर ग्राफिक्सच्या सहाय्याने कुठल्याही आकाराचे विचित्र प्राणी आणि पक्षीसुद्धा तयार करून त्यांना वाटेल तसल्या हालचाली करतांना दाखवता येतात.

सुपरमॅन, बॅटमॅन वगैरे हीरो एकएकटे संघर्ष करत असत. मार्वेल कॉमिक्सने अॅव्हेंजर्स नावाची अशा वीरांची टोळीच तयार केली. कॅप्टन अमेरिका, ब्लॅक विडो, हल्क, ठोर, आयर्नमॅन, ब्लॅक नाइट इत्यादी अनेक सुपर हीरोज मिळून अख्ख्या गॅलॅक्सीचे रक्षण करत असतात. मार्वेलने अॅव्हेंजर्सच्या सिनेमांची एक मालिका सुरू केली. मागील महिन्यात रिलीज झालेल्या अॅव्हेंजर्स - दि एंड गेम या सिनेमात सगळा मसाला ठासून भरला होता. निरनिराळ्या उपग्रहांवरील विचित्र आणि भयानक आकारांचे पशुपक्षी, किडेमुंग्या आणि टाइममशीनमधून हवे तेवढे भूतकाळात किंवा भविष्यकाळात जाण्यायेण्याची सोय, अनेक प्रकारची महाभयंकर शस्त्रास्त्रे वगैरेंमुळे त्यात प्रचंड वैविध्य आले आहे, थ्रीडीव्हिजन, सराउंड साउंड वगैरेमुळे ते सगळे चित्तथरारक प्रकार अगदी आपल्या आसपास घडत असल्याचा भास होतो. अशा सगळ्या गुणांनी युक्त असा हा सिनेमा जगातल्या हजारो थेटरांमध्ये एकदम प्रदर्शित झाला आणि तो पाहणाऱ्यांच्या गर्दीचे आणि उत्पन्नाचे जागतिक रेकॉर्ड्स मोडत चालला. पुण्यातल्याच अनेक मॉल्समधील मल्टिस्क्रीन थिएटरमधील सगळे ५-६ पडदे या सिनेमाला दिले होते आणि एरवी दिवसाकाठी होणारे चार पाच खेळसुद्धा हाउसफुल होत असल्याने शनिवार रविवारी आणखी जादा खेळ ठेवले होते.

थॅनोस नावाचा महाविध्वंसक राक्षस अद्भुत शक्तीशाली इन्फिनिटी स्टोन्सच्या सहाय्याने सगळ्या विश्वामधील अर्धी जीवसृष्टी गायब करतो तेंव्हा टोनी स्टार्क, नेब्यूला, बॅनर, स्टीव्ह, ठोर, नताशा, लँग्ज वगैरे अनेक अॅव्हेंजर्स एकत्र येऊन लढा देतात. टाइम मशीनमधून मागे जाऊन ते स्टोन्स काबीज करतात आणि नष्ट झालेल्या जीवांना परत आणतात, पण थॅनोस आपल्या सैन्यानिशी त्यांच्या ग्रहावर हल्ला करतो. त्याच्याशी घनघोर लढाई होते त्यात अनेक उलथापालथी झाल्यानंतर अखेरीला स्टार्क हा अॅव्हेजर त्या स्टोन्सचाच उपयोग करून थॅनोसला नष्ट करतो, पण त्यातून निघालेल्या अपार ऊर्जेमुळे त्याचाही बळी जातो. मात्र बाकीचे विश्व सुरक्षित राहते. अशा प्रकारे शेवट गोड होतो आणि सगळे प्रेक्षक आनंदात घरी जातात.

मी या मालिकेतला हा पहिलाच चित्रपट पाहिला असल्यामुळे अनभिज्ञ होतो, पण मुख्यतः किशोरवयातले आणि युवा प्रेक्षक प्रत्येक अॅव्हेंजर हीरो पडद्यावर दिसला रे दिसला की टाळ्या आणि किंकाळ्यांनी त्याचे स्वागत करत होते आणि त्याने केलेल्या प्रत्येक प्रहारावर गलका करून थिएटर डोक्यावर घेत होते. अशा प्रकारचा प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मी पहिल्यांदाच पहात होतो. मला मात्र मुख्य पात्रेच ओळखीची नसल्यामुळे थेटरमधल्या आरडाओरडीमधूनच आलेले पात्र सुष्ट आहे की दुष्ट आहे त्याचा अंदाज होत होता. मला तर सगळेच अक्राळ विक्राळ दिसत होते किंवा त्यांनी तसले मुखवटे लावले होते. जे त्यातल्या त्यात जास्त भयानक आणि हिडीस आणि कुत्सित किंवा विकराल हास्य करणारे ते दुष्ट राक्षस अशी मी एक खूणगाठ बांधून घेतली होती, पण केंव्हा केंव्हा माझा अंदाज चुकतही होता. मुख्य खलनायकाने कितीही विध्वंस केला तरी शेवटी त्याचा नाश होणारच हा माझा अंदाज मात्र बरोबर ठरला.


Friday, May 17, 2019

स्मृती ठेउनी जाती - भाग १६ - तात्या अभ्यंकर

स्व.तात्या अभ्यंकर यांना त्यांच्या चाहत्यांनी  मनोगत, फेसबुक आणि मिसळपाव या स्थळांवर दिलेल्या श्रद्धांजलींचे एक संकलन इथे वाचा.

तेरा वर्षांपूर्वी रिटायर झाल्यानंतर मला आंतर्जालावर भटकायला भरपूर वेळ मिळायला लागला. त्या काळात मराठीमधून तिथे लिहिण्याची सुरुवातच होत होती. ते पाहून लहानपणापासून माझ्या मनात दडून बसलेली एक ऊर्मी उफाळून आली आणि मी माझा ब्लॉग सुरू केला. पण त्या काळात तो कोणी वाचतात का ते मला समजायला मार्ग नव्हता. कुणालाही मुक्त प्रवेश असलेल्या मनोगत या संकेतस्थळाची माहिती मला काही दिवसांनी मिळाली आणि मी चाचपडतच मनोगतवर प्रवेश केला. इथले सदस्य तिथे आलेले बहुतेक लेखन कसेही असले तरी वाचत असत आणि लगेच त्यावर कॉमेंट्सही देत असत.

तेंव्हा तिथे छोटा डॉन, पिवळा डँबिस, ३.१४विक्षिप्त, चित्त, केशवसुमार, अत्त्यानंद अशांसारखी नावे धारण करणारी दादा मंडळी होती आणि काही लोक आपल्या खऱ्या नावानेही तिथे वावरत असत. त्यांच्याबरोबर एक विसोबा खेचर होता. त्याचे कधी अत्यंत खुसखुशित तर कधी सडेतोड किंवा घणाघाती लिखाण मला खूप आवडायचे. संगीतावर लिहितांना तो खूप समरस होऊन त्यातले बारकावे समजाऊनही सांगत असे. नंतरच्या काळात त्याने रौशनी या नावाची एक दीर्घकथा लिहिली. सुरुवातीच्या काळात मनोगतवर त्याचा रोजचा वावर होता आणि निरनिराळ्या लोकांनी टाकलेल्या पोस्टांवरसुद्धा तो तुफान फटकेबाजी करत असे, कुणाची टोपी उडव, कुणाच्या पंच्याला हात घाल वगैरे त्याचे उद्योग बहुतेक सगळेजण मोकळेपणाने घेत असत कारण त्यात निखळ विनोद असायचा, कुजकटपणा किंवा द्वेश नसायचा. थोड्याच अवधीत मीसुद्धा त्याचा फॅन झालो होतो.

मनोगतवरील लेखांवर होत असलेल्या टोलवाटोलवीचे रूपांतर कधी कधी व्यक्तीगत भांडणांमध्ये व्हायला लागले ते पाहून तत्कालीन संचालकांनी एक प्रकारची सेन्सॉरशिप जाहीर केली. त्यामुळे प्रत्येक लिखाण किंवा त्यावरील टीका, टोमणे वगैरे आधी कुणीतरी नजरेखालून घातल्यानंतर ते प्रकाशित करायचे असे त्याचे स्वरूप झाले. पण स्पॉंटेनियटी हा तर त्या वादविवादांचा जीव होता. ती उत्स्फूर्तता गेली तर ते स्थळ निर्जीव किंवा सपक झाले असते. यावर विचार करण्याच्या निमित्याने विसोबाच्या पुढाकारातूनच एकदा मनोगतचा कट्टा जमवायचे ठरले. (ही गोष्ट मला आता समजली.) मनोगतवर वावर असलेली ही मंडळी आहेत तरी कोण? याची मला उत्सुकता असल्याने मीही त्याला हजेरी लावली.

ठाण्यातल्या एका प्रशस्त घरात आम्ही २०-२५ जण जमलो होतो. तिथे मला कळले की या अवलियाचे खरे नाव तात्या अभ्यंकर असे आहे. गोरा गोमटा, अंगाने स्थूल, चेहऱ्यावर बेदरकारीचा आणि तितकाच आपुलकीचा भाव, मनमोकळे अघळपघळ बोलणे वगैरेंनी युक्त अशा तात्याचे माझ्यावर पहिले इंप्रेशन चांगले पडले. आम्हा दोघांच्या वयात २०-२५ वर्षांचा फरक असला तरी आमचे बरे सूत जमले. तात्या तर त्या कट्ट्याचा संयोजक, सूत्रसंचालक आणि प्रमुख पाहुणा वगैरे सबकुछ होता. त्याने आपुलकीने सर्वांची चांगली आवभरत केली, आपल्या विनोदी बोलण्यामधून थट्टामस्करी करत सर्वांना हसत खेळत ठेवलेच, थोडी तात्विक चर्चाही केली आणि थोडा बिहाग रागही गाऊन दाखवला. सगळ्या अनोळखी लोकांनी जमवलेला तो कट्टा म्हणजे माझ्यासाठी एक विलक्षण आणि संस्मरणीय असा अनुभव होता. तिथे मला पहिल्यांदा भेटलेले काही सदस्य माझे जन्मभराचे मित्र झाले.

तात्याचे बिंधास वागणे किंवा बेछूट लेखन कदाचित मनोगतमधल्या काही विद्वानांना मानवत नसेल आणि त्यांनी ढवळाढवळ केलेली तात्याला चालत नसेल. यावर उपाय म्हणून तात्याने स्वतःचे मिसळपाव हे नवे संकेतस्थळ काढले आणि त्याच्याच शब्दातले त्याचे हे 'हॉटेल' उत्तम प्रकारे चालवले. तिथली सदस्यसंख्या आणि तिथे येणाऱ्या लेखांची संख्या भराभर वाढत गेली. मनोगतवरील तात्याचे अनेक मित्र तिथे रोजच्या रोज काहीबाही लिहीत होतेच, इतरही अनेक नवे सदस्य तिकडे आकर्षिले गेले आणि ज्ञान व मनोरंजन यांचा एक खजिनाच मराठी वाचकांना उपलब्ध झाला. या अजब प्रकारच्या हॉटेलातले काम कसे चालत असे यावर मी दहा वर्षांपूर्वी लिहिलेला एक हलका फुलका लेख खाली दिला आहे.

काही वर्षांनंतर तात्याने बहुधा मिसळपावमधूनही आपले अंग काढून घेतले आणि फेसबुकवर शिळोप्याची ओसरी काढली आणि तीही छान चालवली. तिथेही रोजच त्याचे स्वतःचे आणि इतर मित्रांचे मजेदार लेखन वाचायला मिळत असे. माझी जुनी ओळख लक्षात ठेऊन त्याने या दोन्ही ठिकाणी मला पाचारण केले होते आणि मीसुद्धा तो माझा बहुमान समजून अधून मधून दोन्हीकडे चकरा मारून येत होतो. अलीकडच्या काळात वॉट्सॅप आल्यानंतर बेसुमार वाढलेल्या माझ्या इतर व्यापांमुळे मी अलीकडे तिकडे फारसा जाऊ शकत नव्हतो. तात्यासुद्धा काही वेळा कित्येक दिवस अदृष्य होत असे. त्यामुळे अलीकडल्या काळात माझी त्याच्याशी आंतर्जालावर गाठ पडली नव्हती आणि आज अचानक त्याच्या अकाली निधनाची धक्कादायक बातमी आली. ईश्वर त्याच्या आत्म्याला सद्गति देवो अशी प्रार्थना.

तात्याच्या व्यक्तीगत जीवनाविषयी मला काहीच माहिती नव्हती. मी त्याला पहिल्यांदा भेटलो तेंव्हा तो कसला तरी व्यवसाय करतो एवढेच समजले होते. त्याचा परिस्थिती खाऊन पिऊन सुखी अशी दिसत होती. तो आपल्या लेखांमध्ये स्वतःबद्दल काहीबाही लिहायचा, पण त्यातले किती खरे मानायचे आणि किती काल्पनिक ते समजायला मार्ग नव्हता. तो गेल्यानंतर त्याला दिल्या गेलेल्या श्रद्धांजलींमधून मला माहीत नसलेली बरीच नकारात्मक माहिती पुढे आली. त्याच्या कुठल्याशा व्यवसायामध्ये त्याला मोठी खोट बसल्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती असे वाटते. तो इतके छान लिहीत असे, पण या उपजत प्रतिभेमधून त्याला कधीच खूप पैसे मिळवता आले नाहीत. त्याने दिवसातला बराच वेळ लेखनामध्ये खर्ची घातला, पण त्यातून कमाई करायचा प्रयत्नच केला नाही की आज घडीला त्याला सोयिस्कर मार्केट नाही कोण जाणे! पुस्तके लिहून प्रकाशित करणे किंवा कथा, पटकथा, संवाद वगैरे लिहिणे अशा गोष्टी तो छानपणे करू शकला असता असे मला तरी वाटते. तो एक उत्तम गायक होता, त्याचे मोठमोठ्या संगीतकारांशी किती चांगले संबंध होते ते तो फोटोंसह आपल्या लेखांमध्ये सांगत असे. पण त्याने या कलागुणाचाही व्यवसाय केला नसावा.  "गंधर्वांना शाप असतात म्हणे" असे पु.ल.देशपांड्यांनी नंदा प्रधान या पात्राबद्दल लिहितांना  लिहिले आहे. तात्या अभ्यंकरच्या जीवनाकडे पाहतांना तोसुद्धा एक असाच शापित गंधर्व असावा असे मला वाटले.

ठाण्यातल्या कट्ट्यात झालेल्या ओळखभेटीनंतर पुन्हा कधी आमची गाठभेट झाल्याचे आठवत नाही कारण आमची विश्वे संपूर्णपणे वेगवेगळी होती. त्यात आम्हाला एकत्र येण्याचे काही प्रयोजन किंवा कारण नव्हते. तसा योगायोगही आला नाही. पण मनोगत, मिसळपाव आणि शिळोप्याची ओसरी या स्थळांवर अधूनमधून माझे जाणे होत असल्यामुळे त्याचे प्रखर तसेच खेळकर अस्तित्व मात्र सतत जाणवत राहिले. आता ते सगळे संपले, पण त्याच्या स्मृती मनाच्या एकाद्या कोपऱ्यात नेहमी राहणार आहेत.
-----------------------------------------------------आपले लाडके श्री.तात्या अभ्यंकर आज आपल्यात राहिले नाहीत. त्यांच्या मिसळपाव या संकेतस्थळाबद्दल मी दहा वर्षांपूर्वी लिहिलेला एक लेख त्यांच्या स्मरणार्थ खाली देत आहे. जे वाचक जुने मिपाकर असतील तर त्यांना ते कदचित दिवस आठवत असतील.
.... आनंद घारे


मिसळपाववरील पहिले वर्ष


एक वर्षापूर्वी मी मिसळपावच्या हॉटेलात पहिले पाऊल ठेवले. ते कोण चालवत असे याची त्या वेळी मला कांही कल्पना नव्हती. पण आंत आल्या आल्या तात्यासाहेबांनी जुनी ओळख दाखवून मोठ्या अगत्याने "या, बसा." असे म्हणत माझ्याकडे खुर्ची सरकवली. आजूबाजूला बसलेल्या लोकांत कांही ओळखीचे चेहेरे आणि मुखवटे पाहून मलाही आपल्या माणसांत आल्यासारखे वाटले. काउंटरवर जाऊन मी थाळी भरून घेतली. जेवण तर मस्तच होते. तेंव्हापासून मी इकडे येत राहिलो. मधील काळात कधी मला तर कधी माझ्या संगणकाला विषाणूंची बाधा झाली, कधी मी परगांवी गेलो वगैरे कारणांमुळे मला अवकाशाशी जडलेले नाते राखता आले नाही. ते पुन्हा जुळेपर्यंत पोस्टाच्या पेटीत पत्रांचा ढिगारा सांचलेला असायचा. माझ्या ढाब्यावरसुध्दा पूर्वी चार माणसे यायची, त्यांची संख्या आता पांच सहा (आंकड्या)वर गेली आहे. त्यांना काय हवे नको ते पहायचे असते. त्या व्यापातून वेळ काढून अगदी रोजच्या रोज मिसळपाववर यायला जमले नाही आणि त्यामुळे कांही छान पदार्थांची ताजी चव घेता आली नाही. पण आपल्याला जे मिळाले नाही त्याची खंत करण्यापेक्षा जे मिळाले त्याची कदर करावी, असे मी नेहमीच स्वतःला आणि कधी एकादा ऐकणारा भेटला तर त्याला सांगत असतो.

"तुम्हाला वाचनातून काय मिळतं हो?" असा प्रश्न आपण दहा लोकांना विचारला तर त्याची निदान वीस तरी उत्तरे मिळतील, पण त्या सर्वांची गोळाबेरीज बहुधा माहिती आणि मनोरंजन यात होईल. पुढे त्यामुळे निरनिराळ्या क्षेत्रात उन्नती झाली, अनेक प्रकारचा आनंद मिळाला वगैरे त्याचे कित्येक फायदे त्यातून निघतील. मी मात्र एकादी गोष्ट समजून घेत असतांना त्या क्रियेत तल्लीन होऊन जातो आणि देहभान हरपवून टाकणारा एकादा कलाविष्कार पहात किंवा ऐकत असतांनासुध्दा त्यातून कसला तरी शोध बोध मनातल्या मनात चाललेला असतो. माहिती आणि मनोरंजन या गोष्टी मला एकमेकींपासून वेगळ्या करता येत नाहीत. मिसळपाववर मला त्या दोन्हीही मिळाल्या असे सांगता येईल.

मिपावरच्या मेनूकार्डात कांही मुख्य विभाग आहेत. त्यातल्या प्रत्येक पदार्थाला लेखनविषय आणि लेखनप्रकार यांची लेबले लावावी लागतात. अशा चौकटी आंखून त्यात बसतील असे शब्द लिहायला मला जमत नाही. तापलेल्या तव्यावर फोडून टाकलेल्या अंड्याप्रमाणे माझे लिखाण अस्ताव्यस्त पसरत जाते. त्यामुळे मुळात मला लिहायला तरी कुठे येते? असा प्रश्न कांही लोक विचारतात, तसा तो मलाही पडतो. पण मी त्याला नजरेआड खुंटीला टांगून ठेवतो आणि सुचेल तसे कीबोर्डवर बडवून घेतो. अर्थातच इतर लोकांच्या लेखनाच्या लेबलांकडे माझे लक्ष जात नाही. मी सरळ खाली लिहिलेले वाचायला सुरुवात करून देतो.

मिपाच्या सर्व विभागात 'जनातलं, मनातलं' हे माझे मुख्य खाद्य आहे. अनेक छान छान कथा, अनुभव, प्रवासवर्णने, व्यक्तीचित्रे वगैरे मला त्या विभागात वाचायला मिळाली. कांही कथा काळजाला भिडणार्‍या होत्या तर कांही गुदगुल्या करणार्‍या, कांही क्षणाक्षणाला रहस्य वाढवत नेणार्‍या तर कांही शेवटच्या एका वाक्यातच दणका देणार्‍या अशा नाना तर्‍हा त्यात होत्या. कधी कधी कल्पितापेक्षा वास्तव जास्त अद्भुत किंवा भयानक असते याचे अनुभव कोणी लिहिले, तर कोणी आपले मजेदार किस्से सांगितले. कोणी गौरवशाली भूतकाळातली एकादी गोष्ट सांगितली तर कोणी नजिकच्या भविष्यकाळात काय घडू शकते याचा अंदाज वर्तवला. वर्तमानकाळात घडत असलेल्या घटनांवरील लेखांचा प्रवाह तर धोधो वहात असतो. वर्तमानपत्रात छापून येण्यापूर्वीच एकादी महत्वाची बातमी मला मिपावर वाचायला मिळाली असेही अनेक वेळा घडले, इतके इथले सदस्य सजग आणि तत्पर आहेत. समुद्रकिनारा ते बर्फाच्छादित पर्वतशिखरे, प्राचीन वाडे ते आलीशान पॅलेसेस, तसेच मंदिरे, चर्च, म्यूजियम वगैरे कांही निसर्गसौंदर्याने नटलेल्या तर कांही मानवाची किमया दाखवणार्‍या अशा अनेक स्थळांची सचित्र वर्णने वाचायला आणि पहायला मिळाली. कांही लेखातून मधुर गायनाचे दुवे मिळाले. अशा प्रकारे हे सदर वाचणे ही एक मेजवानी असायची. कांही चित्रकारांच्या कुंचल्यातील अप्रतिम जादू आणि छायाचित्रकारांच्या कौशल्याची कमाल वेगळ्या कलादालनात पहायला मिळाली.

काथ्याकूट या सदरात होणार्‍या चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी संयोजकांची इच्छा आहे! त्यानुसार कधी कधी एकाद्या विषयावर मुद्देसूद चर्चा घडते. त्यातून त्या विषयाचे आपल्याला आधी माहीत नसलेले पैलू समोर येतात. "वादे वादे जायते तत्वबोधः।" या उक्तीनुसार आपल्या मनातल्या कांही अस्पष्ट संकल्पनांना आकार येतात, त्याचे रेखाचित्र असेल तर त्यात रंग भरले जातात, चित्र असेल तर त्याला उठाव येतो. पण कांही वेळा मुळात टाकलेल्या काथ्याकडे दुर्लक्ष होते आणि लोक आपापल्या सुतळ्या, दोरखंड, काड्या वगैरे त्यात घालून कुटत बसतात. अशा काथ्याकुटासाठी काथ्यांचे वेगवेगळे धागे न टाकता एक खलबत्ताउखळमुसळ यंत्र अखंड चालत ठेवले आणि ज्यांना जे पाहिजे ते जितके हवे तितके बारीक किंवा भरड कुटू दिले तरी फारसा फरक पडणार नाही. मात्र त्याचा खाट सहन होत नसेल तर हातातला उंदीर तिकडे जाण्यासाठी चुळबुळ करायला लागला की आधी कीबोर्डाचे कनेक्शन काढून ठेवणे बरे असते अशी सावधगिरी बाळगण्याची सूचना करावी असे वाटते.

आजची खादाडी हा तर मिसळपावचा लाडका विषय असायलाच पाहिजे. मुखपृष्ठावरच मुळी इतके छान छान फोटो टाकलेले असतात की ते पाहतांना तोंडाला पाणी सुटते. इतर विभागातले लाक्षणिक अर्थाने 'पदार्थ' वाचून मन तृप्त होते, पण पाककृती मात्र प्रत्यक्ष करून आणि जिभेने चाखून पहाव्याशा वाटतात. आमच्या किचनलँडचा फक्त टूरिस्ट व्हिसा मला मिळालेला असल्यामुळे तिथे गेल्यावर लुडबूड करता येत नाही. शिवाय गोड, तिखट, खारट, आंबट, तेलकट, तुपकट वगैरे सगळ्या चविष्ट पदार्थांच्या आणि उत्तेजक पेयांच्या सेवनावर नतद्रष्ट डॉक्टरांनी नियंत्रण घालून ठेवले आहे. इंटरनेटमधून जशी छान चित्रे पहायला मिळतात, सुरेल संगीत ऐकायला मिळते त्याचप्रमणे खाद्यपदार्थ तयार होतांना पसरणारा घमघमाट आणि तयार झाल्यावर त्याला आलेली चव यांचा आस्वाद दुरून घेता येण्याची सोय कधी तरी होईल असे मनातले मांडे मी मनात खात असतो.

"जे न देखे रवी ते देखे कवी" असे म्हणतात. त्याप्रमाणे जिथे सूर्याचा प्रवेश होत नाही अशा आभाळात हे महानुभाव आपल्या कल्पकतेचे पंख लावून स्वैर भ्रमण करत असतात. त्यांचे शेपूट धरून त्यांच्याबरोबर जायला मिळाले तर आपल्याला सुध्दा त्याचे नेत्रदीपक दर्शन घडू शकते. पण कधी कधी जे कवीला दिसते ते पाहण्याइतकी क्षमता आपल्या दृष्टीत नसते किंवा आपल्या पंखातले बळ कमी पडते आणि आपण जमीनीवरच खुरडत राहतो. कधी तर आपण त्यांच्या सोबतीने आकाशात उडण्याऐवजी पार पाताळात जाऊन पोचलो आणि कवीला न दिसलेले आपल्याला दिसायला लागले तर पंचाईत होते. अशा अमूर्त अगम्य गोष्टींविषयी मला फारसे आकर्षण वाटत नसल्यामुळे त्या प्रांतात मी क्वचितच जातो. त्यातला विडंबन हा प्रकार समजायला सोपा आणि मजेदार वाटतो. मूळ कविता आपल्या ओळखीची असेल, त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे विडंबन करणार्‍याला ती पूर्ण समजली असेल, त्यातले वृत्त, छंद वगैरे व्यवस्थितपणे सांभाळले गेले असेल आणि मूळ कवितेची आठवण करून देणारे महत्वाचे शब्द किंवा ते ध्वनित करणारे तत्सम शब्द वारंवार येत राहिले तर ते विडंबन मस्त वाटते. नुसतेच एका गाण्याच्या चालीवर दुसरे गाणे रचले तर ते विडंबन न वाटता एक स्वतंत्र काव्य होते आणि त्यातल्या काव्यगुणांप्रमाणे त्याचे मूल्यमापन होते.

प्रत्यक्षातील बहुतेक हॉटेलांत ग्राहकांनी मागवलेले पदार्थ वेटर आणून देतो तर बर्‍याचशा कँटीन, कॅफेटेरिया वगैरेंमध्ये स्वयंसेवा असते. मिसळपावच्या हॉटेलात वाढपी तर नाहीतच, स्वैपाकीसुध्दा नाहीत. एक अद्ययावत साधनांनी युक्त असे स्वयंपाकघर आहे. इथे येणारे ग्राहकच आपापला शिधा घेऊन येतात, वाटल्यास इतर ग्राहकांकडून कांही वस्तू मागून घेतात किंवा ढापतात आणि पाकसिध्दी करून पदार्थ तयार झाल्यावर ते काउंटरवर आणून ठेवतात. इतर सदस्य आणि पाहुणे त्याचा मुक्तपणे आस्वाद घेतात. कांही ग्राहकांचे इतरांवर बारीक लक्ष असते आणि ते त्यांना परोपरीने मदत करत असतात. माझ्यासारख्या नवशिक्याने केलेला पदार्थ धांदरटपणामुळे अर्धाकच्चा राहिला तर तो खरपूस भाजून देतात, त्यात ढेकळे राहिली तर ती फोडून त्यांचा चकणाचूर करतात, दिव्यदृष्टी प्राप्त झालेल्या कांही एक्स्पर्ट लोकांना चुकून आलेले खडे आणि न शिजलेले गणंग पटकन दिसतात, कांही सज्जन खोवलेला नारळ, चिरलेली कोथिंबीर, बारीक शेव वगैरे त्यावर पसरतात आणि बाजूला लिंबाची फोड, टोमॅटोचे काप वगैरे ठेऊन छान सजवून देतात. इथली संचालक मंडळीसुध्दा जसा पदार्थ असेल त्याप्रमाणे त्यावर खमंग फोडणी देऊन, तुपाची धार धरून किंवा पिठीसाखर पसरून त्याची गोडी वाढवतात. अधून मधून ते ग्राहकाचा वेष धारण करून येतात आणि ठेवणीतले चमचमीत पदार्थ तयार करून हॉटेलाचे स्टँडर्ड उंचावतात.

चितळे बंधूंची आंबा बर्फी किंवा बाकरवडी, हलदीरामची सोनपापडी, आलू भुजिया यासारखे सुप्रसिध्द खाद्यपदार्थ किंवा घरी भेट म्हणून आलेले मिठाईचे पुडे इकडे घेऊन यावे असेही कोणाला वाटते. कांही लोक दुसर्‍या चांगल्या हॉटेलातून तिथल्या खाद्यपदार्थांचे पार्सल बांधून आणण्याचा विचार करतात. हे सारे पदार्थ चविष्ट असले तरी मिपाच्या योग्य अशा धोरणाप्रमाणे बाहेरचे खाद्यपदार्थ इथे आणणे वर्ज्य आहे. तसा रीतसर बोर्डसुध्दा लावलेला आहे. पण उत्साहाच्या भरात तिकडे लक्ष न गेल्यामुळे किंवा ते न दिल्यामुळे क्वचित कांही लोक तसे करतात. ते उघडकीला आल्यावर कांही लोक सौम्य शब्दात त्याची जाणीव करून देतात, तर कांही लोक "परवा आम्हाला नाही म्हंटलं होते, आज यांनी केलेलं कसं चालतं ?" वगैरे अवघड प्रश्न विचारून त्यावर वाद घालतात. माझ्यासारखे कांही सदस्य आपापले वेगळे ठेलेसुद्धा चालवतात. त्यात एकादा चांगला पदार्थ बनून गेला तर त्याची चव इतर लोकांनी चाखून पहावी यासाठी कधी कधी ते सदस्य तो पदार्थ  इथे तसेच दुसर्‍या कांही ठिकाणीसुध्दा मांडतात. स्वतः तयार केलेला पदार्थ इथे आणून मांडायला इथल्या नियमांप्रमाणे परवानगी आहे आणि मला त्यात कांही गैर वाटत नाही. पण "आपले उष्टे खरकटे पदार्थ इथे आणून ठेवायला या लोकांना लाजा कशा वाटत नाहीत ?" असा ओरडा जेंव्हा आंतल्या गोटातून एकदा झाला तेंव्हा मात्र मी चपापलो. त्यानंतर त्याचा ऑफीशिअली खुलासा झाला असला तरी त्यावरून समजायचे ते समजून घेऊन मी आपल्यापुरता एक निर्णय मनाशी घेतला होता. पण ती कांही भीष्मप्रतिज्ञा नव्हती की ते जाहीर आश्वासन नव्हते, त्यामुळे नंतर ते विसरून गेलो. आज सिंहावलोकन करतांना त्याची आठवण झाली. हा लेख मात्र खास मिसळपावासाठीच लिहिला गेला आहे याची ग्वाही द्यायला हरकत नाही.

बहुतेक उडप्यांच्या हॉटेलात दारापाशीच एका चांदीच्या चकाकणार्‍या देव्हार्‍यात एक सुंदर मूर्ती ठेवलेली असते किंवा एका स्वामीचा फोटो लावून त्याला ताज्या फुलांचा हार भक्तीभावाने घातलेला दिसतो. मिसळपावच्या मुखपृष्ठावर सुध्दा आराध्य दैवतांची किंवा साधुसंतांची सुंदर चित्रे लावून ते मंगलमय केलेले असते. पण मधूनच कोणी भाबडा (वाटणारा) भक्त एका जगद्वंद्य महात्म्याचा फोटो एका भिंतीला चिकटवून त्याला उदबत्ती ओवाळतो. त्यानंतर दोघेतीघे येतात आणि हिरव्या मिरचीची चटणी, चिंचेचा घोळ, हॉट अँड सॉवर सॉस वगैरेमध्ये बुडवलेली बोटे त्या चित्राला पुसतात. ते पहायलाही कांही लोकांना मजा वाटते. "पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना" असे म्हणतात ना!

मिसळपावाच्या हॉटेलातल्या ग्राहकांना एकेक खण देऊन ठेवले आहेत. एकादा खास पदार्थ करून त्यातल्या कोणाच्याही खणात ठेवलेल्या बशीत घालायची सोय केलेली आहे. कांही ग्राहक त्याचा फायदा रोज घेत असतात. मध्यंतरी एकदा एका सदस्याने भरून ठेवलेल्या अमृतकुंभाचे रेखाचित्र दुसर्‍या एका ग्राहकाने त्याला न विचारता काढले, त्यातल्या अ या अक्षरावर फुली मारली आणि त्याच्या चारी बाजूंना काळ्या रंगाची चौकट काढून ते चित्र आपल्या खणात लावून ठेवले. ते पाहून पहिल्या सदस्याच्या अंगाचा तिळपापड झाला आणि या दोन सदस्यात कांही तिखट व कडू पदार्थांची देवाणघेवाण झाली म्हणे. त्याची कुणकुण कानावर आल्यामुळे अशा प्रकारच्या समांतर चर्चा इथे चालतात हे मला समजले. आपल्या बशीत पडलेले पण न आवडलेले पदार्थ काढून कचर्‍याच्या पेटीत टाकायची सोय आहे. "आज आपण आपली बशी साफ केलीत कां?" अशी आठवण एक सन्मान्य सदस्य सर्वांना रोज करून देत असतो. काउंटरवर ठेवलेले सगळे सुग्रास पदार्थ घ्यायलाच मला वेळ पुरत नाही. त्यामुळे इतर कोणाचे बंद खण उघडून त्यातल्या बशांत काय पडले आहे हे पहाण्याचा प्रयत्न मी कधी करत नाही.

जिवश्चकंठश्च मैत्री असलेले कांही ग्राहक एकमेकांना भेटण्यासाठी या हॉटेलात नेहमी येतात. अर्थातच त्यांच्या गप्पागोष्टी, थट्टामस्करी, उखाळ्यापाखाळ्या वगैरे मस्त रंगतात. या गुजगोष्टी आपापसात करण्यासाठी स्पेशल फॅमिली रूम नसल्यामुळे ते सर्वांसमक्षच चालते. जुन्या काळातल्या इंग्रजी किंवा हिंदी सिनेमातला एक सीन ते पाहतांना माझ्या डोळ्यासमोर येतो. एक जंगी पार्टी चाललेली असते, सारी माणसे छान छान पोशाख करून तिथे आलेली असतात, अचानक त्यातला एकजण हातातला केक दुसर्‍याच्या तोंडावर मारतो, ते पाहून तिसरा चौथ्याकडे फेकतो, पण तो हा हल्ला चुकवतो त्यामुळे तो पांचव्याला लागतो. त्यानंतर सहावा, सातवा, आठवा असे करत पार्टीतले सारेच लोक या खेळात सामील होतात. मधूनच एकादा चार्ली चॅपलिन किंवा राजेंद्रनाथ गालाला लागलेले क्रीम बोटांनी पुसून चाटून घेतो. ते दृष्य पाहतांना सर्व प्रेक्षकांची हंसून हंसून मुरकुंडी वळते.

अशा अनेक गंमतीजंमती मिपावर चाललेल्या असतात. तिथे आज आलेला लेख उद्या इतिहासकाळात जातो आणि परवा तो मुद्दाम शोधून काढावा लागतो इतक्या प्रचंड गतीने ते येत असतात. त्यातले सारेच वाचणे जमत नाही. पण आपल्या आवडीनुसार हवे ते निवडता येते. एकंदरीत पाहता मला हे स्थळ आवडले, शक्य तितक्या वेळा इथे यावे असे वाटले आणि पुढेसुध्दा मी इथे येत रहाणारच आहे असे म्हणतो.

- आनंद घारे

Thursday, May 02, 2019

मराठीतली विरामचिन्हे (. , ? ! ' ")माझे शिक्षण मराठी माध्यमात झाले. अर्थातच मी आधी मराठी भाषा शिकलो. मला मराठीमधली अक्षरे, शब्द, वाक्यरचना, विरामचिन्हे वगैरे समजायला लागली आणि मी त्या भाषेतील पुस्तके वाचायला लागलो. त्यानंतर अनेक वर्षांनी मी मराठीमधून इंग्रजी शिकलो आणि त्या भाषेतले वाचन आणि लेखन सुरू केले. या दोन्ही भाषांच्या लिपी अगदी भिन्न आहेत. मराठीमध्ये कखगघ या सारखी अनेक व्यंजने आहेत आणि त्यांना काना, मात्रा आणि वेलांट्या लावून बाराखड्या केल्या असल्याने अक्षरशः शेकडो निरनिराळी अक्षरे आहेत, त्याशिवाय जोडाक्षरे निराळीच. इंग्रजीत फक्त २६ अक्षरे आहेत आणि स्पेलिंग हा एक वेगळा प्रकार आहे. असे असले तरी पूर्णविराम (.), स्वल्पविराम,(,) प्रश्नचिन्ह (?), उद्गारवाचक चिन्ह (!), कंस () वगैरेंसाठी मात्र तीच चिन्हे कां असतात या एका गोष्टीचे मला आश्चर्य वाटायचे. इतकेच नव्हे तर ती इंग्रजांनी आपल्याकडून उचलली असतील का असेही वाटायचे.

मराठी भाषेचा इतिहास पहायला गेला तर तो अनेक शतकांचा आहे आणि संस्कृत भाषेपासून सुरुवात करायची झाली तर तो हजारो वर्षांचा म्हणावा लागेल. शिलालेख, ताम्रपट, भूर्जपत्रे, खलिते, बखरी वगैरेंमधून इतिहासाबद्दल माहिती मिळते. पण मी पुराणवस्तूसंग्रहालयांमध्ये किंवा पुरातन देवळे, किल्ले वगैरे जागी असले जितके अवशेष पाहिले त्यातून मला तरी काही बोध झाला नाही. एक तर ती लिपीच माझ्या ओळखीची नसायची, असलीच तरी त्यातले सगळे शब्द सलग लिहिलेले असायचे, त्यातून ते वेगळे करून काढले तरी ते अनोळखी असायचे आणि एकादा ओळखीचा शब्द मिळाला तरी त्याचा संदर्भ लागायचा नाही. म्हणजे माझ्या अक्कलखात्यात काहीही भर पडायची नाहीच. माझ्या लहानपणी आमच्या घरी काही जुन्यापुराण्या जीर्ण जर्जर पोथ्या होत्या. त्यांची सगळी पाने सुटी असायची आणि दोन चपट्या लाकडी फळ्यांमध्ये ठेवलेली असायची. आजोबा, पणजोबांच्या काळातले काही दस्तऐवज होते ते मोडी लिपीत होते. मी त्या पोथ्या एक एक अक्षर करून आईला वाचून दाखवत असे आणि हळू हळू मलाही त्या थोड्या समजायला लागल्या होत्या. जुन्या काळातल्या मोडी दस्तऐवजाला हात लावायला मुलांना परवानगी नव्हती.

या सगळ्या जुन्या काळातल्या मराठी लेखनामधून मला एक गोष्ट दिसली की यात कुठेही विरामचिन्हे नसायची. सगळे संतवाङमय तर पद्य रूपातच होते. त्यात प्रत्येक चरणाच्या शेवटी एक दंड किंवा उभी रेघ आणि श्लोक किंवा ओवीच्या अखेरीला दोन उभ्या रेघा मारून त्यांना वेगळे करत असत. पण पद्यातली वाक्यरचना कर्ता, कर्म, क्रियापद या क्रमानुसार असण्याची गरज नसते. त्यामुळे मराठी गद्य ज्या स्वरूपात वाचण्याची आपल्याला संवय आहे किंवा ज्या स्वरूपात हा लेख लिहिला आहे अशा प्रकारचे लेखन इतिहासकाळात होत नसावे. त्या काळातल्या लेखनाचे काही नमूने वरील चित्रात दिले आहेत. यातले हजार बाराशे वर्षे जुने शिलालेख वाचून ते मराठी भाषेतलेच आहेत असे ठामपणे सांगू शकणाऱ्या पंडितांचे मला प्रचंड कौतुक वाटत आले आहे. 

आपल्या ओळखीची मराठी भाषासुद्धा निदान दीडशे वर्षे तरी जुनी आहेच कारण टिळक - आगरकर यांचे लेख किंवा देवल - किर्लोस्कर यांची नाटके या स्वरूपात आहेत. मग हे प्रत्येक शब्द सुटा लिहिलेले आणि विरामचिन्हांनी युक्त असलेले मराठी भाषेतले लेखन कधीपासून सुरू झाले असेल? पूर्वीच्या काळी अशा प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी खास वाचनालयांमध्ये जाऊन विशिष्ट पुस्तके धुंडाळावी लागायची आणि हे माझ्यासाठी शक्यच नव्हते. पण आता गगलबुवांच्या कृपेमुळे कसलीही पायपीट न करता घरबसल्या बरीच माहिती अगदी सहजपणे आणि फुकटात उपलब्ध होते.  त्यावरून माहिती घेता समजले की या बाबतीतसुद्धा आपल्याला इंग्रज साहेबांचे आभार मानायला हवेत.

आपल्याकडल्या पेशवाईचा ऱ्हास चालू असतांनाच इंग्रजांनी मुंबईला आपले ठाणे वसवले होते आणि इथला प्रदेश गिळंकृत करायचा उद्योग सुरू केला होता. त्या काळात भारतात पाठवल्या जाणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांना इंग्लंडमध्येच मराठी भाषेचे धडे देऊन पाठवत असत. त्यांच्यातल्या मोल्सवर्थ, कँडी आदि काही लोकांना मराठी भाषेची गोडी लागली आणि त्यांनी या भाषेतला शब्दकोष, व्याकरण इत्यादींवर मन लावून आणि कंबर कसून काम केले. त्यांनीच युरोपियन भाषांमध्ये प्रचलित असलेली विरामचिन्हे मराठीत वापरायची पहिल्यांदा सुरुवात केली आणि तशा प्रकारे काही पुस्तके लिहिली. यामागे मराठीभाषिक लोकांना इंग्रजी शिकवून आपल्या बाजूला वळवणे आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणे ही त्यांची उद्दिष्टे असली तरी त्यांच्या प्रयत्नांमुळे गद्य मराठी लेखनाला एक नवे स्वरूप प्राप्त झाले. छापखाने सुरू झाल्यामुळे त्याचा प्रसार झपाट्याने होण्याला मदत झाली. त्याच काळात होऊन गेलेले दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी या इंग्रजांच्या कल्पना उचलून घेऊन आणि त्यांचा उपयोग करून घेऊन मराठी भाषेतले व्याकरण लिहिले आणि गद्य लेखन अशा प्रकारे लिहिण्याचा जो पायंडा पडला तो आपण दीडशे वर्षे पाळत आलो आहोत. स्वातंत्र्यानंतर सरकारी प्रयत्नामधून काही समित्या स्थापन झाल्या आणि त्या मराठी भाषेच्या वापराबद्दल काही सूचना देत असतात पण त्याच्या स्वरूपात मूलभूत बदल होण्याची शक्यता मला तरी दिसत नाही. किंबहुना तसे करण्याचे काही कारणही नाही.

Friday, April 26, 2019

विजेच्या बॅटरीचा शोध लावणारा शास्त्रज्ञ व्होल्टाविजेचा टॉर्च, मोबाइल फोन, मोटारगाडी वगैरेंसाठी आपण बॅटरी वापरतो ती अमूक इतक्या व्होल्टची असावी लागते. घरातल्या किंवा कारखान्यातल्या विजेच्या व्होल्टेजचा उल्लेख आपल्या बोलण्यात किंवा वाचनात येतो. हा व्होल्ट हा शब्द कुठून आला याचे कदाचित कुतुहल असेल. ते एका जुन्या काळातल्या युरोपियन शास्त्रज्ञाने नाव आहे.

आकाशात चमकणारी वीज माणसाला अनादि काळापासून माहीत होती. विल्यम गिल्बर्ट या सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या ब्रिटिश शास्त्रज्ञाने अँबरचा खडा चामड्यावर घासून प्रथमच स्थितिक विद्युत (Static Electricity) तयार केली. या प्रकाराला इलेक्ट्रिक असे नाव त्यानेच दिले. निरनिराळे विशिष्ट पदार्थ एकमेकांवर घासल्यामुळे त्यांच्यात धन किंवा ऋण विद्युत प्रभार (Positive or Negatve Electric Charge) तयार होतात. पण या विद्युत प्रभाराने फार फार तर एकादे हलके पीस किंवा हातावरले केस किंचित हलवले जातील इतके ते क्षीण असतात. तसल्या त्या सौम्य विजेचा कशासाठीही उपयोग होत नव्हता किंवा तिच्यामुळे कुणालाही त्रास नव्हता यामुळे त्या नैसर्गिक प्रकाराला विशेष महत्व द्यावे असे त्या काळातल्या कोणालाही वाटले नसेल. सतराव्या शतकातले काही शास्त्रज्ञ कुतूहलापोटी या विषयावर संशोधन करायला लागले. ओटो व्हॉन गेरिक या शास्त्रज्ञाने सन १६७२ मध्ये गंधकाच्या एका मोठ्या गोलकाला घासून त्यातून कृत्रिम वीज निर्माण केली आणि तिच्यामुळे होणारे आकर्षण (Attraction) आणि प्रतिकर्षण (Repulsion) प्रयोगामधून दाखवून दिले. त्यानंतर धन आणि ऋण प्रभार यांच्यामध्ये ठिणगी पडते आणि त्यातून विद्युत् विमोच (Electric Discharge) होतो हे शास्त्रज्ञांना समजले. अठराव्या शतकातल्या बेंजामिन फ्रँकलिन याने १७५०च्या सुमाराला कांच आणि शिशाच्या चपट्या पट्ट्या वापरून विजेचा प्रभार (Charge /चार्ज) साठवून ठेवण्याचे एक संधारित्र (Capacitor कपॅसिटर) तयार केले. तसेच आकाशात चमकणारी वीज आणि स्थिर विद्युत या दोघी एकच असतात असे प्रयोगाने सिद्ध करून दाखवले.  सन १७६७ पर्यंत या विषयावर इतके संशोधन झाले होते की जोसेफ प्रीस्टली याने ते गोळा करून विजेचा एक सविस्तर इतिहास ग्रंथ लिहिला होता. प्रीस्टलीनेच हा प्रभार वाहून नेणारे वाहक (Conductor) आणि वाहून न नेणारे दुर्वाहक (bad conductor) यांचे शोध लावले. अशा प्रकारे वीज या विषयावरील संशोधनात खूप हळूहळू प्रगति होत होती, पण विजेचा प्रवाह तयार करणारे साधन मात्र अजून निघाले नव्हते.

अलेसँडर व्होल्टा या इटालियन शास्त्रज्ञाने १७७५ मध्ये विद्युत प्रभार निर्माण करण्यासाठी इलेक्ट्रोफोरस नावाचे उपकरण बनवले. यामुळे विजेवर अधिक संशोधन करायला मदत झाली. त्याने विजेच्या प्रभाराला साठवून ठेवणारा गुणधर्म विद्युत धारिता (Electric Capacitance) या विषयावर संशोधन करून संधारिकांवरील विजेचा दाब त्यातील पदार्थाच्या विद्युत धारितेच्या सम प्रमाणात असतो हे दाखवून दिले. या नियमाला व्होल्टाचा नियम असेच नाव आहे. व्होल्टाचा समकालीन शास्त्रज्ञ गॅल्व्हानी हा मृत बेडकांवर संशोधन करत होता. प्रयोग करतांना त्याला एक आश्चर्यकारक गोष्ट दिसली. त्याने एका बेडकाला तांब्याच्या तारेने बांधून ठेवले होते आणि त्याच्या पायाला लोखंडाचे अवजार लागताच तो पाय एकदम शॉक लागल्यासारखा आखडला. यावरून प्राण्यांच्या शरीरात वीज निर्माण होते असा निष्कर्ष गॅल्व्हानीने काढला आणि त्याला अॅनिमल इलेक्ट्रिसिटी असे नाव ठेवले. या संशोधनामधून प्राण्यांच्या शरीरांच्या अभ्यासाला एक वेगळी दिशा मिळाली.

पण व्होल्टाने यावर वेगळा विचार केला. त्याने तांबे, लोखंड, शिसे, जस्त आदि निरनिराळ्या धातूंची अवजारे वापरून बेडकावर प्रयोग केल्यावर त्याला वेगवेगळी निरीक्षणे मिळाली. त्यामुळे या बाबतीत फक्त प्राण्याच्या शरीराचा गुणधर्म नसून धातूंचासुद्धा सहभाग आहे असे त्याने ओळखले. त्याने त्यानंतर निरनिराळ्या धातूंचे तुकडे वेगवेगळ्या रसायनांमध्ये बुडवून प्रयोग केले आणि बेडकाशिवायही वीज निर्माण करून दाखवली. प्रत्येक धातूचे एक विद्युत विभव (Electric Potential) असते हे त्याने पाहिले आणि या विभवाप्रमाणे धातूंची विद्युतरासायनिक मालिका (Electrochemical Series) तयार केली. त्यासंबंधीच्या नियमालाही व्होल्टाचेच नाव आहे. (Volta's Law of the electrochemical series) दोन भिन्न धातूंचे इलेक्ट्रोड रसायनामध्ये बुडवून ठेवले तर त्याच्यामध्ये एक विद्युतगामक बल (Electromotive Force) तयार होते हे दाखवून ते विद्युत विभवामधील फरकाच्या समप्रमाणात असते असा नियम सांगितला. जगातल्या सर्व विजेच्या बॅटऱ्या या तत्वावर काम करतात.

व्होल्टाने कृत्रिमरीत्या विजेचा प्रभार निर्माण करणारे असे व्होल्टाइक पाइल हे साधन तयार केले. त्यात जस्त आणि तांब्याच्या चपट्या चिपा आणि रसायनांत भिजवलेले पुठ्याचे तुकडे आलटून पालटून एकावर एक ठेऊन त्यांचे अनेक थर केले आहेत. यातल्या प्रत्येक थरांमध्ये थोडा थोडा प्रभार तयार होऊन साठत जातो. व्होल्टाने अशा प्रकारे प्रथमच रासायनिक पद्धतीने वीज तयार करून दाखवली हे या प्रगतीमधले एक मोठे पाऊल होते. अशा प्रकारे साठवलेला विजेचा प्रभार तारेमधून वाहून नेला तर लगेच नवा प्रभार तयार होतो. यामुळे सलगपणे काही वेळ वाहणारा विजेचा प्रवाह तयार करणे प्रथमच शक्य झाले. तोपर्यंत स्थायिक विजेमधून फक्त एक ठिणगी पाडणेच शक्य झाले होते, व्होल्टाने पहिल्यांदाच विजेला प्रवाही करून दाखवले.

याशिवाय व्होल्टाने वायूंच्या रसायनशास्त्रावर संशोधन करून मीथेन या वायूचा शोध लावला. मीथेन हा वायू निसर्गातसुद्धा तयार होत असतो. व्होल्टाने त्याला बंद पात्रामध्ये साठवून आणि त्यात विजेची ठिणगी टाकून त्याला पेटवून दाखवले. त्याने विजेवर केलेल्या  अत्यंत मौलिक संशोधनाचा मान ठेऊन विद्युत विभव (Electric Potential) आणि विद्युतगामक बल (Electromotive Force) यांच्या एककाला व्होल्ट असे नाव दिले आहे. विजेचा दाब व्होल्टेजमध्येच व्यक्त केला जातो आणि त्याचा उल्लेख प्रत्येक उपकरणाच्या बाबतीत होत असल्यामुळे व्होल्टेज हा शब्द आपल्या चांगल्या परिचयाचा आहे.


Sunday, April 14, 2019

माझी घरातली वेधशाळा

आमच्या लहानपणी आम्ही नेहमी गच्चीवर झोपत होतो. त्या ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी सगळीकडे मिट्ट काळोख असल्यामुळे आकाशातल्या असंख्य चांदण्या चमचमतांना दिसत. माझ्या वडिलांना खगोलशास्त्राची चांगली माहिती होती. ते आम्हाला राशी, नक्षत्रे आणि त्यांच्या गर्दीमधून संचार करणारे ग्रह यांची मजेदार माहिती सांगत. सप्तर्षींच्या सहाय्याने ध्रुव तारा कसा शोधायचा ते मी शिकलो. मृग आणि हस्त नक्षत्र, वृश्चिक रास यांना ओळखणे त्यांच्या विशिष्ट आकारांच्या रचनांमुळे तसे सोपे होते. सूर्याचे भ्रमण कोणत्या राशीत चालले आहे यावरून सूर्यास्त किंवा सूर्योदयाला कोणती रास पूर्व किंवा पश्चिम क्षितिजावर असते हे ठाऊक असायचे आणि त्यावरून अंदाजाने आकाशातल्या इतर राशी समजायला लागल्या होत्या. ग्रहांच्या गति समजल्यानंतर त्यांना शोधणेही सोपे झाले होते. पंचांगामधल्या कुंडलीत मांडलेले ग्रह आकाशात शोधायचा मला नादच लागला होता.

शालेय जीवन संपवून मुंबईपुण्याला आल्यावर तिथल्या झगमगाटात माझ्या आकाशातले ग्रहतारेच हरवून गेले. तिथल्या इमारतींच्या गर्दीतून आभाळाचा एकादाच तुकडा कधी मुद्दाम पाहिला तर दिसायचा. त्यात लुकलुकणारी एकादी चांदणी दिसलीच तरी तिची ओळख पटणे अशक्य होते. पण आता पन्नास वर्षांनंतर मला पुन्हा एकदा आकाशाकडे पहायची संधी मिळाली किंवा बुद्धी झाली. इथेही जमीनीवरील दिव्यांच्या आकाशातले झगमगाटामुळे फारसे काही दिसू शकत नाहीच, पण जेवढे दिसते त्याचाच अर्थ लावायचा प्रयत्न मी आता सुरू केला आहे. 

आमच्या सव्वीसाव्या मजल्यावरच्या घराच्या बाह्य भिंती पूर्वपश्चिम रेषेमध्ये आहेत. माझ्या खोलीच्या खिडकीमधून समोर पाहिल्यास दक्षिण दिशा दिसते, तसेच जवळजवळ १५० अंश इतके दूरवर पसरलेले वर्तुळाकार क्षितिजही दिसते. बाल्कनीत जाऊन थोडे जास्त आकाश पहाता येते. मी या घरी रहायला आलो तेंव्हा पावसाळा सुरू होता. त्यामुळे बहुतेक दिवस आभाळ ढगाळ असायचे. एकाद्या दिवशी जास्त घनदाट ढगांची गर्दी झाली तर सूर्यसुद्धा झाकून जायचा, पण तुकळक ढग असले तरी तारे दिसणे कठीणच होते. पावसाळा संपत आल्यावर सप्टेंबरच्या अखेरीला मला एकदा अचानकच सकाळच्या सूर्योदयाचे स्पष्ट दर्शन घडले. आधी पूर्वेच्या बाजूला आलेला लालिमा, तिथून आकाशभर पडलेले लाल, पिवळ्या, केशरी रंगांचे झोत आणि त्यातून हळून लालचुटुक सूर्यबिंबाचे प्रगट होणे वगैरे सगळे मी बाल्कनीत बसून आ वासून पाहिले. तो सूर्योदय नेमका किती वाजता झाला ती वेळ आणि क्षितिजावरच्या कोणत्या बिंदूपाशी झाला ते स्थान मी नोंदवून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी ठरवून पहाटे लवकर उठून त्याची वाट पहात बसलो. हळूहळू मला त्याची सवय होऊन गेली.

ओळीने काही दिवस रोज सूर्योदय पहात असतांना माझ्या लक्षात आले की क्षितिजाखालून सूर्य वर येतांना कसा दिसतो याबद्दलच्या मुळात वेगळ्याच कल्पना आपल्या मनात असतात. तो डोंगराच्या बेचक्यामधून डोकावून पहातांना आधी त्याचा एक लहानसा तुकडा दिसेल आणि तो हळूहळू मोठा मोठा होत जातांना दिसत असेल अशी माझी कल्पना होती. पण तसे काही होतच नव्हते. म्हणून मी दि. १९ नोव्हेंबरला लिहिले, "खाली दिलेले पहिले चित्र सर्वांच्या चांगल्या माहितीतले असेल. बहुतेकांनी सूर्योदयाची अशीच अनेक चित्रे लहानपणी स्वतः काढली असतील आणि पुढे आपली लहान भावंडे, मुले, भाचे, पुतणे, नातवंडे वगैरेंनाही शिकवली असतील. मी प्रत्यक्षात असंख्य ठिकाणचे सूर्योदय पाहिले आहेत, पण या चित्रात दाखवल्यासारखा सूर्योदय मात्र कधीही कुठेच दिसला नाही. आजकाल रोजच सकाळी माझ्या घराच्या बाल्कनीमधून मला सूर्योदयाचे दर्शन घडते. क्षितिजाला लागून एक धूर, धूळ, धुके आणि ढग यांनी भरलेला दाट असा हवेचा पट्टा असतो. सूर्याची किरणे त्याच्या मागून निरनिराळ्या रंगांची उधळण आकाशात करत असतात, स्वतः सूर्यनारायण मात्र त्या पट्ट्यामधून थोडा वर आल्यानंतर फिक्कट असा दिसायला लागतो आणि पाहता पाहता तो प्रखर होत वर वर चढतो. हे दुसऱ्या आणि तिसऱ्या छायाचित्रात दिसेल."

सूर्याच्या उगवण्याची जागासुद्धा हळूहळू किंचित बदललेली दिसत होतीच. माझ्याकडे कुठलेही मोजमोप घेण्याचे यंत्र नसल्यामुळे मी त्याची अंशांमध्ये नोंद ठेवत नसलो तरी क्षितिजावरील इमारतींच्या संदर्भाने सूर्यबिंबाचा वेध घेतच होतो. ते रोज किंचित उजवीकडे म्हणजेच आग्नेयेच्या दिशेने सरकत होते. यालाच दक्षिणायन असे म्हणतात.  २१ डिसेंबरला तो उगवण्याची जागा पूर्वेपासून सुमारे २२-२३ अंशाने किंवा काटकोनाच्या पाव हिश्याने सरकलेली होती. ती मी फोटोत बंद करून ठेवली.  त्या दिवशी सूर्योदय जवळजवळ सव्वासात वाजता झाला होता याचीही नोंद घेतली.

त्यानंतर उत्तरायण सुरू झाले. रोजचा सूर्योदय एकादे मिनिट उशीराने व्हायला लागला, तसेच त्याच्या उगवण्याची जागा रोज किंचित डाव्या बाजूला सरकायला लागली. हा फरक अगदी सूक्ष्म असला तरी तीन चार दिवसात तो एक इमारतीच्या ऐवजी दुसऱ्या इमारतीच्या मागून वर आलेला जाणवत असे. २१ मार्चला वसंतसंपाताच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता तो बरोबर पूर्व दिशेला आमच्या घराच्या भिंतीला लागूनच उगवला. त्यानंतर मला घरबसल्या सूर्योदय दिसणे बंद झाले. आता मला पहाटे उठून खाली उतरून गेल्याशिवाय सूर्योदय पाहता येत नाही.

सूर्याच्या उदयापासून त्याच्या अस्तापर्यंत तो आकाशात कोणत्या मार्गाने जातो याचा अभ्यास करून "सूर्याचा आकाशातला प्रवास" या नावाची पोस्ट मी माझ्या या अनुदिनीवर मागच्या महिन्यातच लिहिली आहे. http://anandghan.blogspot.com/2019/03/blog-post_25.html  याचा सारांश असा आहे की आपला सूर्य आपला आकाशातला मार्ग सुद्धा रोजच किंचित बदलत असतो. उत्तर गोलार्धामधील युरोप अमेरिकेत जिथे तो कधीच डोक्यावर येत नाही तिथेसुद्धा या चित्रात दाखवल्याप्रमाणे आपला मार्ग वर्षभर बदलत असतो. थंडीच्या दिवसात तो खालच्या खालीच पाचसहा तास फिरून मावळतीला जातो तर उन्हाळ्याच्या दिवसात सावकाशपणे सतरा अठरा तास थोड्या लांबच्या रस्त्यावरून आकाशात फिरत राहतो.

एकदा मी पहाटे उठून खिडकीबाहेर पाहिले तर अजून सूर्योदयाला उशीर असल्यामुळे बाहेर काळोखाचे साम्राज्य होते आणि कविवर्य भा रा तांबे यांच्या शब्दात सांगायचे झाले तर "घनतमी शुक्र बघ राज्य करी"त होता. पुण्याच्या वातावरणात इतर फारशा चांदण्या स्पष्ट दिसत नसल्या तरी त्या होत्याच. मी बाल्कनीत येऊन पाहिले तर थोड्या उंचावर तेजस्वी गुरुमहाराजही विराजमान होते. मी या दोघांना पटकन ओळखले आणि इंटरनेटवर थोडा शोध घेतल्यावर त्या दोघांच्यामध्ये शनिमहाराज असल्याचे समजले. मग थोडे निरखून पाहिल्यावर किंचित निळसर छटा असलेला हा मंद ग्रहसुद्धा सापडला. तोपर्यंत पहाट व्हायला आल्यामुळे सगळ्याच तारका मंद मंद होत अदृष्य झाल्या. त्या दिवसानंतर मला काही कारणाने कधीही लवकर जाग आली की मी लगेच खिडकीत जाऊन त्यांचे दर्शन घेतो. त्यांच्या मंद गति मला माहीत असल्यामुळे त्यांच्या आकाशातल्या स्थानामध्ये रोजच्या रोज फारसा फरक पडत नाही हे मला लहानपणापासून ठाऊक होते. त्यामुळे ते आधी ज्या ठिकाणी दिसले होते त्याच्या जवळपास दिसायचेच.


शनि हा ग्रह फारच मंद आहे, तो एकेका राशीत तब्बल अडीच वर्षे मुक्का ठोकून बसतो. गुरु त्या मानाने थोडा चपल आहे, दर वर्षी एका राशीने पुढे जातो. त्यामुळे महिनाभरात बोटभर सरकला आहे. शुक्र मात्र सूर्याच्याच वेगाने दर महिन्याला रास बदलतोच, शिवाय त्याच्याही कधी मागे तर कधी पुढे होतांना दिसतो. त्यामुळे महिनाभरात तो गुरु आणि शनि यांच्यापासून चांगला १५-२० अंशांनी दूर गेला आहे. माझ्याकडे चांगला कॅमेरा नसल्यामुळे मी इंटरनेटवरून आणि मित्रांकडून मिळालेल्या त्यांच्या आकृति खाली दिल्या आहेत. या आकृति दोन निरनिराळ्या खंडामधील असल्यामुळे आणि निरनिराळ्या अँगलमधून काढलेल्या असल्यामुळे त्या ग्रहांना जोडणारी रेषा वेगवेगळ्या बाजूने आणि कोनाने तिरक्या दिसतात, पण त्यांच्यामधील अंतरे मात्र प्रमाणातच आहेत.

चंद्र हा आपल्या पृथ्वीभोवतीच महिनाभरात प्रदक्षिणा घालतांना तेरा राशींमधून पुढे सरकतो. तो रोजच आदल्या दिवशीपेक्षा बारा अंशांनी पुढे जातो आणि महिनाभरात आकाशातल्या सर्व ग्रहांबरोबर एक एकदा तरी युति करतोच. मार्चच्या अखेरीस तो गुरु आणि शनि यांच्या जवळ येऊन गेला. तो शनिच्या तर इतक्या जवळ आलेला दिसला की आणखी काही काळात तो शनिला झाकून किंवा गिळून टाकेल की काय असे वाटले होते, पण तेवढ्यात सकाळ होऊन आकाशात उजेड झाला. कदाचित युरोपमधून ते दृष्य दिसलेही असेल.


दोन एप्रिलच्या पहाटे एक अद्भुत योग जुळून आला होता. तेरा वर्षांपूर्वी मी जेंव्हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली तेंव्हा त्या पानावर काय लिहावे असा प्रश्न मला पडला होता. त्या काळात अचानक मला त्रयोदशीच्या पहाटेच्या लोभसवाण्या चंद्रकोरीचे दर्शन घडले आणि एक विषय मिळाला. त्यातूनच पुढे 'तोच चंद्रमा नभात' ही मालिका सुरू करून मी तिचे बत्तीस भाग लिहिले आणि माझ्या या छंदाला आकार आला. दोन एप्रिलच्या पहाटे चंद्रमा आणि शुक्र यांची युति होणार आहे हे मला आधीच समजले होते म्हणून मी मुद्दाम पहाटे लवकर उठून या नाजुक चंद्रकोरीचे आणि तिच्या शेजारीच तळपणाऱ्या तेजस्वी शुक्राचे दर्शन घेतले. दोघेही जवळजवळ तितक्याच तेजाने चमकत होते, डोक्यावर गुरु होताच आणि या दोघांच्या मधल्या जागेत शनि होता. शिवाय या वेळी बुध हा ग्रहसुद्धा चंद्राच्या जवळ येणार होता त्यामुळे त्याचा शोध घेणे सोपे झाले आणि बोनस म्हणून बुध या ग्रहाचे दुर्मिळ असे दर्शनही झाले. थोड्या वेळाने रविचा उदय होणारच होता. अशा प्रकारे सात वारांना ज्यांची नावे आहेत त्या सातापैकी सहा पहायला मिळााले. माझी खिडकीतली वेधशाळा अशी चांगली चालली आहे.


मंगळ हा ग्रह मात्र संध्याकाळच्या पश्चिमेच्या आकाशात असतो पण तो भाग माझ्या खिडकीमधून दिसत नाही. नऊ एप्रिलला त्याची चंद्राबरोबर अॅपॉइंटमेंट असल्याचे समजले तेंव्हा मी संध्याकाळच्या फिरण्यानंतर बाहेरच थोडा जास्त वेळ रेंगाळत राहिलो आणि चंद्राच्या आधाराने लालसर मंगळाला शोधून काढले. या वेळेलाही बोनस म्हणून जवळच असलेले मृग नक्षत्र आणि व्याधाचा तारा पहायला मिळाला. आणखी काही महिन्यांनी हे सर्वही पहाटेच्या आकाशात दिसायला लागतील आणि एकाद्या दिवशीचे आकाश निरभ्र असले तर दिसतीलही. 

Saturday, March 30, 2019

फ्रेंच शास्त्रज्ञ जोसेफ लुई गे ल्युसॅकयुरोपातल्या मध्ययुगापर्यंतच्या काळात फक्त तत्वज्ञान (Philosophy) म्हणजे ज्ञान असे समजले जात होते आणि पुरातन काळातल्या विद्वानांनी जेवढे काही लिहून ठेवले होते त्याचाच अभ्यास पिढ्यान् पिढ्या होत होता. कुणालाही सहज न पटणारा असा क्रांतीकारक नवा विचार मांडायला तिकडेसुद्धा  समाजाचीच परवानगी नव्हती. ज्ञानाचा संबंध धर्माशी जोडून काहीही वेगळे मत मांडणे हे धर्माला आव्हान दिल्यासारखे समजले जाई आणि त्या माणसाला वाळीत टाकले जाई. भारतातसुद्धा 'बाबावाक्यम् प्रमाणम्' असेच शतकानुशतके समजले जात असे, किंबहुना अजूनही तसे समजले जाते. पण कोपरनिकस, गॅलीलिओ, न्यूटन वगैरें शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून त्यांना अनेक नव्या गोष्टी समजल्या किंवा अधिकाधिक नवी माहिती उजेडात येत गेली आणि त्यांनी ती धीटपणे प्रसिद्ध केली. यामधून तयार झालेले नवे ज्ञानसुद्धा निसर्गाचे तत्वज्ञान (Natural Philosophy) या नावाने ओळखले जायला लागले. त्याला विज्ञान (Science) हे नाव मिळाले नव्हते आणि त्याच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र वगैरे शाखा तर नव्हत्याच. त्या काळातले संशोधक अनेक प्रकारचे विविध प्रयोग करून नवी शास्त्रीय माहिती मिळवण्याचा आणि तिला सिद्धांतांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असत. त्या संशोधकांच्या विषयांमध्ये सजीव प्राणी तसेच निर्जीव पदार्थ अशा सगळ्यांचा समावेश होत असे.

जमीन, पाणी, हवा या महाभूतांपैकी जमीन किंवा घनरूप पदार्थ आणि पाणी किंवा द्रवरूप पदार्थ आपल्याला हाताळता येत असल्यामुळे त्यांच्यावर प्रयोग करून त्या पदार्थांचा अभ्यास करणे तुलनेने सोपे असते. ते काम प्राचीन काळापासून चालत आले होते. अशा प्रयोगांमधूनच अनेक प्रकारचे धातू आणि औषधे, रसायने वगैरे वस्तू तयार केल्या जात होत्या. पण अदृष्य आणि विरळ अशा हवेवर काम करणे त्या मानाने खूप कठीण होते. हवेला बंद झाकणाच्या बरणीमध्ये किंवा फुग्यांमध्ये कोंडून ठेऊनच तिच्यावर संशोधन करणे भाग होते. या सगळ्या अडचणींना सामोरे जाऊन सतराव्या शतकातल्या अनेक शास्त्रज्ञांनी हवा आणि इतर वायूंवर संशोधन करायला सुरुवात केली. त्यांच्या अस्तित्वापासून ते विशिष्ट गुणधर्मांपर्यंत शास्त्रीय माहिती जमा होत गेली. टॉरिसेली, पास्कल, बॉइल, चार्ल्स आदि शास्त्रज्ञांनी महत्वाचे शोध लावून या संशोधनामध्ये मौलिक कामगिरी केली. जोसेफ लुई गे ल्युसॅक या फ्रेंच शास्त्रज्ञाने यात महत्वाची भर घातली.

जोसेफ लुई गे ल्युसॅक याचा जन्म एका सधन फ्रेंच परिवारात इसवी सन १७७८ मध्ये झाला. पण तो लहान असतांनाच झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर काही काळ त्याच्या पित्याला तुरुंगात टाकले गेले होते. चर्चमधल्या धर्मगुरूंनी त्याला शिक्षण दिले. त्याने भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचा अभ्यास करून त्या विषयांचे अध्यापन केले तसेच संशोधनाला वाहून घेतले.

गे ल्युसॅक याने हवेवर प्रयोग करतांना पाहिले की हवेला बंद पात्रामध्ये तापवत असतांना तापमानासोबतच हवेचा दाबही सारखा वाढत जातो. तापमान जितके वाढेल त्या प्रमाणात तिचा दाब वाढतो तसेच हवा थंड होतांना तिचे तापमान जितके कमी होईल त्या प्रमाणात तो दाब कमी होतो. त्याने यावर विचार केला. जॅक चार्ल्सने लावलेल्या शोधाला तोपर्यंत प्रसिद्धी मिळालेली नसली तरी गे ल्युसॅकला त्याची माहिती समजली होती. त्या नियमानुसार "वायूचे घनफळ (व्हॉल्यूम) त्याच्या तापमानाच्या सम प्रमाणात असते." म्हणजेच बंद पात्रामध्ये असलेल्या हवेला तापवले तर त्याचे घनफळ वाढायला पाहिजे, पण त्यासाठी पात्रामध्ये जास्तीची जागा नसल्यामुळे त्या हवेला पात्रात उपलब्ध असलेल्या जागेतच कोंडले जाते. समजा पात्रातल्या हवेचे घनफळ तापवल्यामुळे वाढून दुप्पट झाले तरीही त्या वाढलेल्या घनफळाला निम्मे होऊन त्या पात्रातच मावावे लागते. बॉइलच्या नियमानुसार घनफळ आणि दाब व्यस्त प्रमाणात असतात. त्यामुळे घनफळ अर्धे झाले तर त्याचा दाब दुप्पट होतो. यावरून गे ल्युसॅकच्या निरीक्षणाला समाधानकारक शास्त्रीय स्पष्टीकरणही मिळाले. त्याने ही सगळी माहिती प्रसिद्ध करून स्वतःबरोबरच चार्ल्सच्या संशोधनालाही प्रसिद्धी दिली आणि आपल्या स्वतःच्या शोधाला चार्ल्सच्या नियमाचा आधार असल्याचे दाखवून दिले. "घनफळ स्थिर असेल तर वायूचा दाब त्याच्या तापमानाच्या सम प्रमाणात असतो" हा गे ल्यूसॅकचा नियम 'दाबाचा नियम' ('Pressure Law') या नावानेही ओळखला जातो. बॉइल आणि चार्ल्स यांनी केलेल्या प्रयोगांमधून त्यांना जी माहिती समजली त्यांच्या आधारावर त्यांनी निसर्गाचे दोन प्रयोगसिद्ध नियम सांगितले होते. पण त्या नियमांनुसार दाब आणि घनफळात बदल का होतात याची शास्त्रीय कारणे तेंव्हा कुणालाच माहीत नव्हती. गे ल्यूसॅकचा नियम मात्र या दोन नियमांच्या आधाराने सैद्धांतिकदृष्ट्या (theoretically) आणि शिवाय प्रयोगानेही (experimentally) सिद्ध होत होता.
वर दिलेल्या संशोधनांवरून वायूंचे तीन मुख्य नियम समजले. या तीन्ही नियमांना मिळून वायूंचे नियम (Gas Laws) असे म्हणतात.
१. बॉइलचा नियम ...... P X V = k ... दाब  X घनफळ = स्थिरांक .... जेंव्हा तापमान स्थिर असते.
२. चार्ल्सचा नियम ...... V = k X T ... घनफळ = स्थिरांक X तापमान .... जेंव्हा दाब स्थिर असतो.
३. गे ल्यूसॅकचा नियम .. P = k X T ... दाब = स्थिरांक X तापमान .... जेंव्हा घनफळ स्थिर असते.
घनरूप पदार्थांची लांबी, रुंदी, जाडी, व्यास, परीघ वगैरे मोजून गणिताने त्यांचे घनफळ काढता येते, द्रवरूप पदार्थांचे घनफळ मापाने मोजता येते, पण वायुरूप पदार्थांचे घनफळ स्थिर नसते. ते त्यांचा दाब आणि तापमान यांच्यावर अवलंबून असते. त्यामुळे ते केंव्हाही अमूक इतक्या तापमानाला आणि इतक्या दाबावर इतके लिटर किंवा घनफूट असेच सांगावे लागते. सिलिंडरमध्ये भरलेल्या वायूंच्या घनफळांची मोजणी, हिशोब वगैरे करण्यासाठी प्रमाणभूत तापमान आणि दाब (standard temperature and pressure) किंवा (STP) ठरवतात आणि Liters / Cubic feet at STP असे सांगतात. 
जोसेफ लुई गे ल्युसॅकने दुसरा एक अत्यंत महत्वाचा शोध लावला. त्याने असे दाखवून दिले की हैड्रोजन आणि ऑक्सीजन या दोन वायूंचा २ : १ या ठराविक प्रमाणातच संयोग होऊन त्यामधून पाण्याची वाफ तयार होते. नायट्रोजन आणि हैड्रोजन यांचा १:३ या प्रमाणातच संयोग होऊन अमोनिया हा वायू तयार होतो. अशा प्रकारे दोन वायूंचा संयोग होतांना त्यांच्या आकारमानांचे प्रमाण नेहमीच १,२,३ अशा पूर्ण अंकांमध्ये सोपे प्रमाण असते. सगळेच वायू कितीही प्रमाणात एकमेकांमध्ये मिसळतात पण त्यांच्यामधील रासायनिक क्रियांमुळे होणारे संयोग फक्त ठराविक प्रमाणातच होतात. समजा हवेने भरलेल्या एकाद्या पात्रात थोडासा हैड्रोजन वायू सोडला तर तो लगेच हवेत सगळीकडे पसरेल आणि त्यात ठिणगी टाकली तर त्या पात्रात जितका हैड्रोजन वायू असेल तो सगळा जळून जाईल पण त्याच्या निम्मा इतकाच ऑक्सीजन खर्च होईल आणि उरलेला ऑक्सीजन वायू हवेत तसाच शिल्लक राहील. गे ल्यूसॅकच्या या नियमामुळे रासायनिक क्रियांची समीकरणे मांडण्याला मदत झाली.

त्याशिवाय गे ल्युसॅकने इतर अनेक प्रकारचे संशोधन केले. त्याने वातावरणाच्या अभ्यासासाठी ऊष्ण हवेचे बलून तयार करून ते सात हजार मीटर इतक्या उंचीपर्यंत आकाशात उडवले आणि त्याला जोडलेल्या पाळण्यात बसून तो स्वतः हवेत उडून आला. आपल्या या उड्डाणात त्याने निरनिराळ्या उंचीवरील वातावरणामधल्या हवेचे नमूने बाटल्यांमध्ये गोळा केले आणि ते प्रयोगशाळेत तपासून पाहिले. पर्वतशिखरांवर किंवा हवेत उंच उडल्यावर हवेचा दाब कमी होत असतो, तरीही हवेमधील नायट्रोजन, ऑक्सीजन आदि घटकांचे प्रमाण मात्र सगळीकडे सारखेच असते हे त्याने या प्रयोगांमधून दाखवून दिले. त्याने बोरॉन आणि आयोडिन या मूलद्रव्यांचा शोधही लावला, प्रयोगशाळांमधल्या उपकरणांमध्ये काही महत्वाच्या सुधारणा केल्या. अशा प्रकारे जोसेफ लुई गे ल्युसॅकने विज्ञानाच्या, विशषतः रसायनशास्त्राच्या प्रगतीला मोठा हातभार लावला.
---------------------------
फ्रेंच शास्त्रज्ञ जोसेफ लुई गे ल्युसॅक (Shikshan Vivek) http://shikshanvivek.com//Encyc/2019/3/23/French-Scientist-Joseph-Louis-Gay-Lussac.aspx