Friday, July 11, 2008

खरे की खोटे

माझा मित्र त्या दिवशी सत्यवादी हरिश्चंद्राचा अवतार धारण करून आला होता. कोणी तरी त्याला दिलेला शब्द पाळला नव्हता किंवा एक लोणकढी थाप ठोकून दिली होती. त्यामुळे तो भयंकर अस्वस्थ झाला होता असे मला वाटले. हताश चेहे-याने अत्यंत विषण्णपणे तो म्हणाला, "अरे, या जगाचं कांहीसुद्धा खरं नाही हेच खरं. सगळेच लोक सर्रास खोटं बोलतात, अगदी कांही कारण नसतांना किंवा त्याचा कांही उपयोग नसतांनासुद्धा वाटेल ते सांगतात."
मी म्हंटलं, "अरे, जग इतकं कांही वाईट नाही आहे बरं. निदान तुझा हा मित्र (अर्थातच मी) तरी कधी कुणाला फसवीत नाही की मला वाटेल त्या थापा मारीत नाही हे तुला चांगलं माहीत आहे ना ? या जगात खरे बोलणारी प्रामाणिक माणसं सुद्धा खूप आहेत."
तो लगेच म्हणाला,"बघ तुझ्या खोटारडेपणाची सुरुवात झालीच. जर तू खरोखरच शंभर टक्के सत्यनिष्ठ असतात तर स्वतःला असं प्रमाणपत्र दिलं असतंस कां?"
मलाही थोडा रागच आला. मी सरळ त्याला आव्हानच दिलं,"अरे, माझ्या बोलण्यातला एक तरी खोटेपणा सिद्ध करून दाखवच."
तो कांही बोलणार एवढ्यात माझ्या घरातील रेडिओमधून मंजुळ स्वर कानावर आले, "आजा रे परदेसी .."
त्याने सहज विचारल्यासारखे केले,"हे कोण गातेय् रे ?"
मी म्हंटले,"काय हे एवढंसुद्धा तुला माहीत नाही?, अर्थातच लता मंगेशकर."
"ती तुझ्या घरात येऊन बसली आहे कां?" त्याने खोचकपणे विचारले.
त्याचा विचारण्याचा रोख ओळखून मी म्हंटलं, "अरे, ती रेडिओवर गाते आहे, रेडिओमधून तिचा आवाज ऐकू येतो आहे."
"म्हणजे ती काय झुरळासारखी तुझ्या रेडिओच्या आंत शिरून बसली आहे कां? आणि तिचे हे तबला पेटीवाले साथीदार कुठे बसले आहेत?"
"रेडिओ स्टेशनवरून त्या सगळ्यांचा आवाज येतो आहे."
"म्हणजे ते लोक आता रेडिओ स्टेशनवर बसले असतील ना?"
"नाही रे बाबा, तिच्या गाण्याची रेकॉर्ड रेडिओ स्टेशनवर वाजवताहेत."
"हे तुला रे कसे माहीत? तुला ते इथून दिसते आहे कां तू तिथं पहायला गेला होतास कां?" त्याच्या प्रश्नांची सरबत्ती सुरूच होती.
शेवटी वैतागून मी सांगितले,"तुला अगदी सविस्तर ऐकायचं आहे कां? मग ऐक तर. पूर्वी कधी तरी कुठल्या तरी स्टूडिओमध्ये लताबाई गायिल्या होत्या. तिथल्या साउंड रेकॉर्डिस्टनं त्या गायनाचं ध्वनिमुद्रण केलं. त्यापासून पुढे अनेक रेकॉर्ड्स, टेप्स, सी.डी. वगैरे काढल्या गेल्या. त्यातील एखादी या वेळी रेडिओ स्टेशनमधील यंत्रात ठेऊन वाजवत आहेत. दुस-या एका यंत्रात रेडिओलहरी मिर्माण करतात. त्यांना वहन करणा-या म्हणजेच कॅरियर वेव्ह असे म्हणतात. त्या कॅरियर लहरी या गाण्याच्या आवाजापासून तयार होणा-या विद्युल्लहरीवर मॉड्युलेट करतात. या मॉड्युलेटेड लहरी केबलद्वारे ट्रान्स्मिशन टॉवरपर्यंत वाहून नेतात व तेथून त्यांचे वातावरणात प्रसारण होते. वातावरणात त्या दूरवर पसरतात. माझ्या रेडिओशी जोडलेला अँटेना त्याला मिळालेल्या कॅरियर रेडिओ लहरींना ग्रहण करून रेडिओच्या आतील यंत्राकडे त्यांचे वहन करतो. त्यामधील फिल्टर आपल्याला पाहिजे असेल त्या स्टेशनवरून आलेल्या विद्युल्लहरी बाजूला काढून इतर लहरी नष्ट करतो. दुस-या एका सर्किटमध्ये त्या लहरींना डिमॉड्युलेट करून त्यातील रेडिओ लहरी व ऑडिओ लहरी वेगळ्या केल्या जातात. अँम्प्लिफायरमध्ये त्या ऑडिओ विद्युल्लहरी अनेकपटीने वाढवल्या जातात व तेथून त्या स्पीकरकडे पाठवल्या जातात. स्पीकर त्या विद्युल्लहरींचे ध्वनिलहरींमध्ये रूपांतर करतो व त्या या खोलीमधील वातावरणात पसरवतो. त्यातील कांही ध्वनिलहरी आपल्या कानाच्या पडद्यावर आदळून त्यात कंपने उत्पन्न करतात. यामधून मेंदूकडे संदेश पाठवले जातात. मेंदू तो ध्वनि ओळखतो आणि स्मरणशक्तीच्या आधाराने आपल्याला कळते की हा आवाज लता मंगेशकर यांचा आहे. झालं समाधान?"
"हो. म्हणजे मला त्यातल्या मॉड्युलेट डिमॉड्युलेट वगैरे तांत्रिक बाबी फारशा समजल्या नाहीत पण आता तू बरोबर बोलला असावास. मग आधी सांगितलेस ते खोटं नव्हतं?"
सत्यवादी ठरण्यासाठी रोज मी असे इतके अचूक खरे बोलायला पाहिजे कां? या कल्पनेनेच माझ्या अंगावर कांटा उभा राहिला.
तीन चार वर्षाची चिमुरडी ईरा धांवत आली आणि हांतातील रेगीबेरंगी चित्रे असलेले पुस्तक माझ्या हातात देत लाडिकपणे म्हणाली, "मला यातली गोष्ट सांगा ना."
तिला अजून पुस्तकातल्या गोष्टी स्वतः वाचता येत नाहीत पण त्या ऐकायची प्रचंड हौस आहे.
मी म्हंटले, "पाहू बरं? तुला आता यातली कुठली गोष्ट ऐकायची आहे? सिंड्रेलाची का स्नोव्हाईटची का मरमेडची?"
"मला हेच म्हणायचे आहे ! अरे तुम्ही लोक इतक्या लहान मुलांना या जादू करणा-या प-या, चेटकिणी आणि मत्स्यकन्या, हवेत उडणारे सुपरमॅन, हीमॅन नाहीतर हनुमान आणि बोलणारे वाघ, सिंह, ससे आणि कासवांच्या खोट्या खोट्या गोष्टी सांगता. ती मुलं हेच शिकत मोठी होतात. मग मोठी झाल्यावर तरी ती कशाला खरं बोलणार आहेत?"
"अरे त्या काल्पनिक गोष्टी आहेत. सगळ्यांनीच फक्त सत्यकथाच सांगायच्या म्हंटलं तर जगातील ललित साहित्यच बाद करावे लागेल. व्यास वाल्मिकींपासून साहित्याची परंपरा चालत आलेली आहे आणि लहानपणापासून सगळं जग आजीबाईंच्या गोष्टी ऐकत आलं आहे."
"कदाचित म्हणूनच ते असं खोटारडं झालं असेल." त्याने नवा शोध लावला.
"खोटं म्हणजे काय आणि खरं म्हणजे काय हो?" चिमुरड्या ईराने भाबडेपणाने विचारले.
तिच्या सत्य आणि काल्पनिक विश्वामधील सीमारेषा अगदी पुसट होत्या. त्यामुळे तिला समजेल असे ते सांगणे मला कठीण होते. खरे तर मलाच अजून ते नीट समजले आहे की नाही याची आता शंका येत होती.
********************************************************************
शिळ्या कढीला ऊत

वरसंशोधनाच्या मोहिमेमध्ये एका तरुणाचा भावी वर म्हणून विचार चालला होता. त्याची चौकशी करणा-याने त्यालाच गाठून त्य़ाची विचारपूस करायला सुरुवात केली. मोठ्या पगाराची नोकरी, गांवाच्या मध्यवर्ती भागात राहते घर, त्यात सगळ्या सुखसोय़ी, प्रेमळ स्वभाव वगैरेने युक्त स्वतःचे एक सुंदर चित्र त्याने रंगवले. शिवाय अंगावर कसली जबाबदारी नाही, कधीही कुठलाही आजार झाला नाही, पान, बिडी, सिगरेट, दारू असले कसलेही व्यसन नाही, वगैरे वगैरे.
"म्हणजे तुमच्यात एकही दुर्गुण नाही म्हणायचं! पण असं कसं शक्य आहे? माणूस म्हणजे त्यात कांही तरी उणीव असायलाच पाहिजे ना? " विचारणा झाली.
"असं म्हणताय होय? आता तुम्ही इतका आग्रहच करता आहात म्हणून सांगतो. अहो मला फक्त एकच वाईट संवय आहे. ती म्हणजे मी बेधडक बेमालूम थापा मारतो."" ! ! ! "

No comments: