Sunday, February 01, 2009

चन्द्रयान ( भाग ७) - यशोगाथा (उत्तरार्ध)


मुंबई ते दिल्लीचा प्रवास असो किंवा सातारा ते फलटणपर्यंतचा असो, त्यात निर्गमन, मार्गक्रमण आणि आगमन असे त्या प्रवासाचे तीन टप्पे असतात. पहिल्या आणि अखेरच्या टप्प्यांवर त्या त्या ठिकाणी असलेल्या तत्कालिन स्थानिक परिस्थितीचा प्रभाव असतो, पण तो अल्पकाळासाठी असतो। दोन गांवातले अंतर कापण्यामधले मार्गक्रमणच महत्वाचे असते आणि तेच आपल्या लक्षात राहते. पृथ्वीपासून चंद्रापर्यंत मार्गक्रमणाची गोष्ट मात्र यापेक्षा वेगळी आहे.

पृथ्वीवरून आभाळातला चंद्र डोळ्यांना दिसतो. त्यामुळे नेम धरून सोडलेल्या बाणाप्रमाणे रॉकेटसुध्दा चंद्राला बरोबर नाकासमोर ठेवून सरळ रेषेत त्याच्याकडे झेपावत असेल आणि त्याच्यापर्यंत जाऊन पोचत असेल असे कोणालाही वाटणे शक्य आहे. पण प्रत्यक्षात ते तसे नसते एवढे मला माहीत होते. पृथ्वीवरून उड्डाण केल्यानंतर ते यान आधी पृथ्वीच्या सभोवती प्रदक्षिणा घालीत राहते आणि त्यात स्थिरावल्यानंतर चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करते एवढे मला ऐकून ठाऊक होते. ज्या वेगाने ते आकाशात झेप घेते तो पाहता ते कांही मिनिटातच पृथ्वीभोवती फिरू लागेल, त्यानंतर कांही तासात ते पुढील प्रवासाला निघू शकेल आणि एक दोन दिवसात चंद्रापर्यंत जाऊन पोहोचेल अशी माझी अपेक्षा होती. पण चंद्रयानाच्या यशस्वी उड्डाणाची जी बातमी आली तिच्यातच त्या यानाला चंद्राजवळ जायला पांच दिवस लागतील हे वाचून थोडे आश्चर्य वाटले होते. प्रत्यक्षात तर २५ ऑक्टोबरला इकडून निघालेले हे यान दोन आठवडे उलटून गेले तरी अजून आपल्या मुक्कामाला ते पोचल्याची बातमी आली नाही. साध्या प्रवासी विमानाच्या गतीने सुध्दा एवढ्या काळात ते चंद्रापर्यंत जाऊन पोचले असते. त्यामुळे ते नेमके कुठे गेले आहे आणि इतके दिवस तिथे काय करते आहे हे समजत नव्हते. अखेरीस १२ नोव्हेंबरला चंद्रयान आपल्या ठरलेल्या कक्षेत स्थिरावले आणि १४ नोव्हेंबरला त्याने भारताचा झेंडा चंद्रावर रोवला.

प्रत्यक्ष प्रवासाचा मार्ग साधारणपणे वर दिलेल्या चित्रात दाखवल्यासारखा होता. सर्कसमधील ट्रॅपीझ या प्रकारातला क्रीडापटू एका उंच झोपाळ्यावर चढतो, त्याला झोका देत देत तो उंच उंच जातो आणि खूप मोठा झोका दिल्यानंतर पटकन आपला झोपाळा सोडून दुसरा झोपाळा पकडतो, तशा प्रकारे पृथ्वीभोवती फिरता फिरताच तिच्यापासून दूर दूर जात चंद्रयानाने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आणि चंद्राभोवती फिरता फिरता त्याच्या जवळ जवळ जात त्याने आपले नियोजित स्थान ग्रहण केले. तारीखवार त्याची प्रगती खाली दिल्याप्रमाणे झाली.
२२ ऑक्टोबर : पृथ्वीवरून उड्डाण करून २२९००/२५५ कि.मी. च्या लंबवर्तुळाकार कक्षेत तिच्याभोवती भ्रमण सुरू
२३ ऑक्टोबर : कक्षा ३७९००/३०५ कि.मी. वर नेली
२५ ऑक्टोबर : कक्षा ७४७१५/३३६ कि.मी. वर नेली
२६ ऑक्टोबर : कक्षा १६४६००/३४८ कि.मी. वर नेली
२९ ऑक्टोबर : कक्षा २६७०००/४६५ कि.मी. वर नेली
०४ नोव्हेंबर : पृथ्वीपासून ३८०००० कि.मी. वर चंद्राच्या जवळ पोचले
०८ नोव्हेंबर : ७५०२/५०४ कि.मी. या कक्षेत चंद्राभोवती भ्रमण सुरू
०९ नोव्हेंबर : कक्षा ७५०२/२०० कि.मी. वर नेली
१२ नोव्हेंबर : १०० कि.मी. अंतरावरून चंद्राभोवती वर्तुळाकार कक्षेत भ्रमण सुरू
१४ नोव्हेंबर : एम.आय.पी.(प्रोब) च्या सहाय्याने चंद्रावर भारताचा राष्ट्रध्वज उतरवला.
ऑक्टोबर रोजी पृथ्वीभोवती फिरतांना चंद्रयानाला एका परिभ्रमणासाठी फक्त साडेसहा तास इतका वेळ लागत होता. तो कालावधी वाढत वाढत २९ ऑक्टोबरला ज्या कक्षेत चंद्रयान पोचले तिच्यात सहा दिवसांइतका झाला होता. त्यानंतर बहुधा शेवटचे भ्रमण पूर्ण होण्याच्या आधीच ते चंद्राभोवती प्रदक्षिणा घालू लागले. आता ते चंद्रापासून १०० कि.मी. अंतरावर राहून वर्तुळाकार ध्रुवीय कक्षेत फिरत आहे. चंद्राच्या दोन्ही ध्रुवांना भेत देत आपले एक आवर्तन ते सुमारे दोन तासात पूर्ण करते. तोपर्यंत चंद्र थोडासा स्वतःभोवती फिरलेला असतो. अशा प्रकारे चंद्राचा संपूर्ण पृष्ठभाग ते पाहून घेईल आणि त्याची छायाचित्रे पाठवत राहील. चंद्रयान जरी (पृथ्वीवरच्या) एका दिवसात चंद्राभोवती बारा वेळा फिरत असले तरी ते कांही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून पूर्णपणे मुक्त झालेले नाही. चंद्राबरोबरच ते सुध्दा सत्तावीस दिवसात एक पृथ्वीप्रदक्षिणा घालत राहीलच आणि पृथ्वी व चंद्र या दोघांच्याही सोबत सूर्यालासुध्दा एका वर्षात एक प्रदक्षिणा घालेल.

चंद्रयानाच्या कक्षांमध्ये बदल करण्यासाठी त्याच्यासोबत जोडलेल्या रॉकेट इंजिनांचा उपयोग केला गेला. त्यांच्या जोरावर यानाच्या भ्रमणाची गती बदलली की त्याची कक्षा बदलते आणि त्यानंतर ते यान नव्या कक्षेत आपोआप फिरत राहते. त्यावरील विविध उपकरणांना विद्युत पुरवठा करण्यासाठी लागणारी वीज पुरवण्यासाठी यानावर सोलर सेल्सचे पॅनेल बसवले आहे. यानावरील सर्व साधनांना पुरेल इतकी वीज त्या सोलर सेल्सपासून निर्माण होते. या सर्व उपकरणांचे कसून परीक्षण केलेले असल्यामुळे निदान दोन वर्षे तरी ती अव्याहत चालत राहतील अशी अपेक्षा आहे. चंद्रयानाकडून कुठकुठली शास्त्रीय माहिती मिळते ते पाहणे, ती जमा करून तिचे विश्लेषण करणे वगैरे काम आता पुढील दोन वर्षे चालत राहील.

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ( इस्रो) च्या संकेतस्थळावर चंद्रयानाबद्दलची जी माहिती प्रसिध्द झाली आहे तिचा उपयोग या लेखासाठी केला आहे. या संकेतस्थळाचा दुवा खाली दिला आहे.
http://www.isro.org/chandrayaan/htmls/home.htm
गुरुत्वाकर्षण, अग्निबाण, उपग्रह वगैरेबद्दलच्या शास्त्रीय माहितीचे संकलन नासाच्या आणि इतर संकेतस्थळांवरून मिळालेल्या माहितीवरून केले आहे. त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे.

No comments: