Tuesday, February 03, 2009

सलिल चौधरी - भाग १


विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारी माणसे अरसिक आणि रुक्ष मनोवृत्तीची असतात असा एक गैरसमज उगाचच पसरवला जातो. नेहमी आपल्याच धुंदीत रहात असल्यासारखी भासणारी ही माणसे किती कलाप्रेमी असतात हे इतरांना चांगले कळावे अशा प्रकारच्या कांही उपक्रमांचे आयोजनदेखील ते अधून मधून करत असतात. प्रामुख्याने वैज्ञानिक व तंत्रज्ञांची वस्ती असलेल्या अणुशक्तीनगरमधील कलाप्रेमी लोकांनी मागील वर्षी एक वेगळ्याच प्रकारचा कार्यक्रम तिथल्या सभागृहात घडवून आणला होता. सुप्रसिद्ध संगीतकार स्व.सलिल चौधरी यांच्या जन्मदिनानिमित्य त्यांच्या सांगीतिक जीवनावर या वैज्ञानिक लोकांनी चक्क एक परिसंवाद ठेवला.

विषयांवरील परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा वगैरेंच्या थाटातच या कार्यक्रमाची एकंदरीत आंखणी केली होती. स्वागत गीत, दीप प्रज्वलन, विधीवत उद्घाटन, स्मरणिकेचे प्रकाशन, मान्यवरांचे सत्कार, प्रमुख पाहुण्यांचे अभिभाषण, इतर वक्त्यांची व्याख्याने व त्यावर चर्चा वगैरे सारी रूपरेषा तशीच होती. फक्त त्यातला विषय मात्र आगळा वेगळा होता. "संगीत हे ऐकायचे असते. त्यावर चर्चा कसली करताहेत?" किंवा "असल्या कार्यक्रमासाठी रविवारची सुटी कोण वाया घालवणार आहे?" असे प्रश्न कोणाच्या मनात आले असतील तर त्याला सडेतोड उत्तर मिळावे इतकी चांगली उपस्थिती या कार्यक्रमाला झाली आणि तीही त्याच्या प्रवेशशुल्कासाठी पदरमोड करून आलेल्या रसिकजनांची. हा कार्यक्रम इतका रंगला की सर्व प्रेक्षक व श्रोते दिवसभर आपल्या आसनाला खिळून राहिले होते. सकाळचे चहापान व दुपारचे जेवण यांची सोयही तिथेच केली होती. त्यासाठी मध्यंतरात थोडा वेळ उठावे लागत होते तेवढेच.

सलिल चौधरी यांच्या पत्नी व बंगालीमधील सुप्रसिद्ध गायिका श्रीमती सबिता चौधरी या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांनी फार म्हणजे फारच सुंदर भाषण केले. या भाषणातून त्यांनी सलिलदांचे मधुर संगीत, त्यांच्या बहुमुखी प्रतिभेचे इतर अनेक क्षेत्रातील आविष्कार आणि कांही हृद्य व्यक्तीगत आठवणी यांचा सुंदर मिलाफ घडवून आणलाच. शिवाय आपल्या कोकिळकंठातून त्यांच्या अनेक गाण्यांच्या ओळी कोठल्याही साथीविना ऐकवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. उतारवयातसुद्धा त्यांनी दाखवलेली आवाजावरील मजबूत पकड, संगणकासारखी तल्लख स्मरणशक्ती आणि मुद्देसूद उत्तरे या सगळ्याच गोष्टी अचंभित करण्यासारख्या होत्या. नंतर सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमातसुद्धा त्या पदोपदी आपल्या आठवणीतून अधिकाधिक माहिती सांगत होत्या. मी कधीही न ऐकलेल्या किंवा न वाचलेल्या किती तरी गोष्टी सबितादींनी त्या दिवशी सांगून आमच्या ज्ञानात मोलाची भर टाकली. त्यातली थोडी माहिती पुढील भागात देईन.

पहिले व्याख्यान सलिलदांचे सुपुत्र संजय चौधरी यांनी दिले. 'लोकसंगीत आणि पाश्चात्य संगीत यांचा सलिलदांच्या रचनांवर पडलेला प्रभाव' हे शीर्षक असले तरी त्यांनी फारसे अभ्यासपूर्ण असे गंभीर वक्तव्य केले नाही. या प्रकारच्या संगीताशी सलिलदांचा संपर्क कसा आला याबद्दलच ते जास्त बोलले. त्यांना स्वतःला बॉक्सिंगची आवड होती आणि त्यांनी त्यात प्राविण्यसुद्धा मिळवले होते. घरातच संगीत असल्यामुळे सलिलदांनी त्यांना संगीताच्या क्षेत्रात कांहीसा जोर लावून खेचूनच आणले असे ते म्हणाले, पण त्यांनी स्वतः दिलेले सुरेल संगीत ऐकल्यावर त्यांनासुद्धा मनापासून संगीतात रुची व प्रतिभा होतीच हे स्पष्ट दिसते.

भाभा अणुसंधान केंद्रातील संगणक विभागाचे प्रमुखपद सांभाळणारे पण साहित्य व संगीतात प्रवीण असलेले श्री आल्हाद आपटे यांचे अतीशय प्रगल्भ असे भाषण झाले. 'सलिल चौधरी यांची जीवनरेखा व त्यांच्या रचना' हा या परिसंवादाचा गाभा असलेला विषय निवडून त्याचा विस्तृत अभ्यास त्यांनी केला होता. सलिलदांच्या जीवनातील प्रमुख टप्पे थोडक्यात सांगून त्यांनी केलेल्या अनेकविध प्रकारच्या रचनांचे उत्तम रसग्रहण त्यांनी सादर केले. शास्त्रीय संगीत, लोकगीते, क्लब डान्स, प्रेमगीते, विरहगीते, भारतीय पद्धतीची सुरावटीवर आधारलेली गाणी तसेच थिरकत्या लयीवर रचलेल्या उडत्या स्वरांच्या चाली असे अनेक प्रकार सलिलदांनी समर्थपणे हाताळले होते.

यातील प्रत्येक प्रकारातली गाणी उच्च कोटीची होती आणि आजवर लोकप्रिय आहेत. त्यांची मार्मिक माहिती आपटे यांनी थोडक्यात पण मुद्देसूदपणे दिली. साहिती या गुणी गायिकेने नमून्यादाखल त्यातील कांही गाणी ऐकवून व्याख्यानातील मुद्दे स्पष्ट होण्यास मदत केली. शिवाय अधून मधून सबितादींनी कांही गाण्यांचा इतिहास किंवा कांही 'अंदरकी बाते' सांगून मजा आणली. उदाहरणार्थ मधुमती या चित्रपटातील 'आजारे परदेसी' हे अप्रतिम गाणे त्या चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक बिमल रॉय यांना कथानकाशी अनुरूप वाटत नव्हते आणि हे गाणे चित्रपटातून गाळण्याचा विचारसुद्धा ते करीत होते. पण सलिलदांनी आग्रह धरल्यामुळे ते गाणे राहिले आणि सुपर डूपर हिट होऊन अजरामर झाले.

लघुपट आणि मालिका निर्माण करणारे श्री.कृष्णराघव यांनी सलिल चौधरी यांनी चित्रपटांव्यतिरिक्त इतर क्षेत्रांमध्ये केलेल्या सांगीतिक कार्याचा गोषवारा दिला. त्यांनी रचलेल्या मधुर गाण्यांच्या चाली आपल्याला माहीत आहेत. पण अत्यंत प्रभावी पार्श्वसंगीत देऊन वातावरणनिर्मिती करण्यात ते कुशल होते आणि अनेक लघुपटांमध्ये व मालिकांमध्ये त्यांच्या या कौशल्याचा वापर करण्यात आला होता. त्यासाठी ते किती खोलवर विचार करत असत, विशिष्ट परिणाम साधण्यासाठी कोणत्या वाद्याचा कसा उपयोग करून घेत असत याबद्दल कृष्णराघव यांनी सांगितले. एकदा तर पार्श्वसंगीतासाठी सरकारकडून मंजूरी मिळालेले बजेट खर्च होऊन गेले होते तरी त्यानंतरसुद्धा त्यांनी एका विशिष्ट प्रसंगासाठी आपल्या खर्चाने वादकाला बोलावून घेऊन त्यांच्या मनातले सनईचे सूर दिल्याची आठवण त्यांनी सांगितली. सलिल चौधरी यांनी अनेकविध वाद्यांचा चपखल उपयोग तर करून घेतलाच पण मानवी आवाज, पक्ष्यांची किलबिल, गुरांचे हंबरणे यासारखे नादसुद्धा त्यांनी पार्श्वसंगीतात आणले. सलिल चौधरी यांचे पार्श्वसंगीत इतके लोकप्रिय झाले होते की कानूनसारख्या गाणी नसलेल्या कांही चित्रपटांचे पार्श्वसंगीत दिग्दर्शन आवर्जून त्यांना दिले गेले. एकंदर सिनेमासाठी त्यांचे पार्श्वसंगीत आणि त्यातली गाणी तेवढी दुस-याच संगीत दिग्दर्शनाने दिल्याची उदाहरणेसुद्धा आहेत.


केरळमधील श्री.टी.उन्नीकृष्णन यांनी केलेल्या भाषणात सलिल चौधरी यांनी इतर भारतीय भाषांमधील चित्रपटांना दिलेल्या संगीताबद्दल माहिती भाषणात दिली. 'चेम्मीन'या मल्याळी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर मल्याळी सिनेमाच्या विश्वात सलिल चौधरी खूपच लोकप्रिय झाले. भारतातील जवळ जवळ सर्व भाषांमध्ये निघालेल्या चित्रपटांना संगीत देणारे ते एकमेव संगीत दिग्दर्शक असावेत. एका मराठी सिनेमालासुद्धा त्यांनी संगीत दिले होते, पण तो तेवढा गाजला नाही. एका भाषेतील चित्रपटातल्या गाण्याच्या चाली ते अनेक वेळा दुस-या भाषेतल्या गाण्याला देत असत. एवढेच नव्हे तर एका गाण्याच्या सुरुवातीच्या आधी दिलेल्या किंवा दोन कडव्यांमधल्या वाद्यसंगीताच्या लकेरीवर नंतर स्वतंत्र गाण्याची चाल रचल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. पण असे करतांना ते त्या चित्रपटातील प्रसंग व वातावरणाचे भान ठेऊन त्यानुसार त्यात फेरफार करीत व त्यासाठी योग्य त्याच वाद्यांची जोड त्याला देत असत. श्री.उन्नीकृष्णन स्वतः संगीतज्ञ व उत्कृष्ट गायक आहेत. ते खैरागढ संगीत विद्यापीठात अध्यापनाचे काम
करतात. उदाहरणादाखल त्यांनी आपल्या खड्या आवाजात फक्त कीबोर्डच्या कॉर्डच्या आधारावर कांही छान गाणी म्हणून दाखवली. तसेच गायकाच्या आवाजातील वैशिष्ट्यानुसार सलिलदा कोणत्या प्रकारच्या गाण्यासाठी कोणाची निवड करायची ते कसे ठरवत असत तेही दाखवून दिले.
. . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: