'केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे' हे समर्थ रामदासांचे सुप्रसिद्ध वचन माझी आई दर दहा पंधरा दिवसांत एकदा तरी मला ऐकवायचीच. तिने सांगितलेले घरातले एखादे काम करणे आळसापोटी टाळण्यासाठी "मला ते येत नाही", "मी ते शिकलो नाही", "मी ते यापूर्वी कधी केलेले नाही","उगाच असं करायला गेलो आणि तसं झालं तर पंचाईत होईल" वगैरे सबबी मी पुढे करीत असे. त्यावर तिचे उत्तरही ठरलेले असे. "शिकला नसशील तर आता शिकून घे", "करायला घेतलेस की यायला लागेल","प्रत्येक गोष्ट तू कधी तरी पहिल्यांदा करणारच आहेस, आज हे काम कर", "असंच्या ऐवजी तसं होणार नाही याची आधी काळजी घे आणि तरीही तसं झालंच तर काय करायचं ते आपण तेंव्हा पाहू" वगैरे सांगितल्यावर मला ते काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नसे. मात्र एकदा ते काम हाती घेतल्यावर ते फक्त यायलाच नव्हे तर मनापासून आवडू लागे.
मराठीमध्ये ब्लॉग सुरू करायला घेतला तेंव्हा साधारण अशीच परिस्थिती होती त्यामुळे लहानपणची ही आठवण जागी झाली. ब्लॉग या प्रकारासंबंधी कांहीच माहिती नव्हती आणि त्यातले कांहीसुद्धा येत तर नव्हतेच, कधी पूर्वी इंटरनेटवर काम केलेले नव्हते. बोट धरून चालवत घेऊन जाणाराही कोणी नव्हता. पण कामाला लागल्यानंतर त्यातून एक एक गोष्ट शिकून घेत, चुका करीत, त्या सुधारीत कसाबसा माझा हा ब्लॉग तयार तर झाला. एक झाल्यानंतर उत्साह वाढला आणि याहू ३६० वर दुसरा सुरू केला. त्या ठिकाणी एक बोधवाक्य द्यायचे असते, ते कोणते द्यावे याचा जास्त विचार करायची गरजच नव्हती.
'केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे।' हे मनांत घोळत असलेले वाक्य देऊन टाकले.
दोन तीन महिन्यांनी दासनवमी आली. तोपर्यंत मी आपल्या ब्लॉगवर थोडी थोडी माहिती देण्यास सुरुवात केली होती. "आपले बोधवचन आता धूळ खाऊ लागले आहे, ते कधी बदलणार?" अशा अर्थाचे संदेश याहूवर दिसू लागले होते. तेंव्हा समर्थ रामदासांचेच दुसरे सुप्रसिद्ध वचन "जे जे आपणासी ठावे ते इतरासी सांगावे, शाहाणे करून सोडावे सकळ जन " आपले बोधवाक्य बनवले. यांतील "शाहाणे करोन सोडावे" हा भाग आपल्या आंवाक्याबाहेरचा वाटत होता, पण पहिला अर्धा भाग अंमलात आणायचा थोडा तरी प्रयत्न करून पहावा असे ठरवले.
त्यानंतर एक गंभीर आजारपण उद्भवले. त्या दयनीय परिस्थितीत "कभी खुदपे कभी हालातपे रोना आया। " इतकेच सांगावेसे वाटले. थोडे बरे वाटू लागल्यावर पुन्हा धडपड करण्याची उमेद निर्माण झाली. तेंव्हा "लहरोंसे डरकर नैया पार नही होती। कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती। " हे बोधवाक्य घेऊन त्यापासून स्फूर्ती घेण्याचा प्रयत्न केला. कांही दिवसांनी मराठी ब्लॉगवर हिंदी बोधवाक्य कशाला असा विचार मनात आला तेंव्हा ते बदलून "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। " हे बोधवाक्य निवडले.
पुढील दासनवमीला पुन्हा समर्थ रामदासस्वामींचे वचन घ्यावेसे वाटले. यावेळी "मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणें नीच सोशीत जावे ॥ स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ।। " हे निवडले. कुणीही कांहीही म्हंटले तरी आपण आपली शांतगंभीर वृत्ती सोडता कामा नये हा उपदेश समोर असला म्हणजे मनावर ताबा ठेवायला त्याचा उपयोग होतो. या सगळ्यांमध्ये कांहीतरी एक समान सूत्र आहे हे वाचकांच्या लक्षात आलेच असेल.
No comments:
Post a Comment