Thursday, December 31, 2009

नववर्षाच्या शुभेच्छा


आज आणखी एक नवे वर्ष सुरू झाले. या वेळी पूर्वीच्या वर्षांच्या आठवणी जाग्या होणारच. आमच्या ऑफीसला १ जानेवातीला सुटी नसायची. पण त्या दिवशी फारसे काम असे होतच नसे. कांही धीट मुले ऑफीस सुरू होण्याच्या आधीच येऊन पोचून सर्वात मोठ्या साहेबाच्या केबिनच्या आसपास घुटमळत रहायची आणि साहेब एकटे असल्याचे पाहून आत घुसून त्यांना शुभेच्छा वगैरे द्यायची. इतरांच्या नजरेतून मस्का मारायची. माझ्यासारखी बुजरी मुले एकमेकांनाच विश करत असत आणि एकादा घोळका साहेबांकडे जायला निघाला तर त्यांत सामील होऊन त्यांच्याबरोबर जात असत. तिथे जाऊन काय बोलायचे? हेच मला समजत नसे. ते जरा जरा कळायला लागेपर्यंत मीच साहेब झालो होतो.

त्या दिवशी ऑफिसातल्या इतर सहका-यांना भेटून एकमेकांचे अभिनंदन करणे चालायचे. मित्रमंडळींच्या ग्रुपमध्ये आणि सेक्शनच्या पार्ट्या असायच्या. थोडी वरची जागा मिळाल्यावर इतर लोकांच्या पार्ट्यांमध्ये सामील व्हावे लागायचे. कँटीनमधले तेच तेच सामोसे आणि वेफर्स पुन्हा पुन्हा खाणे शक्य नसले तरी थोडे तोंड चाळवावे लागायचे. कांही कल्पक मित्र बाहेरून केक किंवा मिठाया आणायचे, त्यावर मात्र ताव मारायचा. या सगळ्याचे नियोजन करून ठेवले तर ते बरे पडायचे. शिवाय टेलीफोन सारखा घणघणतच असायचा. त्या दिवशी ऑफिसच्या खर्चाने आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना फोन करण्याची मुभा असते अशीच सर्वसामान्य समजूत असावी. त्यामुळे सख्ख्या भावापासून आऊच्या काऊपर्यंत सगळ्यांशी मनमुराद नाही तरी अघळपघळ गप्पा व्हायच्या.

ऑफिसमधल्या गुजगोष्टी खाजगी असल्या तरी त्या मुख्यतः ऑफिसमधल्या विषयांवरच असायच्या. गेल्या वर्षी कोणी कोणी कसकसला गाढवपणा केला होता याची उजळणी व्हायची आणि नव्या वर्षात काय करायचे याच्या योजना, विचार आणि अचाट कल्पना या सगळ्यांवर चर्चा व्हायची. त्यातून कांही कण मिळतच असतील आणि त्यांचा फायदाही पुढे होत असेल. कांही कल्पक साहेब लोकांनी त्या दिवशी वरिष्ठ सहका-यांबरोबर मीटिंगच ठेवली आणि त्या दिवशी मारायच्या गप्पा ऑफिशियल करून टाकल्या.

सेवानिवृत्त झाल्यानंतर आलेल्या २००६ च्या नूतन वर्षाच्या आरंभाला मी ऑफिसात तर नव्हतोच, पण भारताबाहेर गेलो होतो. घरात मला सोडून इनमिनतीन माणसे होती आणि घराबाहेर एकाचीही ओळख नव्हती. परदेशातून भारतातल्या आप्तांना फोन लावण्याइतका निर्ढावलो नव्हतो. त्यामुळे शुभेच्या द्यायच्या तरी कोणाला? हा प्रश्नच होता. "हे विश्वचि माझे घर" असे म्हणत नुकताच आंतर्जालावर प्रवेश केला होता. भारतातून निघतांना दहा बारा लोकांनी त्यांचा ईमेलचा पत्ता देऊन ठेवला होता. तेंव्हा एक ग्रीटिंग कार्ड तयार केले आणि सर्वांना पाठवून दिले.

आंतर्जालावरील विश्वाच्या कक्षा कशा रुंद करायच्या या विचारातून या ब्लॉगचा जन्म २००६ च्या नववर्षदिनाच्या शुभमुहूर्तावर केला. त्यानंतर इतर कांही संकेतस्थळे मिळाली आणि आता खरोखरच त्या बीजामधून निदान एक लहानसे रोपटे तरी वाढीला लागले आहे. ईमेलचा पसारासुध्दा अफाट वाढला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भेटून ज्यांना शुभेच्छा देता आल्या आणि येतील त्यांच्या अनेकपटीने अधिक लोकांबरोबर इंटरनेटवरून संपर्क होऊ लागला आहे.

मागील वर्षाच्या अखेरच्या महिन्यात अचानकपणे आलेल्या एका कामामुळे मला या स्थळावर यायला फारसे जमले नव्हते. पण तरीसुध्दा याला भेट देणा-यांची संख्या वाढतच होती हे पाहून खूप चांगले वाटले. आता नव्या वर्षात नव्या जोमाने ही कसर भरून काढायचा प्रयत्न करायची जबाबदारी माझ्यावर पडली आहे.

या नव्या वर्षात सर्व वाचकांना यश, कीर्ती आणि सुखसमृध्दी आणि भरभरून मिळो अशा शुभेच्छा !!!

Monday, December 14, 2009

अमेरिकेची लघुसहल - तिसरा दिवस - ६


अमेरिकेची लघुसहल - तिसरा दिवस - ६ फिलाडेल्फिया

वॉशिंग्टन डीसी मधली अनेक स्मारके पाहतांना अमेरिकेच्या स्वातंत्र्यसंग्रामापासून ते व्हिएटनाममधल्या लढाईपर्यंतच्या इतिहासाची झटपट उजळणी झाली. त्या वास्तूंच्या आजूबाजूला पसरलेली रम्य हिरवळ, फुलांचे ताटवे आणि निर्मळ पाण्याने तुडुंब भरलेले तलाव पाहतांना मन मोहून गेले आणि राइट बंधूंनी हवेत केलेल्या पहिल्या उड्डाणापासून ते मंगळ, गुरू आणि शनी या ग्रहांच्या दूरवरच्या यात्रेला निघालेल्या व्हॉयोजरच्या अंतरिक्षातल्या मोहिमेपर्यंत साध्य केलेल्या गगनभरारीचे सम्यक दर्शन घेतांना मन उचंबळून आले. हा सगळा अनुभव गाठीला मारून आम्ही परतीच्या प्रवासासाठी बसमध्ये येऊन बसलो. या सहलीला निघण्यापूर्वी जी स्थळे पहायला मिळण्याची अपेक्षा होती ती सगळी पाहून झाली होती. आता परत घरी जायचे वेध लागले होते. आपला पुढचा आणि अखेरचा स्टॉप आता फिलाडेल्फियाला असणार असल्याचे टूर गाईडने सांगितले, पण त्यावर कोणीच टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली नाही. अमेरिकेतली जी कांही सात आठ शहरे मला ठाऊक होती त्यातलेच फिलाडेल्फिया हे एक असले तरी ते नांव मी कोणत्या संदर्भात वाचले किंवा ऐकले होते ते आठवत नव्हते. डायवरदादाला थोडा आराम मिळावा आणि पर्यटकांनाही चहा कॉफी घेऊन थोडी तरतरी आणता यावी आणि पाय मोकळे करायला मिळावेत एवढ्याचसाठी हा थांबा असावा अशी समजूत करून घेतली.

दिवसभर पायपीट करून शरीराला किंचित थकवा आला होता. त्यानंतर या ट्रिपमधले अखेरचे जेवण खातांना बिनधास्त होऊन त्यावर जरा जास्तच आडवा हात मारला गेला होता. त्यामुळे बहुतेक प्रवासी सुस्तावून पेंगुळले होते. बस हलायला लागताच सारे डुलक्या घेऊ लागले. अधून मधून जाग आल्यावर बाहेर शहरातल्या वातावरणाऐवजी कुठे कंट्रीसाइड तर कुठे नागरी वस्त्या दिसत असल्याचे जाणवत होते. खेड्यातल्या जुन्यापुराण्या चर्चेसचे खांब, कमानी व चौकोनी उंच शिखरे आणि आता लहान गांवातसुध्दा दिसणारे शीशमहलासारखे कांचबंद मॉल्स दुरून पाहण्यात फारसे नाविन्य उरले नव्हते. असेच कांही वेळ पुढे गेल्यानंतर एका मोठ्या शहराची स्कायलाइन दिसायला लागली. त्याला बाजूला टाकून बायपासने न जाता आमची बस त्या शहरात शिरली आणि एका जुनाट पण छान दिसणाच्या इमारतीसमोर असलेल्या मोकळ्या जागेत जाऊन थांबली. आम्ही पेन्सिल्व्हानिया राज्यातल्या फिलाडेल्फियाला येऊन पोचलो असल्याचे जाहीर केले गेले. रस्ता ओलांडून पलीकडे असलेल्या इमारतीमधली लिबर्टी बेल जवळून आणि जवळच असलेला इंडिपेन्डन्स हॉल मात्र बाहेरूनच पाहून सर्वांनी तासाभरात परत यायचे आहे अशी सूचना झाली. दोन तीनशे वर्षांपूर्वी बनवलेली, त्यानंतर भंग पावलेली आणि आवाज न करणारी एक घंटा कोणी जिवापाड जतन करून ठेवली असेल याची मला पुसटशी कल्पनाही नव्हती आणि ती पहायला आपण सातासमुद्रापलीकडे जाऊ असे स्वप्नातसुध्दा वाटले नव्हते. त्यामुळे लिबर्टी बेल हे नांव ऐकून त्यातून कांही बोध झाला नाही. अशा प्रकारच्या सहलीत मार्गदर्शकाच्या सोबत घोळक्यात राहणे फायदेशीर असते म्हणून कांहीशा अनिच्छेनेच उठून आम्ही त्याच्या मागोमाग गेलो.

लिबर्टी बेल सेंटरमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूच्या भिंतींवर अनेक सचित्र फलक लावलेले पहायला मिळाले. या ऐतिहासिक घंटेची कुळकथा आणि गेल्या अडीचशे वर्षांचा इतिहास सांगणारी खूप माहिती त्यात दिली होती पण त्यातले एकेक पॅनेल वाचण्याइतका वेळ आमच्याकडे नव्हता. त्यांचे मथळे वाचून आणि चित्रे पाहून साधारण कल्पना आली. सन १७५१ साली फिलीच्या (फिलाडेल्फियाचे संक्षिप्त नांव) स्टेट हाउसच्या इमारतीवर बसवण्यासाठी ही घंटा मागवली गेली. इंग्लंडमधल्या एका फाउंड्रीमध्ये तयार होऊन ती अमेरिकेत आली. पुढे ती भंग पावली, तिची दुरुस्ती करण्यात आली होती, पण ती पुन्हा जास्तच भंगली आणि वाजेनाशी झाली. तिच्या जागी तिच्याच आकाराची दुसरी घंटा टांगण्यात आली आणि ही घंटा प्रदर्शनार्थ वस्तू बनली. तिच्या आधारे अनेक दंतकथा रचल्या गेल्या आणि तिला अमेरिकेच्या जनमानसात एक अभूतपूर्व स्थान प्राप्त झाले. या कथांना ऐतिहासिक पुरावा नाहीच, त्यांच्या सत्यतेबद्दल शंका सुध्दा घेतल्या जातात, असे असले तरी बहुतेक लोक त्या ख-या मानतात आणि सगळ्या समतावादी विचारसरणीचे ही घंटा हे एक प्रतीक बनले आहे.

युरोपातील इंग्लंड, हॉलंड, स्वीडन वगैरे विविध देशातल्या लोकांचे अमेरिकेच्या पूर्व किना-यावर आगमन झाले आणि त्यांनी आपापल्या वसाहती स्थापन केल्या. आधी त्यांच्या आपापसात लढाया होत असत. अखेर इंग्लंडने सर्वांवर विजय मिळवून आपली सार्वभौम सत्ता स्थापन केली. त्यानंतर फिलाडेल्फिया शहराची भरभराट होऊन ते ब्रिटीश साम्राज्यातले लंडननंतर दुस-या क्रमांकाचे शहर ठरले. अर्थातच ते अमेरिकेतले सर्वात मोठे आणि महत्वाचे शहर झाले होते. अमेरिकेतल्या या पुढारलेल्या राज्यांचा विकास झाला त्याबरोबर तेथील लोकांच्या मनात स्वातंत्र्याची इच्छा जागृत झाली. स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश राजवटीबरोबर संघर्ष करून तेरा राज्यांनी ते मिळवले. त्यात पेन्सिल्व्हानिया हे एक प्रमुख होते. १७७४ साली फिलाडेल्फियाच्या स्टेट हाउसच्या इमारतीवरील ही घंटा वाजवून तिथल्या नागरिकांना एकत्र करण्यात आले आणि त्यांच्या समोर अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा वाचून दाखवण्यात आला. अशा रीतीने संपूर्ण जगाच्या इतिहासाला नवे वळण लावणा-या घटनेची ही घंटा एक साक्षीदार आहे असे समजले जाते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या इमारतीचे नांव बदलून इंडिपेन्डन्स हॉल असे ठेवण्यात आले, तसेच या घंटेचे लिबर्टी बेल असे नामकरण करण्यात आले. आज या दोन्ही ठिकाणांना तीर्थस्थानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

पुढे झालेल्या यादवी युध्दाच्या काळात ही घंटा म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याबरोबरच जनतेच्या व्यक्तीस्वातंत्र्याचीही प्रतीक बनली. उच्चनीच कांही नेणे भगवंत अशी शिकवण आपल्या संतांनी पूर्वापारपासून दिलेली आहे, पण अमेरिकेत वर्णभेदाचे भयानक स्वरूप अस्तित्वात असतांना सर्व माणसे समान आहेत (ऑल मेन आर बॉर्न इक्वल) या विचाराचा पुरस्कार तिथल्या कांही उदारमतवादी थोर विचारवंत राजकीय नेत्यांनी केला आणि त्यासाठी भीषण संघर्ष केला. त्या काळात समतेचे प्रतीक म्हणून या घंटेची निवड केली गेली. त्याला पडलेला तडा हा कदाचित तत्कालीन भेदभावसुध्दा दर्शवीत असेल. या घंटेची देशभर मिरवणूक काढण्यात आली आणि त्या यात्रेतून समतेचा संदेश गांवोगांवी पोचवण्यात आला. हा सगळा इतिहास सोडला तर या घंटेत फारसे प्रेक्षणीय असे कांही दिसणार नाही.

हॉल ऑफ इंडिपेन्डन्सच्या आंत जाऊन तो पाहण्यासाठी आमच्याकडे अवधी नव्हता आणि त्यासाठी लागणारी परवानगीही नव्हती. त्यामुळे ती ऐतिहासिक इमारत बाहेरूनच पाहून अडीचशे वर्षांपूर्वी अमेरिकेची संसद तिथे कशी भरत असेल याची कल्पना करून घेतली. त्या इमारतीच्या माथ्यावर बसवलेल्या लिबर्टी बेलच्या प्रतिकृतीचे दर्शन घेतले आणि परतीच्या प्रवासाला लागलो.


. . . . . . . . . . (क्रमशः)

Saturday, December 05, 2009

अमेरिकेची लघुसहल - तिसरा दिवस - ५


अमेरिकेची लघुसहल - तिसरा दिवस - ५ - वॉशिंग्टन डीसी - ५

कॅपिटॉल हिल समोर असलेल्या मॉलच्या दोन्ही बाजूंना ओळीने एकाहून एक सुरेख संग्रहालये आहेत. आमच्याकडे फक्त दोन तासांचाच अवधी असल्यामुळे उगाच धांवाधांव नकरता एकादेच म्यूजियम शांतपणे पाहून घ्यावे असा सल्ला आम्हाला आधीच मिळाला होता. अमेरिकेचा इतिहास किंवा भूगोल यात आम्हाला फारसा रस नव्हता आणि तशा प्रकारच्या जागा यापूर्वीही पाहिलेल्या होत्या आणि पुढेही दिसणार होत्या. रेड इंडियन लोकांचे चित्रविचित्र वेष पहायला मजा आली असली तरी ते पहायचा मोह टाळला. अशा प्रकारे एक एक कटाप करत अखेर दोन संग्रहालये शॉर्टलिस्टमध्ये आली. त्यातले एक नॅचरल हिस्टरीचे होते आणि दुसरे एअरोस्पेसबद्दल होते. डायनोसारसच्या हाडांचा सांगाडा अॅटलांटाच्या विमानतळावरच ठेवलेला पाहिला होता. तशाच प्रकारचे आणखी सांगाडे आणि नामशेष किंवा दुर्मिळ झालेल्या पशुपक्ष्यांची चित्रे पाहण्यापेक्षा विमाने आणि उपग्रह पाहण्याचे आकर्षण जास्त ठरले. माझ्यासाठी तर हा आवडीचा विषय होता. या विषयावर ऐकीव आणि वाचलेल्या माहितीच्या आधारावर मी दोन विस्तृत लेखमाला या ब्लॉगवर लिहिल्या आहेत. त्यामुळे मी जोर लावला आणि सहप्रवाशांना माझ्या बाजूने वळवून घेतले.

वॉशिंग्टन डीसी येथील स्मिथ्सोनियन नॅशनल एअर एँड स्पेस म्यूजियमला दिलेली भेट खरोखरच अपेक्षेइतकीच अविस्मरणीय ठरली. प्रवेश द्वारातून आंत शिरतांनाच अनेक विमाने, अग्निबाण आणि उपग्रह छताला टांगून ठेवलेले दिसतात. स्वागतिकेकडे जाऊन त्या जागेचे मार्गदर्शन करणारी पुस्तिका घेतली आणि मोहिमेवर निघालो, आकाशात उडणारी विमाने आणि अंतरिक्षात झेप घेणारे अग्निबाण व उपग्रह यांसाठी दोन वेगवेगळे विभाग केले आहेत. विमानांच्या विभागात राइट बंधूंनी सन १९०३ साली उडवलेले पहिले विमान पहायला मिळाले. वैमानिकासाठी बंद हवेशीर केबिन सोडा, बसायला साधी खुर्चीसुध्दा नाही, विमानाच्या सांगाड्याला धरून कधी उभे तर कधी आडवे होत रहायचे आणि झोंबणारा वारा अंगावर घेत स्वतःचा तसेच अवाढव्य आकाराच्या विमानाचा तोल सावरायचा हे केवढे मोठे दिव्य असेल याची कल्पना आली आणि 'दोज म्रग्निफिसेंट मेन इन देअर फ्लाइंग मशीन्स' या सिमेनात दाखवलेल्या त्या महापुरुषांबद्दल मनात असलेला आदर अनेक पटीने वाढला. त्यांच्यातल्या विल्बर आणि ऑर्विल या बंधूंची नांवे तरी इतिहासात अजरामर झाली. इतर अनेकांची कथा तर 'नाही चिरा नाही पणती' अशातलीच आहे. त्या सर्वच अनामिक साहसी वीरांच्या आठवणीने माझे कर आपोआप जुळले.

राइट बंधूंच्या पहिल्या वहिल्या उड्डाणानंतर २४ वर्षांनेतर चार्लस लिंडबर्ग या वैमानिकाने ३३ तास सलगपणे उडाण करून न्यूयॉर्कपासून पॅरिसपर्यंतचे अंतर कापले आणि अॅटलांटिक महासागरावरून एका दमात विमान उडवून नेणारा तो पहिला वैमानिक ठरला. त्याचे विमानसुध्दा या भागात पहायला मिळाले. आधी प्रोपेलर आणि नंतर जेट इंजिनांमध्ये आणि ते इंजिन वापरून तयार केलेल्या विमानांच्या रचनेत कशी प्रगती होत गेली याची सुरस कथा चित्रे, फोटो, मॉडेल्स आणि प्रत्यक्ष कांही विमाने यांच्या आधाराने या ठिकाणी सुरेखपणे मांडली आहेत. एका आधुनिक विमानाचे कॉकपिट कांचेच्या बंद दरवाजामागे मांडून ठेवले होते. तिकडे एक साधा दृष्टीक्षेपसुध्दा न टाकता "आपल्याला त्या खुर्चीवर बसून स्वतःचा फोटो काढायला मिळत नाही तर काय उपयोग? नुसता त्याचा फोटो कशाला काढायचा?" असा म्हणणारे एक सद्गृहस्थ दिसले. हे गृहस्थ बहुधा फक्त दिसेल त्या जागेच्या पार्श्वभूमीवर आपले किंवा आपल्या पत्नीचे छायाचित्र काढून घेणे एवढ्याच उद्देशाने तिथे आले असावेत. मायदेशी गेल्यानंतर आपण परदेशात काय काय पाहिले हे इतरांना दाखवणे यात धन्यता मानणा-यांपैकी ते असावेत. मी मात्र पहाण्यातच एवढा रंगून जात होतो की गळ्यातल्या कॅमे-याची आठवण रहात नव्हती.

मानवाने अंतराळात झेप घेऊन केलेल्या प्रगतीची कहाणी संग्रहालयाच्या दुस-या विभागात उलगडून दाखवली होती. सुरुवातीच्या काळापासून तयार केलेली रॉकेट्स, सॅटेलाइट्स आणि भविष्काळातल्या योजना वगैरे सारे कांही थोडक्यात पहायला मिळाले. नील आर्मस्ट्राँग, एड्विन आल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स अपोलो ११ मोहिमेवर जाऊन ज्या कोलंबिया मॉड्यूलमधून पृथ्वीवर परत आले ती या ठिकणी ठेवला आहे. शिवाय अंतराळवीरांच्या पूर्णाकृती प्रतिकृती ठेवून जीवंत देखावा उभा केला आहे. इतर अनेक मोहिमांबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. चंद्रावरून आणलेल्या दगडाचा एक तुकडा शोकेसमध्ये ठेवला असून त्याला स्पर्श करण्याची मुभा आहे. अंतराळवीरांचे स्पेससूट, अंतराळात गेल्यानंतर त्यांना देण्यात येणारे अन्नपदार्थ वगैरे अनेक मनोरंजक गोष्टी पहायला मिळतात. आमच्या कडे असलेला दोन तासांचा वेळसुध्दा हे म्यूजियम पहाण्यासाठी अपुराच होता, पण घड्याळाकडे पहात पहात कुठे थांबून तर कुठे न थांबता फेरफटका मारून घेतला आणि भोजनासाठी फूडमॉलकडे वललो.


. . . . . . . . . . (क्रमशः)