Friday, July 11, 2008

हो किंवा नाही

अनेक चित्रपटात किंवा मालिकांमध्ये आपल्याला न्यायालयाची दृष्ये दिसतात. उलटतपासणी घेणारा वकील सांगतो, "मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर फक्त 'हो' किंवा 'नाही' या शब्दात द्यायचे. समजलं?"
साक्षीदार म्हणतो, "हो"
"आपलं नांव काय?" उत्तर मिळत नाही.
"कृपया आपण न्यायालयाला आपलं नांव सांगू शकता कां ?"
"हो."
"आपलं नांव 'हो' आहे कां?"
"नाही."
"!!!"
कधी कधी उलटतपासणी घेणारे वकील प्रश्नांच्या फैरी झाडतात. "आपण आरोपीला प्रत्यक्ष खून करतांना पाहिलेत कां?", "म्हणजे त्याला पिस्तूल झाडतांना पाहिलेत का?", "पिस्तूल कसे झाडतात ते तुम्हाला ठाऊक आहे का?", "पिस्तुलाचा ट्रिगर कशाला म्हणतात ते माहीत आहे कां?", "ट्रिगरवर ठेवलेलं आरोपीचं बोट तुम्हाला दिसलं कां?", "त्यानं ट्रिगर दाबलेलं तुम्हाला कळलं का?", "पिस्तुलातून निघालेली गोळी तुम्ही पाहिली कां?", "ती मयताच्या शरीरात घुसतांना तुम्हाला दिसली कां?", "मयताचा जीव जात असतांना तुम्ही त्याला पाहिलेत कां?", "कोणत्या क्षणी त्याचा जीव गेला हे तुम्हाला कळलं कां?", "हे कळायला तुम्ही डॉक्टर आहात कां?", "डॉक्टरला तरी इतक्या दुरून हे समजतं असं तुम्हाला वाटतं कां?" वगैरे वगैरे.
मध्येच कुठे तरी दुसरा वकील, "ऑब्जेक्शन माय लॉर्ड!" असे म्हणत त्याला थोडी उसंत देतो. पण बिचारा साक्षीदार गांगरून गेलेला असतो आणि अदमासाने 'हो' किंवा 'नाही' म्हणत राहतो. त्याचाच आपापल्या सोयीनुसार अर्थ लावून वकील लोक आपापल्या 'मनगढंत कहाण्या' किंवा 'सच्चाईच्या तसबिरी' रंगवतात.

पडद्यावरील गोष्टीमध्ये पहायला हे जरी मनोरंजक वाटले तरी प्रत्यक्ष आयुष्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरे अशी 'हो' किंवा 'नाही' मध्ये देता येतात कां ?" दुस-या माणसाला असे प्रश्न विचारून निरुत्तर करण्यासाठी कांही लोक त्याचा उपयोग करतात. "हल्ली तुम्ही दारू पिणं सोडलत कां?", "बायकोला मारणं बंद केलं कां?", "अजून शर्टाच्या बाहीला नाक पुसता कां?" अशा प्रश्नाला 'हो' किंवा 'नाही' म्हंटले तर एक तर तुमच्या वाईट संवयी गेलेल्या नाहीत, नाही तर आता आतापर्यंत त्या होत्या असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे दोन्ही बाजूंनी पंचाईतच!
"या जगात देव आहे कां ?","शहाजहान बादशहाने ताजमहाल बांधला कां?", "महात्मा गांधीजींच्या चळवळीमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले कां?", "स्वातंत्र्यानंतर भारताने प्रगती केली कां?", अशा अनेक प्रश्नांना बहुतेक लोक "हो" असे उत्तर देतील पण त्यांना ठामपणे "नाही" असे म्हणणारे कित्येक लोक आहेत आणि ते पुराव्यांची भेंडोळी आपल्यापुढे मांडतात. पुन्हा कांही लोकांना ते पुरावे पटतात, कांही लोकांना पटत नाहीत. "भारताने अणुकरारावर स्वाक्षरी करावी कां?" यापासून "भारताचे मंत्रीमंडळ कोलमडणार कां?" इथपर्यंत अनेक प्रश्न रोजच्या रोज वृत्तपत्रातून विचारले जातात. कोणी त्यांना 'हो' असे उत्तर देतात तर कोणी 'नाही' असे. थोडक्यात सांगायचे झाले तर दोन्ही प्रकारची उत्तरे असतात, त्यांना समर्थनीय वाटणारी कारणेही असतात. त्याशिवाय कित्येक लोकांची द्विधा मनस्थिती असते, त्यांना 'हो' किंवा 'नाही' ते नक्की सांगता येत नाही.
'हो' किंवा 'नाही' यासारखीच पंचाईत चांगले-वाईट, जवळ-दूर, बरोबर-चूक या शब्दांचा उपयोग करतांना होतो, कारण या गोष्टी सापेक्ष असतात. कोठल्या तरी संदर्भाला जोडल्याशिवाय त्यांना अर्थ नसतो. तसेच संदर्भाप्रमाणे अर्थ बदलत जातो. परीक्षेत ८० टक्के गुण मिळवण्याची अपेक्षा ठेवणारा विद्यार्थी ९० टक्के गुण मिळाल्यास आनंदाने नाचायला लागतो आणि ७० टक्के मिळाल्यास त्याला रडू कोसळते, पण दुसरीकडे ९५ टक्के गुण मिळालेला विद्यार्थीसुद्धा त्याच्या अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाले म्हणून खट्टू होतो तर जेमतेम पास होण्यात धन्य मानणारा मुलगा ५० टक्के मार्क मिळाल्याबद्दल आनंदाने गांवभर पेढे वाटीत फिरतो. मुंबईत राहणारा माणूस दोन तीन किलोमीटरवर असलेली जागा अगदी "हांकेच्या अंतरावर आहे" म्हणेल तर खेड्यातला माणूस "ती जागा आपल्या गांवातच नाही, दुस-या गांवात आहे" असे म्हणेल.
असे असले तरी अनेक लोक जगाकडे पाहतांना त्यातील प्रत्येक गोष्ट काळी , आहे नसेल तर ती पांढरी असायला पाहिजे अशी भूमिका घेतात. त्यामुळे आपल्या "शत्रूचा शत्रू आपला मित्र" किंवा "आपला मित्र नसेल तर तो आपला शत्रू " असेच समजतात. याहून वेगळी त्रयस्थाची भूमिका त्यांना मान्यच नसते. बेकारी, महागाई, संरक्षण वगैरे सगळ्या जटिल प्रश्नावर सरकारचे धोरण बरोबर तरी आहे (असे म्हणणारे कमीच), नाहीतर ते सपशेल चुकीचे आहे असेच बहुतेक लोक बोलतात. घरातील किरकोळ बाबीवर सुद्धा अशाच टोकाच्या भूमिका घेतात. आई आणि वडील दोघांपैकी कोणीही एकजण आपल्या मुलावर कोठल्याही कारणाने आणि कितीही रागावले तर दुस-याने किंवा घरातील तिस-या कुणी ते योग्य आहे की नाही याचा विचार करता कामा नये. कारण रागावणा-याच्या मनासारखे वागणेच फक्त बरोबर आणि त्या व्यतिरिक्त इतर सारे वागणे चूकच असते. दुसरा कोणी मध्ये बोलला तर लगेच "त्या पोराच्यासमोर तुम्ही मला चूक ठरवलेत तर तो माझा मान कसा राखेल? तुम्ही त्याला लाडावून ठेवले आहे," वगैरे संवाद सुरू होतात आणि मूळ मुद्दा बाजूला पडतो.
काल मला एक बाई भेटल्या. त्या सांगत होत्या, "अहो ते आपले देशपांडे आहेत ना? ते कुठे तरी प्रवासाला म्हणून गेले होते आणि परत येता येता त्यांना पायावर एक गळू झाला होता. डॉक्टरकडे गेले तर लगेच त्यांनी ऑपरेशन केलं आणि आता एवढं मोठं बँडेज लावून बसले आहेत. आता पुढचे पंधरा दिवस कुठे हिंडायफिरायला नको. कसले तरी हे डॉक्टर म्हणायचे? बिचा-या पेशंटला त्यांनी किती त्रास द्यायचा?"
मी त्यांना विचारले,"बाई, तुम्हाला या डॉक्टरांचा कांही वाईट अनुभव आला आहे का?" कदाचित त्या डॉक्टरने काट्याचा नायटा केला असेल किंवा नसेलही!
"छे हो, मला तर ते काळे का गोरे ते सुद्धा माहीत नाही."
"मग त्यांना तुम्ही दोषी कां ठरवता?" गळूच्या शल्यक्रियेची गरज असेलच किंवा कदाचित त्याने अधिक सावधगिरी बाळगली असेल.
"अहो देशपांडे बाईच सांगत होत्या की सध्या त्यांनी कुठे जायचं नाही का यायचं नाही, म्हणजे त्यांना त्रास होणार नाही कां?"
"त्यांना त्रास होणारच, पण त्यात डॉक्टरांची काय चूक आहे?"
"कां? मागच्या वर्षी त्या कुलकर्ण्यांना हातावर फोड झाला होता ना? त्यांच्या डॉक्टरांनी तर ऑपरेशन करून त्यांना लगेच घरी पाठवलं आणि दुस-या दिवशी ते कामावरसुद्धा हजर झाले."
त्यांची परिस्थिती वेगळी होती, कदाचित त्यांची जखम फारशी खोल नसेल, हाताला बँडेज बांधून माणूस हिंडू फिरू शकतो पण पायावर जोर दिल्याशिवाय त्याला चालता येत नाही वगैरे बाबी समजून घेणे त्या बाईंना आवश्यक वाटत नाही. देशपांड्यांना घरी बसायला लागल्याबद्दल सरळ त्यांच्या डॉक्टरला जबाबदार ठरवून मोकळ्या! त्यांनी लगेच ऑपरेशन करून किती चांगले काम केले होते याला महत्व नाहीच. खरोखर काय झालेले होते, काय करण्याची आवश्यकता होती, ते न केल्यास काय झाले असते, आणखी काय करता आले असते, आणखी काय होऊ शकले असते वगैरे विचार केल्यास आपल्याला या गोष्टीच्या अनंत छटा दिसतील. पण फक्त काळे पांढरे पहाण्याची संवय झाली तर त्या कशा दिसणार?
**********************************************************************
जरा हंसून घ्या
जर 'तो' आणि 'ती' यांच्यात वाद झाला (म्हणते तसा तो होणारच, उगाच आपले जर तर म्हणायचे!) तर त्यामधील शेवटचा शब्द नेहमीच 'तिचा' असतो.
.
.
जर त्यावर 'तो' कांही बोललाच तर ती एका नव्या वादाची सुरुवात असते.

No comments: