मी कॉलेजात गेल्यानंतर माझ्या 'कोकप्रेमी' मित्रांना हे पेय पितांना पहिल्यांदा पाहिले तेंव्हा साहजीकच त्या 'काळ्या पाण्या'त एवढे काय घातलेले असते त्याबद्दल त्यांना विचारले. "हे तर जगातले सर्वात मोठे गुपित आहे. स्कॉटलंड यार्डलासुध्दा ते अजून कळलेले नाही." असे उत्तर त्या प्रश्नाला मिळाले. खाजगी गुपिते ओळखणे हे कांही स्कॉटलंड यार्डचे काम नाही. लंडनमधल्या उल्हासनगरातल्या एकाद्या संशयिताच्या दुकानावर धाड घालून बनावट पेयविक्रीचा तपास करण्यासाठी कदाचित त्यांनी कोकचे रासायनिक पृथक्करण केलेही असले तरी त्याचे निष्कर्ष त्यांनी जगजाहीर केले नसणार. कोकाकोलामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी असतात हे गौडबंगाल शंभर वर्षाहून अधिक काळ कोणाला समजलेले नाही हे मात्र खरे.
आपल्या खाद्यपेयांमध्ये अमकी तमकी जीवनसत्वे किंवा क्षार असल्याचा दावा अनेक उत्पादक त्यांचा खप वाढवण्यासाठी करतांना दिसतात. कोकाकोलाच्या जाहिरातीत मात्र ते पेय अमाप उत्साह वाढवते एवढेच मनावर ठसवले जाते. यासाठी कोणत्या उत्साहवर्धक औषधीचा उपयोग केला जातो हे गुलदस्त्यातच ठेवले जाते. त्याचा उल्लेख कधी झालाच तर तो नकारात्मक असतो. भारतातल्या आणि अमेरिकेतल्यासुध्दा कांही भागात पूर्वीच्या काळात दारूबंदीचा प्रयोग होऊन गेला होता. त्या काळात कोकाकोलावर बंदी येऊ नये यासाठी त्यात मद्यार्काचा अंश नसल्याचे सांगून सिध्द केले गेले. कोणीही त्याचा कोकेनशी संबंध जोडू नये या दृष्टीने ते अंमली पदार्थापासून मुक्त असल्याचे सांगितले जाते. आजकाल मधुमेहाचे प्रमाण वाढले असल्यामुळे शर्करेचे प्रमाण नगण्य असलेला डाएट कोक निघाला आहे, एवढेच नव्हे तर झीरो कोक नांवाच्या उत्पादनात तर ऊर्जेचे प्रमाण अगदी चक्क शून्यभोपळा असते असेसुध्दा सांगतात.
कोकाकोला संग्रहालय पाहतांना तो बनवण्याची प्रक्रिया दाखवली जाते. त्यात पाण्याचे शुध्दीकरण केल्यानंतर त्यात कर्बद्विप्राणिल वायू विरघळवला जातो आणि त्यानंतर त्यात कोकाकोलाचा अर्क मिसळतात एवढेच दाखवतात. पण हा अर्क कसा तयार करतात याचे गुपित सांगत नाहीत. कोकाकोलाचा फॉर्म्युला गुप्त ठेवण्यातले कौशल्य हेच त्याच्या अमाप यशाचे गमक आहे असे या प्रदर्शनात हिंडतांना मनावर सारखे ठसवले जात असते. हा फॉर्म्यूला एका मोठ्या बँकेच्या लॉकरमध्ये कड्याकुलुपात सुरक्षित ठेवला आहे आणि कंपनीच्या मोजक्या सर्वोच्च पदाधिका-यांनाच तो पाहण्याची परवानगी आहे, कोकाकोला कंपनीत काम करणा-या सामान्य नोकरांनासुध्दा तो कधीच समजणार नाही अशी खास तरतूद केली आहे, यामुळेच आजवर कोणीही डुप्लिकेट कोक बनवू शकला नाही आणि कधीही बनवू शकणार नाही वगैरे सांगितले गेले.
मला मात्र हा सगळा बहुधा प्रचाराचा भाग वाटला. कोकाकोलाच्या एक अब्जाहून अधिक बाटल्या रोजच्या रोज विकल्या जातात. त्या कामासाठी शंभराहून अधिक देशातल्या हजारावर बॉटलिंग प्लँटमध्ये या बाटल्या भरल्या जातात. प्रत्येक बाटलीत एक चमचाभर अर्क घालायचा म्हंटले तरी हजारो पिपे भरतील एवढा अर्क त्यासाठी रोज निर्माण करावा लागत असेल. हे काम किती जागी केले जाते याबद्दल गुप्तता पाळली जात असली तरी त्याचा व्याप किती मोठा असेल याची कल्पना करता येईल. एवढे मोठे उत्पादन करण्याच्या कामात त्याचेवर देखरेख ठेवण्यासाठीच मोठ्या संख्येने तंत्रज्ञांची गरज पडते. त्या लोकांना यातील प्रक्रियांची संपूर्ण माहिती असावी लागते आणि नसली तरी काम करतांना ती होत जाते. कारखान्यातील कामे करणारी स्वयंचलित यंत्रे आज उपलब्ध असली तरी पन्नास वर्षांपूर्वी ती ऐकिवातसुध्दा नव्हती. त्या काळात देखील कोकाकोलाचा विस्तार जगभर झालेला होता. तेंव्हा त्यांच्या कारखान्यात काम करणा-या कांही हुशार लोकांना तरी थोडा अंदाज आल्याशिवाय राहिला नसता. त्याशिवाय शंभरावर वर्षांच्या इतिहासात कोकाकोला कंपनीच्या संचालकपदावर किती मंडळी येऊन गेली असतील. त्या सर्वांनी बँकेतला लॉकर उघडून त्यात ठेवलेला फॉर्म्यूलाचा कागद काढून वाचून पाठ केला असेल आणि त्याची एकही प्रत न काढता तो कागद पुन्हा लॉकरमध्ये सुरक्षित ठेवला असेल या गोष्टीवर विश्वास बसणे कठीण आहे.
याखेरीज दुसरी एक गोष्ट आहे. कोणत्याही वस्तूचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचे झाल्यास त्यासाठी तितक्याच मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाची गरज पडते. हिमालयातल्या एकाद्या वृक्षाची कंदमुळे किंवा रॉकी माउंटनमधल्या कोठल्याशा अज्ञात झाडाचे फळ अशा प्रकारचा दुर्मिळ पदार्थ हवा तितका मिळू शकणार नाही. कोकाकोलाचा अर्क बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल मुबलक प्रमाणात आणि वाजवी भावाने मिळत असणार. त्याची खरेदी मध्यस्थांमार्फत केली जात असली तरी त्या पदार्थांच्या बाजारात त्यांच्या मोठ्या ग्राहकांबद्दल कुणकुण ऐकू येत असेल. त्या मालाचा पुरवठा करणा-या मंडळींना आपले अंतिम ग्राहक कोण आहे याचा सुगावा लागणे हे त्यांच्या व्यवसायाच्या भवितव्याच्या दृष्टीने आवश्यक असते. कोकाकोला तरी याला अपवाद कसा ठरेल ? एकशे वीस वर्षांपूर्वी श्रीमान पेंबरटन यांनी शोधून काढलेला फॉर्म्यूलाच आजतागायत उपयोगात आणला जात आहे या त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा झाला तर त्या काळात अॅटलांटासारख्या लहान शहरातल्या एका सामान्य वैद्याला कोणती द्रव्ये उपलब्ध असतील त्याचा विचार करता ती रोजच्या कामातल्या उपयोगातलीच असणार हे लक्षात येईल. संशोधन करायचेच म्हंटले तर ते शोधता येणे अशक्य वाटत नाही.
असे असले तरी कोकाकोलाच्या गुपिताचे मिथक कोकाकोलाप्रमाणेच इतका दीर्घ काळ टिकून राहिले आहे.
2 comments:
मी पण रायपुरच्या एका बॉटलिंग प्लांट ला गेलो होतो. तिथे सुध्दा हेच सांगण्यात आलं. पण एक बाकी खरं की पाण्यावर सगळ्या प्रोसेसेस करुन आधी पाणी शुध्द केलं जातं नंतरच त्यात ते ’सिक्रेट" लिक्विड मिक्स करण्यात येतं.
ते लिक्वीड मोठ्या बाटल्यातुन प्रत्येक फ्रॅंचाइसीला पुरवलं जातं.
एक गोष्ट इथे जरुर नमुद कराविशी वाटते, की भारतामधे जॉर्ज फर्नांडीस ने जेंव्हा कोक वर बंदी आणली होती तेंव्हा थम्स अप, किंवा कॅंपा कोला सारखे चांगले ब्रॅंड्स डेव्हलप झाले होते. पार्ले ने तर खुपच आघाडी घेतली होती या कोल्ड ड्रिंक्स मधे.अजुनही गिव्हन अ चान्स काही लोक पांचट कोक पेक्षा थम्स अप प्रिफर करतात.
कोक चे शेअर होल्डर्स, जे गेल्या १०० वर्षापासुन शेअर्स न विकता ठेउन आहेत ते मल्टी मिलिऑनिअर झाले आहेत असे म्हणतात...
छान लेख आहे.
यातले थम्स अप आता कोकाकोलानेच विकत घेतले आहे आणि एक वेगळे पेय म्हणून ते चालू ठेवले आहे. कँपाकोला हे पेय कोकाकोला बनवणा-या प्यूअर ड्रिंक्स या कंपनीने आणले होते आणि कोकचे पुनरागमन झाल्यानंतर ते बहुधा बंद केले असावे.
प्रतिसाद पाठवल्याबद्दल आभारी आहे.
Post a Comment