Wednesday, July 02, 2008

राजवाड्यांचे शहर मैसूर


आमच्या जमखंडीसारखे पिटुकले संस्थान असो किंवा पांच खंडात पसरलेले ब्रिटीशांचे साम्राज्य असो, त्याच्या राजघराण्यातले लोक कुठे आणि कसे राहतात याबद्दल सामान्य प्रजाजनांत विलक्षण कुतूहल असे. त्या कुतूहलाची परिणती भयमिश्रित आदरात होऊन प्रजेने राजनिष्ठ बनावे यासाठी राजघराण्यातल्या व्यक्ती सामान्यांपेक्षा वेगळ्या आणि श्रेष्ठ असतात असे सतत लोकांच्या मनावर बिंबवले जात असे. राजे महाराजे म्हणजे दिसायला राजबिंडे, त्यांचे खाणेपिणे, कपडेलत्ते वगैरे सारे कांही राजेशाही थाटाचे आणि त्यांचा निवास भव्य राजवाड्यात असे. गांवातील कोठल्याही धनाढ्य माणसाचा वाडा, हवेली, कोठी वगैरेपेक्षा तिथला राजवाडा नेत्रदीपक आणि आलीशान असायलाच हवा. राजघराण्यातील व्यक्तींचे कडेकोट संरक्षण करण्यासाठी त्याचे बांधकाम चांगले भरभक्कम असे, त्याच्या सभोवती अभेद्य अशी तटबंदी, त्यावर तोफा ठेवण्यासाठी बुरुज, हत्तीला सुध्दा दाद देणार नाहीत असे मजबूत दरवाजे वगैरे सारा सरंजाम त्यात असे. पुरातन कालापासून असेच चालत आले आहे. इंग्रजी भाषेतल्या परीकथा, अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कृतीपूर्ण किस्से, आपल्या पौराणिक कथा-कहाण्या या सगळ्यात पूर्वीच्या राजांच्या राजवाड्यांचे रसभरित वर्णन असतेच. त्यांच्या बांधकामामुळे हजारो मजूरांना रोजगार मिळतो, कुशल कारागीरांना आपले कौशल्य दाखण्याची संधी मिळते, त्यातून नवे कुशल कलाकार तयार होतात, प्रजेला सुंदर कलाकृती पहायला मिळतात, त्यामुळे तिची अभिरुची विकसित होते, वगैरे अनेक कारणांसाठी त्यावर होणा-या अमाप खर्चाचे समर्थन किंवा कौतुकच केले जात असे. राजेशाही संपून लोकशाही आल्यानंतर आताचे लोकप्रतिनिधी असलेले राज्यकर्ते देखील व्हाइट हाउस किंवा राष्ट्रपती भवन यासारख्या भव्य वास्तूमध्येच रहातात. ही परंपरा अशीच यापुढे राहणार असे दिसते.
कुठलेही ऐतिहासिक गांव पाहतांना त्या जागी कधीकाळी बांधलेला राजवाडा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. मध्ययुगात बांधलेल्या दणकट ऐतिहासिक वास्तू दिल्ली वा आग्र्यासारख्या कांही थोड्या ठिकाणी अद्याप शाबूत राहिलेल्या दिसतात तर इतर अनेक ठिकाणी त्यांचे भग्न अवशेष पाहून इतिहास काळातील त्यांच्या गतवैभवाची कल्पना करावी लागते. इतिहासाच्या आधुनिक कालखंडात म्हणजे ब्रिटीशांच्या राजवटीत तत्कालीन राजे, महाराजे, नवाब वगैरे लोकांनी आपापल्या राज्यात एकापेक्षा एक सुंदर राजवाड्यांचे बांधकाम करवून घेतले. त्या बहुतेक इमारती आजही सुस्थितीत दिसतात आणि रोजच्या वापरात त्यांचा उपयोग होतांना दिसतो. बडोदा, ग्वाल्हेर, जयपूर आदि अनेक गांवांमध्ये हे दृष्य आपल्याला दिसते. अशा सा-या शहरांत मैसूरचा क्रमांक सर्वात पहिला असावा असे वाटावे इतके भव्य आणि सुंदर राजवाडे या ठिकाणी बांधले गेले आहेत. मैसूरच्या प्रसिध्द मुख्य राजवाड्याखेरीज जगन्मोहन पॅलेस, जयलक्ष्मीविलास पॅलेस, ललितामहाल, वसंतमहाल, कारंजीविलास, चेलुअंबा विलास, राजेंद्र विलास वगैरे महाल किंवा पॅलेस या शहराची शोभा वाढवतात. मैसूरच्या राजवाड्याला मोठा इतिहास आहे. चौदाव्या शतकाच्या अखेरीस वाडियार राजांनी मैसूरचे राज्य स्थापन केले तेंव्हापासून याच जागेवर त्यांचा निवास राहिला आहे. चौदाव्या किंवा पंधराव्या शतकात बांधलेला पुरातन राजवाडा कधीतरी वीज कोसळून पडून गेल्यावर सतराव्या शतकात त्या जागी एका सुंदर राजवाड्याची उभारणी केली होती. तिचे वर्णन असलेल्या साहित्यकृती व दस्तऐवज उपलब्ध आहेत. अठराव्या शतकाच्या अखेरीस तो जीर्ण झालेल्या अवस्थेत असतांना टिपू सुलतानाने तो पाडून टाकला. इंग्रजांनी टिपू सुलतानाला मारून राज्याची सूत्रे पुन्हा वाडियार राजाकडे सोपवली. त्या राजाने त्याच जागी अल्पावधीत नवा राजवाडा बांधला. शंभर वर्षे टिकल्यानंतर एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस त्याचा बराचसा भाग आगीत जळून खाक झाला. तत्कालीन राणीने त्याच जागी आणि सर्वसाधारणपणे जुन्या राजवाड्याच्याच धर्तीवर नवा आलीशान राजवाडा उभारायचे ठरवले. त्यासाठी नेमलेल्या इंजिनियराने अनेक शहरांना भेटी देऊन तिथल्या उत्तमोत्तम इमारतींची पाहणी करून नव्या राजवाड्याच्या इमारतीचा आराखडा बनवला आणि एका भव्य वास्तूची निर्मिती केली. युरोपात विकसित झालेले त्या काळात प्रचलित असलेले स्थापत्यशास्त्र व वास्तुशिल्पकला आणि परंपरागत भारतीय हिंदू तसेच इस्लामी शैलींच्या शिल्पकलेचा आविष्कार या सर्वांचा संगम या इमारतीच्या रचनेत झाला आहे. ती बांधण्यासाठी दूरदुरून खास संगमरवर आणि ग्रॅनाइटचे शिलाखंड आणून त्यावर कोरीव काम केले आहे. सुंदर भित्तीचित्रांनी त्याच्या भिंती सजवल्या आहेत. तसेच खिडक्यांसाठी इंग्लंडमधून काचा मागवून त्यावर सुरेख चित्रे रंगवून घेतली आहेत. रोम येथील सेंट पीटर्स बॅसिलिकाची आठवण करून देणारी अनुपम चित्रे छतावर रंगवली आहेत. तिथे बायबलमधील प्रसंग दाखवले आहेत तर मैसूरच्या राजवाड्यात दशावतार आणि तत्सम पौराणिक कथांचे दर्शन घडते. या इमारतीतले खांब, कमानी, सज्जे, त्यावरील घुमट वगैरेंच्या आकारात पाश्चिमात्य, मुस्लिम आणि भारतीय अशा सर्व शैलींचा सुरेख संगम आढळतो. राजवाड्याच्या चारी बाजूंना भरपूर मोकळी जागा ठेवून त्याच्या सभोवती तटबंदी आहे.
कॉलेजमध्ये असतांना मी मैसूरचा राजवाडा दसरा महोत्सवासाठी शृंगारलेल्या स्थितीत पाहिला होता. माझ्या आयुष्यात पाहिलेली ही पहिलीच इतकी संदर इमारत असावी. कदाचित त्यामुळे आजही मला ही वास्तू 'यासम ही' वाटते. ताजमहालसारखे अत्यंत सुंदर महाल रिकामे रिकामे वाटतात आणि सिस्टीम चॅपेलसारख्या इमारतीतल्या कलाकुसरीच्या वस्तू प्रदर्शनासाठी मुद्दाम मांडून ठेवल्यासारख्या दिसतात. मैसूरच्या राजवाड्यातले सर्व सामान आणि शोभेच्या वस्तू नैसर्गिकरीत्या जागच्या जागी ठेवल्यासारके वाटते. तिथले एकंदर वातावरण चैतन्यमय आहे. दरबार हॉलमध्ये हिंडतांना कोठल्याही क्षणी महाराजाधिराजांच्या आगमनाची वर्दी देत भालदार चोपदार येतील असा भास होतो.
दर रविवारी आणि सुटीच्या दिवशी संध्याकाळी तासभर राजवाडा आणि त्याच्या परिसरातील सर्व इमारतींवर दिव्यांची रोषणाई करतात. दस-याच्या महोत्सवात ती रोजच असते. लक्षावधी झगमगणा-या दिव्यांच्या प्रकाशात राजवाड्याची सुडौल इमारत अप्रतिम दिसते. समोर, पाठीमागे आणि दोन्ही बाजूला नजर पोचेपर्यंत सगळीकडेच दिवाळी असल्यामुळे तिथले वातावरणच धुंद होऊ जाते. त्या काळात राजवाड्याच्या प्रांगणात गणवेषधारी शिपाई बँड वाजवून त्यात आणखी भर टाकतात. हा सोहळा पहायला नेहमीच खूप गर्दी होते, पण राजवाड्यासमोरील पटांगण विस्तृत असल्याने त्यात ती सामावते.
येथील जगन्मोहन पॅलेसमध्ये सुरेख आर्ट गॅलरी आहे. त्यात अनेक जुन्या चित्रकारांनी रंगवलेली तैलचित्रे तसेच इतर माध्यमातल्या कलाकृती ठेवल्या आहेत. हळदणकर यांचे 'ग्लो ऑफ होप' हे अनुपम चित्र यातले खास आकर्षण आहे. एक संपूर्ण दालन फक्त राजा रविवर्मा यांनी काढलेल्या भव्य चित्रांनी भरले आहे. ललितामहालमध्ये आलीशान पंचतारांकित हॉटेल थाटले आहे. जयलक्ष्मीविलास पॅलेसमध्ये मैसूर विद्यापीठाचे मुख्य कार्यालय आहे, तसेच त्याच्या कांही भागात लोककला आणि पुरातत्व या विषयांवरील पुराणवस्तुसंग्रहालय आहे. चलुअंबा पॅलेसमध्ये सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे कार्यालय आहे. अशा प्रकारे इतर राजमहालांचा आज या ना त्या कारणासाठी चांगला उपयोग करण्यात येत आहे. मैसूरच्या रस्त्यांवरसुध्दा जागोजागी कमानी उभारलेल्या आहेत, तसेच चौकौचौकात छत्र्या, चबुतरे वगैरे बांधून त्यावर राजा महाराजांचे पुतळे उभे केले आहेत. कित्येक सरकारी ऑफीसे, इस्पितळे वगैरे सार्वजनिक इमारतींच्या सजावटीत खांब, कमानी, छत्र्या, घुमट वगैरेंचा कल्पकतेने वापर करून त्यांनासुध्दा महालाचे रूप दिले आहे. शहरातून फेरफटका मारतांना ते 'राजवाड्यांचे शहर' (' सिटी ऑफ पॅलेसेस' ) आहे याची जाणीव होत राहते.

No comments: