Wednesday, February 11, 2009

टायटॅनिक जॉर्जिया मत्स्यालय - १


"तुम्ही माशांना कसे निरखून पहात आहात ते पहायला आलेल्या माशांच्या थव्यांकडे टक लावून त्यांना पाहण्यासाठी सिंगापूरला चला." अशा अर्थाची एक जाहिरात पूर्वी सिंगापूर एअरलाइन्सकडून केली जात असे. त्यासाठी सिंगापूरला जाण्याचा योग कांही अजून माझ्या आयुष्यात आला नाही, पण असंख्य माशांच्या डोळ्याला डोळा भिडवून त्यांना अमोरासमोर पाहण्याची अपूर्व संधी मला अॅटलांटा येथील टायटॅनिक एक्वेटिकच्या जॉर्जिया मत्स्यालयात मिळाली.

लहानपणी घडलेल्या मुंबईच्या पहिल्या भेटीत मी तिथल्या जेवढ्या प्रेक्षणीय जागा पाहिल्या होत्या त्यातले चौपाटीवरचे तारापोरवाला मत्स्यालय मला सर्वात जास्त आवडले होते. प्रिन्स ऑफ वेल्स म्यूजियममधल्या अनंत वस्तू मी तोंडाचा आ वासून पाहिल्या होत्या, पण पांचशे वर्षांपूर्वीचा पोशाख, पांच हजार वर्षांपूर्वीची आयुधे आणि पन्नास लाख वर्षांपूर्वीचे दगड यांचे ऐतिहासिक महत्व लहान वयात फारसे समजत नव्हते आणि ते मनाला विशेष मोहवत नव्हते. राणीबागेतले सजीव प्राणी त्यांच्यापेक्षा जास्त आवडले असले तरी वाघ, सिंह, हत्ती आदि कांही वन्य पशूंना मी त्यापूर्वी सर्कशीत अवघड कामे करतांना पाहिलेले होते त्या मानाने राणीबागेतल्या पिंज-यात त्यांना बसलेले किंवा नुसतेच उभे राहिलेले पाहण्यात तेवढी मजा वाटली नव्हती. आमच्या गांवातील विहिरीतल्या किंवा तळ्यातल्या गढूळ पाण्यात कधी तरी सुळकन बाजूने जातांना दिसलेली एकाद दुसरी मासोळी सोडल्यास मत्स्यावताराचे हे माझे पहिलेच साग्रसंगीत दर्शन होते. मत्स्यालयातल्या मोठमोठ्या फिशटँक्सच्या कांचेतून दिसणारे विविध आकारांचे, विविध रंगांचे मासे पाहतांना मन मोहून गेले होते. पुढे मुंबईला स्थाईक झाल्यानंतर माझ्याकडे जेवढे पाहुणे येऊन गेले, त्यातल्या बहुतेकांना मी आवर्जून ते मत्स्यालय दाखवले होते आणि त्या निमित्याने ते पुन्हा पुन्हा स्वतः पाहिले होते. पण टायटॅनिक जॉर्जिया मत्स्यालय पहाण्यातला अनुभव अभूतपूर्व आणि चित्तथरारक होता.

अॅटलांटाच्या डाउनटाउनमध्ये ऑलिंपिक पार्कच्या बाजूलाच या मत्स्यालयाची अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण इमारत आहे. तिच्या वेगळेपणामुळे ती दुरूनच ओळखता येते. हे मत्स्यालय जगातील सर्वात मोठे आहे किंवा जगात इतरत्र कोठेही दिसणार नाहीत इतके निरनिराळे मासे इथे पहायला मिळतील असा इथल्या लोकांचा दावा आहे. त्याप्रमाणे हे मत्स्यालय जगात सर्वात मोठे असो वा नसो आणि त्यात किती लाख मासे असतील हे माझ्या दृष्टीने एवढे महत्वाचे नाही. पण जे कांही पाहिले ते अचाट आणि माझ्या
कल्पनेच्या पलीकडले होते.

जॉर्जिया मत्स्यालयाच्या भव्य इमारतीत प्रवेश केल्यानंतर समोर एक अवाढव्य आकाराचे दालन आहे. याच दालनातून इतर सर्व दालनांकडे जाणा-या वेगवेगळ्या वाटा आहेत. एका बाजूला एकमेकात मिसळलेले दोन लंबवर्तुळाकृती चौथरे आहेत. त्यावर चार चार खुर्च्यांसह वीस पंचवीस टेबले मांडून सुमारे शंभर माणसांना बसण्याची सोय केली आहे. त्याच्या बाजूलाच कँटीनचा स्टॉल आहे, पण तिथली सर्व्हिस कमालीच्या संथगतीने चालते. दीड दोन हजार रुपयांचे तिकीट काढून आलेला माणूस तिथे कपभर चहासाठी रांगेत उभा रहायला आणि खुर्चीवर चकाट्या पिटत बसायला आलेला नसतो. त्यामुळे बहुतेक जागा दिवसभर रिकाम्याच दिसल्या आणि भूक लागल्यावर क्षुधाशांती करण्यासाठी किंवा फिरून थकवा आल्यास दोन चार मिनिटे बसून विश्रांती घेण्यासाठी जागा रिकामी होण्याची वाट पहावी लागली नाही.

महासागराची सफर (ओशन व्हॉयेजर) हा या मत्स्यालयातला सर्वात मोठा आणि महत्वाचा भाग आहे. या विशाल कृत्रिम तलावात साठ लाखाहून अधिक गॅलन इतके खारे पाणी भरलेले आहे. त्याला साडेचार हजार स्क्वेअर फूट इतके एकूण क्षेत्रफळ असलेल्या प्रचंड पारदर्शक खिडक्या ठेवल्या आहेत. आपल्या घरातल्या दिवाणखान्याची भिंत सुमारे दीडशे ते दोनशे स्क्वेअर फूट असते. अशा पंचवीस तीस भिंतींएवढ्या क्षेत्रफळातून आपल्याला महासागरातले दृष्य पहायची सोय आहे. यावरून त्याच्या भव्यतेचा अंदाज येईल. यात एक शंभर फूट लांब बोगदा आहे. त्यातून जातांना आपल्या दोन्ही बाजूंना आणि माथ्यावरसुध्दा पाणीच पाणी असल्यामुळे पाणबुड्याप्रमाणे आपण समुद्राच्या तळाशी जाऊन तिथले अवलोकन करत आहोत असा भास होतो. जिकडे तिकडे लहान मोठे मासे एकेकटे किंवा घोळक्याने स्वैर हिडत असतात. एका मोठ्या सभागृहासारख्या दालनात पडद्याच्या ठिकाणी सिनेमास्कोप पडद्यासारखा ६१ फूट रुंद आणि २३ फूट उंच असा प्रचंड पारदर्शक अॅक्रिलिकचा स्लॅब लावला आहे. समोर बसण्यासाठी खुर्च्यांच्या रांगा मांडून ठेवल्या आहेत, तसेच पडद्याजवळ उभे राहून पाहण्यासाठी भरपूर मोकळी जागाही आहे. इथे तर एकाच वेळी असंख्य मासे इकडून तिकडे जातांना दिसत असतात. जसे आपण त्यांना पहात असतो त्याचप्रमाणे तेसुध्दा आपल्याकडे पहात असतात आणि केंव्हा केंव्हा त्यांच्या भाषेत एकमेकांना कांही खाणाखुणासुध्दा करत असावेत असे वाटते. त्यातली एकादी मत्स्यसुंदरी कुणाकडे तरी एक तिरपा कटाक्ष टाकून "हा मेला माझ्याकडे कसा टकमक बघतो आहे!" अशी तक्रारसुध्दा आपल्या सवंगड्याकडे करत असेल. व्हेल शार्क या जातीचा मासा आकाराने सर्वात मोठा असतो. या दालनात कांही अवाढव्य व्हेल शार्कसुध्दा अगदी जवळून म्हणजे कांचेपलीकडे फक्त हातभर अंतरावरून जातांना पहायला मिळाले. लहानात लहान अगदी बोट भर आकाराच्या शेकडो माशांचे थवे विशिष्ट प्रकारचे फॉर्मेशन करून एका वेगाने एका दिशेने जात असलेले पहातांना खूप छान वाटतात. रंगसंगतीबद्दल तर पाहता मत्स्यसृष्टीमध्ये जेवढी विविधता दिसते त्याच्या एक दशांशसुध्दा प्राण्यांच्या जगात दिसणार नाही. फुलपाखरे तर रंगीबेरंगी असतातच, पक्ष्यांमध्ये पोपटच कित्येक रंगात दिसतात, पण जलचरांमधल्या वैविध्याला तोड नाही.
. . . . . . (क्रमशः)

No comments: