Friday, February 06, 2009

सलिल चौधरी भाग ५


ज्याने मधुमती हा चित्रपट अजून पाहिला नाही किंवा पाहिल्यानंतर त्याला तो आवडला नाही असा हिंदी सिनेमाचा शौकीन आपल्याला सहसा मिळणार नाही. मला तरी अद्याप असा माणूस भेटलेला नाही. अगदी आलमआरा पासून ते काल परवा आलेल्या स्लमडॉग मिलिऑनेअर पर्यंत सर्व हिंदी सिनेमांमधील संगीताच्या दृष्टीने 'टॉप टेन' ची यादी बनवल्यास त्यात मधुमतीचे नांव निश्चितपणे येईल असे मला वाटते. खुद्द सलिल चौधरी यांनीसुद्धा मधुमतीच्या यशानंतर पन्नासावर चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आणि त्यातून उत्तमोत्तम गाणी दिली पण एकंदरीत पाहता मधुमतीची सर त्यातील कोणत्याही चित्रपटाला येऊ शकली नाही असे माझे मत आहे.

असे एवढे काय त्या चित्रपटाच्या संगीतात होते ? यापेक्षा त्यात काय नव्हते या प्रश्नाचे उत्तर देणे अधिक कठीण जाईल. चित्रपटाची सुरुवात होऊन थोडाच वेळ झाल्यावर एका निसर्गरम्य अशा जागेचे दृष्य पडद्यावर येते, चिमण्यांची चिंवचिंव कानावर पडते, धनगराची लकेर ऐकू येते आणि अचानकपणे मुकेशच्या स्वरात एक गाणे सुरू होते, "सुहाना सफर है ये मौसम हंसी" जणु ते आपल्यालाच त्या नयनरम्य ठिकाणी घेऊन जाते. आपण सुद्धा "हमें डर है हम खो न जाये कहीं" असे मनात म्हणतो. दूरवर असलेल्या पहाडीवरून लता मंगेशकरांच्या आंवाजात एक कमालीची मधुर साद ऐकू येते, "आ जा रे, परदेसी, मै तो कबसे खडी उस पार, अँखियाँ थक गयी पंथ निहार।". महल या चित्रपटांमधल्या "आयेगा, आनेवाला" या गीतापासून गूढ आर्त अशी साद घालणा-या गाण्यांची मालिकाच सुरू झाली. "नैना बरसे रिमझिम रिमझिम", "कहीं दीप जले कहीं दिल", "अनजान है कोई", "या डोळ्यांची दोन पांखरे", "तू जहाँ जहाँ चलेगा" वगैरे अशा प्रकारची किती तरी 'हॉँटिंग' गाणी त्यानंतर आली आहेत. "आ जा रे, परदेसी" हे सुद्धा त्याच पद्धतीचे आणि त्या गूढ आवाजाचा वेध घेण्यास भाग पाडणारे असे गाणे आहे. माझ्या टॉप टेनमध्ये त्याची जागा पक्की आहे.

या गाण्याच्या इंटरल्यूडमध्ये आपल्याला "घडी घडी मोरा दिल धडके" या पुढे येणा-या दुस-या एका गोड गाण्याची चाल ऐकू येते. प्रेमिकाच्या मीलनासाठी आतुर झालेल्या नायिकेच्या हृदयाची तो अमूल्य क्षण जवळ आल्यानंतर जी नाजुक अवस्था होईल ती या गाण्यात अचूक टिपली आहे. "जुल्मीसंग आँख लडी, सखी मै कासे कहूँ।" हे एक प्रेमगीत आणि कुमाँऊँमधील लोकसंगीत यांचे अप्रतिम मिश्रण आहे. प्रेमी जनांच्या जिवाची होणारी तडफड "दिल तडप तडपके कह रहा है आ भी जा। तू हमसे आँख ना चुरा तुझे कसम है, आ भी जा।" या गाण्यात प्रभावीपणे दाखवली आहे. प्रेमिकेशी मीलन न होऊ शकल्याने सर्वस्व गमावून बसलेल्या नायकाचा तीव्र आक्रोश "टूटे हुवे ख्वाबोंने हमको ये सिखाया है। दिलने जिसे पाया था आँखोंने गँवायाहै।" या महंमद रफीच्या गाण्याने प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतल्याशिवाय रहात नाही.

याच्या अगदी उलट "जंगलमें मोर नाचा किसीने ना देखा। हम जो थोडीसी पीके जरा झूमे तो हाय रे सबने देखा।" हे महंमद रफीनेच गायिलेले विनोदी गाणे मनावरचा ताण हलका करते. "हम हालेदिल सुनायेंगे सुनिये के न सुनिये" ही एक खास उत्तर भारतीय ढंगाची ठुमरीसुद्धा मुबारक बेगम यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये या सिनेमात ऐकायला मिळते आणि "कांची रे कांचीरे" हे नेपाळी पद्धतीचे समूहगीत सुद्धा यात आहे. "दैया रे दैया रे चढ गयो पापी बिछूआ।" हे गाणे तर मला लोकसंगीतातल्या समूहनृत्याचा अगदी परमोच्च बिंदू वाटतो. त्यानंतरच्या काळात मी किती तरी लावण्या, कोळीगीते, गरबा वगैरे पाहिले आहेत. भांगड्याचा धांगडधिंगा तर आजकाल फारच बोकाळला आहे. अलीकडे आलेल्या "ढोल बाजे", "चोलीके पीछे क्या है" किंवा "बीडी जलैले" यासारख्या गाण्यांना वाद्यांची अप्रतिम साथ आहे. असे असले तरी "दैया रे दैया" ने पन्नास वर्षांपूर्वी मनावर घातलेली जादू त्या "पापी बिछूआ" च्या विषासारखी उतरत नाही.

अशा प्रकारे भरपूर विविधतेने नटलेली खूप गाणी या चित्रपटांत आहेत. "सुहाना सफर" आणि "दिल तडप तडपके" यासारख्या गाण्यात उडते सूर आणि थोडे खालचे स्वर घेतले आहेत आणि त्यातले शब्द थबकत थबकत पुढे जात आहेत असे वाटते. त्यातल्या ललाल्लाच्या लकेरी पश्चिमेकडल्या दिसतात. ही गाणी गाण्यासाठी मुकेशचा भरदार आवाज वापरला आहे, तर "टूटे हुए ख्वाबोंने" हे थोड्या चढ्या स्वरात आणि मींडचा वापर करून सलगपणे म्हंटलेले गाणे महंमद रफी यांनी गायिले आहे. "आ जा रे परदेसी" व "दैया रे दैया" या अप्रतिम दर्जाच्या गाण्यांसाठी लतादीदींचा स्वर निवडला आहे, ठुमरीसाठी मुबारक बेगम आणि समूहगीतासाठी आशा भोसले, सबिता वगैरेंचा आवाज घेतला आहे. गायक वा गायिकेची अचूक निवड, वाद्यांची उत्तम साथ आणि मुख्य म्हणजे मनमोहक मुखडे या सगळ्या बाबतीत विचारपूर्वक काम केले असल्याने ही गाणी नुसती कानाला संतोष देऊन थांबत नाहीत, त्यांतले तर शैलेंद्र यांचे सुंदर अर्थपूर्ण शब्द थेट मनाला जाऊन भिडतात आणि दीर्घकाळ लक्षात राहतात.
. . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: