Saturday, July 19, 2008

मेघदूत


मालविकाग्नीमित्र, विक्रमोर्वशीय आणि अभिज्ञानशाकुंतल ही तीन नाटके आणि अस्ति, कश्चित आणि वागार्थः या तीन शब्दांनी सुरू होणारी कुमारसंभव, मेघदूत आणि रघुवंश ही तीन दीर्घकाव्ये कालिदासाने लिहिली. त्याच्या तीनही नाटकांमध्ये त्यांमधील कथेला अनुसरून अनेक रोचक किंवा मनोरंजक प्रसंग त्याने अनुपम कौशल्याने रंगवले आहेत. रघुवंश या महाकाव्यात राघवाच्या (श्रीरामाच्या) वंशातल्या अनेक पिढ्यांमध्ये होऊन गेलेल्या सम्राटांची चरित्रे आहेत. शंकर आणि पार्वती यांच्या प्रेमाच्या कहाण्या कुमारसंभव या महाकाव्यात आहेत. त्यात दक्षकन्या उमा आणि हिमालय पर्वताची पुत्री गिरिजा किंवा पार्वती अशा दोन जन्मात तिने केलेली शंकराची खडतर आराधना, महादेवाने तिचा स्वीकार करणे, त्यांचे मीलन आणि कार्तिकेयाचा जन्म याची सुरस कथा आहे. मेघदूत हे काव्य मात्र या सर्वांहून वेगळे आहे. सांगण्यासारखी कथा अशी या खंडकाव्यात नाही.
कुबेराची सेवा करणारा एक यक्ष आपल्या प्रिय पत्नीच्या प्रेमात (किंवा बाहुपाशात) इतका गुरफटलेला असतो की त्यामुळे त्याच्या हातून धन्याच्या सेवेत अक्षम्य कुचराई होते. त्याच्या अशा उद्दंडपणाच्या वर्तनामुळे कुबेर संतापतो आणि त्या यक्षाला वेगळ्याच प्रकारची शिक्षा देतो. त्या शिक्षेप्रमाणे एक वर्षभर त्याने दूर रामगिरीवरील आश्रमात रहायचे आणि त्याच्या पत्नीने मात्र हिमालयातील यक्षांच्या अलकानगरीतील घरी रहायचे अशी आज्ञा त्याला होते. असल्या 'पनिशमेंट पोस्टिंग'वर गेलेला बिचारा यक्ष पत्नीचा विरह मोठ्या कष्टाने कसाबसा सहन करत असतो. गोष्टीची ही सगळी पार्श्वभूमी मेघदूताच्या पहिल्या श्लोकात सांगून टाकली जाते.
कश्चित्कान्ताविरहगुरूणा स्वाधिकारात्प्रमत्तः शापेनास्तङ्गणितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः ।
यक्षश्चक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु स्निग्धच्छायातरूषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ।। १ ।।

जानकीने (सीतेने) या जागी स्नान केल्यामुळे पावन झालेल्या जलाशयाच्या कांठावरील स्निग्ध छाया देणाऱ्या वृक्षराजीमध्ये तो आश्रम आहे असे रामगिरी येथील आश्रमाचे काव्यमय वर्णन कालिदासाने या श्लोकात केले आहे. एवढी प्रस्तावना करून कालिदास मुख्य मुद्यावर येतो.

तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः ।
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।।

पत्नीच्या विरहाच्या वेदनेने यक्ष दिवसमास खंगत असतो आणि त्याच्या सुकलेल्या दंडावरील सोन्याची वलये खाली ओघळत असतात. अशा कृष्ट अवस्थेत असतांना आषाढ महिन्याच्या प्रतिपदेला त्याला आभाळ काळ्या ढगांनी दाटलेले दिसते. त्या मेघराजाला पाहताच तो मीलनोत्सुक आणि मदोन्मत्त असा हत्ती आहे असा भास त्याला होतो आणि त्याच्या मनातली प्रियेबद्दल वाटणारी आसक्ती उफाळून वर येते. उन्हाळ्याची रखरख संपून पावसाळी ढगाळ वातावरण निर्माण होताच त्या यक्षाला आपल्या पत्नीची जास्तच प्रकर्षाने आठवण येते. कांही करून आपण तिच्याबरोबर संपर्क साधलाच पाहिजे असे त्याला तीव्रतेने वाटू लागते. पण तो काय करू शकणार होता? त्या काळात सेल फोन, एसटीडी, आयएसडी, इंटरनेट चॅटिंग, ईमेल, फेसबुक, वॉट्सअॅप असले कांही नव्हते. चिठ्ठी नेऊन पोचवणारा पोस्टमन नव्हता. सांडणीस्वार, संदेशवाहक कबूतरे वगैरे साधने एका यःकश्चित सेवकाला परवडणारी नव्हती आणि असली तरी त्यांची रेंज हिमालयापर्यंत असणार नाही. अशा अवस्थेत आकाशमार्गे उत्तरेच्या दिशेने जात असलेल्या मेघाला पाहून यक्षाच्या मनात आशेचा किरण फुटला. "हा निर्जीव वाफेचा पुंजका मला काय समजून घेणार आहे आणि माझा कोणता संदेश घेऊन जाणार आहे? " असली शास्त्रीय शंका त्याच्या हळुवार मनाला शिवली नाही कारण "मदनबाणांनी विध्द झालेल्या पुरुषाची विवेकबुध्दी जागेवर नसते." असे कालिदासानेच पुढे नमूद केले आहे.

त्यामुळे असला रुक्ष विचार करत न बसता त्या मेघालाच दूत ठरवून आपले मनोगत त्याच्यापुढे व्यक्त करायचे आणि हा संदेश अलकापुरीमध्ये रहात असलेल्या आपल्या प्रियपत्नीला पोचवण्याची विनंती त्याला करायची असे तो यक्ष ठरवतो. आधी त्या मेघाची तोंडभर स्तुती करून त्याला आपला मित्र बनवतो. आपल्या मनातल्या पत्नीबद्दल वाटणाऱ्या प्रेमभावनांना शब्दात व्यक्त करतो. विरहामुळे आपण किती व्याकुळ झालो आहोत ते सांगतो. रामगिरीपासून अलकापुरीचा मार्ग कसा कसा जातो, वाटेत कोणते पर्वत, नद्या, अरण्ये, कोणकोणती रम्य नगरे आणि स्थळे लागतील त्यांचे रसभरित वर्णन करतो. वाटेत कांही सुंदर कृषीवलकन्या तुला पाहून हर्षभरित होतील, पण तू मात्र त्यांच्या नादी लागून आपल्या मार्गावरून विचलित व्हायचे नाहीस अशी त्याची थट्टा करतो. अखेरीस अलकापुरी आल्यानंतर ती सुंदर नगरी कशी दिसेल याचे सुरेख वर्णन करतो. तिथे आपली पत्नी आपल्या वाटेवर डोळे लावून बसलेली असेल असे सांगून तिच्या मनात कोणत्या भावनांचे वादळ उठलेले असेल याचे वर्णन करतो. तिच्या रूपाचे वर्णन तर आलेच. अखेर आपला निरोप तिला देऊन तिचे कुशलमंगल वृत्त माझ्यापर्यंत आणून पोचव अशी परोपरीने त्या मेघाची विनवणी करतो. तसेच तू माझ्यासाठी हे करशील असा विश्वास दाखवतो.

अशा प्रकारे हे कथाकथन नसलेले विशुध्द काव्य आहे. मेघाला दूत बनवून त्याच्यामार्फत संदेश पाठवण्याची कल्पनाच भन्नाट आहे. तिचा विस्तार करतांना निसर्गातील सौंदर्यस्थळे आणि मनातील नाजुक तसेच उत्कट भावना यांना कालिदासाने आपल्या अलौकिक प्रतिभेने शब्दबध्द केले आहे. या काव्यातील एक एक उपमा, उत्प्रेक्षा, रूपके पाहता "उपमा कालिदासस्य" असे कां म्हणतात ते पटते. या काव्यासाठी कालिदासाने मंदाक्रांता हे वृत्त निवडले आहे. या वृत्तात ला ला ला ला अशी संथ सुरुवात करून लललललला अशी जलद लय येते आणि ला ललाला ललाला अशी ती दुडक्या चालीने संपते. आजच्या काळातले संगीतकार मेघदूतातील नादमय शब्दांना यमन, केदार आदि रागांच्या सुरात गाऊन अधिकच मजा आणतात. हजार वर्षाहून अधिक काळ टिकून राहिलेली मेघदूताची जादू पुढेही अनंत काळपर्यंत रसिकांच्या मनाला मोहिनी घालत राहील यात शंका नाही.

No comments: