Friday, July 04, 2008

मैसूरची देवालये २


चामुंडा हिलवर देवीच्या मंदिरापासून थोडे दूर अंतरावर एक प्रचंड आकाराची नंदीची मूर्ती आहे. देवीच्या देवळाकडे जाणारा अर्धापाऊण रस्ता चढून गेल्यानंतर मुख्य रस्त्याला एक फाटा फुटतो तो या नंदीपर्यंत जातो. नंदी हे भगवान शंकराचे वाहन आहे. आपल्याला नेहमी तो शंकराच्या पिंडीच्या समोर बसलेला पहायला मिळतो. ब-याचशा शंकराच्या देवळात गाभा-यातील पिंडीपर्यंत पोंचण्यापूर्वी सभामंटपातल्या नंदीला नमस्कार करूनच भक्त पुढे जातात. चामुंडा हिलवर मात्र फक्त महाकाय नंदीच तेवढा उघड्यावर बसवलेला आहे. त्याच्या आसपास दोन तीन लहान लहान घुमट्या आहेत, पण शंकराची मोठी पिंडी मला त्यात कोठे ठळकपणे तरी दिसली नाही. या नंदीच्या आकाराएवढा प्रचंड शिलाखंड बाहेरून उचलून आणून या डोंगरावर चढवला जाणे खूपच कठीण दिसते. टेकडीच्याच एकाद्या सुळक्याला छिन्नीने फोडून त्यातून हा नंदी कोरून काढला असावा असे वाटते. पण आजूबाजूच्या चौथ-याच्या दगडाचा रंग वेगळा दिसतो. " ही जागा संरक्षित आहे, इथे कोणी कांही केल्यास भारतीय दंडविधानाच्या अमक्या तमक्या कलमाखाली कडक कारवाई करण्यात येईल." असे धमकी देणारे फलक जिकडे तिकडे तत्परतेने लावणारे आपले पुरातत्व खाते त्या जागेवरील वास्तू किंवा कलाकृतीविषयी अधिकृत माहिती स्पष्ट शब्दात देण्यासाठी तेवढे तत्पर नसते. उगाच त्यावरून वादविवाद, मोर्चे, निषेध वगैरे व्हायला नकोत म्हणूनही कदाचित हे काम करायला कोणी धजावत नसेल. त्यामुळे ही नंदीची मूर्ती कोणी आणि कधी घडवली याबद्दल कांही माहिती समजली नाहीच.
काळ्या पाषाणात कोरलेली ही मूर्ती अत्यंत प्रमाणबध्द आणि रेखीव आहे. नंदीच्या गळ्यातील व अंगाखांद्यावरील अलंकारांचे सारे तपशील कौशल्यपूर्वक कोरीव कामाने त्यातल्या बारकायांसह दाखवले आहेत. त्याच्या पृष्ठभागाचा गुळगुळीतपणा ही मूर्ती घडवतांनाच आणला की वर्षानुवर्षे तेलाने माखून आणला आहे ते समजत नाही. चामुंडामातेचे ओझरते दर्शन दुरूनच घ्यावे लागते, इथे मात्र आपण नंदीच्या अगदी जवळ जाऊ शकतो, त्याला स्पर्श करू शकतो, त्याचे आणि त्याच्यासह आपले फोटो काढू शकतो. कोणीही त्यात आडकाठी आणत नाही.
दक्षिण भारतात चांगल्या देवळांची संख्या थोडी जास्तच दिसते. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे ती इतर इमारतींपेक्षा पटकन वेगळी दिसूनही येतात. मीनाक्षी आणि चिदंबरम यासारख्या मोठ्या मंदिरांची प्रचंड गोपुरे जगप्रसिध्द आहेत. चामुंडीमातेच्या दंवळाचे गोपुरसुध्दा चांगले उंच आहे. पण मैसूर शहरातल्या मध्यम आकाराच्या अनेक देवालयांच्या प्रवेशद्वारावर दोन तीन मजल्यांइतकी उंच गोपुरे बांधलेली दिसतात. लहान देवळाचे प्रवेशद्वारसुध्दा कलाकुसर आणि छोट्या मूर्ती यांनी सजवलेले असते आणि त्यावरून कोठलेही मंदिर बाहेरून ओळखता येते. याशिवाय अनेक जागी ते कोणत्या देवाचे आहे हे लिहिलेला फलक त्या जागी लावलेला दिसला.
देवांच्या नांवापुढे स्वामी हा शब्द लावण्याची इकडे प्रथा आहे. मारुतीच्या देवळावर आंजनेयस्वामी लिहिलेले असते तर गणेशाच्या मंदिरावर विनायकस्वामी. मैसूरजवळ श्रीरंगपट्टण इथे श्रीरंगनाथस्वामींचे पुरातन मंदिर आहे तेसुध्दा प्रसिध्द आहे. आमच्या घराजवळ एक सुंदर शिवमंदिर आहे त्यावर श्रीचंद्रमौलेश्वरस्वामी असा फलक आहे. बहुतेक देवांना अशा मोठ्या नांवाने संबोधिले जाते. पांडुरंगस्वामी नांवाचे एक विठ्ठलमंदिरही दिसले. भगवान विष्णूच्या दशावतारांपैकी श्रीरामचंद्र आणि श्रीकृष्ण यांचीच उपासना अधिककरून केली जाते. इतर अवतारांची मंदिरे सहसा दिसत नाहीत. पण मैसूर शहरात श्रीवराहस्वामी आणि श्रीलक्ष्मीनरसिंहस्वामी यांची वेगवेगळी मंदिरे आहेत. नरसिंहाअवताराच्या वेळी ते खांबामधून प्रकट झाले आणि हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर भक्त प्रल्हादाला आशीर्वाद देऊन पुन्हा अदृष्य झाले अशी कथा मी ऐकली होती. पण या मंदिरात जी मूर्ती स्थापन केलेली आहे त्यात श्रीनृसिंहस्वामी मांडी घालून बसले आहेत आणि त्यांच्या मांडीवर लक्ष्मीदेवी विराजमान आहेत अशी प्रतिमा आहे. मी मैसूरला असतांना त्या लहान शहरात दोन जागी नरसिंहजयंतीचा उत्सव साजरा केला गेला. यापूर्वी महाराष्ट्रात मी कधी त्याबद्दल ऐकलेसुध्दा नव्हते.
नाशिक सोडल्यास इतर कोठे मला रामाचे देऊळ प्रामुख्याने दिसले नव्हते असे मी रामनवमीच्या दिवशी लिहिले होते. मैसूरची सगळी मंदिरे कांही मी आतून पाहिली नाहीत, पण रस्त्यावरून जाताजाता जेवढे नजरेस पडत गेले त्यावरून पाहतां प्रवेशद्वारावरील कमानीत मात्र कोदंडपाणी (धनुर्धारी) श्रीरामाच्या मूर्ती मला निदान तीन चार ठिकाणी दिसल्या. बाजूला सीतामाई आणि लक्ष्मण होतेच. कांही जागी त्याच्या बरोबर किंवा ऐवजी देहुडाचरणी वेणू वाजवीत उभा असलेल्या मुरलीधराची मूर्ती होती. बहुतेक ठिकाणी विघ्नहर्त्याची प्रतिमा होतीच, कांही जागी हांतावर पर्वत धरून उड्डाण करणारा हनुमान होता. अंबा, दुर्गा, काली, राजराजेश्वरी, वगैरे देवीच्या अनेक रूपांची अनेक मंदिरे दिसली, त्यात चामुंडामातेची जास्त होती. राघवेंद्रस्वामींचे मठ कांही जागी आहेत. त्यात पूजा अर्चेशिवाय अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन वगैरेंसारख्या मोठ्या संस्थांनी चालवलेल्या शाळा, कॉलेजे आणि आश्रम मैसूर शहरात कार्यरत आहेत. यातल्या बहुतेक संस्था जुन्या शहरात नसून नव्या विस्तारित क्षेत्रात आहेत. एकंदरीत पाहता आजच्या परिस्थितीच्या मानाने मैसूरमधले लोक मला जास्तच सश्रध्द वाटले.

No comments: