Wednesday, February 04, 2009

सलिल चौधरी भाग २


स्व.सलिल चौधरी यांची जीवनयात्रासुद्धा त्यांच्या संगीतासारखीच विलक्षण होती असे म्हणता येईल. त्यांचे वडील आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये डॉक्टर म्हणून काम करीत. या मळ्यांचे मालक त्या काळी बहुधा ब्रिटीश असत तर मजूरवर्ग भारतीय, त्यातही बहुतांश गिरीजन असे. त्यांच्याबद्दल डॉक्टरांना जास्त आपुलकी वाटत असे आणि वेळ पडल्यास ते मालकांविरुद्ध मजूरांना साथ देत असत. हल्ली सुरू असलेल्या 'असंभव' या मालिकेमध्ये आलेल्या 'श्रीरंग रानडे' हे पात्र पाहून मला सलिलदांच्या पिताजींची आठवण झाली.

सलिलदांचे बालपण चहाच्या मळ्यांच्या निसर्गरम्य परिसरात गेले. ब्रिटीश मालकवर्गाच्या सहवासामुळे आणि जात्याच आवड असल्यामुळे सलिलदांच्या वडिलांनी पाश्चात्य संगीताच्या ध्वनीमुद्रिकांचा प्रचंड संग्रह केला होता. त्यातली गाणी ऐकत मोझार्ट आणि बिथोवन यांच्या रचनामधून सलिलदांनी स्वरांची ओळख करून घेतली. कुशाग्र बुद्धीमत्ता आणि ग्रहणशीलता असल्यामुळे कुठल्याही गुरूच्या मार्गदर्शनाशिवायच ते स्वरमालिका शिकले एवढेच नव्हे तर ऐकलेले किंवा सुचलेले स्वर लिपीबद्ध करू लागले. पियानो, हार्मोनियम व व्हायलिनसारखी पाश्चात्य वाद्ये आणि बांसुरीसारखी भारतीय वाद्येदेखील ते आपल्या स्वतःच्या प्रयत्नानेच वाजवायला शिकले. मजूरांच्या सान्निध्यात राहून त्यांनी ईशान्य भारतातील लोकसंगीत भरपूर ऐकले आणि तेही आत्मसात केले. शांत निसर्गरम्य ठिकाणी बसून पांव्याचे मधुर स्वर आळवायचा नाद त्यांना लागला.

संगीताच्या क्षेत्रात अशी एकट्याने वाटचाल सुरू असतांना त्यांच्या मनावर साम्यवादी विचारांचा प्रभाव पडत होता. गरीब मजूरांना एकत्र आणून त्यांच्या समस्यासाठी लढा देणे वगैरे गतिविधींना सुरुवात झाली. त्या विषयांना अनुरूप अशी ज्वलंत गाणी रचून व त्यांना आकर्षक चाली लावून ती कामगारांकडून म्हणवून घेणे, त्यांच्यासाठी नाटके व पथनाट्ये लिहून ती बसवणे हा सुद्धा लढ्याचा एक भाग म्हणून त्यांनी केला. अशा विविध माध्यमांमधून आपले क्रांतिकारी विचार दीनदुबळ्या जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या कार्यात गुंतल्यामुळे दुस-या महायुद्धाच्या काळात त्यांना भूमीगत व्हावे लागले. पुढील काळात ते संगीताकडे वळले नसते तर खचितच राजकीय पुढारी झाले असते, किंवा कदाचित प्रसिद्ध साहित्यिकही झाले असते. या सगळ्या क्षेत्रात त्यांना रुची होती तसेच चांगल्यापैकी गतीसुद्धा होती आणि मुख्य म्हणजे शिखरापर्यंत चढून जाण्याची जिद्द व क्षमता होती.
त्यांनी गाणी लिहिली तसेच कथासुद्धा लिहिल्या आणि त्या चांगल्या गाजल्या. त्यांनी लिहिलेली नाटके बंगाली रंगभूमीवर आली आणि लोकप्रिय झाली. बंगाली भाषेतील चित्रपटांसाठी कथा व गाणी लिहिली ती सुद्धा यशस्वी झाली. बंगाली चित्रपटक्षेत्रात त्यांचे नांव झाले. कोलकाता शहरात मोलमजूरी करून आपली गांवाकडील जमीन सावकाराच्या पाशातून सोडवण्याची स्वप्ने पाहणा-या गरीब बिचा-या माणसाच्या जीवनाची कशी फरपट होते या गोष्टीवर त्यांनी लिहिलेली कथा 'रिक्शावाला' या नांवाने बंगाली सिनेमाच्या पडद्यावर आली.

ती पाहून तिचे हिंदीत रूपांतर करण्यासाठी स्व.बिमल रॉय यांनी सलिल चौधरी यांना मुंबईला पाचारण केले आणि या कथेवर आधारित 'दो बीघा जमीन' हा चित्रपट करण्यासाठी ते मुंबईला आले. हा चित्रपट चांगला गाजला. बिमल रॉय यांचे कुशल दिग्दर्शन व बलराज साहनी यांनी विलक्षण ताकदीने साकारलेली त्यातली प्रमुख भूमिका तर लक्षात राहिलीच. पण सलिल चौधरींची कथा, त्यांनी दिलेले प्रभावी पार्श्वसंगीत आणि त्यातील 'धरती कहे पुकारके ... मौसम बीता जाये' हे गाणे खूप गाजले. त्यानंतर अनेक वर्शे ते बिमलदांच्या बरोबर राहिले. बंगाली चित्रपट सुरूच होते. हिंदी व इतर भारतीय भाषांमधील चित्रपट त्यांना एकामागोमाग एक मिळत गेले.


. . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: