विष्णुभगवानांनी घेतलेल्या दशावतारांची नांवे सर्वांनाच तोंडपाठ असतात. त्यामधील मत्स्य, कूर्म आणि वराह हे पहिले तीन अवतार प्राणीवर्गांत घेतलेले आहेत. त्यांच्याबद्दल सुसंगत अशी फारशी माहिती सर्वांना ठाऊक नसते. भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण करून त्याने हिरण्यकश्यपु राक्षसाला ठार मारले आणि बटु वामनाच्या वेषात येऊन महाबळीराजाला पाताळात गाडले. एवढी कामे करण्यापुरतेच श्रीविष्णूने हे दोन अवतार घेतले आणि कार्यभाग संपताच ते पुन्हा अदृष्य होऊन गेले. अशा रीतीने त्यांच्या पहिल्या पांच अवतारांमधील संपूर्ण जीवनाची कथा सामान्यांना ज्ञात नसते. त्यानंतरचे परशुराम, रामचंद्र आणि श्रीकृष्ण या तीन अवतारांबद्दल अनेक आख्याने ऐकलेली असतात. या अवतारांमधील त्यांचे आईवडील कोण होते, त्यांचे बालपण कसे गेले, मोठे झाल्यावर त्यांनी कोणते जीवितकार्य केले वगैरेची खूप सविस्तर माहिती बहुतेक लोकांना ठाऊक असते. शेवटचे दोन अवतार बुद्ध आणि कल्की यांच्याबद्दल पुन्हा थोडा संभ्रम आहे.
दहावा कल्की अवतार कधी होणार आहे कोणास ठाऊक? तो होऊन गेला आहे असेही कांही लोक समजतात, पण 'विष्णूचा अवतार' म्हणून ओळखला जावा एवढा मोठा महापुरुष कांही अलीकडच्या काळात होऊन गेलेला दिसत नाही. सर्वसाधारणपणे गौतम बुद्धालाच 'विष्णूचा नववा अवतार' मानले जाते. पण पंढरपूरचा विठ्ठल हाच 'बुद्ध' नांवाचा नववा अवतार आहे असे समजणारे अनेक लोक महाराष्ट्रात आहेत. हा समज कधी आणि कुठे निर्माण झाला आणि कोठपर्यंत पसरला ते माहीत नाही, पण मी तो लहानपणीच ऐकला होता आणि इतिहासाच्या पुस्तकातून गौतमबुद्धाची ओळख होण्यापूर्वी मी ही तसेच समजत होतो. सह्याद्री वाहिनीवरील विठ्ठलाची माहिती देणारा एक बोधपट पाहिला होता त्यांतसुद्धा असेच विधान केलेले दिसले. त्याबद्दल थोडे स्पष्टीकरणसुद्धा दिले गेले.
भक्त पुंडलीकावर प्रसन्न होऊन भगवान विष्णु त्याला भेटायला त्याच्या पंढरपूर येथील जागी आले. नेमका त्या वेळेस तो आपल्या आईवडिलांच्या सेवेत गर्क होता, म्हणून त्याने विष्णूच्या दिशेने एक वीट भिरकावून देऊन तिच्यावर थोचा वेळ उभे रहायला सांगितले. पुंडलीकाला पुरसत मिळताच त्याने विष्णूला वंदन करून त्याची क्षमा मागितली आणि त्याने कशासाठी येणे केले ते विचारले. विष्णूने आपण त्याच्यावर प्रसन्न झालो असल्याचे सांगून कोणतेही वरदान मागायला सांगितले, पण "आपण आपल्या मातापितरांच्या सेवेत पूर्णपणे संतुष्ट आहोत, आपल्याला आणखी कांही नको" असे पुंडलीकाने सांगितले. "स्वतःसाठी कांही नको असल्यास इतरांसाठी माग." असे म्हणताच "देवाने आपला पुढील अवतार सुजनांच्या कल्याणासाठी घ्यावा." असे मागणे त्याने मागितले आणि देवाने "तथास्तु" म्हंटले. तोच त्याचा पुढचा अवतार समजायचा कां नाही यावर दुमत होऊ शकते.
'अवतरणे' म्हणजे वरून खाली येणे एवढा अर्थ घेतला तर विठ्ठल हा सुद्धा एक 'अवतार' ठरू शकतो, पण या अवतारात त्याने त्यापूर्वीच्या परशुराम, रामचंद्र व श्रीकृष्ण यांच्यातल्याप्रमाणे मानवी मातापित्यांच्या घरी जन्म घेतलेला नाही. गौतमबुद्धाने मात्र 'सिद्धार्थ' या नांवाने मनुष्यजन्म घेतला होता हा एक फरक आहे. विठ्ठलाच्या नांवाला बहुधा शास्त्रपुराणांचा आधार नसावा. विष्णूच्या दशावतारांच्या यादीत त्याचे नांव नाही तसेच केशव, नारायण, माधव इत्यादी त्याच्या ज्या चोवीस नांवांना पूजाविधीमध्ये सारखा नमस्कार केला जातो त्यातही विठ्ठल हे नांव नाही. इतकेच नव्हे तर विष्णूसहस्रनामांत देखील त्याचा समावेश नाही. गौतमबुद्धाचा आहे की नाही ते माहीत नाही, पण विठ्ठलाच्या नांवाला शास्त्रपुराणांची मान्यता मिळालेली होती असे दिसत नाही.
विठ्ठल आणि गौतमबुद्ध या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे दोघांनीही कुठल्या दैत्याचा संहार वगैरेसारखी हिंसा केलेली नाही. विष्णूच्या हातात नेहमी सुदर्शनचक्र, शंकराकडे त्रिशूळ किंवा श्रीरामाकडे धनुष्यबाण असतात, पण पांडुरंगाच्या हातात कोणतेही शस्त्र नसते. दोन्ही हात कंबरेवर ठेऊन तो शांत मुद्रेने उभा असतो. गौतमबुद्धाने तर क्षत्रियधर्माचा त्याग करून अरण्यवास पत्करला आणि विश्वबंधुत्वाचा उपदेश जगाला केला. विठ्ठलाच्या भक्तांनी म्हणजेच सर्व संतांनीसुद्धा आपसातील प्रेम वाढवण्याचाच संदेश सगळ्या लोकांना दिला. विठ्ठलाने त्यांना परोक्ष अपरोक्ष रूपाने सतत सहाय्य केले असल्याच्या आख्यायिका आहेत. "देवाने आपला पुढील अवतार सुजनांच्या कल्याणासाठी घ्यावा" ही मागणी अशा रीतीने पूर्ण होतांना दिसते.
आजच्या काळातील बौद्धधर्मीय लोक आपला 'धम्म'च वेगळा मानतात आणि चीन, जपान, श्रीलंका यासारख्या परदेशातून आलेले भिख्खू त्यांच्या धार्मिक विधींचे संचलन करतांना दिसतात. गौतमबुद्धाला श्रीविष्णूचा अवतार मानणे या धम्मपंडितांना कितपत मान्य आहे कोणास ठाऊक? तसे नसेल तर कदाचित आणखी कांही वर्षांनी तरी विष्णूच्या दशावतारातील नवव्या अवताराची वेगळी ओळख करावीच लागेल.
2 comments:
manya aahe. Japan chya eka palace madhe madhe mee ashi mahiti baghitali aahe.
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. तिथे नेमकी काय माहिती आहे हे समजून घेण्याची उत्सुकता आहे.
Post a Comment