Tuesday, July 01, 2008

मैसूरचे इन्फोसिस कँपस


मैसूर हे एक प्राचीन शहर आहे. महिष्मती, महिषावती वगैरे नांवाने या नगरीचा उल्लेख पुराणात होतो असे म्हणतात. इतिहासकाळात तर त्याला महत्व होतेच. पण हे शहर जुन्या काळातील आठवणीत गुंतून पडलेले नाही. ते नेहमी काळाच्या ओघाबरोबर किंवा एकादे पाऊल पुढेच राहिले आहे. एकविसाव्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्वाची कामगिरी करण्यासाठी ते सज्ज होत आहे याची साक्ष येथील इन्फोसिसचा कँपस पाहिल्यावर मिळते. शहराच्या वेशीवर असलेल्या हेब्बाळ परिसरात इन्फोसिसने आपले एक आगळेच विश्व उभे केले आहे. त्याचा विस्तार करायला भरपूर वावही ठेवला आहे. मैसूरला गेल्यावर पूर्वी पाहिलेल्या ऐतिहासिक स्थळांना पुन्हा भेट देण्याआधी या नव्या युगाच्या अग्रदूताची भेट घेतली.
सोमवार ते शुक्रवार कामात मग्न असलेल्या या कँपसला शनिवारी व रविवारी भेट द्यायची बाहेरच्या लोकांना मुभा आहे. मात्र इन्फोसिसमध्ये काम करणारा कर्मचारीच त्या दिवशी आपल्यासोबत पाहुण्यांना आंत घेऊन जाऊ शकतो. आजकालची परिस्थिती लक्षात घेता अत्यंत कडक सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. आधी गेटपाशी थांबवून प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जाते. एक सविस्तर फॉर्म भरून त्यात कर्मचा-याची आणि त्याच्या पाहुण्याची माहिती भरल्यानंतर आत प्रवेश करण्याची परवानगी मिळते. प्रत्येक पाहुण्याला तिथल्या तिथे नवा फोटोपास तयार करून दिला जातो. त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री सज्ज असते. संगणकाच्या क्षेत्रात कार्य करणा-या संस्थेला त्यात काय विशेष आहे म्हणा! पाहुण्याने त्या आवारात असेपर्यंत सतत तो पास गळ्यात अडकवून फिरायचे आणि गेटमधून बाहेर पडतांना तो परत करायचा. सर्व कर्मचारीगण आपापली ओळखपत्रे गळ्यात लटकवूनच हिंडत असतात. त्यामुळे आतला कोणताही माणूस कोण आहे हे तिथे फिरत असलेल्या सुरक्षा अधिका-याला शंका आल्यास किंवा त्याची गरज पडल्यास लगेच समजते.
ऑफीसच्या कामाशी आम्हाला कांही कर्तव्य नसल्यामुळे आम्ही सरळ मनोरंजनाच्या जागेकडे गेलो. क्लब हाउस, स्विमिंग पूल, सभागृह वगैरे सारे कांही तिथे एका विभागात बांधले आहे. त्यात एक बराच मोठा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा तरणतलाव आहे. तो नेहमीसारखा सरळसोट आयताकार चौकोनी आकाराचा स्विमिंग पूल नाही. त्यात मध्ये मध्ये ओएसिससारखी छोटी छोटी वर्तुळाकार बेटे ठेवली आहेत. त्यातील प्रत्येक बेटात लिलीच्या फुलांचे ताटवे आणि मधोमध एक लहानसे पामचे झाड लावले आहे. त्यातून मॉरिशस आणि केरळ या दोन्हींचा आभास निर्माण होतो. तलावाच्या एका बाजूला पाण्यामध्येच एक थोडेसे उंच बेट बांधले आहे. त्यातून निर्झराप्रमाणे पाणी खाली पडत असते. तलावाच्या दुस-या बाजूला एका धबधब्यातून ते बाहेर पडत असते. अशा प्रकारे पाण्याचे अभिसरण चाललेले असते आणि दिसायलाही ते दृष्य खूप सुंदर दिसते. तलावाच्या कडेला लांबलचक लाकडाच्या आरामखुर्च्या ठेवलेल्या आहेत. वाटल्यास त्यावर पाय पसरून आरामात बसून रहावे. सुटीचा दिवस असल्यामुळे त्या वेळी पूलमध्ये बरेच लोक होते. इतर दिवशी ऑफीस सुरू होण्यापूर्वी आणि सुटल्यानंतर फक्त त्या परिसरात राहणारे लोक त्याचा लाभ घेऊ शकतात. तिथली फक्त एक गोष्ट मला थोडी विचित्र वाटली. ती म्हणजे त्या तलावात खोल पाण्याचा विभागच नव्हता. या टोकापासून त्या टोकांपर्यंत तळाला पाय टेकवून चालत जाण्याइतपतच पाणी होते. पोहण्याचा तलाव म्हणण्यापेक्षा त्याला डुंबत बसण्याचे ठिकाण म्हणणे जास्त योग्य ठरेल. कदाचित अनुचित अपघात टाळण्यासाठी असे केले असेल. पण मी तरी एवढ्या मोठ्या आकाराचा एवढा उथळ तलाव कुठे पाहिला नाही. पाण्याची खोली कमी असल्यामुळे त्यात उडी किंवा सूर मारण्याला अर्थातच प्रतिबंध होता.
स्विमिंग पूलला लागूनच काटकोनी आकारात चांगले ऐसपैस दुमजली क्लब हाउस आहे. त्यात एका बाजूला पोहणा-यांसाठी शॉवर्स, चेंजरूम वगैरे आहेत. स्टीम बाथसुध्दा आहे. दुस-या कोनात खेळ आणि व्यायामासाठी अनेक आधुनिक साधनसुविधा आहेत. जिम्नॅशियममध्ये ट्रेड मिल, सायकल वगैरेसारखी हर त-हेची अत्याधुनिक यंत्रे ठेवली आहेत. त्यावर उभे राहून किंवा बसून हात, पाय, दंड, मनगट, मांड्या, पोट-या, पाठ, पोट, कंबर वगैरे शरीराच्या ज्या अवयवांच्या स्नायूंना जेवढा पाहिजे तेवढा व्यायाम देता येतो. बॅडमिंटन, टेबलटेनिस, बिलियर्ड, स्नूकर वगैरेंची कित्येक अद्ययावत कोर्टे आहेत. एका खोलीत स्क्वॅश खेळायची सोयसुध्दा आहे. कॅरम, ब्रिज यांसारखे बैठे खेळ खेळायची भरपूर टेबले आहेत. मला त्या ठिकाणी असलेली बाउलिंगची यंत्रणा सर्वात वैशिष्ट्यपूर्ण वाटली. एका वेळी आठ लोक खेळू शकतील अशी संपूर्णपणे यांत्रिक सामुग्री तिथे बसवली आहे. एका टोकाला उभे राहून बॉल टाकल्यावर दुस-या टोकाला ठेवलेल्या जितक्या पिना पडतात त्याप्रमाणे त्या खेळीचा स्कोअर इलेक्ट्रॉनिक बोर्डावर दाखवला जातो. टाकलेले बॉल एका नलिकेतून आपल्या आपण परत येतात आणि यंत्राद्वारेच सगळ्या पिना पुन्हा उभ्या करून ठेवल्या जातात. बाजूला टेनिस कोर्टे तर आहेतच.
थोडक्यात सांगायचे तर मुंबईतल्या सर्वात आधुनिक आणि सर्वात महागड्या क्लबमध्ये जितक्या सोयी उपलब्ध असतात त्या सगळ्या तिथे आहेत. त्या अगदी मोफत मिळत नसल्या तरी इन्फोसिसच्या नोकरदारांना परवडतील एवढ्या दरात त्यातील कोणीही (अचाट मेंबरशिप फी न भरता) त्यांचा लाभ घेऊ शकतो. तसेच दिवसाचा माफक आकार देऊन त्यांच्या पाहुण्यांनाही तिथे खेळता येते. इन्फोसिसची स्वतःची अशी मोठी कॉलनी त्या परिसरात नाही. कांही लोक आजूबाजूच्या भागात घरे घेऊन राहतात ते तेथे नेहमी येऊ शकतात. इन्फोसिसचे ट्रेनिंग सेंटर हे अशा प्रकारचे संपूर्ण जगात अव्वल क्रमांकाचे केंद्र आहे. या केंद्रामध्ये येणा-या प्रशिक्षणार्थींसाठी मोठमोठी हॉस्टेल्स आहेत त्यात नेहमीच कांही हजार विद्यार्थी थोड्या थोड्या काळासाठी येऊन रहात असतात. ते सर्वजण या सुविधांचा पुरेपूर उपयोग करून घेतात. त्यांना कोणत्याही कामासाठी मुख्य शहरात जायची गरजच पडू नये इतक्या सर्व सुखसोयी त्यांना कँपसमध्येच दिल्या जातात. त्यात त्यांच्या क्रीडा आणि मनोरंजनाकडे विशेष लक्ष दिले गेले आहे.
क्लबहाऊसहून जवळच एक प्रचंड चेंडूच्या आकाराची बिंल्डिंग आहे. त्याला बाहेरच्या बाजूने अननसासारखे शेकडो खवले केले असून ते संपूर्णपणे कांचांनी मढवले आहेत. बाहेरून पाहिल्यावर ती एक इमारत आहे असेच वाटत नाही आणि त्या इमारतीच्या आंत काय असेल याची तर कल्पनाही करता येत नाही. ते एक मल्टिप्लेक्स आहे. त्याच्या आंत निरनिराळ्या आकारांची सभागृहे आहेत. लहान हॉलमध्ये शैक्षणिक चित्रपट, स्लाईड शो वगैरे दाखवले जातात तर मोठ्या सभागृहात शनिवारी व रविवारी हिंदी, इंग्रजी किंवा कानडी सिनेमेसुध्दा दाखवले जातात आणि पाहुणे मंडळी ते पाहू शकतात. बाजूलाच सुसज्ज असे ग्रंथालय, वाचनालय वगैरे आहेत. त्यात संगणकावरील आणि तांत्रिक विषयावरील सर्व पुस्तके आहेतच, शिवाय चांगल्या साहित्यकृतीसुध्दा उपलब्ध आहेत. रोम येथील कॉलेसियमची आठवण करून देणारे एक वर्तुळाकृती वास्तुशिल्प सध्या आकार घेत आहे. तिच्या बाहेरच्या बाजूला प्रत्येक मजल्यावर कोलेसियमप्रमाणेच खांब व कमानीच्या रांगा बांधल्या आहेत. या इमारतीत शैक्षणिक केंद्र सुरू करण्याची योजना आहे.
एका वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण आकाराच्या इमारतीत तरंगते उपाहारगृह (फ्लोटिंग रेस्तरॉं) आहे. त्यात जाऊन दुपारचे जेवण घेतले. सूपपासून स्वीट डिशेसपर्यंत परिपूर्ण असे सुग्रास व चविष्ट भोजन तिथे मिळाले. एकाद्या मोठ्या हॉटेलच्या रेस्तरॉंमध्ये ठेवतात त्या प्रमाणे विविध प्रकारची सॅलड्स, दोन मांसाहारी पदार्थ, दोन तीन प्रकारच्या भाज्या, दोन प्रकारचे भात, नान, पराठे, पापड, फळफळावळ, केकचे प्रकार, आइस्क्रीम वगैरे सगळे कांही तिथे मांडून ठेवले होते आणि 'आपला हात जगन्नाथ' पध्दतीने त्यावर मनसोक्त तांव मारायला मुभा होती. त्या मानाने त्याचे शुल्क यथायोग्य होते. रोज रोज अशी भरपेट मेजवानी खाल्ल्यानंतर इथले लोक काम कसे करतात असा विचार मनात आला. पण रोज जेवणासाठी त्या भोजनगृहात जाण्याइतका वेळच दिवसा तिथे कोणाला नसतो. त्यासाठी वेगळी फूडकोर्ट आहेत. त्या जागी झटपट थाळी मिळण्याची व्यवस्था आहे. मात्र प्रत्येकाला जेवणासाठीच नव्हे तर चहा, कॉफी किंवा अल्पोपाहारासाठी जवळच्या फूडकोर्टवरच जावे लागते. कॅटीनमधून कांहीही 'मागवण्याची' सोय उपलब्ध नाही.
प्रशिक्षणार्थींच्या निवासाची जशी कँपसवरच सोय केलेली आहे त्याचप्रमाणे पाहुण्यांसाठी अतिथीगृहांची भरपूर व्यवस्था आहे. इन्फोसिसच्या इतर शाखामधून अनेक लोक निरनिराळ्या कामासाठी इथे येतच असतात. त्यांना दूर शहरात राहून तिथून रोज कामासाठी इथे येण्यापेक्षा इथेच राहणे निश्चितच सोयीचे पडते. नवी नेमणूक झालेल्या सर्वच कर्मचा-यांना पहिले आठवडाभर राहण्याची जागा इथे उपलब्ध करून देतात. त्यामुळे गांवात जागा पाहण्यासाठी त्यांना थोडा अवधी मिळतो. तीन चार महिन्यांसाठी इथल्या हॉस्टेलवर येऊन रहात असलेल्या लोकांचे आई वडील त्यांना भेटायला आले तर त्यांना एक दोन दिवस रहाण्यासाठी गेस्टहाउसमध्ये जागा मिळते. अशा प्रकारे इन्फोसिस ही एक काळजी घेणारी संस्था आहे असे मत लोकांमध्ये पसरावे हा उद्देश त्यामागे असावा. संचालक मंडळाचे सदस्य, उच्चपदस्थ अधिकारी, विशेष अतिथी वगैरे खास लोकांसाठी सुंदर बंगले व सूट ठेवले आहेत. त्यांची सर्व व्यवस्था तिथे केली जाते. निवासस्थाने व अतिथीगृहांच्या इमारतीसुध्दा वैशिष्ट्यपूर्ण आकारांच्या आहेत. विहंगम दृष्यात त्यातून INFOSYS अशी अक्षरे दिसतात. मैसूरला सध्या तरी विमानतळ नसल्यामुळे आकाशात स्वैर भ्रमण करणारे विहंगच ते पाहू जाणे. ती पाहण्यासाठी आपल्याला किमान हॅलिकॉप्टरमध्ये बसून उड्डाण करावे लागेल. मात्र थेट उपग्रहामार्फत काढलेली छायाचित्रे आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे घरबसल्या आपण पाहू शकतो.
चार पांच मोठमोठ्या इमारतींमध्ये सध्या ऑफीसे थाटलेली आहेत. यातली कुठलीच बिल्डिंग कॉंक्रीटच्या चौकोनी ठोकळ्यासाठी दिसत नाही. निरनिराळ्या भौमितिक आकारांचा अत्यंत कल्पक व कलात्मक उपयोग करून तसेच त्यात काम करणा-यांच्या सोयीचा विचार करून या वास्तुशिल्पांची रचना केली आहे. त्या बांधतांना त्यात अत्याधुनिक स्थापत्यशास्त्राचा आणि नव्या साधनसामुग्रीचा सढळ हाताने उपयोग केला गेला आहे. अशा प्रकारच्या इमारती भारतात फारशा दिसत नाहीत. त्या भागात फिरतांना आपण एकाद्या प्रगत देशात असल्यासारखे वाटते. इन्फोसिसने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले महत्वाचे स्थान मिर्माण केले आहे त्याला हे साजेसेच आहे.
या बाबतीत मी एक वदंता ऐकली. एका विकसनशील देशाचे कांही इंजिनियर या जागी संगणकाचे प्रशिक्षण घ्यायला आले. त्यांनी इथला कँपस पाहून घेतला आणि त्याचा त्यांच्यावर एवढा परिणाम झाला की मायदेशी गेल्यावर त्यांनी आपला पेशाच बदलला. संगणकप्रणालीवर काम करण्याऐवजी ते वास्तुशिल्प, नगररचना यांसारख्या विषयांवर काम करू लागले आणि त्यांच्या देशात अशा जागा निर्माण करू लागले. त्यात त्यांना भरघोस यश आणि संमृध्दीसुध्दा मिळाली म्हणे.

No comments: