Thursday, July 17, 2008

वर्णमाला


भारतीय भाषांमधील वर्णमाला आपल्या पूर्वजांनी अत्यंत विचारपूर्वक व शास्त्रशुध्द पध्दतीने बनवली आहे. आपण जेंव्हा बोलतो त्यावेळी फुफ्फुसातील हवा हळूहळू तोंडातून बाहेर सोडतो व त्याचबरोबर स्वरयंत्र, जीभ आणि जबडा यांच्या विशिष्ट हालचालीमधून ध्वनि निर्माण करतो. या प्रक्रियेचा सूक्ष्म अभ्यास करून त्याअनुसार अक्षरांची रचना या वर्णमालेत केलेली आहे. स्वर व व्यंजन असे अक्षरांचे दोन मुख्य गट आहेत अ, आ, इ ई वगैरे स्वरांचा उच्चार मुख्यतः घसा व जबडा यांच्या माध्यमातून होतो "आ" म्हणतांना आपण तोंड पूर्णपणे उघडून आ वासतो तर "ऊ" म्हणतांना ओठांचा चंबू करतो. अं म्हणतांना तोंड मिटून घेऊन नाकाद्वारे हवा बाहेर सोडतो तर अः च्या उच्चारात तोंड उघडून झटक्यात हवा बाहेर टाकतो. स्वरांच्या उच्चारात जिभेचा फारसा वापर होत नाही.
व्यंजनांच्या उच्चारात जिभेची हालचाल आवश्यक आहे. किंबहुना त्यावरूनच व्यंजनांची वर्गवारी केलेली आहे. क,ख,ग,घ,ङ या पहिल्या गटाचा उच्चार करतांना जीभ आतल्या बाजूला घशाकडे ओढली जाते म्हणून त्याला "कंठ्य" म्हणतात. या गटातील पहिले अक्षर थोडेसे तीव्र किंवा कठोर आहे तर तिसरे ग हे अक्षर सौम्य वा मृदु आहे. या अक्षरांच्या जोडीने घशातून जास्त जोरात हवा सोडली की अनुक्रमे ख आणि घ या दुस-या व चौथ्या अक्षरांचा उच्चार होतो. शेवटी नाकातून आवाज काढला की ङ हे अनुनासिक होते. अशा प्रकारे प्रत्येक गटात पांच व्यंजनांचा संच बनवला आहे.
वरच्या दंतपंक्तींच्या हिरड्यांच्याही वर जिभेने स्पर्श करून च,छ,ज,झ,ञ या अक्षरांचा उच्चार होतो. या गटाला तालव्य असे म्हणतात. जीभ उभी करून वरच्या पडद्याला लावली की ट,ठ,ड,ढ,ण या मूर्धन्य गटाचा उच्च्रार होतो, तर वरच्या दातांना स्पर्श करून होणा-या त,थ,द,ध,न या अक्षरांच्या गटाला दंत्य हे नांव दिले आहे. प,फ,ब,भ,म या औष्ठ्य गटामध्ये जीभ तोंडातच राहते आणि वरचा ओठ खालच्या ओठाला भेटतो. या पांच गटांतील पंचवीस व्यंजनांमध्ये कुठे तरी स्पर्श होणे आवश्यक आहे.
त्यानंतर येणा-या य,र,ल,व या व्यंजनाच्या उच्चारासाठी जीभ ज,ड,द,ब या अनुक्रमे तालव्य, मूर्धन्य, दंत्य व औष्ठ्य गटांतील व्यंजनासाठी लागणा-या स्थानांच्या अगदी जवळ जाते पण त्यांचा उच्चार एखाद्या स्वराप्रमाणे मुख्यतः घशातून होतो, तसेच जीभ किंचित आतल्या बाजूला ओढली जाते. या व्यंजनांना
अंतस्थ म्हणतात. त्यानंतरची श,ष,स अक्षरे उच्चारतांना जीभ पुन्हा अनुक्रमे तालव्य,मूर्धन्य व दंत्य स्थितीत जाते पण किंचित पुढे ढकलली जाते. श,ष,स आणि ह,ळ यांच्या उच्चारात हवा कांहीशा जोरात फेकली जाऊन तिच्या घर्षणामधून ऊष्णता निर्माण झाल्यासारखे वाटते. या अक्षरांच्या गटाला ऊष्म नाव दिले आहे. तोंडाची वाफ दवडणे हा वाक्प्रचार बहुधा या गटामुळेच आला असावा. ह चा उच्चार करतांना तर त्याचा उछ्वास अगदी बेंबीच्या देठापासून जाणवतो. त्याला महाप्राण असेही म्हणतात. क्ष आणि ज्ञ ही दोन नेहमी वापरली जाणारी जोडाक्षरे आहेत त्यांना ही मुळाक्षरांमध्ये स्थान दिले आहे. कांही भाषांमध्ये त्यांच्या जोडीने त्र सुध्दा गणले जाते.
जेंव्हा इंग्रजी भाषेच्या प्रसाराला सुरुवात झाली त्यावेळी Boy, Cat हे शब्द ब्वाय, क्याट असे लिहीत. मध्यंतरी कोण्या विद्वानाने ॅ ही देवनागरी लिपीत नसलेली मात्रा मराठीत आणून बॉय, कॅट असे सुटसुटीतपणे लिहिण्याची सोय केली. हिन्दी भाषेमध्ये उर्दू शब्दांच्या मुलायम उच्चारातील मार्दव दाखवण्यासाठी कांही अक्षरांच्या खाली नुक्ता नांवाचा एक बिंदु देण्याची प्रथा पडली. तसेच चाँद (चॉन्द) सारख्या शब्दांच्या उच्चारासाठी चन्द्रबिंदु आणला. कन्नड भाषेत ऋस्व आणि दीर्घ ए कार व ओ कार आहेत. त्यामुळे Get आणि Gate या शब्दांमधील गे चे वेगळेपण दाखवता येते. प्रत्यक्ष उपयोगात Get हे ग्यट् असे ऐकू येते.
अशा प्रकारे मूळ संस्कृत भाषेतील वर्णमालेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भर वेगवेगळ्या भाषांच्या लिपींमध्ये घातलेली आहे. तामीळ भाषेची मात्र एक वेगळीच त-हा म्हणायची. तिथे क,ख,ग,घ या सर्वांसाठी मिळून एकच अक्षर आहे. त्यामुळे एकच वाक्य कोणी खाना खाओ असे वाचेल तर दुसरा गाना गाओ असे. पंजाबी ढंगाच्या हिंदीमध्ये घर शब्दाचा उच्चार क्कार आणि भाई चा उच्चार प्पाई असा होत असलेला आपण अनेक मालिकांमध्ये पाहतोच.
भारतातील विविध भाषा आणि लिपी एकत्र पहायच्या आहेत ? आपली कुठलीही एकादी नोट घ्या. तिचे मूल्य हिन्दी आणि इंग्रजीशिवाय आसामी पासून उर्दूपर्यंत पंधरा वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलेले आपल्याला पहायला मिळेल.

No comments: