Wednesday, July 02, 2008

उद्यान नगरी मैसूर


मी शाळेत असतांना शांतारामबापूंचा 'झनक झनक पायल बाजे' हा आगळा वेगळा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत व नृत्य यांना केंद्रस्थानी ठेऊन निर्माण केलेल्या या सिनेमातील कांही दृष्यांचे चित्रीकरण 'म्हैसूरच्या वृंदावन गार्डन'मध्ये केले होते आणि "ती दृष्ये पाहतांना प्रत्यक्ष स्वर्गलोक पहात असल्यासारखे वाटते." अशी त्याची तारीफ ऐकल्यामुळे "म्हैसूर म्हणजे वृंदावन गार्डन आणि म्हणजेच स्वर्ग " असे एक समीकरण डोक्यात फिट झाले होते. पुढे अनेक हिंदी चित्रपटात वृंदावन गार्डनमध्ये चित्रित केलेली गाणी सर्रास दिसू लागल्यामुळे आणि वृंदावनाच्या छोट्या आवृत्या गांवोगांवी तयार झाल्यानंतर त्याची एवढी नवलाई राहिली नाही. कालांतराने "स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही." ही म्हण ऐकली आणि त्याही पुढच्या काळात 'स्वर्ग ही प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेली एक निव्वळ कविकल्पना आहे' याचा बोध झाला. यामुळे त्या समीकरणातून 'स्वर्ग' बाहेर गेला, पण 'म्हैसूर शहर' आणि 'वृंदावन गार्डन' ही सुध्दा दोन वेगवेगळी ठिकाणे आहेत हे मात्र त्या जागांना भेट दिल्यानंतरच समजले.
मैसूरपासून सतरा अठरा किलोमीटर अंतरावर कावेरी नदीवर एक मोठे धरण पाऊणशे वर्षांपूर्वी तत्कालीन मैसूरचे राजे कृष्णराजा यांनी बांधवले आहे. प्रख्यात इंजिनियर स्व.मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांनी बांधलेले हे धरण त्या काळात भारतात तर अद्वितीय असे होतेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या धरणांत त्याची
गणना केली जात होती. त्याच्या जलाशयाला कृष्णराजसागर (के आर एस) असे नांव दिले आहे. यातून उपलब्ध झालेला मुबलक पाणीपुरवठा, निर्माण होणारी वीज आणि धरणाच्या बांधकामासाठी तयार केलेली मोकळी जागा यांचा अत्यंत कलात्मक रीतीने उपयोग करून घेऊन त्या ठिकाणी वृंदावन गार्डन या विशाल उद्यानाची निर्मिती केली गेली. अल्पावधीतच त्याची कीर्ती चहूकडे पसरली आणि ते एक पर्यटकांचे अत्यंत आवडते आकर्षण बनले. जगभरातून लक्षावधी पर्यटक ही बाग पहाण्यासाठी मैसूरला येत असतात. कर्नाटक सरकारनेही या उद्यानाची उत्तम निगा राखली आहे आणि त्याचे आकर्षण टिकवून धरण्याच्या दृष्टीने नवनवीन तंत्रज्ञानाचा कुशलतेने उपयोग करून घेतला आहे. बागेमध्ये हजारोंच्या संख्येने त-हेत-हेची सुंदर फुलझाडे आहेतच, त्यातून झुळूझुळू वाहणारे पाण्याचे झरे, लहान लहान धबधबे,संगीताच्या तालावर नाचणारे शेकडो लहान मोठे कारंजे आणि त्यांच्या फवा-यावर व उडणा-या शिंतोड्यावर पडणारे बदलत्या रंगांचे प्रकाशझोत यांतून एक अद्भुत असे दृष्य निर्माण होते. त्याचा अनुभव प्रत्यक्ष पाहूनच घ्यायला हवा.
अनुपम असे हे वृंदावन गार्डन मैसूर शहराच्या हद्दीच्या बाहेर दूर अंतरावर आहे म्हणून बाजूला ठेवले तरीसुध्दा मैसूर शहराला मिळालेली उद्याननगरी (गार्डन सिटी) ही उपाधी सार्थ ठरेल इतकी मुबलक हिरवाई या शहरात सगळीकडे आहे. मुख्य राजवाड्याच्या सभोवती खूप मोठी रिकामी जागा आहेच, इतर राजवाड्यांच्या आजूबाजूलाही प्रशस्त मोकळ्या जागा आहेत आणि त्यात विस्तीर्ण हिरवीगार लॉन्स केलेली आहेत, तसेच अनेक त-हेची फुलझाडे व शीतल छाया देणारे वृक्ष लावलेले आहेत. महानगरपालिका, इस्पितळे, महाविद्यालये, मोठ्या बँका वगैरे सार्वजनिक महत्वाच्या सर्वच मोठ्या इमारतींच्या आसमंतात लहान मोठे बगीचे आहेतच. पुणे विद्यापीठाच्या परिसरातल्या विशाल मोकळ्या जागेचे मला खूप कौतुक वाटत आले आहे. मैसूर युनिव्हर्सिटीचे आवार आकाराने कदाचित तितके विशाल नसले तरी त्यातली वनराई मला जास्त गडद आणि नयनरम्य वाटली. मैसूर येथील सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट या केंद्र सरकारच्या संस्थेच्या आवारातली झाडी इतकी घनदाट आहे की त्याच्या कुंपणालगत वळसा घेत जाणा-या रस्त्यावरून आतल्या इमारती दिसतही नाहीत. मैसूरच्या प्राणीसंग्रहाला झूलॉजिकल गार्डन किंवा पार्क असे म्हणतात. मी आपल्या आयुष्यात जे चार पांच झू पाहिले असतील त्यातला फक्त मैसूरचाच वैशिष्ट्यपूर्ण झू माझ्या स्मरणात राहिला आहे. या वन्यप्राणिसंग्रहालयात शाकाहारी प्राण्यांसाठी मुक्तपणे गवतात चरत फिरण्यासाठी हिरवी कुरणे आहेत आणि वाघसिंहादि हिंस्र पशूंनासुध्दा पिंज-यात डांबून ठेवलेले नसते. आपले पाय मोकळे करण्यासाठी सुरक्षित कुंपण घातलेल्या मोकळ्या जागा त्यांच्यासाठी ठेवल्या आहेत. फक्त स्वतः शिकार करून ती खाण्याची व्यवस्था मात्र करता येण्यासारखी नाही. या ठिकाणी जितके पशू असतील त्याच्या अनेक पटीने वृक्षवल्ली लावलेल्या आहेत. नांवाप्रमाणे तोसुध्दा एक छान आणि मोठा बगीचा आहे. राणीबागेसारखी तिथे नुसती नांवापुरती बाग नाही.
जुन्या शहराच्या गजबजलेल्या वस्त्यांमध्ये इतर शहरांप्रमाणेच एकाला लागून एक अशी घरे दाटीवाटीने बांधलेली आहेत, त्यामुळे त्यात वृक्षांना वाढायला फारसा वाव नाही. पण थोड्या थोड्या अंतरावर सार्वजनिक बागा, उद्याने वगैरे बनवलेली दिसतात. मोठ्या हमरस्त्यावर दुतर्फा झाडे त्या भागातसुध्दा दिसतातच. शहराचा विस्तार होतांना वाणीविलास मोहल्ला, जयलक्ष्मीपुरम, गोकुलम, विजयनगर आदि नव्या वस्त्या वसवण्यात आल्या आहेत. यात मात्र अनेक छोटे छोटे वेगवेगळे प्लॉट्स आहेत. त्यातल्या कांहींमध्ये जुनी बैठी कौलारू घरे आणि कांहींमध्ये दुमजली टुमदार बंगले यांचे मिश्रण आहे. चार पांच मजल्यांचे चौकोनी ठोकळ्यांच्या आकाराचे ब्लॉक्स अधून मधून दिसू लागले आहेत, पण मला तरी गगनचुंबी इमारती गांवात कुठेच दिसल्या नाहीत. कदाचित अन्य कोठलीही वास्तू राजवाड्याहून
उंच असता कामा नये हा जुना संकेत अजून पाळला जात असेल. या सर्वच एक किंवा दोन मजली घरांच्या व बंगल्यांच्या आजूबाजूला मोकळ्या जागेत भरपूर झाडे लावलेली दिसतात. त्यात कुठे नारळाची किंवा अशोकाची जवळजवळ लावलेली उंच झाडे किंवा गुलमोहराची दूर दूर लावलेली झाडे प्रामुख्याने दिसतात. कांही लोकांनी केळ्यासारखी उपयुक्त झाडे लावलेलीही दिसतात. त्याखेरीज सुंदर आणि सुवासिक फुलांनी बहरलेली फुलझाडे किंवा वेली तर जागोजागी आहेतच. बहुतेक कुंपणांवर रंगीबेरंगी फुलांच्या बोगनवेलींचे आच्छादन घातलेले दिसते.
या सुनियोजित भागांत चांगले रुंद आणि सरळ रेषेत एकमेकांना समांतर किंवा काटकोनात जाणारे रस्ते आहेत. त्यांवर सगळीकडे दुतर्फा झाडे लावलेली आहेत. नारळ व गुलमोहरांशिवाय इतर प्रकारची मोठी झाडेही आहेत. अधून मधून दिसणा-या देवळांच्या आसपास पिंपळाचे डेरेदार वृक्ष आहेत. मधूनच एकादे आंब्याचे झाडसुध्दा दिसते. दर दोनतीनशे मीटर अंतरांवर एक तरी मोकळा प्लॉट उद्यानासाठी खास राखून ठेवलेला आहे, त्यातल्या ब-याचशा प्लॉटवर बगीचे तयार केलेही आहेत. त्यात लहान मुलांसाठी घसरगुंड्या, झोपाळे वगैरे चांगल्या अवस्थेत राखले आहेत, तसेच प्रौढांसाठी जॉगिंग ट्रॅक्स आवर्जून सगळीकडे ठेवलेले आहेत. यामुळे सायंकाळी हे पार्क मुलांनी व माणसांनी गजबजलेले असतात. यातल्या बहुतेक उद्यानांची निगा खाजगी संस्था राखत असाव्यात कारण त्यांची नांवे प्रवेशद्वारापाशी दिसतात. एका अर्थी हे प्रायोजित पार्क आहेत. आमच्या घरापासून पांच ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर असे तीन चार वेगवेगळे पार्क आहेत. वीस पंचवीस मिनिटांच्या अंतरावर असलेला चेलुअम्बा पार्क तर अर्धा पाऊण किलोमीटरपर्यंत पसरला आहे. त्यात एका वेळेस निदान तीन चारशे माणसे तरी येऊन बसत किंवा फिरत असतील, पण तरीही त्यांची गर्दी वाटत नाही.
इथे आल्यावर सकाळी इतके प्रसन्न वातावरण असते की घरी बसवतच नाही. पोचल्याच्या दुस-याच दिवशी सकाळी फेरफटका मारायला बाहेर पडलो. रस्त्यावर कुठे गुलमोहराच्या लाल केशरी पाकळ्यांच्या पायघड्या घातलेल्या दिसत होत्या तर मध्येच एकाद्या जागी प्राजक्ताच्या फुलांचा सुगंधी सडा पडलेला. आजूबाजूच्या बंगल्यातल्या विविध सुवासिक फुलांचा मंद मंद सुगंध एकमेकांत मिसळत होता. एकदम मागच्या बाजूने एक छानशा सुवासाची झुळुक आली आणि तिच्या पाठोपाठ "हूवा मल्लिगे.... (फुलांच्या माळा).... " अशी लकेर आली. मागे वळून पाहिले तर एक मुलगा सुवासिक फुलांच्या माळांनी भरलेली चपट्या आकाराची वेताची पाटी सायकलच्या हँडलवर ठेऊन ती हळू हळू बेताने तोल सांभाळत चालवत येत होता. थोड्या वेळाने एक बाई डोक्यावर फुलांची पाटी घेऊन माळा विकत जातांना दिसली. सकाळच्या वेळी घरोघरी रतीब घालणारे दूधवाले आणि पेपरवाले रस्त्यात हिंडतांना सगळ्याच शहरात दिसतात. पण फुलांचे गजरे आणि माळा घेऊन विकण्यासाठी फिरणारी मुले आणि स्त्रिया मैसूरलाच मी पाहिल्या. त्यांच्या परड्यांमधली फुले दुपारपर्यंत कोमेजून जात असतील, पण ते घालत असलेली "हूवा मल्लिगे...." ही साद दीर्घकाळपर्यंत माझ्या लक्षात राहील.

No comments: