हिंदी चित्रपटसृष्टीत आल्यानंतर सलिल चौधरी यांनी आपला दबदबा निर्माण केला होता. सलिलदांनी संगीतबद्ध केलेली दोन तीन गाणी तरी त्या काळी अत्यंत लोकप्रिय असलेल्या बिनाका गीतमाला या कार्यक्रमात दर बुधवारी वरच्या 'पादान'वर लागत असत आणि त्यामधली कित्येक गाण्यांना 'सरताज' मिळत असे. अशी सात आठ वर्षे गेली. त्यानंतर मधला कांही काळ सलिलदांची एवढी गाणी एका पाठोपाठ आली नाहीत. चाँद और सूरज आणि पूनमकी रात यासारखे कांही सिनेमे आले, पण ते फारसे गाजले नाहीत. "बागमें कली खिली बगिया मेहकी, पर बेवफा भँवरा नही आया" यासारखे नटखट गाणे, "झनन झन बाजे" हे शास्त्रीय संगीत असलेले गीत, आणि "तेरी याद न दिलसे जा सकी" हे विरहगीत अशी कांही गाणी अजून स्मरणात टिकून आहेत. पूनमकी रातमधले "साथी रे, तुझबिन जिया उदास .. आजा, आजा, आजा" हे गूढतामय गाणेसुद्धा अमर झाले. पण एकंदरीत सलिलदांचे अस्तित्व पूर्वीइतके उठून दिसत नव्हते.
त्यांची जादू ओसरली की काय असे वाटत असतांनाच सन १९७१ च्या सुमारास त्यांच्या सदाबहार गाण्यांची नवी लाट घेऊन आनंद हा सिनेमा आला. त्यामधली "जिंदगी कैसी ये पहेली हाये, कभी तो हंसाये कभी ये रुलाये", "कहीं दूर जब दिन ढल जाये, चाँदसी दुलहन बदन चुराये, चुपके से आये", "मैने तेरे लियेही सात रंगके सपने चुने " आणि "ना जिया लागे ना " ही चारही वेगवेगळ्या प्रकृतीची गाणी एकदम ताजी तवानी आणि मनोहारी वाटत होती. त्याच वर्षी आलेल्या मेरे अपने चित्रपटातले "कोई होगा अपना जिसको हम अपना कह देते यारो" हे किशोरकुमारचे गाणेही गाजले. त्याच्या पाठोपाठ आलेल्या अन्नदातामधले "गुजर जाये दिन, दिन, दिन " हे गाणे सलिलदांच्या खास ढंगातले गाणे होते. ते ऐकायला सोपे वाटत असले तरी त्याची चाल अचूकपणे येण्यासाठी कितीतरी वेळा त्या गाण्याचे रिटेक करावे लागले.
त्यानंतर आलेल्या रजनीगंधा सिनेमातले "एक बार यूँ भी देखा है " हे मुकेशचे गाणे आणि "रजनीगंधा फूल तुम्हारे" हे लता मंगेशकरांनी गायिलेले गाणे ही दोन्हीही गाणी सुरेख होती. छोटीसी बात सिनेमातली "जानेमन जानेमन तेरे दो नयन" आणि "न जाने क्यूँ होता है ये जिंदगी के साथ" ही गाणीसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण होती. हे सगळे सिनेमे फाँर्म्यूल्यापासून जरा 'हटके' असे होते. लोकप्रिय चित्रपटांच्या मुख्य प्रवाहापासून सलिलदा थोडे दूर गेले होते.
हिंदी चित्रपटांमध्ये सुरुवातीपासूनच शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांवर आधारलेली गाणी दिली जात होती। इंग्रजी चित्रपटांबरोबर पाश्चात्य संगीताचा प्रभाव त्यावर गेला. हे सगळे सलिल चौधरींनी या क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वीच होऊन गेलेले होते. नौशाद, मदनमोहन, शंकर जयकिशन आदि समकालीन संगीत दिग्दर्शकांनी सुद्धा या तीन्हींचा उत्तम उपयोग केला आहे. त्यातही प्रत्येकाची आपापली लैशिष्ट्ये होती. सलिलदांनी आपली खास अशी स्वतंत्र शैली निर्माण केली.
मेलडी किंवा सुरेलपणा हा गाण्याचा आत्मा असतो असे म्हणतात. सलिलदांच्या संगीतात त्यांनी हा आत्मा मुख्यतः भारतीय ठेवला. पश्चिमेकडून आलेल्या ठेक्यांची साथ देऊन व लय कमी अधिक करून गाण्यांच्या चाली आकर्षक बनवल्या. अनेक प्रकारचे वाद्यसंगीत वापरून त्याची जोड देत गाणी अधिकाधिक चांगली बनवली. भारतीय मूळ संगीताला त्यांनी पाश्चात्य संगीताचा उपयोग करून अलंकृत केले असे म्हणता येईल. फक्त वाद्यसंगीतच नव्हे तर मानवी स्वरांचा उपयोगसुद्धा पार्श्वसंगीतात खुबीने केला. सलिलदांच्या गाण्यात समूहगानाचे स्वर आलेले दिसतात. एक उदाहरणच घ्यायचे झाल्यास जागते रहो या चित्रपटातल्या जागो मोहन प्यारे गाण्यातले "जागोरे जागोरे सब कलियाँ जागी" हा तुकडा पहा.
नंतरच्या काळात पाश्चिमात्य संगीतातली मेलडीच कमी होत जाऊन कर्णकर्कश तालवाद्यांचा प्रभाव वाढला. गाण्यापेक्षा नाचालाच महत्व आले. या प्रकारचे बदल सलिलदांनी केले नाहीत. त्यांचे शैलीदार संगीत हळूहळू लोप पावत गेले.
(समाप्त)
No comments:
Post a Comment