'रस्त्यातली गर्दी', 'रस्त्यावरचे घर', ते ताब्यातून गेले तर सामानासकट 'रस्त्यावर येण्याची' भीती अशा शब्दप्रयोगातून 'रस्ता' म्हणजे एक स्थायी अशी जागा असल्याचे ध्वनित होते. एका नाठाळ माणसाला कोणा ति-हाइताने म्हणे विचारले, "कां हो, हा रस्ता कुठे जातो?"त्याने खंवचटपणाने सांगितले, "मी तर त्याला कुठे जातांना केंव्हाही पाहिले नाही. कधीपासूनचा हा तर इथेच पडून राहिला आहे."त्याएवजी त्याला कुठल्याशा गांवाची 'वाट' विचारली असती तर कदाचित वेगळे उत्तर आले असते. 'वाट' ही नेहमीच कुठे तरी जाणारी असते. ती त्या जागेची दिशा दाखवते आणि प्रवासाची निदान सुरुवात तरी करून देते. 'मार्ग' मात्र आपल्याला ईप्सित ठिकाणापर्यंत नेऊन पोचवतो. एकादा माणूस 'वाट चुकून' भरकटत जाऊ शकतो, पण ते लक्षात आल्यावर पुन्हा 'मार्गावर' येतो. माणसेच काय, ग्रहसुध्दा वक्री झाले की मागे जाऊ लागतात आणि ते पुन्हा मार्गी लागले की राशीचक्रातील आपले भ्रमण चालू ठेवतात. कदाचित म्हणूनच शाहीर अनंत फंदी आपल्या फटक्यात "बिकट'वाट' वहिवाट नसावी धोपट'मार्गा' सोडू नको" असा सूज्ञ सल्ला देतात.
कांही माणसे वाममार्गाचा उपयोग करून फायदा मिळवू पाहतात, पण त्या मार्गाने नेण्याला कधीही 'मार्गदर्शन' असे म्हणत नाहीत. 'मार्गदर्शक' किंवा 'पथप्रदर्शक' हा नेहमीच गुरुस्थानी असतो. तो एका उच्च पातळीवरून शिष्याला शिकवण देत असतो. वाटाड्या मात्र सवंगड्यासारखा आपल्याबरोबर असतो आणि तो आपल्यातलाच एक वाटतो. 'मार्ग' या शब्दाला असा महिमा आहे, एक वजन आहे. 'मार्ग' म्हंटल्यावर साधा 'रस्ता' डोळ्यासमोर येत नाही. 'स्वामी विवेकानंद मार्ग' आणि 'लाल बहादुर शास्त्री मार्ग' हे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातील मुख्य रस्ते आहेत, पण सगळे लोक त्यांचा उल्लेख 'एसव्ही रोड' आणि 'एलबीएस रोड' असाच करतात. "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गाने परळहून दादर टीटीपर्यंत जावे." अशासारख्या सूचना गणपतीविसर्जनाच्या दिवशी वाचायला मिळतात. कोणाला प्रत्यक्षात तसे बोलतांना मी अजून ऐकले नाही.
'मार्ग' या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. रस्त्यांबरोबरच 'लोहमार्ग', 'जलमार्ग' आणि 'हवाई मार्ग' यांचाही समावेश त्यांत होतो. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी 'ज्ञानयोग', 'कर्मयोग', 'भक्तीयोग' वगैरे विविध मार्ग भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहेत. त्यातला 'भक्तीमार्ग' हा सर्वात सरळ आणि सोपा आहे अशी शिकवण
सर्व संतांनी जनतेला दिली आहे. एकदाचा 'मार्ग' मिळाला की प्रवासी त्यावरून आपल्या पुढील मुक्कामापर्यंत गेलाच असे सर्व साधारणपणे समजले जाते. 'वाटे'मध्ये संकटे आली तर त्यातून
गुपचुपपणे निसटायच्या 'पळवाटा' शोधल्या जातात. 'मार्गा'त अडचण आली तर तिचा मुकाबला करून 'मार्ग' मोकळा केला जातो. त्यामुळे एकदाचा मुलगा 'मार्गा'ला लागला की मातापिता त्याच्या भवितव्याबद्दल आश्वस्त होतात. "मार्गस्थ स्वये मीच पृष्ठि वाहीन, त्वरितया परत आणीन" असे वचन तू दिले होतेस याची सागराला आठवण करून देत "विश्वसलो या तव वचनी मी, जगद्नुभवयोगे म्हणुनी मी" असे वीर सावरकर "सागरा, प्राण तळमळला" या सुप्रसिध्द देशभक्तीपर गीतात म्हणतात.
भाग्यवान लोक आपापल्या ध्येयपूर्तीसाठी त्या दिशेने जाणारा राजमार्ग धरतात आणि त्यावर चालत जाऊन प्रगतीची उंच शिखरे गांठतात. कांही दुर्दैवी लोकांना मात्र ते भाग्य लाभत नाही. त्यांची कांही चूक नसतांनासुध्दा त्यांच्या वाट्याला सारखे अपयशच येत राहते. तरीही जीवनाची वाटचाल त्यांना कशीबशी करणे भाग असते. यशस्वी माणसाबरोबर राहणे सर्वांना आवडते, अपयश एकट्यानेच पचवावे लागते. पण थकलाभागला तरी तो न थांबता एक एक पाऊल पुढे टाकत राहतो. हृदयातल्या जखमा लपवून ओठावर स्मितहास्य आणायचा प्रयत्न करतो. अशा दुर्दैवी माणसाच्या मनातल्या करुण भावना स्व. शांता शेळके यांनी किती अप्रतिम रीत्या शब्दबध्द केल्या आहेत ते खालील गीतात दिसते.
हा माझा मार्ग एकला ! शिणलो तरिही चालणे मला ।।
दिसले सुख तो लपले फिरुनी, उरले नशिबी झुरणे दुरुनी, बघता बघता खेळ संपला !
सरले रडणे उरले हसणे, भवती रचितो भलती व्यसने, विझवू बघतो जाळ आतला !
जगतो अजुनी जगणे म्हणुनी, जपतो जखमा हृदयी हसुनी, छळते अजुनी स्वप्न ते मला !
'पथ' हा बिनाजोडाक्षराचा सोपा शब्द असला तरी तो क्वचितच वापरला जातो. दिल्लीला 'राजपथ' व 'जनपथ' हे खूप रुंद रस्ते आहेत. महाराष्ट्रातही कांही गांवातल्या रस्त्यांना 'अमका तमका पथ' असे नांव ठेवलेले असते. फुटपाथला 'पदपथ' असे म्हणतात, नगरपालिका वाहनचालकांचेकडून 'पथक'र वसूल करतात. पण हे सगळे सरकारी कागदोपत्री चालते. बोलण्यात किंवा लिखाणात सहसा कुठे 'पथ' दिसत नाही. संस्कृतमध्ये 'महाजनो येन गतः स पंथः।' असे एक सुभाषित आहे. ज्या वेळी आपल्याला रस्ता माहीत नसेल आणि मार्गदर्शन करायलाही कोणी नसेल तेंव्हा मोठी माणसे ज्या मार्गाने गेले आह्त तोच पंथ धरावा हे इष्ट असते. मराठीत 'पंथ' या शब्दाचा अर्थ 'पथ'हून थोडा वेगळा होतो.
No comments:
Post a Comment