Wednesday, July 23, 2008

हितगुज


माजी संरक्षणमंत्री माननीय श्री.यशवंतरावजी चव्हाण यांनी खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीला भेट दिल्यावर "खडकवासला महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्र खडकवासल्यात कुठे दिसत नाही" असे उद्गार काढले होते असे म्हणतात. त्याचप्रमाणे अणुशक्तीनगर मुंबईत आहे, पण तसे जाणवण्याइतक्या मोठ्या संख्येने मराठी माणसे कांही तिथे भेटत नाहीत. जे मराठी लोक भेटतात ते सुद्धा मराठी भाषेतील साहित्य, संस्कृती, समाजप्रबोधन असल्या विषयांवर आपसात कधी बोलत नाहीत. त्यामुळे कांही मंडळींनी दर महिन्यातून एक दिवस एकत्र जमून खास याच विषयांवर चर्चा करायचे ठरवले. आपल्या अनौपचारिक समूहाला त्यांनी 'हितगुज' हे नांव दिले. या गोष्टीला दहा बारा वर्षे होऊन गेली असतील. त्या काळात मी आपल्या तांत्रिक कामात आकंठ बुडालेलो होतो आणि साहित्य, संस्कृती किंवा समाज यातील 'स'चा सुद्धा मला कधी स्पर्श झाला असेल अशी शंका कोणाला येण्याचे कारण नव्हते. त्यामुळे मला हितगुजच्या अस्तित्वाचा पत्ता लागला नाही.

नाही म्हणायला श्रवणभक्ती करण्याइतपत संगीतातील 'स'ची थोडी गोडी निर्माण झालेली असल्यामुळे मी कधी कधी गायनाच्या कार्यक्रमांना हजेरी लावीत होतो. अशाच एका कार्यक्रमाच्या मध्यंतरामध्ये चार मराठी माणसे चहा पीत बोलत उभी होती त्यांच्यात मी ही सामील झालो. पुढील भाग सुरू होत असल्याची घोषणा झाल्यावर आम्ही आपापल्या जागांकडे परतलो. जाताजाता एक पाटील कां कुलकर्णी दुस-याला म्हणाले, "आता पुन्हा पुढच्या शनिवारी आपण हितगुजमध्ये भेटणारच आहोत." ते वाक्य ऐकल्यावर डोक्यात एका कुतूहलाच्या किड्याने जन्म घेतला. 'हितगुज'मध्ये म्हणजे हे लोक कुठे भेटणार आहेत? त्या भागातली सगळी हॉटेले आणि हॉल मला माहीत होते. त्यात हे नांव कधी ऐकले नव्हते. कदाचित एखादा बंगला किंवा गृहनिर्माण संस्था असेल असे मनाचे समाधान करून त्या किड्याला झोपवून दिले. आणखी कांही दिवस गेल्यावर योगायोगाने पुन्हा तेच नांव असेच कानावर आले, शिवाय "तुम्ही आला असतात तर तुम्हाला ती चर्चा नक्कीच आवडली असती" असे कांहीतरी कोणीतरी म्हणाले. ते ऐकून झोपी गेलेला 'तो' जागा झाला आणि ताडकन स्वतः उठून वळवळ करू लागला व मला
स्वस्थ बसू देईना. पण लोकांच्या बोलण्यात मध्येच नाक खुपसून चौकशा करण्याचे तंत्र मला कधी जमलेच नाही. त्यामुळे त्या बाबतीत फारशी माहिती मिळाली नाही.

हितगुजची माहिती काढायचे काम मग मी एका बोलक्या व्यक्तीला दिले. तिने एका दिवसात कोणाला तरी विचारून माहिती पुरवली. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी संध्याकाळी कोणाच्या तरी घरी जमून कांही लोक मराठी भाषेतील साहित्य, संस्कृती, सामाजिक समस्या असल्या विषयांवर दीड दोन तास चर्चा करतात. शिवाय या कार्यक्रमात गाणेबीणे आणि खाणेपिणे अजीबात नसते (थोडक्यात माझे तिथे कांही काम नाही) एवढी माहिती मिळाली. आधी वाटले की ज्या गांवाला जायचे नाही त्या गांवाची वाट कशाला विचारा?

पण नंतर लक्षात आले की आपण जी चर्चासत्रे, संमेलने, कार्यशाळा वगैरे पाहतो त्या ठिकाणी तर खाण्यापिण्याची चंगळ असते. रसाळ रसगुल्ले खाल्ल्यावर वक्त्याची वाणी किती 'रसवंती' होते आणि खमंग चटपटे नमकीन पदार्थ खाऊन त्याचे भाषण व त्यावरील चर्चा कशी खुमासदार होते ? पण कांही न खाता पिता हे लोक उपाशीपोटी इतका वेळ कसली गहन चर्चा करीत असतील? ही विचारवंत, प्रज्ञावंत, ज्ञानवंत, प्रतिभावंत वगैरे कलावंत मंडळी तावातावाने चर्चा करतांना कशी दिसत असतील? आपला मुद्दा मांडतांना त्यांच्या आवाजाला कशी धार चढत असेल? तो जिंकल्यावर त्यांची मुद्रा कशी प्रफुल्लित होत असेल? अशा प्रकारच्या प्रश्नांनी कुतूहलाच्या कीटकांची फौज उभी केली. त्यांना शांत करण्यासाठी मला स्वतच तिथे जाऊन तो कार्यक्रम पाहणे आवश्यक होते.

त्यांच्या पुढील महिन्यातल्या बैठकीची माहिती मिळवून भिंतीवर टांगलेल्या कालनिर्णयावर खूण करून ठेवली. त्या दिवशी ठरलेल्या वेळी घरातून निघायला थोडा उशीरच झाला होता. एवीतेवी आपण कांहीतरी ऐकायलाच जाणार आहोत तेंव्हा कोणी कांही म्हणालेच तर तेही 'ऐकून' घेऊ असा विचार करीत त्या बिल्डिंगपर्यंत जाऊन पोचलो. जिना चढत असतांना वरून जोरजोरात हंसण्याचे आवाज ऐकू येत होते. त्यामुळे खिशातला पत्ता काढून पुन्हा पाहून घेतला. त्या घरी पोचलो तोंवर वीस पंचवीस मंडळी जमली होती. त्यातली निम्मीतरी आमच्या परिचयाची होती. त्यामुळे आमचे आपुलकीने स्वागत झाले. कार्यक्रम नुकताच सुरू झाला होता. नुकत्याच वाचलेल्या पुस्तकातील विनोदी उतारे कोणीतरी वाचून दाखवत होते. त्यावर हास्याचे फवारे उडत होते. इथे तर अगदी खेळीमेळीचे वातावरण होते. त्यामुळे मनावरचा ताण एकदम नाहीसा झाला.

लग्नाचा रौप्पमहोत्सव होऊन गेलेल्या एका गृहस्थाने तो प्रेमगीते लिहायचे वय असतांना त्याने लिहून ठेवलेल्या कांही कविता वाचून दाखवल्या. त्याची अर्धांगी समोरच बसलेली होती. या कविता नेमक्या कोणाला उद्देशून केल्या होता त्याचा पत्ता लागत नसल्याने तिने लाजावे की रुसावे हेच तिला समजेनासे झाल्यागत ती गोंधळली होती. काव्यवाचन झाल्यावर सगळ्यांनीच 'वाः वाः' केले. कांही लोकांनी त्यांना न कळलेल्या शब्दांचे अर्थ विचारून घेतले तर कांही जणांनी यावरून त्यांना आठवलेल्या सुप्रसिद्ध कवितांच्या ओळी म्हणून दाखवल्या.

लग्नसमारंभाच्या वेळी आहेर देण्याच्या प्रथेवर बरीच चर्चा झाली. "ही परंपरा पूर्वापारपासून चालत आलेली असल्याकारणाने त्यात कांही तरी तथ्य पूर्वीच्या लोकांनी पाहिलेच असणार." असा सूर कोणी लावला. "या निमित्ताने लग्नाच्या खर्चाची जबाबदारी थोडी वाटली जाते" असे कोणाला वाटले. "देण्यामध्ये सुद्धा एक प्रकारचे सुख असते ते देणा-याला मिळते, घेणा-याची प्राप्ती तर झालेली असतेच" असा युक्तीवाद कोणी केला. या उलट "हा एक प्रकारचा कर झाला आहे. मनाविरुद्धसुद्धा लोकलाजेस्तव तो भुर्दंड द्यावा लागतो. त्यामुळे लग्नाचे निमंत्रण मिळाल्यावर आनंद होण्यापेक्षा आहेर द्यावा लागणार या विचाराने तापच होतो." असे मुद्दे मांडले गेले. "पण त्याची काय आवश्यकता आहे?" यावरून सुरुवात होऊन, "लग्नासाठी खर्चाची, खर्चासाठी समारंभाची, समारंभाला लोकांच्या गर्दीची अशा सगळ्याच गोष्टींची काय आवश्यकता आहे?" असे करता करता "लग्नाची तरी काय आवश्यकता आहे?" या दिशेने चर्चा चालली आहे हे पाहून एका ज्येष्ट महिलेना चर्चेचे सूत्र हातात घेतले आणि "आहेर देण्याची प्रथा प्राचीन कालापासून चालत आलेली असली तरी कालाप्रमाणे त्यात बदल करून ती ऐच्छिक ठेवावी, ज्यांना आहेर द्यावा घ्यावा असे वाटेल त्यांनी तो द्यावा व घ्यावा ज्यांना तो नकोसा वाटत असेल त्यांच्यावर तो लादला जाऊ नये" असे सर्वानुमते ठरले असल्याचे सांगून ही चर्चा आता इथेच थांबल्याचे जाहीर केले.

या कार्यक्रमात खाणेपिणे वर्ज्य असल्याची माहिती मिळालेली असल्यामुळे व गंभीर चर्चा ऐकण्यासाठी स्टॅमिना रहावा म्हणून दुपारच्या चहाबरोबर दोनच्या ऐवजी चार बिस्किटे खाऊन घरून निघालो होतो. पण त्याची गरज नव्हती कारण तिथे बिस्किटासकट चहाही मिळाला आणि चर्चाही डोक्यावरून गेली नाही. फक्त गंमत पहायला म्हणून गेलेलो असतांना मी त्यात केंव्हा ओढला गेलो व हिरीरीने भाग घ्यायला सुरुवात केली ते कळलेच नाही. क्रिकेटची मॅच पहायला गेलेल्या प्रेक्षकाने नकळत बाउंडरीलाईनवर फील्डिंग करायला लागावे तशातली माझी गत झाली. एकदाच जायचे म्हणून त्या बैठकीला गेल्यावर तिथला कायमचा सदस्य बनून परत घरी आलो.

2 comments:

Mrs. Asha Joglekar said...

wat baghtey pudhalya baithakeechi.

Anand Ghare said...

या लेखात माझ्या हितगुजमधल्या प्रवेशाची चित्तरकथा लिहिली आहे. या गोष्टीला पाच वर्षे होऊन गेली. तिथे घडलेल्या चर्चेतून मला लिहायला अनेक विषय मिळाले आणि त्यावर मी लिहीत गेलो. त्यातले कांही भाग या टिकाणी हळू हळू देत आहे.