आधी गीतकार गाणे लिहितो, संगीत दिग्दर्शक त्याला चाल लावतो आणि गायक ते गाणे त्या चालीवर म्हणतो अशी बहुतेक लोकांची एक ढोबळ समजूत असते. हा सुद्धा तसा एक महत्वाचा मार्ग आहे. मध्ययुगात होऊन गेलेल्या संतांनी रचलेले अभंग, दोहे, भजने किंवा भा.रा.तांबे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यासारख्या कवींनी कित्येक दशकांपूर्वी केलेल्या उत्तमोत्तम कविता गाण्याच्या रूपात याच मार्गाने आपल्या कानापर्यंत पोचल्या आहेत. "मी कधीही आधी ठरवून कविता लिहीत नाही. ती आपल्याला स्फुरत जाते." असे कवी मंगेश पाडगांवकर नेहमी आपल्या मुलाखतींमध्ये सांगतात. अर्थातच त्या कवितेला चाल लावणे ही त्यानंतरची गोष्ट झाली. "ज्या वेळी काव्याचे शब्द माझ्या समोर असतात तेंव्हाच मी त्यांना चाल लावतो." असे संगीतकार श्रीनिवास खळे यांनी एका मुलाखतीत सांगितल्याचे मला आठवते. श्री.यशवंत देवांनी तर 'शब्दप्रधान गायकी' या विषयावर खास कार्यक्रम केले आहेत आणि पुस्तकसुद्धा लिहिले आहे. बोलपटांचा जमाना आल्यानंतर ते अधिक आकर्षक व मनोरंजक करण्यासाठी त्यात गाणी घालणे सुरू झाले. त्यासाठी पाहिजे तशी तयार गाणी आयती मिळणे कठीणच असल्यामुळे बव्हंशी ती मुद्दाम लिहिली जाऊ लागली. सुरुवातीच्या काळात आधी सिनेमातील प्रसंगानुसार गीत लिहून ते नंतर स्वरबद्ध केले जात असे. हा सगळा या प्रक्रियेचा एक भाग झाला.
पण जसजशी सिनेमातली गाणी लोकप्रिय होत गेली, लोकांच्या तोंडात बसली तेंव्हा त्यांमधील स्वरांना व ठेक्याला अधिकाधिक महत्व निर्माण झाले. कांही गाणी त्यातील सुंदर अर्थामुळे लक्षात रहायची तर बरीचशी गाणी त्यांच्या गोड किंवा आकर्षक चालीमुळे मनात भरायची. त्यामुळे गीतकार आणि संगीतकार यांनी एकत्र बसून गीतरचना करणे सुरू झाले. संगीतकारांनी धुन ऐकवायची, गीतकारांनी त्यावर शब्द लिहायचे, त्या शब्दांच्या अर्थाला उठाव देतील अशा जागा संगीतकाराने निर्माण करायच्या आणि गायक वा गायिकेकडून त्या घटवून घ्यायच्या, त्या ऐकल्यावर वाटल्यास थोडे शब्द इकडे तिकडे करायचे वगैरे प्रकारे सर्वांच्या सहकार्याने गाणी बनू लागली. ग.दि.माडगूळकर किंवा शांता शेळके यांच्यासारखे संगीताची जाण असलेले गीतकार आणि सुधीर फडके किंवा हृदयनाथ मंगेशकरांसारखे साहित्यप्रेमी संगीतकार एकत्र आल्यावर त्यांनी एकत्र येऊन कित्येक अजरामर अशी गाणी निर्माण केली.
आजच्या काळात सिनेमातील गाणी म्हणजे त्याच्या ठेक्यावर नाचून घ्यायचे एक साधन अशीच लोकांची समजूत झालेली असावी असे कधी कधी दिसते. त्यामुळे त्यातला एक नशा आणणारा, धुंद करणारा जलद ठेका जोरजोरात कानावर आदळत असतो. हिंदी, इंग्रजी, मराठी, पंजाबी अशा कुठल्याही भाषेतले कांही शब्द त्या ठेक्यावर ओढून ताणून बसवलेले असतात. एकतर ते नीट स्पष्टपणे ऐकू येत नाहीत, ऐकू आले तरी समजत नाहीत आणि समजले तरी लक्षात रहात नाहीत कारण त्यातून कांही अर्थाचा बोध व्हावा अशी अपेक्षाच नसते. निवांतपणे बसून ऐकत रहावीत अशी कांही गाणीसुद्धा अधून मधून येतात पण त्यांची टक्केवारी हल्ली कमी झाली आहे.
संगणक क्रांती आल्यानंतर ध्वनीसंयोजनाच्या तंत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. कोठलेही वाद्य प्रत्यक्ष न वाजवता अनंत प्रकारचे नाद कृत्रिम रीत्या निर्माण करणे आता शक्य झाले आहे. स्व.सलिल चौधरी यांच्या काळात ते तंत्र असते तर त्याचा देखील त्यांनी कुशलतेने उपयोग करून घेतला असता यांत शंका नाही. भारतीय व पाश्चात्य संगीतातील सर्व छटा त्यांनी त्यांच्या संगीतात आणल्याच. बंगाली चित्रपटामधील गीते ते स्वतःच लिहीत असत. त्यामुळे आधी चाल की आधी शब्द हे सांगता येणे कठीण आहे. कदाचित या दोन्ही गोष्टी त्यांच्या मनात एकत्रच जन्म घेत असाव्यात. पण बंगालीमध्ये लोकप्रिय झालेल्या चालीवर हिंदी गाणे करायचे असेल तर ते नंतरच लिहावे लागणार. त्यांची बरीचशी गाणी आधी कवी शैलेंद्र यांनी लिहिली आणि नंतर योगेश यांनी. ते दोघेही प्रतिभासंपन्न कवी असल्यामुळे ती गाणी ऐकायला जितकी मधुर वाटतात तितकेच त्यातले भाव सुंदर असतात.
पारंपरिक भारतीय संगीतामध्ये साथीला जी वाद्ये असतात त्यातला तबला किंवा ढोलक वगैरे वाजवून ताल धरतात आणि तानपुरा सुरांचा संदर्भ देत असतो. पेटी, सारंगी वगैरे वाजवणारे साथीदार गायकाने आळवलेले सूरच त्याच्या मागोमाग वाजवून त्याच्या गायनात एक प्रकारचा भराव घालत असतात. या सर्व साजांचे वाजणे सतत चालूच असते. त्यात सुसंवाद साधण्यासाठी केलेले तंबोरे जुळवण्याचे ट्याँव ट्याँव आणि तबल्याची ठाकठूक श्रोत्यांना निमूटपणे ऐकून घ्यावीच लागते. सिनेमामधील गाण्यात मात्र कधी मुख्य गाणे सुरू होण्यापूर्वीच त्याची चाहूल देणारे कांही ध्वनी ऐकू येतात, मुख्य गाण्याच्या सोबतीने दुसरेच कांही वाजत असते आणि ध्रुपद व कडव्यांमधल्या जागा इतर वाद्यांच्या वादनातून भरलेल्या असतात. सारी वाद्ये सहसा सलगपणे वाजत नाहीत. कधी पन्नास व्हायलीन वाजत असल्याचा सामूहिक ध्वनी येईल तर मध्येच एका बांसुरीवर घातलेली शीळ, कुठे मेंडोलिनचा पीस तर कुठे ड्रम्सचे तुकडे. अशा शेकडो व्हरायटीज त्या गाण्यांमध्ये असतात. या सगळ्या वाद्यवृंदाचा सांभाळ करणारा अरेंजर नांवाचा वेगळाच तज्ञ असतो.
सलिलदा संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरले त्यापूर्वीच पाश्चात्य देशात प्रचलित असलेला ऑर्केस्ट्रा त्यात येऊन स्थिरावला होता. त्यांना तर पाश्चिमात्य संगीताचे बाळकडूच प्यायला मिळाले होते. मनात भारतीय शास्त्रीय तसेच लोकसंगीताची आवड होती. त्या सर्वांचा सुंदर मिलाफ त्यांनी केला. एकदा ते आपण बसवलेले गाणे रेकॉर्ड करत असतांना बोलावलेल्या ऑर्केस्ट्राच्या अरेंजरने "त्यांना यातलं काय कळतंय्?" असा कांहीसा आव आणला. ते सलिलदांना सहन झाले नाही. त्यांना सर्व वाद्यांची माहिती होतीच, स्वरलिपीही समजत होती. त्यांनी त्या अरेंजरलाच रजा देऊन टाकली आणि स्वतःच त्या गाण्याचे ध्वनिसंयोजन केले अशी आठवण कोणी सांगितली. केवळ आपल्याला येतात म्हणून कांही कोणी सगळी कामे आपल्या स्वतःच्या डोक्यावर घेत नाही. पण कोणाशिवाय आपले अडत नाही हा मुद्दा त्यांना दाखवून द्यायचा असणार.
. . . . . . . . . . (क्रमशः)
No comments:
Post a Comment