Sunday, July 06, 2008

विठो माझा लेकुरवाळा


आषाढी एकादशीला पंढरपूरला पोचण्यासाठी गांवोगांवाहून निघालेल्या वारक-यांच्या दिंड्यांचे वृत्तांत आपण हल्ली रोजच्या बातम्यांमध्ये वाचतो किंवा पाहतो. "मनुष्यबळाचा हा केवढा अपव्यय आहे? या लोकांनी त्याऐवजी कांही उत्पादक काम केले तर त्यांची आणि देशाची संपदा वाढेल." असा व्यवस्थापकीय विचार पूर्वी माझ्या मनात येत असे. "इतक्या लोकांना आपापल्या घरांतून पंढरपुराला खेचून नेणारी कोणती आकर्षणशक्ती असेल? कोणते बल हे काम करवून घेत असेल? कसली ऊर्जा त्यासाठी उपयोगी पडत असेल?" वगैरे कुतूहलात्मक प्रश्न आता समोर येतात. या गोष्टींचे मूल्य मला न्यूटन आणि जूल्सच्या परिमाणात काढता येणार नसले तरी या संकल्पना मला विज्ञानाच्या अभ्यासातूनच मिळाल्या आहेत. विज्ञानावरील निष्ठा न सोडता समोर येत असलेल्या माहितीचे विश्लेषण करून त्यांची उत्तरे शोधण्याचा तोकडा प्रयत्न करावासा वाटतो.


पंढरीच्या विठ्ठलाचे जबरदस्त आकर्षण या भक्तांच्या मनात असते हे उघड आहे. यामुळे या पांडुरंगाची विविध रूपे पहाण्यापासून सुरुवात केली. त्याच्या दर्शनाने माझ्या मनात कोणते तरंग उठतात याला महत्व न देता त्याच्या परमभक्तांनी त्याच्याबद्दल जे सांगितले आहे अशा कांही अजरामर रचना वाचून मला त्यातले जेवढे आकलन झाले ते या पानांवर थोडक्यात देत आहे. चर्मचक्षूंना अनाकलनीय वाटणारे पण मनाला दिव्य तेजाने दिपवणारे असे 'कानडा विठ्ठलू'चे रूप संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या एका अभंगात वर्णिलेले आहे ते मी आधीच्या भागात दिले होते. त्याचबरोबर या 'कानडा राजा'ने भक्तांसाठी मनुष्यरूप धारण केल्याचे दाखले महाकवि गदिमांनी आपल्या गीतामध्ये कसे दिले आहेत ते दाखवले होते.
अशा स्वरूपाच्या अनेक आख्यायिका प्रसृत आहेत. बालक नामदेवांनी अनन्य भक्तीभावाने अर्पण केलेला नैवेद्य पांडुरंगाने भक्षण केला, चोखामेळ्याला संगत देऊन त्याच्या गुरांचा सांभाळ केला, दामाजीपंतांनी उपाशी गरीबांना सरकारी गोदामामधील धान्य दिले त्याच्या वतीने बादशहाकडे जाऊन त्याची मोहरांमध्ये किंमत मोजली या घटनांचे उल्लेख त्या गाण्यात आहेत. त्याशिवाय जनाबाईला जात्यावर दळण दळायला तर एकनाथांना चंदनाचे खोड उगाळायला विठ्ठलाने मनुष्यरूप धारण करून हातभार लावला असे म्हणतात. शून्यामधून प्रकट होणे आणि कार्यभाग संपल्यावर अदृष्य होऊन जाणे या गोष्टी चित्रपटात पटण्यासारख्या वाटल्या तरी त्या प्रत्यक्षात घडू शकत नाहीत. त्याचा अन्वयार्थ घ्यावा लागेल. "त्या त्या प्रसंगी जे कोणी धांवून आले त्या लोकांमध्ये या संतमंडळींना परमेश्वराचे रूप दिसले." असे कदाचित म्हणता येईल असे मला वाटते.


बहुतेक वेळा देव आणि त्याचे भक्तगण यांत खूप लांबचे अंतर असते. देवांचे वास्तव्य एक तर कैलास किंवा वैकुंठ अशा त्यांच्या स्वतंत्र स्वर्गलोकांत असते नाहीतर तो निर्गुण, निराकार, अगम्य स्वरूपात चराचरामध्ये भरलेला असतो किंवा भक्ताच्या हृदयात विराजमान झालेला असतो. भक्तांनी ज्याच्याबरोबर अगदी घरातल्या प्रियव्यक्तींसारखी जवळीक दाखवली असा विठोबासारखा दुसरा देव क्वचितच सापडेल. "बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ।।" असे संत एकनाथ म्हणतात आणि पुंडलीकाला भाऊ तर चंद्रभागेला बहीण मानतात. "विठू माऊली तूं, माऊली जगाची। .... विठ्ठला, मायबापा।" असे आधुनिक काळातील कवी जगदीश खेबुडकर यांच्या गीताचे बोल आहेत. संत जनाबाईने एका अभंगात "ये ग ये ग विठाबाई । माझे पंढरीचे आई ।।" अशी साद घातली आहे तर दुस-या अभंगात त्या काळातील सारीच संतमंडळी ही विठोबाची लेकरे आहेत अशी कल्पना करून तो आपल्या बाळगोपाळांना लडिवाळपणे अंगाखांद्यावर घेऊन खेळवतो आहे असे सुरेख कौटुंबिक चित्र रंगवले आहे. अशा रचना गाता गाता इतर भक्तांनासुद्धा त्या माउलीचा लळा लागला तर त्यात काय नवल?

विठो माझा लेकुरवाळा । संगे गोपाळांचा मेळा ।।१।।
निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी ।।२।।
पुढे चाले ज्ञानेश्वर । मागे मुक्ताई सुंदर ।।३।।
गोरा कुंभार मांडीवरी । चोखा जीवा बरोबरी ।।४।।
बंका कडियेवरी । नामा करांगुली धरी ।।५।।
जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ।। ६।।


माझे माहेर पंढरी । आहे भीवरेच्या तीरी ।।१।।
बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ।।२।।
पुंडलीक राहे बंधू । त्याची ख्याती काय सांगू ।।३।।
माझी बहिण चंद्रभागा । करीतसे पापभंगा ।।४।।
एका जनार्दनी शरण । करी माहेराची आठवण ।।५।।

ये ग ये ग विठाबाई । माझे पंढरीचे आई ।।१।।
भीमा आणि चंद्रभागा । तुझ्या चरणीच्या गंगा ।।२।।
इतुक्यासहित त्वां बा यावे । माझे अंगणी नाचावे ।।३।।
माझा रंग तुझे गुणी । म्हणे नामयाची जनी ।।४।।

No comments: