Friday, August 02, 2019

चंद्रयान आणि अपोलो


बावीस ऑक्टोबर २००८ हा दिवस भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिण्यासाऱखा आहे कारण त्या दिवशी चंद्रयान-१ या यानाने पृथ्वीवरून उड्डाण केले आणि भारताला अमेरिका व रशीया यासारख्या प्रगत राष्ट्राच्या पंक्तीत बसवले. त्यानंतर सन २०१४ मध्ये मंगळयान उडवून भारताने ते स्थान अधिक पक्के केले. या मालिकेमधील चंद्रयान-२ हे यान दि. १५ जुलैला पाठवण्याचे ठरले होते. त्या योजनेला भरपूर प्रसिद्धी दिली गेली होती. त्यात इस्रो या संस्थेमधील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे खूप कौतुक केले होते. त्यांनी आतापर्यंत केलेली कामगिरी गौरवास्पद आहेच.

चंद्राला भेट देण्याची योजना अत्यंत कठीण आहे. अचाट बुद्धिमत्ता, सखोल ज्ञान, विशेष कौशल्य आणि कठोर परिश्रम या सर्वांचा कस लावणारे असे हे काम आहे. ते करण्यामध्ये देशभरातल्या आणि परदेशामधल्या अनेक शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांचा सहभाग असतो. त्या सर्वांच्या कामात सुसूत्रता आणण्याचे व्यवस्थापकीय काम देखील कौशल्याचे असते. यात सहभागी असलेल्या शेकडो लोकांपैकी कुणाकडूनही अनवधानाने कसलीही क्षुल्लक कसूर राहू नये याची खूप काळजी घ्यावी लागते. यासाठी अनेक परीक्षणे आणि चाचण्या घेतल्या जातात.

१४ जुलैला चंद्रयान-२ या यानाचे काउंटडाऊन सुरू झाल्यानंतर त्याच्या अखेरच्या टप्प्यातल्या अॅक्टिव्हिटीज सुरू असतांना हीलियम वायूचा दाब अपेक्षेनुसार नाही असे शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. त्यांना त्या वायूची किंचित गळती होत असल्याची शंका आली. अशा गोष्टीकडे दुर्लक्ष न करता तिची सखोल चौकशी करून आवश्यक ती दुरुस्ती करणे शहाणपणाचे असल्यामुळे त्या दिवशी होणारे यानाचे उड्डाण थांबवण्यात आले आणि आठवड्यानंतर दि.२२ ला ते यशस्वीरीत्या करण्यात आले.

पण दरम्यानच्या काळात दि.२० जुलैला एक आंतरराष्ट्रीय महत्वाची गोष्ट घडली. अमेरिकन अवकाशवीर नील आर्मस्ट्राँग याने अपोलो-११ या मोहिमेमधून अवकाशात जाऊन चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल ठेवले या घटनेला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचा सुवर्णमहोत्सव साजरा केला गेला. या निमित्याने त्या ऐतिहासिक घटनेच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. साहजीकपणे अमेरिकेचा अपोलो प्रोजेक्ट आणि आपले चंद्रयान यांची तुलना होणे अपरिहार्य होते.

अपोलो -११ च्या कार्यक्रमात खालील गोष्टी होत्या.
१. पृथ्वीवरून उड्डाण
२. पृथ्वीभोवती घिरट्या घालत असतांना आपली कक्षा विस्तारत जाणे
३. चंद्राजवळ जाऊन पोचणे
४. चंद्राभोवती घिरट्या घालत घालत आपली कक्षा घटवत जाऊन एका कक्षेत फिरत राहणे
५. तीनपैकी दोघा अवकाशवीरांनी एका वेगळ्या लहान यानात बसून चंद्राकडे प्रस्थान करणे
६. तिसऱ्याने यानातच बसून चंद्राभोवती घिरट्या घालत राहणे
७. दोघा अवकाशवीरांनी चंद्रावर जाऊन उतरणे, यानाचा दरवाजा उघडून जमीनीवर उतरणे
८. तिथे अमेरिकेचा झेंडा रोवणे, तिथली दगड माती गोळा करून यानात भरणे
९. दोघा अवकाशवीरांसह लहान यानाने चंद्रावरून उड्डाण करणे.
१०. चंद्राभोवती घिरट्या घालत राहिलेल्या मोठ्या यानाला गाठून त्याच्याशी जोडून घेणे
११. दोघा अवकाशवीरांनी लहान यानामधून मोठ्या यानात जाणे
१२. मोठ्या यानाने चंद्राभोवती घिरट्या घालता घालता पृथ्वीकडे जाणे
१३. पृथ्वीभोवती घिरट्या घालत असतांना आपली कक्षा घटवत जाणे
१४. पृथ्वीवर ठरलेल्या जागी येऊन अलगदपणे उतरणे

पहिल्या चंद्रयानाने यातली फक्त पहिली चारच कामे केली होती. चंद्राभोवती फिरत असतांना त्याने एक लहानसा गोळा चंद्राच्या दिशेने फेकला आणि तो चंद्रावर जाऊन पडला. त्यावरच भारताचा झेंडा होता. ते यान काही दिवस चंद्राभोवती फिरत राहिले आणि संदेश पाठवत राहिले. त्या यानाचा संपर्क तुटल्यानंतर त्याचे काय झाले ते समजायला मार्ग नाही. ते कदाचित चंद्रावर जाऊन कोसळले असेल किंवा अजूनही चंद्राभोवती फिरत राहिले असेल.

दुसऱ्या चंद्रयानाकडे याहून जास्तीची आणखी एक कामगिरी सोपवली आहे. ती म्हणजे विक्रम नावाचा एक लँडर चंद्रयानाच्या मुख्य ऑर्बिटरपासून वेगळा होऊन हळूच चंद्राच्या दिशेने जाईल आणि तो चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील एका विशिष्ट ठिकाणी अलगदपणे चंद्रावर उतरेल. त्या लँडरमधून प्रग्यान नावाचा एक रोव्हर बाहेर निघून चंद्रावर फिरेल. ही एक सहा चाकांची गाडी असून ती चंद्रावरील ओबडधोबड जमीनीवरून चालण्यासाठी सक्षम आहे. ती सेकंदाला एक सेंटीमीटर एवढ्या संथपणे चालत राहील. तिच्यावर बसवलेल्या उपकरणांकडून मिळालेली माहिती पृथ्वीवरील प्रयोगशाळांकडे पाठवली जाईल. चंद्रावरचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील चौदा दिवस हे काम चालेल आणि संपेल. ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत राहील आणि ज्याप्रमाणे पहिल्या चंद्रयानाने दुरूनच माहिती गोळा करून पाठवली होती त्याप्रमाणे तो आणखी काही दिवस ती पाठवत राहील.

यावरून असे दिसेल की अमेरिकेने पन्नास वर्षांपूर्वी पाठवलेल्या अपोलो यानाने जेवढे काम केले होते त्याचासुद्धा अगदी लहानसा भाग आपले हे दुसरे चंद्रयान करणार आहे. मुख्य म्हणजे अवकाशात माणूस पाठवायचा झाला तर त्याच्यासाठी बंदिस्त केबिन बनवावी लागते आणि तिचे तापमान आणि दाब नियंत्रित ठेवावे लागतातच, त्या माणसासाठी कित्येक दिवस पुरेल असे अन्न, पाणी आणि हवासुद्धा इथूनच न्यावी लागते. तसली काही व्यवस्था यात नाहीच, या यानाला सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्याचीही कसली व्यवस्था नाही. आपले हे अभियानच अगदी लहान आहे. तुलना करायची झाल्यास चंद्रयानाला घेऊन जाणारे जीएसएलव्ही रॉकेट ४ मीटर व्यास असलेले, ४४ मीटर उंच आणि ४ टन वजन अवकाशात नेण्याची क्षमता असलेले आहे तर अपोलोला घेऊन जाणारे सॅटर्न रॉकेट १० मीटर व्यास, ११० मीटर उंच आणि ४८ टन क्षमतेचे होते. त्यामुळे आपण हे काम अगदी कमी खर्चात करीत आहोत या म्हणण्याला फारसा अर्थ नाही. या क्षेत्रातली आपली प्रगति स्पृहणीय असली तरी आपण प्रगत राष्ट्रांच्या तोडीचे आहोत अशा वल्गना एवढ्यातच करण्यात अर्थ नाही. अपोलोसारखी मिशन्स पाठवणे ही अत्यंत खर्चिक बाब आहे आणि ती चैन आपल्या देशाला परवडण्यासारखी नाही हे आहेच.

1 comment:

Anonymous said...

As you've rightly pointed out, please don't compare ISRO Chandrayaan mission with Apollo-11. Pl. write article comparing Chandrayaan with missions prior to Apollo-11. Then you will still understand ISRO is doing it much efficiently & fraction of the budget.