Tuesday, July 29, 2008

आमच्या छकुल्या (भाग ४)


आता आमच्या छकुल्या पांच वर्षांच्या झाल्या आहेत. वयाबरोबर त्यांची समजशक्ती आणि समजुतदारपणा वाढला आहे. त्याबरोबर सगळे कांही समजून घेण्याची जिज्ञासा अपार वाढली आहे. कुठल्याही प्रश्नाचे त्यांना समजेल आणि पटेल असे उत्तर मिळेपर्यंत त्या पिच्छा सोडत नाहीत. त्यांना आता काऊचिऊ, कुत्रामांजर यांच्यापेक्षा जिराफ, झेब्रा, अजगर आणि देवमासा अशा प्राण्यांबद्दल कुतुहल वाटते. त्यांची चित्रे पाहून त्या या प्राण्यांना ओळखतातच, शिवाय ते प्राणी काय खातात आणि कसे ओरडतात वगैरेसारखे प्रश्न त्या विचारतात. त्यांना प्राणीसंग्रहालयात नेऊन कांही वेगळे प्राणी दाखवता येतील, त्यावेळी त्या प्राण्यांनी खाण्यासाठी किंवा ओरडण्यासाठी आपले तोंड उघडले तर नशीब!
एकदा मी बसलो आता इरा मागून आली आणि माझ्या टकलावरून हात फिरवत म्हणाली," आजोबा, तुझे केस कुठे गेले?"
या अचानक आलेल्या प्रश्नाला मी कांहीतरी उत्तर द्यायचे म्हणून सांगितले, "अगं, वा-याने थोडे थोडे उडून गेले."
या उत्तराने तिचे समाधान झाले नाही. आपल्या केसांवरून हात फिरवत ती म्हणाली, "हे पहा, माझे केस किती छान वाढतातहेत. तुझेच कसे उडून गेले?"
मी सांगितले, "तुझे केस कसे छान काळेभोर आणि दाट आहेत, तसे माझे नाहीत ना! माझे तर पांढरे आणि हलके झाले आहेत, म्हणून ते उडून जातात. "
" पण तुझे केस असे पांढरे आणि पातळ कां झाले?" लगेच पुढला प्रश्न आला.
"मी आता ओल्ड झालोय ना, म्हणून. "
"पण तू ओल्ड कशाला झालास?"
काय सांगावे ते मला सुचेना. "वयानुसार सगळेच म्हातारे होतात." असे सांगून तिला भीती घालायची माझी इच्छा नव्हती. मी सांगितले, "खरं म्हणजे चुकलंच माझं! "
"मग सॉरी म्हण. "
इराच्या या वाक्याचा अर्थ मला लागत नाही असे पाहून ईशाने स्पष्टीकरण दिले, "अरे आजोबा, कुणाचं चुकलं असलं तर त्यानं सॉरी म्हणायचं असतं. एवढं पण तुला ठाऊक नाही कां?"
"अरे हो, मी तर विसरलोच होतो. पण मी कुणाला सॉरी म्हणू?" मी विचारलं.
"कुणाला नाही तर देवबाप्पाला सॉरी म्हण, म्हणजे तो तुला पुन्हा केस देईल."
तिचे आशावादी विश्व सरळ सोपे होते. त्याला तडा द्यावा असे मला वाटले नाही. पण थोडी वस्तुस्थिती मान्य करता यायला हवी. म्हणून मी सांगितले, "देवबाप्पा म्हणतो की तुला आजोबा व्हायचं असेल तर आधी म्हातारा व्हायला पाहिजे. तुम्हाला ओल्ड आजोबा आवडतो ना?"
"ओके", " ओके" म्हणत त्यांनी तो संवाद थांबवला.
आता त्या मैसूरला रहायला गेल्या आहेत. पुण्याच्या सेंट मेरी कॉन्व्हेंटमधून एकदम तिथल्या पुष्करणी बालोद्याना शाळेत गेल्याने त्यांना कल्चरल शॉक वगैरे बसेल अशी आम्हला भीती वाटत होती. पण तसे कांहीच झाले नाही. इथे जुन्या शाळेतल्या मैत्रिणी नाहीत म्हणून थोडी कुरकुर केली, पण तेवढीच. आता त्यांना इंग्रजी, हिंदी, संस्कृत आणि कन्नड या चार भाषा आणि गणित, सामान्य ज्ञान, चित्रकला वगैरे विषय आहेत. त्यांची पुस्तके आणि वह्या मिळून अठरा आयटमचे गांठोडे पाहून आम्हालाच घाम फुटला होता. त्याशिवाय घरी मराठी बोलायचे शिक्षण चाललेच असते. त्यामुळे आम्ही त्यांना हवे तसे बोलू देतो. त्यातल्या व्याकरणाच्या चुका काढून आणि आदरार्थी बहुवचन वगैरेचा घोळ घालून त्यांना बोलतांना आडवत नाही. एकदा मनात आलेले विचार मांडता येणे जमू लागले की बाकीच्या गोष्टी हळू हळू जमतील.
सिंड्रेला, स्नोव्हाइट वगैरेंच्या परीकथांच्या जगातून त्या पूर्णपणे बाहेर आलेल्या नाहीत, पण आता माणसांच्या जगातल्या कांही गोष्टी ऐकायला आणि सांगायला लागल्या आहेत. त्यांना आता अक्षरज्ञान झाले असले आणि बोलतांना शब्द जुळवून वाक्यरचना करता येऊ लागली असली तरी अजून पुस्तक वाचता येत नाही. त्यामुळे गोष्टींच्या पुस्तकांतल्या गोष्टी त्यातल्या चित्रांच्या आधारानेच सांगाव्या लागतात. एका चित्रात एक पोलिस एका चोराचा पाठलाग करतो आहे असे दाखवले होते त्याप्रमाणे मी इराला सांगितले. त्यावर तिने विचारले, "तुला हे कसे समजले?"
मी म्हंटले, "ते तर अगदी सोप्पं आहे. मागून धांवणा-या या पोलिसाने त्याचा युनिफॉर्म घातला आहे. हा बघ! "
" पण मग चोर युनिफॉर्म कां नाही घालत?" खरेच सगळ्या गुन्हेगारांनी विशिष्ट गणवेष घातले असते आणि त्यांना ओळखता आले असते तर किती बरे झाले असते ना?

अशा आहेत आमच्या गोड छकुल्या. चिवचिवाट करून मन रमवणा-या आमि मध्येच न सुटणारे प्रश्न विचारून निरुत्तर करणा-या.

No comments: