Wednesday, July 09, 2008

लॉर्ड मेकॉलेने केलेले भाषण

लॉर्ड मेकॉलेने ब्रिटिश पार्लमेंटसमोर २ फेब्रूवारी १८३५ रोजी केलेले भाषण

"मी हिंदुस्थानभर प्रवास केला आहे आणि तो करतांना मला एकसुद्धा भिकारी किंवा चोर दिसला नाही. या लोकांची नैतिक मूल्ये व क्षमता इतक्या उच्च दर्जाची आहे की त्यांच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरा हा या देशाच्या पाठीचा कणा मोडल्याखेरीज आपण कधीही त्यांना जिंकू शकणार नाही. आणि यासाठी या लोकांची जुनी व प्राचीन शिक्षणपद्धती आणि संस्कृती बदलून टाकून त्यांच्या जागी आपल्याला पाहिजे तशा त्या आणाव्यात असा प्रस्ताव मी मांडत आहे. कारण जर का परदेशी इंग्रजी गोष्टी त्यांच्या स्वतःच्या देशी गोष्टींपेक्षा चांगल्या आणि श्रेष्ठ आहेत असे त्यांना वाटू लागले तर ते आपला आत्मसन्मान व परंपरागत संस्कृती विसरून जातील आणि आपल्याला हवे आहे तसे ते खरोखर आपल्या आधीन राष्ट्र होईल."

मागील वर्षी हे भाषण ई-मेलद्वारे इंटरनेटवर प्रसृत होत होते. मुळात ते कोणी नेटवर टाकले कोण जाणे, पण झपाट्याने एक दुस-याला पाठवून (फॉरवर्ड करून) जवळ जवळ सगळ्या ई-मेल धारक भारतीयांच्या मेलबॉक्सपर्यंत ते पोचले असणार. हे प्रसारण करण्यामागे दोन उद्दिष्टे स्पष्टपणे दिसतात. पहिले म्हणजे "आपल्या महान भारत देशातील जनता किती प्रामाणिक होती!" याचा डांगोरा पिटणे. त्यासाठी (दुष्ट) मेकॉले महाशयांचे प्रशस्तीपत्रक दाखवण्याची काय गरज होती कोण जाणे. दुसरा उद्देश म्हणजे मेकॉले नांवाच्या या कलीने भारतभर नवी शिक्षणसंस्था प्रस्थापित करून या देशाच्या पाठीचा कणा असलेली त्याची संस्कृती धुळीला मिळवली असा कांगावा करणे. त्याने प्रयत्न करूनसुद्धा प्रत्यक्षात तसे कांही झाल्यासारखे दिसत तर नाही. कारण भारतीय संस्कृती अद्याप शाबूत आहे. तिचा कणाबिणा कांही मोडलेला नाही. इंग्रजांच्या अधिपत्याखाली जगातील जितके इतर देश आले त्या सगळ्या देशात, इतकेच नव्हे तर खुद्द इंग्लंडमध्येसुद्धा साधारणपणे ज्या प्रकारचे शिक्षण त्या काळी प्रचलित होते तसेच मेकॉलेने भारतात आणले. त्यामुळे मेकॉलेमहाशयांनी हा खास भारतासाठी लावलेला शोध आहे असे म्हणता येणार नाही. मेकॉलेने भारतात तशा प्रकारच्या शिक्षणपद्धतीचा प्रसार करण्यात पुढाकार घेऊन त्यासाठी जोर लावला असे फारतर म्हणता येईल.

या देशावर अनेक आक्रमणे झाली व सर्व आक्रमकांनी येथील संपत्तीची लूटमार केली यात कांही जगावेगळे दिसत नाही. एखाद्या गांवावर दरोडा पडतो तेंव्हा तेथील श्रीमंत सावकाराचे घर लुटले जाते, गरीबाच्या झोपडीकडे कोठला दरोडेखोर आपली नजर वळवेल? नैसर्गिक साधन सामुग्री व स्वतःचे श्रम व कौशल्य यांच्या बळावर इथल्या लोकांनी समृद्धी मिळवली असली तर लुटारूंची नजर त्यांच्याकडेच जाणार. समृद्धी मिळवण्याबरोबरच तिचे संरक्षण करण्याची जबाबदारीसुद्धा येतेच. जेंव्हा आपले सैनिक ते करण्यास समर्थ होते तेंव्हा त्यांनी आक्रमकांना चोख उत्तर देऊन पिटाळून लावले. जेंव्हा कांही कारणाने ते कमी पडले तेंव्हा आक्रमकांचे फावले एवढेच. विजयी आक्रमकांनी पराजित देशाची लुटालूट करावी ही जगरहाटी आजपर्यंत चालत आलेली आहे. फक्त ती किती प्रमाणात व किती निष्ठुरपणे केली याच्या तपशीलात थोडा फरक असेल.

ब्रिटीश राजवटीने कांही चांगल्या गोष्टी भारतीयांना दिल्या असेही कांही लोक सांगतात. यात रेल्वे, इमारती, धरणे, कालवे, वीज, टपालसेवा, इस्पितळे आदि लोकोपयोगी सेवांचा तसेच शिक्षण, न्याय, राज्यकारभार आदि व्यवस्थांचा प्रामुख्याने समावेश होतो. शिवाय इंग्रज येथे येण्यापूर्वी 'भारत' नांवाचा एक सलग देश किंवा 'हिंदू' नांवाचा एक सर्वसमावेशी धर्म सुद्धा अस्तित्वात नव्हता; शेकडो लहानमोठी राज्ये होती तसेच अनेक पंथ, जाती पोटजातींमध्ये येथील लोक विभागलेले होते; इंग्रजांमुळेच (किंवा त्यांच्या विरोधात) ते एकत्र आले आणि इंग्रजांनीच त्यांचे नामकरण करून आपल्याला आपला देश व धर्म यांची आयडेंटिटी मिळवून दिली असेही कोणी म्हणतात. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला फायदा झाला हे नाकारता येणार नाही. पण इंग्रजांनी हे सगळे उपकारबुद्धीने केले नव्हते, केवळ त्यांच्या स्वार्थापोटी त्यांनी ते केले होते, तसेच त्यांनी त्यापासून पुरेपूर लाभ आधीच उठवलेला असल्याने आपल्याला त्यांचे ऋणी राहण्याचे कांही कारण नाही.

खरे सांगायचे झाले तर ब्रिटीश साम्राज्याच्या काळात ज्या गोष्टी भारतात घडल्या त्यातील बहुतेक सर्व गोष्टी ब्रिटीशांच्या आधिपत्याखालील इतर देशातसुद्धा घडून आल्या, इतकेच नव्हे तर फ्रेंच, डच किंवा पोर्तुगीज अंमलाखालील प्रदेशातसुद्धा जवळपास तितक्याच प्रमाणात त्या घडल्या. यावरून हेच दिसते की वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती तसेच वैचारिक प्रवाह देशांच्या सीमारेषांना न जुमानता पसरत जातात. "कुदरतने तो बक्षी थी हमें एकही धरती, हमने कहीं भारत कहीं ईरान बनाया" असे साहिरने म्हंटले आहे. ऊन, वारा, नदीचा प्रवाह, समुद्राच्या लाटा, पावसाचे ढग वगैरे नैसर्गिक गोष्टी माणसांनी नकाशावर आंखलेल्या रेषांमध्ये कधीच अडकून पडत नाहीत, त्याचप्रमाणे विचार, ज्ञान, तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाने उपलब्ध होणा-या सोयींचासुद्धा आजूबाजूच्या भागातील समाजात प्रसार होतच राहतो. पूर्वीच्या काळात दळणवळणाच्या सोयी मर्यादित असल्याने हे काम हळू हळू होत असे. दोनशे वर्षापूर्वी औद्योगिक क्रांतीच्या पाठोपाठ जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. प्रसारमाध्यमांचा विकास झालेला असल्यामुळे आता तिला अधिक वेग आला आहे. पुरोगामी विचाराचे राज्यकर्ते भावी काळाची पाउले ओळखून त्याला सहाय्य करतात, त्यामुळे त्याचे क्रेडिट त्यांना मिळते. प्रतिगामी विचाराचे लोक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे कांही काळापुरती प्रगतीची गति मंदावल्यासारखी वाटते, पण ती थांबत नाही. आपली राज्यसत्ता टिकवून धरण्यासाठी या देशात ज्या दिशेने होणारी प्रगती ब्रिटीशांना सोयीची वाटली तिला त्यांनी हांतभार लावला, त्याचा फायदा एतद्देशीयांनासुद्धा मिळालाच. जे ब्रिटीशांना सोयीचे नव्हते तिच्यात त्यांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, पण ते तिला पूर्णपणे थोपवू शकले नाहीतच. प्रगतीबरोबर नवे विचार आणि सुधारणा देखील इकडे येऊन पोचल्याच.

"मेकॉलेचे भाषणाचा वरील उतारा खरा कशावरून?" हा एक मूलभूत प्रश्न आहे. थोडेसे इतिहाससंशोधन केल्यावर सन १८३५ साली मेकॉले हा भारतातच असण्याची दाट शक्यता होती, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भाषण देण्यासाठी त्या काळात त्याने इंग्लंडमध्ये जाणे अशक्य नसले तरी असंभवनीय वाटते अशी माहिती मिळाली. "कोणीतरी कुठेतरी याची नोंद ठेवलेली असणारच." असे गृहीत धरून आणि "कोणीतरी कधीतरी ते वाचले असेल त्या अर्थी ते खरेच असेल" असे समजून लोक धडाधड त्या ई-मेलला फॉरवर्ड करीत राहिले आणि अशा प्रकारे त्याची लक्षावधी आवर्तने झाल्यावर ते ग्राह्य मानू लागले गेले! अफवांचे पीक असेच येते.

मी जेंव्हा पहिल्यांदा हे भाषण माझ्या मेलवर वाचले तेंव्हा त्याला फारसे महत्व दिले नाही, यामागे वेगळे कारण होते. 'हिंदुस्थानाचा गव्हर्नर जनरल' हे मेकॉलेच्या काळात एक महत्वाचे पद होते. आजचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान या दोन्ही पदांची जबाबदारी व अधिकार या एका पदामध्ये एकवटले होते. असे पद धारण करणारी व्यक्ती असली उथळ विधाने करेल आणि तीसुद्धा त्याच्या स्वतःच्या देशाच्या पार्लमेंटमध्ये, हे कांही माझ्या अल्पबुद्धीला पटण्यासारखे नव्हते. इंग्रज लोकांची परंपरागत संस्कृती कदाचित आपल्याइतकी महान नसली तरी त्यांच्याकडे भरपूर मुत्सद्दीपणा होता हे मान्य करायला हरकत नसावी. मला असे कां वाटले हे समजून घेण्यासाठी आपण त्यातील एक एक वाक्य घेऊ.

"मी हिंदुस्थानभर (across the length and breadth of India) प्रवास केला आहे"
दळणवळणाची कसलीही यांत्रिक साधने नसलेल्या त्या काळात पायी चालत किंवा घोडा, उंट वा खेचरावर बसून हिंदुस्थानासारख्या डोंगर द-या, नदी नाले, जंगले, वाळवंटे यांनी भरलेल्या खंडप्राय देशाचा कानाकोपरा पाहण्यासाठी माणसाचा एक जन्मसुद्धा पुरला नसता. राज्यविस्ताराच्या धामधुमीच्या काळात गव्हर्नर जनरल बनून इकडे आलेल्या या गृहस्थाला इतस्ततः फिरण्याखेरीज दुसरा उद्योग नव्हता कां? त्याने या विशाल देशाची लांबी रुंदी कशी काय पालथी घातली असेल? तो इकडे आला त्या वेळेस संपूर्ण भारतभर इंग्रजांचे राज्य पसरलेलेही नव्हते, तरीसुद्धा तो सगळीकडे कसा काय फिरला असेल?

"आणि तो करतांना मला एकसुद्धा भिकारी किंवा चोर दिसला नाही."
आपल्या पुराणातील वामन अवतारात प्रत्यक्ष भगवान विष्णु याचकाचे रूप धारण करून पृथ्वीवर अवतरले व बळीराजाकडे जाऊन त्यांनी संपूर्ण जगाचे दान मागितले अशी कथा आहे. चांगुणा नांवाच्या राणीने याचकाला तृप्त करण्यासाठी प्रत्यक्ष आपल्या चिलयाबाळाला चिरून व शिजवून त्याला खायला घातला अशी एक कथा आहे, त्यात तिची सत्वपरीक्षा पहाण्यासाठी याचकाचे रूप घेऊन कोण आला होता तर प्रत्य़क्ष भगवान शंकर! याचक बनून दान मागायला आलेल्या देवेन्द्राला दानशूर कर्णाने ऐन युद्धाच्या आधी आपली संरक्षक कवचकुंडले अंगावरून उतरवून दिली इतकेच नव्हे तर अगदी मृत्युमुखी पडलेले असतांना शेवटच्या क्षणी आलेल्या याचकाला जातां जातां आपले सोन्याचे दांत तोडून काढून दिले. अशा कथा आहेत. 'याचना' या गोष्टीचे इतके उदात्तीकरण आपल्या पौराणिक वाङ्मयात झालेले आहे. लहान मुलाचा मौंजीबंधन संस्कार झाल्यावर त्याला "ओम् भवति भिक्षांदेही" या मंत्राची दीक्षा दिली जाते. दान मागणे व स्वीकारणे हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे हे नाकारता येणार नाही. 'याचक' किंवा 'भिक्षुक' म्हंटल्याने 'भिकारी' या शब्दात अभिप्रेत असलेला अर्थ बदलत नाही.
जगातील 'सर्वप्रथम कवी' म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते वाल्मिकी ऋषी पूर्वी रानात वाटमारी करीत होते, नारदमुनींनी त्यांना सन्मार्गाला लावले अशी त्यांची गोष्ट आहे. त्यांनी लिहिलेल्या रामायणाच्या कथेत लंकाधिपती रावण याचकाचे रूप घेऊन येतो व सीतामाईचे अपहरण करतो. सध्या श्रीलंका हा एक वेगळा देश असल्यामुळे रावण हा एक 'विनापरवाना आलेला परदेशी घुसखोर' होता असे वाटले तर म्हणावे, पण वाल्मिकीमुनींनी कांही तो कोणी परका होता किंवा त्याची संस्कृती आपली नव्हती असे म्हंटलेले नाही. तरीही त्याने केला तो गुन्हाच होता यात शंका नाही. पण बालपणीच्या 'माखनचोर' कृष्णाच्या चरित्रातील 'रुक्मिणीहरण' आणि 'सुभद्राहरण' यांच्या सुरस कथा तर आपण चवीने ऐकतो. सत्यनारायणाच्या प्राचीन कथेत साधुवाणी ज्या शहरात जातो त्या ठिकाणी कांही चोर राजाच्या खजीन्यातून चोरी करून पळत असतांना चोरीचा माल साधुवाण्याच्या सामानात टाकतात व त्यामुळे त्यांच्यावर चोरीचा खोटा आळ येऊन त्यांना तुरुंगात टाकले जाते अशी गोष्ट आहे. त्या काळातील चोरांचे अस्तित्व तसेच तत्कालिन न्यायव्यवस्था या दोन्हींचे दर्शन यात होते.
मृच्छकटिक या संस्कृत नाटकांत शर्विलक नांवाच्या चोराचे एक पात्रच आहे. बिरबल बादशहाच्या गोष्टींमध्ये चोराला युक्तीने पकडणे येते. तेनाली रामनच्या घराच्या आवारातच रात्रीच्या वेळी चोर घुसला होता. त्याची चाहूल लागताच "चोरांच्या हाती लागू नयेत म्हणून मी आपले दागदागीने सुरक्षित स्थळी ठेवतो आहे." असे मोठ्याने म्हणत तेनाली रामनने एक दगडांनी भरलेले गाठोडे विहिरीत टाकून दिले. दागीने हांती लागण्याच्या आशेने तो चोर रात्रभर विहिरीतील पाणी उपसत राहिला आणि तेनाली रामनच्या बागेतील झाडांना आयतेच भरपूर पाणी मिळाले अशी त्याच्या चातुर्याची कथा आहे. ही सगळी माहिती स्थानिक भाषांमध्ये लिहिलेली असल्यामुळे मेकॉलेच्या वाचनात आली नसेल, पण दुस-याकडील वस्तु मिळवण्याचे बेग्, बाय, बॉरो किंवा स्टील हे चार मार्ग असतात एवढे तरी इंग्लंडमधील शाळेत तो शिकला असेल. मनुष्यस्वभाव दाखवणारे हे तत्व भारतात लागू पडत नाही असे त्याला वाटले कां मध्य भारतातील ठग आणि पेंढा-यांचा बीमोड करण्यात ब्रिटीशांचा वाटा होता हे तो विसरला? त्यामुळे "भारतात एकही चोर किंवा भिकारी नव्हता." असे विधान करणे धार्ष्ट्याचे वाटते.

"या लोकांची नैतिक मूल्ये व क्षमता इतक्या उच्च दर्जाची आहे की त्यांच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरा हा या देशाच्या पाठीचा कणा मोडल्याखेरीज आपण कधीही त्यांना जिंकू शकणार नाही."
सन १८३५ साली भारतात असलेली अराजकाची परिस्थिती पाहता असे वाटत नाही. त्या काळात कोणत्याही भारतीय राजाची एकछत्र सत्ता नव्हतीच. सगळे लहान मोठे राजेरजवाडे व नबाब एकमेकांपासून स्वतःच्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी ब्रिटीशांच्या कवायती सैन्याची मदत घेतांना कुठल्या नैतिक मूल्यांचे पालन करीत होते?

"आणि यासाठी या लोकांची जुनी व प्राचीन शिक्षणपद्धती आणि संस्कृती बदलून टाकून त्यांच्या जागी आपल्याला पाहिजे तशा त्या आणाव्यात असा प्रस्ताव मी मांडत आहे."

भारतीयांची जुनी आणि प्राचीन शिक्षणपद्धती फक्त तथाकथित उच्चवर्णीयांसाठी त्यांच्या संस्कृत भाषेतील मंत्रपठणापुरती मर्यादित होती. त्यामुळे आयतेच जातीजमातीमधील तेढ वाढत होती. आपल्या 'फोडा आणि झोडा' या नीतीला अनुसरून इंग्रजांनी अशा प्रकारच्या जुन्या शाळा बंद न करता त्या सुरू ठेऊ दिल्या व त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्याचे तेवढे काम केले. ब्रिटीश राज्यकर्ते आपल्या घरी परत गेल्यानंतरच्या काळापर्यंत आमच्या छोट्या गांवात पूर्वापार चालत आलेली वेदशाळा मी माझ्या लहानपणी पाहिलेली आहे. दिवसा इंग्रजी माध्यमात शाळा शिकून संध्याकाळी संस्कृत मंत्रांचे पठण करणारी कांही दक्षिण भारतीय मुले अजूनही माझ्या पहाण्यात आहेत.
सर्वसामान्य जनतेसाठी शिक्षणाचे दरवाजे भारतात प्राचीन काळातसुद्धा खुले नव्हते. मनुस्मृतीप्रमाणे स्त्रिया व शूद्र यांना शिक्षणापासून वंचित ठेवले होते असा तिच्यावर आरोप करण्यात येतो. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी या कारणासाठी शंबुकाचा वध केल्याची कथा सांगतात. कदाचित हा सगळा प्रचार इंग्रजांच्या चिथावणीनुसार नंतरच्या काळात झाला असल्याची शक्यता आहे. पण तो तेंव्हाही प्रभावीपणे खोडला गेला नाही आणि आजही केला जात आहे. कौरव व पांडव राजपुत्रांना शिक्षण देणा-या गुरु द्रोणाचार्यांनी सूतपुत्र कर्णाला शिक्षण देण्यास नकार दिला आणि त्यांच्या अनुज्ञेशिवाय केवळ त्यांचे अनुकरण करून शिक्षण घेतले म्हणून एकलव्याकडून त्याचा अंगठा मागितला (आणखी एक याचना) हे काय दाखवते ? इतिहासकाळातील उदाहरण घ्यायचे झाल्यास "संस्कृत भाषा जनासी कळेना म्हणूनि नारायणा दया आली।" यासाठी त्याने ज्ञानेश्वराचा अवतार घेतला असे अभंगवाणीमध्ये म्हंटलेले आहे. या सगळ्यावरून हेच दिसते की ब्रिटीशांनी परंपरागत भारतीय शिक्षणपद्धतीमध्ये फारशी ढवळाढवळ न करता त्याच्या जोडीने सर्वसामान्य जनतेसाठी नव्या शाळा सुरू केल्या असेच म्हणावे लागेल.

"कारण जर का परदेशी इंग्रजी गोष्टी त्यांच्या स्वतःच्या देशी गोष्टींपेक्षा चांगल्या आणि श्रेष्ठ आहेत असे त्यांना वाटू लागले तर ते आपला आत्मसन्मान व परंपरागत संस्कृती विसरून जातील आणि आपल्याला हवे आहे तसे ते खरोखर आपल्या आधीन राष्ट्र होईल."

एवढे मात्र अंशतः बरोबर वाटते. पण प्रत्यक्षात त्या काळात मेकॉलेच्या अपेक्षेप्रमाणे कांही झाले नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गेल्या पन्नास वर्षातच भारतीय लोक जास्त इंग्रजाळले आहेत किंवा मोठ्या प्रमाणात जागतिकीकरण झाले आहे असे दिसते. त्यातही इंग्रजांपेक्षा अमेरिकनांचा मोठा वाटा आहे असे वाटते.
त्यामुळे मेकॉलेचे भाषण म्हणून जे कांही प्रसारित केले गेले त्यात मला तरी कांही तथ्य दिसत नाही.

6 comments:

Anonymous said...

घारे साहेब,

आपला लेख वाचून कुतूहलापोटी थोडा शोध घेतला. ब्रिटिश संसदेच्या संस्थळावर G. O. Trevelyan लिखीत The Competition Wallah या ग्रंथात सदरहू भाषण समाविष्ट असल्याचे कळले. हा ग्रंथ व भाषणदेखील येथे सापडले.
मला समग्र भाषण वाचून शहानिशा करणे सध्या शक्य नाही, आपल्याला सवड झाल्यास काय गवसले ते कळवावे ही विनंती.

अवांतर: या आधी कधी प्रतिक्रिया दिली नसली तरी मी आपले लेख वाचित असतो.आपले लेखन व सातत्य आदरास पात्र आहे.

- मृण्मय

Anand Ghare said...

क्षमा करा, मला तसले कोणतेही भाषण तिथे सापडले नाही. त्यात एका कमिटीच्या मीटिंगचा उल्लेख आहे. त्यातही मेकॉलेने असली विधाने केलेली नाहीत. ते पार्लमेंटमधले भाषण तर नाहीच.

Anonymous said...

घारे साहेब, आपण तत्परतेने पडताळणी केल्याबद्दल आभारी आहे. ब्रिटीश संसदेच्या संस्थळावरील माहितीनुसार, Macaulay's Minute, sometimes referred to as a speech given in Parliament or a minute presented to Parliament, is not a Parliamentary record so is not held by the Parliamentary Archives. ... The Minute was ... presumably written for the Supreme Council, not the British Parliament. हा मुद्दा आपल्या प्रतिपादनाला बळ देणारा ठरतो.

तसेच The Competition Wallah मधील भाषण (पृ. ३१९) हेच जर ते भाषण असेल (ब्रिटीश संसदेच्या संस्थळावरील माहितीनुसार Macaulay's entry in the Oxford Dictionary of National Biography records that Macaulay's Minute was printed by G. O. Trevelyan in an appendix to his book The Competition Wallah) व त्यात लॉर्ड मेकॉले यांची तथाकथित विधाने नसतील तर आपल्या लेखातील तर्क सत्य सिद्ध होतो. माझा उद्देश आपल्या तर्काला शक्य झाल्यास पुरावा देणे हाच होता.

क.लो.अ.

- मृण्मय

Anand Ghare said...

अनामिकसाहेब,
आपल्या प्रतिसादाबद्दल मी अत्यंत आभारी आहे. मी बरोबर की चूक हे माझ्या दृष्टीने गौण आहे. मी इतिहासविषयातला तज्ञबिज्ञ कांही नाही. अभ्यासकही नाही. कॉम्प्यूटरवरील जुन्या फाइली चाळतांना मला जे जाणवले ते मी मांडले. ब्लॉगचा हाच फायदा आहे. आपल्या पहिल्या प्रतिसादावरून दुवा मिळाला म्हणून कुतूहलाने तो वाचला. त्यातील मिनिट्स ऑफ मीटिंगची भाषा माझ्या अपेक्षेप्रमाणे आहे, पण ज्या भाषणाचा उल्लेख मी केला त्याची माझ्या मते तशी नाही.

Anand Ghare said...

मृ्ण्मय, या नांवावरून संबोधन कसे करायचे ते समजले नाही म्हणून अनामिकसाहेब असे लिहिले.

jitu said...

dhanyawad