Monday, February 23, 2009

तो मी नव्हेच


महाशिवरात्र या दिवसाचे औचित्य साधून मी निर्वाणषटक किंवा आत्मषटक या नांवाने प्रसिद्ध असलेली जगद्गुरू शंकराचार्यांची एक अद्वितीय रचना या ठिकाणी काल दिली होती. त्यातील शिव या शब्दावरून हे शंकराचे स्तोत्र आहे असे कोणाला वाटेल, किंवा निर्वाणषटक या नांवावरून शिवरात्रीच्या दिवशी (रात्री) त्याचे पठण केल्यामुळे मोक्षप्राप्ती होते असेही कोणी सांगेल. पण कोणत्याही देवाची स्तुती किंवा प्रार्थना यात केलेली नाही. मनुष्य आणि ईश्वर किंवा आत्मा व परमात्मा यांचे ऐक्य साधेल अशा अद्वैताच्या अवस्थेत कोण कुणाला काय मागणार? माझ्यासारख्या जीवनासक्त माणसाला हे विचार करण्याच्यासुद्धा पलीकडले वाटते तर त्याची अनुभूती कुठून येणार? या रचनेतील छंदबद्धता, माधुर्य, विचारांची झेप, जगाचे सूक्ष्म निरीक्षण, त्याविषयी असलेले ज्ञान, पांडित्य, अचूक शब्दरचना या सगळ्या गोष्टी थक्क करणार्‍या आहेत. इतर अनुवादांच्या माध्यमातून त्या शब्दांचा जो कांही अर्थ माझ्या अल्पबुद्धीला अनुभूतीविना समजला तो आपल्या शब्दात देण्याचा अल्पसा प्रयत्न करीत आहे.

कोहम्? किंवा मी कोण आहे? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध अनादिकालापासून जगाच्या पाठीवर सगळ्या मानव समूहांमध्ये चालला आहे आणि अनेक विद्वानांनी त्याची अनेक उत्तरे आपापल्या परीने दिली आहेत. जगाला दिसते ते शरीर म्हणजेच आपण असे सर्वसाधारणपणे समजले जाते. पण "माझे शरीर" म्हणणारा 'मी' कोण आहे? हा फक्त कर्ता कोण आणि कर्म कोण एवढ्यापुरता भाषेतील व्याकरणाचाच प्रश्न आहे कां? निर्जीव कलेवर आणि सजीव प्राणी यांची शरीरे बाहेरून तरी सारखीच दिसत असली तरी त्यात चैतन्य कशामुळे येते? स्वयंचलित यंत्रे निघण्यापूर्वीच्या काळात हा प्रश्न जास्तच महत्वाचा होता कारण जड
वस्तूंमध्ये चैतन्य आणणारे एक वेगळे तत्व असणे त्या काळात आवश्यक वाटत होते. "मला कोणतीही गोष्ट समजते", "ती माझ्या लक्षात राहते", "मला आठवते" वगैरे मधला 'मी' कोण? या प्रश्नाचा वेध घेतांना 'बुद्धी' ही संकल्पना निर्माण झाली. त्याचप्रमाणे "मला आवडते", "मला चीड आणते" ही कामे करणारे मन आले आणि या 'मी'पणाला अहंकार हे नांव मिळाले. पण असे दिसते की आपण नेहमीच मनासारखेही वागत नाही किंवा बुद्धीलाही मानत नाही. अहंकारालाही मुरड घालतो. मग आपल्या क्रिया कोण ठरवते? यासाठी या सगळ्यांच्या मागे चित्त, अंतरात्मा वगैरे आणखी कांही आहे कां? अशा किती अदृष्य गोष्टी आहेत? असल्यास त्यांची रचना व रूपे कशी आहेत? शरीराचाच एक भाग असलेल्या मेंदूमध्येच हे सारे एकवटलेले आहे असा एक विज्ञाननिष्ठ विचार आहे. पण ते नेमके कसे आहे व कशा रीतीने चालते हे अद्याप फारसे कळलेले नाही. हे सगळे इतके गूढ आहे की आपण ते करूच शकणार नाही, कर्ता करविता परमेश्वर वेगळाच आहे असा विचार प्राचीन कालापासून मांडला गेला व सर्व जगात बहुसंख्य लोकांनी तो मानला. हा कर्ता करविता आपले सगळ्यांचे हात पाय डोळे कान वगैरे प्रत्यक्ष चालवतो की आपल्या आत्म्याकरवी ती कामे करून घेतो? हा आत्मा परमात्म्यापासून वेगळा आहे की त्याचाच एक अंश आहे? या प्रश्नातून द्वैत व अद्वैत मते मांडली गेली. त्यामधील अद्वैत मत खालील रचनेत दिले आहे। यामध्ये "मी हे नाही", "ते सुद्धा नाही" असे करीत शंकराचार्यांनी जगाचे सुंदर वर्णन केले आहे.

मन, बुद्धी, अहंकार व चित्त म्हणजे मी नाही, जीभ, नाक, कान, डोळे आदि (ज्ञानेंद्रिये) मी नाही, (पंचमहाभूतातील) जमीन, आकाश, हवा किंवा तेजसुद्धा नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.
मी म्हणजे जीवनाचा प्राण नाही की प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे पांच वायु नाही. रक्त, मांस, मज्जा, अस्थी, कातडी, चरबी आदि ज्या सात धातूंपासून हे शरीर बनलेले आहे किंवा ज्या पांच शारीरिक वा मानसिक आवरणामध्ये ते आच्छादित केलेले आहे ते म्हणजे मी नव्हे. हात, पाय, जीभ, व उत्सर्जक इंद्रिये ही पांच कर्मेंद्रिये म्हणजे मी नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.
राग, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू माझ्यात नाहीत. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ ही मला नकोत. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.
मी पुण्याचा किंवा पापाचा धनी नाही. मला सुखही होत नाही की दुःखही होत नाही. मंत्रपठण, तीर्थयात्रा, यज्ञयाग किंवा वेदांताची मला गरज नाही. मी उपभोग घेणारा नाही, देणारा नाही की उपभोगाची वस्तूही नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.
मला मृत्यूचे भय नाही (कारण मृत्यूच नाही), मी जातींमध्ये भेदभाव करीत नाही, मला माता पिता व जन्मच नाही. भाऊ, मित्र, गुरू, शिष्य कोणीही नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.
मला विकल्प (विचार) नाही की आकार नाही. मी सर्वत्र आहे व सर्व इंद्रियांना चालवतो. पण मी कशाशीच बांधलेलोही नाही की कशापासून मुक्तही नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.

No comments: