Thursday, July 24, 2008

पूजा आणि व्यापार


आपल्याकडे नव्या दुकानाचे उद्घाटन हमखास देवाची पूजा करून व नारळ फोडून होते. किंबहुना 'नारळ फोडणे' या वाक्प्रचाराचा अर्थच 'नव्याने सुरुवात करणे' असा झाला आहे. व्यापारी वर्षाच्या सुरुवातीला धूमधडाक्याने लक्ष्मीपूजन केले जाते. इतर अनेक प्रसंगीसुद्धा परंपरागत विधीने पूजा अर्चा करून ते साजरे केले जातात. व्यापारातील नफ्यातोट्याच्या अनिश्चिततेमुळे व्यापार व्यवसाय करणारे लोक नोकरदारांच्या मानाने अधिकच श्रद्धाळू वृत्तीने व सढळ हाताने पूजापाठ, नवससायास करतांना दिसतात. हे करतांना अर्थातच आपली भरभराट होवो, आपले उत्पन्न आणि संपत्ती यामध्ये भरघोस वाढ होवो अशी प्रार्थना ते करतातच. यासाठी ते आपल्या प्राप्तीमधला कांही भाग खर्च करतात. पण पूजाविधी हेच प्राप्तीचे एक साधन बनवण्याची कल्पना कांही सुपीक डोक्यांत आली.


तशी ती कांही अगदी नवी कल्पना नाही. प्रत्येक देवस्थानांच्या दारात फुले, हार, नारळ, उदबत्त्या वगैरे विकून त्यावर उदरनिर्वाह करणा-या लोकांची झुम्मड उडालेली आपण पाहतोच. त्यांना "नको नको" म्हणत देवळात प्रवेश करतांना नाकी नऊ येतात. पण घरी होणा-या धार्मिक समारंभांची गोष्ट जरा वेगळी आहे.
माझ्या लहानपणच्या काळात खेडोपाड्यात रहाणा-या लोकांच्या घरातल्या देवांची रोज साग्रसंगीत पूजा करायची प्रथा होती. त्यामुळे त्यासाठी लागणा-या सर्व वस्तू देवघरात नेहमीच ठेवलेल्या असायच्या. स्वयंपाकासाठी लागणा-या वस्तूंचेही साठवण घरी केलेले असायचे. तुळस, दुर्वा, फुले वगैरे ज्याच्या त्याच्या अंगणात नाहीतर परसात मिळायच्या. त्यामुळे सत्यनारायणासारख्या पूजेसाठी खास बाजारहाट करण्याची गरज पडायची नाही.


मुंबईच्या धांवपळीच्या जीवनात दैनिक देवपूजेचा संकोच झाला. तसेच जागेच्या टंचाईमुळे रोजच्या जीवनाला आवश्यक तेवढ्याच गोष्टी घरात ठेवता येतात. चाळीत किंवा फ्लॅटमध्ये रहात असलेले लोक अंगणातली पानेफुले कोठून आणणार? एकत्र कुटुंबपद्धत जाऊन विभक्तपणे राहण्यामुळे कुठल्या विधीसाठी काय काय लागते हे सांगणारी वडीलधारी माणसे घरी नसतात. या सगळ्या कारणांनी सत्यनारायण, हरतालिका, मंगळागौर, गृहप्रवेश अशी एखादी खास पूजा करायची असल्यास त्यासाठी चांगली पूर्वतयारी करावी लागते. शहरातल्या लोकांच्या हातात ब-यापैकी क्रयशक्ती असल्याने अशा ग्राहकांचा एक वर्ग निर्माण झाला आहे.


साहजीकच या ग्राहकवर्गाला लागणारे सामान पुरवणारे व्यापारी पुढे आले. नुकताच मी एका ठिकाणी गेलो होतो. त्यांनी सत्यनारायणाच्या पूजेचा 'किट' विकत आणला होता. त्यात पूजाविधीसाठी लागणा-या एकोणीस वस्तू पुठ्ठ्याच्या एका सुबक चौकोनी डब्यात पॅक केल्या होत्या. त्या शिवाय बाहेरून आणावयाच्या वस्तूंची यादी त्यावर छापलेली होती. डब्यावरच सत्यनारायणाचे सुंदर चित्र दिले होते. ते पूजेच्या चौरंगावर कलशाच्या मागे उभे करून ठेवायचे.


योगायोगाने त्याच दिवशी व्यापार उद्यम या विषयाला वाहिलेल्या एका नियतकालिकात एका आगळ्या उद्योजकाची माहिती वाचायला मिळाली. त्याचे नांव आहे प्रकाश मुंदडा. या तरुण उद्योजकाने पुण्याच्या सिंबॉयसिस मधून मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये एम् बी ए ची पदवी घेतली. ते शिक्षण सुरू असतांनाच त्यांनी कांही स्पर्धांमध्ये भाग घेतला व आपल्या कल्पकतेच्या जोरावर व्यापारक्षेत्रात अभूतपूर्व अशा संकल्पना मांडून पारितोषिके मिळवली. लठ्ठ पगाराच्या नोक-या त्यांच्याकडे चालून आल्या होत्या, पण त्यांना स्वतःचा उद्योग स्थापन करून तो बहराला आणायचा होता.


स्पर्धांसाठी प्रबंध लिहीत असतांनाच यथासांग पूजाविधी करू इच्छिणा-या सधन कुटुंबातील व्यक्ती ही नवी बाजारपेठ त्यांच्या दृष्टीस पडली. तिच्या गरजा व आवडी निवडी यांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. अशा प्रकारच्या ग्राहकांचा गुणवत्तेवर कटाक्ष असतो, देवा धर्माच्या बाबतीत कसलीही चूक केलेली त्यांना चालत नाही, त्यांना सुटसुटीत आकाराच्या पण आकर्षक दिसणा-या वस्तू घ्यायला आवडतात. या सगळ्यासाठी किंमत मोजावयाची त्यांची तयारी असते. स्वतः श्रद्धाळू नसूनसुद्धा श्री.मुंदडा यांनी विविध पूजाविधींचा बारकाईने अभ्यास करून त्यातील अगदी तेलातुपापासून जास्तीत जास्त किती वस्तू आपल्याला व्यवस्थित पॅक करून पुरवता येतील ते ठरवले आणि 'ब्लेसिंग्ज' या नांवाखाली आपला पूजासामानाचा संच बाजारात आणला. हे संच घरोघर पोचायला वेळ लागेल हे पाहून त्यांनी एकदम मोठमोठ्या व्यापारी संस्थांच्या संचालकांना गाठले आणि दिवाळीसाठी एक अभिनव भेटवस्तू म्हणून हे संच देण्याची कल्पना त्यांना पटवून दिली. यामुळे त्यांची विक्री एकदम लक्षावधीच्या घरात गेली, इतकेच नव्हे तर त्यांची उत्पादने थोरामोठ्यांच्या घराघरात जाऊन पोचली. आता हिंदूंच्या वेगवेगळ्या धार्मिक विधींसाठी तसेच इतर धर्मीयांना लागणा-या वस्तूंचे वेगवेगळे संच बनवण्याच्या योजना त्यांच्या मनात आहेत.

No comments: