Tuesday, July 22, 2008

अजब ही टक्केवारी


पूर्वापारपासून आपल्याकडे १६ आण्यांचा एक रुपया असायचा. त्या काळात "१६ आणे खरे", "१२ आणे काम फत्ते झाले", "फक्त ८ आणे शक्यता आहे", "४ आणे सुद्धा पीक आले नाही", "एका पैशाएवढा विश्वास नाही" अशा प्रकारचे शब्दप्रयोग सर्रास वापरात होते. त्याचा अर्थ सगळ्यांना लगेच कळायचा. दशमान पद्धती सुरू झाल्यावर १६ आण्यांपासून एकदम १०० पैशांचा रुपया झाला आणि टक्केवारीत सांगणे सुरू झाले. मात्र ३७.७९ टक्के आणि ८६.५७ टक्के असे मोठे आकडे दिल्यावर त्यातला नेमका फरक सर्वसामान्य माणसाला चटकन समजत नाही. यामुळेच आकडेवारीबरोबरच चार्ट दिले जातात. त्यातील स्तंभांच्या आकारमानावरून अधिक बोध होतो. सामान्य माणसाला बुचकळ्यात पाडणारे दोन किस्से खाली दिले आहेत.

----------------------------------------------------------------------


पहिला किस्सा


एक माणूस घरोघरी जाऊन टोमॅटोचा सॉस विकत होता. लोकांनी त्याला विचारले, "हा सॉस शुद्ध आहे कां?"
त्याने सांगितले, " मी खोटे बोलणार नाही. यात ९०% टोमॅटो आणि १०% इतर खाद्यपदार्थ आहेत पण मी तुमच्याकडून बाजारभावाच्या फक्त ८०% किंमत घेत आहे. म्हणजे त्यात तुमचा फायदाच आहे." त्याच्या कडील सर्व बाटल्या एकाच दिवशी खपल्या.
दुसरे दिवशी सकाळी नाश्त्याच्या वेळी लोकांनी सॉसची चव घेऊन पाहिली ती विचित्रच लागत होती. पण तो विक्रेता पुन्हा त्या बाजूला फिरकलाच नाही. एका माणसाने त्याला शहराच्या दुस-या भागात फिरतांना पाहिले आणि पकडले. तो पुन्हा म्हणाला, "देवाशप्पथ सांगतो, यांत ९० टक्के टोमॅटो आहेत. खोटे वाटत असेल तर माझ्याबरोबर कारखान्यात चला."
दोघे कारखान्यात गेले. तिथे एक माणूस यंत्रामध्ये कच्चा माल टाकत होता. मोजून नऊ टोमॅटो आणि एक भोपळा. ९०% टोमॅटो आणि १०% भोपळा!!!

-----------------------------------------------------------------------

दुसरा किस्सा


हा किस्सा गणितात हमखास शंभर टक्के गुण मिळवणा-या लोकांनी वाचला नाही तरी चालेल. आज गणिताचा पेपर आहे म्हणून ज्यांच्या छातीतली धडधड थोडी वाढत असेल त्यांनी अवश्य वाचावा.
चार मित्र दर रविवारी एकत्र जमून पत्ते कुटायचे. एका नव्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांना असे वाटले की नवीन वर्षात आपला कंपू वाढवावा, महिन्यातून एक दिवस पत्ते खेळण्याचे ऐवजी साहित्य, संगीत, कला वगैरे विषयावर अवांतर गप्पा माराव्या वगैरे. त्या पुढच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी प्रत्येकाने आपापल्या दोन तीन जवळच्या मित्रांना घेऊन यायचे असे ठरले.
ठरल्याप्रमाणे चौघांनीही आपापल्या मित्रांना बरोबर आणले. त्यामुळे उपस्थितीत एकदम ३०० टक्के वाढ झाली. इतक्या लोकांची नीट सोय करणे कठिणच होते आणि एकंदरीत गोंधळ उडाला. त्यामुळे मार्च महिन्यात उपस्थिती ७५ टक्क्यांनी कमी झाली. पुन्हा प्रयत्न करून त्यांनी एप्रिल महिन्यात उपस्थिती १५० टक्क्यांनी वाढवली. या वेळेस नीट व्यवस्था झाली असली तरी चर्चेविषयी कुणीच तयारी करून आले नव्हते. त्यामुळे ती फारशी रंगली नाही. त्याचा परिणाम असा झाला की मे महिन्यात उपस्थितीत ६० टक्क्यांची घट झाली.
त्यानंतर जून मध्ये १०० टक्क्यांनी वाढली ती जुलै मध्ये ५० टक्क्यांनी कमी झाली. ऑगस्ट मध्ये ५० टक्के वाढ, सप्टेंबर मध्ये ३३ टक्के घट, ऑक्टोबर मध्ये २५ टक्के वाढ तर नोव्हेंबरमध्ये २० टक्के घट झाली. डिसेंबर महिन्यात कांहीच फरक न पडता उपस्थिती पूर्वीच्या आंकड्यावर स्थिरावली.
वर्षभराचा आढावा घेतला तर असे दिसेल की उपस्थितीमध्ये ३००, १५०, १००, ५० आणि २५ टक्क्यांनी वाढ झाली तर ७५, ६०, ५०, ३३ आणि २० टक्के घट झाली. एकंदर ६२५ टक्के वाढ आणि २३८ टक्के घट म्हणजे त्यांचा ग्रुप ब-यापैकी वाढला असेल नाही कां? नव्या वर्षाच्या सुरुवातीला तो केवढा मोठा झाला असेल ?
.
.
कसचं काय? ज्या चार लोकांनी सुरुवात केली होती तेवढेच शिल्लक राहिले होते. बाकीचे मित्र मध्यंतरी येऊन गेले पण त्यातले कोणीच स्थिरावले नाहीत. वर्षभरातील उपस्थितीची संख्या अनुक्रमे ४,१६,४,१०,४,८,४,६,४,५,४ आणि ४ अशी होती.

1 comment:

आशा जोगळेकर said...

अजब खरीच .