Monday, August 18, 2008

फाटकी जीन पँट


एका वर्तमानपत्राच्या पुरवणीमध्ये 'देहबोली' नांवाचा लेख वाचला. त्याची सुरुवात एका जाहिरातीच्या वर्णनाने होते. एक तरुण मुलगी बाजारातून नवीन फॅशनची जीन पँट आणते. तिला उलगडून पाहून ती स्वतःवरच बेहद्द खूष होते. तिला पलंगावर पसरून ठेऊन ती वॉश घ्यायला बाथरूममध्ये जाते. तेवढ्यात तिची आई तेथे येते आणि त्या जीन पँटची जीर्णशीर्ण अवस्था पाहून तिला उसवलेल्या जागी टांके घालून आणि फाटलेल्या जागी ठिगळे लावून नीट करायचे ठरवते. त्या जीन पँटला पाहून त्यावर होणा-या मायलेकींच्या विरुद्ध प्रकारच्या प्रतिक्रिया या जाहिरातीमध्ये एकही शब्द न उच्चारता दोघींच्या देहबोलीवरून दाखवल्या आहेत .
या जाहिरातीचे वर्णन वाचून मला प्रत्यक्षात घडलेला एक प्रसंग आठवला. त्या वेळी मी गंभीर स्वरूपाच्या आजारातून बरा होण्याच्या मार्गावर होतो. त्या दिवशी मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार होता. माझा मुलगा त्याबद्दल डॉक्टरांशी बोलायला गेला होता. त्याची वाट पहात मी माझ्या वॉर्डच्या कॉरीडॉरमधल्या एका बेंचावर बसलो होतो. त्या वॉर्डच्या लांबलचक हॉलमध्ये पार्टीशन्स टाकून बिनदरवाज्याच्या खोल्या बनवलेल्या आहेत आणि प्रत्येक खोलीत दोन किंवा चार खाटा टाकून त्यांवर पेशंट्सना झोपवले जाते. बाहेरचा कॉरिडॉर मात्र एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत सलग आहे. माझ्या समोर असलेल्या खोलीमध्ये एक तरुण मुलगी त्यातल्या एका कॉटवर झोपलेल्या रुग्णाची अत्यंत आस्थेने सेवाशुश्रुषा करीत होती. त्याच्या कपाळावरून हात फिरवणे, त्याला मायेने थोपटणे वगैरे चालले होते. दाराकडे तिची पाठ असल्यामुळे आणि कॉरीडॉरच्या मानाने आंतमध्ये काळोख असल्याने तिचा चेहेरा नीटसा दिसत नसला तरीसुद्धा तिच्या मनातल्या प्रेमळ भावना तिच्या देहबोलीमधून स्पष्ट होत होत्या. एकंदर पेहरावावरून ती सुखवस्तू परिवारामधली होती यांत शंकाच नव्हती, पण तिने घातलेली जीन पँट ठिकठिकाणी फाटलेली किंवा उसवलेली दिसत होती. कुठे त्यातून धागे बाहेर लोंबत होते तर कुठे वाकडीतिकडी ठिगळे लावली होती. ते पाहून मला आधी थोडेसे आश्चर्यच वाटले पण ही सुद्धा एक फॅशनच असणार हे लगेच लक्षात आले आणि "असली कसली अंगावर लक्तरे चढवायची कर्मदरिद्री फॅशन!" म्हणून मी थोडेसे नाक मुरडले. त्या वेळी त्या मुलीबद्दल माझा कांही चांगला ग्रह झाला नाही. "असेल कोणीतरी आणि करेना कां कांहीही!" असे म्हणत मी दुसरीकडे नजर फिरवली.
माझा मुलगा डॉक्टरांना भेटून परत आल्यावर त्या मुलीला विसरून जाऊन मी माझ्या मुलाबरोबर बोलायला लागलो. डॉक्टरांनी काय सांगितले हे अर्थातच आता माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाचे होते. तेवढ्यात कोणीतरी मला "हॅलो अंकल" अशी हाक मारलेली ऐकून मी पटकन मान वर करून पाहिले. मघाशी समोरच्या खोलीत पाठमोरी दिसलेली जीन्स धारण केलेली मुलगीच माझ्या पुढ्यात उभी होती. अजीबात मेक अप न केल्यामुळे सामान्य वाटणारा सावळा तरतरीत चेहरा, बोलके डोळे आणि मधुर आवाज. कॉलनीतल्या स्कर्टमधल्या शाळकरी मुलींना आपण पाहिलेले असते ते अमक्या तमक्या मित्राची किंवा शेजा-याची मुलगी म्हणून. वर्षा दोन वर्षांनंतर त्याच मुली अपटुडेट कपडे घालून अचानक समोर आल्यावर वेगळ्याच दिसतात. त्यांना पटकन ओळखणे जरा कठीण जाते. आपल्यात फारसा फरक पडलेला नसल्यामुळे त्यांनी मात्र आपल्याला बरोबर ओळखलेले असते. त्यामुळे जरासे चांचरत चांचरतच ओळख दाखवून आधी ती कोण आहे ते आठवायचा प्रयत्न करावा लागतो. पण हा चेहरा तर अतिशय प्रसिद्ध होता. शिवाय तो विलक्षण गोड आवाज कानांत साठवलेला होता. त्यामुळे लगेच माझ्या लक्षात आले, अरे ही तर श्रेया!
श्रेयाला तर मीच काय पण त्या वेळी हॉस्पिटलमध्ये आलेल्या प्रत्येक माणसाने ओळखले असणार. नुकतेच तिला कोणचे तरी महत्वाचे पारितोषिक मिळाले असल्यामुळे तिची छायाचित्रे वृत्तपत्रामधून तसेच दूरचित्रवाणीवरील सगळ्या वाहिन्यांवर झळकली होती. तिने गायिलेली गाणी लोकांच्या ओठांवर होती. ती आता सेलिब्रिटी झालेली होती. पण तिने मला कसे ओळखले असेल? या वेळी मला आश्चर्याचा धक्का बसला तो या बरोबर विरुद्ध ओळखण्यामुळे. तसा आमचा कांही घरोबा नव्हता. तिचे वडील माझ्या ऑफीसात काम करीत होते एवढाच आमच्यातला दुवा असेल. तिच्याच कुठल्या तरी गाण्याच्या कार्यक्रमानंतर आमची औपचारिक ओळख झाली होती. त्यानंतर दोन तीन वेळा तिला स्टेजवर उभी राहून गात असतांना पाहून मी प्रेक्षकांत बसून टाळ्या वाजवल्या होत्या. तिचे कौतुक करण्यापलीकडे आमचे बोलणे असे कधी झाले नव्हते. माझ्या ऑफीसात मी ब-यापैकी उच्च पदे मिळवली असली तरी त्यांना प्रसिद्धीची वलये नव्हती. त्यातूनही मी आता निवृत्त होऊन कॉलनी सोडून गेल्यामुळे कॉलनीमधील लोकांच्या नजरेआड झालेलो होतो.
त्यानंतर मी तिला टीव्हीवरच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये नेहमीच पहात आलो होतो. कधी गातांना, कधी बक्षिस घेतांना तर कधी मुख्य पाहुणी किंवा परीक्षकाच्या स्थानावर बसलेल्या तिला पाहून "ही आमची श्रेया" असे आजूबाजूच्या लोकांना अभिमानाने सांगत होतो आणि सर्वस्वी तिच्या असलेल्या श्रेयातला भागीदार उगाचच बनत होतो. गायनकलेच्या क्षेत्रामधील प्रगतीपथावरील श्रेयाच्या घोडदौडीकडे माझे दुरूनच कौतुकाने लक्षपूर्वक पाहणे सुरू असले तरी तिच्या स्मरणात मला जागा असावी अशी मला मुळीच अपेक्षा नव्हती. त्यातून हॉस्पिटलमधील वास्तव्यात दाढीचे खुंट वाढलेले, आजारपणामुळे म्लान झालेला चेहरा, अंगावर रुग्णाचे ढगळ अस्ताव्यस्त कपडे अशा अवतारात माझे मलासुद्धा आरशात पाहून ओळखता आले असते की नाही याची शंका होती आणि ही अल्पावधीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोचलेली, नेहमी प्रखर प्रकाशझोतात वावरणारी मुलगी चक्क माझ्या पुढ्यात उभी राहून आपुलकीने माझी चौकशी करीत होती. क्षणभर त्यावर माझा विश्वासच बसेना. समोरच्या खोलीमध्ये उपचार घेत असलेल्या तिच्या भावाला भेटून परततांना तिने मला बाहेर बसलेले पाहिले आणि ती आपणहून चार पावले चालून माझ्या प्रकृतीची विचारपूस करायला आली होती.
माझे उरलेसुरले दुखणे क्षणार्धात पळून गेले. मला मनातून भरून आले. ज्या वातावरणात राहून तिने हे संस्कार मिळवले त्याचा मीसुद्धा एक भाग होतो याचा अभिमान वाटला. आता मला तिची जीर्णशीर्ण फाटकी जीनपँट अतीशय सुरेख दिसायला लागली होती.

2 comments:

priyadarshan said...

आपला प्रत्येक लेख मस्तच असतो

Anand Ghare said...

आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहे.