Thursday, July 17, 2008

गुरुपौर्णिमा

आषाढ पौर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात. या वर्षी ती दि.१८ जुतैला येत आहे. दिवशी आपल्या गुरूची पूजा करण्याची भारतीय परंपरा आहे. वेळापत्रकाप्रमाणे रोज थोडा वेळ वर्गात येऊन शालेय पाठ्यक्रमातील विषय शिकवून जाणा-या शिक्षकांसाठी वेगळा शिक्षकदिवस ठेवला आहे तो सप्टेंबरमध्ये पाळला जातो. गुरुशिष्यपरंपरेनुसार गुरुचरणी लीन होऊन त्याच्याकडून मिळेव तेवढे ज्ञान, कला, विद्या घेणारे लोक गुरुपौर्णिमेच्या दिवशी आठवणीने या दिवशी गुरूचा आशीर्वाद घेण्यासाठी त्याच्याकडे जातात. आजकाल बहुतकरून शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात गुरुपौर्णिमा उत्साहाने पाळली जाते. पौर्णिमेच्या दिवशी सुटी नसेल, किंवा जोराचा पाऊस असेल तर पुढे सवडीने गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम ठेवतात.
गुरू या शब्दाचा अर्थच महान, मोठा असा आहे. शिष्याने ते मान्य केल्यावरच तो कांही तरी शिकू शकतो. एका संस्कृत श्लोकात त्याचे "गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरुःसाक्षात् परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नमः।।" असे वर्णन करून त्याला नमन केले आहे. यात गुरूला देवतुल्य मानले आहे तर संत कबीर म्हणतात, "गुरु गोविंद दोऊ खडे काकै लागौ पाय। बलिहारी गुरु आपने गोविंद दीजो बताय।।" इथे त्यांनी देवाच्याही आधी गुरूच्या पायावर डोके ठेवणे पसंत केले आहे. "परीस हा लोखंडाला स्पर्श करून त्याचे फक्त सोने बनवतो पण गुरु तर शिष्याला थेट आपल्यासारखे बनवतो म्हणून तोच जास्त श्रेष्ठ." असे दुस-या एका ठिकाणी म्हंटले गेले आहे. "गुरूबिन कौन बताये बाट, बडा विकट यमघाट।", "बिन गुरु ग्यान कहाँसे पाऊँ" यासारखी कांही नकारात्मक अर्थाची पदेही आहेत. योग्य गुरु भेटल्याशिवाय आपण कांहीच करू शकत नाही असा नकारात्मक संदेश त्यातून दिला जातो आणि आपल्या प्रयत्नातली उणीव झाकायला एक निमित्य मिळते.
मला तो विचार फारसा पटत नाही. गुरूच्या मार्गदर्शनाखाली शिष्याचा प्रवास सुकर होईल, त्याची दिशाभूल होणार नाही, तो इतस्ततः भरकटणार नाही, त्याला अनेक टक्केटोणपे चुकवता येतील वगैरे गुरूपासून मिळणारे फायदे निश्चितपणे आहेत, पण गुरूने शिष्याला अगदी चमच्याने भरवले तरच त्याचे पोट भरेल किंवा बोट पकडून चालवले तरच तो दोन चार पावले टाकू शकेल असे समजायचे कारण नाही. महर्षी व्यासांनी सुद्धा एकलव्याच्या गोष्टीतून या मिथकातील फोलपणा दाखवून दिला आहे. गुरु द्रोणाचार्यांचा आशीर्वाद व मार्गदर्शन तर त्याला मिळाले नव्हतेच, त्यांनी त्याला शिष्य म्हणून स्वीकारले सुद्धा नव्हते. तरीही द्रोणाचार्यांनी कौरव व पांडव या आपल्या शिष्यांना दिलेल्या शिकवणीचे ती अपरोक्षपणे ऐकून आणि तिचे नुसते अनुकरण करून एकलव्याने धनुर्विद्येमध्ये विलक्षण प्राविण्य प्राप्त केले होते. हे म्हणजे एकाद्या गरीब विद्यार्थ्याने कॉलेजची फी न भरता कोणाकडून तरी तिथल्या नोट्स मिळवायच्या आणि त्या वाचून परीक्षेला बसून उत्तम गुण मिळवायचे असे झाले. एका अर्थाने हा बौध्दिक संपत्तीच्या हक्काचा भंग होत असेल. अर्थात द्रोणाचार्यांनी दिलेल्या शिकवणीचे अनुकरण करतांना एकलव्याने त्यांना मनोमनी गुरुस्थानी मानले असणारच. त्याशिवाय कोणी त्याच्या मागे इतके प्रामाणिकपणे प्रयत्न करणार नाही. पण त्यावर गुरुदक्षिणा म्हणून द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागून घेतला ही गोष्ट मनाला फारशी पटत नाही. मला ती अलंकारिक वाटते.
एकलव्याच्या रूपाने त्यांना त्यांच्या पट्टशिष्य अर्जुनाचा राजकारणातला प्रतिस्पर्धी दिसला असेल. तो युध्दात उतरला तर घातक ठरू शकतो हे त्यांना जाणवले असेल. एकलव्याने फक्त धनुर्विद्येचे शिक्षण घेतले होते पण राज्यशास्त्र, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र वगैरेचे ज्ञान त्याला नव्हते, त्यामुळे महाघातक ठरू शकणा-या अस्त्रांचा त्याच्याकडून दुरुपयोग होऊ शकेल असा धोकाही त्यांना वाटला असेल आणि आपल्या धनुर्विद्येचा उपयोग फक्त अरण्यातील शिकारीपुरता करण्याचे वचन त्यांनी त्याचेकडून घेतले असेल किंवा त्याच्याकडची संहारक अस्त्रे नष्ट केली असतील. अलंकारिक भाषेत त्याला अंगठा मागून घेतला म्हंटले गेले असेल. कविवर्य विं.दा.करंदीकर यांची एक सुप्रसिद्ध कविता आहे, "देणा-याने देत जावे घेणा-याने घेत जावे। घेता घेता एक दिवस देणा-याचे हात घ्यावे।।" इथे "हात घ्यावे" म्हणजे पंजा, मनगट, दंड वगैरेसकट ते खांद्यापासून तोडून घ्यावे असा क्रूर अर्थ कोणी काढत नाही. "देणे" हा त्या हातांचा गुण घ्यावा असाच त्याचा अर्थ घेतला जातो. तसा कांहीसा प्रकार असण्याची शक्यता मला वाटते. सभोवतालच्या जगाकडे आपण लक्ष देऊन पाहिले तर किती तरी लोकांच्याकडे बरेच कांही शिकण्या सारखे दिसेल. त्या सर्वांना गुरु मानून आपण त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकू शकतो. आपल्या नकळत आपण ते करत असतोसुध्दा. "बालादपि सुभाषितम् ग्राह्यम्" असे म्हंटलेलेच आहे. आपला हुद्दा, पदव्या, वय वगैरेचा विचार बाजूला ठेऊन समोरचा माणूस ज्या गोष्टीत प्रवीण आहे तेवढ्यापुरते त्याला गुरू (मोठे) मानून त्याच्याकडून ते शिकून घेतले तर त्यात आपलाच फायदा आहे. माझ्य़ा व्यावसायिक जीवनात मी ज्या ऑफिसात असेन त्या ठिकाणी असलेली एकूण एक उपकरणे स्वतः हाताळून त्यांचा वापर कसा करायचा हे त्यावर काम करणा-या कर्मचा-याकडून फावल्या वेळात शिकून घेत असे, मग तो टाईपरायटर असो, ड्रॉइंग बोर्ड असो, झेरॉक्स मशीन असो किंवा वायरलेस ट्रान्स्मिटर असो. त्यामुळे अप्रशिक्षित नवखा माणूससुध्दा त्यापासून काय काय करू शकतो आणि कुशल कामगार त्यातून कोणते चमत्कार घडवून आणू शकतो अशा दोन्ही मर्यादा समजायच्या आमि व्यवस्थापनात त्याचा चांगला उपयोग करता आला. ऑफिसात कॉम्प्यूटर आल्यानंतर तो शिकण्याचा कुठला कोर्स वगैरे करायला मला वेळच नव्हता. त्याचा उपयोगसुध्दा ऑफिसातल्या सर्वात तरुण मुलांना गांठून त्यांना गुरुस्थानी मानून शिकून घेतला. त्याचा उपयोग मला आजतागायत होतो आहे.

1 comment:

Dhananjay said...

Good article!