Saturday, March 26, 2016

गुड फ्रायडे कधी साजरा करतात ?



भारतातल्या पंचांगांमधील कालगणना चंद्राच्या पृथ्वीभोवती होत असलेल्या भ्रमणानुसार केली जाते. अमावास्येला चंद्र उगवतच नाही यामुळे रात्री पूर्ण काळोख असतो.  अशा अमावास्येनंतर येणा-या शुक्ल प्रतीपदेला यातला प्रत्येक महिना सुरू होतो आणि पुढल्या अमावास्येला संपतो. एका वर्षामध्ये असे बारा महिने असतात. अशा प्रकारच्या चांद्र कालगणनेतल्या वर्षाचा कालावधी ३५४ दिवसांचा असतो. इंग्रजी कॅलेंडरचे सौर वर्ष  पृथ्वीच्या सूर्याला घातलेल्या प्रदक्षिणेनुसार होत असल्यामुळे त्याचा कालावधी सुमारे ३६५ दिवस एवढा असतो. दर तीन वर्षांमध्ये एकदा अधिक महिना धरून हा फरक भरून काढला जातो. पण पंचांग आणि कॅलेंडर यांच्या वर्षांमधल्या फरकामुळे तिथीनुसार येणारी आपली दिवाळी किंवा होळी यासारखे सण दर वर्षी निरनिराळ्या इंग्रजी तारखांना येतात .

ख्रिसमस हा पाश्चिमात्यांचा सण दरवर्षी नेमाने २५ डिसेंबरलाच येणार हे ठरलेले असते, पण त्यांचा गुड फ्रायडे मात्र दरवर्षी निराळ्या तारखेला का येतो याचे मला गूढ वाटत आले होते. फ्रायडे म्हंटल्यावर तो शुक्रवारीच येणे आवश्यक आहे एवढेच कारण घेतले तर दर वर्षी तो फक्त एका दिवसांनी मागे जायला हवा कारण बावन आठवड्यांनतर येणारा शुक्रवार ३६४ दिवसांनंतर म्हणजे वर्ष पूर्ण व्हायच्या एक दिवस आधी येईल, पण यंदाचा गुड फ्रायडे २४ मार्चला आला तर मागल्या वर्षी तो ३ एप्रिलला आला होता. हा एवढा मोठा फरक कशामुळे पडला असेल ते पहायला हवे.

याबद्दल तपास करतांना असे समजले की गुड फ्रायडे हा ईस्टर संडेच्या दोन दिवस आधी साजरा केला जातो आणि हा ईस्टरचा रविवार कधी येतो ? त्याचे एक जरासे गुंतागुंतीचे गणित आहे. वर्षामधले सगळे दिवस आणि रात्री सारख्या वेळांच्या नसतात. उन्हाळ्यात दिवस मोठा असतो तर हिवाळ्यामध्ये रात्रीचा अंधार जास्त वेळ असतो. मात्र दरवर्षामधून दोनदा दिवस आणि रात्री बरोबर बारा बारा तासांचे असतात. त्या दिवशी सूर्य बरोबर पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. याला equinox किंवा संपात म्हणतात. वसंत ऋतूमध्ये (मार्च महिन्यात) येणारा हा दिवस वसंतसंपात म्हणून ओळखला जातो आणि सप्टेंबर महिन्यात येणारा शरदसंपात असतो. यातल्या वसंतसंपातानंतर जी पौर्णिमा येते त्यानंतर येणारा पहिला रविवार हा ईस्टर संडे म्हणून मानला जावा असे  कित्येक शतकांपूर्वीच्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी सर्वानुमते ठरवले म्हणे. त्या धर्मातही प्रोटेस्टंट आणि कॅथॉलिक हे मुख्य गट आणि त्यांचे अनेक उपगट आहेत, तसेच ज्यूलियन आणि ग्रेगोरियन अशी दोन कॅलेंडरे आहेत. यातून काही पाठभेद आहेत. पण बहुतेक लोक मान्य करतील त्यानुसार जे काही ठरत असेल त्या दिवशी आपल्याकडे गुड फ्रायडे साजरा केला जातो आणि सार्वजनिक सुटी दिली जाते.

दोन हजार वर्षांपूर्वी या शुक्रवारी येशू ख्रिस्ताला हाल हाल करून क्रूसावर चढवून खिळ्यांनी ठाणबंद करण्यात आले आणि मरणाची वाट पहात तसेच सोडून देण्यात आले. अशा प्रकारच्या क्रौर्याची आठवण तरी कशाला ठेवायची आणि तो दिवस सण म्हणून साजरा तरी का करायचा ?   पण असे जगभरात सगळीकडे केले जाते.  आपल्याकडेही थोर संतांच्या पुण्यतिथी साज-या केल्या जातातच. काही लोक त्या दिवशी त्या संतांच्या आठवणीने सद्गदित होत असतीलही पण एकंदरीत त्या दिवसातल्या समारंभांचे स्वरूप उत्सवासारखेच दिसते.  काही लोकांच्या मते गुड फ्रायडे हा God's Friday चा अपभ्रंश आहे  आणि काही लोक या दिवसाला   Black Fryday असेही म्हणतात. जीझस (येशू) ख्राइस्टने सगळ्या जगाच्या कल्याणासाठी स्वतःचे बलिदान केले, तो ईश्वराचा मुलगा असल्यामुळे तिस-या दिवशी म्हणजे रविवारी प्रत्यक्ष ईश्वराने त्याला  पुनरुज्जीवित केले (Resurrection)  आणि आपल्यासोबत निजधामाला नेले असे सांगितले जाते. त्यामुळे ईस्टर संडे हा तर आनंद साजरा करण्याचा दिवस झालाच.

येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस दरवर्षी ठराविक तारखेलाच साजरा केला जातो, पण हा ईस्टरचा सण तसा का केला जात नाही यालाही काही कारणे असतीलही, पण परंपरा हेच त्यातले मुख्य असावे. दोन हजार वर्षांपूर्वीच्या काळात छापील पंचांग किंवा कॅलेंडर अस्तित्वात असण्याचा प्रश्नच नव्हता. पण सात दिवसांचा आठवडा मात्र पाळला जात होता. ऋतूचक्रानुसार येणारा वसंत ऋतू, त्यातली पौर्णिमेची रात्र आणि त्यानंतर आलेला रविवार या ठळकपणे जाणवणा-या खुणांच्या आधाराने त्या दिवसाची आठवण लोकांना होत राहिली आणि त्यांनी ती परंपरागत उत्सवामधून जपून ठेवली.  

-----------------------------------------------------------------------------------------
मागच्या वर्षातला गुड फ्रायडेचा दिवस आम्हा दोघांच्याही आयुष्यातला अत्यंत क्लेशकारी दिवस होता. निव्वळ परमेश्वराची कृपा होती म्हणूनच आम्ही त्यातून वाचलो आणि आजचा दिवस पाहू शकलो. त्या दिवसाच्या आठवणी मी या स्थळावर नोंदून ठेवल्या आहेत.

देव तारी ....... मला
http://anandghan.blogspot.in/2015/05/blog-post.html

गुड फ्रायडे की very bad Friday?
http://anandghan.blogspot.in/2015/07/very-bad-friday.html
-----------------------------------------------------------