Sunday, December 31, 2017

वर्ष २०१७ जाता जाता

वर्ष २०१७ जाता जाता

हे वर्ष संपता संपता माझ्या मनात आलेले दोन विचार मी फेसबुकावर मांडले होते. ते एकत्र करून या पोस्टमध्ये देत आहे. गतवर्षी माझ्या जवळच्या व्यक्ती दुर्दैवाने दिवंगत झाल्या त्यांच्या आठवणीने माझ्या मनात जे चलबिचल झाले ते पहिल्या लेखात व्यक्त केले आहे. याच्या बरोबर उलट नववर्षदिनाचा जल्लोश लोकांनी करू नये अशी नकारघंटा वाजत असतांनासुध्दा लोक हा दिवस का उत्साहाने साजरा करतात याचे कारण शोधण्याचा प्रयत्न दुस-या लेखात केला आहे.
--------------------------------------------------

वियोग

नैनम् छिन्दंति शस्त्राणि नैनम् दहति पावकः। न चैनम् क्लेबयंत्यापो न शोषयति मारुतः।।
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृण्हाति नरोपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्न्यानि संयाति नवानि देही ।।
आत्मा अमर असतो, कपडे बदलल्याप्रमाणे तो शरीरे बदलत असतो वगैरे गीतेमधले तत्वज्ञान सामान्य माणसाच्या मनाची समजूत घालू शकत नाही. जी प्रिय व्यक्ति आपल्याशी बोलते, आपल्याबरोबर खेळते, हंसते किंवा रडते, आपली काळजी करते किंवा घेते, प्रेम करते किंवा रागावते, रुसते वगैरे हे सगळे ती व्यक्ती तिच्या शरीरामार्फतच करत असते आणि ते शरीर नष्ट झाल्यानंतर हे सगळे कायमचे थांबते. त्यानंतर तिचा अमर आत्मा स्वर्गात गेला, परमात्म्यात विलीन झाला, त्याने दुसरा जन्म घेतला  किंवा इतर धर्मांत सांगितल्याप्रमाणे तो जजमेंट डे किंवा कयामतची वाट पहात शांतपणे स्वस्थ बसला असला, यातले कांहीही झाले असले तरी यापुढे त्याच्याशी आपला कसलाही संपर्क राहणार नाही या विचाराने मन अस्वस्थ होतेच.

शिशिर ऋतूमध्ये झाडांची पाने पिकून गळतात आणि वसंतात त्यांना नवी पालवी फुटते हा निसर्गक्रम असतो. शास्त्रीय भाषेत सांगायचे झाल्यास पानांमधले क्लोरोफिल हे द्रव्य नष्ट होते, ती पाने हवेमधला कार्बनडायॉक्साइड वायू शोषून घेऊन हवेला प्राणवायू देणे थांबवतात, झाडाकडून अन्नपाणी घेणे आणि झाडासाठी अन्नरस तयार करणे ही दोन्ही कामे करत नाहीत. अशी निरुपयोगी झालेली पाने गळून पडतात आणि पाचोळा होतात. माणसांच्या बाबतीत कांहीसा तसाच प्रकार होतो. नट, गायक, चित्रकार, खेळाडू वगैरे मंडळी त्यांच्या बहराच्या काळात जगाला खूप आनंद देतात, पण तो बहराचा काळ ओसरल्यानंतर ते प्रकाशाच्या झोतात रहात नाहीत, वर्षानुवर्षे कुणालाही त्यांची माहिती नसते. कधी तरी त्यांच्या निधनाची बातमी येते तेंव्हा त्यांचे चाहते क्षणभर हळहळतात, पण खरे तर त्या गुणी लोकांचे जीवंत असणे किंवा नसणे याला तोंपर्यंत इतरांच्या दृष्टीने फारसा अर्थ उरलेला नसतो.  गेल्या वर्षात अशी किती प्रसिध्द माणसे या जगाचा निरोप घेऊन देवाघरी गेली याच्या याद्या पुढल्या एक दोन दिवसात वर्तमानपत्रांमध्ये येत राहतील.

नोकरीमध्ये माझ्या आयुष्यात आलेले कित्येक लोक पंधरा वीस किंवा त्याहून अधिक वर्षांपूर्वी नोकरी सोडून गेले किंवा सेवानिवृत्त झाले आणि माझ्या संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेले. त्यानंतर ते कुठे आणि कसे रहात होते की अनंतात विलीन होऊन गेले होते याची मला काहीच माहिती मिळत नव्हती.  अशातला एकादा दिवंगत झाल्याची बातमी येते आणि झर्रकन त्याच्या संबंधातल्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर येऊन जातात एवढेच होते. काही लोकांची प्रत्यक्षात भेट होत नसली तरी सोशल मीडियावर अधून मधून गाठ पडत असते आणि काही लोक अचानकपणे भेटतसुध्दा असतात. त्यांच्या सोडून जाण्याने मनाला चटका लागतो. या दोन्ही प्रकारचे तीन चार मित्र गेल्या वर्षभरात दिवंगत झाले. अशा बातम्यांमुळे दुःख होतेच, पण त्यातले जे आपल्यापेक्षा वयाने लहान असतात त्यांच्या जाण्यामुळे धक्कासुध्दा बसतो.

नातेवाईक कधी नात्यामधून रिटायर होत नाहीत. ते परगावी किंवा परदेशीसुध्दा गेले तरी संपर्कात असतात. त्यांच्याशी किती जवळचे व्यक्तीगत संबंध जुळतात आणि जुळून राहतात ते एकमेकांच्या वागण्याप्रमाणे ठरते. त्यामुळे त्यानुसार कमी जास्त तीव्रतेचे दुःख होते. त्यांचा कायमचा वियोग सहन करणे बरेच कठीण असते.

नोकरीमध्ये चांगली प्रमोशन्स मिळत गेली, व्यवसायात चांगला जम बसला, मुले मार्गाला लागली, घरात सुना, जावई, नातवंडे वगैरे आली म्हणजे माणसाच्या जीवनाची इतिकर्तव्यता संपली. अशी पिकली पाने हे जग सोडून गेली तर त्यांचे सोने झाले असे पूर्वीच्या काळात म्हणत असत. पण अशी वडीलधारी माणसे आपल्याला हवीच असतात. माझ्या दोन मोठ्या वहिनी आणि एक आत्तेबहीण यांच्याशी काही महिन्यांपूर्वीच भेट झाली होती, त्यांच्याशी प्रत्यक्षात आणि फोनवर बोलणे आणि हास्यविनोद झाला होता तेंव्हा त्यांनी अंथरूण धरलेले नव्हते. असे असतांना अचानक त्यांच्या निवर्तनाच्या मनाला सुन्न करणा-या वार्ता येत गेल्या. पुढच्या पिढीतल्या कुटुंबांचा संसार अजून पूर्ण झालेला नसतो, त्यांच्या किती तरी आशाआकांक्षा आणि योजना अर्धवट राहिलेल्या असतात. अशा वेळी त्यांच्या संसाररथाचे एक चाक निखळून पडले तर त्यामुळे होणा-या वेदना सोसवत नाहीत. माझ्या पुतणीच्या जीवनात अशी एक दुर्दैवी घटना काल घडली. आमच्या त्या सुस्वभावी जावयाला वैकुंठधामात पोचवायला जावे लागले.

वर्षभरात घडलेल्या चांगल्या घटनांचा आढावा घेणारे दहा पोस्ट्स मी गेल्या दहा बारा दिवसात बाय बाय २०१७ या शीर्षकाखाली टाकले होते, पण मनातून इच्छा नसली तरी अखेर गेल्या वर्षानेच दिलेल्या या चटक्यांचा उल्लेख करून डोळ्यांमधले आंसू पुसती ओठावरले गाणे असे म्हणत त्याला निरोप द्यावा लागत आहे. 
----------------------------------------------------------------------------------

नकारघंटा 

वॉट्सअॅप आणि फेसबुकवर रोज ज्ञानगंगेच्या अनंत धारा धो धो वहात असतात, "मार्केट में नया है" असे सांगून विनोदांच्या शिळ्याच कढीला पुनःपुनः ऊत आणला जात असतो, चमत्कृतिपूर्ण किंवा अविश्वसनीय कामे करणारी नवनवी यंत्रे, अफलातून आकारांच्या इमारती आणि निसर्ग सौंदर्याची किंवा सुंदरींची आकर्षक चित्रे आणि चलचित्रे दाखवली जात असतात, अधून मधून सुरेल गायन वादनसुध्दा ऐकायला आणि पहायला मिळते. पण संगीतामधल्या कुठल्याही वाद्यापेक्षा जास्त वेळा सोशल मीडियावर वाजवले जाणारे एक वाद्य आहे ते म्हणजे नकारघंटा.

नकारघंटा वाजवणा-यांचे अनेक प्रकार आहेत. पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा उपदेश देणारे पोस्ट फटाके नकोत, गोंगाट नको, प्लॅस्टिक नको, थर्मोकोल नको, पाणी वाया घालवू नका, अमूक करू नका, तमूक करू नका वगैरे नकार सांगत असतात. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र वगैरेंच्या काळात या नकारघंटा सतत घणघणत राहतात. त्या प्रचाराच्या तसेच कुठल्याही आधुनिक, पुरोगामी विचारांच्या नांवाने सतत शंखनाद केला जातोच, पण हॅपी या शब्दालाच संस्कृतिसंरक्षणाच्या ऐसपैस छत्रछायेत सरसकट नकारघंटा वाजवली जाते. त्यांच्या दृष्टीने हॅपी बर्थडे, हॅपी दिवाली, हॅपी होली वगैरे म्हणणे म्हणजे शांतम् पापम्. मेरी ख्रिसमस आणि हॅपी न्यू ईयर म्हणणारा तर पुरता धर्मभ्रष्टच नव्हे तर चक्क देशद्रोही असल्यासारखे दाखवले जाते. यामधले मूळ विचार बरोबरच आहेत, पर्यावरण आणि संस्कृति यांचे महत्व आहेच. माझ्या व्यक्तीगत जीवनात मी सुध्दा  माझ्या लहानपणापासून त्यांना सुसंगत असेच वागायचा प्रयत्न करत असतो.

काही लेखांमध्ये जरा विनोदी उपाय सांगितले जातात. केकच्या ऐवजी उकडीचे मोदक खा, व्हिस्कीऐवजी कडुलिंबाचा काढा किंवा गोमूत्र प्या, सांताच्या गोंड्याच्या टोपीऐवजी केशरी पटका बांधा वगैरे वगैरे.  पण त्यांची तरी काय गरज आहे ?  मुळात कोण या पोस्टा तयार करतात कोण जाणे, पण आला संदेश की त्याला ढकल पुढे असे करणारे असंख्य पोस्टमन मात्र तयार झाले आहेत. अशा एकाद्या पोस्टमनला त्याबद्दल विचारलेच तर  "मी फॉरवर्डेड अॅज रिसीव्ह्ड असे लिहिले आहे ना !" असे म्हणून बगला झटकतो. जसे काही  "आम्ही पालखीचे भोई , आम्ही पालखीचे भोई , पालखीत कोण आम्ही पुसायाचे नाही।" हे त्याचे ब्रीदवाक्य असावे. आज ज्या प्रमाणात साक्षरतेचा आणि मोबाइल फोन्सचा प्रसार झाला आहे ते पाहता हे सगळे संदेश प्रत्येक माणसाकडे नसले तरी बहुतेक सर्व कुटुंबांपर्यंत नक्कीच पोचतात. पण त्यांचा किती परिणाम होतो हा संशोधनाचा विषय आहे. 

"आपले लोक म्हणजे ना, गाढवं आहेत. त्यांच्यापुढे कितीही गीता वाचा, त्यांना ढिम्म होत नाही." असे म्हणणा-यांची मला मजा वाटते. यांना इतके समजते तर ते कशाला गीता वाचायला जातात ? या बाबतीत पहायचे झाले तर गाढव आणि माणूस यांच्यातला फरक ते नीट समजून घेत नसावेत. कुणी तरी गाढवांना कधी हंसतांना, गातांना, नाचतांना  पाहिले आहे कां ? ती नेहमी एकाद्या स्थितप्रज्ञ योग्याप्रमाणे (ही उपमा स्व.पुलंची आहे) शांत असतात, पण माणसांना मात्र आनंदाने गावे, ओरडावे, नाचावे, उड्या माराव्यात असे मनातून वाटते. त्यांना देवाने किंवा निसर्गाने हे एक प्रकारचे वरदान दिले आहे. गणेशोत्सव, गरबा, लग्नाची वरात, वाढदिवस किंवा नववर्षदिन ही फक्त निमित्ये असतात. त्यात भाग घेणा-या माणसांना आनंदाने धुंद होण्याची हौस असते हे मुख्य कारण आहे आणि ती हौस या ना त्या स्वरूपात व्यक्त होतेच.  धनाढ्य लोक एअरकंडीशन्ड डिस्कोमध्ये नाचतील तर गरीब आदिवासी रानातल्या त्यांच्या पाड्यामध्ये, कुणी भाविक टाळमृदुंगाच्या तालावर नाचत भजन करतील तर कुणी ऑर्गनच्या सुरात कॅरोल्स गातील, या सगळ्यांच्या मागे मानवी स्वभावातली ऊर्मी असते.

त्यामुळे कोणीही आणि कितीही शंखध्वनि किंवा घंटानाद केला तरी निरनिराळे उत्सव हे उत्साहात साजरे होत जाणारच. दर वर्षीप्रमाणेच या वर्षीही ख्रिसमस साजरा होऊन गेला आणि आता नववर्षदिनाच्या पार्ट्यांचा जल्लोश आणि धिंगाणासुध्दा होईल.  आणि मला वाटते की सगळे जग जेंव्हा उल्हासाने भारलेले असेल तेंव्हा आपण तरी काय म्हणून आंबट चेहरा करून काळोखात बसा ?



Wednesday, December 27, 2017

वर्ष २०१७ला निरोप (उत्तरार्ध)

संपायला आलेल्या इसवी सन २०१७ मध्ये माझ्याकडून काय काय घडले यातला कांही भाग मी यालेखाच्या पूर्वार्धात दिला होता. आणखी कांही आठवणी या भागात. ...

बाय बाय २०१७ (भाग ६) ....... दंतकथा

वयोमानानुसार माझे दांत एक एक करून मला सोडून जात होते आणि त्यांच्या जागी पार्शल डेंचर, ब्रिज वगैरे लावून माझे काम चालले होते. २०१७च्या सुरुवातीलाच शेवटचा पूलही कोसळला आणि माझ्या वरच्या दांतांची पंक्ति एकदंत झाली. आता कांहीही चावून खाणेच अशक्य होऊन गेले. दंतवैद्याकडे गेल्यावर त्याने सांगितले की आता वरच्या बाजूला संपूर्ण कवळी बसवणे हाच एक उपाय आहे. पण तिथे नवी पलटण आणून बसवण्यासाठी उरलेल्या एकांड्या खंबीर शिलेदाराला मात्र मलाच जबरदस्तीने रजा द्यावी लागली. पडलेल्या पुलांच्या आणि तुटलेल्या दांतांच्या खाली त्यांची मुळे हिरड्यांमध्ये रुतलेली होती. त्यांना खोदून बाहेर काढणे म्हणजे एक शस्त्रक्रियाच होती. ती केल्यानंतर हिरड्यांना झालेल्या जखमा भरून निघण्यासाठी आणि आलेली सूज उतरण्यासाठी दोन महिने थांबावे लागले. दांत काढल्यामुळे रिकाम्या जागेत आतल्या बाजूला गेलेला वरचा ओठ फारच विचित्र दिसत होता. त्याला  झाकण्यासाठी तिथे काही दिवस मर्दोंकी खेती (इति राजेश खन्ना) केली. यामुळे ते छायाचित्रही या दंतकथेचाच भाग आहे.
-----------------------------------------------------------------

बाय बाय २०१७ (भाग ७)

माझ्या लहानपणी आमच्या घरात आणि गांवातसुध्दा खूप धार्मिक वातावरण होते. आईवडील किंवा आणखी कोणा मोठ्यांचे बोट धरून मी नेहमीच कुठल्या ना कुठल्या देवळात जात होतो. कांही देवळांमध्ये शंभर माणसेसुध्दा दाटीवाटीने बसू शकतील असे प्रशस्त सभामंटप होते. तिथे निरनिराळे उत्सव साजरे होत असत. टाळमृदुंगांच्या तालावर एका सुरात गायिलेली भजने ऐकायला मजा येत असे, तसेच काही ह.भ.प.कीर्तनकारबुवा पुराणातल्या सुरस आणि अद्भुत कथा त्यांच्या रसाळ वाणीमधून छान रंगवून सांगत असत. अशा कार्यक्रमांना लहान मुलेसुध्दा उत्साहाने येऊन बसत. गांवापासून जवळच असलेल्या कल्हळ्ळीच्या व्यंकटेशाच्या जागृत देवस्थानावर गांवातल्या लोकांची अपार श्रध्दा होती. तिथे आणि आणखीही कांही ठिकाणी दरवर्षी उत्सवाबरोबर जत्रा भरायच्या.  त्यांची तर आम्ही मुले वर्षभर आतुरतेने वाट पहात असू. देवळात जाऊन देवदर्शन घेणे हा त्या काळात आमच्या दैनंदिन जीवनाचा भाग होता.

माझे वडील दरवर्षी नेमाने पंढरपूरची वारी करायचे. त्याशिवाय कोल्हापूर, तुळजापूर, नरसोबाची वाडी वगैरे दक्षिण महाराष्ट्रातल्या देवस्थांनांचे उल्लेख मोठ्या लोकांच्या बोलण्यात नेहमी यायचे. या सर्वांबद्दल माझ्या मनात खूप कुतूहल निर्माण झाले होते. पुढे संधी मिळेल तेंव्हा मी सुध्दा त्या देवस्थानांचे दर्शन घेतले. घरातली मोठी माणसे काशीस जावे नित्य वदावे असे म्हणायची पण त्या काळात ते फारच कठीण होते. मला मात्र पुढील आयुष्यात काशी आणि रामेश्वर या दोन्हींचे दर्शन घडले. पर्यटन आणि ऑफीसचे काम या निमित्याने मी देशभर खूप भटकंती केली. त्यात मी ज्या ज्या भागात गेलो तिथली प्रेक्षणीय स्थळे पाहिली तसेच तिथल्या प्रसिध्द देवस्थानांचे दर्शनही घेतले. अशा प्रकारे मी बराच पुण्यसंचय केला असला तरी निखळ भक्तिभावाने मुद्दाम ठरवून अशी कुठली तीर्थयात्रा केली नाही. मला तशी आंतरिक ओढही कधी लागली नाही. नोकरीच्या काळात माझे घराच्या आजूबाजूच्या देवळांमध्ये जाणेसुध्दा कमीच झाले होते.

२०१७ मध्ये मी इथल्या ज्येष्ठ नागरिकांच्या सहवासात यायला लागलो. ती सगळी मंडळी जात्याच आणि संस्काराने भाविक प्रवृत्तीची आहेत. पूजापाठ, उपासतापास करणारी आहेत. महाशिवरात्र, एकादशी, नवरात्र यासारख्या विशेष दिवशी या वर्षी मीही त्यांच्याबरोबर इथल्या निरनिराळ्या मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेतले. कॉलनीमधल्या गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक आरतीच्या वेळी हजर राहून आरत्या म्हंटल्या. गणपतिअथर्वशीर्षाची पारायणे केली. लहानपणी पाठ झालेल्या आरत्या, मंत्र आणि स्तोत्रे अजूनही आठवतात याचे माझे मलाच थोडेसे कौतुक वाटले.
------------------------------------------------------------------------------------

बाय बाय २०१७ (भाग ८)

आमच्या शाळेच्या आवारात घसरगुंडी, झोपाळे, सीसॉ, उभ्या आडव्या शिड्या वगैरे साधने होती आणि लहानपणी आम्ही त्यावर मनसोक्त खेळत होतो. मी मुंबईला आलो त्या काळात चर्चगेट स्टेशनच्या जवळ आझाद मैदानात दरवर्षी कसले ना कसले प्रदर्शन लागत असे आणि त्याचाच एक भाग म्हणून जायंट व्हील, मेरी गो राऊंड वगैरे मुलांना खेळण्याची साधने ठेवलेली असत आणि तिकडेच अधिक गर्दी होत असे. त्यासाठी माफक शुल्क असे आणि मुलांबरोबर मोठी माणसेही त्यात बसायची हौस भागवून घेत असत. पुढे अशी प्रदर्शने शहराच्या इतर अनेक भागांमध्ये भरायला लागली.

झी टीव्हीचे श्री.सुभाषचंद्र यांनी एस्सेलवर्ल्ड तयार केले आणि "एस्सेलवर्ल्ड में रहूँगा मै, घर नही जाऊँगा मै।" या त्याच्या जाहिरातीने देशभरातल्या मुलांवर जादू केली. एस्सेलवर्ल्डला भेट देणे हा जिवाची मुंबई करण्याचा महत्वाचा भाग होऊन बसला. आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांना घेऊन आम्हीही एस्सेलवर्ल्डला गेलो आणि तिथली अजस्त्र यंत्रे पाहून थक्क झालो. असले जंगी रोलरकोस्टर आणि झुलते पाळणे मी यापूर्वी फक्त सिनेमातच पाहिले होते आणि ते फॉरेनमध्ये असतात असे ऐकले होते. एस्सेलवर्ल्डची प्रवेश फीच चांगली घसघशीत असली तरी एक वेगळा अनुभव घ्यायला मिळाल्यामुळे पैसे वसूल झाले. पुढे तीन चार दिवस दुखत असलेल्या अंगाने वाढलेल्या वयाची आठवण मात्र करून दिली. 

आमच्या युरोपदर्शनाच्या पर्यटनात एक संपूर्ण दिवस पॅरिसच्या जवळ डिस्नेलँडसाठी होता. आमच्या पाठीचे मणके आणि गरगरणारा मेंदू यांचा विचार करून आम्ही जास्त भयानक राइड्स टाळल्या, पण तरीसुध्दा तिथल्या अद्भुत जगात स्वतःला विसरायला लावणा-या अनेक गोष्टी होत्या. त्यालाही दहा वर्षे होऊन गेली. २०१७ मध्ये माझ्या दोन्ही मुलांनी मिळून सहकुटुंब इमॅजिकाला भेट द्यायचे ठरवले. पुण्याहून निघाल्यानंतर अडीच तीन तास प्रवास करून खोपोलीजवळ असलेल्या त्या अजब मौजउद्यानापर्यंत (अॅम्यूजमेंट पार्क) पोचल्यावर तिथे पाहतो तो गेटच्या बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. आणखी तासभर उन्हात उभे राहून तपश्चर्या केल्यावर आत प्रवेश मिळाला. पण आत मात्र जिकडेतिकडे आनंदीआनंदच पसरला होता. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या पार्कमध्ये अनेक गंमती होत्या आणि त्या सगळ्या व्यवस्थितपणे चालत होत्या. रात्री केलेली रोषणाई तर डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.  आम्ही केलेल्या तपश्चर्येचे सार्थक झाले.
--------------------------------------------------------------------------------------

बाय बाय २०१७ (भाग ९)


जगप्रसिध्द ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे आयुका (Inter-University Centre for Astronomy and Astrophysics) या संस्थेची स्थापना झाली असल्याचे मला पहिल्यापासून माहीत होते, पण एनसीआरए (National Centre for Radio Astrophysics) हे नांव मी दोन वर्षांपूर्वीच ऐकले. या दोन्ही संस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवाराच्या मागच्या बाजूला खडकी औंध रस्त्यावर आहेत. भारतातील अनेक विश्वविद्यालयातील विद्यार्थी आणि संशोधक आयुकामध्ये खगोलशास्त्र आणि अवकाशविज्ञानाचा अभ्यास आणि त्यावर संशोधन करत आहेत.  एनसीआरए ही संस्था मुख्यतः नारायणगांवजवळील खोदाड येथे स्थापन केलेल्या विशालकाय दुर्बिणीचे (Giant Metrewave Radio Telescope) काम पाहते.
ही अशा प्रकारची जगातील सर्वात मोठी दुर्बिण आहे आणि जगभरातले संशोधक इथे येऊन प्रयोग आणि निरीक्षणे करतात. या खास प्रकारच्या दुर्बिणीमध्ये परंपरागत दुर्बिणीसारख्या लांब नळकांड्या आणि कांचेची भिंगे नाहीत. ४५ मीटर एवढा प्रचंड व्यास असलेल्या ३० अगडबंब अँटेना मिळून ही दुर्बिण होते. या अँटेनासुध्दा १०-१२ वर्गकिलोमीटर्स एवढ्या विस्तृत भागात एकमेकीपासून दूर उभ्या करून ठेवलेल्या आहेत. यातली प्रत्येक अँटेना एका गोल आकाराच्या इमारतीच्या माथ्यावर मोठ्या यंत्रांना जोडून उभारल्या आहेत. आकाशातील विशिष्ट ग्रह किंवा तारे यांचे निरीक्षण करण्यासाठी यातली प्रत्येक अँटेना त्यावर फोकस करून त्याच्यावर नजर खिळवून ठेवावी लागते. यासाठी तिला जोडलेल्या यंत्रांमधून ती अत्यंत मंद गतीने सतत फिरवत रहावे लागते.
हे वैशिष्ट्यपूर्ण केंद्र पहायची मला खूप उत्सुकता होती, पण त्यासाठी आधी सरकारी परवानग्या घ्याव्या लागतात आणि वाहनाची व्यवस्था करायला हवी. हे कसे साध्य करावे याचा मला प्रश्न पडला होता. पण ११-१२ सप्टेंबरला मला अचानक एका मित्राचा फोन आला आणि मी एनसीआरएमधल्या इंजिनिअरांना एकादे व्याख्यान देऊ शकेन का असे त्याने विचारले. मी गंमतीत उत्तर दिले, "मी तर नेहमीच तयारीत असतो, पण माझे भाषण ऐकणाराच कुणी मिळत नाही." मला ही अनपेक्षित संधी मिळत असल्याने अर्थातच मी लगेच माझा होकार दिला.

१७ सप्टेंबर २०१७ ला खोदाडला जीएमआरटीमध्ये या वर्षीचा इंजिनियरदिन साजरा केला गेला. त्यात मुख्य पाहुणे आणि व्याख्याता म्हणून मला पाचारण करण्यात आले आणि अर्थातच जाण्यायेण्याची सोय आणि पाहुण्याला साजेशी बडदास्त ठेवली गेली. निवृत्त होऊन १२ वर्षे झाल्यानंतर मला अशा संधी क्वचितच मिळतात, ती या वर्षी मिळाली,  अनेक तरुण इंजिनियरांना भेटायला मिळाले आणि मुख्य म्हणजे जीएमआरटीमधली जगातली सर्वात मोठी रेडिओदुर्बिण विनासायास अगदी जवळून आणि आतून बाहेरून पहायला मिळाली.

-------------------------------------------------------

बाय बाय २०१७ (भाग १०)

मला समजायला लागल्यापासून आजपर्यंत माझा दिवसभरातला जास्तीत जास्त वेळ कशात जात असेल तर तो वाचन आणि लेखन यात जातो, आधी अभ्यास, मग ऑफिसमधले काम आणि सेवानिवृत्तीनंतर अवांतर, म्हणजे बोलाच्याच चुलीवर बोलाचाच तवा ठेऊन त्यावर लश्करच्या भाकरी भाजणे!
"तू हा उपद्व्याप कशाला करतोस?" असे मला कांही लोक विचारतात.
मी त्यांना सांगतो, "कारण मला इतर कांही गोष्टी करायला आवडतात, पण त्या जमत नाहीत आणि कांही गोष्टी जमतात, पण त्यात माझे मन रमत नाही. वाचन आणि लेखन मला खूप आवडते आणि थोडे फार जमते, म्हणजे कांही लोक मला तसे सांगतात."
त्यामुळे मी रिटायर झाल्यानंतर अवांतर वाचन आणि लेखन यात आपला बराचसा फावला वेळ घालवायला लागलो. आनंदघन या नावाची अनुदिनी (ब्लॉग) सुरू करून दिली, आणखी कांही खाती उघडली आणि त्यावर चार चार शब्द टाकत राहिलो. सात आठ वर्षांनंतर त्या कामाचा वेग मंद होत गेला होता. याला इतर कांही तांत्रिक, शारीरिक, मानसिक वगैरे कारणे होती, तसेच ईमेल्स, फेसबुक, वॉट्सअॅप वगैरेंच्या आगमनामुळेही ब्लॉगिंगवर परिणाम झाला होता.
या वर्षी म्हणजे २०१७मध्ये ईमेल्स, फेसबुक, वॉट्सअॅप वगैरेंचा व्याप तर वाढतच होता, पण फेसबुक आणि वॉट्सअॅप यावरील पोस्ट्स क्षणभंगुर असतात आणि आता ईमेलग्रुप्स कालबाह्य होऊ लागले आहेत. हे पाहता मी पुन्हा ब्लॉगिंगकडे जरासे जास्त लक्ष देऊ लागलो. या ठिकाणी लिहिलेले लेख बराच काळ तिथेच राहतात आणि वाचकांना कालांतरानेसुध्दा ते पाहता येतात. माझे लिहिणे कमी झाल्यानंतरसुध्दा वाचकांच्या टिचक्यांची संख्या वाढतच गेली यावरून असे दिसते. त्यांच्या सोयीसाठी मी अनुक्रणिका तयार करून त्यांच्या लिंक्स मुख्य पानावर टाकायचे काम केले.
त्याशिवाय या वर्षी मला शिक्षणविवेक या नियतकालिकाच्या वेबव्हर्जनवर लिहायची संधी मिळाली आणि मी शास्त्रीय शोध व संशोधक यांच्यावर एक लेखमालिका सुरू केली. या वर्षी मराठी विश्वकोशासाठी लेख लिहायची संधीसुध्दा मला मिळाली आणि मी तयार करून पाठवलेले पहिले दोन लेख (त्यांच्या परिभाषेत नोंदी) आता तज्ज्ञांकडे परिक्षणासाठी दिले गेले आहेत. अशा प्रकारे २०१७ मध्ये मी लेखनाच्या बाबतीत एक दोन लहानशी पावले पुढे टाकली.


Tuesday, December 26, 2017

वर्ष २०१७ ला निरोप ... (पूर्वार्ध)

हे वर्ष २०१७ संपायला आता चारपांचच दिवस उरले आहेत. ते सुध्दा हां हां म्हणता निघून जातील आणि आपण नव्या वर्षाचे स्वागत करू. अनेक लोक आताच त्या तयारीला लागले आहेत. त्यासाठी हॉटेल्स, रिसॉर्ट्स वगैरेंमध्ये बुकिंग करून ठेवले आहे, रेल्वे, बस, विमान वगैरेंची रिशर्वेशन करून ठेवली आहेत. कांही लोक घरीच पार्टी करायची तयारी करत आहेत. पण नव्या वर्षाचे स्वागत करायच्या आधी आपण थोडे मागे वळून गतवर्षाकडे पहातो. तसाच एक प्रयत्न मी या लेखात केला आहे. गेल्या वर्षात मी काय काय केले, त्यात कोणती गोष्ट नवीन किंवा वेगळी होती हे आठवून पाहिले आहे.  पण या संदर्भात कांही अगदी जुन्या आठवणीही जाग्या झाल्या. या लेखाला १० लहान लहान तुकड्यांच्या रूपात मी गेले १०-१२ दिवस फेसबुकावर टाकून  माझ्या मित्रांकडून त्यावर येणा-या प्रतिक्रिया पहात आहे. हा एक वेगळा प्रयोग मी गेल्या वर्षाच्या अखेरीला करून पहात आहे.

बाय बाय २०१७ ..... (भाग १) प्रास्ताविक

"जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका, सावध! ऎका पुढल्या हाका"
ही कवि केशवसुतांनी फुंकलेली तुतारीसुध्दा शंभर वर्षांहून जास्त जुनी होऊन गेली तरी अजून अभंग आहे. "इतिहासाचे ओझे खांद्यावरून फेकून द्या, त्याची पाने फाडून आणि जाळून टाका" अशी जळजळीत वक्तव्ये अनेकदा कानावर पडतात आणि त्या क्षणी ती बरोबर वाटतात. पण नवे पान उलटले तरी पूर्वीची काही पाने मनाच्या कोप-यात कुठे तरी लपून बसतात. त्यांच्यावर ढीगभर धूळ बसून ती दिसेनाशी झाली तरी अचानक त्यातल्या एकाद्या पानावरची धूळ पुसली जाते आणि आधी लिहिलेले लख्ख दिसायला लागते. इतकेच नव्हे तर त्यांच्या आधाराने नव्या पानांवर नव्या नोंदी लिहिणे सुरू होते असे काही अनुभव मला या वर्षात आले. पन्नास पंचावन्न वर्षे संपर्कात नसलेले कांही मित्र अचानक सापडले तर कांहींना मी शोधून काढले आणि पुन्हा त्यांच्याशी अरे तुरेच्या भाषेत बोलणे सुरू झाले. ज्या लोकांनी मला माझ्या लहानपणापासून पाहिले आहे अशी मला एकेरीत संबोधणारी  माझ्या संपर्कात असलेली माणसे आता तशी कमीच राहिली आहेत. खूप वर्षांनंतर तसे बोलणारी आणखी कांही माणसे पुन्हा भेटली तर त्यातून मिळणारा आनंद औरच असतो.
-----------------

बाय बाय २०१७ ..... (भाग २) जुने मित्र

कदाचित स्व.जगजीतसिंगांच्या समृध्द पंजाबमध्ये पूर्वीपासून सुबत्ता नांदत असेल, पण दुष्काळी भागातल्या आमच्या लहान गांवात घरोघरी मातीच्या चुली, शेणाने सारवलेल्या जमीनी आणि उंदीरघुशींनी पोखरलेल्या कच्च्या भिंती होत्या आणि त्यात अगदी पिण्याच्या पाण्यापासून अनेक गोष्टींचा खडखडाट असायचा. शहरामधल्या सुखसोयींमध्ये लाडात वाढलेल्या मुलांच्या इतके 'रम्य ते बालपण' आम्हाला तेंव्हा तरी तसे वाटत नव्हते. त्यामुळे परिस्थितीशी झगडून जरा चांगले दिवस आल्यानंतर ते लहानपण परत मिळावे म्हणून "ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो" असे म्हणावेसे वाटले नसेल पण "वो कागज की कश्ती वो बारिश का पानी" यांची ओढ मात्र वाटायची.

माझ्या लहानपणी मित्रांना "अंत्या, पम्या, वाश्या, दिल्प्या" अशा नावांने किंवा "ढब्ब्या, गिड्ड्या, काळ्या, बाळ्या" अशा टोपणनावानेच हांक मारायची पध्दत होती. माझ्या वर्गात वीस पंचवीस मुलं होती. तशा दहापंधरा मुली पण होत्या पण त्यांच्याशी बोलायलासुध्दा बंदी होती. आठदहा मुलांचे आमचे टोळके रोज संध्याकाळी ग्राउंडवर खेळायला आणि मारुतीच्या देवळासमोरच्या कट्ट्यावर बसून टाइमपास करायला जमायचे. शाळेतले शिक्षण झाल्यावर त्यातले फक्त तीन चारजण कॉलेजला जाऊ शकले होते.  इतर मुलांची नोकरीचाकरी शोधण्यासाठी कुठल्या ना कुठल्या शहरातल्या काकामामाकडे रवानगी झाली. फक्त एक सु-या फाटक तेवढा माझ्याच कॉलेजात आला होता, पण त्यानेही वर्षभरानंतर कॉलेज सोडले. दोन तीन वर्षांनंतर माझे गावी जाणे सुध्दा बंद झाले. त्या काळात संपर्काची कसलीही साधनेच नसल्याने शाळेतले सगळे मित्र जगाच्या गर्दीत हरवून गेले. क्वचित कधीतरी त्यातला एकादा योगायोगाने अचानक कुठेतरी भेटायचा, पण तास दोन तास गप्पाटप्पा झाल्यानंतर आम्ही दोघेही पुन्हा आपापल्या मार्गाने चालले जात होतो. त्या काळात  मोबाईल तर नव्हतेच, आमच्यातल्या कोणाकडे ट्रिंग ट्रिंग करणारे साधे फोनसुध्दा नव्हते. त्यामुळे मनात इच्छा झाली तरी एकमेकांशी बोलणार कसे? इंटरनेट आणि फेसबुक आल्यानंतर मी जुन्या मित्रांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना बहुधा त्या गोष्टींची आवड नसावी. त्यामुळे मला कोणीच सापडला नाही.



माझ्या पुण्यातल्या शरद या एका कॉलेजमित्राशी २०१७ मध्ये माझी नव्याने ओळख झाली आणि त्याच्याशी बोलता बोलता माझा एक गांववाला मित्र दिलीप त्याच्याही ओळखीचा निघाला. त्या सुताला धरून मी दिलीपला फोनवर गाठले आणि आता वाहनांचीसुध्दा सोय झालेली असल्यामुळे आम्ही दोघे सरळ त्याच्या घरी जाऊन धडकलो. त्या अकल्पित भेटीतून दोघांनाही झालेला आनंद शब्दात सांगता येण्यासारखा नव्हता.
-------------------------------------------------------------

बाय बाय २०१७ ..... (भाग ३) जुने मित्र


दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट। एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गांठ।
क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसांचा । पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ।।

कविवर्य ग दि माडगूळकरांनी अशा शब्दांमध्ये जीवनाचे एक चिरंतन अर्धसत्य सांगितले आहे. माणसाच्या जन्मापासून अखेरीपर्यंत शेकडो लोक त्याच्या जीवनात येतात आणि दूर जातात हे खरे असले तरी आप्तस्वकीयांना जोडण्याचे, त्यांना स्नेहबंधनात बांधून ठेवण्याचे त्याचे प्रयत्न चाललेले असतात आणि कांही प्रमाणात ते यशस्वी होत असतात म्हणूनच कुटुंब आणि समाज या व्यवस्था हजारो वर्षांपासून टिकून राहिल्या आहेत हे ही खरे आहे.  प्रभु रामचंद्रांनी ज्या भरताला उद्देशून हा उपदेश केला होता, त्याच्याशीसुध्दा चौदा वर्षांनी पुनः भेट होणार होतीच. आपल्या जीवनात आलेली काही माणसे काही काळासाठी दूर जातात आणि पुनः जवळ येतात असे होतच असते. काही माणसे मात्र नजरेच्या इतक्या पलीकडे गेलेली असतात आणि आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास ती संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेलेली असतात की ती पुनः कधी नजरेला पडतीलच याची शाश्वति वाटत नाही. टेलीफोन, इंटरनेट आदि संपर्कमाध्यमांमुळे आज जग लहान झाले आहे आणि एका लाटेने तोडलेल्या ओंडक्यांची पुन्हा पुन्हा गांठ पडण्याच्या शक्यता थोड्या वाढल्या आहेत.


कृष्णा कामत हा माझा इंजिनियरिंग कॉलेजमधला मित्र वयाने, उंचीने आणि अंगलटीने साधारणपणे माझ्याएवढाच होता किंवा मी त्याच्याएवढा होतो. माझे बालपण लहानशा गांवातल्या मोठ्या वाड्यात तर त्याचे महानगरातल्या चाळीतल्या दोन खोल्यांमध्ये गेले असले तरीसुध्दा आमचे संस्कार, विचार, आवडीनिवडी यांत अनेक साम्यस्थळे होती. त्यामुळे आमचे चांगले सूत जमत होते. तो सुध्दा माझ्यासारखाच अणुशक्तीखात्यात नोकरीला लागला, पण त्याचे ऑफिस ट्राँबेला तर माझे कुलाब्याला होते आणि मी रहायला चेंबूर देवनारला तर तो भायखळ्याला होता. आम्ही दोघेही रोज विरुध्द दिशांनी मुंबईच्या आरपार प्रवास करत होतो आणि आराम तसेच इतर कामात रविवार निघून जात असे. पण मला कधी बीएआरसीमध्ये काम असले तर ते करून झाल्यावर मी तिथे काम करणा-या इतर मित्रांना भेटून येत असे. त्यात कामतचा पहिला नंबर लावत असे.

कामतने ती नोकरी सोडून व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तो बंगलोरला गेला. पण त्याने आपला ठावठिकाणा कुणालाच कळवला नाही. त्याच्याशी संपर्क राहिला नव्हता. मी दहा बारा वर्षांनंतर मुंबईतल्याच एका कमी गर्दीच्या रस्त्यावरून चालत असतांना अचानक तो समोरून येतांना दिसला, पण त्याच्या शरीराचा एक आवश्यक भाग असलेला असा तो सोडावॉटर बॉटलच्या कांचेसारखा जाड भिंगांचा चष्मा त्याने लावला नव्हता. हे कसे शक्य आहे असा विचार करत मी त्याच्याकडे पहात असतांना तोच माझ्या पुढ्यात येऊन उभा राहिला. माझ्या प्रश्नार्थक मुद्रेला त्याने उत्तर दिले, "अरे, काय पाहतोय्स? माझे कॅटरॅक्टचे ऑपरेशन झाले आणि चष्मा सुटला." तो आता वाशीला रहायला आला होता आणि त्याने दुसरी नोकरी धरली होती. पुढची तीन चार वर्षे आम्ही अधून मधून भेटत राहिलो, पण त्यानंतर तो पुन्हा अचानक अदृष्य झाला. या वेळी तो परदेशी गेला असल्याचे कानावर आले.


२०१७ साली म्हणजे आणखी बारा वर्षे गेल्यानंतर माझ्या बोरीवलीमध्ये रहात असणा-या माझ्या एका पत्रमित्राचा मला एक ईमेल आला. त्यात त्याने लिहिले होते की मला ओळखणारे कामत नावाचे एक गृहस्थ त्याला तिथल्या एका दवाखान्यात भेटले होते. त्याने समयसूचकता दाखवून त्यांचा फोन नंबर घेऊन मला कळवला होता. मी लगेच कामतला फोन लावला. तो बारा वर्षे गल्फमध्ये राहून नुकताच परत आला होता आणि त्याने आता बोरीवलीला घर केले होते. मी पुण्याला आलो असल्याचे आणि इथे काही जुन्या मित्रांच्या संपर्कात असल्याचे त्याला सांगितले. पुढच्या आठवड्यात आम्ही ब्रेकफास्टला एकत्र येणार असल्याने कामतने त्या वेळी पुण्याला यायलाच पाहिजे अशी त्याला गळ घातली आणि त्यानेही उत्साह दाखवला. त्यानंतर मी त्याला रोज फोन करून विचारत राहिलो आणि पुण्यात वास्तव्याला असलेल्या आमच्या नोकरीमधल्या दोन सहका-यांशी बोलून एक पूर्ण  दिवस आमच्यासाठी राखून ठेवायला सांगितले.


ठरल्याप्रमाणे कामत पुण्याला आला आणि किमया रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्टला हजर राहिला आणि आमच्या कॉलेजमधल्या जुन्या मित्रांना कित्येक म्हणजे बारा ते पन्नास  वर्षांनंतर भेटला, पण आम्हा दोघांचाही जवळचा मित्र भोजकर प्रकृतिअस्वास्थ्यामुळे  शकला नव्हता. मग लगेच त्याच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि आम्ही दोघे तिसरा एक मित्र अशोक याला सोबत घेऊन भोजकरच्या घरी गेलो आणि त्याला भेटलो. त्यानंतर आम्ही दोघेच बीएआरसीमधल्या एका मित्राकडे गेलो आणि तासाभरानंतर त्याला सोबत घेऊन दुस-या जुन्या मित्राकडे गेलो. दोन तीन दिवसांपूर्वी मला ज्याची कल्पनाही नव्हती असा इतक्या जुन्या मित्रांच्या भेटींचा योग त्या दिवशी जुळवून आणता आला तो फक्त इंटरनेट आणि टेलिफोन यांच्या मदतीमुळे. 
----------------------------------------------------------------

बाय बाय २०१७ ..... (भाग ४)

अर्थशून्य भासे मजला कलह जीवनाचा ।

अशा प्रकारच्या नकारात्मक विचारांचे मळभ सन २०१६ मध्ये घडलेल्या घटनांमुळे त्या वर्षाच्या अखेरीला माझ्या मनावर साचू लागले होते. तेंव्हासुध्दा मला कशाची कमतरता नव्हती. मुळातच मी माझ्या गरजा कधीच वाढवल्या नव्हत्या आणि परिस्थितीमधून जेवढ्या गरजा निर्माण झाल्या होत्या त्या सगळ्या माझ्या घरातली माझी माणसे मी न सांगता पुरवत होती. त्यासाठी मला कांहीच करायची आवश्यकता नव्हती, पण कशासाठीही कांहीही करावे असे न वाटणे हेच मला बेचैन करत होते.  २०१६च्या अखेरीला माझी शारीरिक आणि मानसिक अवस्था जरा दोलायमान झाली असल्यामुळे साधारणपणे तसे कांही तरी झाले होते.

याचा छडा लावण्यासाठी आम्ही हृदयविकारतज्ज्ञ (कार्डिओलॉजिस्ट) आणि मेंदूविकारतज्ज्ञ (न्यूरॉलॉजिस्ट) यांना भेटलो. त्यांनी कांही तपासण्या करून सांगितले की मला कोणता नवा विकार झालेला नाही, पण वयोमानानुसार ही इंद्रिये आता उताराला लागली आहेत. त्यांची घसरण थांबवण्यासाठी मला कांहीतरी करणे आवश्यक झाले होते. शरीराचा तोल सांभाळण्याला मदत करतील अशा काही फिजिओथेरपीच्या क्रिया दिवसातून सहा वेळा करायचा आदेश मिळाला. म्हणजे मला दिवसभरासाठी काम मिळाले. त्या थिरपीमधून २-३ महिन्यांनी माझा आत्मविश्वास वाढला आणि मी पुन्हा एकट्याने फिरायला लागलो. आता मला पुढचे पाऊल उचलायचा धीर आला.

लहानपणापासूनच मी निरनिराळी योगासने करून पहात होतो, पण ती एक गंमत म्हणून किंवा सर्कशीतल्या हालचाली करून दाखवण्यासारखे होते. मोठेपणी नोकरीला लागल्यानंतर मी काही योगासने केली नाहीत. ती करण्यासाठी वेळ न मिळणे ही सबब आणि आळस हे पुरेसे कारण होते. निवृत्त झाल्यानंतर मात्र मला योगाच्या वाटेने जावे असे वाटायचे आणि टीव्हीवरील त्याचे कार्यक्रम मी पहायला लागलो होतो, पण अमूक आजार असेल तर तमूक आसन करू नये अशा सूचनांमुळे बहुतेक सगळीच आसने माझ्यासाठी बाद झाली होती. तसेच ही आसने किंवा व्यायामाचा कुठलाही प्रकार नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करावा अशी तळटीप सगळीकडे दिलेली असते. हे करणे कसे शक्य आहे ते कळत नव्हते.

 २०१७ साली मात्र आमच्या घरापासून जवळच चालत असलेल्या योगवर्गाला नियमितपणे जायचा माझा विचार पक्का झाला. आपल्याला बहुतेक आसने करता येणार नाहीत यामुळे इतर लोक काय म्हणतील याची लाज आणि मनातून थोडी भीतीही वाटत होती. पण माझ्याच वयाच्या एका नव्या मित्राने मला एकदा फक्त येऊन पहा अशी गळ घातली आणि मी मनात संकोच बाळगतच त्याच्यासोबत पहाटे त्या वर्गाला गेलो.

या वर्गात अनेक आसने आणि प्राणायामाचे प्रकार दररोज एका ठराविक क्रमाने केले जातात. बाबा रामदेवांच्या पतंजलि आश्रमामध्ये जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले प्रशिक्षक इथे रोज ही आसने दाखवतात, पण सगळ्या साधकांनी ती केलीच पाहिजेत अशी सक्ती नसते. ज्याला जेवढे जमेल, झेपेल, इच्छा होईल तेवढे त्याने करावे. माझ्यासारखेच इतर कांही ज्येष्ठ नागरिक तिथे येत होते त्यांनाही अनेक अडचणी होत्या. यामुळे मला लाज वाटायचे कारणच नव्हते आणि प्रयोग करता करता माझ्या मनातली धाकधूक हळूहळू कमी झाली. मुख्य म्हणजे नकारात्मक विचारांकडे चाललेला माझा कल पुन्हा सकारात्मक विचारांकडे झुकला. आता २०१७चा निरोप घेतांना या वर्षातली ही एक उपलब्धी आहे असे म्हणता येईल.

---------------------------

बाय बाय २०१७ ..... (भाग ५)

Man is a social animal. मनुष्यप्राणी समूहांमध्ये रहातात. असे समाजशास्त्रज्ञ सांगतात. एकाद्या माणुसघाण्या एकलकोंड्याचा अपवाद सोडला तर बहुतेक माणसांना इतर माणसांचा सहवास हवा असतो. त्यांच्या कुटुंबामधली माणसे असतातच, त्याशिवाय शेजारीपाजारी, मित्रमैत्रिणी, सहकारी वगैरे इतर अनेक लोकांशी स्नेहसंबंध जोडायचा प्रयत्न बहुतेक माणसे करत असतात. समानशीलव्यसनेषुसख्यम् । या संस्कृत उक्तीनुसार मी सुध्दा मुंबईत असेपर्यंत माझ्याशी जमवून घेऊ शकणा-या लोकांमध्ये वावरत गेलो होतो. पण पुण्याला रहायला आल्यानंतर ही पूर्वीची मंडळी दुरावली गेली.  त्यांच्या प्रत्यक्ष गांठी भेटी घडणे जवळ जवळ थांबले. पण गेल्या कांही वर्षांमध्ये इंटरनेट आणि मोबाइल फोनमुळे दूर राहणारी माणसे जोडली गेली आहेत आणि त्यांच्याबरोबर संपर्क साधणे शक्य झाले आहे. मी तसे प्रयत्न करत होतो, पण ते नीट जुळवून आणण्यामधल्या काही तांत्रिक अडचणी दूर करून आवश्यक त्या सुखसोयी प्रस्थापित कराव्या लागतात. ते करेपर्यंत २०१६चे वर्ष बरेचसे संपत आले होते.

२०१७ मध्ये मात्र मला हवे असेल त्या वेळी ईमेल, फेसबुक आणि वॉट्सअॅप उपलब्ध होऊ लागले आणि मी त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेतला. आमच्या ऑफिसमधून निवृत्त झालेल्या सहका-यांच्या गूगल ग्रुपमध्ये आता सुमारे तीनशे सदस्य आहेत, फेसबुकवर माझे सुमारे पाचशे मित्र आहेत आणि वॉट्सअॅपवरील आठ दहा ग्रुप्समध्ये मिळून पुन्हा तितकेच आहेत. यातले माझ्यासकट अनेक लोक झोपाळू सदस्य (स्लीपिंग मेंबर्स) असले तरी रोज निदान पंचवीस मेल्स, पन्नास अपडेट्स आणि शंभर तरी पोस्ट येतातच. त्यात मी सुध्दा अल्पशी भर टाकत असतो. मी लिहिण्याचा कंटाळा करत असलो आणि इधर का माल उधर करणे मला आवडत नसले तरी जमेल तेवढे वाचायचा निदान प्रयत्न तरी करतो. त्यामुळे शहाणपणात भर पडो न पडो, मेंदूतल्या पेशींना थोडा व्यायाम मिळत असावा.  शिवाय त्या निमित्याने त्या मित्राचे किंवा आप्ताचे नांव आणि फोटो दिसतो आणि त्याची आठवण जागी होते. त्याचे क्षेमकुशल आणि प्रगति समजते. यातून जरा चांगले वाटते.

२०१७ मध्ये आमच्या संकुलामधल्या कांही ज्येष्ठ नागरिकांनी एका संघाची स्थापना केली. तसे हे लोक रोजच सकाळ संध्याकाळ दोघातीघांच्या लहान लहान ग्रुप्समध्ये बसून गप्पा टप्पा करत असत. त्यांची संख्या कधी कधी सात आठ पर्यंत जात असे. त्याला आता जास्त जोम आला. या वर्षी मीसुध्दा त्यांच्यात जाऊन बसायला लागलो आणि त्यांच्यासोबत इकडे तिकडे जायला यायला लागलो. निरनिराळ्या गांवांमधून निरनिराळ्या प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करून आता इथे रहायला आलेल्या या ज्येष्ठ लोकांच्या जीवनातले अनुभव आणि त्यातून घडलेले त्यांचे व्यक्तिमत्व खूप वेगवेगळे असते. अणुशक्तीनगरमध्ये रहात असतांना आजूबाजूचे बहुतेक सगळे लोक ऑफिसात माझ्यासारखेच काम करणारे, माझ्याच शैक्षणिक, बौध्दिक व आर्थिक स्तरामधले आणि साधारणपणे समान विचारसरणीचे असायचे, त्यामुळे मला माणसांमधले इतके वैविध्य पहायला मिळत नव्हते. या वर्षी मी त्याचा अनुभव घेत आहे. आपलेच तेवढे खरे असे न समजता इतरांना हे जग कसे दिसते हे ऐकून घेण्यात एक वेगळी मजा येत आहे.   

. .  . . . . ... .  . . . . . . . . .  (क्रमशः)
--------------------------------------------------------------------------------------------------

Friday, December 22, 2017

वातावरणामधील हवेचा दाब


आपल्या आजूबाजूला चहूकडे हवा पसरलेली असते, पण ती संपूर्णपणे पारदर्शक असल्यामुळे आपल्या डोळ्यांना दिसत नाही. तिला रंग, गंध किंवा चंवसुध्दा नसते. त्यामुळे डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा या आपल्या बाह्य ज्ञानेंद्रियांना तिच्या अस्तित्वाचे ज्ञान होत नाही. पण या हवेला पंख्याने जरासे हलवलेले मात्र आपल्या त्वचेला लगेच समजते, हवेतले धूलिकण हलतांना दिसतात, हवेमधून गंध पसरतो आणि घ्राणेंद्रियांना तो लगेच समजतो, जोरात वारा आला तर त्याचा आवाज कानाला ऐकू येतो. श्वासोच्छ्वास करतांना किंवा फुंकर मारतांना तर आपल्याला हवेचे अस्तित्व जाणवते आणि ती श्वासाला कमी पडली तर लगेच आपला जीव कासावीस होतो. अशा प्रकारे ङवा आपल्या चांगल्या ओळखीची असते.

ही अदृष्य हवा वजनाने इतकी हलकी असते की वजनाच्या काट्यावर उभे राहून आपण दीर्घ श्वास घेतला आणि पूर्णपणे बाहेर सोडला तरी तो काटा तसूभरही जागचा हलत नाही. पण हवेलाही अत्यंत कमी असले तरी निश्चितपणे वजन असतेच. आपल्या वजनापेक्षाही जास्त भरेल इतके मोठे हवेचे ओझे आपण सतत आपल्या डोक्यावर आणि खांद्यावर वहात असतो आणि आपल्या अंगावर सतत सर्व बाजूंनी त्याचा दाब पडत असतो यावर मात्र कदाचित आपला विश्वास बसणार नाही.

जमीनीपाशी तर सगळीकडे हवा असतेच, या हवेत उंच उडणारे पक्षी आणि त्यांच्यापेक्षाही उंचावरील आभाळात वा-याबरोबर पुढे पुढे सरकणारे ढग दिसतात. आकाशात अमूक उंचीपर्यंत हवा पसरलेली आहे आणि तिच्यापुढे ती अजीबात नाही अशी स्पष्ट सीमारेषा नसते. जसजसे जमीनीपासून दूर जाऊ तसतशी ती अतीशय हळू हळू विरळ होत जाते. यामुळे ती आकाशात कुठपर्यंत पसरली आहे हे नजरेला दिसत नाही. मग जमीनीवरली हवा ढगांच्या पलीकडल्या अथांग आकाशात पार सूर्यचंद्र, ग्रहतारे यांच्यापर्यंत पसरलेली असते का? कदाचित नसेल असा विचार प्राचीन काळातल्या विचारवंतांच्या मनातसुध्दा आला असणार. कदाचित म्हणूनच या विश्वाची रचना ज्या पंचमहाभूतांमधून झाली आहे असे मानले जात होते त्यात पृथ्वी, आप (पाणी), तेज यांच्यासोबत वायू (हवा) आणि आकाश अशी दोन वेगळी तत्वे त्यांनी सांगितली होती.

सतराव्या शतकातले कांही पाश्चात्य संशोधक पाण्याच्या प्रवाहावर संशोधन करत होते. ते काम करतांना त्यांना हवेच्या दाबाचा शोध लागला अशी यातली एक गंमतच आहे. त्या काळातल्या युरोपमध्ये कांही शास्त्रज्ञांनी खोल विहिरींमधून पाणी उपसायचे पंप तयार केले होते, धातूंच्या नलिकांमधून (पाइपांमधून) पाणी इकडून तिकडे वाहून नेले जात होते आणि त्यात कांही जागी एकादा उंचवटा पार करून जाण्यासाठी वक्रनलिकेचा (सायफनचा) उपयोगसुध्दा केला जात होता. त्या काळात हवेचा दाब ही संकल्पनाच कुणालाही माहीत नव्हती आणि गुरुत्वाकर्षणाचे नियमही अजून सांगितले गेले नव्हते. हे पंप किंवा वक्रनलिका भौतिकशास्त्राच्या कोणत्या नियमांनुसार काम करत असतील याची  स्पष्ट कल्पना त्यांचा उपयोग करणा-यांनाही नव्हतीच. पण अनेक प्रयोग करून पाहतांना त्यातला एकादा सफल झाला, त्याचा उपयोग करून घेतला, त्या अनुभवावरून आणखी प्रयोग केले, त्यातला एकादा यशस्वी झाला किंवा त्या प्रयोगामधून योगायोगाने नवीन माहिती प्राप्त झाली, नवीन कल्पना सुचली अशा पध्दतीने हळू हळू माणसांच्या ज्ञानात वाढ होत होती, तसेच त्यांचे काम सोपे होत होते. विज्ञानाच्या क्षेत्रात त्या काळापर्यंत झालेली बरीचशी प्रगति अशा प्रकारे झाली होती.
   
पाणी उपसण्याच्या पंपांवर काम करत असलेल्या काही शास्त्रज्ञांना असा अनुभव आला की सुमारे दहा मीटर खोल विहिरींमधले पाणी  कितीही जोर लावला तरी कांही केल्या वरपर्यंत येऊन पोचतच नाही. तसेच दहा मीटर उंचवटा पार करून जाणा-या वक्रनलिकेमधून पाणी वहात पुढे जातच नाही. अशा प्रकारच्या तांत्रिक तक्रारी त्या काळातले श्रेष्ठ इटॅलियन शास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्याकडे आल्या. त्यांनाही लगेच या कोड्याचे उत्तर मिळाले नाही, पण इव्हाँजेलिस्ता तॉरिचेली (Evangelista Torricelli (Italian: [evandʒeˈlista torriˈtʃɛlli]) या नावाचे त्यांचे एक हुषार सहकारी होते त्यांनी मात्र या अनुभवांवर खोलवर विचार करून त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला.


आपण हाताने एकादी दोरी धरून ओढू शकतो तसे पाण्याला आपल्याकडे ओढता येत नाही. मग पंपाने तरी ते नळीमधून वरच्या बाजूला कां खेचले जावे असा प्रश्न तॉरिचेलीला पडला. पाण्याला ओढून वर काढणे शक्य नसेल तर कोणीतरी त्याला खालून वर ढकलत असले पाहिजे असा सयुक्तिक तर्क त्याने केला. तॉरिचेलीच्या काळातलाच पास्कल नावाच्या फ्रेंच शास्त्रज्ञ द्रवरूप किंवा वायुरूप अशा प्रवाही पदार्थांमधील (फ्लुइड्समधील) दाब या विषयावर संशोधन करीत होता. विहिरीच्या पाण्यावर जी हवा असते ती हवा जर तिच्या वजनाइतका दाब पाण्यावर देत असली तर त्यामुळे पाण्यामध्ये सर्व दिशांनी दाब निर्माण होईल आणि त्यात बुचकळलेल्या नळीमधले पाणी त्या दाबामुळे वर उचलले जाईल असा रास्त विचार तॉरिचेलीने केला. पाणी उचलले जाण्याला दहा मीटर्सची मर्यादा कशामुळे येत असेल हा जो मूळ प्रश्न होता, त्याचे कारण हवेचा पाण्यावरला दाब फक्त इतकाच मर्यादित असेल असे उत्तर त्याला मिळाले.  पण त्याला सुचलेल्या या विचाराची खातरजमा करून घेणे अत्यंत आवश्यक होते.

तॉरिचेलीने एक लांबलचक सरळ नळी घेऊन ती पाण्याने पूर्णपणे भरली आणि तिला दोन्ही बाजूंनी झाकणे लावून बंद केली, एका लहानशा उघड्या टाकीत पाणी भरून त्या नळीला त्यात उभे केले आणि हळूच त्या नळीच्या तळातले झाकण उघडले. त्यासरशी त्या नळीमधले थोडे पाणी खाली असलेल्या टाकीमध्ये उतरलेले दिसले पण बाकीचे पाणी उभ्या नळीतच राहिले. नळीमध्ये उरलेल्या पाण्याच्या स्तंभाची उंची सुमारे दहा मीटर्स भरली. यावरून त्याने असा निष्कर्ष काढला की दहा मीटर उंच पाण्याचा स्तंभ खालच्या टाकीमधल्या पाण्यावर जेवढा दाब देईल तेवढाच हवेचा दाब पाण्यावर पडत असला पाहिजे. पण दहा बारा मीटर इतकी लांब नळी त्याच्या घरात मावत नसल्यामुळे ती छपराच्या वर जात होती आणि वातावरणातल्या हवेचा दाब कमी जास्त होत असल्यामुळे तिच्यातले पाणी खाली वर होतांना दिसत होते. हा माणूस कांही जादूटोणा चेटुक वगैरे करत असल्याची शंका त्याच्या शेजा-यांना आली. त्यामुळे त्याने हा प्रयोग थांबवला.

हवेच्या दाबाच्या अस्तित्वाबद्दल तॉरिचेलीची खात्री पटली होती. आपण सगळेजण हवेने भरलेल्या एका विशाल महासागराच्या तळाशी रहात आहोत असे त्याने एका पत्रात लिहून ठेवले होते. समुद्राच्या तळाशी गेल्यावर जसा पाण्याचा प्रचंड दाब शरीरावर पडतो तसाच हवेचा दाब आपल्यावर सतत पडत असतो असे त्याने सांगितले. त्या काळातल्या इतर शास्त्रज्ञांना ती अफलातून कल्पना पटायची नाही. आपले सांगणे प्रात्यक्षिकामधून सिध्द करून दाखवण्यासाठी तॉरिचेलीने एक वेगळा प्रयोग केला. त्याने पाण्याच्या तेरापट जड असलेला पारा हा द्रव एक मीटर लांब कांचेच्या नळीत भरून ती नळी पारा भरलेल्या पात्रात उभी करून धरली. त्याच्या अपेक्षेप्रमाणे नळीमधला पारा खाली येऊन सुमारे पाऊण मीटर (७६ सेंटीमीटर) उंचीवर स्थिरावला. पाऊण मीटर पा-याच्या स्तंभाचे वजन दहा मीटर पाण्याच्या स्तंभाइतकेच असते.  तॉरिचेलीने तयार केलेला हा जगातला पहिला वायुभारमापक (बॅरोमीटर) होता. नळीमधला पा-याच्या वर असलेला भाग पूर्णपणे रिकामा होता, बाहेरची हवा तिथे जाण्याची शक्यता नव्हती. अशी निर्वात पोकळी (व्हॅक्यूम) हा सुध्दा त्या काळात एक नवा शोध होता. अशी पोकळी असू शकते याची कोणी कल्पना करू शकत नव्हता. तत्कालिन शास्त्रज्ञांना ते सत्य पटवून देण्याठी पास्कल या फ्रेंच शास्त्रज्ञाला बरेच प्रयोग आणि प्रयत्न करावे लागले. पृथ्वीवर तॉरिचेलीने त्याच्या बॅरोमीटरमध्ये निर्वात पोकळी निर्माण केली होती या गोष्टीची आठवण ठेऊन निर्वात पोकळीमधील दाबाचे मोजमाप करण्यासाठी तॉरिचेलीच्या सन्मानार्थ टॉर हे युनिट धरले जाते.

समुद्रसपाटीवर प्रत्येक एक वर्ग सेंटिमीटर इतक्या लहानशा क्षेत्रफळावर उभ्या असलेल्या कांही किलोमीटर उंच अशा हवेच्या स्तंभाचे सरासरी वजन सुमारे एक किलोग्रॅम (1.01 Kg/sq.cm) इतके असते. म्हणजेच सुमारे ७६ सेंटीमीटर पारा किंवा १० मीटर पाणी यांना तोलून धरण्यासाठी १०१ किलोपास्कल 101 kN/m2 (kPa) म्हणजेच 10.1 N/cm2 इतका  हवेचा दाब लागतो असे गणितातून सिध्द होते. जर्मनीमधील मॅग्डेबर्ग या शहराचा नगराध्यक्ष असलेल्या ओटो व्हॉन गेरिक या शास्त्रज्ञाने हवेचा दाब किती शक्तीशाली असतो आणि त्याने तयार केलेला व्हॅक्यूम पंप किती चांगले काम करतो हे प्रत्यक्ष प्रमाणाने दाखवण्यासाठी एक अजब प्रयोग केला. त्याने तांब्याचे दोन मोठे अर्धगोल तयार करून त्यांना एकमेकांमध्ये बसवले आणि त्यांना फक्त ग्रीज लावून सील केले. त्यानंतर त्या गोलाकार डब्यामधली शक्य तितकी हवा व्हॅक्यूम पंपाद्वारे बाहेर काढून टाकली. बाहेरील वातावरणामधल्या हवेच्या दाबामुळे ते अर्धगोल इतके घट्ट बसले की दोन्ही बाजूला जुंपलेल्या अनेक घोड्यांनी ओढूनसुध्दा ते एकमेकापासून वेगळे झाले नाहीत. त्या अर्धगोलांना लावलेली झडप उघडताच बाहेरील हवा आत शिरली आणि ते सहजपणे वेगळे झाले. हे अर्धगोल आणि हा प्रयोग मॅगेडेबर्गच्या नावानेच प्रसिध्द आहे.

आपल्या शरीरावरसुध्दा बाहेरच्या हवेचा इतका मोठा हवेचा दाब पडत असतोच, पण ज्या प्रमाणे पाण्यात बुडवलेल्या वस्तूला पाणी उचलून धरत असते असे आर्किमिडीजने सांगितले होते त्याप्रमाणे हवासुध्दा आपल्याला वर उचलतही असते. शरीराच्या अंतर्गत भागांमधल्या पोकळ्यांमधली हवा बाह्य वातावरणाशी संलग्न असल्यामुळे शरीराच्या आतल्या इंद्रियांमध्ये सुध्दा तेवढाच दाब असतो. तो आपल्या इंद्रियांना आणि कातडीला आतून बाहेर ढकलत असतो. यामुळे आपल्याला वातावरणातल्या हवेचा दाब एरवी जाणवत नाही. पण विमानात किंवा कांही प्रयोगशाळांमध्ये हवेच्या दाबाचे मुद्दाम नियंत्रण केले जाते. तिथे आपल्या कानाच्या पडद्यांना तो फरक लगेच जाणवतो.

पुढील काळात निरनिराळ्या संशोधकांनी हवेचा दाब मोजण्यासाठी पा-याच्या वायुभारमापकाशिवाय इतर प्रकारची अनेक सोयिस्कर उपकरणे तयार केली आणि निरनिराळ्या वेळी निरनिराळ्या जागी हवेचा दाब मोजून पाहिला. वातावरणाचा अभ्यास करण्याचे ते एक मुख्य साधन झाले. समुद्रसपाटीला हवेचा सर्वात जास्त दाब असतो आणि जसजसे आपण उंचावर जाऊ तसतसे त्या ठिकाणाच्या वर असलेल्या हवेचा थर पातळ होत जातो आणि त्या जागी वातावरणामधील हवेचा दाब कमी कमी होत जातो. हिमालयातल्या उंच पर्वतशिखरांवर तो खूपच कमी असतो. तिथे जाणा-या गिर्यारोहकांना श्वास घेतांना पुरेशी हवा न मिळाल्यामुळे धाप लागते. त्यांना हवेचा विरळपणा प्रत्यक्षात जाणवत होताच. तिथल्या हवेचा दाब मोजून तो किती कमी आहे हे पहाण्याचे एक साधन मिळाले. समुद्रसपाटीपासून पर्वतशिखरापर्यंत कुठल्याही ठिकाणच्या हवेचा दाब नेहमीच स्थिरसुध्दा नसतो. तिथल्या तपमानात होत असलेल्या बदलांमुळे हवा आकुंचन किंवा प्रसरण पावते आणि त्यातून तिथल्या हवेचा दाब कमी जास्त होत असतो. त्यामुळे ज्या ठिकाणी हवेचा दाब जास्त असेल तिथली हवा कमी दाब असलेल्या भागाकडे वाहू लागते. याचा सखोल अभ्यास केल्यावर वारे नेहमी ठराविक दिशेने कां वाहतात हे समजले. हवेच्या दाबाच्या अभ्यासावरूनच वादळांची पूर्वसूचना मिळू लागली.

मोटारींच्या किंवा कारखान्यातल्या स्वयंचलित इंजिनांना हवेची आवश्यकता असते, तसेच विमान हवेने उचलून धरल्यामुळेच हवेत उडते. हवेला दाब असतो हे सिध्द झाल्यानंतर आणि तो मोजण्याची साधने उपलब्ध झाल्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाची अनेक नवी दालने उघडली.


Tuesday, December 05, 2017

गॅलीलिओ आणि विज्ञान (सायन्स)



ज्ञान, विज्ञान, शास्त्र या संस्कृत भाषेमधील प्राचीन शब्दांना कालमानानुसार वेगवेगळे अर्थ जोडले गेले. मी शाळेत शिकत असतांना शास्त्र या नावाच्या विषयामध्ये सायन्स शिकलो होतो. आता विज्ञान हा शब्द अधिक प्रचलित झाला आहे. तरी संशोधन करणा-या सायंटिस्ट लोकांना शास्त्रज्ञ असेच संबोधले जाते. मुळात सायन्स आणि सायंटिस्ट हे शब्दसुध्दा अलीकडच्या काळातलेच म्हणजे गेल्या दोन तीनशे वर्षात पुढे आलेले आहेत. आपण आज ज्यांचा समावेश सायन्समध्ये करतो त्या विषयांचा समावेश युरोपमध्ये नॅचरल फिलॉसॉफीमध्ये केला जात होता आणि तो फिलॉसॉफीचा एक भाग होता. निरनिराळे विद्वान विचारवंत त्यांच्या बुध्दीमत्तेनुसार विचार करून अनेक विषयांवर आपली मते किंवा सिध्दांत मांडत असत आणि ती भिन्न किंवा परस्परविरोधी असली तरी त्या त्या विद्वानांचे अनुयायी त्यांचा डोळे मिटून स्वीकार करून त्यांना पुढे नेत असत आणि ज्याच्या नावाचा दबदबा जास्त त्याच्या सांगण्याला मान्यता मिळत असे. फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञानामध्ये हे चालत आले आहे, पण सायन्समध्ये तसे चालत नाही. यामुळे सायन्सची फिलॉसॉफीपासून फारकत करण्यात आली. इंग्रजी शिक्षणपध्दतीमधून जेंव्हा आपल्याकडे सायन्सचे शिक्षण सुरू झाले तेंव्हा त्याला शास्त्र किंवा विज्ञान अशी नावे दिली गेली, पण तो नेमका अर्थ अजूनही लोकांच्या मनात पूर्णपणे रुजलेला नाही. त्यामुळे अमूक तमूक गोष्ट शास्त्रीय आहे की नाही यावर अनेक वादविवाद होत असतात. या लेखामध्ये मी विज्ञान हा शब्द फक्त सायन्स याच अर्थाने घेतला आहे. 

विज्ञान (सायन्स) म्हणजे थोडक्यात सांगायचे झाल्यास आपले जग कसे चालते याचा पध्दतशीर अभ्यास आणि त्यातून समजलेले निसर्गाचे नियम व सिध्दांत मुद्देसूदपणे मांडणे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि त्यांच्यापासून निघालेल्या उपशाखांचा समावेश विज्ञानात केला जातो. या विषयातले सिध्दांत प्रत्यक्ष प्रमाणाने सिध्द केले जातात. याचा पाया घालण्यात गॅलीलिओचा मोठा वाटा आहे.

प्राचीन काळातले ऋषीमुनि आणि विद्वानांनी अनेक शास्त्रांचा विकास केला होता. मंत्रतंत्र, स्तोत्रे, कथा, पुराणे, वगैरें धर्मशास्त्रे पिढी दर पिढी पुढे दिली जात गेली. योगविद्या, आयुर्वेद, ज्योतिष वगैरे कांही शास्त्रेही टिकून राहिली. पण विज्ञानाशी संबंधित शास्त्रांना बहुधा प्राधान्य दिले जात नसावे. आर्यभट, वराहमिहिर आदि विद्वानांनी भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, गणित वगैरे विषयांवर काम केले होते. पण त्यांचे सिध्दांत आणि सूत्रे यांचा प्रसार मधल्या काळात थांबला. शास्त्रज्ञांची मालिका तयार झाली नाही. मध्ययुगाच्या काळात त्यांच्या संस्कृत ग्रंथांवर मराठी किंवा हिंदीसारख्या भाषेतही भाष्य किंवा लेखन झालेले दिसत नाही.

युरोपमध्ये पूर्वीच्या काळात ज्ञानाचा प्रसार करण्याचे काम मुख्यतः धर्मगुरूंकडेच होते. तेंव्हा विज्ञानाचा समावेश तत्वज्ञानात केला जात होता. तिकडल्या कांही ठिकाणी विद्यापीठांची स्थापना झाली होती आणि तिथे विविध विषयांवरील पुरातन ग्रंथांचा आणि इतर शास्त्रांसोबत खगोलशास्त्र व गणितासारख्या विषयांचासुध्दा अभ्यास केला जात असे. अॅरिस्टॉटल, टॉलेमी, युक्लिड, पायथॉगोरस, आर्किमिडीस आदि विद्वानांनी सांगितलेली प्रमेये, सिध्दांत, नियम वगैरे त्यांच्या नावानिशी जतन करून ठेवले गेले होते आणि त्यामध्ये रस असलेल्या विद्यांर्थ्यांना ते शिकणे शक्य होते.

गॅलीलिओ गॅलीली या इटालियन शास्त्रज्ञाने विज्ञानामधल्या निरनिराळ्या विषयांवर संशोधन केले, त्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग आणि प्रात्यक्षिके केली, त्यामधून केलेल्या निरीक्षणांचा तर्कसंगत अर्थ लावून त्यामधून निष्कर्ष काढले आणि ते सुसंगतपणे जगापुढे मांडले. यालाच शास्त्रीय पध्दत (सायंटिफिक मेथड) असे म्हणतात आणि पुढील काळातले संशोधन कार्य त्या पध्दतीने होऊ लागले. म्हणून गॅलीलिओला आधुनिक विज्ञानाचा जनक समजले जाते.

गॅलीलिओचा जन्म १५६४ साली इटलीमधल्या सुप्रसिध्द पिसा या गावात झाला. त्याचे वडील एक संगीतज्ञ होते. कुशाग्र गॅलीलिओने लहानपणी संगीत आणि त्यातले गणित आत्मसात केले. त्या काळातही डॉक्टरांची कमाई चांगली होत असे म्हणून त्याला वैद्यकीय शास्त्राच्या शिक्षणासाठी विद्यापीठात पाठवले होते. पण त्याचा ओढा विज्ञानाकडे असल्यामुळे त्याने औषधोपचाराऐवजी गणित आणि नैसर्गिक तत्वज्ञान या विषयांचा अभ्यास करून त्यात प्राविण्य मिळवले.

मेडिकलचा अभ्यास करत असतांनाच त्याचे लक्ष चर्चमध्ये टांगलेल्या झुंबरांकडे गेले. ती झुंबरे वा-याने कमी जास्त झुलत होती, पण त्यांना जोराने ढकलले किंवा हळूच लहानसा झोका दिला तरी त्यांची आंदोलने तेवढ्याच वेळात होतात असे त्याला वाटले आणि त्याने आपल्या नाडीच्या ठोक्यांच्या आधारे ते झोके मोजले. त्याने घरी येऊन दोन एकसारखे लंबक तयार करून टांगले. त्यातल्या एकाला जास्त आणि दुस-याला कमी खेचून सोडले तरी दोन्ही लंबक एकाच लयीमध्ये झुलत राहिले. त्यानंतर त्याने तपमान मोजणे, वजन करणे वगैरे कामे करणारी उपकरणे तयार केली आणि तत्कालिन शास्त्रज्ञांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतले.

गॅलीलिओने एकापेक्षा एक अधिक शक्तीशाली दुर्बिणी तयार केल्या आणि त्या दुर्बिणींमधून आकाशाचे खूप बारकाईने निरीक्षण केले. चंद्राला असतात तशाच शुक्रालासुध्दा कला असतात हे त्याने पाहिले. त्याने शनी ग्रहाच्या सभोवती असलेली कडी पाहिली, शनी ग्रहाच्या पलीकडे असलेल्या नेपच्यूनलाही पाहिले, पण तो सूर्याभोवती अत्यंत मंद गतीने फिरणारा ग्रह न वाटता एकादा अंधुक तारा आहे असे वाटले. गुरु या ग्रहाला प्रदक्षिणा घालणारे चार लहानसे ठिपके पाहून त्याने ते गुरूचे उपग्रह असल्याचे अनुमान केले. त्यापूर्वी शास्त्रज्ञांना फक्त तारे आणि ग्रह माहीत होते, उपग्रह ही संकल्पनाच नव्हती. पृथ्वीलाच ग्रह मानले जात नसतांना चंद्र हा फक्त चंद्रच होता. गॅलीलिओने सूर्यावरचे डाग आणि चंद्रावरचे डोंगर व खळगे पाहिले. धूसर दिसणारी आकाशगंगा असंख्य ता-यांनी भरलेली आहे असे सांगितले. ग्रह आणि तारे यांचे ढोबळपणे आकार मोजण्याचा प्रयत्न केला. आकाशातले सगळे तारे एकाच प्रचंड गोलाला चिकटले आहेत असे अॅरिस्टॉटलने वर्तवले होते आणि मानले जात होते. ते निरनिराळ्या अंतरावर असल्याचे गॅलीलिओने निरीक्षणांवरून सिध्द करून दाखवले.

गॅलीलिओला खगोलशास्त्राची खूप आवड होती आणि त्याने गणितातही प्राविण्य मिळवले होते. त्याने कोपरनिकस आणि केपलर यांनी केलेल्या संशोधनाचा आणि किचकट आकडेमोडीचा अभ्यास केला. त्यांनी मांडलेली सूर्यमालिकेची कल्पना गॅलीलिओला पटली आणि त्याने ती उचलून धरली. सूर्य एका जागी स्थिर असून पृथ्वी त्याच्याभोवती फिरते हे मत बायबलमधल्या काही ओळींच्या विरोधात जात होते. धर्मगुरूंनी ते खपवून घेतले नाही आणि गॅलीलिओने या विषयावरचे काम ताबडतोब थांबवावे असा आदेश दिला. त्याने तो आदेश पाळला आणि आपले मत बदलले नसले तरी ते उघडपणे मांडणे टाळले. तरीही सोळा वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच्यावर खटला भरून त्याला नास्तिकपणाच्या विचारांचा प्रसार करण्याच्या गुन्ह्यासाठी आजन्म स्थानबध्दतेची शिक्षा फर्मावली गेली.

भौतिकशास्त्र आणि अभियांत्रिकी या विषयांमध्येसुध्दा गॅलीलिओने मोलाची भर घातली. उंचावरून खाली पडत असलेल्या वस्तूंच्या गतीच्यासंबंधी त्याने केलेल्या निरीक्षणांचा आणि मांडलेल्या विचारांचा पुढे न्यूटनला उपयोग झाला. गॅलीलिओने ध्वनींची कंपनसंख्या आणि प्रकाशाचा वेग मोजण्याचे प्रयत्न केले. भूमिती आणि निरीक्षणासाठी लागणा-या कंपॉसपासून ते दुर्बिण आणि सूक्ष्मदर्शक यंत्रापर्यंत अनेक प्रकारची उपकरणे गॅलीलिओने तयार केली, बाजारात विकली आणि संशोधनासाठी स्वतः वापरली.

या सर्वांपेक्षा अधिक मोलाची गोष्ट म्हणजे त्याने जगाला एक वैज्ञानिक दृष्टी दिली. त्याने प्रयोग, प्रात्यक्षिक आणि गणित यांची सांगड घालून कुठलाही तर्कशुध्द निष्कर्ष काढणे किंवा तपासून पाहणे आणि तो रूढ समजुतींना धक्का देणारा असला तरीही निर्भीडपणे आणि सुसंगतपणे मांडणे याची एक  वैज्ञानिक चौकट घालून दिली. विज्ञान किंवा सायन्स आणि सायंटिफिक मेथड या शब्दांचा उपयोग गॅलीलिओच्या काळात होत नव्हता, ते रूढ व्हायला आणखी शंभर दीडशे वर्षे लागली असली तरी त्या विचारांना आधी गॅलीलिओने दिली. त्यामुळे त्याला आधुनिक विज्ञानाचा जनक ही सार्थ पदवी दिली गेली.