Sunday, July 20, 2008

भेंडीबाजारवाले घराणे




हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात घराणेशाहीचे मोठे महत्व आहे. 'ग्वाल्हेर', 'आग्रा', 'पतियाळा' यासारख्या मोठ्या शहरांच्या नांवाने प्रसिद्ध झालेली घराणी त्या भागात विकसित झालेल्या संगीतशैलीवरून निर्माण झाली असतील असे वाटेल. 'जयपूर' घराणे राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरामध्ये स्थापन झाले असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. पण या घराण्याच्या नांवातील जयपूर हे अत्रौली नांवाच्या उत्तर भारतातील छोट्या गांवाच्या नांवाला जोडून 'जयपूर-अत्रौली' घराणे स्थापन करणारे उस्ताद अल्लादियाखाँ आपले अत्रौली गांव सोडून कांही दिवस जयपूरला राहून पुढे मुख्यतः कोल्हापूरला राहिले होते. त्याचप्रमाणे 'किराणा' घराण्याचे अध्वर्यू उस्ताद अब्दुल करीम खाँ उत्तर भारतातील किराणा हे गांव सोडून दक्षिणेत येऊन स्थिरावले होते. त्यांनी किराणा मालाचे दुकान कांही चालवले नव्हते.
या सगळ्या गांवांच्या नांवावरून पडलेल्या घराण्यांच्या नांवात 'भेंडीबाजार' घराणे हे नांव जरा विचित्रच वाटते. ते नाव ऐकून बरेच लोक स्मितहास्य करतात. या घराण्याचे पूर्वीच्या काळातील मोठे गायक मरहूम उस्ताद अमान अली खाँ यांच्या पुण्यतिथीनिमित्य एक संगीताची मैफिल गेल्या वर्षी वाशी येथील गांधर्व महाविद्यालयाच्या इमारतीत आयोजित केली होती. या घराण्याच्या प्रसिद्ध गायिका तसेच प्रख्यात विदुषी डॉ.सुहासिनी कोरटकर यांनी या प्रसंगी त्यांच्या घराण्याविषयी खास माहिती सांगितली. तसेच संगीताची खूप चांगली माहिती थोडक्यात सांगून प्रात्यक्षिकांसह आपल्या सुरेल आवाजात तिची उदाहरणे ऐकवली व त्यातील बारकावे श्रोत्यांना दाखवून दिले.
त्यांनी सांगितले की 'घराणे' हा शब्द पूर्वी प्रचलित नव्हता. वेगवेगळ्या गायकांनी आपापल्या शैलींचा विकास केला व ते त्याप्रमाणे गायन करीत असत. ते कोठून आले किंवा कोठे राहतात या अर्थाने 'आग्रावाले' किंवा 'ग्वाल्हेरवाले' असे त्याच्या गांवाच्या नांवाचे विशेषण या गायकांच्या नांवाच्या मागे किंवा पुढे लावले जाई. 'गिरगावचे गाडगीळ' किंवा 'माटुंग्याचे म्हात्रे' असे आपल्या बोलण्यात येते तसेच. यातील कांही प्रमुख गायक पुढे प्रसिद्ध झाले व त्यांच्यामागे त्यांची शिष्यपरंपरा निर्माण झाली. त्यांच्या गायनाची खास वैशिष्ट्ये निर्माण झाली. गुरुकुल पद्धतीने सतत त्यांच्या बरोबर राहणा-या शिष्यांनी ती आत्मसात केली व अधिक विकसित केली. बहुतेक गायकांच्या मुलांनी संगीत क्षेत्रातसुद्धा आपल्या वाडवडिलांचा वारसा घेतला व पुढे चालवला. कदाचित या कारणाने त्यांना कालांतराने 'घराणे' हे नांव पडले. या घराण्यात वंशपरंपरा असेल किंवा नसेल, पण शिष्यपरंपरेला अधिक महत्व आहे.
उस्ताद छज्जूखाँ, उस्ताद नजीरखाँ व उस्ताद खादिम हुसेनखाँ हे तीन बंधु त्यांचे वडील उस्ताद दिलावर हुसेन व उत्तर प्रदेशातील रामपूर येथील उस्ताद इनायत हुसेनखाँ यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेऊन एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी चरितार्थासाठी मुंबईला आले. मुंबईला आधीच स्थाईक झालेल्या आपल्या भावासोबत ते भेंडीबाजार या भागात राहू लागले म्हणून 'भेंडीबाजारवाले' या नांवाने ओळखले जाऊ लागले. आजच्या भेंडीबाजारातील गर्दी, गलका, बकालपणा पाहिल्यावर या कोलाहलात कसले संगीत निपजले असेल असे वाटेल. पण त्या कालखंडात भेंडीबाजार ही श्रीमंतांची वस्ती होती. मोठे व्यापारी व सरकारी अधिकारी तेथे बंगले बांधून रहात असत. त्या काळात मलबार हिल व मरीन ड्राइव्हचा विकास झालेला नसावा. स्वयंचलित वाहने नव्हती. त्यामुळे फोर्टपासून जवळ असलेल्या भेंडीबाजार भागाला महत्व होते. त्या भागात राहणे प्रतिष्ठेचे मानले जाई. त्यामुळे 'भेंडीबाजारवाले' या नांवाला प्रतिष्ठेचे वजन होते.
त्यानंतरच्या काळात या घराण्यात अनेक गवई होऊन गेले. त्यातील मरहूम उस्ताद अमान अली खाँ व स्व.अंजनीबाई मालपेकर यांनी संगीताच्या क्षेत्रात विशेष कामगिरी करून यशाचे शिखर गांठले व अमाप प्रसिद्धी मिळवली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अमान अली खाँ यांचेकडे व किशोरी आमोणकर यांनी अंजनीबाईंच्याकडे कांही काल संगीताचे मार्गदर्शन घेतले होते ही गोष्ट नमूद करण्याजोगी आहे. या दोघींनाही शास्त्रीय संगीताचा अद्भुत असा वारसा घरातूनच मिळाला होता हे सर्वश्रुत आहे. पण तरीसुद्धा त्यांनी या घराण्यातील गुरूंकडून शिक्षण घेतले हे महत्वाचे आहे.
डॉ.सुहासिनी कोरटकर यांनी भेंडीबाजार घराण्याच्या संगीताबद्दल थोडक्यात पण बरेच कांही महत्वाचे मुद्दे चांगले समजावून सांगितले. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर शास्त्रीय संगीत पुस्तक वाचून शिकता येत नाही, ते योग्य गुरूकडूनच शिकले पाहिजे. त्याचप्रमाणे ते वाचून समजणार नाही, प्रत्यक्ष ऐकणे आवश्यक आहे. जे वाचून समजत नाही ते शब्दात लिहिण्याचे सामर्थ्य माझ्यासारखा संगीत क्षेत्रातील अशिक्षित माणूस कोठून आणणार? त्यांच्या सांगण्यातील मला जितके आकलन झाले ते थोडेसे माझ्या शब्दात देण्याचा एक तोकडा प्रयत्न इथे करणार आहे. सुहासिनीताईंच्या तोंडून ऐकलेले विचार व त्यावरून मला सुचलेली रोजच्या जीवनातील उदाहरणे यांची मिसळ यात केलेली दिसेल. प्रास्ताविक करतांनाच त्यांनी दुसरी एक गोष्ट सांगितली की अमक्या अमक्या गोष्टी भेंडीबाजार घराण्यात आहेत असे म्हंटले तर इतर घराण्यात त्या नाहीत असे नाही. सगळ्या घराण्यात त्या वेगवेगळ्या प्रमाणात व विविध प्रकाराने असतात व त्यामुळे त्या घराण्यांना वेगळेपण प्राप्त होते.
सगळ्यात पहिलीच गोष्ट म्हणजे आवाजाचा लगाव. आपापल्या शरीररचनेनुसार आपल्या गळ्याला कष्ट न देता त्यामधून निर्माण होईल अशा नैसर्गिक आवाजात आपण आपले रोजचे बोलणे बोलतो. रागाच्या भरात किंवा आश्चर्याने किंचाळतांना वरच्या पट्टीतील बारीक स्वर लागतो तर दुःखाने किंवा भावनावेगाने कंठ दाटून आल्यास त्यात खालचे सूर लागतात आणि आपोआपच घोगरेपणा येतो. कुशल नट आवाजातील हे सगळे फरक मुद्दाम ठरवून आपल्या अभिनयात व संवादात दाखवून देतात. वरच्या स्वरांना टोकदारपणा आणायचा तर खर्जातील आवाजाला हवी तेवढीच रुंदी द्यायची हे तर गायकाला करायचे असतेच, त्यशिवाय आणखी अनेक गोष्टी असतात. कांही स्वरांच्या आवती भोवती दुसरे स्वरकण फिरवून ते त्यातून गुंजन निर्माण करतात, गुंजारव करणा-या भँवराची आठवण करून देतात. कधी एक स्वर कांही क्षण घट्ट धरून ठेवतात तर कधी त्याला कंपायमान करतात. त्यासाठी गळ्यातील स्वरयंत्रावर चांगला ताबा ठेवावा लागतो तर आवाजात चढ उतार करण्याचा व्हॉल्यूम कंट्रोल करण्यासाठी श्वासाच्छ्वासावर नियंत्रण मिळवावे लागते. या सगळ्या गोष्टी आपल्या शिष्याकडून रियाजामार्फत गुरू करवून घेतात व ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार त्याचा आवाज तयार करतात. पूर्वीच्या काळचे जाणकार लोक आवाजाच्या लगावावरून त्या गायकाचे घराणे कोणते ते ओळखायचे असे म्हणतात.
आवाज तयार झाल्यानंतर त्याचा उपयोग गायनात कसा करायचा हे आले. शास्त्रीय संगीतामधील फक्त ख्यालगायन घेतले तरी त्यात एका रागाच्या सुरावटी आलाप व तानांमधून दर्शवणे, त्यातील सरगम गाणे व ते करता करता बंदिशीच्या शब्दामधील भाव व्यक्त करणे हे सगळे आले. आलाप घेतांना कधी अत्यंत संथ लयीमध्ये त्यातील एक एक स्वर उलगडून दाखवतात. अनुभवी व जाणकार रसिकांना ते आवडते पण नवखे श्रोते त्याला कंटाळतात. त्यातील कांही कुंपणावर बसलेले श्रोते असतात. एक दोन अनुभव घेतल्यानंतर ते पुन्हा शास्त्रीय संगीत ऐकायला येणारच नाहीत. त्यांना आपल्या बाजूला करून घेण्याच्या दृष्टीने थोड्या जलद लयीने आलाप घेणे इष्ट ठरते. दोन स्वरांना जोडणारी मींड अनेक प्रकाराने घेता येते. जवळ जवळचे किंवा दूरदूरचे स्वर वेगवेगळ्या प्रकाराने जोडून त्यातून सौंदर्य निर्माण होते. एका रागातील स्वर विविध क्रमाने घेता येतात. उदाहरणादाखल ग, म आणि प हे तीनच स्वर गमप, गपम, पमग, पगम, गगमप, गमपप अशा अनेक प्रकारे त्यांनी गाऊन दाखवले. प्रत्येक रागात एका सप्तकातील पाच ते सात स्वर असतात आणि वरचे खालचे धरून दहा पंधरा पर्यंत सहज जातात. अर्थातच यातून असंख्य कॉंबिनेशन्स करता येतात. त्यातून सौंदर्य निर्माण करण्यात गायकाचे कौशल्य दिसते.
सरगम गाणे म्हणजे फक्त आलापांची स्वरलिपी एका लयीमध्ये गाणे नव्हे. त्यातील प्रत्येक स्वर ठसठशीतपणे दाखवणे हे एक स्वतंत्र कौशल्य आहे. 'आ'कारात आलापी गाण्यापेक्षा तो किती वेगळा प्रकार आहे हे त्यांनी उदाहरणासह दाखवले. भेंडीबाजार घराण्याच्या गाण्यात याला महत्व दिले आहे. स्वरांमधून प्रकट होणा-या भावनांना साजेसे शब्द बंदिशीमध्ये असल्यास त्यात उत्कटता निर्माण होते. तसेच गायनाच्या दृष्टीने नादपूर्ण शब्दांची निवड उपयुक्त ठरते. खाष्ट, दुष्ट असले क्लिष्ट शब्द टाळून शब्दात माधुर्य असलेल्या बंदिशी अमान अली खाँसाहेबांनी मुद्दाम रचल्या व त्यांना साजेसा स्वरसाज चढवून आपल्या गायनात आणल्या. अर्थातच त्या रसिक श्रोत्यांना अत्यंत आवडल्या.
गायकांची आवड, सक्षमता व श्रोत्यांची पसंती यांमधून त्यांच्याकडून कांही राग पुन्हा पुन्हा गायिले गेले तसे त्यांच्या गायनात अधिकाधिक प्राविण्य, माधुर्य व चमत्कृती येत गेल्या. शिष्यांनी गुरूचेच अनुकरण करून त्यात आणखी भर घातली. ते राग गाण्याची परंपराच मिर्माण झाली. अशा त-हेने प्रत्येक घराण्याचे कांही खास राग ओळखले जाऊ लागले व अजूनही जातात. यात कांही सर्वमान्य लोकप्रिय राग आहेत तसेच कांही दुर्मिळ अनवट रागही आहेत. कांही घराण्यात जोड राग किंवा त्रिवेणीला प्राधान्य दिले जाते.
अशा प्रकारच्या अनंत गोष्टी आहेत. भारतीय शास्त्रीय संगीत हा एक अथांग रत्नाकरासारखा आहे. आपल्याला जमतील तेवढ्या ओंजळी भरून घ्याव्यात. प्रत्येक ओंजळीत वेगवेगळी चमचमती रत्ने सापडतील.
**********************************************************************

गोविंदराव व गोपाळराव शेजारी रहात होते. एके दिवशी गोविंदरावांच्या घरी रात्री उशीरापर्यंत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम झाला. त्यात अनेक गवयांचे गायन व वादकांचे वादन झाले. दुसरे दिवशी त्यांची गोपाळरावांबरोबर भेट झाली तेंव्हा त्यांनी मानभावीपणाने विचारणा केली,"काल रात्री उशीरापर्यंत येणा-या आवाजामुळे तुम्ही त्रस्त तर झाला नाहीत ना?"
"छे! छे! उलट फार बरं वाटलं बघा. काल तुमच्याकडे फारच परिणामकारक गाणं झालं."
"हो कां? तुम्हाला गाण्याची इतकी आवड आहे हे मला माहीतच नव्हतं. तरी काय झालं? तुम्ही यायचं होतं."
"नाही हो, आमच्याकडे पाहुणे आले होते."
"हो कां? मग त्यांनासुद्धा बरोबर आणायचं. काल कुठल्या घराण्याची गायकी झाली माहीत आहे?"
"नाही बुवा! मासळीबाजार घराणं होतं का ? म्हणजे आमचे पाहुणेच विचारत होते. आपल्याला त्यातलं काय कळतय्?"
"अस्स? आता कुठे आहेत ते पाहुणे?"
"ते ना? गेले आठ दिवस इथं ठिय्या मारून बसले होते, हलायचं नांव काढीत नव्हते. पण आज सकाळीच आपला गाशा गुंडाळून गेले बघा. मी त्यांना एवढंच सांगितलं की हा गाण्याचा कार्यक्रम आठवडाभर चालणार आहे."
@#$#&"

No comments: