जात होतो एकटा मी मार्ग शोधूनी नवा ।
मागुनी पांथस्थ आले जाहला त्यांचा थवा ।।
एका सुप्रसिध्द उर्दू शेराचे मराठीत स्वैर रूपांतर करून मी वर दिले आहे. एक सहस्रांश किंवा एक लक्षांश टक्के इतक्या अल्प प्रमाणात कां होईना, या ओळींमधला मतितार्थ कदाचित माझ्या ब्लॉगला लागू पडत असल्यामुळे मला हा शेर आज अचानक आठवला. ब्लॉग हा शब्द ऐकल्यावर तो काय असतो हे शोधण्याचा प्रयत्न करता करतांनाच हा ब्लॉग सुरू होऊन गेला हे मी मागे लिहिलेलेच आहे. त्या वेळीसुध्दा मी एकटा नव्हतो, कांही लोकांनी त्यापूर्वीच मराठीत अनुदिन्या लिहायला सुरुवात केलेली होती. कांही लोक आपल्याला आलेले अनुभव त्यात रंगवून सांगायचे, तर कांही लोक सुप्रसिध्द लेखकांच्या साहित्यातील निवडक उतारे वाचकांना सादर करायचे. कांही लोक त्यांनी पाहिलेल्या सुंदर स्थळांची उत्तमोत्तम छायाचित्रे आपल्या ब्लॉगवर दाखवत होते, तर लोकप्रिय गाण्यांचे आपल्याला ठाऊक नसलेले संपूर्ण शब्दरूप कांही अनुदिन्यांमध्ये दिले जात होते. आता मराठीतल्या अनुदिन्यांची संख्या हजारांवर गेली असली आणि त्यांत हाताळल्या जात असलेल्या विषयांत बरेच वैविध्य आले असले तरी त्यातले बहुसंख्य ब्लॉग अजूनही वरील चार प्रकारात मोडतात. त्या सगळ्या प्रकारांमधले थोडे थोडे (प्रकार, साहित्य नव्हे) घेऊन त्यात पदरचा मसाला घालून ती मिसळ द्यायला मी सुरुवात केली होती. त्यात मनासारखे समाधान मिळत नसल्यामुळे एकादा विषय घेऊन त्याचा जमेल तेवढा पाठपुरावा करायचा आणि मालिकेच्या रूपात तो सादर करायचा असा एक वेगळा उपक्रम मात्र मी आपल्या मनाने सुरू केला. त्यामुळे वर दिलेल्या शेरामधील पहिली ओळ मला किंचितशी लागू पडत असावी.
खरे तर मी चौफेर लिहीत आलो आहे. मी एकादा वेगळा पंथ काढला नव्हता आणि त्यात सामील व्हायचे आवाहनही कधीच कोणाला केले नव्हते. त्यामुळे माझा अनुयायी म्हणून एक नांव माझ्या ब्लॉगवर दिसू लागल्यावर मला त्याचे थोडे आश्चर्यच वाटले. त्यांची संख्या वाढत वाढत आता पांचावर गेली आहे. यापूर्वी आंतर्जालावर भटकत असतांना ब्लॉगधारकांना आवडलेल्या इतर ब्लॉग्जची यादी आणि आंतर्जालावरून तिकडे जाणारे दुवे कांही ब्लॉग्जवर दिलेले मी पाहिले होते. कदाचित त्यांची लेखकमंडळी आपापल्या मित्रांच्या ब्लॉगची नांवे एकमेकांच्या अनुदिन्यांवर घालून ते चटकन पहाण्याचा सोयीचा मार्ग तयार करून ठेवत असतील किंवा आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचा ओघ आपल्या मित्रांकडे वळवीत असतील अशी माझी कल्पना होती. माझ्या ब्लॉगचे अनुयायी झालेल्या मंडळींची मात्र माझी साधी तोंडओळखसुध्दा झालेली नाही आणि त्यांनी कधी माझ्या लिखाणावर प्रतिसाद दिले असले तरी ते माझ्या ध्यानात राहिलेले नाहीत. चांगला लक्षात रहावा एवढा संवाद नक्कीच कोणाबरोबर साधलेला नाही. त्यातील एका अनुयायाने आपले नांवसुध्दा माझ्यापासून गुप्त राहील अशी व्यवस्था करून ठेवली आहे. माझे (सुध्दा) कांही अनुयायीगण आहेत ही भावना जरी अत्यंत उत्साहवर्धक असली तरी ते कोण आहेत आणि कसल्या बाबतीत ते माझ्या कोणत्या मार्गाचे अनुसरण करतात हे समजले तर मला जास्तच आनंद होईल. माझ्याकडून त्यांना कांही अपेक्षा असतील आणि त्यांनी त्या व्यक्त केल्या तर मला त्या समजू शकतील. हा भाग वाचल्यानंतर ते प्रतिसाद पाठवतील अशी अपेक्षा आहे.
2 comments:
ब्लॉगचा हा भाग प्रकाशित होता होता अनुयायांच्या संख्येत आणखी एकाची भर पडली आहे. वेळ मिळेल तेंव्हा मी या सर्व अनुयायांच्या सुरेख ब्लॉग्जबद्दल लिहिणारच आहे. आता त्यांनी माझ्या ब्लॉगबद्दलची आपापली मते थोडक्यात मांडावी अशी त्यांना विनंती आहे.
आदरणीय श्री. आनंद घारे,
नमस्कार.
मी नुकताच महाजालावर एक मराठी ब्लॉग सुरु केला. तसं मी संगणकशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे महाजाल आणि ब्लॉग हे मला काही नवीन नाहीत. पण मराठीत ब्लॉग लिहिणार्यांविषयी मला नेहमीच एक कुतूहलमिश्रित आदर वाटत आलेला आहे. आपलाही एक मराठी ब्लॉग असावा, अशी बर्याच दिवसांपासून माझी तीव्र इच्छा होती, आणि एकदाची ती पूर्ण केली. आता जमेल तसं मी त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करीत असतो. असो.
मराठी ब्लॉग विश्वावरील इतर उत्कृष्ट ब्लॉगप्रमाणेच आपलाही ब्लॉग वाचनात आला. आपण निवडलेल्या विषयांची व्याप्ती आणि विविधता पाहून मी तर थक्कच झालो. इतके विविध विषय सामान्यातल्या सामान्य माणसालाही समजतील अशा सोप्या भाषेत मांडणं म्हणजे काही येरागबाळाचं काम नव्हे ! त्यातूनही आपण लिहिलेली प्रवासवर्णनं म्हणजे तर लाजवाबच ! ते वाचून डोळयासमोर संपूर्ण चित्रच उभं राहतं. एकूणच या ब्लॉगविश्वात मी एक क्षुल्लक पामर आहे, अशी जाणीव मला आपला ब्लॉग वाचून झाली. काहीही असो, शेवटी आपणांसारख्या मोठ्यांपासूनच आम्हांला प्रेरणा मिळत राहणार आहे. आपणांला शुभेच्छा देण्याइतपत तर मी मोठा नाहीच. पण आपल्यासारखी विचारांची प्रगल्भता थोड्या प्रमाणात का होईना, माझ्याही अंगी यावी, असा आपणच मला आशिर्वाद द्यावा !
Post a Comment