Sunday, May 31, 2009

ग्रँड युरोप - भाग ३३ प्रवासातील गंमती


प्रवासातील गंमती

पॅरिसमधील रंगीन लिडो शो ने आमच्यापुरती ग्रँड युरोप टूरची सांगता झाली. आमच्या ग्रुपमधील बाकीचे सर्व सहप्रवासी दुसरे दिवशी लंडनला जाणार होते, पण सहल ठरवतांनाच आम्ही इंग्लंडचा प्रवास त्यातून वगळला होता. त्यासाठी कांही तशीच सबळ कारणे होती. आम्ही उभयतांनी लंडनची वारी पूर्वीच केलेली होती, त्यामुळे तीच जागा पुन्हा पाहण्याचे एवढे आकर्षण नव्हते ही पहिली गोष्ट होती. यापूर्वी आयुष्यात कधीही इतके दिवस सलग प्रवास केलेला नसल्यामुळे तितके दिवस आपल्या मनातला उत्साह टिकून राहील की नाही आणि इतक्या भटकंतीमध्ये आपले शरीर कुरकुर न करता साथ देईल की नाही अशी प्रश्नचिन्हे डोळ्यासमोर होती. त्यामुळे शक्य झाल्यास त्यातील तीन दिवस कमी करणे जरासे शहाणपणाचे वाटले. इंग्लंडच्या व्हिसासाठी वेगळे फोटो, वेगळे फॉर्म भरणे, कदाचित इंटरव्ह्यूची गरज वगैरे टळले असते. ही सगळी नकारात्मक कारणे झाली. सहसा मी आपले निर्णय अशा कारणांमुळे घेत नाही. पण खर्चात चांगली घसघशीत बचत होईल हे सकारात्मक कारण यांच्या जोडीला आले आणि इंग्लंडला न जाण्याचा कौल मनाने दिला. या गोष्टी एकदा ठरवल्यानंतर आपल्याला पाहिजे तेंव्हा आयत्या वेळी बदलता येत नाहीत. त्यामुळे "आपण या ग्रुपबरोबर लंडनलासुद्धा जायला हवे होते." असा विचार पॅरिस पाहून झाल्यानंतर करण्यात कांही अर्थ नव्हता. लिडो शो पाहून परत येतांना बसमधून अखेरचे उतरल्यावर सर्वांचा प्रेमळ निरोप घेतला आणि खोलीवर जाऊन परतीच्या प्रवासाची तयारी केली. पण त्याची हकीकत सांगण्याआधी आतापर्यंत केलेल्या यात्रेमधील लक्षात राहिलेल्या कांही विशेष बाबी सांगायला हव्यात.

युरोपमधील आमचा सारा प्रवास एकाच आरामबसने झाला हे यापूर्वी आले आहेच. ही खरोखरच आरामशीर बसगाडी होती. बसमध्ये प्रशस्त मऊ सीट्स व एअरकुशनचे शॉक एब्सॉर्बर्स होते, तसेच सारे रस्ते सपाट असल्याने पूर्ण प्रवासात शरीराला एकसुद्धा धक्का बसला नाही. युरोपच्या थंड हवेत बस वातानुकूलित असण्याची काय गरज आहे असे आधी वाटले होते. पण तिकडच्या वाहनांना उघडझाप करणा-या खिडक्या नसतातच, सगळ्या खिडक्यांना मोठमोठ्या कांचा लावलेल्या असतात. श्वास घेण्यासाठी शुद्ध हवेचा पुरवठा एअरकंडीशनिंगच्या यंत्रामधूनच केला जातो. वातावरणातील थंडपणामुळे कॉंप्रेसरवर कमी ताण पडत असेल आणि इंधनाची बचत होत असेल एवढेच. पण गाडीचे इंजिन सुरू करून ए.सी.सुरू केला नाही तर तोपर्यंत आंत गुदमरायला होते. त्यामुळे ते असणे आवश्यक असते.

गाडी आणि तिचा चालक या दोघांनाही युरोपभर फिरण्याचा परवाना होता. त्यांची तपासणी करण्यासाठी वाटेत कोठेही थांबावे लागले नाही. आपल्याकडे एका राज्यातून दुस-या राज्यात प्रवेश करतांना 'बॉर्डर फॉर्मॅलिटीज' पूर्ण करण्यासाठी बरेच वेळा थांबावे लागते. तिथे एका देशातून दुस-या देशात जातांना सीमेवर फक्त एक फलक आणि दोन बाजूला दोन देशांचे झेंडे दिसतात. चालत्या गाडीतून ते पहात पहात पुढे जात होतो. सर्वांसाठी सामायिक शेंघेन व्हिसा असल्याने प्रवाशांचीही तपासणी करायची गरज नसते. फक्त एकाच वेळा, ऑस्ट्रियामधून लीस्टनटीनमध्ये जातांना आमचे पासपोर्ट मागितले, कारण तो देश युरोपीय संघात सामील झालेला नाही. पण स्विट्झरलंडचा व्हिसा तेथे चालतो. तेंव्हा सुद्धा आम्हा सगळ्यांचे पासपोर्ट गोळा करून एकत्र पाहून परत केले. बसमध्ये प्रत्यक्ष कोण कोण बसले आहेत हे पहायला कोणी आंत आले नाही. त्यानंतर पुन्हा कोठेसुद्धा पासपोर्ट दाखवावा लागला नाही. "मात्र तो अत्यंत महत्वाचा आहे आणि सतत सोबत बाळगणे आवश्यक आहे. चुकूनसुद्धा इकडे तिकडे ठेवू नका, हॉटेलमध्ये किंवा बसमध्ये तर नाहीच नाही." वगैरे उपदेशाची रेकॉर्ड रोज सकाळ संध्याकाळी ऐकवली जात होती. यापूर्वीच्या सहलींमध्ये या दोन्ही ठिकाणावरून तसेच खिशातून तो चोरीला गेल्याच्या घटना घडून गेल्या असल्यामुळे सकाळी बसमध्ये चढतांना आणि रात्री परत आल्यावर उतरतांना त्याची आठवण करून दिली जात होती.

आम्ही दोन देशांमधील सीमा जशा सुलभतेने ओलांडीत होतो त्याचप्रमाणे जागोजागी असलेले टोलनाकेसुद्धा पार करून जात होतो. जवळजवळ प्रत्येक नवा पूल किंवा बोगदा बांधायला आलेला खर्च तो वापरणा-या वाहनांच्या चालकाकडून टोलच्या रूपाने वसूल करण्याची पद्धत आता भारतातही सुरू झाली आहे. युरोपात ती आधीपासून अस्तित्वात आहे. मात्र इथे प्रत्येक जागी मोटारी अडवून ट्रॅफिकची कोंडी केली जाते तसे तिकडे नसते. गाडीच्या समोरील कांचेवरच क्रेडिटकार्डासारखे एक स्टिकर लावलेले असते. टोलनाक्यासमोरून गाडी जात असतांना एका यंत्राद्वारे दुरूनच ते वाचले जाते आणि टोलची रक्कम परस्पर बँकेमधून वसूल केली जाते.

ड्रायव्हरकडे युरोपमध्ये फिरण्याचा परवाना असला तरी सगळीकडले रस्ते त्याला कसे माहीत असतील किंवा त्याच्या लक्षात रहात असतील याचे सुरुवातीला कौतुक वाटायचे. चौकाचौकात गाडी उभी करून पुढील दिशा विचारायची सोय नव्हती कारण कोणत्याही हमरस्त्यावरून शेकडो किलोमीटर गाडी चालवली तरी एक चौक सापडणार नाही. सगळी लेफ्ट हँड ड्राइव्ह व्हेइकल्स असून ती रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवली जातात. वाटेत येणारे गांव रस्त्याच्या उजव्या बाजूला असो वा डाव्या बाजूला असो, तिकडे जाणारा छोटा रस्ता उजव्या बाजूनेच फुटणार. त्याची आगाऊ सूचना एक दीड किलोमीटर आधीपासून दिली जाते. ती पाहून आपली गाडी रस्त्याच्या उजवीकडील लेनमध्ये आणून फाटा फुटल्यावर वळवायची. गांव डाव्या बाजूला असेल तर तिकडे जाणारा रस्ता हमरस्त्याला पुलावरून ओलांडून तिकडे जाईल. त्यामुळे कोणाकडे विचारपूस करायची सोय नाही. तशी आवश्यकताही नसते. फक्त रस्त्यावरील खुणा व फलक वाचून ते समजायला हवेत. त्यात एक चूक केली तर परत फिरणेही शक्य नसते कारण कोठेही यू टर्न नसतोच. निदान वीस पंचवीस किलोमीटर पुढे जाऊन तिथल्या पुलावरून आपला रस्ता पार करून परत जावे लागते.

दोन तीन दिवस निरीक्षण केल्यानंतर अधिक माहिती समजली. जगातील कोठल्याही जागेची उपग्रहावरून घेतलेली चित्रे आता गूगल अर्थमधून आपल्याला घरबसल्या दिसू शकतात. त्यात आपले राहते घऱ, ऑफिस, मित्रांची व नातेवाइकांची घरे सर्वांनीच हौसेने पाहिली असतील. तशाच प्रकारच्या तंत्रज्ञानावर आधारित एक ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम (जीपीएस) नांवाची प्रणाली निघाली आहे. तिचे सदस्यत्व घेणा-या वाहनचालकाला मोटारीत बसल्या बसल्या कोणत्या जागी कसे जायचे याचे सविस्तर मार्गदर्शन मिळते. कोणत्याही क्षणी आपली गाडी कोठे आहे ते ठिकाण समजते आणि आपल्याला कोठे जायचे आहे ते सांगितल्यावर तिकडे जाण्याचा मार्ग समोरच्या स्क्रीनवरील नकाशातून दाखवला जातो तो पाहून गेल्यावर ते ठिकाण आपोआपच येते. आमचा चालक एका गांवाहून दुस-या गांवाला जाण्यासाठी या जीपीएसचा चांगला उपयोग करीत असला तरी त्या गांवात गेल्यानंतर राहण्याचे किंवा जेवणाचे हॉटेल शोधतांना कधी कधी थोडा गोंधळ होत असे. कदाचित एकासारख्या नांवाची दोन हॉटेले असत किंवा त्याच्या स्पेलिंगमध्ये चुका होत असतील. एकदा तर आम्हाला डोळ्यासमोर मॅकडोनाल्डचे एक रेस्टॉरेंट दिसत होते, पण जीपीएसच्या सूचनेनुसार आम्ही चार पांच किलोमीटर दूर जाऊन त्याच्या दुस-या शाखेत जाऊन पुन्हा परत आलो. या निमित्ताने आपल्याला ते गांव पहायला मिळत आहे असा सकारार्थी विचार आम्ही करीत होतो.

प्रवासातच कोणीतरी आम्हाला सांगितले की मागच्या वर्षी एका ट्रिपमध्ये केसरीची बसच चोरीला गेली होती. ते ऐकून आधी सगळ्यांचेच धाबे दणाणले. मग हळू हळू अधिक चौकशी करायला सुरुवात केली. ब्रुसेल्सला गेल्यावर चोरी जिथे झाली होती ती जागासुद्धा आम्ही पाहिली. पर्यटक दुपारचे जेवण करायला गेले असतांना ड्रायव्हरलाही थोडे पाय मोकळे करून घ्यावेसे वाटले. त्यामुळे रस्त्याच्या कडेला बस उभी करून तो दहीपंधरा मिनिटे फिरून आला. तेवढ्यात ती बस आतील सर्व सामानासह अदृष्य झाली होती. खरे तर दरवाज्याची किल्ली, इंजिनाची किल्ली, कॉँप्यूटरचा पासवर्ड वगैरेशिवाय ती कशी पटकन चोरता आली हेच आश्चर्जनक आहे. इतके संगणकीकरण केलेले असतांनासुद्धा रस्त्यात कुठेही ती सापडू नये याचे त्याहूनसुद्धा जास्त आश्चर्यही वाटले आणि या आधुनिक साधनांवरील विश्वास कमी झाला.

. . . .(क्रमशः)

Thursday, May 28, 2009

ग्रँड युरोप - भाग ३२ : डिस्नेलँड आणि लिडो शो


दि.२९-०४-२००७ चौदावा दिवस : डिस्नेलँड आणि लिडो शो

पहिल्या दिवशी पॅरिस शहर पाहून झाल्यावर दुसरा दिवस यापूर्वी कधी न पाहिलेल्या कांही खास गोष्टींसाठी ठेवलेला होता. सकाळी उठून तयार होऊन डिस्नेलँडला जायला निघालो. हे रिसॉर्ट शहरापासून दूर, सुमारे तासाभराच्या अंतरावर मोकळ्या जागेवरील निसर्गरम्य परिसरात वसवले आहे. या ठिकाणीसुद्धा पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असल्याने त्यांच्या सोयीसाठी अवाढव्य पार्किंगची व्यवस्था आहे. कार, बसेस, कॅरॅव्हॅन भरभरून येणा-या लोकांची रीघ लागली होती. त्यातले बहुतेक लोक दिवसभर तेथे घालवण्याच्या तयारीनेच आलेले होते. आम्हीसुद्धा चक्क जेवणाचे डबे आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या बरोबर घेऊन तिथे गेलो होतो.

वॉल्ट डिस्नेचे नांव कोणी ऐकले नसेल? गेल्या शतकात करमणुकीच्या क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून टाकणारी कामगिरी त्या माणसाने करून ठेवली आहे आणि त्याच्या पश्चातसुद्धा त्याची कीर्ती वाढतेच आहे. पूर्वीच्या काळातील नाटक, तमाशा, नौटंकी आदि सगळ्या करमणुकीच्या परंपरागत क्षेत्रात जीवंत माणसे रंगमंचावर येत असत. सिनेमाची सुरुवात झाल्यावर नट व नट्या पडद्यावर यायला लागल्या. यापासून वेगळी अशी कार्टून्सद्वारा मनोरंजन करण्याची कला सादर करून तिला अमाप लोकप्रियता मिळवण्यात वॉल्ट डिस्नेचा सिंहाचा वाटा आहे. एका खास कॅमेराद्वारे वेगाने छायाचित्रे घेऊन सजीव माणसाचा अभिनय टिपून घेता येतो व त्याच प्रकारे तो पुन्हा दाखवता येतो, पण निर्जीव कार्टून्सच्या हालचाली दाखवण्यासाठी थोड्या थोड्या फरकाने अनेक चित्रे काढून ती एकामागोमाग एक दाखवावी लागतात. त्यात पुन्हा मुद्राभिनय आणायचा असेल, चेप-यावरील बदलते भाव दाखवायचे असतील तर ते किती कठीण व किचकट काम असेल? आज संगणकाच्या सहाय्याने ते बरेच सोपे झाले आहे, पण वॉल्ट डिस्ने्या काळात तशी सोय कुठे होती? फार फार तर चित्रांचे ट्रेसिंग करता येणे त्या काळात शक्य होते. वेगवेगळे मुखवटे घालून माणसेच या हालचाली करत असणार अशी माझी समजूत होती.

वॉल्ट डिस्नेने नुसतीच हलणारी चित्रे दाखवली नाहीत तर त्यांमधून अद्भुत पात्रे निर्माण करून त्यांच्याकरवी मजेदार गोष्टी सांगितल्या. खरे तर कुठल्याच उंदराला मिकी माऊसप्रमाणे गोलाकार कान किंवा नाकाचा शेंडा नसतो की कुठल्याच बदकाला पंखाऐवजी दोन हांत नसतात. पण मिकी माऊस आणि डोनाल्ड डक यांचे बिळात राहणारा उंदीर व पाण्यावर तरंगणारे बदक यांचेबरोबर फक्त नांवापुरतेच संबंध आहेत. ते दोघे आणि मिनी, गूफी, अंकल स्क्रूज वगैरे सगळे लोक माणसांप्रमाणे चालतात, बोलतात, घरात रहातात, अंगात कपडे घालतात, पायात बूट चढवतात, मोटार चालवतात, ऑफिसला किंवा बाजारात जातात. त्यांचे चेहेरे विचित्र असले तरी माणसांप्रमाणेच प्रत्येकाचे निराळे व्यक्तीमत्व असते व त्यानुसार तो वागतो. मात्र ती काल्पनिक पात्रे असल्यामुळे मानव शरीराचे नियम त्यांना लागू पडत नाहीत. त्यांचे अंग इतके लवचीक आहे की ओढले तर छपरापर्यंत ताणले जाते आणि दाबले की इस्त्री केलेल्या कापडासारखे सपाट होते. कधी ते फुग्यासारखे टम्म फुगते तर कधी धुवून पिळलेल्या फडक्यासारखे दहा ठिकाणी पिरगळते. हे सगळे अफलातून चमत्कार पहातांना लहान मुले तर खिदळत राहतातच, मोठे लोकसुद्धा खुर्चीला चिकटून बसतात.

सिनेमाच्या माध्यमात प्रचंड यश मिळवल्यानंतर वॉल्ट डिस्नेने मनोरंजनाच्या क्षेत्रात एक नवा अध्याय जोडला. केवळ मौजमजा करण्यासाठी त्याने डिस्नेलँड या एका एम्यूजमेंट पार्कची निर्मिती केली. त्यात चित्रविचित्र आकाराच्या इमारती तर बांधल्याच पण लहानापासून थोरांपर्यंत सगळ्यांसाठी विलक्षण मनोरंजक तसेच चित्तथरारक खेळांची योजना केली. या कल्पनेला लोकांकडून कल्पनातीत प्रतिसाद मिळाला आणि अशा प्रकारच्या उद्यानांना मोठी मागणी निर्माण झाली. वॉल्ट डिस्नेच्या कंपनीने त्यानंतर फ्रान्स, जपान, हाँगकाँग वगैरे देशात स्वतःचे डिस्नेलँड उभारले आहेत. यापासून प्रेरणा घेऊन तयार केलेले एस्सेलवर्ल्डसारखे इतर पार्कसुद्धा अनेक ठिकाणी आहेत. पण डिल्नेलँडची सर कोणाला आली नाही आणि तितकी लोकमान्यताही कोणाला मिळाली नाही.

पॅरिसच्या डिस्नेलँडचे पांच मुख्य भाग आहेत. मेन स्ट्रीट यू.एस.ए, फ्रॉंटियरलँड, एड्व्हेंचरलँड, फँटसीलँड आणि डिस्कव्हरीलँड. हे सारे भाग एकमेकांना लागून आहेत. त्यात निरनिराळ्या प्रकारच्या करमणुकीच्या सोयी व खेळ आहेत. मेन स्ट्रीटवर मुख्यतः आकर्षक इमारतीमध्ये दुकाने थाटलेली आहेत. घोड्याच्या बगीमधून फेरफटका मारता येतो. रोज संध्याकाळी इथे एक अनुपम अशी मिरवणूक निघते. फ्रॉंटियरलँडमध्ये फँटमचा बंगला, थंडर माउंटन, इंडियन खेडे, नदीमधील होड्या वगैरे आहेत. एड्व्हेंचरलँडमध्ये कॅरीबियन सागरी चांचे, रॉबिनसन क्रूसोचे झाडावरील घर, अल्लाउद्दीनची गुहा यासारख्या जागा आहेत. फँटसीलँडमध्ये निद्रिस्तसुंदरीचा राजवाडा (स्लीपिंग ब्यूटीचा कॅसल), अलाइस (वंडरलँडमधील)चा भूलभुलैया, पिनोचिओ, पीटर पॅन, ड्रॅगन यासारख्या अद्भुत कृती आहेत. स्पेस माउंटन, ऑर्बिट्रॉन, लेजर ब्लास्ट, स्टार टूर यासारख्या धाडसाच्या सहली डिस्कव्हरीलँडमध्ये आहेत. एका वर्तुळाकृती मार्गावरून फिरणारी छोटीशी आगीनगाडी या सर्वांमधून सारखी फिरत असते. हनी आय श्रंक द क्राउड हा कार्यक्रम एका सभागृहात दाखवला जातो. छोटा चेतन हा चित्रपट पहातांना जसा एक खास चष्माघालावा लागत असे तसला चष्मा लावून हा चित्रपट पहायचा असतो. तो पहाता पहाता पडद्यावरील पात्रे राक्षसासारखी मोठी होऊन आपल्या अंगावर आल्यासारखी वाटतात.

एकंदरीत अठ्ठेचाळीस वैशिष्ट्यपूर्ण जागा या मायानगरीत आहेत. कुठे घोड्यावर, मोटारीत किंवा विमानात बसून फिरण्याच्या मेरी गो राउंड आहेत, त्यातसुद्धा एका पातळीवर गोल फिरणा-या, स्वतःभोवती गिरक्या घेत फिरणा-या किंवा वरखाली तिरक्या प्लेनमध्ये फिरवणा-या असे वेगवेगळे उपप्रकार, तर कुठे जायंट व्हीलमधले झुलते पाळणे आहेत. एखाद्या खडकाळ जमीनीवरून जीपगाडी भरधाव नेल्याने बसतील तसे दचके बसवणारे रोलर कोस्टर कोठे आहेत, तर तोफेच्या तोंडी दिल्याप्रमाणे एका सेकंदात वर उडवून वेगाने खाली आणणारी रॉकेटे आहेत. ज्यांच्या हाडांचे सांधे मजबूत असतील आणि हृदय धड़धाकट असेल त्यांना अनेक अभूतपूर्व असे अनुभव देणारे कांही प्रकार आहेत, तर लहान मुलांनासुद्धा भीती वाटू न देणारे साधे खेळ आहेत. त्यांना सिंड्रेला किंवा अलाईस यांच्या कल्पनारम्य विश्वात घेऊन जाण्यायाठी किती तरी तशा प्रकारची स्थाने बनवून ठेवलेली आहेत. आम्ही आपल्या वयोमानाला अनुसरून आणि वैद्यकीय सल्ला पाळून जमतील तेवढे अनुभव घेतले आणि इतर लोकांना धा़डसी कृत्ये करतांना बाजूला उभारून पाहून घेतले.

दुपारचे तीन वाजून गेल्यानंतर मुख्य रस्त्यावर आलो. तोपर्यंतच रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या फूटपाथवर बरीच गर्दी झालेली होती. त्यातच थोडीशी चेंगराचेंगरी करून जागा करून घेतली आणि चक्क जमीनीवर बसकण मारली. सगळ्या लोकांनी तेच केले होते कारण त्यांचे पायसुद्धा दिवसभराच्या फिरण्याने दुखू लागले असणार. चार वाजता सुरू होणा-या मिरवणुकीची सगळे लोक आतुरतेने वाट पहात होते. त्याप्रमाणे चार वाजता तिचे पडघम वाजायला लागले, पण सारे चित्ररथ तयार होऊन रस्त्यावर येऊन कासवाच्या गतीने सरकत आमच्यासमोर येईपर्यंत निदान अर्धा तास तरी वाट पहावी लागली. तो जसजसा जवळ येत गेला तसे सारेजण उत्साहाने उठून उभे राहिले.

ही मिरवणूक पाहणे हा एक अभूतपूर्व अनुभव होता. मिकी माऊस, डोनाल्ड डक आणि त्यांच्या कॉमिक्समधील चिपमंकसकट एकूण एक पात्रे तर त्यांत सामील झालेली होतीच, त्यांशिवाय सिंड्रेला, स्नोव्हाईट, स्लीपिंग ब्यूटी, ब्यूटी आणि बीस्ट, पिनॅचियो, अलाईस, लायन किंग इत्यादी सर्व परीकथांमधील वेगवेगळी पात्रे या मिरवणुकीमध्ये मिरवत होती. सजवलेल्या चित्ररथांमध्ये त्यांच्या गोष्टींमधील दृष्ये अत्यंत आकर्षक रीतीने मांडलेली होती आणि कांही पात्रे त्यावर बसलेली होती किंवा नाचत होती. त्याशिवाय प्रत्येक रथाच्या आगेमागे कांही पात्रे नातच बागडत चालत होती आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बाळगोपाळांशी हस्तांदोलन करीत त्यांना खाऊ वाटत होती. प्रत्येक पात्र चित्रात दिसतो तसा चित्रविचित्र पोशाख घालून आणि मुखवटे परिधान करून आल्याने सहज ओळखू येत होते आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत होत होते. फारसे राईड घेता न आल्याने मनाला जी थोडीशी रुखरुख वाटत होती ती या परेडनंतर कुठल्या कुठे पळून गेली.

दिवसभर डिस्नेलँडच्या परीकथेतील विश्वात घालवल्यानंतर रात्री चंप्स एलिसेजवरील लिडो शो पहायला गेलो. हे सुद्धा एक वेगळ्याच प्रकारचे जग होते. टाटा थिएटरची आठवण करून देईल अशा एका भव्य थिएटरात आम्ही प्रवेश केला. आत समोर एक विशाल मंच तर दिसत होता पण प्रेक्षकांसाठी रांगेत मांडलेल्या खुर्च्या नव्हत्या. त्याऐवजी जागोजागी छोटी छोटी टेबले मांडून त्याच्या बाजूला खुर्च्या ठेवलेल्या होत्या. म्हणजे खाणे पिणे करता करता मनोरंजनाची व्यवस्था होती तर. पण आम्ही तर रात्रीचे जेवण उरकून तिथे गेलो होतो. पुढे जाऊन पहाता रंगमंच बराचसा प्रेक्षागृहाच्या आंत आला होता व त्याच्या दोन्ही बाजूला मोकळी जागा होती. त्या जागेत लांबट टेबले ठेऊन आमच्या आसनांची व्यवस्था केलेली होती. आमच्यासाठी शँपेनची बाटली आणली गेली, पण तीनचार रसखान सोडल्यास इतरांनी कोका कोला पिणेच पसंत केले.

इथला रंगमंच अद्भुत प्रकारचा होता. पूर्वीच्या काळच्या मराठी नाटकांत अरण्य, राजवाडा, रस्ता वगैरेची चित्रे रंगवलेले भव्य पडदे पार्श्वभूमीवर सोडून त्याचा आभास निर्माण करीत असत. नंतरच्या काळात नेपथ्याच्या कलेचा व शास्त्राचा विकास झाला. त-हेत-हेचे सेट बनवण्यात येऊ लागले. 'तो मी नव्हेच' या नाटकाने फिरता रंगमंच आणला. दुस-या एका नाटकात सरकता रंगमंच आला. मिनिटभर स्टेजवर अंधार करून तेवढ्यात पटापट बदलता येण्याजोगे सेट आले. पण हे सगळे प्रयत्न प्राथमिक पातळीवरचे वाटावेत इतके प्रगत तंत्रज्ञान इथे पहायला मिळाले. पहाता पहाता मागचा भाग पुढे यायचा किंवा परत मागे जायचा, बाजूचे भाग सरकत जायचे. सपाट जागेच्या ऐवजी पाय-यांची उतरंड निर्माण व्हायची. समोरील स्टेजचा मधलाच भाग भूमातेने गिळून टाकल्यासारखा गडप व्हायचा. त्यानंतर जमीनीखालून एखादा कारंजा थुई थुई नाचत वर यायचा. कधी छतामधून पाळणा तरंगत तरंगत खाली यायचा. प्रकाशयोजनासुद्धा खूप वैविध्यपूर्ण होती. रंगांच्या छटा क्षणोक्षणी बदलत होत्याच. मध्येच एका बाजूला झोत जायचा. तेथून दुसरीकडे वळला की तोपर्यंत तिथले दृष्य पूर्णपणे बदललेले असायचे.

वेगवेगळ्या प्रकारचे नाच हा कार्यक्रमाचा मुख्य भाग होता. त्याखेरीज जादूचे प्रयोग, कसरती, जगलरी, मिमिक्री यासारखे ब-यापैकी आयटमसुद्धा अधूनमधून होत होते. आपल्या हिंदी सिनेमात पूर्वी क्लबडान्स असत, त्यानंतर कॅबरे आले, आता आयटम गर्ल्सचा धुडगुस चालला असतो. त्यात नट्यांच्या अंगावरील कपडे कमी कमी होत गेले. तरीही सेन्सॉरच्या थोड्या मर्यादा असतात. इथे मात्र कसलाच धरबंध नव्हता. कधी टॉपलेस, कधी बॉटमलेस तर कधी सगळेच लेस असलेल्या तरुणींचे घोळके मंचावर येत होते, तर अधून मधून झगमगीत कपड्याने त्यांचे सर्वांग झाकलेले असायचे. कधी डोक्यावर शिरपेच घालून त्यात तुरा खोवलेला, कधी मागच्या बाजूला कोंबड्यासारखे तुर्रेदार शेपूट लावलेले तर कधी पाठीला परीसारखे पंख चिकटवलेले. इतके विविध प्रकारचे कॉस्च्यूम! गाण्यांचे बोल मुळीच समजत नव्हते आणि डान्सच्या स्टेप्सबद्दल काडीचे ज्ञान नसल्याने मंचावर नक्की काय चालले आहे किंवा ते कशाबद्दल आहे याचा अंधुकसा अंदाजसुद्धा येत नव्हता. फक्त प्रत्येक आयटम पूर्वीच्या आयटमपेक्षा वेगळा होता एवढे समजत होते. हाही एक वेगळा अनुभव होता.

सभागृहातील बहुतेक टेबलांवर विराजमान झालेली युरोपियन जोडपी आपसात संवाद साधत असतांनाच हे सगळे अधून मधून निर्विकार नजरेने पहात असली तरी आम्हा भारतीय मंडळींना हे अगदीच नवीन होते. आमच्यातल्या कोणी भारतातल्या हॉटेलात जाऊन प्रत्यक्षातला कॅबरे कधी पाहिला असेल असे वाटत नव्हते. त्यातून सर्वांच्या अर्धांगिनी त्यांच्या शेजारी बसलेल्या. त्यामुळे जरासे अवघडल्यासारखेच होत होते. त्यातल्या एकीने समोरच्या गृहस्थाकडे पहात "तो पहा कसा आधाशासारखा त्या बायांकडे पहातो आहे." असे आपल्या नव-याच्या कानात कुजबुजल्यावर त्या बिचा-याला आता कुठे पहावे हा प्रश्न पडून तो गोंधळून गेला.

. . . . . . . .(क्रमशः)

Wednesday, May 27, 2009

ग्रँड युरोप - भाग ३१ : आयफेल टॉवर


दि.२८-०४-२००७ तेरावा दिवस : आयफेल टॉवर

आमच्या नौकाविहाराची सुरुवात आयफेल टॉवरच्या पायथ्याच्या अगदी जवळून झाली. जसजशी आमची नाव नदीमधून पुढे जात होती तसतसा तो उंच मनोरा लहान लहान होत दूरदूर जातांना दिसत होता आणि परत येतांना तो मोठा होत जवळ जवळ येतांना दिसत होता. सीन नदीचा प्रवाह या भागात चंद्रकोरीसारखा थोडासा बांकदार असल्यामुळे तो टॉवर वेगवेगळ्या कोनातूनही पहायला मिळाला. सकाळपासून पॅरिसमध्ये फिरतांना हा उत्तुंग मनोरा अधून मधून पार्श्वभूमीवर दिसत होताच. पॅरिस आणि आयफेल टॉवर यांचे अतूट नाते आहे. गेटवे ऑफ इंडिया हे जसे मुंबईचे आणि कुतुबमीनार हे दिल्लीचे प्रतीक झाले आहे तसेच आयफेल टॉवर हे सुद्धा पॅरिस शहराचे आंतरराष्ट्रीय प्रतीक झाले आहे.

फ्रान्समधील राज्यक्रांतीच्या शतकमहोत्सवाच्या निमित्ताने १८८९ साली पॅरिस येथे एक आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन भरवण्याचे ठरवले गेले. फ्रान्सने यंत्रोद्योगाच्या क्षेत्रात केलेली लक्षणीय प्रगती या निमित्ताने जगापुढे आणावी असा एक मुख्य उद्देश त्यामागे होता. त्या दृष्टीने विचार करता फ्रान्समधील लोकांच्या कर्तृत्वाचे एक नेत्रदीपक असे एक प्रतीक बनवून त्या ठिकाणी उभे करायचे ठरले. त्यासाठी समर्पक अशी भव्य व कल्पक कलाकृती बनवण्यासाठी निविदा मागवल्या गेल्यावर त्याला शेकडो प्रतिसाद आले. तज्ञांकरवी त्यांची छाननी होऊन गुस्ताव्ह आयफेल या तंत्रज्ञाने मांडलेली टॉवरची संकल्पना स्वीकारण्यात आली. पुढे हा मनोरा त्याच्याच नांवाने जगप्रसिद्ध झाला.

औद्योगिक प्रदर्शन हे मर्यादित काळापुरतेच भरवले जाणार असल्यामुळे त्यासाठी कायम स्वरूपाच्या प्रतीकाची जरूरी नव्हती. पण या मीनाराच्या बांधणीला येणा-या खर्चाचा विचार करता त्यासाठी वीस वर्षाचा करार करण्यात आला. गुस्ताव्ह आयफेल याने हा मीनार पहायला येणा-या लोकांकडून वीस वर्षे मिळेल तेवढे उत्पन्न घ्यावे आणि त्यानंतर तो मोडकळीला काढावा असे ठरले. अशा प्रकारचा लोखंडाचा सांगाडा बांधतांना त्याचे स्वतःचे वजन आणि सोसाट्याच्या वादळी वा-यामुळे त्यावर पडणारा भार यांचा विचार मुख्यतः केला जातो. यदाकदाचित एखादा भूकंपाचा धक्का बसला तरी त्यामुळे तो कोसळू नये यासाठी आवश्यक तो मजबूतपणाही त्याला दिलेला असतो. या गोष्टींचा त्याच्या वयोमानाबरोबर कांही संबंध नसल्यामुळे तो उभा केल्यानंतर त्याच्या मजबूतपणात कालानुसार फरक पडत नाही. गंज चढल्याने लोखंड क्षीण होत जाते या कारणाने फक्त ते लोखंड गंजणार नाही एवढे मात्र पहावे लागते. यामुळे वारंवार त्या मनो-याची कसून पहाणी करणे व गंजण्यापासून त्याचे संरक्षण करण्यासाठी खास रासायनिक रंगाची पुटे त्यावर चढवणे मात्र गरजेचे असते. अशा प्रकारची निगा राखत राहिल्यास कोणतीही लोखंडी वस्तू दीर्घ काळपर्यंत टिकू शकते.

करारानुसार आयफेल टॉवर पहिले वीस वर्षेपर्यंत टिकवला गेला, तोपर्यंत तो अत्यंत लोकप्रिय झाला होता. त्या काळात तो जगातील इतर सर्व इमारतींहून उंच असा पहिल्या क्रमांकाचा मनोरा होता. लक्षावधी लोक तो पाहण्यासाठी दुरून येऊन गर्दी करीत होते. तो फ्रान्सचा मानबिंदू झाला होता. अशा वेळी कोण त्याला पाडू देईल? उलट त्याची जास्तीत जास्त काळजी कशी घेता येईल यावर विचार आणि चर्चा सुरू झाल्या. दुस-या महायुद्धाच्या संपूर्ण कालखंडात पॅरिस शहर जर्मनीच्या ताब्यात होते. पण लढाईच्या धुमश्चक्रीमध्येही मित्रराष्ट्रांनी पॅरिस शहरावर फारशी बॉंबफेक केली नाही, आयफेल टॉवरला तर मुळीच धक्का लावला नाही. युद्धाच्या अखेरीस जर्मनीपुढे पराभवाचे सावट दिसू लागल्यावर निव्वळ सूडापोटी हा टॉवर नष्ट करण्याच्या आज्ञा हिटलरने दिल्या होत्या असे म्हणतात, पण तेथील सूज्ञ सेनाधिका-याने तसले अघोरी कृत्य केले नाही. अशा रीतीने या मनो-याला दुस-यांदा जीवनदान मिळाले.

या स्ट्रक्चरमधील प्रत्येक खांब त्याच्या माथ्यावरील संपूर्ण सांगाड्याचा भार पेलत असतो. त्यामुळे सरसकट सगळीकडे एकाच आकाराच्या जाडजूड खांब व तुळया वापरल्या तर वरील भागाचा खालील भागावरील भार त्याला असह्य होतो. दही दंडी फोडण्यासाठी मानवी उतरंड बनवतांना जसे सर्वात वजनदार भरभक्कम गडी खालच्या साखळीत, मध्यम बांध्याचे मधील भागात आणि लहान चणीचे गडी सर्वात वर पाठवतात, तशाच प्रकारे या मनो-यासाठी वापरलेले खांब व तुळया वरून खाली येता येता त्यांचे आकारमान वाढत जाते. या कारणाने असल्या उत्तुंग स्ट्रक्चरचे डिझाईन अतीशय काळजीपूर्वक रीत्या व बारकाईने आकडेमोडी करून करावे लागते. पॅरिसची कलाविषयक परंपरा लक्षात घेऊन तो दिसायलासुद्धा देखणा दिसला पाहिजे याची विशेष काळजी घेतलेली आहे. इंजिनीयरांना सौंदर्यदृष्टी नसते असे हा मनोरा पाहिल्यानंतर कोण म्हणेल?

औद्योगिक प्रदर्शनाची तारीख आधीपासून ठरलेली असल्यामुळे कसेही करून हा मनोरा दोन वर्षाच्या काळात पूर्ण करायचाच होता आणि त्याप्रमाणे तो वेळेवर पुरा झाला. अर्थातच तेंव्हा त्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागले असणार. एकंदरीत सात हजार टनावर वजन भरेल इतक्या पंधरा हजारावर लोखंडाच्या विशिष्ट आकारांचे डिझाईन करून, त्यांची ड्रॉइंग्ज रेखाटून व ते भाग कारखान्यात तयार करून इथे आणले. त्यातील प्रत्येक भाग अचूक असणे अत्यंत आवश्यक होते. ते आकाराने सूतभर जरी लहान वा मोठे झाले असते तर त्यांची एकमेकाशी सांगड जुळली नसती किंवा परिणामी मनोरा वाकडा तिकडा दिसला असता. पंचवीस लक्ष इतके रिवेट ठोकून ते सगळे पुर्जे एकमेकांना जोडले. त्या जमान्यातील ज्या कामगारांनी हिंवाळ्यातील थंडीवा-यालासुद्धा न जुमानता इतक्या उंचीवर चढून हे जोडणीचे अवघड काम केले असेल त्यांची धन्य आहे.

हा मूळचा मनोरा तीनशे मीटर उंच आहे. स्कायस्क्रेपर्सच्या आजच्या जमान्यात त्याची तितकीशी नवलाई वाटणार नाही. टेलीव्हिजनचे प्रसारण सुरू झाल्यानंतर आणि उपग्रहाद्वारे ते करणे सुरू होण्यापूर्वीच्या मध्यंतरीच्या काळात जगभरातील सा-या शहरात त्यासाठी उंच मनोरे बांधण्यात आले. मुंबईमधील वरळी येथील दूरदर्शनचा टॉवरसुद्धा जवळ जवळ तितकाच उंच आहे, पण सौंदर्याच्या दृष्टीने तो आयफेल टॉवरच्या पासंगालाही पुरणार नाही. त्याची उभारणी करतांना हा उद्देश डोळ्यासमोर मुळी नव्हताच. सध्या तरी कॅनडामधील टोरोंटो येथील सी.एन.टॉवर ही जगातील सर्वात उंच इमारत मानली जाते. इतर देशांतसुद्धा उत्तुंग मनोरे आहेत. पॅरिसमध्ये मात्र आयफेल टॉवर हा उंच मनोरा आयता उपलब्ध असल्याने त्याच्याच माथ्यावर चोवीस मीटर उंचीचा खांब टीव्हीसाठी उभारला आहे.

रेडिओ व टेलीव्हिजनच्या कार्यक्रमांच्या प्रसरणाव्यतिरिक्त कांही विशेष कामांसाठी आयफेल टॉवरचा उपयोग करण्यात आला. कांही काळ त्यावर महाकाय बेढब जाहिराती लावण्यात आल्या होत्या, पण त्याने त्याच्या सौंदर्याला बाधा येत असल्याने सुदैवाने त्या काढून टाकल्या गेल्या. महायुद्धाच्या काळात जर्मन सैनिकांनी आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या माथ्यावर ऑब्झर्व्हेशन पोस्ट बसवले. कोणा गिर्यारोहकाने लिफ्ट वा जिन्याचा वापर न करता त्यावर चढून जाण्याचा विक्रम केला तर कोणी हातात पॅराशूट धरून त्यावरून खाली उडी मारण्याचा. पर्यटन क्षेत्रासाठी तर इथे सोन्याची खाण आहे. पर्यटकांना उंचावर नेऊन पॅरिस शहराचे विहंगम दृष्य दाखवले जाते. त्यांच्यासाठी या टॉवरमध्ये रेस्तरॉं उघडली आहेत. त्यांना आकर्षण वाटावे यासाठी सर्व प्रयत्न केले जातात आणि त्याचे परिणामस्वरूप इथे येऊन गेलेल्या लोकांची संख्या आतापर्यंत वीस कोटीहून जास्त झाली आहे! त्यापासून असंख्य लोकांना कांही भव्य दिव्य असे करण्याची प्रेरणा मिळाली असेल ती वेगळी!

असा हा आयफेल टॉवर पाहण्याचे कधीपासून मनात होते ते एकदाचे युरोपच्या या सहलीमध्ये साध्य झाले.

. . . . . . . (क्रमशः)

Tuesday, May 26, 2009

ग्रँड युरोप - भाग ३० : पॅरिसची सफर


दि.२८-०४-२००७ तेरावा दिवस : पॅरिसची सफर

बसमधून पॅरिस शहराचे दर्शन घेत आम्ही 'प्लेस द ला कॉंकार्ड'ला आलो. मुंबईमध्ये फ्लोरा फाउंटन (हुतात्मा चौक) किंवा दिल्लीला कनॉट प्लेस या जागांचे जे महत्व आहे, तेवढे किंवा त्याहून कांकणभर जास्तच महत्व पॅरिसमध्ये या चौकाला आहे. त्याच्या विस्तीर्ण प्रांगणातून एका बाजूला 'चँप्स एलिझेस' हा पॅऱिसमधील, कदाचित जगातील, सर्वात सुंदर राजमार्ग जातो. या रस्त्याच्या दुस-या टोकाला, म्हणजे सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेली भव्य दगडी कमान इथूनसुद्धा स्पष्ट दिसते. दुस-या बाजूला एक सुंदर उद्यान आहे. या चौकातून एक रस्ता जवळच्याच सीन नदीवरील पुलावर जातो. या आवारातून आयफेल टॉवरचे दुरून दर्शनसुद्धा घडते. या चौकाच्या मधोमध इजिप्तमधून आणलेला 'ओबेलिस्क' आहे. सुमारे तेवीस मीटर उंच आणि २३० टन वजनाचा हा चौकोनी खांबाच्या आकाराचा अवजड शिलाखंड इथे ताडमाड उभा असून त्याच्या चारी अंगांवर प्राचीन इजिप्शियन चित्रलिपीमध्ये कांही तरी लिहिलेले आहे. त्याच्या दोन्ही बाजूने दोन सुरेख कारंजी आहेत. शिवाय या चौकातील ऐसपैस मोकळ्या जागेच्या कोप-या कोप-यात इतर शिल्पकृती उभ्या करून ठेवलेल्या आहेतच.

सुमारे अडीचशे वर्षापूर्वी पंधरावा लुई राज्यावर असतांना या विशाल चौकाची निर्मिती करण्यात आली व त्या राजाचेच नांव त्याला दिले गेले. त्या राजाचा अश्वारूढ पुतळा त्या चौकाच्या मधोमध स्थापन केला होता. दैवदुर्विलास असा की फ्रेंच क्रांतीनंतर याच चौकात गिलोटीन उभारून त्याचाच मुलगा तत्कालिन राजा सोळावा लुई, राणी मेरी एंतोनिएत आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा निर्घृण वध करण्यात आला आणि त्या जागेचे 'क्रांती चौक' (प्लेस द ला रेव्हॉल्यूशन) असे नामांतर करण्यात आले. त्यानंतर आलेल्या राज्यकर्त्यांनी बदलत्या कालानुसार त्याची नांवे पुन्हा बदलली. अखेरीस सध्याचे 'प्लेस द ला कॉंकार्ड' हे नांव रूढ झाले.

'चँप्स एलिझेस' हा दीडशे वर्षांपूर्वी बांधलेला रस्ता तब्बल सत्तर मीटर इतका रुंद आहे. त्या काळात होणारी तुरळक वाहतूक पाहता हा रस्ता इतका रुंद करणा-या अभियंत्याच्या दूरदृष्टीचे कौतुकच करावे लागेल. पॅरिसमधील उत्तमोत्तम सिनेमागृहे, नाट्यगृहे, हॉटेले, रेस्तरॉं, त-हेत-हेच्या वस्तूंची अत्यंत प्रतिष्ठित दुकाने वगैरे या रस्त्यावर आहेत. कांही मोठ्या कंपन्यांची ऑफीसेही आहेत. त्यामुळे तो अत्यंत गजबजलेला असतो. साहजीकपणेच येथील जागांचे भाव गगनाला भिडणारे असणार यात शंका नाही. ख्रिसमसच्या दिवसात इथे खूप सजावट व रोषणाई केली जाते आणि राष्ट्रीय दिनाला या रस्त्यावरून भव्य शोभायात्राही निघते. नववर्षदिवस साजरा करायला उत्साही लोक मोठ्या संख्येने इथे येऊन गर्दी करतात. अशा रीतीने हा चौक या शहरातील लोकांच्या जीवनातील चैतन्याचा भाग बनलेला आहे.

'प्लेस द ला कॉंकार्ड'हून सुरू होणा-या 'चँप्स एलिझेस' या हमरस्त्याच्या दुस-या टोकाला असलेली 'आर्च द ट्रायम्फ' ही भव्य कमान या रस्त्यावरून जातांना सतत दिसत असते. मुंबईचे गेटवे ऑफ इंडिया व दिल्लीच्या इंडिया गेटची आठवण करून देणारी ही कमान ही एक तशीच भव्य इमारत आहे. विजयी वीरांचे स्वागत करण्यासाठी मोठमोठ्या कमानी बांधण्याची परंपरा युरोपात पूर्वीपासून आहे. पुढे विजयाचे स्मारक म्हणून कमानी बांधणे सुरू झाले. 'आर्च द ट्रायम्फ' या कमानीचे बांधकाम खुद्द नेपोलियनने आपल्या एका लढाईमधील विजयाच्या स्मरणार्थ दोनशे वर्षांपूर्वी सुरू केले. पहिल्या व दुस-या महायुद्धांत शहीद झालेल्या अनाम वीर सैनिकांचे स्मारक तिथेच करण्यात आले आहे. इंडिया गेटप्रमाणेच इथेसुद्धा एक 'अमर जवान ज्योती' आहे आणि सैनिकाच्या स्मृतीदिनी झेंडावंदन करून त्यांना पुष्पचक्र व श्रध्दांजली वाहण्यात येते.

'प्लेस द ला कॉंकार्ड'च्या जवळच सीन नदीच्या किना-यावर जगप्रसिद्ध आणि अतिविशाल 'लूवर' वस्तुसंग्रहालय आहे. हे म्यूजियम इतके अवाढव्य आहे की त्यातील सगळ्या दालनांतून नुसते फिरून येतायेता पायाचे तुकडे पडतील. युरोपमधील इतिहासपूर्व कालापासून ते ग्रीक, रोमन व त्यानंतरच्या इटालियन, फ्रेंच, इंग्लिश, जर्मन वगैरे विविध शैलीतील चित्रे आणि मूर्ती इथे आहेत. तशाच इजिप्त, अरबस्तान, मध्यपूर्व व भारतातील प्राचीन काळातील व मध्ययुगातील मौल्यवान कलाकृतीसुद्धा या संग्रहालयात ठेवलेल्या आहेत. त्या प्रत्येकासाठी स्वतंत्र दालनेही बनवलेली आहेत.

आमच्या कार्यक्रमपत्रिकेत त्यामधील फक्त 'मोनालिसाचे दर्शन' एवढेच समाविष्ट होते असे कळले. तिथपर्यंत जातायेतांना वाटेवर इतर कलाकृती पहायला मिळाल्याच तर तो बोनस! आमच्या गाईडने प्रवेशद्वारापासून मोनालिसाच्या चित्रापर्यंत जाण्याचा आणि तिथून परत येण्याचा रस्ता व्यवस्थित दाखवला. 'व्हीनस डिमिलो'चा सुप्रसिद्ध प्राचीन पुतळाही दाखवला. भग्नावस्थेतही तो किती सुंदर दिसतो? आता तो आमच्या वाटेवरच उभा होता कां त्यासाठी आम्हाला थोडी वाकडी वाट धरावी लागली कोणास ठाऊक! तरीसुद्धा आम्हाला जाण्यायेण्यासाठी तासाहून जास्त वेळ लागला. तो संपूर्ण मार्ग एकाहून एक अधिक सुरेख अशा अनेकविध चित्रे व शिल्पे यांनी गच्च भरला होता. त्यातील प्रत्येकाची माहिती घेत राहिलो असतो तरी एक दिवस पुरला नसता. त्यामुळे त्यांच्यावर ओझरता दृष्टीक्षेप टाकून पुढे जावे लागत होते.

मोना लिसा हे सुप्रसिद्ध इटालियन विद्वान चित्रकार लिओनार्दो दा विंची याने सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस लाकडावर रंगवलेले त्याचे सर्वोत्तम तैलचित्र आहे. ते पूर्ण करायला त्याला चार वर्षे लागली असे म्हणतात. त्या काळात कॅमल कंपनीचे रंग आणि ब्रश बाजारात विकत मिळत नसत. चित्रकलेसाठी आवश्यक असलेल्या एक एक साधनासाठी लागणा-या गोष्टी नैसर्गिक स्रोतामधून मिळवून त्या पासून कलाकाराला पाहिजे असेल ते तयार करावे लागत असे. पण त्यापासून तयार झालेल्या कलाकृती आज पांचशे वर्षानंतरसुद्धा चांगल्या चमकदार राहिल्या आहेत हे कौतुकास्पद आहे. 'मोना' हा शब्द इटालियन भाषेत 'मॅडम' अशा अर्थाने लावला जातो आणि 'लिसा' हे त्या मॉडेलच्या नांवाचे संक्षिप्त रूप आहे अशी 'मोना लिसा' या नांवाची व्युत्पत्ती सांगितली जाते. म्यूजियममध्ये या चित्राचे फ्रेंच भाषेमधील नांव 'ला जाकोंदे' असे दिले आहे.'जाकोंदे' हे तिचे आडनांव असणार. या चित्रातील युवतीच्या ओठावरील गूढ स्मितहास्य आणि डोळ्यातून ओसंडणारे मुग्ध भाव ही या चित्राचे खास वैशिष्ट्य आहेत. कमानदार भ्रुकुटी हे स्त्रीसौंदर्याचे लक्षण समजले जाते आणि आपल्या भुंवयांना रेखीव आकार देण्याचा बराच प्रयत्न बहुतेक महिला करतांना दिसतात. पण लिओनार्दो दा विंचीने मोनालिसाच्या भुंवया अगदी अस्पष्ट काढल्या आहेत आणि तरीसुद्धा ती अत्यंत सुंदर दिसते, कदाचित त्यामुळे तिचे बोलके डोळे अधिकच उठून दिसतात, ही गोष्ट नमूद करायला हवी.

मोनालिसाच्या चित्राची छायाचित्रे व प्रतिकृती सगळ्यांनीच पाहिलेल्या असतील. पुस्तकांत, मासिकांत, ग्रीटिंग कार्डवर, कॅलेंडरवर, कॉंप्यूटर स्क्रीनवर अशा अनेक जागी मी सुद्धा अनेक वेळा त्या पाहिलेल्या होत्या. इतकेच नव्हे तर लूवर म्यूजियमच्या दाराशी असलेल्या दुकानांत तिच्या निरनिराळ्या आकाराच्या तसबिरी विक्रीसाठी टांगून ठेवलेल्या होत्या. 'मोनालिसा' हा शब्द ऐकताक्षणी तिचा सस्मित चेहरा नजरेसमोर उभा रहावा इतका तो ओळखीचा झालेला होता. तिथे पोचल्यानंतर देवदर्शनासाठी लागावे असे लांबलचक रांगेत उभे रहावे लागले. कदाचित त्यामुळे असेल, पण इतके परिश्रम घेऊन आणि वाट पाहून अखेर जेंव्हा आम्ही त्या चित्राच्या समोर आलो तेंव्हा आपण अतिशय भव्य दिव्य असे कांही पाहत आहोत असे मात्र मनोमनी वाटले नाही. ते चित्र अत्यंत सुंदर आहे यात तिळमात्र शंका नाही. पण तेथे पोचेपर्यंत वाटेत जी इतर अनेक मोठमोठी किंवा सूक्ष्म कलाकुसरीने नटलेली चित्रे पाहिली होती, भारतातील पुणे, मुंबई, मैसूर, हैदराबाद, जयपूर आदि ठिकाणच्या वस्तुसंग्रहातील जी चित्रे लक्षात राहिली होती त्यांच्या मानाने मोनालिसा जितक्या पटीने अधिक प्रसिद्ध झाली आहे तशी दिव्यत्वाची प्रचीती कांही मला तरी तिला प्रत्यक्ष पाहतांना आली नाही. उलट ते चित्र अपेक्षेपेक्षा आकाराने लहानसेच वाटले. कदाचित अत्युत्तम कलाकृतींची योग्य पारख करण्याची दिव्यदृष्टी माझ्याकडे नसेल! युरोपमध्ये बहुतेक प्रेक्षणीय जागांचे फोटो काढू दिले जातात, कांही ठिकाणी तर त्याला प्रोत्साहन दिले जाते. या ठिकाणी मात्र मोनालिसाचे छायाचित्रे काढण्याला बंदी आहे. जे चित्र गल्लोगल्ली फुटपाथवर विकत मिळत होते त्याचा फोटो काढण्याला बंदी! इतर कांही जागी फ्लॅश वापरायला बंदी होती ते तांत्रिक कारण पटण्यासारखे आहे, पण सरसकट फोटो काढायला बंदी कां आहे ते कळत नाही. कदाचित वेळ वाचवण्यासाठी असू शकते.

लूवर वस्तुसंग्रहालय पाहून आम्ही अत्तरांची विक्री करणा-या एका नामवंत दुकानात गेलो. तिथल्या विनोदी विक्रेत्याने आम्हा भारतीय मंडळींचे भारतीय पद्धतीने खास स्वागत केले. त्यानंतर "मेरा जूता है जापानी" हे जुने लोकप्रिय हिंदी गाणे आमच्याकडून कोरसमध्ये म्हणवून घेतले आणि "याचा गीतकार कोण आहे?" असा प्रश्न विचारला. मी शैलेन्द्रचे नांव सांगताच मला एक अत्तराची कुपी बक्षिस मिळाली. या सगळ्या गिमिक्सचा अनुकूल परिणाम झाला की नाही ते सांगता येणार नाही, कारण पॅरिसहून सेंटच्या बाटल्या आणायच्या हे सगळ्यांनी, विशेषतः स्त्रीवर्गाने, मुंबईहून निघतांनाच ठरवलेले होते. आपल्या दुकानांत आलेल्या ग्राहकांना बाहेर इकडे तिकडे न जाऊ देता आपला माल खपवण्याइतपत त्याचा फायदा झाला तरी त्याला ते पुरेसे होते.

खरेदी करून झाल्यानंतर आम्ही आयफेल टॉवरच्या पायथ्याशी असलेल्या नदीकिना-यावरील धक्क्यापाशी आलो. इथून एका अद्ययावत सोयींनी सुसज्ज अशा खूप मोठ्या मोटरलॉंचमध्ये बसून नौकाविहार केला. यात बसायला व्यवस्थित खुर्च्या होत्याच आणि प्रत्येक आसनापाशी एक ईअरफोन होता. हे श्रवणयंत्र कानाला लावून हातातील बटने दाबली की इंग्रजी, फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश अशा आपल्याला हव्या असलेल्या भाषेतून निवेदन ऐकायची सोय होती. कॉमेंटरी चालू नसेल तेंव्हा संगीताचे सूर ऐकवीत होते ते मात्र समायिक होते. आमची नाव नदीमधून जसजशी पुढे सरकत होती तसतशा दृष्टीपथात येणा-या इमारतींची अल्प माहिती खुसखुशीत भाषेत निवेजक सांगत होते. ते बहुधा आधीच रेकॉर्ड करून ठेवल्यासारखे वाटत होते. पूर्वीची शहरे नदीच्या आधारावरच वसवली जात असल्यामुळे ऐतिहासिक महत्वाची चर्चे, राजवाडे, कचे-या वगैरे बहुतेक प्रसिद्ध इमारती या फेरफटक्यात येऊन गेल्या.

. . . . . . (क्रमशः)

Monday, May 25, 2009

ग्रँड युरोप - भाग २९ : सुंदर नगरी पॅरिस


दि.२८-०४-२००७ तेरावा दिवस : सुंदर नगरी पॅरिस

"पॅरिस हे जगातील सर्वात सुंदर शहर आहे" असे मी फार पूर्वीपासून ऐकत आलो आहे. म्हणजे कोण हे ठरवतो, कशावरून ठरवतो, त्याचे निकष काय असतात असले प्रश्न डोक्यात यायला लागण्याच्या वयात येण्यापूर्वीपासून ही गोष्ट माझ्या मनात घर करून राहिलेली आहे. त्या शहराबद्दलच्या अधिक मनोरंजक गोष्टी नंतर हळूहळू समजत गेल्या. पॅरिस ही अनेक कलांची पंढरी आहे. त्यामळे त्या शहराची वारी करण्याची इच्छा सगळ्या कलाकारांच्या मनात असते. माझ्या अंगात कसल्याही कलागुणांचा अंश नसला तरी थोडीशी कलासक्ती असल्यामुळे किंवा निव्वळ कुतूहलापोटी कां होईना, पण ते शहर प्रत्यक्ष डोळ्यांनी पहाण्याची अनावर इच्छा माझ्यासुद्धा मनात कधीची जन्माला आलेली होती. पण आतापर्यंत ती पूर्ण करणे शक्य न झाल्यामुळे ते राहून गेले होते. युरोपच्या या सहलीच्या तेराव्या दिवशी बेल्जियम देशांतून निघून फ्रान्सला जाण्यासाठी त्यामुळेच मी खूप उत्सुक होतो.

पहायला गेल्यास पॅरिस हे शहर खूप प्राचीन आहे असे म्हणतात. ख्रिस्तपूर्व चार हजार वर्षापूर्वीसुद्धा येथील सीन नदीवरील नावाडी, व्यापारी आणि मच्छीमार वगैरेंची वस्ती या ठिकाणी होती. आपल्या मुंबईला पूर्वीपासून कोळी लोकांची वस्ती होती तशीच इथेही होती. रोमन सम्राटांनी जेंव्हा युरोपचा मोठा भाग काबीज केला तेंव्हा या ठिकाणी त्यांनी आपली एक मोठी छावणी स्थापन केली. त्या काळात 'ल्युतेतिया' या नांवाने ती ओळखली जात असे. एस्टेरिक्सच्या कॉमिक्स वाचणा-यांना हे नांव परिचयाचे वाटेल. पुढे रोमन साम्राज्याचा अंत झाल्यावर ठिकठिकाणी नवे राज्यकर्ते उदयास आले. या भागातील स्थानिक राजांनी या गांवाला पुन्हा पूर्वीचे नांव देऊन इथून आपला राज्यकारभार चालवायला सुरुवात केली. फ्रान्स हे एकसंध राष्ट्र आणि पॅरिस ही त्याची राजधानी हे दोन्ही सुमारे हजार वर्षांपूर्वी नांवारूपाला आले.

त्यानंतरच्या काळांत त्याची भरभराट होत गेली. कलाकारांच्या कलागुणांना या शहरात चांगला वाव मिळाला. त्यामुळे अनेक कलाप्रेमी इथे आकर्षिले गेले. त्यांचे प्रयत्न आणि कौशल्य यातून सुंदर इमारती उभ्या राहिल्या, विद्यापीठे आणि वस्तुसंग्रहालये उघडली गेली. हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे नंतरच्या कालखंडात स्थानिक महत्वाच्या अनेक घटनाही येथे घडून गेल्या असणार. फ्रेंच राज्यक्रांती ही आंतरराष्ट्रीय महत्वाची घटना इथे अठराव्या शतकाच्या अखेरीस घडली, ती सर्व जगाला हादरवून टाकणारी ठरली. तत्कालिन राजा व राणी यासकट सगळ्या शासकवर्गाची त्यात सरसकट कत्तल करण्यात आली. एका झटक्यात शिर धडावेगळे करणारे गिलोटिन नांवाचे जीवघेणे यंत्र त्या हत्याकांडासाठी खास बनवून वापरण्यात आले. विक्षुब्ध झालेल्या जमावाला उन्मादाने विध्वंसक कृत्ये करणे शक्य असले तरी राज्यशकट चालवण्याचे विधायक काम करण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे क्रांतीनंतरचा कांही काळ अनागोंदी कारभाराचा गेला. त्यानंतर हळूहळू तिथे लोकशाही स्थापन होऊन स्थिरावली.

अधून मधून युद्धे होत राहिली असली तरी शांततेच्या काळात पॅरिसचा खूपच चांगल्या त-हेने विकास होत गेला. कलेचे माहेरघर म्हणून त्याने ख्याती मिळवली आणि ती अद्याप टिकून आहे. नगररचना असो वा वास्तुशिल्प, पुरातन शैलीची चित्रकला असो वा मॉडर्न आर्ट, पारंपरिक नृत्यकला असो वा जलद बीट्सवरील आधुनिक डान्स, या सगळ्यात पॅरिस अग्रगण्य राहिले. कपड्यांच्या बाबतीत तर ती सर्व जगातील फॅशनची राजधानी आहे असे समजले जाते. सौंदर्यप्रसाधनांचे ते आगर आहे. उत्तमोत्तम अत्तर पाहिजे असेल तर ते इथेच मिळेल. अशा रीतीने पॅरिस हे एकाच वेळी ऐतिहासिक तसेच अत्याधुनिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. याच कारणामुळे संपूर्ण जगातून लक्षावधी पर्यटक पॅरिस पहायला येतात.

इंग्रजी आणि फ्रेंच या दोन्ही भाषा रोमन लिपीमध्येच लिहिल्या जात असल्या तरी लिहिलेल्या शब्दांचे उच्चार वेगवेगळ्या प्रकारे करतात. आधी फ्रेंच शब्द वाचणे आपल्याला कठीण आणि त्यांचे उच्चार समजून घेऊन ते लक्षात ठेवणे तर जवळ जवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यासाठी फ्रेंच भाषा विधीवत शिकायलाच हवी. ते केलेले नसल्यामुळे पॅरिसमधील जागांना इंग्रजीमध्ये दिलेल्या नांवांचा इंग्रजी भाषेनुसार उच्चार लिहिणे मला भाग पडत आहे. एक साधे उदाहरण घ्यायचे झाल्यास पॅरिस शहराला तेथील लोक 'पारी' म्हणतात तर लंडन शहराला 'लान्द्रे'. पण मला तसा उल्लेख करता येणार नाही.

पॅरिसला पोचल्यानंतर आधी आम्ही बसमधूनच तेथील मुख्य भागाचा एक फेरफटका मारला. अतिशय नीटनेटके सरळ रेषेत जाणारे लांबरुंद प्रशस्त असे रस्ते, त्याच्या दुतर्फा रांगेने लावलेली झाडे, प्रमाणबद्ध आकाराच्या सुंदर इमारती, त्यावर केलेले कलात्मक कोरीव काम, कमानी, घुमट, खांब वगैरेंची रेलचेल, कलात्मक चबूतरे आणि त्यावर स्थापलेल्या वेगवेगळ्या शिल्पकृतींची सजावट, अधून मधून दिसणारे राजवाडे, चर्च, संग्रहालये यांच्या सुप्रसिद्ध वास्तू, कारंजे आणि पुतळ्यांनी शोभिवंत केलेले प्रचंड आकाराचे चौक वगैरे सा-याचा एकत्र परिणाम होऊन या शहराला सुंदर शहर असे कां म्हणतात ते आपल्याला सहज समजते.

. . . . . . . (क्रमशः)

Sunday, May 24, 2009

ग्रँड युरोप - भाग २८ : बेल्जियम


दि.२७-०४-२००७ बारावा दिवस : बेल्जियम

कोकेनॉफ येथील ट्यूलिप गार्डन मधून बाहेर पडण्यासाठी पाय निघत नव्हता. पण ट्यूलिपच्या मनोहर विश्वातून पुन्हा आपल्या जगात परत जाणे भागच होते. त्यामुळे ठरलेली वेळ झाल्यावर आपल्या बसमध्ये येऊन पुढील प्रवास सुरू केला. थोड्याच वेळात नेदरलँड या छोट्या देशातून बाहेर पडून बेल्जियम या त्यापेक्षाही लहान देशात प्रवेश केला. या दोन्ही देशांचे क्षेत्रफळ अगदी कमी असले तरी तेथील लोकसंख्या एक कोटीच्या वर आहे. त्यांची गणना दाट वस्तीच्या प्रदेशात होते. लोकसंख्येच्या घनतेच्या दृष्टीने भारताचा क्रमांक जगातील सर्व देशांत एकतीसावा लागतो, तर नेदरलँड व बेल्जियम यांचे क्रमांक अनुक्रमे तेवीस व एकोणतीसावे लागतात. म्हणजेच हे दोन्ही देश या बाबतीत भारताच्यासुद्धा पुढे आहेत. त्यातीलही बहुसंख्य लोक शहरात राहतात. आल्प्स आणि ब्लॅक फॉरेस्टमधून फिरून या भागात आल्यावर लोकवस्तीमधील हा फरक जाणवण्यासारखा होताच.

ब्रिटिशांनी ज्या काळात भारतात पाऊल ठेवले तेंव्हाच त्यांच्या पुढे किंवा मागे पोर्तुगीज, फ्रेंच आणि डच लोकांनीदेखील इकडे येऊन आपापल्या वखारी स्थापन केल्या आणि आजूबाजूला हातपाय पसरायला सुरुवात केली. त्यामधूनच त्यांची साम्राज्ये निर्माण झाली. डच लोकांनी कांही काळ सिलोनवर म्हणजे आजच्या श्रीलंकेवर राज्य केले आणि अखेरीस जावा, सुमात्रा आदि त्या काळात ईस्ट इंडिया या नांवाने ओळखल्या जाणा-या आताच्या इंडोनेशियावर आपला जम बसवला होता. या सगळ्यात बेल्जियमचे नांव कुठे येत नाही, कारण त्या शतकात हा देश अस्तित्वातच आलेला नव्हता. तेंव्हा आलेले कांही डच लोक आताच्या बेल्जियममधील भागातून कदाचित आलेही असतील. बेल्जियममधील लोकांची स्वतंत्र भाषा नाही. उत्तरेकडील नेदरलंडजवळ राहणारे लोक डच भाषा बोलतात, तर दक्षिणेला फ्रान्सपासून जवळ राहणारे लोक फ्रेंच. जर्मनीच्या सीमेपासून जवळ राहणारे बरेच लोक जर्मनभाषीय आहेत. डच लोक बहुसंख्य आहेत, पण फ्रेंच लोकांची संख्या त्या खालोखाल आहे. आता आंतरराष्ट्रीय संस्था तिथे आल्याने इंग्लिश निदान समजणा-या लोकांची संख्याही मोठी आहे.

नद्या नाले, समुद्र आणि दलदल यामुळे पायदळातील शिपाई किंवा घोडेस्वार हॉलंडमध्ये जायला तितकेसे उत्सुक नसतील. यामुळे हॉलंडला कांही प्रमाणात नैसर्गिक संरक्षण मिळत होते. पण बेल्जियम मात्र तीन बाजूने फ्रान्स, प्रशिया आणि ऑस्ट्रिया या बलाढ्य साम्राज्यांच्या तडाख्यात सापडत असल्यामुळे त्याचे कांही भूभाग जिंकून या ना त्या साम्राज्यात सामील करून घेतले जात असत. त्यांच्या आपसातील अनेक लढायासुद्धा बेल्जियनच्या भूमीवर लढल्या गेल्या. यामुळे बेल्जियमला 'युरोपचे रणांगण' असे म्हंटले जाते. नेपोलियन बोनापार्टचा अखेरचा निर्णायक दारुण पराभव वॉटरलू या जागी झाला तेंव्हापासून 'वॉटरलू' या शब्दाचा अर्थच 'कायमची पुरती वाट लागणे' असा झाला आहे. ते वॉटरलू गांव बेल्जियममध्येच आहे. आजचा स्वतंत्र बेल्जियम देश सन १८३० मध्ये प्रथम अस्तित्वात आला आणि तेंव्हापासून आतापर्यंत मधला महायुद्धांचा काळ सोडून इतर काळात तो स्वतंत्र राहिला.

गेल्या शतकात या राष्ट्राने युरोपच्या राजकारणात महत्वाची कामगिरी बजावली आहे. पश्चिम युरोपातील देश व अमेरिका यांच्यामधील संयुक्त संरक्षणासाठी एक करार असून त्याचे पालन करण्यासाठी 'नाटो' ही शस्त्रास्त्राने सुसज्ज अशी समाईक संस्था आहे. तिचे मुख्य कार्यालय बेल्जियममधील ब्रुसेल्स इथे आहे. तसेच युरोपियन युनियनचे प्रमुख ठिकाण सुद्धा हेच आहे. एका अर्थाने ब्रुसेल्स ही आता केवळ बेल्जियमचीच नव्हे तर संपूर्ण युरोपची राजधानी बनली आहे असे म्हणता येईल कारण तेथील सैनिकी सामर्थ्य आणि अर्थकारण या दोन्हीचे नियंत्रण इथून होते. अर्थातच हे नियंत्रण येथील स्थानिक लोकांच्या हातात नाही.

ब्रूसेल्सला पोचल्यावर आम्ही थेट एटोमियम पहायला गेलो. १९५८ साली आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांचे एक संमेलन इथे भरले होते. त्या निमित्ताने ही वैशिष्ट्यपूर्ण इमारत आधी तात्पुरत्या कामासाठी म्हणून बांधली होती. पण ती लोकांना इतकी आवडली की आता ते ब्रूसेल्सचे एक कायम स्वरूपाचे गौरवस्थान आणि पर्यटकांसाठी आकर्षण बनले आहे. लोह या धातूच्या स्फटिकाची ही १६५ अब्जपटीने मोठी प्रतिकृती आहे. वैज्ञानिक परिभाषेत हा आकार बॉडी सेंटर्ड क्यूबिक या नांवाने ओळखला जातो. असे असंख्य स्फटिक एकाला एक जोडून लोखंडाच्या कोणत्याही वस्तूला तिचा आकार प्राप्त होतो.

मधोमध एक अणु व त्याच्या आठ बाजूला ठराविक अंतरावर आठ अणु अशी या स्फटिकाची रचना आहे. यातील प्रत्येक अणुसाठी १८ मीटर व्यासाचा पोलादाचा पोकळ गोल बनवला असून हे गोल तीन ते सवातीन मीटर व्यासाच्या नळ्यांनी एकमेकांना जोडलेले आहेत. प्रत्येक गोलाच्या आंत प्रदर्शनीय वस्तू ठेवलेल्या आहेत. संपूर्ण शिल्प १०२ मीटर उंच आहे. खालून सर्वात वरच्या गोलामध्ये जाण्यासाठी अत्यंत वेगवान लिफ्ट आहे. तसेच इतर गोलांमध्ये जाण्यासाठीसुद्धा लिफ्ट आहेतच. वरील गॅलरीमधून ब्रुसेल्स शहराचे विहंगम दृष्य दिसते. तसेच बाजूला असलेले मिनियुरोपसुद्धा इथून छान दिसते. आयफेल टॉवर, वेस्टमिन्स्टर यासारख्या युरोपमधील प्रसिद्ध इमारतींच्या छोट्या प्रतिकृती या जागी बांधलेल्या आहेत. त्या प्रत्यक्ष पहाणे मात्र आमच्या दौ-यामध्ये नव्हते. दोन दिवसापूर्वीच मदुरोडॅम पाहिले असल्यामुळे त्याचे फारसे वाटले नाही.

त्यानंतर ब्रुसेल्समधील जगप्रसिद्ध मॅनेकिन पिस पुतळा पहायला गेलो. तो ब्रुसेल्सच्या जुन्या भागात असल्यामुळे हमरस्त्यावर बसगाडी सोडून एका चौकात आलो. तेथील ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन घेऊन एका गल्लीतून चालत चालत एका छोट्याशा चौकात आलो. पुण्यातील कुठल्या तरी पेठेमधील गल्लीबोळांच्या चौकाएवढ्या जागेत एका कोप-यात पुरुष दीड पुरुष इतक्या उंचीच्या कट्ट्यावर हा हातभर उंचीचा रेखीव दगडी पुतळा ठेवला आहे. बाजूच्याच भिंतीवर त्याची एक ब्रॉंझमधील प्रतिकृती लावून ठेवली आहे. याबद्दल अनेक दंतकथा प्रसृत केल्या गेल्या आहेत. अनेक वेळा तो चोरून नेण्याचे प्रयत्न झाले पण ते यशस्वी झाले नाहीत म्हणे. या मुलाला सणासुदीला नवनवे कपडे करून घातले जातात. ते करण्यासाठी लोकांची रीघ लागलेली असते. आतापर्यंत आठशेच्या वर पूर्णपणे वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रे त्या पुतळ्यावर चढवून झाली आहेत. एरवी मात्र तो नग्नावस्थेतच सारखा 'शू' करीत उभा असतो. पहात राहण्यासारखे फारसे कांही तिथे नसल्यामुळे एक नजर टाकली, फोटोबिटो काढले आणि बाजूलाच असलेल्या चॉकलेट विकणा-या मोठ्या दुकानात गेलो. आधी स्विट्झरलंडमध्ये चॉकलेटे घेतलेलीच होती. उरली सुरली हौस इथे पुरवून घेतली.

. . . . . . . (क्रमशः)

Saturday, May 23, 2009

ग्रँड युरोप - भाग २७ : दूरतक निगाहोंमें हैं गुल खिले हुवे


दि.२७-०४-२००७ बारावा दिवस: दूरतक निगाहोंमें हैं गुल खिले हुवे

युरोपमध्ये उतरल्यापासूनच ट्युलिपची फुले दिसायला लागली होती. कुठे हॉटेलच्या स्वागतकक्षात त्याचा गुच्छ ठेवलेला असे, तर कुठे इमारतींच्या समोरील बगीचामध्ये त्या टवटवीत फुलांचा छोटासा ताटवा फुललेला दिसायचा. कांही ठिकाणी रस्त्यांच्या चौकांमधील वर्तुळात तर कधी रस्त्यांना विभागणा-या जागेत त्यांची रांग दिसे. साल्झबर्ग येथील मीराबेल गार्डनमध्ये तर रंगीबेरंगी ट्यूलिपच्या फुलांची जणू एक विस्तीर्ण रांगोळीच घालून ठेवलेली होती. स्विट्झरलँड आणि जर्मनीतसुद्धा जागोजागी ट्युलिपच्या कळ्या नाही तर फुले दृष्टीला पडतच होती. पण हॉलंडमध्ये गेल्यावर त्यांनी फुललेली शेते दिसू लागली. आमच्या हॉटेलच्या रस्त्यावरच रस्त्याच्या कडेपासून थेट नजर पोचेपर्यंत लाल, पिवळ्या, केशरी किंवा हिरव्या लांब रुंद पट्ट्यांचा अवाढव्य गालिचा पसरलेला पाहून डोळे तृप्त होत होते.

अॅमस्टरडॅमहून प्रस्थान ठेवल्यानंतर थोड्याच वेळांत कोकेनॉफ येथील ट्यूलिप गार्डनला जाऊन पोचलो. जगातील या सर्वात मोठ्या पुष्पवाटिकेला द्यायची भेट हा आमच्या दौ-यामधील एक महत्वाचा भाग होता. वीस मे नंतर ही बाग पहाण्याची संधी मिळणार नव्हती म्हणून आम्ही या युरोपच्या दौ-यावर जाण्याची घाई केली होती. बागेच्या बाहेरच प्रशस्त पार्किंग लॉट होते व त्यात शेकडो कार, कॅरॅव्हॅन आणि बसगाड्या उभ्या होत्या. बसगाड्यांसाठी राखून ठेवलेल्या आवारात आम्ही एक जागा मिळवली आणि बागेत प्रवेश केला. सुमारे ऐंशी एकर आकाराच्या एका मोठ्या शेताएवढ्या विस्तीर्ण जागेत ही बाग एसपैस पसरली आहे. ट्यूलिपखेरीज कितीतरी इतर सुंदर फुलझाडे, लुसलुशीत गवत आणि घनदाट झाडीसुद्धा या आवारात पद्धतशीररीत्या वाढवलेली आहे. पाण्याचे तलाव आणि त्यात तरंगणारी 'बदके पिले सुरेख'ही आहेत आणि हंससुद्धा आहेत.

ट्यूलिप ही लिलीच्या जातीची वनस्पती आहे. त्याचे हजाराहून अधिक प्रकार या बागेत लावतात. सर्वसामान्य ट्यूलिपचे झाड गुढघाभर उंचीचे असते. झाड म्हणजे एक सरळ उभा दांडा, त्याला दोन तीन कर्दळीसारखी मोठी पण दांड्याला लपेटलेली पाने आणि डोक्यावर एक मोठे फूल एवढेच. हे फुल उमलल्यावर अप्रतिम सुंदर दिसतेच, पण न उमललेली पेरूएवढी मोठी कळीसुद्धा खूप छान दिसते. एकच कळी किंवा फूल पहायला गेले तर कदाचित थोडे बटबटीत वाटेल, पण खरे नेत्रसुख एक फूल हांतात घेऊन पाहण्यात नसून एकसारख्या झाडांना एकाच वेळी लागलेल्या एकसारख्या फुलांच्या रांगा पहाण्यात आहे. याचे कंद लावल्यापासून सुमारे वर्षभराने त्यावर फुले येतात, पण ती फक्त वसंत ऋतुमध्येच येतात. म्हणजे त्यांच्या लागवडीसाठी बारा महिने खपावे लागते पण फक्त दोन महिने ती बाग प्रदर्शनीय असते. तेवढ्यात जवळ जवळ एक कोटी पर्यटक ती पाहून जातात म्हणे. म्हणजे रोज किती लोक येत असतील त्याचा हिशोब करावा.

ट्यूलिपच्या फुलांच्या शेकडो रंगछटा तर इथे पहायला मिळतातच, पण दोन दोन रंग असलेली फुलेही आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे वेगवेगळे आकारसुद्धा आहेत. कांहींच्या पाकळ्या सरळ असतात, तर कांही फुलांच्या पाकळ्यांना दंतुर कडा असलेल्या दिसतात. कांही ताटवे एकाच रंगाच्या फुलांनी भरलेले होते तर कांहींमध्ये दोन किंवा अधिक रंगांचे डिझाईन केलेले दिसले. वसंत ऋतूमध्ये फुलणारी इतर अनेक फुलझाडेसुद्धा इथे आहेत. कांही झाडांची पानेच फुलांसारखी सुंदर आहेत, तर कांहींची फुले पानांसारखी हिरवी गार दिसतात. निसर्गाचे वैभव असे अनंत त-हांनी मुक्तपणे खुललेले पहायला मिळते. कांही नाजुक वनस्पतींच्या लागवडीसाठी एक प्रचंड ग्रीन हाऊस उभारले आहे. सगळ्या बाजूने संपूर्णपणे कांचेने बंद अशा या भागात प्रकाश, हवा, पाणी वगैरे सगळ्याच गोष्टी कृत्रिम साधनांनी नियंत्रित करून दिल्या जातात. यामुळे युरोपचे वातावरण सहन करू न शकणा-या झाडांची फुलेसुद्धा इथे पहायला मिळतात. ट्यूलिपसारख्या युरोपची हवा मानवणा-या झाडांवर देखील नवनवे प्रयोग करून पाहणे या कृत्रिम विश्वात चाललेले असते.

या बागेत साठ सत्तर लाख एवढी फुलझाडे तर आहेतच. मधून मधून सुंदर पुतळे ठेवून तिच्या आकर्षकतेत भर घातली आहे. यांत ग्रीक देवता डायनासारखी प्राचीन कालीन शिल्पे आहेत तसेच नव्या युगातील कलेचे प्रतिनिधीत्व करणा-या कलाकृतींचे नमूने आहेत. हे विश्व पहायला येणारे जगभरातून आलेले पर्यटक होते. यात आबालवृद्ध सगळ्या वयोगटांमधील लोक होते. चिमण्या बाळांना बाबागाडीतून फिरवीत हिंडणारे आईवडील होते तसेच अपंगत्वामुळे किंवा वृद्धापकालामुळे चालू न शकणारे लोक स्वतःच व्हीनचेअरवर बसून फिरत होते. सगळ्यांच्या चेहे-यावर तिथल्या असंख्य फुलांचा उल्हास फुललेला दिसत होता.

कांही हिंदी सिनेमातसुद्धा या ट्यूलिपच्या बागांची दृष्ये दाखवली जातात. त्यातील सर्वात प्रसिद्ध सीन अमिताभ बच्चन व रेखा यांच्या सिलसिला चित्रपटातील आहे. ही बाग पाहिल्यावर "देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुवे। दूरतक निगाहोंमें हैं गुल खिले हुवे।" या अजरामर गाण्याच्या ओळी ओठावर आल्याखेरीज रहात नाहीत.

नेदरलँडमधून फिरतांनासुद्धा जागोजागी दिसणा-या विंडमिल्स हे सहज नजरेला पडणारे तेथील आणखीन एक महत्वाचे वैशिष्ट्य. वाफेच्या इंजिनाचा शोध लागून यंत्रयुग सुरू होण्याच्याही आधीपासून माणसाच्या कामासाठी वाहत्या वा-याचा उपयोग करणे सुरू झालेले होते. शिडांत वारा भरून त्याच्या जोरावर मार्गक्रमण करणारी जहाजे व नौका तर शेकडो वर्षापूर्वीपासून माणूस तयार करून वापरीत होता. त्या शिडांची पाती बनवून त्यापासून पवनचक्की बनवण्यात आली आणि त्याच्या जोरावर यंत्रांची चाके फिरू लागली. त्या चाकांना जाते जोडून त्यातून धान्याचे पीठ करणे, घाणा जोडून त्यातून तेल काढणे आणि करवत जोडून तिने लाकूड कापणे अशा कामांसाठी त्याचा उपयोग होऊ लागला. अशा प्रकारच्या पवनचक्क्या युरोपातील अनेक देशात सुरू झाल्या असल्या तरी हॉलंडमध्ये त्यांच्या विकासाला एक वेगळी दिशा मिळाली. समुद्रसपाटीखाली असलेल्या जमीनीवर साठणारे पाणी उपसून समुद्रात टाकण्यासाठी जागोजागी पवनचक्क्या उभारल्या गेल्या. दीपस्तंभासारख्या पण कमी उंचीच्या दगडी मनो-यावर या जुन्या पवनचक्क्या बसवलेल्या असत. लाकडाची चौकट बनवून त्यावर कॅनव्हाससारख्या जाड कापडाची पाती बसवली जात. जत्रेत मिळणारे कागदाचे भिरभिरे जसे वा-याच्या दिशेने धरले की गोल गोल फिरते त्याच तत्वावर हे प्रचंड आकाराचे चाक वारा सुटला की फिरत राहते.

इंजिनांचा शोध लागल्यावर त्यांचा उपयोग करून पाणी उपसण्याचे पंप वेगाने चालवले जाऊ लागले. विजेचा वापर सुरू झाल्यावर ते काम अधिक सुलभ झाले. त्यामुळे कांही काळ पवनचक्क्यांकडे माणसाचे दुर्लक्ष झाले होते. पण पर्यावरणाचा विचार गांभीर्याने सुरू झाल्यावर आणि हलक्या वजनाचे पण मजबूत असे नवनवे पदार्थ बनायला लागल्यानंतर आता नव्या तंत्राने बनवलेल्या अधिक कार्यक्षम विंडमिल्स सुरू झाल्या आहेत. म्हणजे विजेने चाक फिरवणा-या पंख्याऐवजी वाहत्या हवेने पंख्याचे चाक फिरवून त्यापासून विद्युतनिर्मिती सुरू झाली आहे. हॉलंडमध्ये यासाठी अनुकूल परिस्थिती आधीपासूनच असल्यामुळे नवीन विंडमिल्स मोठ्या संख्येने जिकडे तिकडे दिसू लागल्या आहेत. जुन्या काळच्या उरल्यासुरल्या पवनचक्क्या पर्यटकांना दाखवण्यासाठी शाबूत ठेवल्या आहेत. तशीच एक इतिहासकालीन विंडमिल कोकेनॉफच्या बागेत उभी आहे. तिच्या आंतील गोल जिन्यावरून चढून वरपर्यंत जाता येते आणि तेथून खाली पसरलेल्या बगीच्याचे तसेच आजूबाजूच्या ट्युलिपच्या मळ्यांचे विहंगम दृष्य पहायला मिळते.

. . . . . (क्रमशः)

Friday, May 22, 2009

ग्रँड युरोप - भाग २६ : वैशिष्ट्यपूर्ण नेदरलँड




दि.२६-०४-२००७ : वैशिष्ट्यपूर्ण नेदरलँड



नेदरलँड हा आकाराने छोटा देश असला तरी त्याची कांही खास वैशिष्ट्ये तेथील लोकांनी जतन करून ठेवलेली आहेत आणि पर्यटकांना ती हौसेने दाखवली जातात. या देशाचा बराचसा भाग समुद्रसपाटीखाली असल्यामुळे तो पाण्याखाली जाऊ नये यासाठी सतत किती प्रयत्न करावे लागतात हे मागील भागांत सविस्तर रीत्या सांगितलेले आहेच. या गोष्टीचे महत्व लक्षात घेऊन त्यांच्या सरकारमध्ये पूरनियंत्रण याच कामाला वाहून घेतलेले एक स्वतंत्र खाते ठेवलेले आहे. आमच्या एका दिवसाच्या भेटीत दिसलेली या देशाची आणखी कांही वैशिष्ट्ये या भागात पाहू. मदुरोडॅम येथील लिलीपुटांच्या नगरातून निघाल्यानंतर आम्ही एका वेगळ्या प्रकारच्या कारखान्याला भेट दिली. चीज आणि क्लॉग शूज या दोन गोष्टीं इथे तयार होतात. या दोन्ही गोष्टींसाठी हॉलंड पूर्वीपासून प्रसिद्ध आहे एवढाच त्यांचा एकमेकाशी संबंध जोडता येईल.

दूध आणि त्यापासून तयार होणारे दही, ताक, लोणी, तूप, चक्का, खवा आदि पदार्थ नेहमीच आपल्या अन्नात असतात. पंजाबी ढंगाचे पदार्थासाठी वापरले जाणारे पनीर किंवा बंगाली मिठाईतील छेनासुद्धा आता आपल्या आहारात आले आहेत. सँडविच व पिझासारख्या पाश्चात्य खाद्यपदार्थांबरोबर आता चीजचाही आपल्या घरात प्रवेश झाला आहे. आपल्याकडे मिळणारे चीजचे छोटे चौकोनी ठोकळे आणि पातळ चकत्या तेवढ्या आपल्याला ठाऊक असतात, फार तर लोण्याबरोबर मिसळलेले चीजस्प्रेड आपण ब्रेडवर पसरून खातो. पण चीजचे अनंत प्रकार असू शकतात याची मला कधी कल्पना आली नव्हती.

चीज बनवण्याच्या विभागात एका सुहास्यवदनेने आमचे स्वागत करून "आता चीज बनवण्याची प्रक्रिया पहा." असे सांगितले. ती तर फारच सोपी प्रक्रिया निघाली. एका मोठ्या पात्रात दूध घेऊन उकळी येईपर्यंत ते तापवले. एका बाटलीतील द्रवपदार्थ त्यात ओतला. त्याने ते दूध फुटले. ते मिश्रण एका विशिष्ट प्रकारच्या यंत्रात घातले आणि बराच वेळ दाबून ठेवले. त्यातले पाणी वेगळे होऊन बाजूला काढले गेले आणि घट्ट दाबलेला चीजचा गोळा त्यात शिल्लक राहिला की झाले काम. हे सगळे तर आपल्याला माहीतच आहे. मग त्यात नवीन वेगळे असे तिने काय सांगितले?

त्यातील वेगळेपणा त्या बाटलीतील द्रवपदार्थात असतो. आपण या कामासाठी दुधामध्ये फक्त लिंबू पिळतो. इथल्या त्या बाटलीतील रसायनात शाकाहारी, मांसाहारी, मद्यार्कयुक्त किंवा मद्यार्कविहीन असे अनंत प्रकार असतात. ते प्रकार त्या चीजला वेगवेगळे गुणधर्म देतात. पण ट्रेड सीक्रेट या सबबीखाली त्याबद्दल अधिक सांगायचे तिने सफाईने टाळले. त्यांनी तयार केलेले चीज निदान युरोपमधील वातावरणात कधीच नासत नाही म्हणे. कालानुसार त्याचा रंग बदलत जातो आणि ते अधिकाधिक कडक होत जाते. एक महिना, सहा महिने आणि वर्षभरापूर्वी बनवलेल्या चीजच्या गोळ्यांचे नमूने तिने दाखवले. फार काळ जुने चीज माणसाने खाण्याच्या लायकीचे असू शकेल असे त्याचे रंगरूप आणि वास पाहून निदान मला तरी वाटले नाही. फार फार तर जोड्यांना पॉलिश करणे किंवा यंत्रांमध्ये वंगण अशा प्रकारचा त्याचा उपयोग होत असावा. त्या बाईचे इंग्रजी शब्दोच्चार दिव्य असल्यामुळे तिचे बोलणे स्पष्टपणे समजतही नव्हते आणि त्या सांगण्यात आमच्या कामाचे कांही नव्हते. खाण्याजोगे चीज बरोबर नेले तर घरी पोचेपर्यंत निदान आठवडाभर तरी फ्रीजमध्ये न ठेवता टिकेल एवढ्यापुरती खात्री कांही जणांनी पुन्हा पुन्हा विचारून करून घेतली. मला तसला मोह कांही झाला नाही कारण युरोपमधील रोजच्या ब्रेकफास्टमध्ये मिळणा-या चीजने मी समाधानी होतो आणि मुंबईला मिळणारे चीज त्याहून अधिक चविष्ट असते असे मला रोज वाटत राहिले होते.

तयार झालेल्या चीजच्या गोळ्यांना अनेक प्रकारचे आकार व रंग देऊन आकर्षक केले जाते. त्याचे चौकोन, त्रिकोण, वर्तुळाकार, बदाम वगैरे आकार असतात. त्यात पुन्हा चपटे, अंडाकृती, गोटीसारखे घट्ट किंवा स्पंजसारखे पोकळ असे प्रकार. कांही गोळे अंतर्बाह्य एका रंगाचे असतात, तर कांहीवर जेमच्या गोळीप्रमाणे वेगळ्या रंगाचे आवरण असते. लसूण, आले, मिरे यासारख्या गोष्टी मिसळून त्यांमधील कांहींना वेगळी चंव देतात. कांही प्रकारचे चीज निरनिराळे खाद्यपदार्थ तयार करीत असतांनाच त्यात मिसळायचे असते, तर कांही आकृत्या तयार झालेले खाद्यपदार्थ सजवण्याच्या कामासाठी वापरात येतात. अशा प्रकारे असंख्य प्रकारचे चीज व त्यापासून बनलेले पदार्थ वेगवेगळ्या आकर्षक वेष्टनांतील डब्यांमध्ये घालून तिथे विक्रीसाठी मांडून ठेवले होते.

त्याच कारखान्याच्या दुस-या विभागात लाकडाचे क्लॉग शूज तयार केले जातात. शेकडो वर्षांपूर्वी जेंव्हा येथील लोक दलदलीच्या प्रदेशात राहून रोज पाण्यातूनच ये जा करीत असत तेंव्हा ते लाकडापासून बनवलेले बूट पायात घालीत असावेत. आपल्याकडे पूर्वीच्या जमान्यात पायात लाकडाच्या खडावा घालण्याची पद्धत नव्हती कां? तसाच कांहीसा प्रकार इकडे होता. एका खास प्रकारच्या हलक्या लाकडाच्या ठोकळ्यातून हा बुटाचा आकार कोरून काढतात. इथेही प्रथम एका तरुणाने एक ठोकळा घेऊन तो लेथसारख्या एका खास यंत्रात बसवला आणि कांही मिनिटात त्याला आंतून व बाहेरून सफाईने कोरून बुटाचा आकार दिला. त्यानंतर त्या बुटाला सुबक रंगाने रंगवून विकायला ठेवले जाते. हा बूट अजिबातच लवचिक नसल्यामुळे त्यात पाय घुसवायचा असल्यास तो पायापेक्षा भरपूर मोठा असावा लागतो. माणसाच्या पायात बसतील इतके मोठे बूट तेथे विकायला ठेवले असले तरी ते घालून रस्त्यात चालण्याचा प्रयत्न कोणी करेल असे वाटत नाही. मुख्यतः एक स्मरणचिन्ह म्हणूनच पर्यटक ते विकत घेऊन जातात. ज्याच्या त्याच्या खिशाला परवडेल किंवा त्याच्याकडील शोकेसमध्ये राहू शकेल अशा लहान मोठ्या आकारांचे रंगीबेरंगी क्लॉग शूज इथे विकायला ठेवले होते. त्याच्या चिनी मातीच्या प्रतिकृतीसुद्धा मिळतात.

संध्याकाळी आम्ही स्टीमरमध्ये बसून एमस्टरडॅम शहरात फिरून आलो. व्हेनिससारखेच हे शहरसुद्धा जलमय आहे. इथे एक मोठे कालव्यांचे जाळे आहे आणि त्यावर शेकडोने पूल आहेत. मात्र हे शहर खूपच मोठे आहे आणि त्यात मुख्यतः आधुनिक रस्ते आहेत. कालवेसुद्धा व्हेनिसमधील बोळकंडींसारखे अरुंद नसून चांगले प्रशस्त आहेत. आम्ही ज्यामधून क्रूज केली तो कालवा नदीसारखा रुंद होता आणि त्याच्या दोन्ही किना-यावर सुंदर तशाच ऐतिहासिक महत्व असलेल्या नव्या जुन्या इमारती होत्या. त्या कालव्यामधून आम्ही एका विशाल जलाशयापर्यंत लांबवर चक्कर मारून आलो. दिवसाअखेरीस श्रमपरिहारासाठी प्रसन्न वातावरणातील हा जलविहार चांगला वाटला.

. . . . . . . (क्रमशः)

Thursday, May 21, 2009

आपण सारे कोट्याधीश!..... नाही होणार!

१५०० अब्ज डॉलर!' या विषयावर कांही दिवसांपूर्वी मिसळपाव या संकेतस्थळावर बराच काथ्या कुटला गेला होता. त्यात बहुतेक सदस्यांनी त्यांना वाटणारी मनस्वी चीड, सात्विक संताप, टोचणारी खंत, तसेच मत्सर, असूया वगैरे आपल्या मनातील भावनांना वाचा फोडली होती. मात्र कांही मोजके सकारात्मक प्रतिसादसुध्दा आले होते. त्यांतल्या दोन प्रातिनिधिक प्रतिसादांत असे लिहिले होते.
"१.स्वीस बॆंकेतले पैसे काढून सर्व उधा-या (जागतिक बॆंकेच्या कर्जासहीत ) देऊन टाकू आणि शिल्लक पैशातून, सार्वजनिक सुविधा, बेकारी, इतर प्रश्नांची सोडवणूक करायची."
"२. हा पैसा जर भारतात आणला, समजा जर तो पैसा वाटायचा ठरवला प्रत्येक भारतीयाला तर, सर्वजण लखपती होतील एवढा पैसा आहे हा."

शेकड्यांनी अब्ज बिब्ज आणि ते सुध्दा डॉलर्स !(म्हणजे कित्त्त्ती रुपये होतील!) यासारख्या अगडबंब संख्या वाचूनच आपली मती गुंग होते. पण या चर्चेची हजाराच्या वर वाचने झाली आहेत. या वाचकांपैकी कोणीही वरील विधानांना आक्षेप घेतला नाही त्या अर्थी त्यातले आंकडे आणि हिशोब बरोबरच असणार असे समजायला हरकत नसावी. शिवाय भारताच्या एका थोर नेत्याने ही आंकडेवारी जाहीर सभेत सांगून ते पैसे ताबडतोब भारतात परत आणण्याची मागणी केल्याचे वृत्त वाचले. हे सद्गृहस्थ कोणत्याही क्षणी भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी कधीचे सज्ज होऊन बसले आहेत. त्यामुळे ते बेजबाबदार विधाने किंवा अशक्यप्राय मागण्या करणार नाहीत अशी किमान अपेक्षा आहे. पंतप्रधान होताच लगेच याबाबत कारवाई करण्याचे वचनही त्यांनी जाहीरपणे जनतेला दिले. सत्यवचनी प्रभू श्रीरामचंद्र या चांगल्या कार्याला आपले आशीर्वाद देतील, त्यांच्या कृपाप्रसादाने हे नेताजी पंतप्रधानपद भूषवतील आणि दिलेल्या वचनाला जागून या कामासाठी तत्परतेने पाउले उचलतील असे मला त्या वेळी वाटले. त्यानंतर एकदाचा स्विस बँकेतल्या पैशाचा ओघ भारताच्या दिशेने वहायला लागला की सगळीकडे आबादी आबाद होईल या विचाराने मी हरखून गेलो होतो.

रस्त्यावरल्या दुकानांच्या कांचेच्या खिडक्यांतून दिसणा-या कांही छुटपुट वस्तू कधीपासून मला खिजवत आहेत, पण पैशांअभावी तूर्तास नको म्हणत आतापर्यंत त्या घेतल्या गेल्या नव्हत्या. आता लवकरच आपल्या घरात माणशी रोकड लाखलाख रुपये येणार. ते पैसे आले की एका दमात त्या सगळ्या एकदाच्या घरात आणून टाकता येतील. याबद्दल आश्वस्त झाल्यानंतर "ये दिल माँगे मोअर" या उक्तीप्रमाणे आणखी काय काय मिळू शकते याचे स्वप्नरंजन सुरू झाले. जर स्विस बँकेतले पैसे जप्त करून इकडे आणता येत असतील तर इतर ठिकाणी दडवलेली संपत्तीसुध्दा ताब्यात घेता येईल. तसे झाले तर आपल्याला किती धनप्राप्ती होऊ शकेल याची आकडेमोड करायला सुरुवात केली. हजारो अब्जावधी, म्हणजे खर्व, निखर्व का काय म्हणतात तसली ही प्रचंड संख्या आपल्याने पेलवली जात नसल्यामुळे बीजगणितातल्या पहिल्या धड्यात शिकल्याप्रमाणे ही संख्या 'क्ष' इतकी आहे असे मी समजून घेतले. कोणाला 'क्ष' हे जोडाक्षर पसंत नसेल, लिहिता येत नसेल किंवा उच्चार करायला कठीण वाटत असेल तर त्याने ती संख्या (स्वतः नव्हे) 'ढ' आहे असे मानले तरी तिच्यात कांही फरक पडत नाही.

जगातल्या कुठल्याही देशातली कुठलीही बँक लोकांनी दिलेले पैसे आपल्याकडे ठेवून घ्यायला नेहमीच तयार असते. ते काम फक्त स्विस बँकांनाच जमते अशातला भाग नाही. अल्बानियापासून झांबियापर्यंत (ए टू झेड्) शेकडो देश या जगात आहेत. कांही माणसे ऊठसूट मॉरिशस, दुबई किंवा सिंगापूरला जात येत असतात म्हणे. सगळ्या पैसेवाल्या लोकांनी स्विस एअरमध्ये जाऊन गर्दी करण्यापेक्षा वेगवेगळ्या दिशांना जाण्याने इतरांपासून आपले तोंड लपवायलाही त्यांना सोय़ीचे पडत असेल. त्यामुळे स्विट्झरलंडशिवाय जगातल्या इतर देशातील बँकांतसुध्दा त्या लोकांनी बरेचसे पैसे ठेवलेले असण्याची दाट शक्यता वृत्तपत्रातूनच व्यक्त केली जात होती. यासंबंधी निश्चित माहितीच्या अभावी जरी फिप्टीफिफ्टी परसेंट धरले तरी भारतीय कुबेरांची जितकी माया स्विस बँकांत ठेवलेली आहे तितकी तरी इतर सर्व देशांत मिळून आहे असे मानले तर एकंदर '२ क्ष' झाले.

धनवान लोक आपल्याकडचे सगळे पैसे कधीच रोकड्यात ठेवत नाहीत. अनेक प्रकाराने त्याची गुंतवणूक करतात. या लोकांनी सुध्दा परदेशात जमीनी, बागबगीचे, बंगले, हॉटेले, कारखाने, इतर इमारती, मोटारगाड्या, जहाजे, विमाने वगैरे घेऊन ठेवली असतीलच. कांही लोकांनी तर कुठकुठल्या महासागरांमधली अख्खी बेटे विकत घेऊन ठेवली आहेत असे ऐकले. पुन्हा एकदा फिफ्टीफिफ्टीचा फॉर्म्यूला वापरला तर या लोकांची परदेशातली एकंदर मालमत्ता '४ क्ष' इतकी होईल. आज हातात पैसे आले की लगेच ते तिकडे नेऊन ठेवले किंवा कशात गुंतवले असे कोणालाही इतक्या सहजासहजी करता येणार नाही. परदेशाची वारी करण्यासाठी कांही वेळ लागतो आणि खर्च येतोच. त्यासाठी लागणा-या वर्किंग कॅपिटलचा विचार करता या लोकांची परकीय चलनातील संपत्ती '५ क्ष' इतकी असेल असा अंदाज करता येईल.

परदेशात इतकी अपार माया राखून ठेवणारे लोक आपल्या देशातसुध्दा रुबाबानेच राहणार. कांहींच्या घरातल्या मंडळींच्या अंगावर सोने, हिरे, माणके, मोती वगैरे नवरत्नांचे अलंकार असतील, तर कांही लोकांच्या मालकीचे बंगले, राजवाडे, फार्महाउसेस, मॉल्स वगैरे जागोजागी घेऊन ठेवलेले असणार आणि सुंदर व महागड्या हंड्या, झुंबरे, पुतळे, गालिचे वगैरेंनी त्या इमारती सुशोभित केलेल्या असतील. त्याशिवाय जमीनजुमला, बागबगीचे, बड्या कंपन्यांचे शेअर्स, डिबेंचर्स वगैरे असतीलच. पॅन कार्डाची भानगड सुरू झाल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या नांवाने त्यातल्या सगळ्या गोष्टी नसतील; त्यांचे आप्तेष्ट, विश्वासू नोकरचाकर, कुत्री, मांजरे, पोपट वगैरेंची नांवे रेकॉर्डवर असतील, पण कसल्या ना कसल्या रूपात ही संपत्ती अस्तित्वात असेलच. पुन्हा फिफ्टीफिफ्टीचा फॉर्म्यूला वापरला तर या लोकांची स्वदेशातली संपत्ती धरून एकंदर मालमत्ता '१० क्ष' होईल.

ही फक्त जे स्विस बँकांत खातेधारक आहेत अशा बड्या लोकांची गोष्ट झाली. बक्षिसी, खुषी, चिरीमिरी, वर्गणी, निधी, हप्ता वगैरे मार्गांनी सामान्य माणसांकडून ज्यांना लाभप्राप्ती होते ते सगळे लोक आपली कमाई थेट स्विस बँकांत नेऊन ठेवू शकत नाहीत. त्यातल्या हजारात फार फार तर एकादा कधीतरी एकदा परदेशी जाऊन आला असेल आणि तिथे खाते उघडून त्यात पैसे ठेवणारा तर दशसहस्रेषु एक सुध्दा मिळेल की नाही याची शंका आहे. या लोकांच्या मानाने बड्या लोकांची क्षमता दहा हजारपट आहे असे जरी धरले तरीसुध्दा जेवढी माया त्यांनी जमवली असेल तेवढी तरी या सर्व लहान सहान लोकांकडे मिळून असेलच. म्हणजे पुन्हा फिफ्टीफिफ्टीचा फॉर्म्यूला वापरला तर या सर्व लोकांनी गैरमार्गाने मिळवलेली एकंदर मालमत्ता '२० क्ष' इतकी होईल. म्हणजेच या अवैध मार्गाने मिळवलेल्या धनाच्या हिमनगाचा 'क्ष' इतक्या आकाराचा भाग आता स्विस बँकेतल्या ठेवींच्या रूपात पाण्याच्या वर दिसू लागला असला तरी त्याचा अंतर्गत विस्तार '२०क्ष' इतका असावा.

हा सगळा हिशोब पैसे घेणा-या लोकांचा झाला. पण इतका पैसा त्यांना कोणी आणि कशासाठी दिला असेल? याचाही विचार करायला पाहिजे. कोणाही माणसाच्या मनात कधी वैराग्याची किंवा औदार्याची भावना जागृत झाली तर तो आपली जास्तीची संपत्ती गरीब आणि गरजू लोकांना दान करेल. जेंव्हा त्याला स्वतःला भरपूर लाभ होईल किंवा होण्याची खात्री वाटेल तेंव्हाच तो त्यातला कांही भाग त्या कामात सहाय्य करणा-या दुस-या कोणाला तरी खाऊ घालेल. सर्वसामान्य माणसाला शंभर रुपये मिळाले तर खूष होऊन तो त्यातला एकाद दुसरा रुपया बक्षिसी देईल किंवा पाचदहा रुपये कमिशन कुरकुरत देईल. कशाचा तरी गैरफायदा उठवायचा असेल तर त्यातली टक्केवारी वाढून कदाचित वीसपंचवीसावर जात असेल. म्हणजेच जर पैसे घेणा-या लोकांनी अवैध मार्गाने मिळवलेली मालमत्ता '२० क्ष' इतकी असेल तर ते पैसे देणा-या लोकांना त्यातून '१०० क्ष' इतका फायदा मिळाला असणार. 'क्ष'चा अर्थ माणशी लाख रुपये असेल तर '१०० क्ष' म्हणजे दर डोई कोटी रुपये इतका झाला. याचाच अर्थ आपला देश केवढा श्रीमंत आहे! अर्थातच हे सगळे धन आपल्या अर्थव्यवस्थेतच कुठे तरी असायला हवे, कदाचित असेलही. आपल्या चर्मचक्षूंना ते दिसून येत नाही, पण अर्थशास्त्रज्ञ ते शोधून काढू शकतील.
आता हरिदासाची कथा मूळ पदावर आणतो. आपले संभाव्य पंतप्रधान स्विस बँकेतून 'क्ष' इतकी संपत्ती परत आणणार होते. त्यांनी भारतातल्या सर्व जनतेला ते पैसे वाटले तर आपल्याला प्रत्येकी लाख लाख रुपये मिळाले असते. एकदा कां त्या खातेधारकांची नांवे समजली की आणखी एक पाऊल पुढे टाकून त्यांची '१० क्ष' इतकी सारी बेहिशेबी संपत्ती जप्त करून ती जनतेमध्ये वाटली तर प्रत्येकी दहा दहा लक्ष रुपये मिळतील. लांच खाणे हा जसा गुन्हा आहे तसेच ती देणेसुध्दा गुन्हाच आहे. त्यामुळे ती देऊन ज्यांचे उखळ पांढरे झाले असेल त्यांची संपत्तीसुध्दा ('१०० क्ष' इतकी) सरकारने ताब्यात घेऊन लांच घेणारे आणि देणारे यांच्यासकट तमाम जनतेला ती सम प्रमाणात वाटली तरी प्रत्येकाच्या वाट्याला एक कोटी रुपये येतील. मग तर सर्वांची मज्जाच मज्जा ! तिथेही सगळे पैसे मिळाले नाहीत आणि फिफ्टीफिफ्टीचा नियम लावला तरी सुध्दा घरटी एक एक कोटी रुपये येतील.

इतका मोठा पांढरा पैसा विनासायास आणि बिनाटेन्शन मिळाला तर अपवादास्पद अशा कांही फार मोठ्या अब्जाधीश व्यक्ती वगळता बहुतेक सर्वसामान्य पैसेखाऊ लोकसुध्दा खूषच होतील आणि कदाचित आपले आचरण सुधारतीलसुध्दा. लांच देऊन कामे करवून घेणारे लोक कांही न देताच त्यांना मिळणा-या लाभाने नक्कीच सुखावणार. इतर सर्वसामान्य लोकांना तर प्रत्यक्ष देवानेच छप्पर फाडून त्यांचेवर खैरात केल्याचा आनंद मिळेल. अशा रातीने सर्व जनता सुखसागरात डुंबू लागेल. पण एक अडचण येण्याचा धोका मात्र दिसतो. आपले घरकाम, घराची रखवाली, साफसफाई वगैरे करणारे, कोप-यावरले छोटे दुकानदार, भाजीविके, पेपरवाले, दूधवाले, भेळपुरी किंवा वडापाव विकणारे, रिक्शाचालक, बस ड्रायव्हर-कंडक्टर वगैरे वगैरे वगैरे सगळे सर्वसामान्य लोक एकाएकी कोट्याधीश झाले तर कदाचित आपापल्या कामावर येणार नाहीत, त्यांच्याविना आपली सारी कामे अडतील, घरात किंवा घराबाहेर आपल्याला कोणीच विचारणार नाही आणि आपण कोट्याधीश कशाला झालो? असे वाटू लागेल.

या भीतीमुळे माझे गणित मी कुणालाही सांगितले नव्हते. पण आता तो प्रश्नच मिटल्यामुळे मी हळूच एका मित्राच्या कानात पुटपुटलो. त्यावर तो लगेच उद्गारला,"अरे तुला आता वेडा म्हणायचं कां खुळा म्हणायचं? (जाऊ द्या, हे नेहमीचेच आहे आणि हा त्याचा प्रॉब्लेम आहे.) तुझ्या त्या नेताजींनी स्विट्झर्लंडमधले पैसे आणू असं म्हंटलं असेल, पण ते तुला मला त्यातले लाख लाख रुपये देतो असे कांही म्हणाले होते कां? त्यांनी पैसे आणलेही असते तरी त्याच्या बातमीनेच महागाई तेवढी वाढली असती मात्र आणि त्याच्या झळा आपल्यालाच लागल्या असत्या. म्हणूनच कदाचित लोकांनी त्यांना निवडून आणलं नसेल!"

तळटीपः- या लेखात वर्तवलेले सगळे निव्वळ अंदाज आहेत, त्यामागे कोठलेही शास्त्र नाही. ते ज्यांच्या आधारावर केले आहेत ती कारणे वर वर पटण्यासारखी वाटली तरी त्यात कांही ढोबळ मूलभूत चुका आहेत. चाणाक्ष वाचक त्या दाखवून देतीलच.

Wednesday, May 20, 2009

श्री.भालचंद्र पेंढारकर


नटवर्य, गायक, नाट्यसंस्थासंचालक आदि अनेकविध भूमिकांमधून आयुष्यभर रंगदेवतेच्या सेवेत मग्न असलेले श्री.भालचंद्र पेंढारकर ऊर्फ अण्णा यांना गतवर्षीचा महाराष्ट्र राज्य जीवनगौरव पुरस्कार मार्च महिन्यात झालेल्या एका देखण्या सोहळ्यात प्रदान करण्यात आला. नटश्रेष्ठ श्री.प्रभाकर पणशीकर यांच्या नांवाने हा पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे दर वर्षी नाट्यक्षेत्रातल्या एका ज्येष्ठ व्यक्तीला दिला जातो. रविवार दि.१५ मार्चला माटुंग्याच्या यशवंत नाट्यमंदिरात हा कार्यक्रम संपन्न झाला. नटश्रेष्ठ श्री.प्रभाकर पणशीकर, नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रसिध्द गायक श्री.रामदास कामत, मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ.बाळ भालेराव आणि ज्येष्ठ संगीतकार व कवी श्री यशवंत देव या प्रसंगी उपस्थित होते. निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली असल्यामुळे सांस्कृतिक खात्याचे मंत्री श्री.हर्षवर्धन पाटील हे कार्यस्थळी येऊनसुध्दा रंगमंचावर येऊ शकले नाहीत. पडद्यामागेच अण्णांना मानाचा फेटा बांधून ते चालले गेले असे सांगण्यात आले.

दीपप्रज्वलनाचा औपचारिक भाग झाल्यानंतर अण्णांच्या जीवनातील महत्वाचे टप्पे दर्शवणारी एक चित्रफीत पडद्यावर दाखवली गेली. भालचंद्र पेंढारकर म्हणजेच ललितकलादर्श असे समीकरण झालेले असल्यामुळे अर्थातच त्यात ललितकलादर्शच्या कार्याचा आढावा आला. ही संस्था संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी १९०७ साली हुबळी येथे सुरू केली. संगीत सौभद्र, शारदा, शहाशिवाजी, हाच मुलाचा बाप, मानापमान, संन्याशाचा संसार इत्यादी नाटके त्या संस्थेने दिमाखात सादर करून त्या नाटकांनाही अमाप लोकप्रियता मिळवून दिली. केशवरावांच्या मृत्यूनंतर कै.बापूराव पेंढारकर यांनी ललितकलादर्शची धुरा सांभाळून सत्तेचे गुलाम, कुंजविहारी, कृष्णार्जुनयुध्द, श्री, सोन्याचा कळस आदि नवी नाटके मराठी रंगभूमीवर आणली. पण त्यांच्या अकाली निधनानंतर ललितकलादर्श पोरके झाले. त्या सुमारास आलेल्या बोलपटांच्या लाटेमुळे संगीत नाटकांची लोकप्रियता ओसरू लागली होती. संस्थेची आर्थिक परिस्थिती एवढी भक्कम राहिली नसल्यामुळे कांही काळ ती संस्थगित झाली होती. पण बापूरावांचे सुपुत्र श्री.भालचंद्र पेंढारकर यांनी वयाच्या एकवीसाव्या वर्षी १९४२ साली नव्या जोमाने संस्थेचे पुनरुज्जीवन केले. सुरुवातीला त्यांनी बापूरावांची जुनी नाटकेच नव्या संचात सादर केली, पण त्यात नाविन्य आणण्याचा प्रयत्न करताकरता नवी नाटके रंगमंचावर आणली. एका बाजूला खर्च आंवाक्यात ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न आणि दुस-या बाजूला उत्पन्न वाढवण्यासाठी प्रेक्षकांना आकर्षक वाटावेत असे नवनवे प्रयोग यांची तारेवरली कसरत सांभाळत त्यांनी ललितकलादर्शला ऊर्जितावस्थेत आणण्यात यश मिळवले. त्यांनी सादर केलेली दुरितांचे तिमिर जावो, पंडितराज जगन्नाथ, जय जय गौरीशंकर, गीता गाती ज्ञानेश्वर आदि नाटके गाजली. दुरितांचे तिमिर जावो नाटकातील त्यांनी गायिलेली "आई तुझी आठवण येते" आणि "तू जपून टाक पाऊल जरा " ही गाणी अजरामर झाली.

एका काळी अतीशय गाजलेल्या पण कालांतराने मरगळ आलेल्या संगीत रंगभूमीचे पुनरुज्जीवन करण्याचे श्रेय अण्णा पेंढारकर, अण्णा (विद्याधर) गोखले आणि संगीतकार वसंत देसाई या त्रयीला जाते. त्यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकांने अभूतपूर्व असा नांवलौकिक मिळवल्यानंतर मंदारमाला, सुवर्णतुला, जय जय गौरीशंकर, मदनाची मंजिरी आदी अनेक नवी संगीत नाटके पडद्यावर आली आणि त्यानंतर पं.जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीताने नटलेल्या मत्स्यगंधा, ययाती आणि देवयानी, कट्यार काळजात घुसली आदी नाटकांनी मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला हे सर्वश्रुतच आहे. हे थोडे विषयांतर झाले.

श्री.भालचंद्र पेंढारकर हे नाटकाच्या सर्व अंगांकडे अत्यंत बारकाईने लक्ष देत असत. नेपथ्य, ध्वनिसंयोजन, प्रकाशयोजना वगैरेंमध्ये नवनवे कल्पक प्रयोग करून त्यांनी नाट्यकृतींना आकर्षक बनवले. कडक शिस्त आणि वक्तशीरपणा यांसाठी ते नांवाजले गेले होते. समोर प्रेक्षकवर्ग जमलेला असो वा नसो, ठरलेल्या वेळेला तिसरी घंटा वाजून पडदा वर गेलाच पाहिजे असा त्यांचा दंडक असल्यामुळे ललितकलादर्शच्या नाटकांना प्रेक्षकसुध्दा वेळेच्या आधी हजर होत असत. नाटकांच्या प्रयोगांसाठी त्यांनी एकदा भारतयात्रा काढली. त्यासाठी रेल्वेची एक बोगीच आरक्षित करून त्यात त्यांनी ललितकलादर्शचा तात्पुरता संसार थाटला होता आणि ती बोगी वेगवेगळ्या गाड्यांना जोडून त्यांनी भारतभ्रमण केले आणि महाराष्ट्राबाहेरील रसिक प्रेक्षकांना आपले नाट्याविष्कार दाखवून तृप्त केले. दिल्ली मुक्कामी खुद्द पंतप्रधान पंडित नेहरू त्यांचा नाट्यप्रयोग पहायला आले होते. पण त्यांना यायला अवकाश होता म्हणून त्यांच्यासाठीसुध्दा न थांबता अण्णांनी आपला प्रयोग वेळेवर सुरू केला असे आवर्जून सांगितले गेले.

अभिनेता, गायक, संगीत दिग्दर्शक, संस्थेचे चालक वगैरे भूमिकांमधून श्री.भालचंद्र पेंढारकर यांना सर्वांनी पाहिले आहे आणि त्यांची प्रशंसा केली आहे. याशिवाय त्यांचे एक वेगळे रूप या लघुचित्रात पहायला मिळाले. ते म्हणजे त्यांनी स्वखर्चाने सुमारे तीनशे जुन्या नाटकांचे ध्वनिमुद्रण करून ठेवले आहे.तसेच जुन्या नाटकांच्या छायाचित्रांचा प्रचंड संग्रह केला आहे. ध्वनिफितींच्या त्यांच्याकडे असलेल्या या संग्रहातून त्यांचे रूपांतर ते आता नव्या तंत्राने दाखवता येण्याजोग्या टेप व सीडी वगैरेमध्ये करीत आहेत. यासाठी त्यांना साहित्य संघ मंदिरात एक खोली दिली असून त्यात हे काम गेली अनेक वर्षे चालले आहे.

त्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली. नटश्रेष्ठ श्री.प्रभाकर पणशीकर यांनी आपल्या नांवाने हा पुरस्कार कशाला देतात असा प्रश्न विचारून श्री.भालचंद्र पेंढारकर यांना हा दिल्यामुळे त्यात आपला गौरव झाल्याचे सांगून हा पुरस्कार देण्यासाठी आपण केलेल्या खटपटीबद्दल माहिती दिली. गेल्या वर्षीच आपण चार पांच वयोवृध्द नाट्यकर्मींना एकसाथ हा पुरस्कार देण्याची सूचना केली होती, पण आता त्यातले कांही लोक आपल्याला सोडून गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच आजच्या काळात जीवनगौरव म्हणून फक्त एक लाख रुपये देण्यात काय अर्थ आहे असे विचारून एक कुस्ती मारल्यावर पहिलवानाला पंचवीस लाख रुपये मिळतात अशी पुस्ती जोडली. सरकारतर्फे अर्थातच कोणी प्रत्युत्तर दिले नाही, पण सरकार तरी कुठकुठल्या क्षेत्रातल्या किती लोकांना किती पुरस्कार प्रदान करू शकेल हा ही एक प्रश्न आहेच. श्री.रामदास कामत, डॉ.बाळ भालेराव आणि श्री यशवंत देव यांनी प्रसंगोचित छोट्या भाषणांतून अण्णांबद्दल गौरवोद्गार काढले. शासनातर्फे श्री.अंबेकर यांनी केलेल्या गौरवपूर्ण भाषणात श्री.पेंढारकर यांनी संकलित केलेल्या जुन्या नाटकांच्या अमूल्य ठेव्याचा उपयोग शासनातर्फे तो लोकांना दाखवण्यासाठी करू द्यावा अशी याचना केली. डॉ.भालेरावांनी साहित्य संघातर्फे ती तत्परतेने तत्वतः मान्य केली. श्री.भालचंद्र पेंढारकर हे गेली सहासष्ठ वर्षे अव्याहतपणे ललितकलादर्श ही संस्था चालवत आहेत आणि अजून ती कार्यरत आहे हे सांगितले गेले, पण आज या संस्थेची कोणकोणती नाटके रंगभूमीवर पहायला मिळतात याचा मात्र कोणीच उल्लेख केला नाही.

एके काळी गाण्यातल्या प्रत्येक अक्षरावर जोर देऊन ते म्हणणारे आणि जुन्या नाटकांतले पल्लेदार संवाद एका दमात बोलणारे श्री.भालचंद्र पेंढारकर या सत्काराला उत्तर देण्याइतपतसुध्दा सुदृढ राहिले नव्हते हे पाहून वाईट वाटले. त्यांनी लिहून आणलेले उत्तरादाखल भाषण श्री.दाजी पणशीकर यांनी वाचून दाखवले. त्यांच्या जीवनात ज्या ज्या लोकांचे सहाय्य आणि मार्गदर्शन त्यांना प्राप्त झाले त्या सर्वांचे आणि मायबाप प्रेक्षकांचे आभार त्यात त्यांनी व्यक्त केले. श्री.सुधीर गाडगीळ यांनी सभेचे सूत्रसंचालन केले आणि प्रेक्षकांच्या आग्रहास्तव श्री.पेंढारकरांना दिलेल्या मानपत्राचे वाचन केले.


जीवनगौरव पुरस्काराचा समारंभ झाल्यानंतर स्व।विद्याधर गोखले यांनी लिहिलेल्या आणि श्री।यशवंत देव यांनी संगीत दिग्दर्शन केलेल्या संगीत बावनखणी या नाटकाचा नेटका प्रयोग झाला। अण्णांचे सुपुत्र ज्ञानेश पेंढारकर, स्नुषा नीलाक्षी, कन्या गिरिजा काटदरे, गायक अरविंद पिळगावकार, अभिनेत्री नयना आपटे, नृत्यांगना माया जाधव, विनोदमूर्ती चंदू डेग्वेकर आदी कलाकांरांनी यात भाग घेतला। यातील कांही कलाकारांनी दोन किंवा तीन भूमिका साकार केल्या हे एक या प्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. यातील गाणी प्रसंगोचित आणि त्यावेळी ऐकायला गोड वाटत असली तरी ती फारशी प्रसिध्द झाली नाहीत आणि फार काळ लक्षात राहिली नाहीत. श्री.मकरंद कुंडले यांनी ऑर्गनवर आणि श्री.धनंजय पुराणिक यांनी तबल्यावर सराईतपणे साथसंगत केली. वेगळ्या कालखंडातले आणि वेगळ्या अनोळखी पार्श्वभूमीवरले हे नाटक आजच्या युगातल्या प्रेक्षकांना अपील करण्यासारखे नाही, तरी अखेरपर्यंत हॉल भरलेला होता हे त्याच्या सुंदर सादरीकरणाचे यश मानावे लागेल.

------------------------------------------------------------------


श्री,भालचंद्र पेंढारकर यांचा जीवनपट
जन्म २५ नोव्हेंबर १९२१ हैद्राबाद (दक्षिण)- म्हणजेच आपले आंध्रप्रदेशातील
संगीतातील गुरू: रामकृष्णबुवा वझे
नाट्यसृष्टीत पदार्पण १९४२, पहिली भूमिका सत्तेचे गुलाम या नाटकातील वैकुंठ
चित्रपटातील भूमिका १९५२, अमर भूपाळी

पेंढारकरांची प्रमुख नवीन संगीत नाटके
स्वामिनी : पु.भा. भावे
दुरितांचे तिमिर जावो : बाळ कोल्हटकर
पंडितराज जगन्नाथ : विद्याधर गोखले
जय जय गौरीशंकर : विद्याधर गोखले

वेगळ्या थाटाची नाटके
आनंदी गोपाळ, रक्त नको मज प्रेम हवे, झाला अनंत हनुमंत


पेंढारकरांना मिळालेले पुरस्कार
१९६८ नागरी सत्कार
१९७३ विष्णुदास भावे पुरस्कात
१९८३ बालगंधर्व सुवर्णपदक
१९९० केशवराव भोसले पुरस्कार
१९९६ जागतिक मराठी परिषद इस्राइल
१९९९ महेंद्र पुरस्कार
२००२ अल्फा जीवन गौरव पुरस्कार
२००४ संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पारितोषिक
२००५ तन्वीर पुरस्कार
२००६ चतुरंग जीवन गौरव
२००८ महाराष्ट्र राज्य (पणशीकर) जीवन गौरव पुरस्कार

Tuesday, May 19, 2009

ग्रँड युरोप - भाग २५ : मदुरोडॅमचे मिनि हॉलंड


दि.२६-०४-२००७ : मदुरोडॅमचे मिनि हॉलंड


जर्मनीमधील कोलोन शहराहून निघाल्यावर जर्मनीची सीमा उल्लंघून आम्ही नेदरलँडमध्ये शिरलो. ज्याप्रमाणे इंग्लंड हा युनायटेड किंग्डमचा एक भाग असला तरी तो देश इंग्लंड म्हणूनच जास्त प्रसिध्द आहे त्याचप्रमाणे हॉलंड हा नेदरलंडचा एक भाग असूनही आपण त्या देशालाच हॉलंड या नांवाने ओळखत आलो आहे. हा एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा देश आहे याचे मुख्य कारण म्हणजे याचा अर्ध्याहून अधिक भाग समुद्रसपाटीपेक्षाही खालील पातळीवर आहे.

समुद्राच्या पाण्याला रोज भरती आणि ओहोटी येत असते व त्यावेळी भरती ओहोटीच्या जोरानुसार त्याच्या पाण्याची पातळी वर किंवा खाली जात असते. त्याची सरासरी काढून त्याचा मध्यबिंदू ही त्या जागेची समुद्राची पातळी आहे असे ठरवले जाते आणि जमीनीवरील कोठल्याही जागेची उंची या पातळीच्या तुलनेने किती आहे याच्या आंकड्यात दर्शवली जाते. हॉलंडमधील बहुतेक भाग अत्यंत समतल असून तिची उंची या पातळीच्या तुलनेत थोडीशी कमी आहे. याचा अर्थ प्रत्यक्षात तो भाग पाण्याखाली असतो असा नाही. अनेक उपाय करून तो कोरडा ठेवण्यात आला आहे. पण जर कां हे सर्व कृत्रिम उपाय निष्फळ ठरले तर हॉलंडचा बराचसा भाग भरतीच्या वेळी पाण्याने भरेल आणि ओहोटीच्या वेळी त्यावरील पाणी ओसरेल. -हाईन ही युरोपातील मोठी नदी इथेच अनेक मुखाने समुद्राला मिळते. त्यामुळे तिच्या मुखाजवळील प्रदेशात गोड्या पाण्याचेही अनेक प्रवाह निर्माण झालेले आहेत.

शेकडो वर्षांपूर्वी कोणाला तरी या भागात येऊन वसाहत करावी असे वाटले असेल त्या वेळी त्यांनी समुद्रकिना-यावरील उंचवट्यांवर जाऊन रहायला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या आजूबाजूला भर घालून कांही कृत्रिम उंचवटे तयार केले. भरतीच्या वेळी ती बेटे असतील तर ओहोटीच्या वेळी जमीनीला जोडलेली असतील. आणखी एक पाऊल पुढे टाकून समुद्राच्या व नदीच्या उथळ पाण्यात बांध घातले आणि ही बेटे एकमेकांना जोडली. त्यामुळे त्यांच्यामधला सखल भाग समुद्रसपाटीच्या खाली असला तरी भरतीच्या पाण्याला तिथपर्यंत पोचायला मार्ग उरला नाही. तो भाग लागवडीखाली आणता आला.

असे असले तरी नद्यांमधून वहात येणारे पाणी समुद्राला मिळाले नाही तर ते तेथे सांचेल व मोठमोठी तळी तयार होतील. त्याचा निचरा करण्यासाठी वेगवेगळे उपाय योजले गेले. त्यांच्या पात्रांत जागोजागी बंधारे घालून त्यांचे वेगवेगळे भाग बनवले. कांही जागी बंधा-यांवर स्लुईस गेट नांवाच्या झडपा बसवल्या. या झडपा फक्त आंतून बाहेरच्या बाजूला उघडतात. त्यामुळे ओहोटीच्या काळात आंतील पाण्याचा दाब अधिक असल्यामुळे ते दरवाजे उघडून आंतील भागातील पाणी समुद्रात वाहू देतात, तर भरतीच्या वेळी समुद्रामधील पाण्याची उंची व त्यातून निर्माण होणारा दाब जास्त असल्याने तो दाब या दरवाज्यांना घट्ट मिटवून ठेवतो. त्या वेळेस बाहेरील पाणी आंत येऊ शकत नाही. आपल्या हृदयातील झडपा अशाच प्रकारे कार्य करून शरीरातील रक्ताभिसण सुरू ठेवतात.

मध्ययुगीन काळात पवनचक्क्यांचा शोध लागल्यानंतर या भागात मोठ्या संख्येने पवनचक्क्या उभारल्या गेल्या. त्यांना जोडलेले पंप खालील पातळीवरील नद्या व तलावांमधील पाणी उचलून वरील पातळीवरील समुद्रात ते सोडू लागले. असा प्रकारे पंचमहाभूतांमधील वायू या एका महाभूताच्या मदतीने जल या दुस-या महाभूतावर विजय मिळवला. वाफेच्या तसेच डिझेल इंजिनांचा शोध लागल्यानंतर त्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. सागराबरोबर चाललेली ही लढाई अजून सुरूच आहे आणि अशीच चालू राहणार.

इतका खटाटोप करून जमीन संपादन करण्यामागे तसेच महत्वाचे कारण असणारच. नद्यांमधून वहात येणा-या गाळाने तेथील जमीन अतिशय सुपीक बनलेली आहे. त्यामुळे दाट लोकसंख्या झाली असूनसुद्धा हॉलंडमधून शेतीमालाची आणि विशेषतः दूधदुभत्याची प्रचंड निर्यात केली जाते इतके उत्पन्न तेथील जमीनीतून निघत आहे.

अॅमस्टरडॅम या नेदरलंडच्या राजधानीच्या शहराजवळच द हेग या शहरी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. त्याच शहरात मदुरोडॅम नांवाची एक अत्यंत सुंदर अशी एका काल्पनिक शहराची प्रतिकृती बनवली आहे. ही कोणत्याही प्रत्यक्षातील शहराची प्रतिकृती नाही, तर हॉलंडमधील एक नमूनेदार शहर कसे असावे याचे एक पंचवीसांश आकाराचे दर्शन येथे घडते. प्राचीन काळातील चर्च, हॉस्पिटल, शाळा, सरकारी ऑफीसे, मोठ्या खाजगी कंपन्यांची ऑफीसे इत्यादी तेथील प्रत्यक्षातील महत्वाच्या इमारतींच्या हुबेहूब प्रतिकृती आहेतच. त्याशिवाय विमानतळ, रेल्वे स्टेशन, गोदी, नदी, त्यावरील पूल, बागबगीचे, क्रीडांगणे आदि सगळ्या गोष्टींच्या प्रतिकृती आहेत. अगदी मोकळ्या कुरणात चरणारी छोटीछोटी गुरेसुद्धा दाखवली आहेत. रस्त्यांच्या कडेने, इमारतींच्या आसपास आणि मोकळ्या जागेवर हजारोंच्या संख्येने छोटी छोटी झाडे लावून शहराचा अप्रतिम देखावा निर्माण केला आहे. यातील रस्त्यांवरून वेगवेगळ्या मॉडेल्सच्या मोटारी धांवत असतात आणि पाण्यातील जहाजे आणि स्पीडबोट्स वेगवेगळ्या वेगाने चालत असतात. तेलवाहू आणि खनिज पदार्थांची वाहतूक करणारी वेगळ्या पद्धतीची जहाजेसुद्धा इकडून तिकडे फिरत असतांना दिसतात. फक्त विमाने तेवढी आकाशात न उडता जमीनीवरूनच विमानतळाच्या घिरट्या घालीत असतात. अशा प्रकारे ही सगळी फक्त हुबेहूब दिसणारी स्थिर मॉडेल्स नसून चालती फिरती इवली इवली यंत्रे आहेत.

हॉलंडमध्ये आगबोटींना नदीतून समुद्रात किंवा समुद्रातून नदीत प्रवेश करण्यासाठी खास रचनेच्या दुहेरी गेटांमधून जावे लागते. इथे नदीची पातळी समुद्रसपाटीहून खाली असते यामुळे या दोन्हीमधील पाण्याच्या पातळ्या वेगळ्या राखण्यासाठी एक विशेष व्यवस्था केलेली आहे. या रचनेची प्रतिकृतीसुद्धा मदुरोडॅममध्ये पहावयास मिळते. ठराविक वेळानंतर एक आगबोट नदीतून आणि दुसरी बोट समुद्रातून अशा दोन बोटी या दुहेरी दरवाजांपाशी येतात. एक एक दरवाजा उघडून त्या मधील जागेत येतात. त्या वेळेस दुसरे दोन दरवाजे बंद राहून नदी आणि समुद्र यांना वेगळे ठेवतात. त्यानंतर पहिले दोन दरवाजे पूर्णपणे बंद होऊन दुसरे दोन दरवाजे उघडतात व त्यातून या आगबोटी आपापल्या मार्गाने पुढे जातात. हे सगळे आपोआप घडत असलेले पहायला प्रेक्षकांची गर्दी होते आणि सर्व प्रेक्षक चांगलेच प्रभावित झालेले दिसतात. एका मोठ्या बागेएवढ्या जागेत हे सगळे विश्व मांडलेले आहे. ते पहाण्यासाठी दिलेला तासाभराचा वेळ केंव्हा संपला ते कळलेसुद्धा नाही. एक अविस्मणीय अशी जागा पहाण्याचे समाधान इथे मिळाले.
. . . . . . (क्रमशः)

Monday, May 18, 2009

ग्रँड युरोप - भाग २४ : जर्मनीतील प्रवास


दि.२५-०४-२००७ : जर्मनीतील प्रवास


स्विट्झर्लंडधून जर्मनीच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर एक फरक घडून आला। या देशात वाहनांच्या वेगाची कमाल मर्यादा ताशी फक्त नव्वद किलोमीटर एवढीच ठेवली आहे आणि जागोजागी छुपे कॅमेरे लावून हमरस्त्यावरून जाणा-या वाहनांचा वेग मोजला जात असतो. त्यामुळे वेगाने गाडी चालवण्याबद्दल भुर्दंड बसावा लागण्याच्या भीतीने आमचे चालक महाशय जास्तच जागरूक झाले. तसे ते आधीपासून आमची गाडी अत्यंत काळजीपूर्वक व सफाईने चालवीत होते. तरीही वाटेत कुठल्या तरी एका जागी ट्रॅफिक पोलिसाने त्यांना क्षुल्लक कारणावरून अडवून एक झटका दिलेला होता. त्याची पुनरावृत्ती व्हायला त्यांना नको होती आणि आम्हाला तर असला व्यत्यय असह्य झाला असता. त्यामुळे बाणासारखा सरळ आणि कुठेही कसलाही खाचखळगा नसलेला उत्तम रस्ता असूनसुद्धा मर्यादित वेग ठेऊन गाडी हाणावी लागत होती.



ल्यूसर्नहून निघाल्यापासून कोलोनला पोचण्यापर्यंत आठ तासांचा प्रवास होता. त्यात कुकू क्लॉक फॅक्टरीमध्ये तासभर थांबणे झाले आणि दर दोन तासानंतर दहा पंधरा मिनिटे विश्रांती घेणे सक्तीचे होते. असे करून तो दिवस पूर्णपणे प्रवासातच गेला. म्हणजे जर्मनीचा उपयोग आम्ही स्विट्झरलंड आणि हॉलंड यांच्या दरम्यानचा एक कॉरीडॉर एवढाच केला असे म्हणावे लागेल. बर्लिन, फ्रँकफूर्ट, म्यूनिच यासारखी प्रसिद्ध शहरे या देशात असतांना त्यातील कोठल्याही महत्वाच्या शहराला स्पर्शही केला नाही. कदाचित जर्मनी हा विस्तृत देश असल्यामुळे बसने सगळीकडे फिरणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नसेल. म्हणजे जेवढा वेळ प्रवासात घालवायचा तेवढ्या प्रमाणात पहाणे होत नसेल. किंवा परदेशी लोकांपुढे आपल्या देशाचे प्रदर्शन मांडून त्यातून पैसे कमावणे जर्मन लोकांच्या स्वभावात फारसे बसत नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यास तितकेसे प्राधान्य त्या देशात मिळत नसेल. हा आपला माझा अंदाज.

आम्ही तेथील हायवेवरून धांवणारी वाहने आणि आजूबाजूच्या शेतातील पिके पहात मार्गक्रमण करीत होतो. ब्लॅक फॉरेस्ट संपल्यानंतर फारसे मोठे डोंगर किंवा घनदाट जंगल लागले नाही. बहुतेककडे सुपीक सपाट जमीन होती आणि त्यावर यांत्रिक शेती चालली होती. कुठे हिरवागार गालिचा पसरलेला दिसे तर कुठे पिवळ्याधमक फुलांनी तो सजवलेला दिसे. पण आतापर्यंत त्याचे नाविन्य राहिले नव्हते. मधून मधून लहान मोठी गांवे दिसत होती, पण त्यातील रस्त्यांच्या वरून किंवा खालून आमचा हायवे जात असल्याने कोठेही थांबण्याची गरज नव्हती. बहुतेक रहदारी वेगवेगळ्या मॉडेलच्या कार किंवा अवाढव्य आकाराचे ट्रक यांची होती. सगळे पंचवीस तीस चाके असलेले ट्रेलर होते. एवढेच नव्हे तर ते रिकामे झाल्यास त्यातील कांही चांके वर उचलून जमीनीला न टेकवण्याची यंत्रणा त्यांमध्ये दिसत होती. सर्व ट्रक संपूर्णपणे बंद होते. एकसुद्धा साधा चार चाकांचा उघडा ट्रक दृष्टीला पडला नाही. कन्स्ट्रक्शन कंपन्यांचे बांधकामाचे सामानसुद्धा सीलबंद गाड्यामधून नेले जात होते. त्यातील कचरा चुकूनही बाहेर आला तर त्यांना जबरदस्त दंड भरावा लागतो असे ऐकले. आपल्याकडील कचरा वाहणा-या गाड्या तर तो गांवभर मुक्तपणे उधळीत फिरत असतात आणि चुकून आपली गाडी त्या गाडीच्या मागे आली तर किती वैताग येतो त्याची प्रकर्षाने आठवण झाली. दर दोन तासांनी मिळणा-या विश्रांतीमध्ये त्या ठिकाणच्या स्टोअरमध्ये नवीन कोणती वस्तू दिसते ते पहात होतो आणि चॉकलेट, कुकीज, बिस्किटे असली चिटूर पिटूर खरेदी करीत होतो. त्यातच एका जागी कोणाच्या तरी सांगण्यावरून एक शँपेनची छोटीशी बाटलीही आली.

संध्याकाळपर्यंत आम्ही कोलोनला पोचलो. युरोपातील किंवा कदाचित जगातील सर्वात उंच असे हे चर्च असेल. पॅरिसचा आयफेल टॉवर बांधून होण्यापूर्वी म्हणजे एकोणीसाव्या शतकात हे कॅथेड्रल ही जगातील सर्वात उंच इमारत होती म्हणे. याच्या बांधकामाची सुरुवात बाराव्या शतकात झाली आणि ते पूर्ण व्हायला तब्बल सहा शतके लागली. इतके महत्वाचे हे स्थान पहायला पर्यटकांनी गर्दी केली असली तर नवल नाही. पण त्यांच्या सोयीसाठी कसलेही प्रयत्न तिथे केले जात असल्याचे दिसले नाही. अजून चांगला उजेड असूनसुद्धा आंत जाण्याची दारे केंव्हाच बंद होऊन गेली होती. त्या जागेची माहिती देणारा एखादा साधा बोर्डसुद्धा कोठे लावून ठेवलेला दिसला नाही. आम्ही आजूबाजूने फिरून व माना वर करकरून जेवढे दिसले तेवढे पाहून घेतले. हेच चर्च जर इटलीत किंवा इंग्लंडमध्ये असते तर त्या लोकांनी तिथे सोन्याची खाण उघडली असती असे मला वाटले. पिसाचा कलता मनोरा आणि लंडनचा सरळसोट बिगबेनचा टॉवर जगभर प्रसिद्ध आहेत, पण त्या दोन्हींपेक्षा अधिक भव्य आणि कलात्मक अशा कोलोन कॅथेड्रलचे नांव कितीशा लोकांनी ऐकले असेल?

. . . . . . . .(क्रमशः)

Sunday, May 17, 2009

ग्रँड युरोप - भाग २३ : ब्लॅक फॉरेस्टमधील कुकू क्लॉक फॅक्टरी


दि.२५-०४-२००७ : ब्लॅक फॉरेस्टमधील कुकू क्लॉक फॅक्टरी


स्विट्झर्लंडमधील निसर्गसौंदर्यस्थळे पहाण्यासाठी ल्यूसर्न इथे तीन दिवस राहून झाल्यानंतर पुढच्या प्रवासासाठी तेथून प्रस्थान करण्याची वेळ आली. युरोपभ्रमणातील पुढील चार दिवस रोज नवा देश, नवे शहर व नव्या हॉटेलात मुक्काम करायचा होता. तेंव्हा रोजची सामानाची हलवाहलवी कमी करण्याच्या दृष्टीने त्याची पुनर्रचना केली. वापरून मळलेले शर्टपँट्स, बर्फात घालण्यासाठी आणलेले लोकरीचे जाडजूड उबदार कपडे, घरी नेण्यासाठी वाटेत विकत घेतलेल्या वस्तू वगैरे सगळ्या रोज न लागणा-या गोष्टी मोठ्या ''चेक इन बॅगेज'मध्ये ठेऊन दिल्या आणि आवश्यक तेवढे सामान सुटसुटीत हँडबॅगेमध्ये काढून घेतले. म्हणजे रोज तेवढेच बरोबर घेऊन बसमधून चढणे उतरणे आणि हॉटेलमधील खोल्या बदलणे सोयीचे व्हावे हा उद्देश होता.

स्विट्झर्लंडचा निरोप घेऊन आता जर्मनीच्या हद्दीत प्रवेश केला. जर्मनीमधील सुरुवातीचा भाग पाईन व फर वृक्षांच्या घनदाट जंगलाने गच्च भरला होता. या डोंगराळ भागाला 'ब्लॅक फॉरेस्ट' म्हणतात. कदाचित दिवसासुद्धा सूर्याचे किरण तेथे जमीनीपर्यंत पोचत नसतील म्हणून असेल किंवा पूर्वीच्या काळात या निबिड अरण्यात कोणी शिरलाच तर त्यातून बाहेर पडणे त्याला अशक्य होत असेल म्हणून हे नांव पडले असावे. आल्प्सच्या जर्मनीमधील या भागातसुद्धा थोड्या कमी उंचीची कांही पर्वतशिखरे व नद्या, तलाव, सरोवरे वगैरे आहेत. अनुपम निसर्गसौंदर्याने हा भाग नटलेला आहे. त्याखेरीज इथल्या वैशिष्ट्यपूर्ण 'कुकू' घड्याळांमुळे हा भाग जगप्रसिद्ध झाला आहे.

सुमारे पांचशे वर्षांपूर्वी जर्मनीतच दुसरीकडे कोणी तरी पहिले कुकू क्लॉक बनवल्याचा इतिहास आहे. पण तीनशे वर्षांपूर्वी ब्लॅक फॉरेस्ट या भागात हा उद्योग मोठ्या प्रमाणात उदयाला आला व जोमाने फोफावला. त्या काळात तर तो कुटीरोद्योगच होता आणि कांही प्रमाणात अद्यापही तो तसाच अस्तित्वात आहे, कारण या यंत्रयुगातही इथल्या हस्तकौशल्याने बनवल्या जाणा-या नक्षीदार घड्याळांना जगभरातील बाजारपेठांमध्ये मोठी मागणी आहे. ऑस्ट्रियात गेल्यावेळी आम्ही तिथला स्वरौस्कीचा कांचेच्या स्फटिकांच्या वस्तूंचा कारखाना पाहिला होता तो एकमेवाद्वितीय होता. 'कुकू' क्लॉक बनवणारे मात्र शंभराहून अधिक कारखाने ब्लॅक फॉरेस्ट भागामध्येच आहेत. याशिवाय येथील लोकांनी देशविदेशात जाऊन तशाच प्रकारची घड्याळे बनवण्याचे कारखाने काढले आहेत. तसेच साधारण तशा प्रकारच्यासारखी दिसणारी दुसरी 'डुप्लिकेट' घड्याळे अगदी मुंबईलासुद्धा मिळतात.

'कुकू' क्लॉक हे संपूर्णपणे मेकॅनिकल घड्याळ असते. परंपरागत पद्धतीनुसार बनवलेली कुकू घड्याळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर चालतात. त्यातील यंत्रांना पुलीज जोडून त्यावरून खाली लोंबकळणारी एक दोरी सोडलेली असते. या दोरीच्या टोकाशी बांधलेले गोळ्याच्या आकाराचे वजन जमीनीकडे ओढले जाऊन हळू हळू खाली येत असतांना त्यातील चक्रे फिरवते. दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा हाताने हे वजन पुन्हा वर उचलावे लागते. पूर्वीच्या काळातील क्लॉकटॉवरमधील मोठमोठी घड्याळेसुद्धा याच तत्वावर चालत असत. ती फिरवणा-या अवजड वजनांना खालीवर करण्यासाठी उंच मीनाराचा उपयोग होत असे. घरात वापरण्यात येणा-या घड्याळांसाठी या लोंबणा-या वजनाऐवजी सुटसुटीत स्प्रिंगचा उपयोग कालांतराने सुरू झाला. दर रोज किंवा आठवड्यातून एकदा त्याला किल्ली देतांना ही स्प्रिंग फिरवावी लागत असे. लहान आकाराची शक्तीशाली बॅटरी सेल मिळायला लागल्यानंतर घड्याळांमध्ये त्यांचा उपयोग होऊ लागला आणि मेकॅनिकल घड्याळे मागे पडली. तरीसुद्धा ब्लॅक फॉरेस्ट कुकू क्लॉक्समध्ये या जुन्या प्रणालीचा आजही आवर्जून उपयोग केला जातो.

कुकू घड्याळातील कुकू पक्षी हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. कुकू ही एक गाणा-या पक्ष्यांची जात मानली तर आपली काळी कोकिळा ही तिची पोटजात म्हणता येईल. कुकू पक्षी वेगवेगळ्या रंगात आढळतात, पण ते सगळे कुहू कुहू किंवा कुकूऊऊ असा विवक्षित आवाज काढतात. या घड्याळांमध्ये दर तासाला ढण्ण ढण्ण असे ठोके पडण्याऐवजी एक कुकू पक्षी एक पाऊल पुढे येऊन जितके वाजले असतील तितके वेळा कुकू कुकू अशी शीळ घालतो. हा आवाज काढण्यासाठी दोन छोटे भाते (बेलोज) आणि वेगवेगळ्या आकारांची छिद्रे असलेल्या शिट्यांचा उपयोग करतात. तास झाला की यंत्राच्या चाकांना जोडलेल्या तरफा पक्ष्याला पुढेमागे करतात तेंव्हाच आळीपाळीने भात्यांवर दबाव आणून त्यातील हवा एका नळीमार्गे शिट्यांमधून बाहेर सोडतात. हे काम करण्यासाठी वेगळे वजन बांधलेली वेगळी दोरी एका वेगळ्या चाकाला जोडलेली असते. कांही घड्याळात कुकूच्या कूजनाशिवाय किंवा त्याऐवजी तारा किंवा पट्ट्यांमधून संगीताचे सुरेल स्वर ऐकवले जातात. त्यांना कंपने देण्यासाठी तिसरे वजन टांगलेले असते.

घड्याळ ही एक शोभा वाढवणारी वस्तू असेच पूर्वापारपासून मानले गेले असल्याने ते अनेक प्रकारे सजवले गेले आहे. ब्लॅक फॉरेस्ट घड्याळांची मुख्य चौकट तिकडच्या चांगल्या प्रतीच्या लाकडापासून बनवतांना त्यात सुबक असे कोरीव काम करतात. कलाकाराची प्रतिभा आणि त्याचे हस्तकौशल्य या दोन्ही गोष्टींना भरपूर वाव यात दिला जातो. फक्त आंतील यंत्रसामुग्रीला पुरेशी आणि सोयिस्कर जागा ठेऊन उरलेल्या सगळ्या भागात त्यांचा कलाविष्कार बहराला येतो. फुले, पाने, पक्षी, प्राणी आदि अनेक आकार यात कोरलेले दिसतात. प्रत्येक घड्याळ ही एक शिल्पकृतीच असते.

ब्लॅक फॉरेस्ट भागात अनेक जागी हे काम गेल्या दोन तीन शतकांपासून चालत आले आहे. जर्मनीमधील आमची पहिली भेट टिटसी येथील अशाच एका कुकू क्लॉक फॅक्टरीला झाली. एका अत्यंत जुन्यापुराण्या लाकडाच्या इमारतीत हा कारखाना पुरातनकालापासून चालू आहे. विजेचाच नव्हे तर वाफेच्या इंजिनाचाही शोध लागण्यापूर्वीच्या काळात उपयोगात आणली जाणारी एक पाणचक्की इथे जपून ठेवलेली आहे. या कारखान्यात परंपरागत कुकू घड्याळे तर बनवतातच, त्यांशिवाय इतर प्रकारच्या कांही शोभेच्या वस्तूही बनतात. पहिल्यांदा एका माणसाने या घड्याळांची थोडक्यात माहिती दिली आणि भिंतीवर लावलेली सुंदर घड्याळे दाखवली. त्यापाठोपाठ दुकानात ठेवलेल्या वस्तू पाहणे आणि त्यातील कांही खरेदी करणे आलेच. परंपरागत हस्तकौशल्याच्या वस्तूंबरोबर आधुनिक काळातील बॅटरीवर चालणारी पण जुन्यासारखी बाहेरून दिसणारी घड्याळेही तिथे होती. मात्र "त्यांची गॅरंटी आम्ही देत नाही" असे तेथील विक्रेत्याने सांगितले.

येथील सर्वात आश्चर्यकारक असे प्रमुख आकर्षण असलेले महाकाय घड्याळ या इमारतीच्या भिंतीवरच बाहेरच्या अंगाला बसवलेले आहे. रोज दुपारचे बारा वाजता इथे एक तांत्रिक चमत्कार पहायला मिळतो. घड्याळाचा कांटा बारावर सरकला की एक कपाट उघडते, त्यातून एक कुकू पक्षी बाहेर येऊन बारा वेळा कुकू कुकू करतो. त्यापाठोपाठ एक बाहुल्यांचे जोडपे एकमेकांना धरून बाहेर येते आणि बॉलडान्ससारखे नाचत नाचत गिरक्या घेत अर्धगोलाकृती सज्ज्यामधून फिरते आणि पुन्हा आत जाते. आजकालच्या यंत्रयुगात रिमोट कंट्रोलने बाहुल्या नाचवणे फारसे कठीण नाही. संगणकाच्या उपयोगाने त्याचे प्रोग्रॅमिंग करणेही शक्य आहे. पण घड्याळाच्या चाकांना या सगळ्या आकृत्या चाके आणि तरफांमधून जोडून त्यांना एका ठराविक क्रमाने आपल्याआप फिरवणारे यंत्र बनवणा-याच्या अचाट बुद्धीमत्तेचे कौतुक करावे तितके थोडे असे वाटते.

. . . . . . . (क्रमशः)
ःःःःःःःःःःःःःःःःःःःःः-------------------ःःःःःःःःःः--------
मुलाखतकार: "आता एक कोटी रुपयांच्या बक्षिसासाठी अखेरचा प्रश्न; यामधील कोणता पक्षी आपले घरटे बांधीत नाही? तुमचे पर्याय आहेत; कावळा, चिमणी, सुगरण आणि कुकू."उमेदवार: "अं अं अं, कोणता बरे असेल? थांबा हां, मी माझ्या मैत्रिणीला विचारते." मुलाखतकार: "विचारा ना, मी फोन लावून देतो. या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी तुमच्याकडे फक्त तीस सेकंद आहेत. तेंव्हा अवांतर गप्पा तेवढ्या मारू नका." उमेदवार: "अगं, कावळा, चिमणी, सुगरण आणि कुकू यामधील कोणता पक्षी आपले घरटे बांधीत नाही?"मैत्रिण : "कुकू. "उमेदवार: "नक्की ना ?" मैत्रिण : "हो, कुकूच. "बक्षिस मिळाल्यानंतरचा मैत्रिणींमधील संवाद असा होतो.उमेदवार: "अगं, तुझं सामान्यज्ञान खरंच महान आहे हं! त्याचा मला इतका फायदा झाला!" मैत्रिण : "कसचं कसचं! पण हे सांग, अगं कुकू पक्ष्याला घरटं बांधायची मुळी गरजच कुठे असते? तो तर कुकू क्लॉकमध्येच राहत नाही कां?" "