चंद्रयानाच्या उड्डाणाच्या अनुषंगाने गुरुत्वाकर्षण, अग्निबाण, उपग्रह आणि त्यांच्या उड्डाणासाठी लागणारे प्रयत्न यांची थोडक्यात ओळख मी पहिल्या पांच भागात करून दिल्यानंतर या भागात मुख्य मुद्यावर येत आहे. चंद्रयान प्रकल्पाची जाहीर घोषणा झाल्यानंतर लगेच त्यावर जे प्रतिसाद आले त्यात "आता हे कसले नवे खूळ काढले आहे?", "या लोकांना हे झेपणार आहे काय ?", "याची कोणाला गरज पडली आहे ?", "याचा काय उपयोग होणार आहे?", "आता याचा खर्च पुन्हा आमच्याच बोडक्यावर पडणार आहे ना?" अशासारखे प्रश्न अनेक लोकांनी विचारले होते. चंद्रयानाच्या यशस्वी उड्डाणानंतर त्याबद्दल वाटणारा अविश्वास आणि शंका दूर झाल्या आहेत. कालांतराने त्याचे महत्व पटल्यानंतर विरोधाची धारही बोथट होईल. रोहिणी आणि आर्यभट यांच्या उड्डाणाच्या वेळीसुध्दा अशा शंका व्यक्त केल्या गेल्या होत्या. समर्पक उत्तरे मिळाल्याने त्यांचे निरसन आतापर्यंत झाले आहे.
चंद्रयान प्रकल्पाची रूपरेखा आंखतांनाच त्यामागची उद्दिष्टे निश्चित केली होती. अंतराळातील ग्रहगोलांचे वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करून त्यांचा बारकाईने अभ्यास करण्याची ही पहिलीच भारतीय मोहिम आहे. त्यानुसार त्यावर बसवलेल्या अत्याधुनिक उपकरणांद्वारे चंद्राविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती ते यान गोळा करणार आहे. चंद्राची पृथ्वीवरून दिसणारी (सशाचे चित्र असलेली ) बाजू तसेच पलीकडली आपल्याला कधीच न दिसणारी त्याची बाजू या दोन्हींच्या पृष्ठभागाचा सविस्तर त्रिमित नकाशा काढणे, चंद्राच्या पृष्ठभागावरील तसेच त्याच्या गर्भातील विविध खनिजांचा शोध घेणे वगैरे उद्देशाने ही निरीक्षणे करण्यात येणार आहेत. मॅग्नेशियम, अॅल्युमिनियम, सिलिकॉन, कॅल्शियम, लोह, टायटेनियम आदि पृथ्वीवर ब-याच प्रमाणात सापडणारी मूलद्रव्ये तसेच रेडॉन, युरेनियम व थोरियम यासारखी इथे दुर्मिळ असलेली मूलद्रव्ये यांची चंद्रावर किती उपलब्धता आहे याचा अंदाज यावरून येऊ शकेल. अखेर चंद्राचा जन्म नेमका कशामुळे आणि कसा झाला असावा हे समजण्याच्या दृष्टीनेही या निरीक्षणांचा उपयोग होऊ शकेल.
चांद्रयानाच्या मोहिमेचे खालील प्रमुख टप्पे सांगता येईल.
१. पृथ्वीवरून उड्डाण
२. अंतराळातून पृथ्वीचे अवलोकन करीत चंद्राकडे गमन
३.चंद्राच्या कक्षेत प्रवेश
४. चंद्राच्या कक्षेत त्याच्यापासून १०० कि.मी. अंतरावर राहून सुमारे २ वर्षे त्याचेभोवती नियमितपणे घिरट्या घालणे.
हे चांद्रयानाचे मुख्य काम आहे. हे काम करतांना त्याने खालील गोष्टी करायचे योजिले आहे.
अ. चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्व बाजूंनी निरीक्षण करून त्याचे नकाशे तयार करणे.
आ. चंद्रावरील धातू, अधातू वगैरेंच्या साठ्यांचा अंदाज घेणे
इ. चंद्रावर उतरणारे (धडकणारे) छोटे यान पाठवून त्याच्या मार्गाचा अभ्यास करणे, तसेच आपल्या आगमनाची खूण चंद्राच्या पृष्ठभागावर ठेवणे.
ई. या यानाने चंद्रावर धडकण्यापूर्वी त्याच्या जवळून घेतलेली माहिती जमा करणे.
या संपूर्ण कालावधीत चांद्रयानाकडून शक्य तेवढी माहिती पृथ्वीवरील केंद्राकडे पाठवत राहिली जाईल. येथील प्रयोगशाळांमध्ये त्याचे विश्लेषण होत राहील. यांतून नवनव्या शास्त्रीय गोष्टी समजत जातील व त्यांचा भविष्यकाळातल्या प्रयोगात उपयोग होईल. चंद्रावर उतरण्यासाठी योग्य जागा शोधायला त्यातून मदत मिळेल. अंतरिक्ष संशोधनासाठी नासाने केलेल्या संशोधनातून निर्माण झालेल्या कित्येक गोष्टी आज सामान्य माणसाच्या वापरात आल्या आहेत. त्याप्रमाणे कदाचित पृथ्वीवरील जीवनात उपयोगी पडू शकणारे नवे शोधसुध्दा त्यावरून लागू शकतात. या मोहिमेतले पहिले तीन टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. सध्या चौथा टप्पा व्यवस्थितपणे चालला आहे.
२२ ऑक्टोबर २००८ रोजी सकाळच्या नियोजित वेळी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून चांद्रयानाने यशस्वीरीत्या उड्डाण केले. सुमारे चार दशकांपूर्वी अमेरिका व रशिया यांनी चंद्रावर स्वारी केली होती. त्यानंतर नील आर्मस्ट्राँग याने चंद्रावर जाऊन मानवाचे पहिले पाऊल (की बुटाचा तळवा) त्याच्या पृष्ठभागावर उमटवले होते. त्यानंतर अपोलो प्रोग्रॅममधून अमेरिकेचे दहा बारा अंतराळवीर चंद्रावर जाऊन आले. युरोपातील देशांनी संयुक्तपणे आपले यान चंद्राकडे पाठवले होते. वर्षभरापूर्वीच जपान आणि चीन या आशियाई देशांनी या क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्यानंतर आता भारताचा क्रम लागतो. पृथ्वीवरून निघून चंद्रापर्यंत पोचण्याचे जे तंत्र चाळीस वर्षांपूर्वी विकसित झाले होते त्यात मूलभूत असा फरक दरम्यानच्या काळात पडलेला नाही. मात्र अत्यंत प्रभावशाली कॅमेरे, संदेशवहनाची विकसित साधने आणि अत्याधुनिक संगणक आता उपलब्ध असल्यामुळे चांद्रयानाकडून पूर्वीपेक्षा अधिक तपशीलवार, अचूक आणि अद्ययावत माहिती मिळणार आहे. या बाबतीतचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक संस्थांच्या सहयोगाने करण्यात येणार आहे.
सुरुवातीच्या काळात भारताचे उपग्रह विकसित देशांच्या रॉकेट्सबरोबर अवकाशात पाठवले जात. त्याच्या जोडीने अशी रॉकेट्स भारतात तयार करण्याचे प्रयत्न चाललेले होते. पोलर सॅटेलाइट लाँच व्हेहिकल्स (पीएसएलव्ही) चे तंत्रज्ञान विकसित केल्यानंतर भारताने आपले उपग्रह त्यांच्या सहाय्याने अंतराळात पाठवणे सुरू केले. त्यात इतके यश मिळाले की भारताने आपले अनेक उपग्रह अवकाशात पाठवलेच, शिवाय परदेशांचे अनेक उपग्रहसुध्दा आतापर्यंत पृथ्वीवरून आभाळात उडवले गेले आहेत. याच मालिकेतल्या पीएसएलव्ही-एक्सएल जातीच्या अद्ययावत अग्निबाणाच्या सहाय्याने चांद्रयानाने उड्डाण केले. सुमारे पंधरा मजली गगनचुंबी इमारतीइतके उंच असलेले हे रॉकेट चार टप्प्यांचे आहे. यात घनरूप तसेच द्रवरूप अशा दोन्ही प्रकारच्या इंधनांचा उपयोग केला जातो. त्यांच्या जोरावर चांद्रयानाने उड्डाण केल्यानंतर तो पृथ्वीच्या सभोवती अतीलंबगोलाकार अशा कक्षेत फिरू लागला. साडेसहा तासात पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतांना प्रत्येक आवर्तनात तो तिच्या पासून २५५ किलोमीटर इतका जवळ यायचा तर २२८६० कि.मी. इतका तिच्यापसून दूर जायचा. क्रमाक्रमाने हे अंतर वाढवीत त्याने ८ नोव्हेंबर रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर आपली कक्षा हळूहळू बदलून तो त्याच्या ठरलेल्या कक्षेमध्ये फिरू लागला आहे. पृथ्वीवरून निघतांना हा उपग्रह १३८० किलोग्रॅम वजनाचा होता. चंद्राच्या मार्गावर जातांना सोडलेल्या रॉकेटमुळे त्याचे वजन कमी होत गेले. चंद्राजवळ पोचेपर्यंत आता ते ६७५ किलोग्रॅम झाले आहे आणि यापुढे तेवढेच राहील.
चंद्राच्या कक्षेतले आपले निश्चित स्थान ग्रहण केल्यानंतर १४ नोव्हेंबरच्या रात्री (भारतीय वेळेप्रमाणे) त्याने मून इंपॅक्ट प्रोब (एमआयपी) नांवाचा आपला एक दूत चंद्रावर पाठवून दिला. त्या प्रोबच्या अंगावरच तिरंगा झेंडा रंगवलेला होता. सुमारे तीस किलोग्रॅम वजनाचा हा प्रोब स्वतःभोवती फिरत फिरत २५ मिनिटांनंतर चंद्रावर जाऊन नियोजित जागेवर उतरला आणि त्याने चंद्रावर भारताचा राष्ट्रध्वज नेऊन ठेवला आहे. उद्या चंद्राच्या पृष्ठभागाच्या मालकीवरून पृथ्वीवरल्या देशांदेशांमध्ये वाद झाला तर त्यावर आता भारताला आपला हक्कसुध्दा सांगता येईल. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरता उतरता त्या प्रोबने स्वतःभोवती फिरत चंद्राच्या विस्तृत भागाचे जवळून अवलोकन करून अनेक प्रकारची माहिती देखील पाठवली आहे. भारताचा तिरंगा राष्ट्रध्वज यापूर्वी पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर फडकला होताच, आता तो चंद्रावर जाऊन पोचला आहे.
. . . . . . . .. . . . . . . . . (क्रमशः)
No comments:
Post a Comment