Saturday, July 27, 2013

ग्लास अर्धा भरलेला की अर्धा रिकामा ?



ग्लास अर्धा भरलेला की अर्धा रिकामा ? हा एक अतीशय प्रसिध्द प्रश्न आहे आणि नेहमी तोंडावर फेकला जातो. त्याचे उत्तर 'अर्धा रिकामा' असे दिले की त्यावर मोठे लेक्चर सुरू होते, तक्रारखोर वृत्ती सोडायचा आणि सकारात्मक दृष्टीकोन बाळगायचा सल्ला दिला जातो आणि 'अर्धा भरलेला' असे उत्तर दिले की त्या सकारात्मक दृष्टीकोनाचे कौतुक केले जाते, यामुळे तुम्ही आयुष्यात सुखी समाधानी रहाल असा भरोसा दिला जातो. सुप्रसिध्द कवी मंगेश पाडगावकरांनी त्यांच्या 'सांगा कसं जगायचं?' या कवितेमधूनसुध्दा हाच संदेश दिला आहे.
पेला अर्धा सरला आहे  असं सुद्धा म्हणता येतं।
पेला अर्धा भरला आहे  असं सुद्धा म्हणता येतं।
सरला आहे म्हणायचं  की भरला आहे म्हणायचं?
तुम्हीच ठरवा ।।
सांगा कसं जगायचं? तुम्हीच ठरवा ।।

ढोबळ मानाने पाहिलं तर हा उपदेश हितकारक आणि ठीकच आहे. पण गंमत म्हणजे हा पेला कशाने अर्धा भरला आहे याचा यात काही उल्लेखच नाही. पेल्यात काय आहे ते समजल्यावाचून जे काही आहे ते चांगल्यासाठी की वाईटासाठी हे कसे ठरवणार? स्व.कवी केशवसुत एका प्रसिध्द कवितेत म्हणतात, "अमुचा प्याला दुःखाचा, डोळे मिटुनी प्यायाचा।।"  तसे असले तर अर्धा ग्लास भरलेला आहे ही चांगली गोष्ट आहे की अर्धा रिकामा आहे हे समाधानकारक आहे? तेच केशवसुत दुस-या प्रसिध्द कवितेत लिहितात, "काठोकाठ भरु द्या पेला, फेस भराभर उसळू द्या ।" इथे अर्ध्या पेल्यावर त्यांचे समाधान होणार नाही.

दोन भाऊ एका नातेवाईकाकडे गेले. त्यांचे आदरातिथ्य त्याने सरबताने केले. एका भावाला डायबेटीस होता. तो म्हणाला, "मला अर्धा ग्लासच सरबत द्या बरं का." त्या नातेवाईकाने सरबताने अर्धे भरलेले दोन ग्लास आणले. त्यावर दुसरा भाऊ म्हणाला, "मला अर्धाच ग्लास सरबत का देता आहात?" एकजण त्याच्य मनाविरुध्द अर्धा ग्लास सरबत प्यायला तयार होतो आहे आणि दुसरा (फक्त) अर्धाच ग्लास मिळाला म्हणून नाराज आहे.

एका माणसाने "अर्धा ग्लास भरलेला की अर्धा रिकामा?" हा प्रश्न त्याच्या मित्राला विचारला. त्यावर त्याने सांगितले, "बाटलीमधून ग्लास भरतांना तू हा प्रश्न करत असलास, तर मी म्हणेन तो (अजून) अर्धाच भरला आहे, आणखी भर. थोड्या वेळाने आपण पीत असतांना हाच प्रश्न तू केलास तर मी म्हणेन आतापर्यंत अर्धाच ग्लास रिकामा केला आहे. थोडा वेळ थांब." म्हणजे हा प्रश्न केंव्हा विचारला जाणार आहे त्यावर त्याचे उत्तर अवलंबून आहे.

एका ठिकाणी टेबलावर खूप ग्लास ठेवलेले आहेत. त्यातल्या एका ग्लासकडे बोट दाखवून कोणी विचारले, "हा ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा?" त्यावर तुम्ही काय कराल?  टेबलावरल्या इतर पेल्यांकडे पहाल. बाकीचे सगळे ग्लास रिकामे असतील तर "हा ग्लास अर्धा भरलेला आहे" असे म्हणाल आणि बाकीचे सगळे पेले पूर्ण भरलेले असले तर "हा ग्लास अर्धा रिकामा आहे." असेच म्हणाल. इथे तुम्ही वस्तुस्थिती सांगत आहात. ते करतांना या ग्लासचे जे वेगळेपण आहे तेच दाखवत आहात. त्यात सकारात्मकता आणि नकारात्मकता कुठे आली ?

जीवनामध्येसुध्दा काही लोकांच्या बाबतीत त्यांना असेच वाटत नसेल कशावरून?

स्मृती ठेवुनी जाती - ८ - रवी काळे

जमखंडीच्या काळे रावसाहेबांचा धाकटा मुलगा रवी शाळेत माझ्याहून एक वर्षाने पुढे होता, वयाने कदाचित तो त्यापेक्षा जरासा जास्त मोठा असेल. तो नक्कीच माझ्यापेक्षा जास्त हुषार आणि समजूतदार होता. लहान वयात असतांना मला हे समजत असेल की नसेल कोण जाणे, पण माझ्या कळत नकळत मी त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत होतो एवढे मात्र खरे. त्या काळात त्याला माझ्याबद्दल काय वाटत होते किंवा काहीच वाटत नव्हते, त्याचे माझ्याकडे कितपत लक्ष होते वगैरे समजायचा मार्ग नाही. लहानपणी असले विचारसुध्दा कधी मनात आले नसतील आणि आता त्यावर विचार करून काही उपयोग नाही.

आमचे दोघांचेही प्राथमिक शाळेतले म्हणजे चौथीपर्यंतचे शिक्षण एका शाळेच्या इमारतीत, पाचवी ते सातवीसाठी मिडल् स्कूल दुसरीकडे आणि त्यानंतर हायस्कूलचे तिस-या ठिकाणी असे झाले. यामुळे आम्ही सलगपणे सगळी वर्षे एकाच शाळेत गेलो नाही, त्यात दोन वेळा खंड पडला. त्या काळात इयत्तेनुसार आणि त्यात पुन्हा तुकडीनुसार मुलांचे लहान लहान गट तयार होत असत. त्यामुळे माझ्या जवळच्या मित्रांचे कोंडाळे आणि रवीच्या दोस्तांचे टोळके वेगवेगळे होते. त्यात रवीचे जिगरी दोस्त नेहमीच त्याला वेढा घालून बसलेले असायचे. त्यामुळे मी त्याला थोड्या अंतरावरूनच पहात होतो. 'एक ओळखीचा मुलगा' याहून जास्त आणि 'जिवलग मित्र' याहून कमी असे एक नाते आमच्यामध्ये तयार होत गेले. लहानपणी आमची खूप गट्टी काही जमली नाही.

आपल्या वडिलांप्रमाणे रवीसुध्दा वर्णाने गोरा होता, अंगाने धष्टपुष्ट आणि दिसायला देखणा होता. कुशाग्र बुध्दीचे देणे त्याला मिळाले होते, दर वर्षी शाळेच्या प्रत्येक परीक्षेत तो पहिला नंबर मिळवत गेला. शिवाय वक्तृत्वस्पर्धा, निबंधस्पर्धा यासारख्या एक्स्ट्राकरिक्यूलर अॅक्टिव्हिटीजमध्येही भाग घेऊन बक्षिसे मिळवत होता. उत्साही आणि बोलका स्वभाव, हजरजबाबीपणा वगैरे गुणांमुळे शिक्षकांसह सर्वांनाच तो प्रिय होता. त्याच्यातल्या नेतृत्वगुणांमुळे त्याच्या मित्रमंडळींचा तो प्रमुख नेता होता. त्यांचा ग्रुप शाळेतल्या कट्यावर एकाद्या ठिकाणी जमून अगदी खळखळून हास्यविनोद, थट्टास्करी, टिंगलटवाळी वगैरे करतांना दिसत असे. एका शब्दात सांगायचे झाल्यास तो सर्वगुणसंपन्न होता. आमच्या शाळेतला त्या काळातला 'हीरो' होता. त्यामुळे त्याला फॉलो करावेसे वाटल्यास त्यात नवल नव्हते.

आम्ही शाळेत शिकत असतांना देशाची भाषावार राज्यपुनर्रचना झाली. मुंबई, मद्रास आणि हैदराबाद स्टेट्समधले कन्नडभाषी भाग मैसूर संस्थानाला जोडून त्याचे मैसूर राज्य करण्यात आले. काही वर्षांनंतर त्याला कर्नाटक हे नाव दिले गेले. यात आमचे गावसुध्दा मुंबईमधून मैसूरमध्ये गेले. पण राज्य बदलले की लगेच नवी पाठ्यपुस्तके, नवा अभ्यासक्रम, ते शिकवणारे प्रशिक्षित शिक्षक वगैरे तयार होणे शक्य नसते. त्यामुळे या राजकीय बदलाचे परिणाम शिक्षणक्षेत्रात होऊन नव्या राज्यांमध्ये सगळीकडे समान पाठ्यक्रम लागू व्हायला काही वर्षे जावी लागली. मध्यंतरीच्या काळात आमच्या सुरू असलेल्या अभ्यासक्रमात त्यामुळे लगेच काही बदल झाला नाही, फक्त आमच्या शालांत परीक्षा मैसूर राज्यातले बोर्ड घेऊ लागले. सुधीर काळेने म्हणजे रवीच्या मोठ्या भावाने या बोर्डाच्या पहिल्या दहांमध्ये नंबर मिळवला आणि आमच्या हायस्कूलचा नावलौकिक वाढवला. रवीने तो मान नुसता राखलाच नाही तर थेट बोर्डात पहिला नंबर पटकावला आणि शाळेच्या गौरवात मानाचा तुरा खोचला. 

कॉलेजच्या शिक्षणासाठी रवी पुण्याला गेला. त्यानंतर इंजिनियरिंगच्या शिक्षणासाठी मी पुण्याला गेलो तोपर्यंत तो मुंबईला आयआयटी मध्ये दाखल झाला होता आणि नोकरीसाठी मी मुंबईला गेलो तर त्याने पुण्यात नोकरी धरली. अशा प्रकारे आमची चुकामूक होत राहिली. पण कॉलेजच्या सुटीत तोही जमखंडीला येत असे तेंव्हा आमची तिथे भेट होत असे. मी इंजिनियरिंगला जाण्यापूर्वी माझ्या वडिलांच्याबरोबर काळे रावसाहेबांना म्हणजे रवीच्या वडिलांना भेटून आलो होतो आणि त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा मला फायदा झाला होता. त्याशिवाय रवीला भेटून मी इंजिनियरिंगचा अभ्यासक्रम कसा असतो, त्यानंतर कशा प्रकारचे काम असते वगैरेंबद्दल जमेल तेवढे विचारून घेत होतो. त्याने मेकॅनिकल इंजिनियरिंग घेतले होते. त्या शाखेची मी जास्त माहिती करून घेतली. त्याचा माझ्यावर एवढा प्रभाव पडला की मीसुध्दा मेकॅनिकल ब्रँचच घ्यायचे मनोमन ठरवून टाकले. 

पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या काळात सेलफोन किंवा इंटरनेट यासारखी सुलभ प्रसारमाध्यमे नव्हती. पत्र लिहून पोस्टात नेऊन टाकण्याचा भयंकर कंटाळा यायचा. अगदी जवळचे नातेवाईक सोडल्यास इतर कुणाला, त्यात पुन्हा कुठल्याही मित्राला मी कधी पत्र लिहिल्याचे किंवा मला कुणाचे पत्र आल्याचे आठवत नाही. अचानक किंवा ठरवून कोणा मित्राची भेट झाली तरच मग गप्पागोष्टींमधून सगळे काही सांगून आणि ऐकून घेणे होत असे. रवीचा एकादा मुंबईतला वर्गमित्र किंवा पुण्यात राहणारा माझा मित्र भेटला तर आता कोण कोण कुठे कुठे आहे आणि त्यांचे कसे चालले आहे याचे सगळे रिपोर्ट मिळत असत. रवी आता पुण्याला स्थायिक झाल्याचे त्यामधूनच मला कळले.

मध्ये दहा पंधरा वर्षे उलटून गेली. एकदा हैड्रॉलिक मशीन्स या विषयावरल्या एका सेमिनारला मी गेलो होतो. सुरुवातीच्याच एका प्रेझेंटेशननंतर प्रश्न विचारण्यासाठी एक डेलिगेट उभा राहिला. "आय अॅम पी.बी.काळे .." असे त्याने सांगताच मी कान टवकारले आणि वळून त्याच्याकडे पाहिले. रवीचे शाळेतले नाव वेगळे होते आणि त्याची आद्याक्षरे आमच्या हायस्कूलच्या आद्याक्षरांप्रमाणेच पी बी अशी होती हे मला ठाऊक होते. त्याचा आवाज ऐकल्यावर तर तो नक्की रवीच होता याची मला खात्री पटली. ते सेशन संपताच झालेल्या मध्यंतरात मी त्याच्या समोर जाऊन उभा राहिलो आणि 'रवी' अशी हाक मारली. त्यानेही मला लगेच ओळखले. आमच्या दोघांच्याही मेमरीमधल्या जुन्या फायली उघडल्या गेल्या. तो सेमिनार संपेपर्यंत आम्ही दोघे एकमेकाबरोबरच राहिलो आणि सेमिनारच्या कार्यक्रमातून जितका मोकळा वेळ मिळाला तितका वेळ एकमेकांशी बोलत राहिलो.

लहानपणच्या आठवणींची झटपट उजळणी झाल्यानंतर आमच्या संवादाची गाडी वर्तमानकाळात आली. योगायोगाने आम्ही दोघेही आपापल्या ऑफीसात एकाच प्रकारचे तांत्रिक काम करत होतो. किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या फॅक्टरीत तयार होत असलेल्या यंत्रांचे निरनिराळे पार्ट बनवत असतांना त्यांना एका मशीनकडून पुढल्या मशीन मध्ये घेऊन जाण्यासाठी लागणारी ऑटोमॅटिक ट्रान्स्फर मेकॅनिझम्स तो तयार करवून घेत होता आणि पॉवर स्टेशन्ससाठी लागणारी निराळ्या पध्दतीची हँडलिंग मेकॅनिझम्स मी बनवून घेत होतो. या दोन्हींमध्ये हैड्रॉलिक मोटर्स, सिलिंडर्स आणि त्यांना कंट्रोल करण्यासाठी लागणारे पंप, व्हॉल्व्हज वगैरेंचाच मुख्यतः उपयोग केला जात असल्यामुळे त्या विषयावरील परिसंवादाला आम्ही तिथे गेलो होतो. रवीच्या कारखान्यातल्या यंत्रांबद्दल आणि ती डिझाइन करण्यापासून कार्यान्वित करण्यापर्यंत कोणकोणती दिव्ये करावी लागतात आणि त्यात यश मिळाल्यावर होणारा आनंद कसा अलौकिक असतो याबद्दल तो सांगत होता आणि माझे तशा प्रकारचे कडू गोड अनुभव मी सांगत होतो. अशा प्रकारच्या क्रिएटिव्ह कामाची दोघांनाही मनापासून आवड होती आणि दुसरीकडे ते कसे केले जाते हे समजून घेण्यात तितकीच उत्सुकता होती.  बोलताबोलता तो एकदम म्हणाला, "मी वाटल्यास एक जास्तीचा दिवस इथे राहतो, तुझे काम मला दाखवशील का?"
मी सांगितले, "अरे, इथे माझे फक्त ऑफीस आहे आणि त्यात फक्त माझे टेबल आणि खुर्ची आहे. माझी यंत्रे तयार करायचे काम भारतभरात विखुरलेल्या निरनिराळ्या कारखान्यांमध्ये चालते."
तो म्हणाला, "हे कसे शक्य आहे? आपण कागदावर रेघोट्या मारल्या, त्या दुस-याला समजल्या आणि त्याने त्याबरहुकूम काही तयार केले आणि ते अपेक्षेनुसार व्यवस्थित चालले असे होणे कधी तरी शक्य आहे का? त्याचा साधा एक लहानसा भागसुध्दा अगदी आपल्याला पाहिजे तसाच पहिल्या प्रयत्नात बनत नाही असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे."
मी म्हंटले, "तुझे बरोबर आहे. माझासुध्दा अगदी तसाच अनुभव आहे. पण मला यातूनच मार्ग काढून काम करून घेणे भाग आहे. कागदावर मारलेल्या रेघोट्या इतरांना समजावून सांगून त्यातले महत्वाचे मुद्दे त्यांना दाखवून द्यावे लागतात. उत्पादन होत असतांना त्यामधील प्रत्येक स्टेपवर अत्यंत कडक क्वालिटी कंट्रोल करावा लागतो. आधी मॉडेल्स बनवून किंवा ट्रायल्स घेऊन त्यातली अनिश्चितता शक्य तेवढी कमी करावी लागते आणि यासाठी मी आणि माझे सहकारी सगळीकडे फिरून तिथल्या कारखान्यांमधल्या शॉपफ्लोअरवर जाऊन तिथे नेमके काय चालले आहे ते स्वतः पहात असतात. वगैरे वगैरे वगैरे."

रवीची काम करण्याची पध्दत आणि त्यामागे असलेल्या गरजा वेगळ्या होत्या. त्याच्या फॅक्टरीत जे नवे मेकॅनिझम पाहिजे असेल ते अगदी कमी वेळात तयार करवून घेणे अत्यंत आवश्यक होते. पूर्वीचा अनुभव आणि ज्ञान यांच्या जोरावर आधी पटापट एक कच्चा आराखडा तयार करायचा, मग स्टोअरमध्ये जाऊन कोणता कच्चा माल तिथे उपलब्ध आहे, कोणती उपकरणे स्टोअरमध्ये किंवा बाजारात लगेच मिळू शकतात ते पहायचे आणि त्यानुसार त्या आराखड्यात बदल करून स्केचेस बनवायची, वर्कशॉपमध्ये जाऊन तिथे कोणती यंत्रे मोकळी आहेत ते पाहून त्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा याचा विचार करायचा अशा पध्दतीने झटपट काही तरी तयार करवून घ्यायचे, ते चालवून पहातांना जे जे अनपेक्षित असे घडेल त्याचा विचार करून लगेच त्यात फेरफार करायचा. असे करताकरता ते यंत्र अपेक्षेनुसार काम करायला लागले की कारखान्यात त्याची उभारणी करायची. हे सगळे करण्यासाठी त्याच्याकडे फक्त काही दिवस असत आणि अशी कामे एकापाठोपाठ येत असत. त्या मानाने माझ्या कामाची शेड्यूल्स बरीच ऐसपैस आणि लवचीक असत.

त्या वेळच्या भेटीमध्ये आम्ही काही इतर विषयांवरही संवाद साधला होता. सेमिनारमधल्या स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवणामधले पदार्थ वाढून घेतांना रवी आपला हात थोडा आखडताच घेत होता. रोजच्या जेवणातसुध्दा तो मुख्यतः सॅलड आणि भाज्याच जास्त प्रमाणात घेतो हे त्याने सांगितले होते. त्यातून त्याचे वजन कमी झाल्यासारखे दिसत नसले तरी तो त्याबद्दल कॉन्शस होता. त्यासाठी आणखी प्रयत्न करायचे ठरवत होता. हे सगळे बोलणे झाल्यानंतर आम्ही एकमेकांच्या संपर्कात रहायचे कबूल केले, पण कामाच्या रगाड्यात आणि आपापल्या संसाराच्या विवंचनांमध्ये आम्ही अडकतच गेलो. पुरेशी व सुलभ अशी संपर्कसाधने नसल्यामुळेही संपर्क साधणे शक्य झाले नाही. हळूहळू आम्ही ही भेट विसरून गेलो. काही वर्षांनंतर पुण्यातल्या एका मित्राकडून कळले की रवीला अचानक मासिव्ह हार्ट अटॅक आला आणि त्यातून तो वाचू शकला नाही. आरोग्याच्या दृष्टीने तो करत असलेले प्रयत्न कदाचित पुरेसे नव्हते किंवा त्याला आधीच उशीर झाला होता. कदाचित जे घडले ते टाळण्यासारखे नसेलच. त्यानंतर फक्त त्याच्या आठवणीच शिल्लक राहिल्या.

Friday, July 26, 2013

स्मृती ठेवुनी जाती - ७ - काळे रावसाहेब

काळे रावसाहेब माझ्या वडिलांचे मित्र आणि एके काळचे सहकारी होते. त्यांच्या करीयरच्या सुरुवातीच्या काळात ते दोघेही जमखंडी संस्थानच्या राज्यकारभाराचे काम पहात होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व संस्थानांचे विलीनीकरण करण्यात आले आणि संस्थानांच्या सरकारी नोकरीत असलेल्या सेवकांना राज्य सरकारांच्या सेवेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले. स्थानिक सरकारेच बरखास्त होणार असल्यामुळे राज्यात दुसरीकडे जिथे रिकामी जागा असेल तिथे त्यांना जावे लागणार होते. काळे रावसाहेबांचा गावात मोठा वाडा होता, जमीन जायदाद, खूप मानसन्मान, प्रतिष्ठा वगैरे होती, आर्थिक दृष्ट्या सुस्थिती होती. ते जमखंडीतच राहिले किंवा नोकरीसाठी बाहेरगावी न जाता तिथेच रहायचे त्यांनी ठरवले असेल. माझ्या वडिलांकडे हा पर्याय उपलब्ध नव्हता. त्या काळच्या मुंबई इलाख्याच्या स्टेट गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये ते रुजू झाले आणि जिथे पोस्टिंग मिळाले तिथे चालले गेले. त्यानंतर सुध्दा त्यांच्या एका गावाहून दुस-या गावात अशा सारख्या बदल्या होत राहिल्या. आमचे मोठे एकत्र कुटुंब जमखंडीच्या घरातच रहायचे आणि वडील परगावी नोकरीच्या ठिकाणी एकटेच रहायचे. दर महिन्या दोन महिन्यात एकदा घरी येऊन नोकरीच्या जागी परत जायचे. मला समजायला लागल्यापासून माझे वडील रिटायर होईपर्यंत हीच परिस्थिती राहिली होती.

संस्थान खालसा झाल्यानंतरसुध्दा भूतपूर्व राजांचा राजवाडा आणि इतर बरीच स्थावर जंगम मालमत्ता पटवर्धनांकडे राहिली होती. उमारामेश्वर नावाचे जमखंडी गावातले सर्वात सुंदर आणि त्या काळातल्या मानाने आधुनिक बांधणीचे आणि प्रेक्षणीय असे देऊळ होते. गावातल्या त्या एकाच देवळात छान सजवलेला मोठा सभामंटप होता, तिथे जमीनीवर गुळगुळीत (कदाचित संगमरवरी) फरशा आणि छताला हंड्याझुंबरे टांगलेली होती. समोर मोठी मोकळी जागा होती. हे मंदिरही बहुधा भूतपूर्व राजाच्या खाजगी मालकीचे असावे. त्याच्या सगळ्या मालमत्तेसंबंधीचे काम सांभाळण्यासाठी उमारामेश्वराच्या देवळाच्या आवारातच एक कचेरी होती. काळे रावसाहेब जमखंडीमध्ये राहून त्या कचेरीचे काम पहात होते. माझे वडील जेंव्हा जेंव्हा आम्हाला भेटायला जमखंडीला यायचे तेंव्हा तिथल्या स्थानिक मित्रमंडळींना गप्पा मारायला घरी बोलावत असत किंवा त्यांच्यापैकी कोणाकडे सगळे मित्र जमत असत. या मित्रांच्या यादीत काळे रावसाहेबांचे नाव सर्वात पहिले असायचे.

मी अगदी लहान म्हणजे पाच सहा वर्षांचा असतांना एकदा काळे रावसाहेब माझ्या वडिलांना भेटायला आले होते आणि बैठकीच्या खोलीत बसले होते. माझ्या हातात पिण्याच्या पाण्याचे तांब्या भांडे देऊन त्यांना नेऊन द्यायला सांगितले गेले. ते घेऊन मी त्या खोलीत गेलो पण हातातल्या वस्तू तशाच हातात धरून इकडे तिकडे पहात उभा राहिलो.
"अरे असा का उभा आहेस? पाणी आणलं आहेस तर ते पटकन दे ना." असे वडिलांनी म्हणताच मी म्हणालो, "मला काळे रावसाहेबांना पाणी नेऊन द्यायला सांगितले होते, ते कुठे आहेत?"
"हे काय इथे बसले आहेत. दिसत नाहीत का?"
"पण हे तर गोरे पान दिसताहेत."
त्यांचा गोरा पान रंग आणि रुबाबदार व्यक्तीमत्व पाहून त्यांचे आडनाव 'काळे' असू शकते हे माझ्या बालबुध्दीला पटतच नव्हते. हा किस्सा नंतरही अनेक वेळा मला ऐकायला मिळाला. विशेषतः वडिलांनी ठेवलेल्या मित्रांच्या बैठकीचे आमंत्रण द्यायचे काम करतांना मला त्याची आठवण करून दिली जात असे. त्या काळात टेलीफोन नव्हते आणि आमच्याकडे नोकरचाकर नसल्यामुळे कुणालाही कसलाही निरोप कळवण्यासाठी घरातल्या मुलांनाच निरोप देऊन धाडले जात असे. आम्हालाही त्याची मौज वाटायची, अनेक लोकांच्या घरी आमच्या वयाची मुले म्हणजे आमचे मित्र असायचे, त्यांच्याबरोबर खेळायची किंवा गप्पा मारायची आयती संधी मिळायची आणि घरातल्या काकूंकडून हातावर पेढा, लाडू, वडी असा काही खाऊसुध्दा ठेवला जायचा. माझा स्वभाव थोडा भिडस्त असला तरी ओळखीच्या लोकांकडे जायला मला आवडत असे. थोडासा विरोध करून मी हळदीकुंकवाचे निरोपसुध्दा पोचवायचे काम केले आहे.

ज्यांच्याकडे निरोप घेऊन जायला मला आवडत असे त्यात काळे रावसाहेबांचे घरही होते. मुख्य म्हणजे त्या काकांचे उमदे आणि हसतमुख व्यक्तीमत्व. मला पढवून पाठवलेला निरोप मी सांगितल्यावर तुसडेपणाने "बरं आहे" म्हणून किंवा नुसतीच मुंडी हलवून ते माझी बोळवण करत नसत. थांबवून घेऊन अत्यंत आपुलकीने माझी चौकशी आणि कौतुक करत, थोडी थट्टामस्करीही करत, एकादे सोपे कोडे घालत. त्या काळातला जनरेशन गॅप फारच मोठा असायचा. काही तिरसट मोठी माणसे लहान मुलांशी धड बोलायलासुध्दा तयार नसत. जॉली स्वभावाचे काळे रावसाहेब त्याला अपवाद होते. त्यामुळे मला ते आवडत असत.

त्यांची मुलेही अतीशय हुषार होती. दोघेही मुलगे शालांत परीक्षेमध्ये बोर्डाच्या मेरिट लिस्टमध्ये आले. त्याच्या वीस पंचवीस वर्षे आधी किंवा त्याच्याही पूर्वी जमखंडीचे रानडे (ते नंतर गुरुदेव रानडे म्हणून प्रसिध्द झाले) बोर्डात आले होते. त्यांचे उदाहरण आम्हाला नेहमी दाखवले जात असे. काळे रावसाहेबांचे दोन्ही मुलगे पुढेही चांगले शिक्षण घेऊन उत्कृष्ट प्रतीचे इंजिनियर झाले आणि आपापल्या क्षेत्रात खूप वरच्या पदावर जाऊन पोचले. माझ्या पिढीमधली आमच्या ओळखीतली ही बहुतेक पहिलीच इंजिनियरिंगची उदाहरणे होती. आमच्या गावातल्या सुशिक्षित लोकांमध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतके थोडे डॉक्टर होते, अनेक वकील होते, त्याहून जास्त शाळामास्तर होते, पण निदान आमच्या ओळखीत तरी एकही मात्र इंजिनियर नव्हता.


मी जेंव्हा कॉलेजला गेलो तेंव्हा शिक्षणाची कोणती शाखा घ्यायची हे मार्गदर्शन करू शकणारे लोक गावात फार कमी होते. काही लोकांनी तर भीती दाखवायचे सत्कार्य सुध्दा केले. इंजिनियरिंगचा अभ्यास खूप भयानक असतो तो मला कसा जमणार? त्यात खूप शारीरिक कष्ट करावे लागतात. ते मला पेलणार आहेत का? त्या शिक्षणाला खूप खर्च येतो तो करायची आमची कुवत किंवा तयारी आहे का? वगैरे अनेक शंकाकुशंका काढल्या गेल्या. त्या सगळ्यांमध्ये तथ्य नव्हते असे म्हणता येणार नाही. पण त्यामुळे मला नैराश्य वाटायला लागले होते. काळे रावसाहेबांची मुले इंजिनियरिंग कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे माझ्या वडिलांसह मी त्यांना भेटायला गेलो. त्यांनी मात्र अगदी स्पष्ट मार्गदर्शन केले आणि संभाव्य अडचणींची यथार्थ कल्पनाही दिली. या शिक्षणाचा फार मोठा बाऊ करण्याची आवश्यकता नाही, पण ही वाट काही प्रमाणात खडतर आहे. निर्धार आणि काबाडकष्टांची मनाची तयारी ठेवली तर काही कठीण जाणार नाही. अॅडमिशन मिळणे हा पहिला सर्वात मोठा अडथळा पार केला तर मी बिनधास्त पुढे जावे असाच सल्ला त्यांनी दिला. संभ्रमाच्या त्या अवस्थेत तो निर्णायक ठरला.

मी कॉलेजमध्ये शिकत असतांनाच माझे वडील निवर्तले आणि घर कोलमडून गेले. त्यानंतर मला जमखंडीला जायची गरज किंवा कारण उरले नाही. तिथल्या लोकांशी संपर्क उरला नाही. काळे रावसाहेब गेले असे कधीतरी कोणाकडून कानावर आले आणि डोळे आपोआप पाणावले.  


Saturday, July 20, 2013

तेथे कर माझे जुळती - १५ - डॉ.जयंत नारळीकर

माझ्या आयुष्यात मला प्रत्यक्ष भेटलेल्या ज्या मोठ्या व्यक्तींच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल या सदरात दोन शब्द लिहायचे असे मी पाच वर्षांपूर्वी ठरवले होते. यातल्या काही व्यक्तीबद्दल ग्रंथ आणि अगणित लेख लिहिले गेले आहेत. त्या महान लोकांची समग्र माहिती थोडक्यात देणे मला शक्यही नाही, माझी तेवढी पात्रताही नाही आणि हे लेख लिहिण्यामागे माझा तसा उद्देशही नाही. "मी सुध्दा या थोर लोकांना भेटलो आहे." अशी शेखी मारण्याचे माझे वय आता राहिले नाही, पण त्यांना भेटल्याचा मला निश्चितच आनंद आणि अभिमान वाटतो. फक्त माझ्या कांही जुन्या व्यक्तिगत आठवणी आणि या महान लोकांचा माझ्या जीवनावर पडलेला प्रभाव यासंबंधी माझे चार शब्द मी या निमित्याने मांडणार आहे. यामुळे यातसुध्दा कदाचित थोडासा मीच डोकावलेला दिसणार याला काही इलाज नाही. या लेख मालिकेतले हे पंधरावे पुष्प प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांना त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्य समर्पित करीत आहे.

मी कॉलेजात शिकत असतांना त्या काळातल्या वर्तमानपत्रांमध्ये एक सनसनाटी बातमी आली होती. ती अशी होती, "एका तरुण भारतीय, त्यातही महाराष्ट्रीय शास्त्रज्ञाने आइन्स्टाईनला खोटे ठरवले."  त्या काळात आल्बर्ट आईन्स्टाईन हा जगातला सर्वात मोठा शास्त्रज्ञ गणला गेला होता, कदाचित आजसुध्दा असेल. त्याच्या आधी सर आयझॅक न्यूटनला सर्वात मोठा मानले जात होते, पण आईन्स्टाईनने न्यूटनला खोटे पाडल्यामुळे तो सर्वात मोठा शास्त्रज्ञ झाला. या न्यायाने पाहता हा तरुण महाराष्ट्रीय शास्त्रज्ञ आईन्स्टाईनपेक्षाही मोठा म्हणजे जगातला सर्वश्रेष्ठ शास्त्रज्ञ ठरायला पाहिजे असा तर्क काही लोक लावत होते. या शास्त्रज्ञाचे नाव होते डॉ.जयंत नारळीकर. त्यानंतर वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके वगैरेंमध्ये जयंतराव नारळीकरांचा परिचय छापून येत राहिला. त्यांचा जन्म कुठे आणि कधी झाला, शिक्षण कुठे झाले, त्यांचे थोर आईवडील कोण आहेत, त्यांनी केलेले विक्रम आणि त्यांचे कार्य वगैरेंचा भरणा त्या वृत्तांतांमध्ये असायचा. डॉ.जयंत नारळीकरांनी लावलेला शोध त्यांचा एकट्यांचा नव्हता, सुप्रसिध्द खगोलशास्त्री आणि जयंतरावांचे गुरू डॉ.फ्रेड हॉइल या जोडीने मिळून एक नवा सिध्दांत मांडलाहोता आणि तो त्या जोडीच्या नावाने प्रसिध्द झाला होता. ही माहिती पुढे आली. त्या काळातल्या वार्ताहरांनासुध्दा विज्ञान या विषयाचे वावडे असायचे. यामुळे हॉइल आणि नारळीकरांनी नेमका कसला शोध लावला होता हे काही समजले नाही. पहायला गेल्यास आईन्स्टाईनने काय सांगितले होते आणि न्यूटनची कोणती चूक दाखवून दिली होती याचाही त्या काळात मला पत्ता नव्हताच, त्यामुळे त्यातले काय खरे आणि काय खोटे हे समजून घेण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.

डॉ.जयंत नारळीकर हे पुण्याला येणार आहेत, त्यांचा जाहीर सत्कार होणार आहे आणि त्यात ते भाषण करणार आहेत असे समजल्यावर आमचा आनंद गगनात मावला नाही. त्या दिवशी आम्ही काही मित्र त्या जागी जाऊन पोचलो. तरुण, तेजस्वी, हंसतमुख आणि अत्यंत सालस असे जयंतराव मंचावर आले आणि एका जादूई स्मितहास्यानेच त्यांनी सर्व प्रेक्षकांची मने काबीज केली. त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल शक्य तितक्या सोप्या भाषेत ते बराच वेळ बोलले. पण त्यात आईन्स्टाईनला खोटे ठरवण्याचा उल्लेख कुठेच आला नाही. अंतराळाविषयीचे माझे त्या वेळचे ज्ञान फारच तोटके होते. आपल्या पृथ्वीभोवती चंद्र फिरतो, मंगळ, गुरू, शनी, नेपच्यून वगैरे इतर ग्रहांसमवेत पृथ्वी सूर्याभोवती फिरते. तसेच ती स्वतःभोवती फिरते. त्यामुळे आकाशात रात्री दिसणारे अगणित तारे आपल्याला पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकतांना दिसतात. पण खरे तर ते जागच्या जागीच असतात. फक्त  एवढेच शाळेत शिकलेले खगोलशास्त्र मला तेंव्हा ठाऊक होते. या असंख्य ताऱ्यांचेसुध्दा अनेक प्रकार असतात, त्यांनाही आयुष्य असते, त्यात बालपण, यौवन आणि वार्धक्य अशा अवस्था असतात अशा प्रकारच्या शक्यतासुध्दा तोंपर्यंत कधी मनात आल्या नव्हता. त्यामुळे डॉ.जयंत नारळीकर यांनी त्यांच्या व्याख्यानात काय काय सांगितले त्याचा अर्थ मला तेंव्हा काही नीटसा समजला नाही. फक्त त्यांची बोलण्याची शैली, शब्दोच्चार, वाक्यांची फेक, एकादा मुद्दा मांडण्यातले कौशल्य असे गुण जाणवले आणि त्यावर टाळ्या दिल्या. इतर श्रोत्यांच्याही बाबतीत कदाचित असेच घडले असल्याची शक्यता आहे. मंदपणे लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्या बाबतीत जगभरातल्या प्रयोगशाळांमध्ये खूप संशोधन केले जात आहे, ते तारे सुध्दा एका जागी स्थिर नसून सतत एकमेकांपासून दूर दूर जात असतात असे कोणी म्हणत असत, पण नारळीकरांचे मत यावर वेगळे होते.  इतपत त्यांच्या सांगण्याचा उलगडा झाला.

त्यानंतरच्या काळात डॉ.जयंत नारळीकर हे नाव वर्तमानपत्रांमध्ये येत राहिले ते आजतागायत येतेच आहे. त्यांचे शोधनिबंध कुठे प्रसिध्द झाले, त्यांना कोणती पदवी मिळाली, कुठला सन्मान मिळाला वगैरेची माहिती त्यात येत असे. तरुण वयातच ते आंतरराष्ट्रीय पातळीवरले तज्ज्ञ गणले जात आहेत हे त्यावरून दिसून येत होते. ते भारतात परत येणार आहेत असे वाचण्यात आले. ते आमच्या अणुशक्ती खात्यातल्या टी आय एफ आरमध्ये संशोधन करायला आले आहेत असे एक दिवस समजले तेंव्हा आता लवकरच आपल्याला त्यांना प्रत्यक्ष भेटताही येईल असे वाटून माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांची संस्था मुंबईतच असल्यामुळे एकाद्या कार्यक्रमात त्यांना भेटण्याची एकादी तरी संधी लवकरच मिळेल असे मला वाटले होते, पण अशी संधी अगदी अनपेक्षितपणे आणि अनपेक्षित जागी समोर चालून आली.

मी नोकरीला लागल्यापासूनच ऑफिसच्या कामासाठी नेहमी रेल्वेच्या पहिल्या वर्गात प्रवास करत होतो आणि पदोन्नती झाल्यानंतर विमानाने जाऊ लागलो होतो, पण त्या काळातला पगार बेताचाच असल्यामुळे वैयक्तिक आयुष्यात रेल्वेचा दुसरा वर्गच परवडण्यासारखा होता. त्यामुळे आम्ही सगळे मिळून कुठेही जातांना साध्या स्लीपरकोचनेच जात होतो. पत्नी आणि मुले याबद्दल किंचित असूया दाखवत असत. त्यांनाही एकदा वरच्या दर्जाचा प्रवास घडवून आणायचे ठरवले आणि मी त्याकाळी नव्यानेच सुरू झालेल्या वातानुकूलित स्लीपरची तिकीटे काढली. आम्ही सर्वजण महालक्ष्मी एक्सप्रेसच्या थंडगार डब्यातल्या आमच्या खणात जाऊन बसलो. गाडी सुरू व्हायला वेळ असल्यामुळे पडदा लावून घेतला नव्हता. त्यामुळे आमच्या समोरूनच एक ओळखीचा चेहेरा पुढे जातांना दिसला आणि आमच्या बाजूच्याच केबिनमध्ये त्यांनी प्रवेश केला. मी पॅसेजमध्ये जाऊन हळूच बाजूला पाहिले तर साक्षात तिथे डॉ.जयंत नारळीकर त्यांच्या पत्नीसह बसले होते. आमचे आयडॉल असे इतक्या जवळ आले होते आणि आम्हाला डिस्टर्ब करायला किंवा अडवायला तिथे इतर कोणीही नव्हते हे पाहिल्यावर आम्हाला राहवले जाणे शक्यच नव्हते. त्यांना जागेवर बसून स्थिरस्थावर होण्यासाठी दोन तीन मिनिटे दिली आणि त्यांनी पडदा लावून घ्यायच्या आधीच आम्ही त्यांच्या केबिनमध्ये जाऊन दाखल झालो.

आम्ही तर त्यांना कित्येक वर्षे आधीपासून ओळखत होतो, फक्त आमची ओळख त्यांना करून दिली. अशा वेळी काय बोलावे हे त्या क्षणी सुचतच नाही. मग मुंबईतले हवामान आणि भारतातले व अणुशक्तीखात्यातले वातावरण वगैरेंवर जुजबी चर्चा केली, त्यांनीही आमची थोडी औपचारिक विचारपूस केली, हस्तांदोलन केले, प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आणि निरोप घेतला. आपल्या केबिनमध्ये येऊन झोपून गेलो. ते दोघे कोल्हापूरपर्यंत जाणार होते, पण आम्हाला मिरजेलाच उतरायचे होते. आम्ही त्यावेळी त्यांना डिस्टर्ब करणे योग्य नव्हते. 

डॉ.जयंत नारळीकर आणि मी एकाच सरकारी खात्यात काम करत असल्यामुळे एकादी कमिटी किंवा सबकमिटी, वर्किंग ग्रुप, टास्क फोर्स वगैरेंमध्ये किंवा सेमिनार, कॉन्फरन्स, वर्कशॉप, ट्रेनिंग प्रोग्रॅम वगैरेंमध्ये भेटण्याची शक्यता होती, निदान कशाचे तरी उद्घाटन, कोणाचा निरोप समारंभ, एकाद्या सहकाऱ्याच्या घरातल्या लग्नाचे रिसेप्शन अशा जागी तरी आमची गाठ पडेलच असे वाटले होते. आमच्या खात्यातल्या ज्या लोकांशी माझे कधीच प्रत्यक्ष काम पडले नव्हते अशा अनेक उच्चपदस्थांबरोबर अशा निमित्याने माझा परिचय झाला होता. पण नारळीकरांच्या बाबतीत मला अशी संधी मिळालीच नाही. भारतात परतण्याच्या आधीच ते इतक्या वरच्या पातळीवर जाऊन पोचलेले होते की इथे आल्यानंतर ते या बाबतीत कदाचित थोडेसे उदासीन राहिले असावेत. डिपार्टमेंटमध्ये त्यांनी कधीच हाय प्रोफाईल प्रेझेन्स ठेवली नसावी. त्यांच्यासाठी पुण्याला आयुका ही वेगळी संस्था स्थापन केली गेली आणि तिथल्या संचालकपदावर ते गेले आहेत असे एक दिवस समजले.

मी पुन्हा कधी नारळीकरांना प्रत्यक्ष भेटू शकलो नसलो तरी निरनिराळ्या प्रसारमाध्यमांमध्ये मी त्यांना नेहमी पहात आलो आहे. अॅस्ट्रॉनॉमी या अत्यंत स्पेशलाइज्ड विषयामधील उच्च दर्जाच्या संशोधनाखेरीज विज्ञान विषयाचे शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार यावर ते खूप काम करत आले आहेत. सर्वसामान्य वाचकांसाठी आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक मनोरंजक पुस्तके लिहिली. लोकप्रिय विज्ञान (पॉप्युलर सायन्स) तसेच विज्ञानकथा (सायन्स फिक्शन) या दोन्हींमध्ये त्यांनी मोलाची भर घातली. त्यांनी लिहिलेली पुस्तके लोकांना खूप आवडली. त्यांनाही पुस्कार मिळाले. त्यांनी लिहिलेले अनेक लेख वर्तमानपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये आले. टेलिव्हिजनवर त्यांचे नेहमी दर्शन घडत आले, विविध प्रसंगी त्यांच्या मुलाखती घेऊन दाखवण्यात आल्या. पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण यासारखे सर्वोच्च सन्मान त्यांना दिले गेले, याशिवाय इतर अनेक पुरस्कार त्याना मिळाले. भविष्यवाणी करणारे ज्योतिषशास्त्र (अॅस्ट्रॉलॉजी) या विषयाला सायन्स या सदराखाली आणण्याचे आटोकाट प्रयत्न एका मोठ्या राजकीय पुढाऱ्याने केले होते. त्यांची सत्ता जिथे चालत होती त्या भागात त्यांनी ते अंमलातही आणले असेल. डॉ.जयंत नारळीकर यांनी याबाबतचे वैज्ञानिक विचार परखडपणे सांगितले आणि चर्चांमधून ते प्रभावीपणे मांडले. त्यावर उलटसुलट चर्चा होत राहिली. अशा प्रकारे ते सतत प्रकाशझोतात राहिले. 

डॉ.जयंत नारळीकर यांनी दिलेल्या अनेक मुलाखतींपैकी काही गोष्टी माझ्या कायम लक्षात राहिल्या आहेत. ज्या काळात भारताला महासंगणक मिळू नये असे प्रयत्न प्रगत राष्ट्रांमध्ये चालले होते त्या काळात घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांना एक प्रश्न विचारला गेला "आता तुम्ही काय करणार? काँप्यूटरशिवाय आपला विषय विद्यार्थ्यांना कसा शिकवणार?"
त्यावर ते गंमतीने म्हणाले, "मला फक्त एक फळा आणि खडू मिळाला तरी माझा विषय शिकवायला तेवढे पुरेसे आहे."
त्यांना एकदा विचारले गेले, "तुमच्या या संशोधनाचा आम जनतेला काय फायदा मिळणार आहे?"
त्यावर त्यांनी हंसत हंसत सांगितले, "खरं सांगायचं तर मुळीसुध्दा नाही. मी आकाशातल्या अतीदूरस्थ ताऱ्यांचे निरीक्षण करत असतो. माझ्या या कामामुळे कोणालाही लगेच अन्न, वस्त्र, निवारा वगैरे मिळण्याची काही शक्यता नाही. पण मूलभूत विज्ञानामधील प्रगतीमुळेच माणसाला अनेक उपयुक्त असे शोध लागतात आणि त्यांच्या उपयोगाने त्याचे जीवन सुसह्य किंवा समृध्द बनते. नासासाठी विकसित केल्या गेलेल्या अनेक टेक्नॉलॉजीज आता रोजच्या जीवनावश्यक वस्तू बनवण्यासाठी कामाला येत आहेत."

नारळीकरांचा सहभाग असलेल्या एका चर्चासत्रामध्ये विश्वाची उत्पत्ती आणि पसारा यावर चर्चा झाली होती. एका हिंदुत्ववादी विदुषीनेही त्यात भाग घेतला होता. शास्त्रज्ञांनी केलेले प्रयोग, निरीक्षणे आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष याबद्दल नारळीकर शास्त्रीय माहिती देत होते, तर ती महिला कुठकुठल्या पोथ्यांचे संदर्भ देऊन भृगु, भारद्वाज वगैरे ऋषींनी काय काय सांगून ठेवले आहे हे सांगत होती. "पुराणकाळातले नारद मुनींसह आणखीही काही महापुरुष मंत्रशक्तीने विश्वभर संचार करत होते आणि हे सायंटिस्ट लोक आता कुठे फक्त चंद्रापर्यंत जाऊन पोचले आहेत." अशा प्रकारचे तारे तिने तोडल्यावर "यावर आपले काय म्हणणे आहे?" असे मुलाखत घेणारीने नारळीकरांना विचारले. त्यांनी जरासुध्दा विचलित न होता म्हंटले, "इट ईज नॉट फेअर टु कम्पेअर दीस फिंग्ज. माझे सांगणे आणि यांचे म्हणणे याची सांगड घालता येणार नाही. प्रत्यक्ष केलेल्या आणि जगन्मान्य झालेल्या संशोधनावरून मी बोलतो आहे. त्यातले प्रत्येक विधान कशाच्या आधारावर केले आहे हे मी सांगू शकतो. या विद्वान बाई फक्त पोथीतल्या गोष्टी (पुराणातली वांगी) सांगत आहेत. (त्याच्या मागे कसलेच स्पष्टीकरण नाही.)"

आज डॉ.जयंत नारळीकर यांच्या वयाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाल्याचे वाचले. त्यांना वाढदिवसानिमित्य आणि शतक पूर्ण करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा

Wednesday, July 17, 2013

विठ्ठल किती गावा ? (भाग ८ - अंतिम)

दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमाराला विठ्ठलाचे अभंग आणि भक्तीगीते यांचे सुरेल असे कार्यक्रम आयोजित केले जातात. बहुतेक वेळा त्यातल्या एकाद्या कार्यक्रमाला मी हजेरी लावतो. याचे मुख्य कारण म्हणजे मला ते अभंग, ती गाणी ऐकायला आवडतात. मला ती का आवडतात हे एक गूढ आहे. विठोबाचे नाव उच्चारल्याने आणि त्याचे दर्शन घेतल्याने अतीव आनंद होतो, देहभान हरपून जाते वगैरे वर्णने संतमंडळींनी केली आहेतच, माडगूळकर आणि खेबूडकरांसारख्या गीतकारांनीही केली आहेत. तसा थोडा फार अनुभव आपल्याला येतो असे सांगणारी माणसे भेटतात, देवळांमध्ये दर्शनाला आलेल्या काही भाविक लोकांच्या चेहे-यावर ते भाव उमटलेले दिसतात, पण मला स्वतःला मात्र असा कोणताच अनुभव आला नाही. कुठल्याचे देवाचे नाव घेताच मिठाई खाल्ल्याचा भास झाला नाही किंवा त्याच्याकडे पहात असतांना आजूबाजूला काय चालले आहे याची जाणीवही राहू नये असे काही झाले नाही. स्वर्ग, नरक, पुनर्जन्म, मोक्ष वगैरेंमध्ये मला काडीएवढाही इंटरेस्ट कधी वाटला नाही आणि कदाचित त्यामुळे पापपुण्याचा हिशोब ठेवणारा चित्रगुप्त आणि त्यावरून फैसला करणारा यमधर्म यांचेही महत्व वाटले नाही. देवाचे नुसते नाव जिभेवर घेतले किंवा त्याचे चित्र डोळ्यांनी पाहिले की पापाच्या राशी जळून जातात आणि पुण्याचे डोंगर उभे राहतात हे तर मला कधीच पटले नाही. पण असे असले तरी भजन, अभंग, भक्तीगीते वगैरे ऐकतांना मला खूप चांगले वाटते आणि मी त्यात इतके समरस होऊन ते गायन ऐकतो की क्वचित कधी तिथल्या श्रोत्यातला एकादा मुलगा किंवा मुलगी जाता जाता माझ्याही पाया पडून जाते.

गेल्या वर्षी आषाढी एकादशीच्या सुमाराला मी पुण्याला असतांना तिथे पण एक चांगला कार्यक्रम पाहिला होता आणि त्याबद्दल या ब्लॉगवर लिहिलेही होते. या वर्षी तर एकादशीच्या दहा बारा दिवसांपूर्वीच त्यानिमित्याने वाशीला पहिला सांगीतिक कार्यक्रम होऊन गेला. त्या वेळी सादर केली गेलेली गाणी ऐकता ऐकता त्या अनुरोधाने मला आणखी काही प्रसिध्द गाणी आठवत गेली. तेंव्हा त्यांचेच एक संकलन करायचे ठरवले. मराठी भाषेतच अशी गीते आणि अभंग असंख्य आहेत, त्यातली माझ्या माहितीतली आणि आवडती अशी काही गाणी मी या लेखमालिकेसाठी निवडली.

'विठ्ठल किती गावा ?' असे या लेखाचे शीर्षक ठेवले असल्यामुळे ज्या गीतांमध्ये विठोबाच्या गायनभक्तीचा उल्लेख आहे अशी गाणी आणि अभंग पहिल्या दोन भागात निवडले. यात संत तुकाराम महाराजांचे चार अभंग आणि स्व.माणिक वर्मा यांनी गायिलेली दोन भक्तीगीते होती. संत नामदेवांनी लिहिलेले सहा अभंग तिस-या भागात घेतले होते. त्यातले तीन विठ्ठलाच्या दर्शनासंबंधी आणि तीन त्याच्या नावाच्या उच्चारावर लिहिलेले होते. चौथ्या भागात संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले सहा अभंग घेतले होते. यात सगुण आणि निर्गुण अशा विठ्ठलाच्या दोन्ही प्रकारच्या रूपांमधून मिळणा-या अवर्णनीय आनंदाचे वर्णन ज्ञानदेवांनी केले आहे. संत एकनाथ, संत कान्होपात्रा, संत चोखामेळा आणि त्यांची पत्नी संत सोयराबाई यांचे अभंग पाचव्या भागात घेतले होते. विठ्ठलाला मातेच्या जागी मानून त्याला विठू माउली, विठाबाई वगैरे नावांनी संबोधन करून लिहिलेले अभंग आणि गीते सहाव्या भागात घेतली होती. विठ्ठलाच्या सावळ्या पण मनोहर अशा रूपाचे वर्णन करणारे अभंग आणि गीते सातव्या भागात गोळा केली होती. आता निरनिराळ्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकारांची राहिलेली गीते या आठव्या भागात एकत्र करून मी ही अष्टपदी संपवत आहे.  

विठोबाला 'माउली' असे संतांनी म्हंटले आहे, अर्थातच ही संतमंडळी त्याची आवडती 'लेकरे' झाली. अशा या लेकुरवाळ्या विठ्ठलाचे वर्णन खाली दिलेल्या अभंगात केले आहे. त्यात संत जनाबाईंनी हे वर्णन केले असल्यामुळे त्यांच्या काळामधले निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, गोरा कुंभार, चोखा मेळा, जीवा, बंका आणि नामदेव यांचे उल्लेख या अभंगात आहेत. संत एकनाथ आणि संत तुकाराम हे त्यानंतरच्या शतकांमध्ये होऊन गेले. या अभंगाच्या शेवटी 'जनी म्हणे' असे लिहिले असले तरी 'नामयाची जनी' अशी त्यांची नेहेमीसारखी सही नाही. कदाचित "संत जनाबाईंनी असा विचार केला असेल" अशी कल्पना करून हा अभंग आणखी कोणी तरी लिहिला असेल.

विठु माझा लेकुरवाळा । संगे गोपाळांचा मेळा ।।
  निवृत्‍ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी ।।१।।
  पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्‍ताबाई सुंदर ।।२।।
गोराकुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी ।।३।।
बंका कडेवरी, नामा करांगुली धरी ।।४।।
   जनी म्हणे गोपाळा, करी भक्‍तांचा सोहळा ।।५।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Vithu_Majha_Lekurvala

संत नामदेव महाराज विठ्ठलाचे लाडके भक्त होते. त्यांची विठ्ठलाशी इतकी जवळीक होती की त्याचे गुणगान करणे, दर्शन करणे एवढ्यावरच ते थांबले नाहीत, त्याच्याशी एकेरीवर येऊन (खोटे खोटे) भांडलेसुध्दा. असेच थोडेसे उद्दामपणाचे वाटणारे गा-हाणे त्यांनी खाली दिलेल्या अभंगात केले आहे. त्यांनी या अभंगात विठ्ठलाला जवळ जवळ जाबच विचारला आहे.

पंढरी निवासा सख्या पांडुरंगा ।
करी अंग संगा, भक्‍ताचिया ॥१॥
    भक्‍त कैवारीया होसी नारायणा ।
    बोलता वचना, काय लाज ॥२॥
मागे बहुतांचे फेडियले ऋण ।
आम्हासाठी कोण, आली धाड ॥३॥
    वारंवार तुज लाज नाही देवा ।
    बोल रे केशवा, म्हणे नामा ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Pandhari_Nivasa_Sakhya

कवीवर्य ग.दि.माडगूळकरांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या काही गीतांमध्ये संतांच्या रचनांमधला पूर्वापार भाव सुंदर रीत्या आणला आहे. सकाळी उठल्यानंतर भूपाळी गाऊन देवाची प्रार्थना करून त्यालाही जागवायचे अशी परंपरा आहे. 'उठा उठा हो गजमुख' यासारख्या पारंपारिक रचना आणि 'घनःशायामसुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला' यासारख्या 'अमर भूपाळ्या' प्रसिध्द आहेत. विठ्ठलाला जाग आणण्यासाठी गदिमांनी लिहिलेली भूपाळी खाली दिली आहे.

प्रभातसमयो पातला, आता जाग बा विठ्ठला ।।ध्रु.।।
  दारी तव नामाचा चालला गजरू ।
  देव-देवांगना गाती नारद-तुंबरू ।
  दिंड्या-पताकांचा मेळा, तुझिया अंगणि थाटला ।।१।।
दिठी दिठी लागली तुझिया श्रीमुखकमलावरी ।
श्रवणिमुखी रंगली श्रीधरा, नामाची माधुरी ।
प्राणांची आरती, काकडा नयनी चेतविला ।।२।।

स्व.ग.दि.माडगूळकरांनीच लिहिलेले एक अप्रतिम गीत अजरामर झालेले आहे. हे अत्यंत भावपूर्ण आणि अर्थपूर्ण गीत मला इतके आवडले की या एका गीतातल्या शब्दरचनेच्या मागे दडलेला अर्थ समजावून सांगण्यासाठी मी एक स्वतंत्र लेखमाला लिहिली होती. एक कुंभार आणि त्याने बनवलेली गाडगीमडकी यांच्या रूपकामधून त्यांनी परमेश्वर आणि मनुष्यप्राणी, आत्मा आणि व्यक्तीमत्व यांचे चित्रण या गीतात केले आहे.

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार ।
विठ्ठला, तू वेडा कुंभार ।।ध्रु.।।
   माती, पाणी, उजेड, वारा,  तूच मिसळसी सर्व पसारा ।
   आभाळच मग ये आकारा ।
   तुझ्या घटांच्या उतरंडीला, नसे अंत, ना पार ।।१।।
घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे ।
तुझ्याविना ते कोणा नकळे ।
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार ।।२।।
   तूच घडविसी, तूच फोडिसी, कुरवाळिसि तू, तूच ताडीसी ।
   न कळे यातुन काय जोडीसी ।
   देसी डोळे परि निर्मिसी तयांपुढे अंधार ।।३।।


स्व.वसंत प्रभू यांचे संगीत दिग्दर्शन आणि कवी पी.सावळाराम यांची शब्दरचना यांच्या संगमामधून अत्यंत अवीट अशा गोडीची अनेक भावगीते मराठी भाषिक रसिकांना मिळाली आहेत. त्यात काही गीते विठ्ठलरखुमाईंच्या संबंधी आहेत, पण त्यात सामाजिक आशय, मानवता वगैरे विषयांना वाचा फोडली आहे.  परंपरागत समजुतीप्रमाणे टाळ कुटून भजन न करता आणि देवदर्शनासाठी पंढरीची वारी न करता, आपले रोजचे जीवन मंगलमय ठेवल्यानेसुध्दा देव प्रसन्न होतो असा भाव खाली दिलेल्या पहिल्या गाण्यात आहे.

विठ्ठल तो आला, आला, मला भेटण्याला ।
मला भेटण्याला आला, मला भेटण्याला ।।ध्रु.।।
    तुळशी-माळ घालुनि गळा, कधी नाही कुटले टाळ ।
    पंढरीला नाही गेले, चुकूनिया एक वेळ ।
    देव्हार्‍यात माझे देव. ज्यांनी केला प्रतिपाळ ।
    चरणांची त्यांच्या धूळ, रोज लावी कपाळाला ।।१।।
सत्य वाच माझी होती, वाचली न गाथा पोथी ।
घाली पाणी तुळशीला, आगळीच माझी भक्‍ती ।
शिकवण मनाची ती,  बंधुभाव सर्वांभूती ।
विसरून धर्म जाती, देई घास भुकेल्याला ।।२।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Vitthal_To_Aala_Aala

हे गाणे परंपरागत प्रथांना सरळ सरळ धक्का देणारे असल्यामुळे ते ऐकून लहान मुलांच्या मनांवर 'वाईट संस्कार' होतील म्हणून "त्यांना ते ऐकू देता कामा नये" असा विचार करणारे काही वजीलधारी लोक माझ्या लहानपणी होते. पी.सावळाराम आणि वसंत प्रभू याच जोडीने आणलेल्या खाली दिलेल्या गाण्यात तर त्यांच्या मते कहर झाला होता. "पंढरपूर सोडून विठ्ठलाने निघून जावे" असा आग्रह खुद्द रखुमाईच करते असे या गाण्यात म्हंटले आहे. पण गंमत म्हणजे यातल्या कशाचाच काही अर्थ समजून न घेता त्या निमित्याने 'विठ्ठल' हे नाव कानावर पडते म्हणून हेसुध्दा 'देवाचे गाणे' आहे असे समजणारेही काही लोक त्या काळात होते.

    पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला ।
    विनविते रखुमाई विठ्ठला ।।ध्रु.।।
ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरि तुकयाचा ।
याच मंदिरी आलो आपण प्रपंच करण्या भक्‍तजनांचा ।
भक्‍त थोर ते गेले निघुनी, गेला महिमा तव नामाचा ।
विक्रय चाले देवपणाचा, रहायचे मग इथे कशाला ।।१।।
    धरणे धरुनी भेटीसाठी, पायरीला हरिजन मेळा ।
    भाविक भोंदु पूजक म्हणती, केवळ आमुचा देव उरला ।
    कलंक अपुल्या महानतेला, बघवेना हो रखुमाईला ।
    यायचे तर लवकर बोला, ना तर द्या हो निरोप मजला ।।२।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Pandharinatha_Jhadakari

गेले अनेक दिवस पायपीट करून पुढे पुढे जात असलेल्या भक्तजनांच्या सगळ्या दिंड्या आज पंढरपूरला पोचतील. पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे चंद्रभागेचे वाळवंट संकुचित झालेले असले तरी मिळेल तेवढ्या जागेत  झेंडा रोवून हरिनामाचा गजर करत राहतील. याचे वर्णन करणारे एक गाणे मी लहानपणी शिकलो होतो ते असे होते.
विठूचा, गजर हरिनामाचा, झेंडा रोविला ।
वाळवंटी, चंद्रभागेच्या काठी, डाव मांडिला ॥

याच विषयावरचे भारुडाच्या अंगाने जाणारे एक वेगळे गाणे आता उपलब्ध आहे ते असे आहे.

या विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला ।
या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला ॥१॥
   कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण ।
   नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा ॥२॥    झेंडा रोविला ।
उखळण प्रेमाची काढिली, स्वस्थ बसुनी सद्‍गुरूजवळी ।
प्याला घेतला ज्ञानाचा, तोच अमृताचा ॥३॥    झेंडा रोविला ।
    पचतत्वांची गोफण, क्रोध पाखरे जाण ।
    धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण ।
    केशवदास म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा ॥४॥    झेंडा रोविला ।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Ya_Vithucha_Gajar_Hari

उद्याच्या आषाढी एकादशीला क्षेत्र पंढरपूर इथे जमलेल्या असंख्य भाविकांना इथूनच नमन करून आणि त्यांच्या गजराचा आनंद टेलिव्हिजनवरून पहात ही मालिका आवरती घेत आहे.


.  . . . . .  . . . . . . . . . ..  . (समाप्त)


Tuesday, July 16, 2013

विठ्ठल किती गावा ? (भाग ७)

गोरा रंग हे सौंदर्याचे एक महत्वाचे लक्षण समजले जाते, किंबहुना बहुतेक वेळा कोणाचेही सौंदर्य ठरवतांना पन्नास टक्क्यांहून जास्त मार्क रंगाला आणि नाक, डोळे, ओठ, गाल वगैरेंना उरलेले मार्क विभागून दिले जातात असे वाटते. आपल्या मुलासाठी मुलगी पहातांना मुलगा जर गोरा असेल तर त्याला अनुरूप म्हणून गोरी मुलगी हवीच आणि मुलगा काळासावळा असला तरी पुढे त्यांना गोरी मुले व्हावीत असे म्हणून त्याचे आईवडीलसुध्दा गोरीच मुलगी पसंत करतात. यामुळे कृत्रिम गोरेपणा देण्यासाठी अंगाला लावायच्या क्रीम्सच्या जाहिरातींचा सारखा भडिमार होत असतो आणि त्या बाजारात खपतातसुध्दा. गोरेपणाचे एवढे स्तोम माजलेले असले तरी भक्तांचा अत्यंत प्रिय असा विठ्ठल मात्र काळा सावळाच आहे. पंढरपुरातल्या देवळातली विठोबाची मूर्ती काळ्या दगडामधून बनवलेली आहेच, गावोगावी असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरांमध्येही त्या बहुधा काळ्याच दिसतात. संतांपासून ते आजकालच्या गीतकारांपर्यंत सर्वांनी एकमुखाने 'या सावळ्या तनूचे' भरपूर गुणगान केले आहे.

त्याचे सावळे सुंदर रूप सदोदित आपल्या हृदयात राहू दे आणि त्याचे गोड नामस्मरण घडत राहू दे एवढीच आपली एकमेव इच्छा आहे आणि तिची पूर्तता आपण जन्मोजन्मी मागितली आहे, असो संत तुकाराम महाराजांनी खाली दिलेल्या अभंगात सांगितले आहे. पांडुरंगासारखा दयाळू कुठेही शोधून सापडणार नाही अशी त्याची स्तुती करून आपले एवढेसे मागणे तो सहजगत्या देऊन टाकेल असी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

   सावळें सुंदर रूप मनोहर ।
   राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥
आणिक कांही इच्छा, आम्हां नाहीं चाड ।
तुझें नाम गोड, पांडुरंगा ॥२॥
    जन्मोजन्मीं ऐसें, मागितलें तुज ।
    आम्हांसी सहज, द्यावें आतां ॥३॥
तुका म्हणे तुज, ऐसे दयाळ ।
धुंडितां सकळ, नाहीं आम्हां ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Savale_Sundar_Roop

माझ्या लहानपणी खूप गाजलेल्या आधुनिक भक्तीगीतांमध्ये सुध्दा सावळ्या विठ्ठलाच्या अनुपम रूपाचे आणि त्याचे दर्शन करताच देहभान हरपून गेल्याच्या अनुभवाचे वर्णन केले आहे. त्याने आपल्यावर कृपा करावी, आपला उध्दार करावा अशी प्रार्थना केली आहे. श्यामलवर्णी विठ्ठलाच्या रूपाचे आणि गुणांचे वर्णन करून असा लाखात एक पति मिळाल्याबद्दल रखुमाईचे भाग्य किती थोर आहे हे तिलाच उद्देशून तिस-या गाण्यात सांगितले आहे. ही अतीशय गोड आणि अर्थपूर्ण गाणी अनुक्रमे कवी रा,ना.पवार, कवी सुधांशु आणि कवयित्री शांताबाई जोशी यांनी लिहिली असली तरी स्व.दशरथ पूजारी यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली सुमन कल्याणपूर यांनीच ती तीनही गीते गायिली आहेत.

सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले ।
विसरूनी गेले देहभान ।।ध्रु.।।
    गोजिरे हे रूप पाहुनिया डोळां ।
    दाटला उमाळा अंतरि माझ्या ।
    तुकयाचा भाव पाहुनी निःसंग ।
    तारिले अभंग तूच देवा ।।१।।
जगी कितीकांना तारिलेस देवा ।
स्वीकारी ही सेवा आता माझी ।
कृपाकटाक्षाचे पाजवी अमृत ।
ठेव शिरी हात पांडुरंगा ।।२।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Saavalya_Vitthala_Tujhya

देव माझा विठू सावळा।  माळ त्याची माझिया गळा ।।ध्रु.।।
    विठु राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी ।
    भीमेच्या काठी डुले, भक्तिचा मळा ।।१।।
साजिरे रुप सुंदर, कटि वसे पितांबर।
कंठात तुळशीचे हार. कस्तुरी टीळा ।।२।।
   भजनात विठू डोलतो किर्तनी विठू नाचतो
   रंगूनी जाई पाहूनी भक्ताचा लळा ।।३।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Dev_Majha_Vithu_Savala

लाखात लाभले भाग्य तुला ग बाई ।
विटेवरच्या विठ्ठलाची झालिस रखुमाई ।।ध्रु.।।
    मेघासम जो हसरा श्यामल ।
    चंद्राहुनि तो अधिकहि शीतल ।
    नाम जयाचे मुखात येता ।
    रूप दिसे ग ठायी ठायी ।।१।।
भक्‍तांचा जो असे आसरा ।
या विश्वाचा हरी मोहरा ।
क्षणात इकडे क्षणात तिकडे ।
हाकेला ग धाव घेई ।।२।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Vitevarachya_Vitthalachi

गीतकार पी.सावळाराम यांचे हे गाणे माझ्या लहानपणी म्हणजे आकाशवाणीच्या जमान्यात खूप लोकप्रिय होते. त्यातही विठ्ठलाच्या सावळ्या आणि दिव्य अशा रूपाचे वर्णन केले आहे. या गाण्यातली भक्ती संत मीराबाईने केली होती तशी मधुरा भक्ती आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी राधेचे उदाहरण दिले आहे. शेवटच्या कडव्यात संत जनाबाईचे उदाहरण देऊन त्या भक्तीमधले आध्यात्मही दाखवले आहे.

विठ्ठला, समचरण तुझे धरिते ।
रूप सावळे दिव्य आगळे अंतर्यामी भरते ।।ध्रु.।।
    नेत्रकमल तव नित फुललेले ।
    प्रेममरंदे किती भरलेले ।
    तव गुण-गुंजी घालीत रुंजी ।
    मानस-भ्रमरी फिरते ।।१।।
अरुण चंद्र हे जिथे उगवती ।
प्रसन्‍न तव त्या अधरावरती ।
होऊन राधा माझी प्रीती ।
अमृतमंथन करिते ।।२।।
    जनी लाडकी नामयाची ।
    गुंफुन माला प्राणफुलांची ।
    अर्पुन कंठी मुक्‍तीसाठी ।
    अविरत दासी झुरते ।।३।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Vitthala_Samacharan_Tujhe

स्व,माणिक वर्मा यांच्या गोड आवाजातले खाली दिलेले गाणेसुध्दा माझ्या लहानपणी खूप लोकप्रिय होते. त्यातही विठ्ठलाच्या सावळ्या आणि दिव्य अशा रूपाचे वर्णन केले आहे. या गाण्यातली भक्तीसुध्दा थोडीशी मधुरा भक्ती वाटते.

विठ्ठला रे, तुझे नामी, रंगले मी रंगले मी ।
विठ्ठला रे, रूप तुझे साठविते अंतर्यामी ।।ध्रु।।
    तुझ्या कीर्तनाचा गंध, करितसे जीव धुंद ।
    पंढरीचा हा प्रेमानंद, भोगिते मी अंतर्यामी ।।१।।
तुझी सावळीशी कांती, पाडी मदनाची भ्रांती ।
ध्यान तुझे लावियले, सुंदराचा तूच स्वामी ।।२।।
    तुझ्या भजनी रंगता, न उरे काम धाम चिंता ।
    रुक्मिणीच्या रे सखया कांता, मोहरते मी रोमरोमी ।।३।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Vitthala_Re_Tujhe_Nami

.  . . .  . . . . . . .  . . . . .  (क्रमशः)

Sunday, July 14, 2013

विठ्ठल किती गावा ? (भाग ६)

"त्वमेव माता पिता त्वमेव .." असा एक संस्कृत श्लोक आहे, "तुमही हो माता पिता तुमही हो। ..." असे त्याचे हिंदीमधले रूपांतरही प्रसिध्द आहे. "देव हाच आपला माता, पिता. भ्राता. त्राता, मित्र, सखा वगैरे सगळे काही असतो." किंवा "माता, पिता. भ्राता. त्राता, मित्र, सखा वगैरे सगळी रूपे घेऊन देवच आपल्या पाठीशी सदैव उभा असतो." अशी सुवचने ऐकण्यात आणि वाचण्यात येत असतात. सर्वव्यापी असा एकच परमेश्वर या सर्वांमध्ये अभिप्रेत असतो. पण संत नामदेव मात्र त्यांच्या परमप्रिय विठ्ठलाला या सर्व आप्तेष्टांच्या रूपांमध्ये तर पहातातच, शिवाय तीर्थक्षेत्रासारखे ठिकाण आणि देवपूजेसारखा विधी हे देखील खालील अभंगाप्रमाणे त्यांना विठ्ठलमय झालेले दिसतात.

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ॥१॥
   माता विठ्ठल, पिता विठ्ठल । बंधु विठ्ठल, गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल । निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ॥३॥
   नामा म्हणे मज विठ्ठल सापडला । म्हणुनि कळिकाळा पाड नाही ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Tirtha_Vitthal_Kshetra_Vitthal

सर्व विश्वात भरलेला एकच परमेश्वर असला तरी हिंदू धर्मामध्ये त्याची उपासना अनेक नावांनी केली जाते. त्यातही लक्ष्मीनारायण आणि शंकरपार्वती अशा पतिपत्नींच्या काही जोड्या आहेत. त्यांच्यातल्या लक्ष्मी, पार्वती आणि अंबाबाई, भवानी, दुर्गा, काली वगैरे त्यांची रूपे मातेच्या ठिकाणी मानली जातात. भगवान विष्णू, महादेव, मारुती, गणपती आदि पुरुष देवांना कोणी "आई" अशी साद घातलेली सहसा ऐकण्यात किंवा वाचण्यात येत नाही. विठ्ठल हे भगवंताचे रूप मात्र याला अपवाद म्हणावे लागेल. विठोबा हा देवच मुळी त्याच्या भक्तांना फार जवळचा, अगदी घरातल्या व्यक्तीसारखा वाटतो. तो कुठे तरी दूर स्वर्गात, कैलास पर्वतावर किंवा वैकुंठधामामध्ये वास करत नसून त्याच्या भक्तांच्या अगदी जवळपास असतो. घरातल्या माणसांमध्येसुध्दा आईच सर्वांना अत्यंत जवळची असते. यामुळे अनेक संतांनी विठ्ठलाला प्रेमाने आई असे संबोधले आहे.

संत नामदेवांनीच लिहिलेल्या विठोबाच्या आरतीमध्ये त्याला आईच्या रूपामध्ये येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आईच्या येण्याची आपण किती आतुरतेने वाट पहात आहोत हे लिहिल्यानंतर विठोबाची स्तुतीही केली आहे.  एका अभंगामध्येसुध्दा नामदेवांनी असेच आवाहन करतांना विठ्ठलाला फक्त स्वतःची आई न म्हणता सर्व विश्वाची जननी असे संबोधित केले आहे आणि फक्त स्वतःला येऊन भेटण्याऐवजी सर्व भक्तांचा उध्दार करायला सांगितले आहे.

येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥
निढळावरी कर ठेऊनी वाट मी पाहे ॥ धृ. ॥
   आलिया गेलीया हातीं धाडी निरोप ॥
   पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥
   येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ १ ॥
पिंवळा पीतांबर कैसा गगनी झळकला ॥
गरुडावरी बैसून माझा कैवारी आला ॥
येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ २ ॥
    विठोबाचे राज आम्हां नित्य दिपवाळी ॥
    विष्णुदास नामा जीवेंभावे ओंवाळी ॥
    येई हो विठ्ठले माझे माऊली ये ॥ ३ ॥

येई वो विठ्ठले भक्तजनवत्सले। करुणाकल्लोळे पांडुरंगे ।।१।।
सजलजलदघन पितांबरपरिधान । येई उद्धरणे केशिराजे भक्तजनवत्सले ।।२।।
नामा म्हणे तू विश्वाची जननी । क्षीराब्धीनिवासिनी जगदंबे ।।३।।
http://www.youtube.com/watch?v=1sqHcGA1f0Q

स्वतःला नामयाची दासी म्हणवून घेणा-या संत जनाबाईंनीसुध्दा विठ्ठलाला विठाबाई करून आईचे स्थान दिले आहे. तिला बोलावणे करतांना तिच्यासोबत भीमा आणि चंद्रभागा यांनाही घेऊन येण्याची विनंती जनाबाईंनी केली आहे. आशा भोसले यांनी गायिलेली या अभंगाची ध्वनिमुद्रिका प्रसिध्द असली तरी हा अभंग मी इतर काही सुप्रसिध्ध गायकांच्या शास्त्रीय संगीताच्या मैफलींमध्ये सुध्दा आळवून आळवून गायिलेला ऐकला आहे.
येग येग विठाबाई, माझे पंढरीचे आई ॥१॥
   भीमा आणि चंद्रभागा, तुझे चरणीच्या गंगा ॥२॥
इतुक्यासहित त्वां बा यावें, माझे रंगणी नाचावें ॥३॥
    माझा रंग तुझे गुणीं, म्हणे नामयाची जनी ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Yega_Yega_Vithabai

चित्रपट या आजच्या युगामधल्या माध्यमातले प्रसिध्द गीतकार स्व.जगदीश खेबूडकर यांनी लिहिलेल्या एका गीतामध्ये त्यांनीसुध्दा "विठुमाऊली" अशी साद घालून तिला "तू माऊली जगाची" असे सांगतांनाच आपल्या माउलीत विठ्ठलाची मूर्ती पाहिली आहे.

विठुमाऊली तू माउली जगाची।
माउलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।ध्रु.।।

काय तुझी माया सांगु शिरीरंगा ।
संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा ।
डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा।
अमृताची गोडी आज आलीया अभंगा, विठ्ठला पांडुरंगा ।
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची ।
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।१।।
   लेकरांची सेवा केलीस तू आई ।
   कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई ।
   तुझ्या उपकारा जगी तोड नाही ।
   ओवाळीन जीव माझा सावळे विठाई, विठ्ठला मायबापा ।
   जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची ।
   माउलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा ।।२।।
http://www.youtube.com/watch?v=0bt66pFaMro

 . . . .  . . . . . . . . . . . . .  (क्रमशः)

विठ्ठल किती गावा ? (भाग ५)

विठ्ठलाला पाहतांना आपली काय अवस्था होते, देहभान हरपून जाते, मन मुग्ध होते वगैरे अनुभव संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या अभंगात सांगितले आहेत. संत तुकाराम आणि संत नामदेवांनीसुध्दा वेगळ्या पध्दतीने असेच काहीसे सांगितले आहे. हे आपण यापूर्वीच्या भागांमध्ये पाहिले. इतर संतमंडळींचे अभंग या भागात पाहू.

संत एकनाथ महाराज तर काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल असे ते पांडुरंगाशी एकरूप झाले होते. विठ्ठल हा वेगळा कोणी नसून आपला अंतरात्मा आहे असे तत्वज्ञान त्यांनी या अभंगात सांगितले आहे. त्या अनुषंगाने भावभक्ती म्हणजे चंद्रभागा नदीतले पाणी, दया क्षमा शांती हे गुण म्हणजे तिच्या तीरावरले वाळवंट, ज्ञान ध्यान पूजा विवेक म्हणजे वाद्याचा नाद, पाच ज्ञानेंद्रिये आणि पाच कर्मेंद्रिये हे सगळे मिळून झालेले शरीर म्हणजेच पंढरपूर अशी एकाहून एक वरचढ रूपके त्यांनी या अभंगात दिली आहेत. थोडक्यात सांगायचे झाल्यास विठ्ठलाच्या दर्शनासाठी दूर पंढरपुराला जाण्याची गरज नाही. तो या इथे तुमच्या शरीरात आत्म्याच्या रूपाने सदैव वास करत असतो असे त्यांना सांगायचे आहे असे दिसते.

काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल ।
नांदतो केवळ पांडुरंग ॥१॥
   भाव-भक्‍ति भीमा उदक ते वाहे ।
   बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥
दया क्षमा शांती हेंचि वाळुवंट ।
मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥
    ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद ।
    हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥
दश इंद्रियांचा एक मेळ केला ।
ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥
   देखिली पंढरी देहीं-जनी-वनीं ।
   एका जनार्दनी वारी करी ॥६॥
www.aathavanitli-gani.com/Song/Kaya_Hi_Pandhari

संत कान्होपात्रा ही एका गणिकेची मुलगी होती, पण चिखलातून कमळ उगवावे याप्रमाणे ती वेगळी होती. आईचा पेशा न पत्करता तिने विठ्ठलाची भक्ती केली. या अभंगात तिने विठ्ठलाला आपला सखा म्हणून त्यालाच आपले रक्षण करण्याची विनंती केली आहे.

अगा वैकुंठीच्या राया ।
अगा विठ्ठल सखया ॥१॥
   अगा नारायणा ।
   अगा वासुदेवनंदना ॥२॥
अगा पुंडलिक वरदा ।
अगा विष्णू तू गोविंदा ॥३॥
    अगा रखुमाईच्या कांता ।
    कान्होपात्रा राखी आता ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Aga_Vaikunthichya_Raya

"ऊस डॊंगापरी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलीया रंगा?" यासारख्या अभंगांमधून समाजाला निरुत्तर करणारा प्रश्न विचारणा-या संत चोखा मेळा यांनी विठ्ठलाच्या नामाच्या गजराने दुमदुमलेल्या पंढरपूर नगरीचे वर्णन असे केले आहे. विठ्ठलाचा नामघोष. त्याचे भजन कीर्तन वगैरेंची त्यांनासुध्दा किती गोडी होती हे यात दिसते.
विठ्ठल विठ्ठल गजरी गजरी ।
अवघी दुमदुमली पंढरी ॥१॥
  होतो नामाचा गजर ।
  दिंड्या पताकांचा भार ॥२॥
निवृत्‍ती ज्ञानदेव सोपान ।
अपार वैष्णव ते जाण ॥३॥
    हरि कीर्तनाची दाटी ।
    तेथें चोखा घाली मिठी ॥४॥

संत चोखा मेळा यांची पत्नी संत सोयराबाईसुध्दा परम विठ्ठलभक्त होती. तिनेही स्वतः सुंदर अभंग लिहिले आहेत, पण त्यांच्या शेवटच्या ओळीत स्वतःचा उल्लेख मात्र चोखियाची महारी असा केला आहे. या काहीशा अपरिचित कवयित्रीचे दोन प्रसिध्द अभंग खाली दिले आहेत. विठोबाचे नाम गायिल्याने संसार सुखाचा होईल, कामक्रोध आदि गळून जातील वगैरे जो उपदेश इतर संतांनी केला होता तोच तिच्या पहिल्या अभंगांमध्येही आहे. विठ्ठलाच्या दर्शनामुळे मीपण गळून पडले, देहभान राहिले नाही वगैरे मनाची उन्मन झालेली अवस्था दुस-या अभंगात वर्णलेली आहे. तेराव्या शतकातल्या संत कान्होपात्रा, संत चोखामेळा आणि संत सोयराबाई या व्यक्ती त्या काळातल्या समाजाच्या तळागाळातल्या समजल्या जात होत्या असे त्यांच्यासंबंधी असलेल्या माहितीत सांगितले जाते. यावरून त्या बहुधा अशिक्षित असाव्यात असे वाटेल, पण हे अभंग पाहिले तर असे दिसते की त्यांनासुध्दा मराठी भाषा उत्तम प्रकारे अवगत होती आणि त्यांनी चांगल्या साहित्यरचना करून ठेवल्या आहेत.

सुखाचें हें नाम आवडीनें गावें ।
वाचे आळवावें विठोबासी ॥१॥
    संसार सुखाचा होईल निर्धार
    नामाचा गजर सर्वकाळ ॥२॥
कामक्रोधांचें न चलेचि कांही ।
आशा मनशा पाहीं दूर होती ॥३॥
     आवडी धरोनी वाचें म्हणे हरिहरि ।
     म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Sukhache_He_Naam

अवघा रंग एक झाला । रंगि रंगला श्रीरंग ॥१॥
  मी तूं पण गेले वाया । पाहतां पंढरीच्या राया ॥२॥
नाही भेदाचे ते काम । पळोनि गेले क्रोध काम ॥३॥
   देही असोनि विदेही । सदा समाधिस्त पाही ॥४॥
पाहते पाहणें गेले दूरी । म्हणे चोखियाची महारी ॥५॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Avagha_Rang_Ek_Jhala

 . . .. .  . . ..  . . . . . . . . . . . . (क्रमशः)

Saturday, July 13, 2013

विठ्ठल किती गावा ? (भाग ४)

संत ज्ञानेश्वरांनी विठ्ठलभक्तांच्या संप्रदायाचा पाया घातला, संत नामदेवांनी त्यावर भव्य इमारत उभी केली आणि संत तुकारामांनी त्यावर कळस चढवला असे म्हंटले जाते. या संतशिरोमणी तुकोबांनी ज्ञानेश्वरांना "ज्ञानियांचा राजा गुरू महाराव" असे म्हंटले आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला संस्कृत भाषेत केलेल्या गीतोपदेशाची सविस्तर उकल मराठी भाषेत केल्याबद्दल "ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता" असे मराठी भाषा म्हणते असे गीतकार स्व.पी.सावळाराम लिहितात. संत ज्ञानदेवांचे ज्ञान, प्रतिभा, कल्पनाशक्ती वगैरे अलौकिक गुणांचा स्पर्श त्यांच्या काव्यरचनांना झालेला जाणवतो.

दृष्टी, ध्वनि, स्पर्श, गंध आणि चंव हे गुण आपल्या ज्ञानेंद्रयांकडून आपल्याला समजतात. यांच्या बाबतीत दुस-याला आलेले अनुभव आपण स्वतःच्या अनुभवावरून समजून घेऊ शकतो. अॅबस्ट्रॅक्ट गोष्टींची फक्त कल्पनाच करू शकतो. आपल्या मनातली कल्पना स्पष्टपणे व्यक्त करून ती इतरांना सांगता येत नाही. यामुळे चराचरामध्ये व्यापलेला निर्गुण निराकार असा परमेश्वर सामान्य कुवतीच्या माणसाला समजणे फार कठीण आहे. ज्ञानमार्गाने जाणारे साधकच त्या संकल्पनेचा विचार करू शकतात. त्या मानाने सोपा असा भक्तीमार्ग संतांनी दाखवला, सर्वसामान्य लोकांना तो पटला आणि त्यांनी त्यानुसार त्याचा अवलंब केला. कोणत्याही दैवतावर भक्ती करण्यासाठी त्याचे एक सगुण साकार रूप असले तर त्याची मूर्ती किंवा चित्र आपण डोळ्यांनी पाहू शकतो, त्याचे वर्णन कानाने ऐकू शकतो किंवा बोलण्यातून व गायनातून करू शकतो. संत तुकारामांनी विठ्ठलाच्या गुणगानाला कसे महत्व दिले होते आणि संत नामदेवांनी त्याच्या दर्शनाला प्राधान्य दिले होते याची उदाहरणे आपण या आधीच्या भागांमध्ये पाहिली. ही सगळी त्याच्या सगुण रूपाची भक्ती होती.

संत ज्ञानेश्वरांनीसुध्दा विठ्ठलाला भेटण्याची आणि त्याला डोळे भरून पाहण्याची महती काही अभंगांमधून केली आहे. विठ्ठलाच्या भजनाची सुरुवात संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला रूपाचा अभंग गाऊन करायची वारकरी संप्रदायाची एक प्रथा आहे. काही देवळांमधले भजन नेहमी या अभंगापासून सुरू केले जाते. विठ्ठलाचे रूप पाहून खूप आनंद झाला, पूर्वपुण्याईमुळेच विठ्ठलाविषयी आवड निर्माण झाली असा साधा संदेश त्यांनी या अभंगात दिला आहे. 

रूप पाहतां लोचनी । सुख जाले वो साजणी ।।१।।
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ।।२।।
बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठली आवडी ।।३।।
सर्व सुखाचे आगर । बाप रखुमादेवीवर ।।४।।

याच कल्पनेचा विस्तार करून हा आनंद मिळवण्यासाठी पंढरपूरला जाऊन त्याला भेटेन, मला माझ्या माहेरी गेल्याचे आणि माहेरच्या मायेच्या आप्तांना भेटण्याचे सुख त्यातून मिळेल, माझ्या पुण्याईचे फळ मला त्यात मिळेल, माझे सारे विश्वच आनंदाने भरून जाईन वगैरे वर्णन त्यांनी खाली दिलेल्या अभंगात दिले आहे.

अवघाचि संसार सुखाचा करीन ।
आनंदें भरीन तिन्ही लोक ॥१॥
    जाईन गे माये तया पंढरपुरा ।
    भेटेन माहेरा आपुलिया ॥२॥
सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन ।
क्षेम मी देईन पांडुरंगी ॥३॥
     बाप रखुमादेविवरु विठ्ठलेचे भेटी ।
     आपुले संवसाटी करुनी राहे ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Avaghachi_Sansar_Sukhacha
संत ज्ञानेश्वर महाज्ञानी होते, निर्गुण परमेश्वराची उपासना करणे त्यांना साध्य होते, पण इतरेजनांसाठी विठ्ठलाच्या सगुण रूपाची भक्ती करणे शक्य आहे हे त्यांनी जाणले होते. यामुळे सगुण आणि निर्गुण या दोन्ही रूपांचा त्यांनी पुरस्कार केला. सगुण निर्गुण ही दोन्ही रूपे विलक्षण आहेत असे सांगतांना त्याच्या दृष्य (सगुण) रूपाचे कसलेच वर्णन न करता पतितांना पावन करणारा, मनाला मोह घालणारा अशासारखे त्याचे महात्म्य आणि ध्येय, ध्यास, ध्यान वगैरे मानसिक क्रियांमधून चित्ताला भेटणारा असा हा परब्रह्म हे विठ्ठलाचे वर्णन या अभंगात दिले आहे. 

सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ।  ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।१।।
पतितपावन मानसमोहन । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।२।।
ध्येय ध्यास ध्यान चित्‍त निरंजन ।। ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।३।।
ज्ञानदेव म्हणे आनंदाचे गान । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।४।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Sagun_Nirgun_Donhi

संगीताबरोबरच वाङ्मयाचासुध्दा सखोल अभ्यास केलेल्या पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी ज्ञानदेवांचे काही वैशिष्टपूर्ण असे अभंग निवडले, त्यांचा भावार्थ समजून घेऊन त्यांना अप्रतिम चाली लावल्या आणि लतादीदी व आशाताई यांनी त्या तितक्याच सुरेलपणे गायिल्या. यामधून काही अपूर्व अशी भक्तीगीते तयार झाली आहेत. पं.हृदयनाथ यांच्या बहुतेक सगळ्या कार्यक्रमांमध्ये यातली एक दोन तरी गीते असतातच. त्यावेळी त्यातल्या गहन अर्थाबद्दल जे निरूपण ते करतात तेसुध्दा त्या मधुर गाण्याइतकेच सुश्राव्य असते. विठ्ठलाचे गुणगान करण्यासंबंधीची त्यातली तीन गाणी खाली दिली आहेत.

घराजवळ कावळा कावकाव करायला लागला तर तो पाहुणा येणार असल्याची पूर्वसूचना देतो अशी एक समजूत आहे. त्याचा आधार घेऊन प्रत्यक्ष पंढरीनाथ विठोबाच येणार आहेत अशी कल्पना ज्ञानेश्वरांनी खाली दिलेल्या अभंगात रंगवली आहे. त्या विठ्ठलाबद्दल काही तरी सांग, तो कधी येणार आहे, केंव्हा भेटणार आहे हे सांगितलेस तर मी तुला दूधदहीभात खायलाप्यायला देईन, तुझ्या पायात सोन्याचे दागीने घालीन वगैरे लालूच त्याला दाखवतात, आपली आतुरता त्यातून दर्शवतात.  या सगळ्यांच्या मागे गहन आध्यात्मिक अर्थ दडलेला असणार.

     पैल तो गे काऊ कोकताहे ।
     शकुन गे माये सांगताहे ॥१॥
उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ ।
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती ॥२॥
      दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी ।
      जीवा पढिये तयाची गोडी सांग वेगी ॥३॥
दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी ॥४॥
     आंबिया डहाळी फळें चुंबी रसाळीं ।
      आजिचे रे काळीं शकुन सांगे ॥५॥
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराये शकुन सांगे ॥६॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Pail_To_Ge_Kau

खाली दिलेल्या अभंगात त्यांनी सगुण आणि निर्गुण रूपांना एकत्र आणले आहे. विठ्ठलाच्या दिव्य तेजस्वी रूपाची शोभा केवळ अवर्णनीय आहे असे सांगून झाल्यावर पुढच्या कडव्यातल्या शब्दांवरून 'कानडा हो विठ्ठलू'ची मूळ भाषा कानडी होती त्यामुळे पुढे 'बोलणेच खुंटले' आणि 'शब्देविण संवादू' झाला असे कोणाला कदाचित वाटेल, पण ते तसे नाही. कानडा या शब्दाचा अर्थ या अभंगात 'आपल्याला न समजण्यासारखा, अगम्य, अद्भुत' असा आहे. तो नाना त-हेची नाटके रचत असतो, त्याची लीला दाखवीत असतो. ती पाहून मन थक्क होऊन जाते. त्याच्या दिव्य तेजाने डोळे दिपतात,  त्याचे अवर्णनीय लावण्य पाहून मन मुग्ध होते. अवाक् झाल्यामुळे बोलायला शब्द सांपडत नाहीत, पण मनोमनी संवाद होतो. त्याच्या दर्शनाने दिग्मूढ होऊन कांही कळेनासे झाले. पाया पडायला गेले तर पाऊल सांपडेना इतकेच नव्हे तर त्याचे अमूर्त रूप आंपल्याकडे पाहते आहे की पाठमोरे उभे आहे ते सुध्दा समजत नाही. त्याला भेटण्यासाठी दोन्ही हांतानी कवटाळले पण मिठीत कांहीच आले नाही. असा हा 'कानडा हो विठ्ठलू' आहे. शरीरातील इंद्रियांकरवी तो जाणता आला नाही पण हृदयाने त्याचा रसपूर्ण अनुभव घेतला. असे त्याचे अवर्णनीय वर्णन ज्ञानोबारायांनी या अभंगात केले आहे. या अभंगाला अत्यंत मधुर अशी चाल पं.हृदयनाथ मंगेशकरांनी लावली आहे. त्यांच्याच 'भावसरगम' या कार्यक्रमात त्यांनी हा अभंग गातांना त्याविषयी ही माहिती सांगितली.

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्‍नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले ।
न वर्णवे तेथीची शोभा ॥१॥
    कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
    तेणें मज लावियला वेधु ।
    खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।
    आळविल्या नेदी सादु ॥२॥
शब्देंविण संवादु दुजेंवीण अनुवादु ।
हें तंव कैसेंनि गमे ।
परेहि परतें बोलणें खुंटलें ।
वैखरी कैसेंनि सांगें ॥३॥
   पाया पडूं गेलें तंव पाउलचि न दिसे ।
   उभाचि स्वयंभु असे ।
   समोर कीं पाठिमोरा न कळे ।
   ठकचि पडिलें कैसें ॥४॥
क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।
म्हणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी एकली ।
आसावला जीव राहो ॥५॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Pandurang_Kanti_Divya_Tej

संत तुकाराम आणि संत नामदेव यांनी विठ्ठलाच्या नामाचा घोष, त्याच्या रूपाचे दर्शन वगैरेंमधला आनंद दाखवून दिला. संत ज्ञानेश्वरांनीही तो दाखवलाच, पण खाली दिलेल्या अभंगात ते सांगतात की त्याच्या सान्निध्यामुळे वातावरणात एक अद्भुत सुगंध दरवळला. मला त्यामधून त्याचे आगमन झाल्याचे समजले आणि पुढे होऊन त्याचे दर्शन घेतल्यावर तर माझे देहभान हरपून गेले. हे गोड गाणे लतादीदी आणि किशोरीताई या दोघींनीही गायिले आहे.

अवचिता परिमळू, झुळुकला अळुमाळू ।
मी म्हणु गोपाळू, आला गे माये ॥१॥
   चांचरती चांचरती बाहेरी निघाले ।
   ठकचि मी ठेलें काय करू ॥२॥
तो सावळा सुंदरू कांसे पितांबरू ।
लावण्य मनोहरू देखियेला ॥३॥
    बोधुनी ठेलें मन तव जालें आन ।
    सोकोनी घेतले प्राण माझे गे माये ॥४॥
बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा ।
तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥५॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Avachita_Parimalu


.  . . . . .  . . . . . . . . . . . .  . . . (क्रमशः)

Friday, July 12, 2013

विठ्ठल किती गावा ? (भाग ३ )

संत तुकाराम महाराजांनी सुध्दा सर्वांगाने विठ्ठलाची भक्ती करण्याचा उपदेश दिला असला तरी वाणीमधून त्याचे गोड नाम घेण्यावर जास्त भर दिला आहे हे यापूर्वीच्या भागात पाहिले. संत नामदेवांचा जास्त भर विठोबाच्या दर्शनावर दिसतो. संत नामदेव महाराज विठ्ठलाचे अत्यंत लाडके भक्त समजले जातात. विठोबा त्यांच्याशी बोलतो, त्यांनी नैवेद्यासाठी दिलेली खीर प्रत्यक्ष प्रकट होऊन खातो वगैरे कथा प्रसिध्द आहेत. त्यांच्या अभंगांमध्येसुध्दा विठ्ठलाबरोबर असलेली त्यांची सलगी कधी कधी दिसून येते. विठ्ठलाच्या मुखाकडे पाहताच तहान भूक यांचाही विसर पडतो, पाप, ताप, दुःख नाहीसे होऊन जातात, वासना गळून पडतात. त्याला भेटतांना आईच्या कशीत शिरल्यासारखा आनंद होतो. चकोर पक्षी चंद्राला पाहण्यासाठी आसुसलेला होऊन अत्यंत आतुरतेने त्याच्या उगवण्याची वाट पहात असतो, आकाशात ढग जमलेले पाहून मोराला आनंदाचे भरते येते आणि तो थुई थुई नाचू लागतो, अशाच प्रकारे नामदेवांनाही विठ्ठलाच्या मुखकमलाच्या दर्शनाची अतीव ओढ लागलेली असते आणि ते होताच त्यांना अत्यानंद होतो असे ते खाली दिलेल्या अभंगात सांगतात.

सुखाचें हे सुख श्रीहरी मुख ।
पाहतांही भूक तहान गेली ॥१॥
    भेटली भेटली विठाई माऊली ।
    वासना निवाली जिवांतील ॥२॥
चंद्रासी चकोर मेघासी मयूर ।
वाटे तैसा भर आनंदाचा ॥३॥
    नामा म्हणे पाप आणि ताप दुख: गेले ।
    जाहलें हें सुख बोलवेना ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Sukhache_He_Sukh_Shri


संत नामदेव महाराजांना विठ्ठलाच्या दर्शनाची किती तीव्र ओढ लागलेली असायची हे वरील अभंगात त्यांना सांगितले आहे. खालील अभंगात हेच व्यक्त करून विठोबाची भेट झाल्यानंतर काय काय करायचे त्यांनी मनात योजलेले असते त्याचीही यादी ते देतात. विठ्ठलाचे मुखकमल आधीच मनोरम आहेच, त्याच्या अंगाला उटी लावून, कपाळावर कस्तुरीचा टिळा लावून आणि जाईजुईच्या फुलांच्या माळा त्याच्या गळ्यात घालून त्याला अधिक सुशोभित आणि सुगंधित करायचे. हे झाल्यावर मग तर त्याच्या दर्शनाने डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहणार नाही.

पाहू द्या रे मज विठोबाचे मुख ।
लागलीसे भूक डोळां माझ्या ॥१।।
   कस्तुरी कुंकुम भरोनिया ताटी ।
   अंगी बरवी उटी गोपाळाच्या ।।२।।
जाई-जुई पुष्पे गुंफुनिया माळा ।
घालू घननीळा आवडिने ॥३।।
   नामा म्हणे विठो पंढरीचा राणा ।
   डोळिंया पारण होत असे ॥४।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Pahu_Dya_Re_Maj


विठ्ठलाच्या दर्शनाची इतकी गोडी संत नामदेवांना लागली होती की ते रोज त्रिकाल घेता यावे यासाठी पंढरपूरलाच कायमचे वास्तव्य करावे, फक्त या जन्मातच नव्हे तर जन्मोजन्मी ते करायला मिळावे अशी प्रार्थना ते विठोबाला करतात. पंढरीला रहायचे झाल्यास रोज चंद्रभागा नदीत स्नान, संतमंडळींचे दर्शन आणि विठ्ठलमंदिराच्या महाद्वारापाशी त्याचे कीर्तन वगैरे अनेक लाभ त्यातून मिळवता येतील. पंढरपूरच्या विठोबाच्या देवळाच्या पायरीपाशीच नामदेवांची समाधी आहे. त्यामुळे त्यांची ही इच्छा विठ्ठलाने मान्य केली असे दिसते. पण संत नामदेव कायम पंढरपूरला राहिले नाहीत, त्यांनी त्या काळात भारतभ्रमण केले, अगदी पंजाबपर्यंत जाऊन आले आणि त्यांनी सगळीकडे भागवतधर्माचा प्रसार केला असे म्हणतात. त्यांनी लिहिलेल्या कृतींचा समावेश शीखधर्मीयांच्या ग्रंथसाहेबातसुध्दा केलेला आहे.

पंढरीचा वास, चंद्रभागे स्‍नान ।
आणिक दर्शन विठोबाचे ॥१॥
   हेची घडो मज जन्मजन्मांतरी ।
   मागणे श्रीहरी नाही दुजे ॥२॥
मुखी नाम सदा संतांचे दर्शन ।
जनी जनार्दन ऐसा भाव ॥३॥
   नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी ।
   कीर्तन गजरी सप्रेमाचे ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Pandharicha_Vaas

पंढरपूरला वास्तव्य करण्याची संत नामदेवांनी विठ्ठलाला मागणी केली होती हे वरील अभंगात स्पष्ट होतेच. पंढरीच्या रहिवाशांना ही संधी मिळत असल्यामुळे ते सगळे पावन झाले आहेत कारण त्यांचे देणे, घेणे, काम करणे वगैरे संपूर्ण जीवन कसे विठ्ठलमय आणि त्यामुळे आनंदमय झालेले आहे,  हे त्यांनी पुढील अभंगात सांगितले आहे.

पंढरीचे जन अवघे पावन ।
ज्या जवळी निधान पांडुरंग ॥१॥
    विठ्ठलनामें घेणें विठ्ठलनामें देणें ।
    विठ्ठलनामें करणें सकळ काम ॥२॥
विठ्ठलनामी गोडी धरोनी आवडी ।
विठ्ठलनामीं बुडी दिल्ही जेणें ॥३॥
     नामा म्हणे अवघें विठ्ठलचि झालें ।
     विठ्ठलें दिधलें प्रेमसूख ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Pandhariche_Jan_Avaghe  

संत नामदेवांनी विठ्ठलाच्या दर्शनावर अनेक अभंग लिहिलेले आहेतच, त्यांनीही विठ्ठलाच्या नाममहात्म्याबद्दलसुध्दा अभंग लिहिलेले आहेतच. त्यातल्या एका अभंगाला श्रीधर फडके आणि सुरेश वाडकर या द्वयीने नवीन पध्दतीच्या संगीतामधून खूपच श्रवणीय असे रूप दिले आहे.

विठ्ठल आवडी प्रेमभावो । विठ्ठल नामाचा रे टाहो ।
तुटला हा संदेहो । भवमूळ व्याधीचा  ॥१॥
म्हणा नरहरी उच्‍चार । कृष्ण हरी श्रीधर ।
हेची नाम आम्हा सार । संसार करावया प्रेमभावो ॥२॥
नेणो नामाविण काही । विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा म्हणे तरलो पाही । विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥३॥
http://www.youtube.com/watch?v=gO8A_ivui7s

संत नामदेवांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागली आहे, त्याचे नामस्मरण करण्याची खूप इच्छा मनात उफाळली आहे, पण कां कुणास ठाऊक, ते इतस्ततः भरकटते आहे, मनात इतर विकार, वासना वगैरेंनी थैमान मांडले आहे, कधी झोपेची पेंग येते आहे, पण त्यांचे मन विठ्ठलाच्या नामावर एकाग्र होत नाही. यामुळे चिंतित होऊन ते देवालाच विचारतात की "आज माझे मन तुझे गोड नाव का घेत नाही आहे?, मी त्यासाठी आता काय करू?" यातल्या भावाचा काडीमात्र अर्थ मला लहान असतांना समजत नव्हता. "केशवा, पंढरीराया" अशी विठ्ठलाला हाक मारून पुन्हा "तुझं नावसुध्दा मनात का येत नाही?" असे नामदेव का म्हणत आहेत ते समजत नव्हते. पण त्याची अतीशय गोड चाल खूप आवडत असल्यामुळे हे गाणे मनात पक्के घर करून बसले होते.  माझ्या लहानपणीच्या टॉप टेन गाण्यात हे अजरामर गीत नक्कीच होते. आजही हे गाणे काही कार्यक्रमांमध्ये ऐकायला मिळते.

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ।
मन माझे केशवा का बा न घे ॥१॥
   सांग पंढरीराया काय करु यांसी ।
   का रूप ध्यानासी न ये तुझे ॥२॥
किर्तनी बैसता निद्रे नागविले ।
मन माझे गुंतले विषयसुखा ॥३॥
    हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती ।
    न ये माझ्या चित्‍ती नामा म्हणे ॥४॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Amrutahuni_God_Naam

.  . . . . .  . . . . . . . . . . . .  . . . (क्रमशः)

Thursday, July 11, 2013

विठ्ठल किती गावा ? (भाग २)



आपल्या संतांच्या काळात फोटोग्राफर नव्हते की प्रिंटिंग प्रेस नव्हत्या. त्या काळातल्या चित्रकारांनी त्या विभूतींची चित्रे रंगवून ठेवली असली तरी ती आता कुठे असतील कोण जाणे? अलीकडल्या म्हणजे गेल्या शंभर वर्षांमधल्या काळात रंगवलेल्या त्यांच्या तसबिरीच आपल्याला घरोघरी पहायला मिळतात. यात संत ज्ञानेश्वर हे बहुधा मांडी घालून बसलेले आणि हातात पोथीचे एक पान धरून ते वाचतांना किंवा काही तरी नवे लिहितांना दिसतात, तर समर्थ रामदासस्वामी हातात कमंडलू घेऊन कुठे तरी जाण्याच्या तयारीत असतात. संत तुकारामांनी एका हातात छोटीशी वीणा आणि दुस-या हातात चिपळ्या धरलेल्या दाखवतात. हे चित्र पाहता ते वीणेच्या झंकाराचा सुर आणि चिपळ्यांचा ताल धरून अभंग गात असावेत किंवा "जय जय रामकृष्ण हरी", "जय जय विठ्ठल रखुमाई" असा नामघोष करत असावेत असे वाटते. विठ्ठलाच्या नावाचा उच्चार करणे किती आनंददायी आहे, तसेच लाभप्रद आहे हे तुकोबांनी आपल्या अनेक अभंगांमधून सांगितले आहे. "विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥" आणि "विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा ॥" या दोन अभंगांबद्दल मी या लेखाच्या पहिल्या भागात लिहिले होते. संतश्रेष्ट तुकारामांचेच अत्यंत अर्थपूर्ण आणि लोकप्रिय असे आणखी दोन अभंग खाली दिले आहेत.

फक्त वाचेनेच विठोबाचे गोड नाव उच्चारून तिथे थांबू नका, तर शरीराच्या इतर ज्ञानेंद्रियांना आणि मनालासुध्दा त्याचा लाभ घेऊ द्या असे पहिल्या अभंगात त्यांनी सांगितले आहे. डोळ्यांनी त्याची मूर्ती पहा आणि ते सुंदर रूप साठवून ठेवा, पण त्यावेळी मन मात्र त्याच्या चरणापाशी लीन झालेले असू दे, आपल्या जिवाचे कान करून विठ्ठलाचे गुणगान लक्षपूर्वक ऐका, असे केलेत तर देहभान हरपून जाईल, जिवाला विठोबापासून दूर होण्याची इच्छा होणार नाही. असे तुकाराम महाराज या अभंगात सांगतात. पुढल्या काळात पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरात भक्तांची इतकी गर्दी होईल की कुणालाही त्याच्या पाया पडून एक मिनिटसुध्दा तिथे थांबू दिले जाणार नाही याची त्यांना कल्पना नसेल. देवाचे दर्शन घेण्यासाठी त्याने मानवाला डोळे दिले आहेत, त्याचे नाव घेण्यासाठी जिव्हा दिली आहे, ते ऐकण्यासाठी कान दिले आहेत, दान देण्यासाठी हात दिले आहेत वगैरे गोष्टी एका प्रसिध्द हिंदी संताच्या रचनेमध्येसुध्दा सांगितल्या गेल्या आहेत. संत तुकारामांचे सांगणे देखील साधारणपणे असेच आहे.

घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥१॥
  डोळे तुम्ही घ्या रे सुख । पहा विठोबाचें मुख ॥२॥
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचें गुण ॥३॥
  मना तिथें धांव घेई । राहे विठोबाचे पायी ॥४॥
रूपी गुंतले लोचन ।  पायी स्थिरावले मन ॥५॥
   देहभाव हरपला । तुज पाहता विठ्ठला ॥६॥
तुका म्हणे जीवा ।  नको सोडूं या केशवा ॥७॥
http://www.aathavanitli-gani.com/Song/Ghei_Ghei_Majhe_Vache

हाच उपदेश तुकारामांनी खाली दिलेल्या अभंगातही केला आहे. विठ्ठलाच्या दर्शनाने, गुणगानाने मनातले काम. क्रोध लोभ आदी षड्रिपू मनातून चालले जातात आणि त्चांनी रिकामी केलेली पोकळी विठ्ठलाने भरली जाते. भक्त विठ्ठलमय होऊन जातो. असे संत तुकाराम या अभंगात सांगतात.
 
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥
  येणें सोसें मन जालें हांवभरे ।  परती माघारें घेत नाहीं ॥२॥
बंधनापासुनि उकलल्या गांठी ।  देतां आली मिठी सावकाश ॥३॥
  तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें ।  कामक्रोधें केलें घर रीतें ॥४॥

 हा अंभंग पं. जितेंद्र अभिषेकी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर या दोन सुप्रसिध्द गायक गायिकांनी निरनिराळ्या पध्दतीने गायिला आहे हे या अभंगाचे एक वैशिष्ट्य आहे.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Bolava_Vitthal_Pahava_Vitthal

संत तुकारांमांना स्वर्गलोकी जाऊन तीन साडेतीनशे वर्षे होऊन गेल्यानंतरच्या आजच्या काळातल्या कवींनीसुध्दा विठ्ठलाच्या नामाच्या उच्चारण्याबद्दल गीते लिहिली आहेत. खाली दिलेले गाणे आजच्या काळात लिहिले गेले असले तरी त्यात संतांच्या काळाचेच वर्णन केलेले आहे. "माझा म-हाटाचि बोलू कवतुके। तरी अमृताते पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।" असे आत्मविश्वासाने लिहिणारे संत ज्ञानदेव, "पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती । चोखा म्हणे नाम घेता भक्त होती दंग।।" असे सांगणारे संत चोखा मेळा आणि  "नामा म्हणे तरलो पाही । विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥" अशी भावना बाळगणारे संत नामदेव हे सारे जण पंढरपूरच्या इंद्रायणीकाठी वाळवंटावर गोळा झाले आहेत. विठ्ठलाच्या नामसंकीर्तनात दंग झाल्याने ते निस्संग होऊन नाचत आहेत आणि त्यांच्यासाठी एकतारीच विठ्ठलाचे गीत गात आहे असे या गाण्यात कवीने लिहिले आहे. हे संत प्रत्यक्षात एकाच वेळी पंढरपूरला कदाचित कधी आलेही नसतील, असे असले तरी कवीच्या कल्पनेमध्ये ते एकत्र आले आहेत.

एकतारि गाते, गाते गीत विठ्ठलाचे ।
वाळवंटी ध्वजा, ध्वजा वैष्णवांची नाचे ।।
   मराठीचा बोल, बोल जगी अमृताचा ।
   ज्ञानियांचा देव, देव ज्ञानदेव नाचे ।।
नाचे चोखामेळा, मेळा नाचे वैष्णवांचा ।
नाचे नामदेव, देव कीर्तनात नाचे ।।
   अनाथांचे नाथ, नाथ माझे दीनानाथ ।
    भाग्यवंत संत, संत रूप अनंताचे ।।
http://www.aathavanitli-gani.com/Song/Ektari_Gate_Geet_Vitthalache

खाली दिलेल्या गीतात कवीने पांडुरंगाचे वर्णन एका विणकराच्या रूपकात केलेले आहे. एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे या गाण्यात हेच रूपक वापरले आहे. पण माझ्या आठवणीप्रमाणे खाली दिलेले गाणे जास्त जुने असावे. या गाण्यात त्या महान विणकराचे नामस्मरण करण्याचा संदेश दिलेला आहे. अक्षांश आणि रेखांशाचे आडवे, उभे धागे आहेत अशी कल्पना करून यामधून पृथ्वीचा पृष्ठभाग तयार झाला आहे (विठ्ठलाने अशी रचना केली आहे). अशी वेगळी (भौगोलिक स्वरूपाची) कल्पना कवीने केली आहे. आणि पृथ्वीपुरता विचार करायचा झाल्यास तेच सर्वात पहिले विणकाम असे म्हणता येईल. या गाण्याच्या दुस-या चरणात कवी माणसांच्या जगात येतो. हात आणि पाय ही त्याची कर्मेंद्रिये असली तरी मनाने (किंवा बुध्दीने) दिलेल्या आज्ञांचे ते फक्त यंत्रवत पालन करतात, म्हणून त्यांना मागाची उपमा दिली आहे. माणसांनी मनांमध्ये मने गुंतवून त्याचा बहारदार शेला विणावा, बंधुभावाच्या चरख्यावर एकजुटीचा मजबूत धागा तयार करावा वगैरे सूचना केल्या आहेत. त्यात विठ्ठलाच्या भक्तीपेक्षा चांगल्या आचरणावरच जास्त भर दिला आहे.
 
धागा धागा अखंड विणूया, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया ।।
    अक्षांशाचे रेखांशाचे, उभे आडवे गुंफुन धागे ।
    विविध रंगी वसुंधरेचे, वस्त्र विणिले पांडुरंगे ।
    विश्वंभर तो विणकर पहिला, कार्यारंभी नित्य स्मरुया ।।१।।
करचरणांच्या मागावरती, मनामनांचे तंतू टाका ।
फेकुन शेला अंगावरती, अर्धी उघडी लाज राखा ।
बंधुत्वाचा फिरवित चरखा, एकत्वाचे सूत्र धरूया ।।२।।

http://www.youtube.com/watch?v=vNdCT3psfcA
.  . . . .  . . . . . . . .  . . . . . . .  (क्रमशः)

Tuesday, July 09, 2013

विठ्ठल किती गावा ? (भाग १)

बरोबर पन्नास वर्षांपूर्वी जून महिन्यात मी पुण्यनगरीत पहिल्यांदा पाऊल ठेवले. त्यापूर्वी या शहराबद्दल माझ्या वाचनात थोडे फार आले होते. 'शिक्षणाचे माहेरघर', 'महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी' वगैरे पुण्याची ख्याती होतीच. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे आदि थोर पुरुषांची ती कर्मभूमी होती. ना.सी.फडक्यांच्या कादंब-यांमधली वर्णने वाचतांना हे एक रम्य आणि रोमँटिक ठिकाण वाटत होते. "रोज सकाळी फोडणीच्या वरणासोबत साधा भात आणि संध्याकाळी फोडणीचा भात आणि साधे वरण खाऊन उरलेली पै न पै शिल्लक टाकायची आणि त्या शिल्लकेमधून आयुष्याच्या अखेरीला (त्या काळातल्या गावाबाहेरच्या आणि ओसाड अशा) डेक्कन जिमखान्यावर 'श्रमसाफल्य' यासारख्या नावाची एक लहानशी बंगली बांधायची यात जीवनाची इतिकर्तव्यता मानणारा म्हणजे पुणेकर." अशा अर्थाचे वाक्य पुलंनी एका ठिकाणी असे लिहिले होते. वाचलेल्या अशा काही वर्णनांमधून पुण्याची एक प्रतिमा मनात तयार झाली होती. डेक्कन जिमखाना म्हणजे श्रमपरिहार करण्यासाठी नेहमी निवांतपणे आरामखुर्चीवर बसून राहणा-या वृध्दांचा शांत परिसर असावा आणि त्या भागातल्या शाळाकॉलेजांमधली मुले मुली थोडासा गोंगाट करून त्या शांततेचा भंग करीत असावेत अशी त्या भागासंबंधीची एक विचित्र कल्पना माझ्या मनात होती. त्यापेक्षा फारच वेगळे दृष्य मला पहिल्याच दिवशी तिथे पहायला मिळाले.

इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमधून निघून जंगली महाराज रोडवरून डेक्कन जिमखान्यापर्यंत फेरफटका मारतांना तो रस्ता माणसांनी तुडुंब भरलेला दिसला. बाजूच्या फर्ग्यूसन रोडवर तर त्याहीपेक्षा जास्त गर्दी होती. त्या काळातसुध्दा मुंबई म्हणजे अती गजबजलेले शहर होते, पण मला पुण्यामधली त्या दिवशीची गर्दी कमालीची वाटली. त्याहूनही जास्त आश्चर्याची गोष्ट अशी होती की धोतर नेसलेले, कपाळावर गंधाचा टिळा आणि बुक्का लावलेले आणि डोक्यावर पांढरी टोपी किंवा पागोटे धारण केलेले पुरुष आणि नऊ वार लुगडी नेसलेल्या स्त्रिया अशा खेडुतांची संख्या त्यात प्रचंड प्रमाणात होती. डेक्कन जिमखान्यासारख्या पॉश समजल्या जाणा-या भागात मला याची अपेक्षा नव्हती. होस्टेलवरच्या अनुभवी विद्यार्थ्यांकडून याचा उलगडा झाला. आळंदीहून निघालेली ज्ञानेश्वर महाराजांची आणि देहूहून आलेली तुकाराम महाराजांची अशा दोन्ही पालख्यांचा त्या दिवशी पुण्यात मुक्काम होता. त्यापूर्वी मला या पालख्यांची माहिती नव्हती. तिथून ते सगळे वारकरी पुढे पायी चालत पंढरपूरला जाणार होते आणि आषाढी एकादशीपर्यंत तिथे पोचणार होते. 'आषाढीकार्तिकी'ला पंढरपुरात 'चंद्रभागातीरी' गोळा होणा-या असंख्य 'भक्तजनां'विषयी मी ऐकले होते, पण तिकडे जायला निघालेल्या भक्तांचा तो पुण्यातच जमा झालेला महासागर पाहून मी चकित होऊन गेलो. त्या गर्दीतले सगळेच भाविक लोक 'विठूनामा'चा गजर करीत पंढरपूरपर्यंत चालत जाणारे नसले तरी न जाणारे लोक सुध्दा संतांच्या पालख्यांच्या दर्शनासाठी भक्तीभावाने तिथे जमले होते. मागे राहिलेले विठ्ठलभक्तसुध्दा एकादशीच्या दिवशी उपास करणार, घराजवळच्या देवळात जाऊन विठोबाचे दर्शन घेणार, निदान घरात ठेवलेल्या त्याच्या प्रतिमेची भक्तीभावाने पूजा करणार, त्याच्यासमोर अभंगवाणी गाऊन त्याची स्तुती आणि प्रार्थना करणार होते यात शंका नव्हती.

आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या वारीला पंढरीला जाणा-या भाविकांची गर्दी दरवर्षी वाढत जाते आणि त्याचे नवनवे उच्चांक स्थापित होतात असेच दिसते. इतक्या लोकांच्या मनात हा अमाप भक्तीभाव, ही गाढ श्रध्दा वगैरे भावना कशामुळे उत्पन्न होतात याचा तर्कशुध्द उलगडा मला आजवर झालेला नाही. ज्याला विठ्ठल, विठोबा, विठूराया, पांडुरंग वगैरे अनेक नावांनी त्याचे भक्त आळवतात, विठाई, विठू माउली अशा नावांनीसुध्दा ज्याला संबोधतात, अशा त्या विठ्ठलाचे एवढे जबरदस्त आकर्षण कशामुळे निर्माण होते याबद्दल अनेक संतांनी त्यांच्या रचनांमध्ये सांगून ठेवले आहे. पिढ्यानपिढ्या लहानपणापासून ज्या लोकांच्या कानावर हे अभंग पडत गेले असतील, त्यांच्या मनावर त्यांचा अर्थ खोलवर बिंबत गेला असणार, आपल्या परंपराप्रिय समाजात वारीला जाण्याची प्रथा सुध्दा वडिलांकडून मुलाकडे अशी पुढे पुढे चालत राहिली असणार. पण तो उपक्रम नुसताच जुलुमाचा रामराम असता तर पुढल्या पिढीतल्या लोकांनी एकादे निमित्य दाखवून कधीच बंद करून टाकला असता. तसे न करता अधिकाधिक लोक उत्स्फूर्तपणे यात सामील होऊ लागले आहेत, याचा अर्थ त्यातून त्यांना आर्थिक फायदा नसला तरी मानसिक लाभ तरी मिळत असणार.

दरवर्षी आषाढी एकादशीच्या सुमाराला मुंबईपुण्यासह सगळ्या शहरांमध्ये खास सांगीतिक कार्यक्रम केले जातात. योजना प्रतिष्ठान या संस्थेतर्फे झालेल्या या अभंगवाणीच्या कार्यक्रमाला मी ओळीने अनेक वर्षे हजेरी लावलेली आहे. स्व.पं.शिवानंद पाटील, अजित कडकडे, सुरेश वाडकर, साधना सरगम यासारख्या लोकप्रिय गायकांनी गायिलेले अभंग त्यात ऐकले आहेत. एकादशीच्याच दिवशी या कार्यक्रमाला येणे अनेक प्रेक्षकांना सोयीचे नसल्यास त्याच्या तीन चार दिवश आधीपासून ते ठेवले जातात. या वर्षी तर अशा प्रकारचा एक खास कार्यक्रम दोन आठवडे आधीच होऊन गेला. सर्व वयोगटांमधल्या श्रोत्यांनी त्याला चांगली हजेरी लावली आणि नवोदित कलाकारांच्या गायनाला देखील उत्स्फूर्त दाद दिली.  

या विठ्ठलाबद्दल इतिहासकाळामधल्या संतांपासून आजच्या युगातल्या गीतकारांपर्यंत अनेकांनी काय सांगितले आहे याचा अत्यंत त्रोटक आढावा या लेखमालिकेत घेण्याचा एक लहानसा प्रयत्न यंदाच्या वारीच्या निमित्याने मी करणार आहे. संतश्रेष्ठ तुकाराम यांच्यासाठी तर विठ्ठल हे त्यांचे सर्वस्व होते.  काया, वाचा. मनसा ते सतत त्याचेच ध्यान करत असत. तो त्यांच्या चित्ती वास करत असला तरीसुध्दा त्याचे नाव जिभेवर घेतांना, त्याची गीते गातांना त्यांना अतीशय आनंद वाटत असे. त्यांना लौकिक धनदौलतीचा मोह नव्हताच. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना उंची वस्त्रालंकारांचा नजराणा भेट म्हणून पाठवला तेंव्हा ही संपत्ती आम्हाला तृणासमान आहे असे म्हणून त्यांनी तो साभार परत पाठवला. विठ्ठलाचे भजन गात असतांना साथीसाठी उपयोगी पडणारे टाळ आणि चिरळ्या त्यांच्यासाठी अनमोल द्रव्यासारख्या होत्या. विठ्ठलाचे नाव घेतल्याने त्यांना अमृताचा घोट घेतल्याप्रमाणे संजीवनी प्राप्त होत असे. त्यातून त्यांच्या सर्वांगाला चैतन्य मिळत असे.

विठ्ठल हा चित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥१॥
आम्हां विठ्ठल जीवन । टाळ चिपुळिया धन ॥२॥
विठ्ठल विठ्ठल वाणी । अमृत हे संजीवनी ॥३॥
रंगला या रंगे । तुका विठ्ठल सर्वांगें ॥४॥

विठ्ठलाची गीते गातांना त्यांच्या अंतरंगात होणारे परिणाम या अभंगात आहेत, तर या गायनभक्तीमुळे सर्वांचाच उध्दार व्हावा यासाठी खाली दिलेल्या अभंगातून ते सगळ्या जनतेला उपदेश करत असतात. विठ्ठलाचे मनात स्मरण करावे, मुखाने त्याची गीते गावीत आणि विटेवर उभे असलेले त्याचे रूप डोळ्यांनी पहावे असे ते सांगतात. हे करण्यामध्ये त्यांचाच फायदा कसा आहे हे पुढील कडव्यांमध्ये दिले आहे. अनाथ लोकांसाठी तो भाऊ होऊन त्यांची काळजी घेतो. हाच आशय जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे या अलीकडच्या गाण्यामध्ये आहे. आपला सध्याचा जन्म म्हणजे एक पासिंग फेज आहे. याच्या आधी अनेक जन्म होऊन गेले असतील आणि नंतरही होणार आहेत अशी हिंदू धर्माची परंपरागत शिकवण आहे. संत तुकारामाच्या काळात तर याबद्दल कोणालाही शंका नव्हती. त्यामुळे सर्वगुणसंपन्न आणि सर्वशक्तीमान विठ्ठलाला जो कोणी शरण जाईल त्याला तो मुक्ती देईल हे खूपच मोठे आमिश त्यांनी दाखवले आहे. त्याचे नाव घेऊन त्याचे गीत गातांना त्यात तल्लीन होऊन समाधी लागली तर त्या अनुभवामधून तोंड तर गोडावणारच ना ? 

विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा ।
विठ्ठल उभा पहावा विटेवरी ॥१॥
   अनाथांचा बंधु विठ्ठल कृपासिंधु ।
   तोडी भवबंधु यमपाश ॥२॥
तो चि शरणांगतां विठ्ठल मुक्‍तिदाता ।
विठ्ठल या संतांसमागमें ॥३॥
    विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्वसिद्धि ।
    लागली समाधि विठ्ठल नामें ॥४॥
विठ्ठलाचें नाम घेतां झालें सुख ।
गोडावलें मुख तुका म्हणे ॥५॥

मागल्या आठवड्यात मी जो अभंगवाणीचा कार्यक्रम ऐकला त्यातल्या गायकाचे अस्पष्ट उच्चार, मायक्रोफोनमधून होणारे डिस्टॉर्शन आणि कदाचित माझ्या ऐकण्यात होणारी गफलत या सगळ्यांचा मिळून असा परिणाम झाला की मला हा अभंग सारखा "विठ्ठल किती  गावा" असा ऐकू येत होता. मग मनात विचार आला की संत तुकारामांचे शब्द वेगळे असले तरी निरनिराळ्या संतांनी, कवींनी आणि गायकांनी विठ्ठलाचे गुणगायन किती प्रकारे केले आहे हे सांगणारा एक लेख लिहिण्यासाठी 'विठ्ठल किती गावा' हे शीर्षक चांगले आहे

.  . . . . . . . . . . . .  . . . . . . . ..  . ..  .. . .  . . ..  . . . . ( क्रमशः)

Friday, July 05, 2013

तेथे कर माझे जुळती - १४ - शंतनुराव किर्लोस्कर (उत्तरार्ध)

 

माझ्या लहानपणच्या शंतनुरावांसंबंधीच्या आठवणी पूर्वाधात दिल्या आहेत.
http://anandghan.blogspot.in/2013/07/blog-post.html

शंतनुराव किर्लोस्कर यांचे नाव आणि फोटो मला वर्तमानपत्रांमध्ये आणि टीव्हीवर वरचेवर दिसत असत आणि त्याबरोबर येणारा मजकूर वाचून मनामधली त्यांची प्रतिमा अधिकाधिक उज्ज्वल होत गेली. त्यातल्या एकेका बातमीतून किंवा लेखामधून अत्यंत हुषार, धोरणी, कार्यक्षम, कर्तबगार, तत्वनिष्ठ असूनही प्रॅक्टिकल, सज्जन, विचारवंत, कल्पक, दूरदर्शी, मनमिळाऊ, लोकप्रिय, प्रामाणिक, निर्भिड, निर्भय वगैरे अनेक विशेषणे मनातल्या त्यांच्या व्यक्तीरेखेशी जोडली जात होती. त्यांची पर्सनॅलिटी, बोलणे, चालणे, वागणे वगैरे सगळे रुबाबदार होते, माझ्या मनावर आपोआपच त्यांची छाप पडत होती. त्यांनी वार्ताहरांना दिलेल्या मुलाखतींमधले काही मुद्दे दीर्घकाळ लक्षात राहण्यासारखे होते.

एकदा एका मुलाखतकाराने त्यांना विचारले की पुण्याला त्यांचे तीन चार कारखाने असतांना त्यातल्या कामगारांसाठी वसाहत बांधायचा विचार त्यांनी का केला नाही? त्याला अत्यंत समर्पक उत्तर देतांना त्यांनी सांगितले, "आम्हाला इंजिनियरिंगमधले जास्त समजते म्हणून आम्ही या क्षेत्रावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. इमारतींचे बांधकाम, त्याचा मेंटेनन्स, इस्टेट मॅनेजमेंट वगैरेतले आम्ही तितकेसे जाणत नाही आणि ते शिकून घेण्याची आम्हाला इच्छा नाही, आमचा अमूल्य वेळ आम्हाला त्यात घालवायचा नाही. या कारणासाठीच आम्ही कारखान्यांसाठी जागांची निवड करतांना पुणे आणि बंगलोरसारखी मोठी शहरे निवडली. या ठिकाणी घरे बांधून देण्याचे काम जाणणारे अनेक व्यावसायिक आहेत. त्यांचे काम त्यांनाच करू देत. आमच्या कामगारांना ती घरे विकत किंवा भाड्याने घेण्यासाठी आम्ही अर्थसहाय्य करू शकतो, पण आम्हाला स्वतःला त्या उद्योगात पडायचे नाही."
"मग किर्लोस्करवाडी तरी कशाला वसवली?" या प्रश्नावर त्यांचे उत्तर होते, "तो काळ वेगळा होता. कारखान्यात काम करण्यासाठी जे कामगार येतील त्यांच्या निवासाची चांगली सोय करणे तेंव्हा आवश्यकच होते. त्या काळात नवा कारखाना उभा करण्यासाठी मिळालेल्या ओसाड जमीनीवर शून्यामधून नवे विश्व उभे करायचे होते. या ध्येयाने प्रेरित होऊन त्यासाठी जे काही आवश्यक होते ते माझ्या वडिलांना करावे लागले आणि त्यांनी ते आनंदाने केले. पण आजही आम्ही त्याच ठिकाणी उभे रहायला हवे का? आज उपलब्ध असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि आमच्या क्षमतेचा जास्तीत जास्त उपयोग कशात होणार आहे हे पाहून आम्हाला त्या दिशेने पुढे जायला पाहिजे ना?" 

किर्लोस्करांचे उद्योगविश्व सांभाळत असतांनाच ते पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याची विचारपूर्वक तयारी शंतनुरावांनी केली. त्या व्यापातली दैनंदिन व्यवहार पहाण्याची आणि जबाबदारी संभाळण्याची एकेक कामे त्यांनी पुढच्या पिढीकडे सोपवली आणि धोरण ठरवणे, मार्गदर्शन करणे वगैरेसारख्या मूलभूत मुद्यांवर ते अधिक लक्ष देऊ लागले होते. त्या काळातल्या एका वार्ताहरपरिषदेत एका रिपोर्टरने त्यांना खवचटपणे विचारले, "तुमचा व्यवसाय चालवण्यासाठी तुम्ही प्रोफेशनल मॅनेजर्स का ठेवत नाही?"
शंतनुरावांनी त्यालाच उलट विचारले, "असे तुम्हाला कुणी सांगितले?" ते पुढे म्हणाले, "आमच्या कंपन्यांच्या टॉप मॅनेजमेंटमधले सारेजण उच्चशिक्षित आहेत. इंजिनियरिंग, मॅनेजमेंट, फायनॅन्स वगैरेंमध्ये त्यांनी जगप्रसिध्द संस्थांमधून शिक्षण किंवा प्रशिक्षण घेतले आहे. आधुनिक काळातली सगळी मॅनेजमेंट टूल्स वापरण्यात ते निष्णात आहेत. प्रोफेशनल मॅनेजर होण्यासाठी आणखी काय असायला पाहिजे?"
यावर काही उत्तर येण्याआधीच शंतनुरावांनी हल्ला चढवला, "एकादी आगबोट बुडण्याची भीती वाटली तर सगळ्यात आधी त्या बोटीवरचे उंदीर पळ काढतात, तशा पळपुट्या किंवा कुणीतरी मोठे गाजर दाखवले की तिकडे धाव घेणा-या आधाशी लोकांनाच तुम्ही प्रोफेशनल मॅनेजर म्हणणार का? बिकट परिस्थिती आली तरी आमचे लोक तसे घाबरून पळून जाणार नाहीत, तिला खंबीरपणे तोंड देतील. शिवाय आणखी कुठे आणखी काय मिळते का हे शोधत ते फिरत नाहीत म्हणून त्यांचे प्रोफेशनल स्किल कमी ठरते का?"
या उत्तराने गांगरून जाऊन तो पत्रकार गारेगार पडला. "हे सगळे गुण किर्लोस्कर आडनावाच्या लोकांमध्येच असतात का?" असा दुसरा कुजकट प्रश्न त्याने विचारलाही असता तरी त्यालाही शंतनुरावांनी समर्पक उत्तर दिलेच असते. आपण जे काही करतो ते बरोबरच आहे याची खात्री आणि आत्मविश्वास त्यांच्या रोखठोक बोलण्यात व्यक्त होत असे. गुळमुळीत उत्तर देणे किंवा प्रश्नाला बगल देणे असे ते सहसा करत नसावेत.

शंतनुराव किर्लोस्करांना प्रत्यक्ष पाहण्याची पहिली संधी मला गुणवत्ता या विषयावरील एका कॉन्फरन्स किंवा सेमिनारमध्ये मिळाली. अर्थातच त्या वेळी मी प्रेक्षकांमध्ये बसलो होतो आणि ते प्रमुख वक्ते म्हणून व्यासपीठावर विराजमान झाले होते. संस्थेचे पदाधिकारी आणि उद्योगपती, सनदी अधिकारी, राजकीय नेते वगैरे इतर काही मान्यवर त्यांच्यासोबत बसले होते. सूत्रसंचालक, स्वागताध्यक्ष आणि इतर मान्यवरांनी आपापल्या भाषणात गुणवत्तेचे अमाप कौतुक करून "आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट टॉप क्वालिटी असली पाहिजे", "आमच्या कारखान्यात तयार होणारी प्रत्येक वस्तू बेस्ट क्वालिटीचीच असते." वगैरे वारेमाप विधाने केली. शंतनुरावांनी त्यांच्या 'की नोट अॅड्रेस'ची सुरुवात अशी केली. "क्वालिटी या शब्दाचा अर्थ फक्त बेस्ट क्वालिटी असा होत नाही." एवढे बोलून त्यांनी एक छोटासा पॉज घेतला आणि व्यासपीठावरील इतर मंडळींवर नजर टाकली. "आतापर्यंत जे काही बोलले गेले ते कसे निरर्थक होते." असा त्या नजरेचा अर्थ सुजाण श्रोत्यांना त्या नजरेमधून समजला. कुठल्याही कारखान्यात जी वस्तू किंवा जे यंत्र तयार होते ते कशासाठी वापरायचे असते हा उद्देश ठरलेला असतो आणि त्या कारणासाठी ते विकत घेणा-या ग्राहकांच्या तशा अपेक्षा असतात. त्या पूर्ण होतील अशी खात्री देणे म्हणजे 'गुणवत्ता'. प्रत्येक बाबतीत 'बेस्ट क्वालिटी'चा हट्ट धरण्यापेक्षा खात्रीलायक 'अॅप्रोप्रिएट क्वालिटी' आणणे हा त्याच्या इंजियरिंगचा गाभा असला पाहिजे. या दृष्टीने स्टँडर्डायझेशन करून प्रत्येक उत्पादनाचे वर्गीकरण करून त्यातल्या प्रत्येक ग्रेडचे गुणधर्म ठरवले जातात आणि ते जाणून घेण्यासाठी कोणकोणत्या तपासण्या करायच्या हे ठरवले जाते. आपले उत्पादन त्या तपासण्यामधून शंभर टक्के पास होत असले तर त्याचा अर्थ त्याची गुणवत्ता समाधानकारक आहे. स्टेनलेस स्टीलमध्ये साध्या पोलादापेक्षा अनेक बाबतीत चांगले गुण असतात, पण गरज नसतांनासुध्दा 'बेटर क्वालिटी' म्हणून साध्या पोलादाऐवजी स्टेनलेस स्टील वापरले तर त्यामुळे त्या वस्तूची किंमत जेवढी वाढते त्या प्रमाणात त्याची गुणवत्ता वाढत नाही. सोने हा काही दृष्टीने सर्वोत्कृष्ट म्हणजे 'बेस्ट क्वालिटी'चा धातू असला तरी यंत्राचे भाग सोन्याचे करून काहीच फायदा नाही, उलट ते यंत्र चालणारसुध्दा नाही. अशा प्रकारची अनेक उदाहरणे देऊन 'क्वालिटी' किंवा 'गुणवत्ता' या संकल्पनेचा अर्थ त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे समजावून सांगितला की सर्व श्रोते मंत्रमुग्ध होऊन त्यांचे व्याख्यान ऐकत राहिले.
     
आमच्या एका प्रकल्पासाठी काही अतिविशिष्ट यंत्रसामुग्री तयार करण्याचे कठीण काम किर्लोस्कर ब्रदर्स या कंपनीला दिले होते. श्री.संजय किर्लोस्कर त्या आव्हानात्मक कामगिरीकडे जातीने लक्ष ठेवत असल्यामुळे त्यातल्या महत्वाच्या मुद्द्यांवर आमची त्यांच्याशी चर्चा होत असे. या निमित्याने आमच्या भेटी होत असतांना शंतनुरावांशी एकदा भेटण्याची मनापासूनची इच्छा आम्ही व्यक्त केली. संजय यांनीही विचार विनिमय करून त्या भेटीची तारीख आणि वेळ ठरवली. त्यानुसार माझे वरिष्ठ अधिकारी आणि मी पुण्याला जाऊन पोचलो. त्यांच्या 'लकाकि' बंगल्यात आम्हाला नेण्यात आले. शंतनुरावांचे वडील आणि किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आद्य संस्थापक कै.लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या नावाची आद्याक्षरे घेऊन त्या बंगल्याचे नामकरण केले असणार. तो टुमदार बंगला सुंदर आणि नीटनेटका दिसत होता. त्या परिसरातल्या आजूबाजूच्या बंगल्यांमध्ये कोण रहात होते आणि ते किती मोठे होते याची मला काही कल्पना नाही, पण जगप्रसिध्द उद्योगपती शंतनुराव या बंगल्यात रहातात असे त्याचे वेगळेपण दाखवणारी कोणतीही ठळक खूण मला तरी तिथे दिसली नाही.

लहानपणापासून मला शंतनुराव हिमालयासारखे उत्तुंग वाटत होते आणि मी त्यांच्या पायथ्याशी तरी कधी पोचेन असे वाटले नव्हते. इतक्या वर्षांपासून स्वप्नवत वाटणारी त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा पूर्ण होण्याची वेळ जवळ आली होती, पण त्यासाठी मी काहीच तयारी केली नव्हती. वयाने मी त्यांच्या वयाच्या अर्ध्याहूनही लहान होतोच, ज्ञान, अनुभव, यश, समृध्दी, सामर्थ्य अशा कुठल्याही बाबतीत त्यांच्या पायाच्या बोटाच्या नखाचीसुध्दा मला सर आली नसती. त्यामुळे त्यांच्यासमोर गेल्यावर काय बोलावे हेच मला समजत नव्हते, चुकून एकादा वावगा शब्द तोंडातून बाहेर पडला तर जन्मभर पस्तावा करावा लागणार अशी धाकधूक मनात वाटत होती. अनुभवी लोकांना विचारून घेऊन बोलण्यासारखी दोन चार वाक्ये तयार करावी एवढेही मला आधी सुचले नव्हते. 'लकाकि' बंगल्यात प्रवेश करतांना माझ्या मनात असे विचार येत होते. बंगल्याच्या दिवाणखान्यात जाताच शंतनुरावांचे दर्शन झाले. ऐंशीच्या घरात पोचल्यानंतरसुध्दा त्यांचा चेहेरा तितकाच तेजःपुंज होता. शक्य तेवढे वाकून त्यांना अभिवादन केले. त्यांनी आम्हाला समोर बसवून घेतले. संजयने आमची ओळख करून दिली.

चेर्नोबिलच्या आधीच्या त्या काळात अणुशक्तीविरोधाचे वातावरण तयार झालेले नव्हते, पण पोखरण होऊन गेल्यानंतर भारतावर अनेक प्रतिबंध लादण्यात आलेले होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही स्वावलंबी होण्याचा आटोकाट प्रयत्न करत होतो. देशाच्या स्वावलंबनाबाबत शंतनुराव अनुकूल होते, पण सार्वजनिक क्षेत्राबद्दल त्यांची मते फारशी अनुकूल नसावीत. असा आमचा अंदाज होता. अशा उलटसुलट परिस्थितीत ते कितपत आमच्या पाठीशी आहेत याबद्दल आमच्या मनात संभ्रम होता. तरीही त्यांनी आम्हाला भेटण्याची संधी दिली ही आशेची बाजू होती. माझ्या बॉसने आमचा प्रॉजेक्ट आणि त्यात किर्लोस्करांचा सहभाग यावर थोडक्यात माहिती दिली. त्यांच्याकडे तेवढी माहिती नक्कीच होती, पण संभाषणाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने ते सुसंगत होते. आमच्या क्षमतेवर त्यांचा किती विश्वास होता हे कळायला मार्ग नव्हता, त्यामुळे आम्ही हातात घेतलेले काम आमच्या आवाक्यात आहे की नाही याबद्दल ते कदाचित साशंक असण्याची शक्यता होती. आमच्या प्रकल्पाच्या आर्थिक बाजूवर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आमच्याकडे समाधानकारक उत्तरे नव्हती. त्यामुळे देशाची आन, बान, शान, इभ्रत आणि नवे तंत्रज्ञान विकसित करणे वगैरेंवर आम्ही भर दिला. या प्रयत्नात किर्लोस्कर उद्योगाच्या महत्वपूर्ण सहभागाची प्रशंसा केली. पण यामधून तात्कालिक किंवा भविष्यकाळात कोणता लाभ होणार आहे बाबद्दल ते विचारणा करत राहिले. या प्रयत्नामुळे भारताची इभ्रत वाढली आणि किर्लोस्कर उद्योगसमूहाचा लौकिक वाढला तरी त्यामधून निर्यात करण्याच्या संधी वाढण्याची शक्यता ते आजमावून पहात असावेत. तोपर्यंत ते वैश्विक पातळीवर विचार करू लागलेले होते. दहा पंधरा मिनिटे वार्तालाप आणि चहापान करून झाल्यावर आम्ही त्यांचा निरोप घेतला. त्यांच्याकडून पाठीवर थाप किंवा हात ठेवणारे आश्वासन पदरात पडले नसले तरी आमची बाजू मांडायची संधी मिळाली होती. माझ्या व्यक्तीगत दृष्टीने पाहता त्यांचे जवळून दर्शन घडले हेच खूप महत्वाचे होते.

कॅक्टस अँड रोजेस या नावाने शंतनुरावांनी लिहिलेल्या आत्मचरित्रामध्ये त्यांना आलेले कटु व चांगले अनुभव लिहिलेले आहेत. त्यातले एक वाक्य एपीजे अब्दुल कलाम यांनी शंतनुरावांच्या शतसांवत्सरिक समारंभात भाषण करतांना उद्धृत केले होते. ते असे आहे. 'when productively used capital and materials, men and machines, yield results in proportions to the skill and brains of the user'. साधनसामुग्री, मनुष्यबळ आणि यंत्रे या सर्वांचा कौशल्य आणि बुध्दीमत्ता यांच्या सहाय्याने उपयोग करून घेतला तर त्यामधून चांगला विकास होतो, प्रगती होते. यावर त्यांचा ठाम विश्वास होता आणि ते साधण्याचा प्रयत्न ते सदोदित करत राहिले होते. त्यांच्या शतसांवत्सरिक समारंभाचे जे आमंत्रण मला आले होते, त्यात त्यांच्या यापूर्वी मला माहीत नसलेल्या एका पैलूचे दर्शन झाले. ते म्हणजे शंतनुराव एक उत्कृष्ट चित्रकारसुध्दा होते. त्यांनी काढलेल्या रंगीत चित्रांचा संच या निमंत्रणासोबत मिळाला होता. त्यातल्या काही चित्रांचे अंश या लेखाच्या वर दिले आहेत. त्यांच्या आठवणीने फक्त हातच जोडले जात नाहीत तर त्यांच्या चरणावर मस्तक ठेवावे असे वाटते.
.  . . . . . . . . . . . . . . . . . . . . .  (समाप्त) 
     

Thursday, July 04, 2013

तेथे कर माझे जुळती - १४ - शंतनुराव किर्लोस्कर (पूर्वार्ध)



माझ्या आयुष्यात मला प्रत्यक्ष भेटलेल्या ज्या मोठ्या व्यक्तींच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे त्यांच्याबद्दल या सदरात दोन शब्द लिहायचे असे मी पाच वर्षांपूर्वी ठरवले होते. यातल्या एकेका व्यक्तीबद्दल ग्रंथ आणि अगणित लेख लिहिले गेले आहेत. त्या महान लोकांची समग्र माहिती थोडक्यात देणे मला शक्यही नाही, माझी तेवढी पात्रताही नाही आणि हे लेख लिहिण्यामागे माझा तसा उद्देशही नाही. "या थोर लोकांबरोबर माझी ओळख होती." अशी शेखी मारण्याचे माझे वय आता राहिले नाही. फक्त माझ्या कांही जुन्या व्यक्तिगत आठवणी आणि या महान लोकांचा माझ्यावर पडलेला प्रभाव यासंबंधी माझे चार शब्द मी या निमित्याने मांडणार आहे. यामुळे यातसुध्दा कदाचित थोडासा मीच डोकावलेला दिसणार याला काही इलाज नाही. या लेख मालिकेतले हे चौदावे पुष्प प्रख्यात उद्योगपती स्व.शंतनुराव किर्लोस्कर यांना समर्पित करीत आहे.

पन्नास वर्षांपूर्वीच्या काळातल्या दर्जेदार आणि लोकप्रिय मराठी मासिकांमध्ये किर्लोस्कर, स्त्री आणि मनोहर या मासिकांना मानाचे स्थान होते. या तीन्ही मासिकांचे प्रकाशन किर्लोस्कर कुटुंबीयांकडून होत असे. किर्लोस्करांच्या कारखान्यांसंबधी काही महत्वाचे व़त्तांतसुध्दा या मासिकांमध्ये संक्षिप्तपणे दिले जात असत. एकाद्या नव्या कारखान्याचे किंवा त्यातल्या नव्या भागाचे उद्घाटन, एकादा बक्षिस समारंभ, स्नेह संमेलन, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रम, माननीय स्थानिक किंवा परदेशी पाहुण्यांची भेट अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये उद्घाटक, वक्ते, प्रमुख पाहुणे, यजमान अशा निरनिराळ्या भूमिकांमध्ये श्री.शंतनुराव किंवा एस.एल. किर्लोस्कर यांचे दर्शन या पानांमधून नेहमी होत असे, त्या प्रसंगी त्यांनी दिलेल्या संदेशाचा गोषवारा दिलेला असे. त्या काळात मी वयाने लहान असलो तरी मासिकांची पाने सहज चाळता चाळता अशा बातम्यांकडेही माझी नजर वळत असे. त्यायोगे एक अद्वितीय आणि महान व्यक्ती अशी श्री. शंतनुराव किर्लोस्कर यांची प्रतिमा या वाचनामधून मनात तयार होत गेली.

मी शाळेत असतांनाच स्व.जमशेदजी टाटा यांचे अल्पचरित्र माझ्या वाचण्यात आले होते. त्यांनी लोखंड आणि पोलाद तयार कऱण्यासाठी भारतातला पहिला मोठा कारखाना उभारला होता. जमशेदपूर आणि टाटानगर अशी दोन शहरे त्यांच्या नावाने वसवली गेली होती. टाटांच्या कारखान्यात रेल्वे इंजिनासारखी अजस्त्र यंत्रे तयार केली जात होती, मुंबई महानगराला होणारा विजेचा पुरवठा टाटा कंपनीकडून केला जात होता, त्यासाठी बांधलेली धरणे त्यांच्या मालकीची होती, शिवाय तेल, साबण आणि मीठ यासारख्या रोजच्या उपयोगाच्या वस्तूही टाटा या नावाने बाजारात विकल्या जात होत्या. त्यामुळे त्या काळात टाटा कंपनी भारतातली सर्वात मोठी कंपनी होती यात काही शंका नव्हती. बिर्लांचे नाव मी ऐकले होते, पण त्या नावाने कोणतीही वस्तू स्थानिक बाजारात दिसत नव्हती, सेठ घनश्यामदास बिर्ला हे महात्मा गांधींचे निकटवर्ती होते असेही ऐकले असल्यामुळे ते बहुतेक चरखा, पंचा, धोतर वगैरेंचे उत्पादन करत असावेत असा एक तर्क मनात येत होता. त्या काळच्या बिर्ला यांच्या विशाल साम्राज्याची मला सुतराम कल्पना नव्हती. वालचंदनगर नावाचेही एक गाव ठाऊक होते, पण वालचंद ग्रुपबद्दल काही माहिती नव्हती. सिंघानिया, वाडिया, महिन्द्र वगैरेंची नावेदेखील ऐकली नव्हती, अंबानी, मित्तल, नारायणमूर्ती, प्रेमजी वगैरेंचा अद्याप उदय झाला नव्हता. यामुळे शालेय जीवनात असतांना माझ्या लेखी तरी टाटांच्या खालोखाल किर्लोस्करांचेच स्थान होते. शंतनुराव त्यांचे मुख्य असल्यामुळे तेही खूप ग्रेटच असणार यात शंका नव्हती.

पुण्याच्या इंजिनियरिंग कॉलेजवर त्या काळी किर्लोस्कर या नावाची एक प्रकारची छाया पसरलेली असायची. पुण्यातच ख़डकी, हडपसर आणि कोथरूड या भागात त्यांचे तीन कारखाने होते आणि टिळक रोडवर मोठे ऑफिस होते. आम्हाला एक दोन वर्षांनी सीनीयर असलेली अनेक मुले किर्लोस्करांच्या यातल्या एकाद्या कंपनीमध्ये नोकरीला लागली होती. आपल्या मित्रांना भेटायला ती हॉस्टेलवर आली तर त्यांच्या बोलण्यात आपल्या कंपनीचे खूप गुणगान येत असे. आमच्या कॉलेजातले बरेचसे ज्यूनियर लेक्चरर्स, डेमॉन्स्ट्रेटर्स वगैरे लोक किर्लोस्करांकडे नोकरीची संधी शोधत असत आणि ती मिळाली की लगेच कॉलेज सोडून तिकडे जात असत, असे वारंवार घडत असे. आमच्या काही वर्गबंधूंचे काका, मामा किंवा मावस, आते वगैरे भावंडे किर्लोस्कर कंपनीत नोकरीला असत आणि त्यांच्याकडूनसुध्दा फक्त चांगलेच रिपोर्ट येत असत. किर्लोस्कर समूहाच्या अनेक कंपन्या आहेत आणि प्रत्येकीचे व्यवस्थापन निरनिराळी मंडळी करतात एवढे सामान्यज्ञान वाढलेले असले तरी या सर्वांवर शंतनुरावांचा वचक आहे आणि सगळ्या कंपन्यांचे तेच प्रमुख कर्ताधर्ता होते याबद्दल कोणालाही शंका नव्हती. त्या सर्वच कंपन्या आपापल्या क्षेत्रात करत असलेल्या घोडदौडीचे श्रेय शंतनुरावांना मिळत असे. त्याचप्रमाणे तिथे काम करत असणा-या कर्मचारी वर्गामधले शिस्त आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यालाही तेच मुख्यतः कारणीभूत असल्याचे बोलले जात होते.

इंजिनियरिंग शिकत असतांना केलेल्या शैक्षणिक सहलीमध्ये दक्षिण भारतातले मोठमोठे कारखाने आणि पॉवर स्टेशन्स पाहण्याची संधी मिळाली. उत्तर भारताची सहल पाकिस्तानबरोबरच्या लढाईमुळे रद्द झाली, पण त्या निमित्याने त्या कारखान्यांची माहिती मिळाली होती. यावरून एवढे लक्षात आले की किर्लोस्कर उद्योगसमूह मोठा असला तरी त्यांच्याहूनही मोठे अनेक कारखाने भारतात आहेत. सर्व प्रकारची कारखानदारी पाहता त्यातले  किर्लोस्करांचे स्थान मला आधी वाटत होते तसे शिखराजवळ नव्हते. इंजिनियरिंगच्या क्षेत्रात मात्र त्यांचेही नाव आघाडीवर होते.   

पदवी मिळाल्यानंतर कसेही करून परदेशी म्हणजे अमेरिकेला जायचे हे माझ्या बॅचमधल्या बहुतेक पुणेकर विद्यार्थ्यांचे पहिले स्वप्न असायचे आणि श्रीमंत बापांची पोरे व्यवस्थित प्लॅनिंग करून ते साकार करून घेत असत. पण मध्यम वर्गीयांच्या मुलांच्या बाबतीत ते खूपच कठीण असल्यामुळे किर्लोस्करांच्या कंपनीत नोकरी धरणे हे त्यानंतर दुस-या क्रमांकावर असलेले स्वप्न ते पहात आणि त्याची पूर्तता होतही असे. मला स्वतःला सुध्दा किर्लोस्करांच्या एका कंपनीकडून इंटरव्ह्यूचा कॉल आला तेंव्हा खूप आनंद झाला होता, पण त्याच दिवशी माझ्या काही पुण्यातल्या मित्रांनाही बोलावले होते. इंटरव्ह्यूमध्ये सगळेच पास झाले असते तर त्यातून निवड करतांना त्या स्थानिक कँडिडेट्सनाच अधिक पसंती मिळाली असती. त्यामुळे माझ्या निवडीची शक्यता कमी झाली असती. योगायोगाने त्याच दिवशी इंटरव्ह्यूसाठी मला अणुशक्तीखात्याच्या प्रशालेकडूनही बोलावणे आले. या दोन आमंत्रणांचा विचार करता मला दुसरा पर्याय बरा वाटला आणि मी तिकडे जायचा निर्णय घेतला. पण किर्लोस्कर उद्योगाबद्दल मनात एक अनुकूल जागा तयार झालेली होती ती तशीच राहिली.

. .  . . . . .  . . . . . . . .  . . . . .  (क्रमशः)

स्व.शंतनुराव किर्लोस्करांना मी कधी पाहिले, त्यांना कधी भेटलो वगैरे महत्वाचा मजकूर या लेखाच्या उत्तरार्धात वाचावात.
http://anandghan.blogspot.in/2013/07/blog-post_5.html