Thursday, February 26, 2009

लीड्सचा प्रवास


मुंबईहून पुण्याला जायचं म्हंटलं की "कशासाठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी" करीत जाणारी झुकझुक गाडीच पटकन आठवते. कालांतराने एस्.टी बसेस, एशियाड, टॅक्सी वगैरे आल्या. आता व्होल्व्हो बोकाळल्या आहेत. पण पुण्याजवळ लोहगांवला एक विमानतळ आहे आणि सांताक्रुझहून तेथे विमानाने जायची सोय आहे हे मात्र कधीच पटकन डोक्यात येत नाही. इंग्लंडमध्ये लीड्स हे असेच एक शहर आहे. आपल्या पुण्यासारखीच त्यालाही ऐतिहासिक परंपरा आहे, तिथं अनेक नांवाजलेल्या शिक्षणसंस्था आहेत आणि प्रामुख्याने मध्यमवर्गीयांची वस्ती आहे. लंडन या महानगरापासून दीडदोनशे मैलावरील हे टुमदार शहर उत्तम रेल्वे आणि रस्त्यांनी लंडनशी जोडलेले आहे. त्यामुळे हा प्रवास बहुतेक लोक कारने करतात नाही तर ट्रेनने.

आमचे लीड्सला जायचे ठरले तेंव्हा आम्हीही असाच विचार केला. पण लंडन विमानतळावरून थेट लीड्सला टॅक्सी केली तर सुमारे तीन चारशे पौण्ड लागतात म्हणे, म्हणजे पंचवीस तीस हजार रुपये. हे मात्र फार म्हणजे फारच झाले. अहो एवढ्या पैशात तर मुंबई ते लंडनला जाऊन परत यायचं तिकीट मिळतं. मग लंडन विमानतळावरून मुख्य रेल्वेस्टेशनपर्यंत लोकल ट्यूब आणि तिथून लीड्सपर्यंत मेन लाईन ट्रेनने प्रवास करायचा असे ठरले. पण सामानासह ही शोधाशोध करण्याची दगदग वयोमानाप्रमाणे झेपेल कां हाही एक प्रश्न होता. त्यामुळे आम्हाला उतरवून घेण्यासाठी कोणी लंडनला यायचे हे ओघानेच आले. त्यातही एकंदर शंभर दीडशे पौंड खर्च झालेच असते. शिवाय वेळ आणि दगदग वेगळी. तेवढ्यात विमानाचं तिकीट मिळाले तर?

मी विमानाची तिकीटं बुक करायला ट्रॅव्हल एजंटकडे गेलो तेंव्हा सगळ्याच चौकशा केल्या. त्यावरून लक्षात आलं की विमानाच्या तिकीटांच्या किंमती ही एक अगम्य आणि अतर्क्य गोष्ट आहे. एअरलाईन्सची नॉर्मल भाडी खरे तर अवाच्या सवा असतात. ऑफीसच्या खर्चाने जाणार्‍यानाच ती परवडतात आणि गरजू लोक नाईलाजापोटी देतात. कमी खर्चाच्या प्रवासासाठी इतक्या प्रकारच्या स्कीम्स, पॅकेजेस आणि डील्स असतात की अनुभवी एजंटकडे सुध्दा त्यांची संपूर्ण माहिती नसते. त्यामुळे तो अचूक मार्गदर्शन करू शकत नाही. कुठल्या दिवशी कुठल्या कंपनीच्या विमानाने कुठून कुठे जायचं आहे हे आधी इंटरनेटवर फीड करायचे आणि उत्तराची वाट पहायची. त्या दिवशी कुठल्या फ्लाईटमध्ये किती किंमतीची तिकिटे उपलब्ध आहेत हे त्यानंतर कळणार, अशी पध्दत आहे. बर्‍यापैकी बिजिनेस चालत असलेल्या कुठल्याही एजंटकडे तीन चार पेक्षा जास्त ट्रायल मारायला वेळ नसतो.

आमच्या एजंटला पहिल्या ट्रायलमध्येच मुंबई लंडन लीड्स आणि त्याच मार्गाने परतीचे तिकीट वाजवी वाटणार्‍या किंमतीत उपलब्ध दिसलं पण तिथे रात्री उशीरा पोचणार होतो, तेही सध्याच्या कडाक्याच्या थंडीत. आणि परतीच्या प्रवासात तर एक रात्र स्वतःच्या खर्चाने लंडनला घालवायची होती. एकंदरीत गैरसोयच जास्त असल्यामुळे हा प्रस्ताव मी अमान्य केला. आणखी दोन तीन ट्रायलमध्ये मुंबई लंडन मुंबई आणि लंडन लीड्स या प्रवासांसाठी वेगवेगळ्या स्कीम्समध्ये पण सोयिस्कर वेळच्या फ्लाईट्समध्ये तिकीटे मिळाली ती तर खूपच स्वस्तात पडली. लंडन ते लीड्स विमानाचे तिकीट चक्क ट्रेनपेक्षासुध्दा स्वस्त असलेले पाहून धक्काच बसला. मात्र त्यात अशी अट होती की कुठल्याही परिस्थितीत ते बदलता येणार नाही किंवा त्याचा रिफंड मिळणार नाही. कुठल्याही कारणाने ती फ्लाईट चुकली तर मात्र ते पैसे वाया गेले आणि आयत्या वेळी नवीन तिकीट दामदुपट किमतीत घ्यावे लागणार। हा धोका पत्करणे भाग होते.

ठरलेल्या दिवशी वेळेवर सहार विमानतळावर पोचलो. कुठल्या दरवाजातून आत शिरायचे हे काही समजेना कारण आमचे तिकीट ज्या ब्रिटिश मिडलॅंड एअरलाईन्सचे होते तिचा उल्लेख कुठल्याच बोर्डावर दिसेना. मुंबईहून सुटणारी ही फ्लाईट त्या काळात कदाचित नव्यानेच सुरू झाली होती. दोन तीन दरवाजावर धक्के खाल्यावर एकदाचा प्रवेश तर मिळाला. तोपर्यंत आमच्या फ्लाईटची अनाउन्समेंट मॉनिटरवर झळकली होती ती पाहून जीव भांड्यात पडला. आम्ही दोघांनीही जीन्स आणि जॅकेट परिधान केले असले तरी मूळ मराठी रांगडेपण काही लपलं नव्हतं. एक्सरे मशीन वरून बॅगा उतरवणार्‍या लोडरने आम्ही कुठल्या फ्लाईटने जाणार आहोत याची अगदी आपुलकीने मराठीत विचारपूस केली. मी त्याला मारे ऐटीत बी.एम.आय.ने लंडनला जाणार असल्याचे सांगितले. त्यावर त्याने बारा एअरलाईन्सच्या बत्तीस बाटल्यातील रंगीबेरंगी पाणी प्याले असल्याच्या आविर्भावात आमची कींव करीत कुठल्या फडतूस कंपनीच्या भुक्कड विमानाने प्रवास करायची वेळ आमच्यावर आली आहे असा शेरा मारला आणि ती सगळी मद्राशांनी भरलेली असते अशीही माहिती पुरवली. बहुधा बी.एम. म्हणजे बंगलोर मद्रास असा अर्थ त्याच्या डोक्यात भरवून कोणीतरी त्याची फिरकी घेतली असावी.

अशा प्रकारचा प्रथमग्रासे मक्षिकापात मनावर न घेता आम्ही पुढे गेलो. बी.एम.आय.च्या काउंटर वर आमचं अगदी सुहास्य स्वागत झालं. तिथल्या सुंदरीने वेगवेगळी तिकीटे असूनही आमचे थेट लीड्सपर्यंतचे चेक इन करून दिले आणि सामान आता लीड्सपर्यंत परस्पर जाईल, आम्हाला लंडनला कांही कष्ट पडणार नाहीत असे आश्वासन सुध्दा दिले. इमिग्रेशन, कम्टम्स वगैरे सोपस्कारसुध्दा आता एकदम लीड्सलाच होतील अशी चुकीची माहितीही दिली. लंडन हे पोर्ट ऑफ एंट्री असल्यामुळे यू.के. मध्ये आम्हाला प्रवेश देणे सुरक्षित आहे की नाही हे तिथलाच साहेब ठरवेल असे मला वाटत होते, पण ही गोष्ट कदाचित लीड्समधला साहेब ठरवेल आणि तसे असेल तर ते माझ्याच सोयीचे आहे अशा विचाराने मी वाद घातला नाही.

चेक इन झाल्यावर बराच अवकाश होता म्हणून आरामात थोडा अल्पोपहार घेतला तोपर्यंत मॉनिटरवर अनेक फ्लाईट्सचे स्टेटस बदलून इमिग्रेशन, सिक्युरिटी, बोर्डिंग वगैरे जाहीर झाले होते पण आमच्या फ्लाईटची मात्र जैसे थे परिस्थिती होती. मुंबई विमानतळाच्या लेखी तिचे अस्तित्व नगण्य असावे. पुन्हा चौकशी केल्यावर मॉनिटरकडे लक्ष न देता स्थितप्रज्ञ वृत्ती ठेऊन आपली यात्रा पुढे चालू ठेवण्याचा सल्ला मिळाला. त्याप्रमाणे सारे सोपस्कार सुरळीतपणे पार करून आम्ही विमानात स्थानापन्न झालो व पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने मुंबईहून पश्चिम दिशेला उड्डाण केले.

एअरबस ए ३३० मॉडेलच्या त्या नव्या कोर्‍या विमानात सर्व आधुनिक सोयी होत्या. रात्री दीड वाजता सुध्दा बर्‍यापैकी खायला आणि थोडेसे प्यायलासुध्दा मिळाले. वेगवेगळे इंग्लिश व हिन्दी चित्रपट पहात, संगीत ऐकत आणि डुलक्या घेत चांदणी रात्र संपून सोनेरी पहाट केंव्हा झाली ते नाश्ता आला तेंव्हाच कळले. कॉन्टिनेन्टल ब्रेकफास्टमध्ये ज्यूस, ऑमलेट, फळे. योघर्ट, सॉसेजेस वगैरे भरपूर खादाडी होती. शाकाहारी भारतीय पर्याय सुध्दा होता त्यात मात्र कांजीवरम उपमा नावाचा एक पदार्थ आणि मोनॅको बिस्किटाएवढ्या आकाराचे उत्तप्पे ठेवले होते. कदाचित हा सो कॉल्ड मद्रासी टच असेल. न्याहारी उरकेपर्यंत लंडन शहर दिसायला लागले आणि विमान जमीनीवर उतरावयाची तयारी सुरू झाली.

लंडनला उतरल्यावर पॅसेजमध्येच प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी व्यवस्थित खुणा आणि फलक जागोजागी ठळकपणे लावलेले होते. तिथेच विमानतळाच्या बाहेर जाणारे, यू. के. मधीलच दुसर्‍या गावाला जाणारे आणि परदेशी तिसर्‍याच देशाला जाणारे असे प्रवाशांचे तीन गट करून त्यांना वेगवेगळ्या मार्गांनी जायच्या सूचना होत्या. आम्ही दुसर्‍या प्रकारचे प्रवासी असल्यामुळे मध्यममार्ग पत्करून त्यानुसार बाणांचा पाठपुरावा करीत पुढे पुढे जात राहिलो. आमचे लीड्सला जाणारे विमान सुदैवाने त्याच टर्मिनलवरून सुटणार होते. सहारहून सांताक्रूझ विमानतळाला जाण्यासाठी लागते त्याप्रमाणे त्यासाठी बिल्डिंगच्या बाहेर जाऊन बस घ्यायची गरज पडली नाही. पण त्याच विमानतळाच्या एका भागातून दुसर्‍या भागात जाणेसुध्दा कांही सहज गोष्ट नव्हती. कितीतरी लांबलचक कन्व्हेअर बेल्ट पार करून आणि अनंत एस्केलेटरवरून चढउतार केल्यावर एका प्रशस्त दालनांत येऊन पोचलो.

तिथे लांबचलांब रांगा लागलेल्या होत्या. त्यामधून प्रत्येक प्रवाशाची अगदी कसून सुरक्षा तपासणी झाली. अंगावरील ओव्हरकोट, जॅकेट आणि खिशातील मोबाईल फोनसुध्दा काढून त्या सर्व गोष्टी एक्सरे मशीन मधून तपासल्या. खरे तर आधीच विमानातून आलेल्या प्रवाशांची पुन्हा तपासणी कशाला ? पण बहुधा ही पुढील प्रवासाची तयारी होती. दुसर्‍या देशांमधील तपासणीवर ब्रिटीशांचा विश्वास नसावा. त्यानंतर पासपोर्ट कंट्रोल नावाच्या कक्षामध्ये गेलो. ब्रिटीश पासपोर्ट धारकांसाठी खुला दरवाजा होता. इतरांसाठी इंटरव्ह्यू देणे आवश्यक होते. आमचीही जुजबी विचारपूस झाली. आमच्यापासून यू. के. च्या सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक व्यवस्थेला कांही धोका पोचेल अशी शंका येण्याचे कांही कारण नसल्यामुळे लवकर सुटका झाली.

आता लीड्सला जाणारे विमान गेट नंबर आठ वरून पकडायचे होते. पुन्हा अनेक कन्व्हेअर्स व एस्केलेटर्स पार करून तिथे पोचलो. हे एकच गेट भारतातल्या एकाद्या छोट्या एअरपोर्टवरील पूर्ण टर्मिनलच्या आकारमानाएवढे मोठे आहे व त्यामध्ये ए, बी,सी,डी,ई अशी छोटी गेट्स आहेत. इथे पूर्णपणे बी.एम.आय.चे अधिराज्य आहे. चार पाच प्रशस्त दालने, त्यात भरपूर खुर्च्या मांडलेल्या, विमानतळाचे विहंगम दृष्य दिसेल अशा गॅलर्‍या, फास्ट फूडचा स्टॉल, कोल्ड ड्रिंक व्हेंडिंग मशीन्स, स्मोकर्स चेंबर, टेलीव्हिजन, टेलीफोन, इंटरनेट, व्हिडिओ गेम्सचे बूथ वगैरेने सुसज्ज असा हा कक्ष आहे. बाजूलाच मोठमोठी ड्यूटी फ्री शॉप्ससुध्दा आहेत आणि तिथे हिंडणार्‍याने खरेदी केलीच पाहिजे असा आग्रह नाही. विमानतळावर एका बाजूला एकापाठोपाठ एक विमाने उतरत होती आणि दुसर्‍या बाजूने उड्डाण करीत होती. आमच्या गेटवरूनच दर वीस पंचवीस मिनिटांनी कुठे ना कुठे जाणारी फ्लाईट सुटत होती त्यामुळे प्रवाशांची भरपूर जा ये सुरू होती आणि वेगवेगळे आंतरराष्ट्रीय नमुने पहायला मिळत होते. एकंदरीत छान टाईमपास होत होता.

यथावकाश आमच्या विमानाने आम्हाला घेऊन उत्तरेला झेप घेतली. या फ्लाईटमध्ये फुकट खाणे नव्हते. सर्वांना अन्नपदार्थ वाटायला आणि त्यांनी तो खायला फारसा वेळही नव्हता. सॅंडविचेस, चहा, कॉफी वगैरे घेऊन एक ट्रॉली एकदाच समोरून मागेपर्यंत नेली आणि आमच्यासारख्या कदाचित बाहेरून आलेल्या थोड्या लोकांनी कांही बाही विकत घेऊन थोडीशी क्षुधाशांती केली. तोपर्यंत लीड्सला पोचून गेलो. आता आपल्या माणसांना भेटायला मन अधीर झाले होते.

आपले सामान घेऊन लवकर बाहेर पडावे म्हणून धावतपळत बाहेर येऊन ट्रॉली घेऊन कन्व्हेअरपाशी उभे राहिलो. एकापाठोपाठ एक बॅगा बाहेरून आत येत होत्या आणि त्यांचे मालक त्या उतरवून घेऊन बाहेर जात होते. सगळे लोक चालले गेले, बॅगाही संपल्या आणि कन्व्हेअर बंद झाला पण आमच्या सामानाचा पत्ताच नव्हता. चौकशी करायला आत गेलो तर तिथे आमच्यासारखे चार त्रस्त प्रवासी आधीच उभे होते. त्यामुळे त्यातही पुन्हा आमचा शेवटचा नंबर लागला. तिथली बाई प्रत्येक त्रस्त प्रवाशाला आपल्या एकेका वस्तुचे सविस्तर वर्णन करायला सांगत होती. चाळीस पन्नास तर्‍हांच्या बॅगांच्या चित्रांचा एक आल्बम आणि एक कलर शेडकार्ड यांच्या सहाय्याने नेमके वर्णन मिळवायचा तिचा स्तुत्य प्रयत्न होता. पण आमची मात्र पंचाईत होत होती. परदेश दौर्‍यासाठी मुद्दाम विकत आणलेल्या नव्या कोर्‍या बॅगा अजून नीट लक्षात रहाण्यासारख्या नजरेत बसलेल्या नव्हत्या. बेल्टवरून येत असलेल्या एकीसारख्या एक दिसणार्‍या बॅगामधून आपल्या बॅगा पाहिल्यावरसुध्दा पटकन ओळखता येतील की नाही याची खात्री नव्हती. नक्की ओळख पटावी यासाठी आम्ही त्यावर नावाच्या चिठ्या सुध्दा चिकटवल्या होत्या. आता निव्वळ आठवणीतून त्यांचे वर्णन करणे कठीण होते. आधी कल्पना असती तर आम्ही बॅगांचे फोटो काढून आणले असते असे मी म्हंटले सुध्दा. आम्ही दोघांनी मिळून त्यातल्या त्यात जमेल तेवढा प्रयत्न केला आणि त्या बाईने निव्वळ कोड नंबर्सच्या आकड्यात त्यांची नोंद करून घेतली. या सगळ्या प्रकारात आमच्या बॅगा वर्णनात चूक झाली म्हणून त्या आम्हाला दुरावतात की काय अशी एक नवीनच भीती उत्पन्न झाली. सामानाचा विमा उतरवलेला होता आणि विमान कंपनी आंतरराष्ट्रीय नियमानुसार योग्य ती भरपाई देईलच वगैरे छापील माहिती त्या बाईने सराईतपणे सांगितली. पण म्हणून काय झाले? आपल्या वस्तु त्या आपल्या. त्यातल्या काही गोष्टी तर किती हौसेनं सातासमुद्रापार आणलेल्या.

प्राप्तपरिस्थितीमध्ये आणखी कांहीच करता येण्यासारखे नव्हते. खट्टू मनाने हॅण्डबॅग्ज उचलल्या आणि बाहेर आलो. सगळे सहप्रवासी कधीच निघून गेले होते आणि त्या छोट्या विमानतळावर शुकशुकाट झाला होता. आमची मंडळी तेवढी चिंताक्रांत मुद्रेने उभी होती. लंडनला पोचल्यानंतर आमचे फोनवर बोलणे झालेले होते आणि सामानाचा काही तरी घोटाळा झाला आहे एवढे त्यांना कळले होते त्यामुळे आम्ही बाहेर येण्याची वाट पहात ते ताटकळत उभे होते. सामान नसेना का, सुखरूपपणे इथवर पोचलो तर होतो. किती दिवसांनी भेटी झाल्या होत्या. याच आनंदात घरी आलो. गळ्यात पडून आगत स्वागत झालं. गप्पागोष्टी रंगल्या. संध्याकाळी एक डिलिव्हरी व्हॅन घराच्या दिशेने येतांना दिसली. आमचे मागे राहिलेले सर्व सामान नंतरच्या फ्लाईटने लीड्सला सुखरूप पोचले होते आणि कुरीयरमार्फत आम्हाला अगदी घरपोच मिळाले. आता मात्र अगदी सर्व सामानासह सुखरूप यात्रा पूर्ण झाली होती.

No comments: