मी मैसूरला असतांना त्या गांवात एक छोटी घटना घडली. देशभर खप असलेल्या प्रमुख वृत्तपत्रांत अशा किरकोळ घटनांची बहुधा नोंदच घेतली जात नाही आणि त्यांची बातमी आलीच तर ते वर्तमानपत्र वाचतांना ती आपल्या लक्षात येत नाही. मैसूर शहरातल्या बातम्याच प्रामुख्याने छापणा-या तिथल्या एका लंगोटीपत्रात मात्र ती बातमी दोन वेगवेगळ्या दृष्टीकोनातून छापून आली.
मागच्या महिन्यात एक बालमजूरविरोधी दिवस पाळण्यात आला होता. त्या दिवशी संबंधित खात्याच्या पथकाने शहरातील कांही ठिकाणी धाडी घालून कांही बालकामगारांची (त्यांच्या मालकांच्या जांचातून) मुक्तता केली. यासंबंधीचा ऑफीशियल मजकूर एका पानावर छापला होता. पण अशी मुक्त केलेली मुले मुळीसुध्दा खुषीत दिसत नव्हती. उलट आपल्याला आपले काम करू द्यावे म्हणून ती गयावया करत होती. आपल्या घरी दुसरे कोणी कमावते नसल्याने आपल्या कुटुंबाला फक्त आपलाच आधार असल्याचे टाहो फोडून सांगत होती. याचे सचित्र वर्णन दुस-या जागी दिले होते. त्याच दिवशी त्या वर्तमानपत्रात या विषयावर एक मार्मिक व्यंगचित्रदेखील लगेच बनवून छापले होते. त्यातला हॉटेलमालक आपल्या पो-याला विचारतो, "गाढवा, आजच तू मिशी लावून यायला विसरलास कां?" एका दगडात त्याने किती पक्षी मारले?
बालकल्याणदिन साजरा झाल्यानंतर दुसरे दिवशी त्या मुलांचे काय झाले हे कांही वाचायला मिळाले नाही. त्यांच्या कुटुंबाचे काय हाल झाले हे ही पहायला कोणी गेले नसेल. ज्या देशात दारिद्र्यरेषेच्या खाली जगणा-या लोकांची संख्या फार मोठी आहे आणि त्या लोकांना घरातील लहान मुलांकडूनसुध्दा थोडी कमाई करून घेण्याखेरीज गत्यंतरच नाही तिथे कायदा करण्याने मुलांची परिस्थिती सुधारू शकेल कां? बेरोजगारांचीच संख्या प्रचंड असतांना त्या सर्वांना सरकार तरी कसे पोसणार? ज्या असंख्य मुलांना घरी चालणा-या व्यवसायात किंवा शेतावर रोज कष्ट करावे लागतात त्यांची गणना कशी करणार? लहानपणी घरोघरी पेपर टांकून किंवा कपबशा विसळून मोठे झालेल्या लोकांची कितीतरी सन्मान्य उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यांच्या लहानपणी असा कायदा असता तर त्यांचे काय झाले असते? असे अनेक अनुत्तरित प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात.
No comments:
Post a Comment