Sunday, February 15, 2009

सी एन एन च्या अंतरंगात


सी एन एन च्या अंतरंगात . . .(पूर्वार्ध)

पंचवीस तीस वर्षांपूर्वी एकदा हैद्राबादला गेलो असतांना त्या वेळी तिथे नव्यानेच उघडलेल्या ओबेरॉय हॉटेलात उतरलो होतो. परदेशी प्रवाशांसाठी ज्या खास सोयी तिथे केल्या होत्या त्यात एक प्रचंड आकाराची डिश अँटेना बसवून त्यावरून प्रत्येक खोलीतील टेलीव्हिजन सेटवर प्रमुख परदेशी चॅनेल्स दाखवण्याची व्यवस्थासुध्दा होती. तिथे मी पहिल्यांदा सीएनएनचे कार्यक्रम पाहिले आणि त्यातून मला आश्चर्याचे धक्क्यावर धक्के बसत गेले. दिवसाचे चोवीस तास टीव्हीवर फक्त बातम्या देणे कोणालाही शक्य असेल असे तेंव्हा मला वाटत नव्हते. सुरुवातीच्या काळात आम्हाला फक्त मुंबई दूरदर्शन दिसत असे आणि ते सुध्दा संध्याकाळचे कांही तासापुरतेच. बातम्या, माहिती, मनोरंजन, प्रसिध्दी, प्रचार, उपदेश वगैरे सर्वांसाठी त्यातच थोडा थोडा वेळ दिला जात असे. जाहिराती आणि प्रायोजित कार्यक्रम मात्र नव्हते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील वार्तापत्रांना प्रत्येकी फक्त दहा पंधरा मिनिटे मिळत. स्व.स्मिता पाटील आणि स्व.भक्ती बर्वे यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न निवेदिका असूनसुध्दा त्यांनी वाचलेल्या ठळक बातम्यांच्या मथळ्यानंतर पुढल्या सविस्तर बातम्या त्या काळी बहुतेक वेळा ऐकाव्याशा वाटत नसत. त्यामुळे दिवसाचे चोवीस तास फक्त बातम्या देणारे सीएनएन चॅनल हेच एक आश्चर्य होते.

त्या दिवसातले दूरदर्शन आणि सीएनएन यांच्या बातम्यांमध्ये जमीन आसमानाइतका फरक असायचा. दूरदर्शन केंद्राकडे असलेली मोजकी मोबाइल फोटोग्राफिक यंत्रे आधीपासून ठरवून केलेल्या कार्यक्रमांच्या जागी पाठवली जात. निरनिराळ्या सभा, संमेलने, खेळाचे सामने, मंत्र्यांचे दौरे वगैरे ठिकाणी जाऊन त्या जागी ठरलेल्या घटनांचे चित्रीकरण करून त्या परत जात आणि त्यावर प्रक्रिया केल्यानंतर ती हकीकत त्यानंतर जमेल तेंव्हा बातम्यांमध्ये दाखवण्यात येत असे. त्यामुळे मान्यवर पाहुण्यांचे हारतुरे घालून झालेले स्वागत, त्यांनी केलेले दीपप्रज्वलन, त्यांचे भाषण किंवा त्यांच्या हस्ते झालेला बक्षिससमारंभ अशा प्रकारच्या घटना तेवढ्या दृष्य स्वरूपात असत आणि इतर सर्व बातम्या निवेदिका चक्क वाचून दाखवत. रेडिओवरील बातम्या ऐकण्यापेक्षा त्या फारशा वेगळ्या नसायच्या. त्यातला सुध्दा बराच मोठा भाग कुठे तरी अमका असे म्हणाला आणि दुसरीकडे कुठे तरी तमक्याने असे सांगितले अशा प्रकारचा असायचा. या सांगोवांगीच्या प्रकाराला बातम्या कशाला म्हणायचे असाच प्रश्न अनेक वेळा मला पडत असे. सीएनएनच्या वार्ताहरांचे आणि त्यांना बातम्या पुरवणा-या वृत्तसंस्थांचे जाळे मात्र इतके घट्ट विणलेले होते की वादळ, भूकंप यासारख्या नैसर्गिक घटना असोत, अपघात वा दुर्घटना असोत किंवा खून, मारामा-या, दंगेधोपे वगैरे मानवनिर्मित घटना असोत, त्या जागी कांही क्षणातच त्यांचे वार्ताहर पोचून जात आणि घटना घडल्यानंतर थोड्याच वेळात सीएनएनवर त्या जागेची चलचित्रे दाखवायला सुरुवात होत असे. ठरवून झालेल्या कार्यक्रमांच्या जोडीने अकस्मात झालेल्या घटनांचेसुध्दा सचित्र वृत्तांत येत असल्याने त्या बातम्या कानांनी ऐकण्यापेक्षा डोळ्यांनी त्यांच्या संबंधातील दृष्ये पहाण्याचे वेगळे समाधान मिळत असे. आपण स्वतः त्या घटनास्थळी गेल्यासारखे वाटत असे.

आपल्या देशात कोणाच्या भावना कशामुळे केंव्हा दुखावल्या जातील आणि त्याचा परिपाक कशा प्रकारचे नवे प्रश्न निर्माण करण्यात होईल याचा भरंवसा नाही. त्याशिवाय विधीमंडळांचा हक्कभंग आणि न्यायालयाची अवज्ञा होण्याची धास्ती मनात असते. त्यामुळे दूरदर्शनवर कोठल्याही घटनेची बातमी देतांना त्यातील संबंधित पात्रांना 'अल्पसंख्यांक', 'बहुसंख्यांक', 'स्थानिक', 'परप्रांतीय', 'परभाषिक', 'परकीय', 'पुढारलेला', 'मागासलेला', 'बहुजनसमाज' अशा प्रकारचे बुरखे घालून त्यांचा उल्लेख केला जात असे. कांही अनाकलनीय कारणांपोटी कोठल्याही खाजगी व्यावसायिक संस्थेच्या किंवा त्याच्या प्रसिध्द उत्पादनाच्या नांवाचा साधा उल्लेख करणेसुध्दा टाळले जात असे. "अमक्या राज्यातल्या किंवा तमक्या शहरातल्या एका उद्योगसमूहाने या या क्षेत्रात प्रचंड कामगिरी करून जागतिक बाजारपेठेत आपले स्थान बळकट केले आहे." असे सांगतांना त्या जगप्रसिध्द झालेल्या कंपनीचे नांव भारतातील प्रेक्षकांपासून मात्र लपवले जात असे. तसेच अमक्या शहरातल्या एका कारखान्यात मोठी आग लागून त्यात दहा लोक मृत्युमुखी पडले." असे सांगितल्यामुळे त्या शहरात नोकरीसाठी गेलेल्या लक्षावधी लोकांच्या नातेवाईकांच्या जिवाला घोर लागत असे. 'फेविकॉल' हे विशेषनाम घेता न आल्यामुळे त्याचा उल्लेख करतांना तो 'चिपकानेवाला पदार्थ' असा करावा लागत असे. अशा सगळ्या बंधनांमुळे दूदर्शनवरल्या बातम्यांचे पुलंच्या शब्दात सांगायचे तर 'दुर्दर्शन' झाले होते. त्या काळी गाजलेल्या एका मार्मिक व्यंगचित्रात दूरदर्शनवरील निवेदिका "आता ऐका, सकाळच्या वर्तमानपत्रातल्या सेन्सॉर केलेल्या बातम्या." असे सांगतांना दाखवले होते.

सीएनएनच्या बातम्यांमध्ये असे आडपडदे नसायचे. कोणत्याही महत्वाच्या घटनेशी संबंधित व्यक्तींचे नांव गावच नव्हे तर त्याची साद्यंत माहिती, त्याच्या घरातली, शेजारी पाजारी राहणारी मंडळी, त्याचे सहकारी, मित्र, विरोधक, प्रतिस्पर्धी वगैरे सर्वांच्या मुलाखती वगैरेसह त्या व़त्ताच्या पाठोपाठ येत असे. त्यात विसंगती असणारच, प्रत्यक्ष जीवनातसुध्दा वेगवेगळ्या लोकांचे वेगळे अनुभव, वेगळे स्वार्थ, वेगळे विचार, वेगळी मते असतातच. सीएनएनवर होत असलेल्या चर्चांमध्ये सहभाग घेणारे लोक स्थानिक, राष्ट्रीय किंवा मित्रराष्ट्रांच्या धोरणावर बेधडक आणि सडकून टीका करत असत किंवा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या नांवाचा उल्लेख करून त्यावर विनोद करतांना मुळीच डगमगत नसत. दूरदर्शनसारख्या सरकारी विभागात अशा बाबतीत जास्तच काळजी घेतली जात असल्यामुळे हे सगळे दूरदर्शनवर दाखवणे निदान त्या काळात तरी कल्पनेच्या पलीकडले होते. यामुळे सीएनएनवरील कार्यक्रम खूप वेगळे, धक्कादायक आणि प्रेक्षणीय वाटत असत. कालांतराने भारतातच अनेक वाहिन्यांचे कार्यक्रम टेलिव्हिजनवर येऊ लागले आणि त्यात गुणात्मक तसेच संख्यात्मक सुधारणा होत गेली. तसेच सीएनएन व बीबीसीसह अनेक परदेशातून प्रसारित होणारे अनेक कार्यक्रमसुध्दा घरबसल्या पाहण्याची सोय झाली. रोजच्या सर्वसाधारण प्रकारच्या बातम्यांमध्ये त्यांत फारसे अंतर उरले नसले तरी आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घटना पाहण्यासाठी सीएनएनची आठवण येत असे.

न्यूयॉर्कमध्ये अकरा सप्टेंबरची घटना घडल्याची ब्रेकिंग न्यूज येताच मी आपल्या टीव्हीवर चॅनल बदलून सीएनएन प्रसारण लावले, त्या जागेवर पडलेला ढिगारा, उडत असलेला धुरळा आणि त्यातून जगल्या वाचलेल्या माणसांची धांवपळ यांची चलचित्रे दाखवणे तेवढ्यात सुरू झालेले होते आणि श्वास रोखून ती पहात असतांना अगदी डोळ्यादेखत कुठून तरी एक विमान आले आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या उभ्या असलेल्या दुस-या टॉवरला उध्वस्त करून कोसळतांना दिसले. कल्पितापेक्षाही भयंकर अशी ही भयाण घटना त्या दिवशी प्रत्यक्ष घडत असतांना जगभरातील कोट्यावधी लोकांनी हजारो मैल अंतरावरून घरबसल्या सीएनएनवर पाहिली होती. गेल्या वर्षी झालेल्या अमेरिकेतील निवडणुकीचे वारे वहायला लागल्यानंतर पुन्हा सीएनएन पहायला सुरुवात केली होती. मी अमेरिकेत पोचलो तेंव्हा तर टेलिव्हिजनवर प्रचाराची धुमश्चक्री चालली होती. सीएनएनवर रोज ती पाहतांना खूप मजा येत होती.
अशा सीएनएनचे मुख्यालय अॅटलांटा इथे आहे आणि पर्यटकांना भेट देण्यासारख्या येथील प्रमुख स्थळांमध्ये त्याचा समावेश असल्याने सीएनएन सेंटर आंतून पहायची मला खूप उत्सुकता होती.
.. . . . . . . . . .

सी एन एन च्या अंतरंगात . . .(उत्तरार्ध


सीएनएनचे मुख्यालय अॅटलांटा इथे आहे आणि पर्यटकांना भेट देण्यासारख्या तेथील प्रमुख स्थळांमध्ये त्याचा समावेश असल्याने सीएनएन सेंटर आंतून पहायची मला खूप उत्सुकता होती. डाउनटाउनमधील कोकाकोला म्यूजियमपासून ते जवळच असल्याने ते म्यूजियम पाहून लगेच चालत चालतच आम्ही सीएनएन सेंटरकडे गेलो. वीस पंचवीस वर्षांपूर्वी सीएनएनचा कार्यक्रम पहिल्यांदा पाहतांना जसा मला आश्चर्याचा धक्का बसला होता, त्याप्रमाणेच सीएनएन सेंटरच्या मुख्य दरवाजातून आत शिरताच समोर दिसणारे दृष्य विस्मित करणारे होते. मुंबईच्या नरीमन पॉइंट विभागातल्या गगनचुंबी ऑफीस ब्लॉक्ससारख्या चौकोनी ठोकळ्याच्या आकाराच्या या उत्तुंग इमारतीची अंतर्गत रचनासुध्दा तशीच असेल अशी माझी कल्पना होती. पण आंत येताच टेनिस कोर्टापेक्षा लांब, रुंद आणि सात आठ मजले इतकी उंच अशी अवाढव्य पोकळी समोर दिसत होती. त्या जागेत सगळीकडे दिव्यांचा लखलखाट मात्र होता. त्याच्या एका कोप-यात स्वागतकक्ष होते. सेंटरला भेट देणा-या पर्यटकांना त्याविषयीची माहिती देणे, तिकीटविक्री आणि रिझर्वेशन वगैरेसाठी दोन तीन काउंटर होते, त्याच्या समोर इच्छुक लोकांना रांगेत उभे राहण्यासाठी जागा होती आणि सिक्यूरिटी चेक करण्यासाठी खोल्या होत्या. त्याच्या पलीकडे सा-या मोकळ्या जागेत टेबले खुर्च्या मांडून दोन अडीचशे लोकांना बसण्याची व्यवस्था होती. तीन्ही बाजूंना अमेरिकन, मेक्सिकनपासून चिनी, जपानीपर्यंत सर्व प्रकारच्या खाद्यांचे अनेक स्टॉल होते. एकाद्या खूप मोठ्या मॉलच्या फूडकोर्टमध्ये आल्यासारखे तिथे गेल्यावर वाटत होते. इतर ठिकाणी असले फूडकोर्ट बहुधा मॉल्सच्या सर्वात वरच्या मजल्यावर किंवा तिथून बाहेर निघण्याच्या वाटेवर असतात, इथे आंत बाहेर करण्याचे मार्ग एकाच दरवाजातून आहेत. क्रिकेटच्या मैदानात लावतात तसे अवाढव्य आकाराचे स्क्रीन बाजूच्या भिंतींवर दुस-या वा तिस-या मजल्याइतक्या उंचीवर लावले होते आणि सीएनएनवर चाललेल्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण त्यावर होत होते. खाणेपिणे चालले असतांना बसल्या जागेवरून कोठूनही ते पाहता येईल अशी सोय करून ठेवली होती. आम्ही उगाचच बाहेरच्या एका टपरीत मिळाले ते अन्न पोटात ढकलून भूक भागवल्याचा आम्हाला पश्चात्ताप झाला. सीएनएन सेंटर पाहून झाल्यानंतर तिथल्या खाण्यापिण्याचा जरूर समाचार घ्यायचाच असा विचार करून काउंटरपाशी गेलो.

बहुतेक सर्व वस्तुसंग्रहालये किंवा प्रदर्शने जेवढा वेळ प्रेक्षकांसाठी उघडी असतात तेवढ्या वेळेत तिकीट काढून आंत गेल्यानंतर त्यातील कोणताही विभाग कुठल्याही क्रमाने हवा तेवढा वेळ पाहण्याची मुभा असते. परदेशात अनेक जागी फोटो किंवा व्हीडिओ शूटिंगला परवानगी असते, एवढेच नव्हे तर प्रवेशद्वारापाशीच त्यासाठी कॅमेरे विकत किंवा भाड्याने मिळतात. पूर्वी फोटो फिल्म्स मिळत असत, आता एसडी (फ्लॅश मेमरी) कार्डस मिळतात. त्यामुळे तिथे आलेले बहुतेक पर्यटक आपल्याला आवडलेल्या वस्तू किंवा दृष्यांचे चित्रीकरण करीत जागोजागी उभे असतांना दिसतात. कांही प्रदर्शनांची मांडणी मात्र जादूच्या गुहेसारखी केलेली असते. त्यात माणसाने गोंधळून हरवून जाऊ नये किंवा क्रमाक्रमाने त्यात मांडलेली दृष्ये पाहतांना त्यातून अपेक्षित परिणाम साधावा या कारणांसाठी आंत प्रवेश केल्यापासून बाहेर निघेपर्यंत एकाच वळणावळणाच्या मार्गिकेतून पुढे सरकत जावे लागते. पुढे गेल्यानंतर मागे वळून परत जाता येत नाही. आणीबाणीची परिस्थिती असेल तर थेट बाहेर पडणारे एक्झिट्स असतात. पण तिथेसुध्दा मुख्य दरवाजातून केंव्हाही आंत शिरता येते आणि वाटल्यास हळूहळू किंवा तरातरा पुढे सरकता येते. 'इनसाईड सीएनएन' हा मात्र एक वेगळ्याच प्रकारचा कार्यक्रम आहे. तो गटागटाने मार्गदर्शकाच्या साथीनेच पायी फिरत जाण्याचा तासभराचा कार्यक्रम आहे. त्यात कसल्याही प्रकारचे चित्रीकरण करणे निषिध्द आहे. सिनेमाचा खेळ किंवा विमानाचे उड्डाण यांच्या वेळा जशा ठरलेल्या असतात, त्याचप्रमाणे सीएनएनदर्शनासाठी ठरलेल्या वेळी एकेका ग्रुपला प्रवेश दिला जातो. आम्ही पोचलो तेंव्हा एक गट आंत जाण्याच्या तयारीत रांगेत उभा होता, पण त्यात जागा शिल्लक नसल्यामुळे आम्ही पुढच्या गटाचे आरक्षण केले आणि थोडा वेळ फुडकोर्टमध्ये काढून दिलेल्या वेळी हजर झालो.

दहशतवाद्यांच्या कारवाया सुरू झाल्यापासून अमेरिकेत सगळ्याच सार्वजनिक जागी कडक सुरक्षितता बाळगली जाते. सीएनएन सेंटरमधली तपासणी तर विमानतळावर असते तशासारखीच होती. डोक्यावरची कॅप, पायातले बूट, अंगावरचे डगले, कंबरेचा पट्टा, हांतातले घड्याळ, बोटातल्या अंगठ्या, खिशातला मोबाईल, पैशाचे पाकीट, किल्ल्यांचा जु़डगा वगैरे सगळे कांही काढून एका मोठ्या ट्रेमध्ये घालून ते एक्सरे मशीनमध्ये जाणा-या पट्ट्यावर ठेवायचे आणि दोन्ही हात वर धरून मेटल डिटेक्टरच्या चौकटीतून पलीकडे जायचे. त्यातून थो़डासा जरी पींपीं असा आवाज निघाला तर पाठीमागे परत जाऊन खिशात चुकून राहिलेली वस्तू काढून ती ट्रेमध्ये ठेवायची. गळ्यात, हातात, बोटात, कांनात, केसात वगैरे जागोजागी प्रयत्नपूर्वक अडकवलेली सगळी आभूषणे चारचौघांच्यादेखत काढून लंकेची पार्वती होणे महिलावर्गाला मुळीच पसंत नव्हते आणि एवढे दिव्य करून असे काय मोठे इथे पहायला मिळणार आहे हा भाव त्यांच्या नजरेत दिसत होता, पण इतक्या दूर येऊन आणि पैसे मोजून काढलेले महागाईचे तिकीट वाया जाऊ नये यासाठी त्यांना ते दिव्य करावे लागत होते.

एवढी साग्रसंगीत 'सुरक्षा जाँच' झाल्यानंतर आम्हाला एका महिला गाईडच्या हवाली केले गेले. तिने पहिल्यांदा सर्व पर्यटकांना एका अवाढव्य एस्केलेटरने सरळ आठ मजले उंचावर नेले. लिफ्टच्या बंद कपाटात घुसून वर खाली जाणे आणि उघड्या एस्केलेटरमधून चोहीकडे पहात वर जाणे यात मोठा फरक आहे. ते करतांना आपण स्पाइडरमॅनप्रमाणे सरसर वर चढून जात आहोत असा भास होत होता. आधी एका सभागृहात नेऊन सर्वांना सीएनएनबद्दल सर्वसाधारण माहिती देणारी एक छोटी फिल्म दाखवली गेली. त्यानंतर एक एक शिडी उतरत प्रत्येक मजल्यावर चाललेले काम कांचेच्या तावदानातून दाखवण्यात आले. प्रत्येक जागी त्या त्या ठिकाणी होत असलेल्या कामाची थो़डक्यात माहिती करून दिल्यानंतर त्याबद्दल कोणाला प्रश्न विचारायचे आहेत काय असे ती विचारायची. शाळेतले शिक्षक एक धडा शिकवून झाल्यानंतर कोणाला कांही शंका आहेत काय असे विचारतात, तसाच हा प्रकार होता. कोणी अवांतर प्रश्न विचारल्यास त्याची माहिती पुढल्या भागात मिळेल किंवा सीएनएनच्या वेबसाईटवर पहा असे सांगून ती त्याला कटवत होती, मात्र विषयाला अनुसरून असलेला प्रश्न नीट समजून घेऊन त्याचे समाधानकारक उत्तर ती देत होती.

सीएनएनचे अमेरिकन जनतेसाठी होणारे प्रसारण आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी असलेले भारतात दिसणारे प्रसारण यासाठी लागणारे काम संपूर्णपणे स्वायत्त असलेल्या दोन वेगवेगळ्या विभागातून केले जाते. आमच्या सीएनएन दर्शनाच्या कार्यक्रमाची व्याप्ती त्यापैकी फक्त अमेरिकेतल्या प्रसारणापुरती मर्यादित होती. टेलिव्हिजनवर अर्ध्या तासात संपणा-या एका एपिसोडचे शूटिंग तीन चार तास चालते आणि त्याच्या पूर्वतयारीसह निदान अर्धा दिवस त्यात मोडतो याचा मला अनुभव आहे. त्यानंतर होणारे एडिटिंग, मिक्सिंग वगैरे पोस्टप्रोसेसिंगसाठी लागणारा वेळ वेगळाच. यामुळे आज टेलिव्हिजनवर दिसणा-या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग कांही दिवस आधी होऊन गेलेले असते. पण बातम्यांची गोष्ट वेगळी असते. आजकाल प्रसारणाचा वेग इतका वाढलेला आहे की सकाळी घडलेल्या घटनेची बातमी संध्याकाळपर्यंत शिळी होते, दुसरे दिवशी ती भूतकालात जाते आणि तिस-या दिवशीपर्यंत तिच्याशी संबंध नसलेल्या बहुतेक लोकांना तिचे विस्मरण होऊन गेलेले असते. यामुळे कोणतीही घटना घडल्यानंतर तिची बातमी लवकरात लवकर टीव्हीवर दाखवणे महत्वाचे असते. खेळ किंवा समारंभ यांचे वेळापत्रक आधीपासून ठरलेले असल्यामुळे त्याच्या चित्रीकरणाची परिपूर्ण व्यवस्था करणे शक्य असते, पण अवचित घडणा-या घटनांच्या सविस्तर बातम्या देण्यासाठी सतत सुसज्ज राहणे एवढेच करता येते. सीएनएनचा सारा डोलारा वृत्तप्रसारणावर आधारलेला असल्यामुळे या कामात जितकी कार्यक्षमता आणि तत्परता आणणे शक्य असेल तेवढी आणण्याचा प्रयत्न तिथे सतत केला जातो. तो कसा केला जातो याची छोटीशी झलक या कार्यक्रमात पर्यटकांना दाखवली जाते.

सीएनएन सेंटरची इमारत बांधतांनाच तिच्यातील अनेकविध दालनात काय चालले आहे हे बाहेरून दिसावे अशी व्यवस्था करून ठेवली आहे. प्रत्येक मजल्यावर लांबट आकाराचे मोठमोठे हॉल असून त्यात ओपन ऑफीस कन्सेप्टनुसार अर्ध्या उंचीची पार्टिशन्स घातली आहेत. चौकौनाच्या एका बाजूला पन्नास साठ फूट लांब कांचेची तावदाने लावलेली साउंडप्रूफ गॅलरी आहे. ती पुरुषभर उंचावर असल्यामुळे तिथे उभे राहून आतले संपूर्ण दृष्य दिसते, पण आत काम करत असलेल्या लोकांना प्रेक्षकांचा उपद्रव होत नाही. रोजच वीस पंचवीस वेगवेगळ्या गटात मिळून हजारभर प्रेक्षक तिथे येणार हे ठाऊक असल्यामुळे त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून आंतल्या सर्व कर्मचा-यांचे काम शांतपणे चाललेले असते. जगभरातून येत असलेले संदेश गोळा करून व त्यांचे संकलन करून प्रसारण करण्याच्या कामासाठी अनेक कुशल अधिका-यांची फौज कार्यरत असते. विषयानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्यांसाठी लहान लहान गट असतात. त्यातले संपादक, उपसंपादक, सहाय्यक वगैरेंना कामे वाटून दिलेली असतात. ते मिळालेल्या बातमीचा मजकूर लिहून त्याच्या व्हीडिओ क्लिप्स तयार करून देतात. चार पांच अनुभवी, तल्लख बुध्दीच्या आणि शांत प्रवृत्तीच्या अधिका-यांचे एक मंडळ या क्लिप्स पाहून त्यावर थोडीशी चर्चा करून त्यातले काय काय आणि किती प्रमाणात सांगायचे आणि दाखवायचे हे ठरवत असते. त्यांच्यात एकवाक्यता असतेच, शिवाय अंतिम निर्णय कुणाचा हे ठरलेले असते. त्याप्रमाणे तयार झालेले वृत्त नियंत्रण कक्षाकडे पाठवले जाते. प्रत्यक्षात चालेले प्रसारण कसे दिसते आहे याकडे त्या मंडळीचे लक्ष असतेच.

कांही विशेष कार्यक्रम एकादा विषय ठरवून त्यानुसार सवडीने तयार केले जातात. कदाचित तो कार्यक्रम आफ्रिकेतले जंगल किंवा अँटार्क्टिकाच्या बर्फाळ प्रदेशाबद्दल असेल, अवाढव्य उद्योगसमूहाबद्दल असेल किंवा इतिहासकाळात होऊन गेलेल्या काळाबद्दल असेल. त्यानुसार संशोधन करून शक्य तितक्या दृष्य स्वरूपातील माहिती गोळा करणे आणि त्यासाठी खास दृष्यांचे चित्रीकरण करणे, त्याचे संकलन वगैरेची कामे त्यातली तज्ञ मंडळी करीत असतात. मोठ्या आणि प्रसिध्द लोकांच्या मुलाखती घेण्याचे काम करणारी वेगळी टीम असते. कधी कधी त्या मान्यवरांना सीएनएनच्या स्टूडिओत बोलावले जाते, पण बहुतेक वेळी सीएनएनची टीम आपल्या साधनसामुग्रीसह त्यांना भेटायला जाते. कधी ही मुलाखत होऊन गेल्यानंतर दाखवली जाते, पण अनेक वेळा तिचे लाइव्ह टेलिकास्ट असते. त्या वेळी एका ठिकाणी चाललेली मुलाखत, त्याची माहिती देणारे स्टूडिओतले निवेदक आणि त्या मुलाखतीच्या अनुषंगाने दाखवण्यात येणारी इतर क्षणचित्रे या सर्वांचे मिश्रण करणे चालले असते. त्यातही बोलला जात असलेला प्रत्येक शब्द सबटायटल्सद्वारे दाखवला जात असतो. हे सारे काम करणारी तज्ञ आणि कमालीची कार्यक्षम मंडळी नियंत्रणकक्षात बसून हे काम करत असतात. त्यांचे दुरून दर्शन कांचेतून घडते.

एका डमी न्यूजरूममध्ये नेऊन आम्हाला तिथली अंतर्गत रचना दाखवली गेली. या भागात पार्श्वभूमीवर एक गडद हिरव्या रंगाचा पडदा लावलेला असतो. एका बाजूला ठेवलेल्या खुर्च्यांवर बसून वृत्तनिवेदक बातम्यांचे वाचन करतात. त्यांना दिसतील पण कॅमे-याच्या कक्षेत येणार नाहीत अशा जागी मॉनिटरवर त्यातले शब्द आणि वाक्ये उमटत असतात, ती वाचून हे निवेदक कॅमे-याकडे पाहून ते सांगत असतात. एकाच वेळी अनेक कॅमेरे वेगवेगळ्या बाजूने आणि झूम करून चित्रण करीत असतात, त्यातली चित्रे निवडून ती प्रक्षेपित केली जात असतात. स्टेजवरील दुस-या अर्ध्या भागात पडद्यासमोर मोकळी जागा असते. त्या ठिकाणी उभे राहून आणि मॉनिटरवर नजर ठेऊन निवेदक हवेतच हात वारे करीत असतात. आपल्याला मात्र पडद्यावरील एकादे चित्र किंवा नकाशातील जागा ते दाखवीत आहेत असा भास होतो. प्रत्यक्षात मागील हिरव्या रंगाचा पडदा अदृष्य होतो आणि तो भाग पारदर्शक होऊन जातो. स्टूडिओमधील छायाचित्र व रेकॉर्डेड किंवा दुसरीकडून येत असलेली क्लिप एकत्र दाखवली जात असल्यामुळे आपल्याला दोन्ही गोष्टी टीव्हीवर एकदम दिसतात. पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष घटना चालली आहे किंवा हवामानखात्याने दिलेली माहिती दिसत आहे आणि निवेदक पुढे उभे राहून आपल्याला ती दाखवते आहे असा आभास केला जातो.

दूरदर्शन आणि इतर कांही भारतीय स्टूडिओंमध्ये जाऊन तिथे चालत असलेले थोडेसे काम पाहण्याची संधी मला पूर्वी मिळाली असली तरी तिथे चालणा-या कामाचे एक अत्याधुनिक तंत्राने परिपूर्ण असे सर्वंकष दर्शन या इनसाइड सीएनएन टूरमध्ये मला घडले आणि थोडक्यात सांगायचे झाले तर ते पाहतांना भरपूर मजा आली.

No comments: