Friday, February 13, 2009

ब्लॅक अँड व्हाइट


एका सायन्स एक्झिबिशनमध्ये 'दृष्टीभ्रम' या विषयावरील सुरेख प्रात्यक्षिके पाहिली. "दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं." या उक्तीची मजेदार उदाहरणे एक एक करून पहायची आणि त्यामागील शास्त्रीय कारणे समजावून घेऊन पुढे जायचे अशा पध्दतीने त्यांची मांडणी केलेली होती. त्यातल्या एका केबिनमध्ये थोडासा आडोसा करून अंधारात एक टेबल ठेवले होते. त्याच्या उजव्या व डाव्या भागावर दोन वेगळ्या दिव्यांच्या प्रकाशाचे झोत पाडले होते आणि मधोमध एक पडदा लावून त्या भागांना वेगवेगळे केले होते. टेबलावर ठेवलेले चित्र डाव्या बाजूला सरकवले की ते छान रंगीबेरंगी दिसायचे आणि तेच चित्र
उजव्या बाजूला सरकवले की पन्नास वर्षे पूर्वीचे पिवळे पडलेले कृष्णधवल छायाचित्र वाटायचे. प्रकाशलहरींच्या गुणधर्मांची थोडीफार ओळख असल्यामुळे मला त्याचे आश्चर्य वाटले नाही आणि त्याचे शास्त्रीय कारण फलक न वाचताच लक्षात आले होते. त्यामुळे माझ्या मनात वेगळेच विचार आले.

कांही लोक त्यांच्याकडे असलेल्या वस्तू, त्यांची माणसे आणि ते स्वतः यांच्याबद्दल भरभरून बोलत असतात. त्यांची तोंडभर प्रशंसा करतांना त्यातल्या चांगलेपणाचे बारकावे ते व्यवस्थित उलगडून दाखवतात. त्यांच्या कौतुक करण्याच्या कौशल्याचेच आपल्याला कौतुक वाटते. पण विषय बदलला की लगेच त्यांची चर्या बदलते. उत्तम कथाविषय असलेला एकादा चित्रपट पाहिलात कां असे विचारताच, "शी! त्यातला कसला तो टकल्या नायक आणि नकटी नायिका ?" असे उत्तर येते. एकादे अप्रतिम गाणे ऐकतांना त्यात कुठेतरी आलेली थोडीशी खरखर तेवढी त्यांना बोचते आणि कोणा हुषार माणसाला त्याच्या कर्तबगारीमुळे बढती मिळाल्याची बातमी ऐकून "त्याच्या मेव्हण्याच्या सासुरवाडीजवळ त्यांच्या चेअरमनच्या जावयाचे काका राहतात ना, म्हणून!" किंवा "चांगला आपल्या श्यामरावांना हा वरचा हुद्दा मिळायचा चान्स होता, पण हा मेला तडफडला ना मध्येच! " अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून येते. अशा
बोलण्यातून त्यांना कांही फायदा होत असेल किंवा त्यात त्यांचा कांही अंतस्थ हेतू असतो असेही दिसत नाही. त्यामुळे हे लोक असे कां वागतात याचे मला कोडे पडायचे.

एकरंगी प्रकाशकिरण (मोनोक्रोमॅटिक लाइट) या विषयावरचा तो प्रयोग पाहतांना मला या प्रश्नाचे उत्तर सापडले. सात रंगांच्या असंख्य छटांचे वेगवेगळ्या कंपनसंख्येचे किरण सूर्यप्रकाशात असतात. ते सर्व मिळून त्याचा पांढरा रंग बनतो. हे सारे किरण जेंव्हा लाल चुटुक रंगाच्या फुलावर किंवा हिरव्या गार पानावर पडतात तेंव्हा तेवढे रंग सोडून इतर सर्व रंगांचे प्रकाश किरण त्या वस्तूत शोषले जातात आणि अनुक्रमे फक्त तांबड्या व हिरव्या रंगांचे किरण तेवढे फूल आणि पानातून चहू बाजूंना परावर्तित होतात. तेच किरण आपल्या डोळ्यात पोचल्यामुळे आपल्याला त्यांच्या रंगांचा बोध होतो. पण फक्त पिवळ्या रंगाचे किरणच त्या गोष्टींवर पडले तर ते मात्र पूर्णपणे शोषले जातात आणि त्या वस्तू आपल्याला दिसतच नाहीत. त्यांच्या आजूबाजूला असलेल्या पांढ-या किंवा पिवळ्या रंगांच्या इतर गोष्टी पिवळ्या रंगांच्या किरणांना परावर्तित करतात त्यामुळे त्या आपल्याला व्यवस्थित दिसतात पण लाल व हिरव्या रंगाच्या वस्तू दिसत नसल्यामुळे त्यांचा बाह्य आकार तेवढा काळ्या रंगात दिसतो. काळा हा एक रंग नाही, त्यात प्रकाशकिरणांचा संपूर्ण अभाव असतो.

आत्मकेंद्रित प्रवृत्तीच्या लोकांच्या बाबतीत कांहीचे असेच घडते. आपल्या स्वतःच्या गडद अशा रंगात ते नेहमीच इतके डुंबलेले असतात की फक्त त्या रंगातल्या सर्व गोष्टी तेवढ्या त्यांना ठळकपणे दिसतात पण इतर कोणतेही रंग त्यांच्या मनापर्यंत पोचू शकत नाहीत. त्यामुळे ते स्वतःवर नेहमी खूष असतात पण इतरांचे चांगले गुण त्यांच्या ध्यानात येत नाहीत कारण ते त्यांना दिसतच नाहीत. आपला रंग सोडून इतर सगळ्या रंगातल्या गोष्टी त्यांना काळ्या दिसतात किंवा त्यांच्या लेखी त्या अस्तित्वातच नसतात.

अशा लोकांची ओळख पटणे तसे सोपे आहे. त्यांच्यासोबत तुम्ही बसले असतांना त्यांना कोणाचा फोन आला आणि तो गोपनीय वगैरे नसला तर त्या व्यक्ती तुमच्यादेखत त्यावर बोलतील. त्या काय बोलत आहेत ते तुम्हाला ऐकू येत असेल आणि पलीकडची व्यक्ती काय सांगत आहे याबद्दल कुतूहल वाटेल. पण फोन ठेवल्यानंतर त्याबद्दल अवाक्षरही न काढता "मी त्याला असं सांगितलं." असे म्हणून स्वतः बोललेली वाक्येच त्या पुन्हा तुम्हाला ऐकवतील. दुस-या बाजूच्या व्यक्तीने काय सांगितले याचे त्यांना महत्व वाटलेले नसते, त्यांनी ते नीट ऐकलेलेसुध्दा नसते आणि जेवढे ऐकले असेल त्यात सांगण्यासारखे कांही असेल असे त्यांना वाटत नाही. अशा लोकांबरोबर होणारा आपला संवाद हा बहुधा त्यांच्या बाजूने एकपात्री असतो. त्यातली आपली भूमिका फक्त श्रोत्याची असते आणि अशी दोन माणसे एकमेकांना भेटली तर तो दुहेरी एकपात्री संवाद ऐकतांना इतरांची खूप करमणूक होते.

आत्मकेंद्रित व्यक्तींना सिमेना पहायला, देवदर्शनाला किंवा प्रेक्षणीय स्थळी जायला असे कुठे ही जायचे असो, निघण्यापूर्वी पायाच्या नखापासून केसांच्या बटांपर्यंत त्या स्वतःला न्याहाळून घेतात, कोणता पोशाख घालायचा यावर दहादा विचार करून ते ठरवतात आणि आपण सर्वांग सुंदर चांगले दिसत आहोत याची मनोमन खात्री करून घेतात. आपण कांही तरी 'पाहण्या'साठी किंवा 'दर्शन घेण्या'साठी निघालो आहोत अशी त्या लोकांची भूमिका नसतेच. सिनेमातली पात्रे आपल्याला पाहण्यासाठी पडद्यावर येत आहेत, देवळातला देव आपले रूप पाहण्यासाठी खोळंबला आहे किंवा आपला नवा पोशाख पाहण्यासाठी मावळणारा सूर्य आसुसला आहे अशी त्यांची समजूत असते. पर्यटन करतांना बहुतेक वेळा त्यांच्या गळ्यात कॅमेरा असतो. आयुष्यात क्वचित पहायला मिळणारी सौंदर्यस्थळे छायाचित्रात सामावून घेऊन पुन्हा पुन्हा ती पहावीत अशी इच्छा मात्र त्यांना नसते. सूर्योदय आणि सूर्यास्त रोजच होत असले तरी एकाद्या निसर्गरम्य ठिकाणी ते पहाण्यात खास मजा असते. मोजके क्षण दिसणारे ते अद्भुत दृष्य डोळे भरून पाहून घ्यावे असे आपल्याला वाटते. पण ही मंडळी मात्र तो वेळ "अरे तू इथे उभा रहा, केस किती विस्कटले आहेत ते नीट कर, खिशातून काय डोकावते आहे बघ, पायाखाली काय पडलं आहे ते बाजूला कर, इकडे कॅमे-याकडे पहा." वगैरे सांगत एकमेकांचे फोटो काढून घेण्यात घालवतात. त्या चित्रांमधल्या एकाद्या कोप-यात 'मावळत्या दिनकरा'ला थोडीशी जागा मिळाली तर ते त्याचे नशीब !

या लोकांकडे गेलात तर ते आपले फोटोचे आल्बम नक्की दाखवतात. पण ते पाहतांना मला मात्र आपले हंसू आवरता येत नाही. त्यातल्या अथपासून इतीपर्यंत प्रत्येक पानावर त्यांची किंवा त्यांच्या बबड्या छबड्यांची दात विचकून हंसणारी थोबाडेच तेवढी दिसतात. पार्श्वभूमीवर कोठे प्रतापगडाचा बुरुज, महालक्ष्मीच्या देवळाचा कळस, घुमटाशिवाय ताजमहाल किंवा इंडिया गेटचा एक तुकडा दिसलाच तरी कॅमे-याचा फोकस चेहे-यावर असल्यामुळे ते प्रेक्षणीय स्थळ जेमतेम ओळखता येते. पण या महाभागांनी या स्थळांना भेट दिली होती याचा पुरावा जवळ बाळगणे आणि लोकांना तो दाखवणे एवढाच या आल्बमचा हेतू असतो. त्यांनी भेट दिल्यामुळे त्या सुप्रसिध्द जागांना अधिक महत्व प्राप्त झाले असाच त्यांच्या बोलण्याचा नूर असतो.

आत्मकेंद्रित लोकांचे वागणे आणि मोनोक्रोमॅटिक लाइटमध्ये दिसणारी चित्रे यातले साम्य लक्षात आल्यानंतर मी माझ्या संपर्कात येणा-या लोकांच्या वागण्याकडे त्या दृष्टीने पहायला लागलो. त्यातल्या बहुसंख्य व्यक्ती निदान कांही अंशी तरी कृष्णधवल जगातच वावरत असतात असे दिसते. कोठलीही गोष्ट आपली की परकी हे पाहून त्यानुसार ती चांगली वा वाईट, खरी की खोटी, बरोबर की चूक वगैरे दोनच श्रेणीत तिला घालण्याची सर्वांना घाई असते. त्रयस्थ नजरेने पाहिल्यास त्यातल्या अनेक छटा दिसतात हे सांगून कोणाला पटतच नाही. हे जग खरेच असे असते की हा सुध्दा माझा दृष्टीभ्रम आहे?

No comments: