Saturday, February 28, 2009

साठ वर्षानंतर

गुरु, शनि व मंगळ या ग्रहांचे राशीचक्रातले भ्रमणकाल अनुक्रमे सुमारे बारा, तीस आणि दीड वर्षे इतके धरले तर त्यांच्या भ्रमणकालाचा ल.सा.वि. साठ वर्षे इतका येतो, त्यामुळे साठ वर्षानंतर सारे ग्रह पुन्हा एकदा आपापल्या स्थानावर येतात आणि म्हणून साठ संवत्सरानंतर पुन्हा त्याच नांवाच्या संवत्सरांचे नवे चक्र सुरू होते असे कुठे तरी वाचले होते. मग साठ वर्षानंतर जन्मतिथि व जन्मतारीख एकाच दिवशी येते कां? असा प्रश्न मनात आला. साठी पूर्ण केलेल्या माझ्या ओळखीतल्या सगळ्याच व्यक्तींच्या साठाव्या वाढदिवसाची तिथि व तारीख यांत फरक येत असल्याचे प्रत्यक्ष उदाहरणांवरून दिसत होते. मात्र दर १९ वर्षांनंतर जन्मतिथि व जन्मतारीख एकाच दिवशी येतात अशी माहिती मिळाली. या सर्वांची शहानिशा करावी असे अनेकदा वाटले होते पण इथे तर मागच्या वर्षीचे पंचांग सापडत नव्हते, मग इतकी जुनी माहिती कुठून मिळणार?

या प्रश्नाचे उत्तर शोधणे इतके सोपे नाही. इंग्रजी महिने २८, २९, ३० किंवा ३१ दिवसांचे व वर्ष ३६५ किंवा ३६६ दिवसांचे असते तर मराठी पंचांगाचा महिना २९ किंवा ३० दिवसांचा असतो व वर्ष ३५४ किंवा ३५५ दिवसांचे असते. यांतील ११-१२ दिवसांची तूट सुमारे दर बत्तीस महिन्यांत येणार्‍या अधिक महिन्याने भरून निघते. या गुंतागुंतीच्या हिशोबांत तारीख व तिथि यांची साध्या सोप्या अंकगणिताने सांगड घालणे शक्य नाही. यासाठी मग इंटरनेटवर थोडी शोधाशोध केली व त्यावरून मिळालेली माहिती घेऊन सोपी गणिते मांडली. त्या आकडेमोडीवरून खालील गोष्टी दिसतात.

इंग्रजी कॅलेंडरमधील एक वर्ष पृथ्वीच्या सूर्याभोवती भ्रमणाच्या कालावधीएवढे असते हे सर्वश्रुत आहे. हा काल ३६५ दिवस, ५ तास, ४८ मिनिटे, ४६ सेकंद एवढा असतो. मराठी पंचांगातील महिना शुध्द प्रतिपदा ते अमावास्या एवढा असतो. दर महिन्याला चंद्र ज्या वेळी सूर्याच्या मागून येऊन किंचितसा त्याच्या पुढे जातो तेंव्हा प्रतिपदेपासून नवीन महिना सुरू होतो आणि त्या वेळी सूर्य ज्या राशीमध्ये असेल त्य़ावरून त्या महिन्याचे नांव ठरते. कधी कधी सूर्याने एका राशीत प्रवेश केल्या केल्या चंद्र त्याच्या पुढे जाऊन महिना बदलतो व सूर्याने त्या राशीमधून बाहेर पडण्याच्या थोडे आधीच चंद्र बारा राशी फिरून पुन्हा सूर्याच्या राशीत येतो आणि त्याला मागे टाकून त्याच राशीत त्याच्या पुढे जातो. त्यामुळे पुन्हा एकदा चंद्राचा महिना बदलतो, पण सूर्य मात्र आदल्या महिन्याच्या प्रतिपदेला ज्या राशीच्या सुरुवातीच्या भागात असतो त्याच राशीच्या अंतिम भागात अजून घोटाळत असतो. अशा वेळी अधिकमास येतो. चंद्राच्या या प्रकारच्या महिन्याचा काळ २९ दिवस, १२ तास, ४४ मिनिटे एवढा आहे. यावरून हिशोब केला तर १९ वर्षाच्या कालावधीत सात अधिक महिन्यासह २३५ महिने येतात त्याचे ६९३९.६८ दिवस भरतात तर पाश्चात्यांच्या १९ सौर वर्षांचा कालावधी ६९३९.५६ दिवस इतका भरतो. यात ०.१२ दिवस म्हणजे तीन तास इतका फरक येतो. यावरून जवळ जवळ दीडशे वर्षे दर १९ वर्षांनी तिथि व तारीख पुन्हा पुन्हा बरोबर येतील असे दिसते. दर शंभर वर्षात एकदा लीप ईअर येत नाही आणि चारशे महिन्यात ते एकदा येते हा सूक्ष्म फरक धरला तर त्यात आणखी थोडा फरक पडेल. पण सर्वसाधारण माणसाच्या जीवनात इतकी वर्षे येत नाहीत. त्यामुळे १९ वर्षांनी त्याच तारखेला तीच तिथी येत जाईल असे ढोबळपणे म्हणता येईल.
साठ वर्षांनी सर्व ग्रहस्थितींची पुनरावृत्ती होणे मात्र तितकेसे बरोबर नाही. याचे कारण बुध, शुक्र, मंगळ, गुरु व शनि यांचे सूर्याभोवती भ्रमणाचा काळ अनुक्रमे ८८ दिवस, २२५ दिवस, ६८७ दिवस, ११.८६ वर्षे व २९.४६ वर्षे इतका आहे. यातील कोठल्याच आकड्याने साठ वर्षातील दिवसांच्या संख्येचे पूर्ण विभाजन होत नाही. पृथ्वी स्वतः गतिमान असल्यामुळे पृथ्वीवरून दिसणारा त्यांच्या राशीचक्रातून फिरण्याचा काळ आणखी वेगवेगळा असतो. शिवाय ते अधूनमधून वक्री होत असतात किंवा मार्गी लागत असतात. त्यामुळे त्या कालावधीत त्यांची आवर्तने पूर्ण होत नाहीत व ते साठ वर्षापूर्वीच्या स्थितींच्या आगेमागे राहतात.

योगायोगाने एक कॉम्प्यूटर प्रोग्रॅमही मिळाला तो वापरून भूतकाळातील एक काल्पनिक तारीख व वेळ घेऊन त्या दिवशी असलेल्या ग्रहांच्या जागा पाहिल्या व त्यानंतर १९, ३८, ५७ व ६० वर्षानंतर येणार्‍या दिवशी ते कोठे होते ते पाहिले. त्यावरून असे दिसले की दर १९ वर्षांनी सूर्य पहिल्या वेळेच्या राशीत व चंद्र पहिल्या वेळेच्या नक्षत्रांत एकाच वेळी येतात. याचा अर्थ त्याच तिथीला तीच तारीख येत असणार. इतर ग्रह मात्र इतस्ततः विखुरलेले दिसले. साठ वर्षानंतर येणार्‍या जन्मतिथीचे दिवशी सूर्य व चंद्राव्यतिरिक्त अपेक्षेप्रमाणे शनि ग्रह आपल्या पूर्वीच्या जागी आला आणि मंगळ, बुध व गुरु एक घर आजूबाजूला आले तर शुक्र, राहू, केतु दोन तीन घरे दूर राहिले. सगळ्या ग्रहांनी पुन्हा एकाच वेळी जन्मकुंडलीतील आपापल्या जागी येण्याचा योग कदाचित माणसाच्या आयुष्यात कधीही येतच नसेल. त्यामुळेच आयुष्यातला प्रत्येक दिवस हा वेगळाच असतो.
वरील बरीचशी माहिती अवकाशवेध, नासा व इतर संकेतस्थळांवरून मिळाली.

Friday, February 27, 2009

मराठी दिवसाच्या निमित्याने ...

मराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणार्‍यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठी बोलणार्‍या लोकांची एकूण लोकसंख्या नऊ कोटी इतकी आहे. मराठी भाषा सुमारे १३०० वर्षांपासून प्रचलित आहे. महाराष्ट्राबाहेर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू व छत्तीसगढ राज्यात आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासीत प्रदेशातील काही भागात मोठ्या प्रमाणात मराठी बोलली जाते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड, मॉरीशस व इस्त्राएल या देशातही मराठी भाषिक लोक राहतात. यातील बरेचसे लोक आंतर्जालावर मराठी भाषेत आपले विचार व्यक्त करतात.
मराठी भाषेत लिहिलेले अनेक प्राचीन शिलालेख, ताम्रपत्रे, दस्तऐवज वगैरे ऐतिहासिक सामुग्री उपलब्ध आहे. ज्ञानेश्वर-तुकारामादि संतकवी, मोरोपंत, वामनपंडित आदी पंतकवी आणि होनाजी बाळा, पठ्टे बापूराव वगैरे तंतकवींच्या पारंपरिक रचना अनेक लोकांना मुखोद्गत असतात. मराठीत अनेक पोथ्या लिहिल्या गेलेल्या आहेत. आता हे सारे वाङ्मय पुस्तकरूपाने उपलब्ध आहे. अनेक नियतकालिके मराठीत छापून प्रसिध्द केली जातात.

मंगल देशा, पवित्रा देशा या सुप्रसिध्द महाराष्ट्रगीतात कवी गोविंदाग्रज यांनी मराठी भाषेचा इतिहास थोडक्यात असा सांगितला आहे.
रसवंतीच्या पहिल्या बाळा मुकुंदराजाला
पहिलावहिला अष्टांगांनी प्रणाम हा त्याला
शहर पुण्याच्या, शिवनेरीच्या, पंढरिच्या देशा
अनंत कोटी ग्रंथ रचुनिया जोडि तुझ्या नामा
वाल्मीकीचे शत कोटी यश विष्णुदास नामा
मयूरकविच्या पूर्ण यमकमय महाराष्ट्र देशा
कवि कृष्णाच्या निर्यमका हे महाराष्ट्र देशा
देवी ज्ञानेश्वरी करि जिथे भक्तीचा खेळ
तिथेच गीतारहस्य बसवी बुद्धीचा मेळ
जिथे रंगली साधीभोळी जनाइची गाणी
तिथेच खेळे श्रीपादांची कलावती वाणी
विकावयाला अमोल असली अभंगमय वाणी
करी तुझी बाजारपेठ तो देहूचा वाणी
तुला जागवी ऐन पहाटे गवळी गोपाळ
धार दुधाची काढित काढित होनाजी बाळ
मर्दानी इष्काचा प्याला तुझा भरायासी
उभा ठाकला सगनभाउ हा शाहुनगरवासी

आपण मराठी असल्याचा अभिमान कवी सुरेश भट या शब्दात व्यक्त करतात.
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

Thursday, February 26, 2009

लीड्सचा प्रवास


मुंबईहून पुण्याला जायचं म्हंटलं की "कशासाठी पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी" करीत जाणारी झुकझुक गाडीच पटकन आठवते. कालांतराने एस्.टी बसेस, एशियाड, टॅक्सी वगैरे आल्या. आता व्होल्व्हो बोकाळल्या आहेत. पण पुण्याजवळ लोहगांवला एक विमानतळ आहे आणि सांताक्रुझहून तेथे विमानाने जायची सोय आहे हे मात्र कधीच पटकन डोक्यात येत नाही. इंग्लंडमध्ये लीड्स हे असेच एक शहर आहे. आपल्या पुण्यासारखीच त्यालाही ऐतिहासिक परंपरा आहे, तिथं अनेक नांवाजलेल्या शिक्षणसंस्था आहेत आणि प्रामुख्याने मध्यमवर्गीयांची वस्ती आहे. लंडन या महानगरापासून दीडदोनशे मैलावरील हे टुमदार शहर उत्तम रेल्वे आणि रस्त्यांनी लंडनशी जोडलेले आहे. त्यामुळे हा प्रवास बहुतेक लोक कारने करतात नाही तर ट्रेनने.

आमचे लीड्सला जायचे ठरले तेंव्हा आम्हीही असाच विचार केला. पण लंडन विमानतळावरून थेट लीड्सला टॅक्सी केली तर सुमारे तीन चारशे पौण्ड लागतात म्हणे, म्हणजे पंचवीस तीस हजार रुपये. हे मात्र फार म्हणजे फारच झाले. अहो एवढ्या पैशात तर मुंबई ते लंडनला जाऊन परत यायचं तिकीट मिळतं. मग लंडन विमानतळावरून मुख्य रेल्वेस्टेशनपर्यंत लोकल ट्यूब आणि तिथून लीड्सपर्यंत मेन लाईन ट्रेनने प्रवास करायचा असे ठरले. पण सामानासह ही शोधाशोध करण्याची दगदग वयोमानाप्रमाणे झेपेल कां हाही एक प्रश्न होता. त्यामुळे आम्हाला उतरवून घेण्यासाठी कोणी लंडनला यायचे हे ओघानेच आले. त्यातही एकंदर शंभर दीडशे पौंड खर्च झालेच असते. शिवाय वेळ आणि दगदग वेगळी. तेवढ्यात विमानाचं तिकीट मिळाले तर?

मी विमानाची तिकीटं बुक करायला ट्रॅव्हल एजंटकडे गेलो तेंव्हा सगळ्याच चौकशा केल्या. त्यावरून लक्षात आलं की विमानाच्या तिकीटांच्या किंमती ही एक अगम्य आणि अतर्क्य गोष्ट आहे. एअरलाईन्सची नॉर्मल भाडी खरे तर अवाच्या सवा असतात. ऑफीसच्या खर्चाने जाणार्‍यानाच ती परवडतात आणि गरजू लोक नाईलाजापोटी देतात. कमी खर्चाच्या प्रवासासाठी इतक्या प्रकारच्या स्कीम्स, पॅकेजेस आणि डील्स असतात की अनुभवी एजंटकडे सुध्दा त्यांची संपूर्ण माहिती नसते. त्यामुळे तो अचूक मार्गदर्शन करू शकत नाही. कुठल्या दिवशी कुठल्या कंपनीच्या विमानाने कुठून कुठे जायचं आहे हे आधी इंटरनेटवर फीड करायचे आणि उत्तराची वाट पहायची. त्या दिवशी कुठल्या फ्लाईटमध्ये किती किंमतीची तिकिटे उपलब्ध आहेत हे त्यानंतर कळणार, अशी पध्दत आहे. बर्‍यापैकी बिजिनेस चालत असलेल्या कुठल्याही एजंटकडे तीन चार पेक्षा जास्त ट्रायल मारायला वेळ नसतो.

आमच्या एजंटला पहिल्या ट्रायलमध्येच मुंबई लंडन लीड्स आणि त्याच मार्गाने परतीचे तिकीट वाजवी वाटणार्‍या किंमतीत उपलब्ध दिसलं पण तिथे रात्री उशीरा पोचणार होतो, तेही सध्याच्या कडाक्याच्या थंडीत. आणि परतीच्या प्रवासात तर एक रात्र स्वतःच्या खर्चाने लंडनला घालवायची होती. एकंदरीत गैरसोयच जास्त असल्यामुळे हा प्रस्ताव मी अमान्य केला. आणखी दोन तीन ट्रायलमध्ये मुंबई लंडन मुंबई आणि लंडन लीड्स या प्रवासांसाठी वेगवेगळ्या स्कीम्समध्ये पण सोयिस्कर वेळच्या फ्लाईट्समध्ये तिकीटे मिळाली ती तर खूपच स्वस्तात पडली. लंडन ते लीड्स विमानाचे तिकीट चक्क ट्रेनपेक्षासुध्दा स्वस्त असलेले पाहून धक्काच बसला. मात्र त्यात अशी अट होती की कुठल्याही परिस्थितीत ते बदलता येणार नाही किंवा त्याचा रिफंड मिळणार नाही. कुठल्याही कारणाने ती फ्लाईट चुकली तर मात्र ते पैसे वाया गेले आणि आयत्या वेळी नवीन तिकीट दामदुपट किमतीत घ्यावे लागणार। हा धोका पत्करणे भाग होते.

ठरलेल्या दिवशी वेळेवर सहार विमानतळावर पोचलो. कुठल्या दरवाजातून आत शिरायचे हे काही समजेना कारण आमचे तिकीट ज्या ब्रिटिश मिडलॅंड एअरलाईन्सचे होते तिचा उल्लेख कुठल्याच बोर्डावर दिसेना. मुंबईहून सुटणारी ही फ्लाईट त्या काळात कदाचित नव्यानेच सुरू झाली होती. दोन तीन दरवाजावर धक्के खाल्यावर एकदाचा प्रवेश तर मिळाला. तोपर्यंत आमच्या फ्लाईटची अनाउन्समेंट मॉनिटरवर झळकली होती ती पाहून जीव भांड्यात पडला. आम्ही दोघांनीही जीन्स आणि जॅकेट परिधान केले असले तरी मूळ मराठी रांगडेपण काही लपलं नव्हतं. एक्सरे मशीन वरून बॅगा उतरवणार्‍या लोडरने आम्ही कुठल्या फ्लाईटने जाणार आहोत याची अगदी आपुलकीने मराठीत विचारपूस केली. मी त्याला मारे ऐटीत बी.एम.आय.ने लंडनला जाणार असल्याचे सांगितले. त्यावर त्याने बारा एअरलाईन्सच्या बत्तीस बाटल्यातील रंगीबेरंगी पाणी प्याले असल्याच्या आविर्भावात आमची कींव करीत कुठल्या फडतूस कंपनीच्या भुक्कड विमानाने प्रवास करायची वेळ आमच्यावर आली आहे असा शेरा मारला आणि ती सगळी मद्राशांनी भरलेली असते अशीही माहिती पुरवली. बहुधा बी.एम. म्हणजे बंगलोर मद्रास असा अर्थ त्याच्या डोक्यात भरवून कोणीतरी त्याची फिरकी घेतली असावी.

अशा प्रकारचा प्रथमग्रासे मक्षिकापात मनावर न घेता आम्ही पुढे गेलो. बी.एम.आय.च्या काउंटर वर आमचं अगदी सुहास्य स्वागत झालं. तिथल्या सुंदरीने वेगवेगळी तिकीटे असूनही आमचे थेट लीड्सपर्यंतचे चेक इन करून दिले आणि सामान आता लीड्सपर्यंत परस्पर जाईल, आम्हाला लंडनला कांही कष्ट पडणार नाहीत असे आश्वासन सुध्दा दिले. इमिग्रेशन, कम्टम्स वगैरे सोपस्कारसुध्दा आता एकदम लीड्सलाच होतील अशी चुकीची माहितीही दिली. लंडन हे पोर्ट ऑफ एंट्री असल्यामुळे यू.के. मध्ये आम्हाला प्रवेश देणे सुरक्षित आहे की नाही हे तिथलाच साहेब ठरवेल असे मला वाटत होते, पण ही गोष्ट कदाचित लीड्समधला साहेब ठरवेल आणि तसे असेल तर ते माझ्याच सोयीचे आहे अशा विचाराने मी वाद घातला नाही.

चेक इन झाल्यावर बराच अवकाश होता म्हणून आरामात थोडा अल्पोपहार घेतला तोपर्यंत मॉनिटरवर अनेक फ्लाईट्सचे स्टेटस बदलून इमिग्रेशन, सिक्युरिटी, बोर्डिंग वगैरे जाहीर झाले होते पण आमच्या फ्लाईटची मात्र जैसे थे परिस्थिती होती. मुंबई विमानतळाच्या लेखी तिचे अस्तित्व नगण्य असावे. पुन्हा चौकशी केल्यावर मॉनिटरकडे लक्ष न देता स्थितप्रज्ञ वृत्ती ठेऊन आपली यात्रा पुढे चालू ठेवण्याचा सल्ला मिळाला. त्याप्रमाणे सारे सोपस्कार सुरळीतपणे पार करून आम्ही विमानात स्थानापन्न झालो व पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने मुंबईहून पश्चिम दिशेला उड्डाण केले.

एअरबस ए ३३० मॉडेलच्या त्या नव्या कोर्‍या विमानात सर्व आधुनिक सोयी होत्या. रात्री दीड वाजता सुध्दा बर्‍यापैकी खायला आणि थोडेसे प्यायलासुध्दा मिळाले. वेगवेगळे इंग्लिश व हिन्दी चित्रपट पहात, संगीत ऐकत आणि डुलक्या घेत चांदणी रात्र संपून सोनेरी पहाट केंव्हा झाली ते नाश्ता आला तेंव्हाच कळले. कॉन्टिनेन्टल ब्रेकफास्टमध्ये ज्यूस, ऑमलेट, फळे. योघर्ट, सॉसेजेस वगैरे भरपूर खादाडी होती. शाकाहारी भारतीय पर्याय सुध्दा होता त्यात मात्र कांजीवरम उपमा नावाचा एक पदार्थ आणि मोनॅको बिस्किटाएवढ्या आकाराचे उत्तप्पे ठेवले होते. कदाचित हा सो कॉल्ड मद्रासी टच असेल. न्याहारी उरकेपर्यंत लंडन शहर दिसायला लागले आणि विमान जमीनीवर उतरावयाची तयारी सुरू झाली.

लंडनला उतरल्यावर पॅसेजमध्येच प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी व्यवस्थित खुणा आणि फलक जागोजागी ठळकपणे लावलेले होते. तिथेच विमानतळाच्या बाहेर जाणारे, यू. के. मधीलच दुसर्‍या गावाला जाणारे आणि परदेशी तिसर्‍याच देशाला जाणारे असे प्रवाशांचे तीन गट करून त्यांना वेगवेगळ्या मार्गांनी जायच्या सूचना होत्या. आम्ही दुसर्‍या प्रकारचे प्रवासी असल्यामुळे मध्यममार्ग पत्करून त्यानुसार बाणांचा पाठपुरावा करीत पुढे पुढे जात राहिलो. आमचे लीड्सला जाणारे विमान सुदैवाने त्याच टर्मिनलवरून सुटणार होते. सहारहून सांताक्रूझ विमानतळाला जाण्यासाठी लागते त्याप्रमाणे त्यासाठी बिल्डिंगच्या बाहेर जाऊन बस घ्यायची गरज पडली नाही. पण त्याच विमानतळाच्या एका भागातून दुसर्‍या भागात जाणेसुध्दा कांही सहज गोष्ट नव्हती. कितीतरी लांबलचक कन्व्हेअर बेल्ट पार करून आणि अनंत एस्केलेटरवरून चढउतार केल्यावर एका प्रशस्त दालनांत येऊन पोचलो.

तिथे लांबचलांब रांगा लागलेल्या होत्या. त्यामधून प्रत्येक प्रवाशाची अगदी कसून सुरक्षा तपासणी झाली. अंगावरील ओव्हरकोट, जॅकेट आणि खिशातील मोबाईल फोनसुध्दा काढून त्या सर्व गोष्टी एक्सरे मशीन मधून तपासल्या. खरे तर आधीच विमानातून आलेल्या प्रवाशांची पुन्हा तपासणी कशाला ? पण बहुधा ही पुढील प्रवासाची तयारी होती. दुसर्‍या देशांमधील तपासणीवर ब्रिटीशांचा विश्वास नसावा. त्यानंतर पासपोर्ट कंट्रोल नावाच्या कक्षामध्ये गेलो. ब्रिटीश पासपोर्ट धारकांसाठी खुला दरवाजा होता. इतरांसाठी इंटरव्ह्यू देणे आवश्यक होते. आमचीही जुजबी विचारपूस झाली. आमच्यापासून यू. के. च्या सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक व्यवस्थेला कांही धोका पोचेल अशी शंका येण्याचे कांही कारण नसल्यामुळे लवकर सुटका झाली.

आता लीड्सला जाणारे विमान गेट नंबर आठ वरून पकडायचे होते. पुन्हा अनेक कन्व्हेअर्स व एस्केलेटर्स पार करून तिथे पोचलो. हे एकच गेट भारतातल्या एकाद्या छोट्या एअरपोर्टवरील पूर्ण टर्मिनलच्या आकारमानाएवढे मोठे आहे व त्यामध्ये ए, बी,सी,डी,ई अशी छोटी गेट्स आहेत. इथे पूर्णपणे बी.एम.आय.चे अधिराज्य आहे. चार पाच प्रशस्त दालने, त्यात भरपूर खुर्च्या मांडलेल्या, विमानतळाचे विहंगम दृष्य दिसेल अशा गॅलर्‍या, फास्ट फूडचा स्टॉल, कोल्ड ड्रिंक व्हेंडिंग मशीन्स, स्मोकर्स चेंबर, टेलीव्हिजन, टेलीफोन, इंटरनेट, व्हिडिओ गेम्सचे बूथ वगैरेने सुसज्ज असा हा कक्ष आहे. बाजूलाच मोठमोठी ड्यूटी फ्री शॉप्ससुध्दा आहेत आणि तिथे हिंडणार्‍याने खरेदी केलीच पाहिजे असा आग्रह नाही. विमानतळावर एका बाजूला एकापाठोपाठ एक विमाने उतरत होती आणि दुसर्‍या बाजूने उड्डाण करीत होती. आमच्या गेटवरूनच दर वीस पंचवीस मिनिटांनी कुठे ना कुठे जाणारी फ्लाईट सुटत होती त्यामुळे प्रवाशांची भरपूर जा ये सुरू होती आणि वेगवेगळे आंतरराष्ट्रीय नमुने पहायला मिळत होते. एकंदरीत छान टाईमपास होत होता.

यथावकाश आमच्या विमानाने आम्हाला घेऊन उत्तरेला झेप घेतली. या फ्लाईटमध्ये फुकट खाणे नव्हते. सर्वांना अन्नपदार्थ वाटायला आणि त्यांनी तो खायला फारसा वेळही नव्हता. सॅंडविचेस, चहा, कॉफी वगैरे घेऊन एक ट्रॉली एकदाच समोरून मागेपर्यंत नेली आणि आमच्यासारख्या कदाचित बाहेरून आलेल्या थोड्या लोकांनी कांही बाही विकत घेऊन थोडीशी क्षुधाशांती केली. तोपर्यंत लीड्सला पोचून गेलो. आता आपल्या माणसांना भेटायला मन अधीर झाले होते.

आपले सामान घेऊन लवकर बाहेर पडावे म्हणून धावतपळत बाहेर येऊन ट्रॉली घेऊन कन्व्हेअरपाशी उभे राहिलो. एकापाठोपाठ एक बॅगा बाहेरून आत येत होत्या आणि त्यांचे मालक त्या उतरवून घेऊन बाहेर जात होते. सगळे लोक चालले गेले, बॅगाही संपल्या आणि कन्व्हेअर बंद झाला पण आमच्या सामानाचा पत्ताच नव्हता. चौकशी करायला आत गेलो तर तिथे आमच्यासारखे चार त्रस्त प्रवासी आधीच उभे होते. त्यामुळे त्यातही पुन्हा आमचा शेवटचा नंबर लागला. तिथली बाई प्रत्येक त्रस्त प्रवाशाला आपल्या एकेका वस्तुचे सविस्तर वर्णन करायला सांगत होती. चाळीस पन्नास तर्‍हांच्या बॅगांच्या चित्रांचा एक आल्बम आणि एक कलर शेडकार्ड यांच्या सहाय्याने नेमके वर्णन मिळवायचा तिचा स्तुत्य प्रयत्न होता. पण आमची मात्र पंचाईत होत होती. परदेश दौर्‍यासाठी मुद्दाम विकत आणलेल्या नव्या कोर्‍या बॅगा अजून नीट लक्षात रहाण्यासारख्या नजरेत बसलेल्या नव्हत्या. बेल्टवरून येत असलेल्या एकीसारख्या एक दिसणार्‍या बॅगामधून आपल्या बॅगा पाहिल्यावरसुध्दा पटकन ओळखता येतील की नाही याची खात्री नव्हती. नक्की ओळख पटावी यासाठी आम्ही त्यावर नावाच्या चिठ्या सुध्दा चिकटवल्या होत्या. आता निव्वळ आठवणीतून त्यांचे वर्णन करणे कठीण होते. आधी कल्पना असती तर आम्ही बॅगांचे फोटो काढून आणले असते असे मी म्हंटले सुध्दा. आम्ही दोघांनी मिळून त्यातल्या त्यात जमेल तेवढा प्रयत्न केला आणि त्या बाईने निव्वळ कोड नंबर्सच्या आकड्यात त्यांची नोंद करून घेतली. या सगळ्या प्रकारात आमच्या बॅगा वर्णनात चूक झाली म्हणून त्या आम्हाला दुरावतात की काय अशी एक नवीनच भीती उत्पन्न झाली. सामानाचा विमा उतरवलेला होता आणि विमान कंपनी आंतरराष्ट्रीय नियमानुसार योग्य ती भरपाई देईलच वगैरे छापील माहिती त्या बाईने सराईतपणे सांगितली. पण म्हणून काय झाले? आपल्या वस्तु त्या आपल्या. त्यातल्या काही गोष्टी तर किती हौसेनं सातासमुद्रापार आणलेल्या.

प्राप्तपरिस्थितीमध्ये आणखी कांहीच करता येण्यासारखे नव्हते. खट्टू मनाने हॅण्डबॅग्ज उचलल्या आणि बाहेर आलो. सगळे सहप्रवासी कधीच निघून गेले होते आणि त्या छोट्या विमानतळावर शुकशुकाट झाला होता. आमची मंडळी तेवढी चिंताक्रांत मुद्रेने उभी होती. लंडनला पोचल्यानंतर आमचे फोनवर बोलणे झालेले होते आणि सामानाचा काही तरी घोटाळा झाला आहे एवढे त्यांना कळले होते त्यामुळे आम्ही बाहेर येण्याची वाट पहात ते ताटकळत उभे होते. सामान नसेना का, सुखरूपपणे इथवर पोचलो तर होतो. किती दिवसांनी भेटी झाल्या होत्या. याच आनंदात घरी आलो. गळ्यात पडून आगत स्वागत झालं. गप्पागोष्टी रंगल्या. संध्याकाळी एक डिलिव्हरी व्हॅन घराच्या दिशेने येतांना दिसली. आमचे मागे राहिलेले सर्व सामान नंतरच्या फ्लाईटने लीड्सला सुखरूप पोचले होते आणि कुरीयरमार्फत आम्हाला अगदी घरपोच मिळाले. आता मात्र अगदी सर्व सामानासह सुखरूप यात्रा पूर्ण झाली होती.

Wednesday, February 25, 2009

शिवरात्रीनिमित्य आणखी थोडे


भारतात शंकराची बारा ज्योतिर्लिंगे नांवाची अत्यंत प्राचीन काळापासून चालत आलेली प्रमुख तीर्थक्षेत्रे आहेत. त्या प्रत्येक क्षेत्राला पुराणातल्या कथेचा दाखला दिला जातो. ती उत्तरांचलापासून ते तामिलनाडूपर्यंत विस्तीर्ण प्रदेशात विखुरलेली आहेत. शिवाची आराधना भारताच्या बहुतेक सर्व भागात केली जात होती असे यावरून दिसते. त्यांची नांवे एका स्तोत्रात गुँपलेली आहेत. ते खाली दिले आहे. या बारा ज्योतिर्लिंगाशिवाय कर्नाटकातील गोकर्ण येथील महाबळेश्वर आणि नेपाळातील पशुपतीनाथ वगैरे मोठी, पुरातन आणि प्रसिध्द अशी अनेक देवस्थाने आहेत.


द्वादशज्योतिर्लिङ्गानि
सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्।
उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥
परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम्।
सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥
वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे।
हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये ॥३॥
एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रात: पठेन्नर:।
सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥
बारा ज्योतिर्लिंगांची स्थाने
१.सोमनाथ ....सौराष्ट्र .... गुजरात
२.मल्लिकार्जुन ..श्रीशैल्य ... आंध्रप्रदेश
३.महाकाल ... उज्जैन ... मध्यप्रदेश
४.ममलेश्वर .. ओंकारेश्वर .. मध्यप्रदेश
५.वैद्यनाथ ... परळी .... महाराष्ट्र
६.भीमाशंकर .. डाकिनी(पुण्याजवळ) महाराष्ट्र
७.रामेश्वर ... सेतुबंध .... तामिलनाडु
८.नागेश्वर ... दारुकावन (औंढ्या नागनाथ) महाराष्ट्र
९.विश्वेश्वर ... वाराणसी ... उत्तर प्रदेश
१०.त्र्यंबकेश्वर .. नाशिक जवळ . महाराष्ट्र
११.केदारनाथ .. हिमालय .. उत्तरांचल
१२.घृष्णेश्वर ... वेरूळ ... महाराष्ट्र


या वर्षी महाशिवरात्रीला आमच्या घराजवळील सोमेश्वराच्या मंदिरात पुन्हा एक नवे पत्रक मिळाले. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय नांवाची संस्था हे कार्य करते आहे. त्यांच्या संप्रदायाच्या श्रध्देनुसार ईश्वराचे नाम, रूप, धाम, गुण, कर्तव्य आणि आगमनाची वेळ थोडक्यात या पत्रकात दिली आहेत. त्यातील बहुतेक मजकूर गेल्या वर्षी दिलेल्यासारखाच आहे.

Tuesday, February 24, 2009

खुशखबर - सत्ययुग येत आहे


गेल्या वर्षी शिवरात्रीला एका शिवमंदिरात दर्शनाला गेलो असतांना तिथे एक पत्रक वाटले जात होते. ते घरी आणून सहज वाचून पाहिले आणि इंटरेस्टिंग वाटले म्हणून ठेऊन दिले होते. जुने कागद पहातांना ते नेमके या शिवरात्रीला हातात आले. त्यात चार मुख्य परिच्छेद आहेत. त्यांचा सारांश असा आहे.

ईश्वराचे नांव, गुण आणि स्वरूप
ईश्वराचे वास्तविक नांव शिव असे आहे. अर्थात तो मंगलकारी, कल्याणकारी असा आहे. ज्योतिर्बिंदू हे त्याचे रूप आहे म्हणून सर्व धर्मात त्याच्या प्रकाशमय रूपाची पूजा केली जाते.
शिवाची दिव्य कर्तव्ये
ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन सूक्ष्म देवतांद्वारे विश्वाची उत्पत्ती, पालन आणि विनाश ही तीन कर्तव्ये त्रिमूर्ती शिव करत असतो. यांचे प्रतीक म्हणून शिवलिंगावर त्रिपुंड काढतात आणि बेलाच्या पानाचे त्रिदळ त्याला अर्पण करतात.
महाशिवरात्रीचे रहस्य
इथे रात्र या शब्दाचा अर्थ सूर्य मावळल्यानंतर झालेला काळोख एवढा सीमित नसून अज्ञान व अत्याचार यांचा अंधःकार असा आहे. या अंधःकाराचा नाश करून शिवाचे दिव्य अवतरण म्हणजे शिवरात्र.
आजच्या काळाचे महत्व
कलियुगाचा अंधःकारमय काळ आता संपत आला आहे. अधर्माचा विनाश करून धर्माची स्थापना करण्याचे दिव्य कर्तव्य पार पाडण्यासाठी शिवभगवान अवतीर्ण झाले आहेत.कलियुग संपून सत्ययुग सुरू होत आहे.

याबद्दल अधिक माहितीसाठी "खालील ठिकाणी संपर्क करावा" असे लिहून कांही पत्ते दिले होते. पण माझ्या मनातला अज्ञानाचा अंधार दूर करण्याचे इतर कांही खात्रीलायक आणि सोयिस्कर मार्ग जास्त आकर्षक वाटल्यामुळे मी त्या पत्त्यावर दिलेल्या जागी कांही गेलो नाही. शिवाय एवीतेवी सत्ययुग येणारच आहे तर त्याचा फायदा आपल्याला मिळेलच अशी आशा आहे.

Monday, February 23, 2009

तो मी नव्हेच


महाशिवरात्र या दिवसाचे औचित्य साधून मी निर्वाणषटक किंवा आत्मषटक या नांवाने प्रसिद्ध असलेली जगद्गुरू शंकराचार्यांची एक अद्वितीय रचना या ठिकाणी काल दिली होती. त्यातील शिव या शब्दावरून हे शंकराचे स्तोत्र आहे असे कोणाला वाटेल, किंवा निर्वाणषटक या नांवावरून शिवरात्रीच्या दिवशी (रात्री) त्याचे पठण केल्यामुळे मोक्षप्राप्ती होते असेही कोणी सांगेल. पण कोणत्याही देवाची स्तुती किंवा प्रार्थना यात केलेली नाही. मनुष्य आणि ईश्वर किंवा आत्मा व परमात्मा यांचे ऐक्य साधेल अशा अद्वैताच्या अवस्थेत कोण कुणाला काय मागणार? माझ्यासारख्या जीवनासक्त माणसाला हे विचार करण्याच्यासुद्धा पलीकडले वाटते तर त्याची अनुभूती कुठून येणार? या रचनेतील छंदबद्धता, माधुर्य, विचारांची झेप, जगाचे सूक्ष्म निरीक्षण, त्याविषयी असलेले ज्ञान, पांडित्य, अचूक शब्दरचना या सगळ्या गोष्टी थक्क करणार्‍या आहेत. इतर अनुवादांच्या माध्यमातून त्या शब्दांचा जो कांही अर्थ माझ्या अल्पबुद्धीला अनुभूतीविना समजला तो आपल्या शब्दात देण्याचा अल्पसा प्रयत्न करीत आहे.

कोहम्? किंवा मी कोण आहे? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध अनादिकालापासून जगाच्या पाठीवर सगळ्या मानव समूहांमध्ये चालला आहे आणि अनेक विद्वानांनी त्याची अनेक उत्तरे आपापल्या परीने दिली आहेत. जगाला दिसते ते शरीर म्हणजेच आपण असे सर्वसाधारणपणे समजले जाते. पण "माझे शरीर" म्हणणारा 'मी' कोण आहे? हा फक्त कर्ता कोण आणि कर्म कोण एवढ्यापुरता भाषेतील व्याकरणाचाच प्रश्न आहे कां? निर्जीव कलेवर आणि सजीव प्राणी यांची शरीरे बाहेरून तरी सारखीच दिसत असली तरी त्यात चैतन्य कशामुळे येते? स्वयंचलित यंत्रे निघण्यापूर्वीच्या काळात हा प्रश्न जास्तच महत्वाचा होता कारण जड
वस्तूंमध्ये चैतन्य आणणारे एक वेगळे तत्व असणे त्या काळात आवश्यक वाटत होते. "मला कोणतीही गोष्ट समजते", "ती माझ्या लक्षात राहते", "मला आठवते" वगैरे मधला 'मी' कोण? या प्रश्नाचा वेध घेतांना 'बुद्धी' ही संकल्पना निर्माण झाली. त्याचप्रमाणे "मला आवडते", "मला चीड आणते" ही कामे करणारे मन आले आणि या 'मी'पणाला अहंकार हे नांव मिळाले. पण असे दिसते की आपण नेहमीच मनासारखेही वागत नाही किंवा बुद्धीलाही मानत नाही. अहंकारालाही मुरड घालतो. मग आपल्या क्रिया कोण ठरवते? यासाठी या सगळ्यांच्या मागे चित्त, अंतरात्मा वगैरे आणखी कांही आहे कां? अशा किती अदृष्य गोष्टी आहेत? असल्यास त्यांची रचना व रूपे कशी आहेत? शरीराचाच एक भाग असलेल्या मेंदूमध्येच हे सारे एकवटलेले आहे असा एक विज्ञाननिष्ठ विचार आहे. पण ते नेमके कसे आहे व कशा रीतीने चालते हे अद्याप फारसे कळलेले नाही. हे सगळे इतके गूढ आहे की आपण ते करूच शकणार नाही, कर्ता करविता परमेश्वर वेगळाच आहे असा विचार प्राचीन कालापासून मांडला गेला व सर्व जगात बहुसंख्य लोकांनी तो मानला. हा कर्ता करविता आपले सगळ्यांचे हात पाय डोळे कान वगैरे प्रत्यक्ष चालवतो की आपल्या आत्म्याकरवी ती कामे करून घेतो? हा आत्मा परमात्म्यापासून वेगळा आहे की त्याचाच एक अंश आहे? या प्रश्नातून द्वैत व अद्वैत मते मांडली गेली. त्यामधील अद्वैत मत खालील रचनेत दिले आहे। यामध्ये "मी हे नाही", "ते सुद्धा नाही" असे करीत शंकराचार्यांनी जगाचे सुंदर वर्णन केले आहे.

मन, बुद्धी, अहंकार व चित्त म्हणजे मी नाही, जीभ, नाक, कान, डोळे आदि (ज्ञानेंद्रिये) मी नाही, (पंचमहाभूतातील) जमीन, आकाश, हवा किंवा तेजसुद्धा नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.
मी म्हणजे जीवनाचा प्राण नाही की प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे पांच वायु नाही. रक्त, मांस, मज्जा, अस्थी, कातडी, चरबी आदि ज्या सात धातूंपासून हे शरीर बनलेले आहे किंवा ज्या पांच शारीरिक वा मानसिक आवरणामध्ये ते आच्छादित केलेले आहे ते म्हणजे मी नव्हे. हात, पाय, जीभ, व उत्सर्जक इंद्रिये ही पांच कर्मेंद्रिये म्हणजे मी नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.
राग, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू माझ्यात नाहीत. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ ही मला नकोत. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.
मी पुण्याचा किंवा पापाचा धनी नाही. मला सुखही होत नाही की दुःखही होत नाही. मंत्रपठण, तीर्थयात्रा, यज्ञयाग किंवा वेदांताची मला गरज नाही. मी उपभोग घेणारा नाही, देणारा नाही की उपभोगाची वस्तूही नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.
मला मृत्यूचे भय नाही (कारण मृत्यूच नाही), मी जातींमध्ये भेदभाव करीत नाही, मला माता पिता व जन्मच नाही. भाऊ, मित्र, गुरू, शिष्य कोणीही नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.
मला विकल्प (विचार) नाही की आकार नाही. मी सर्वत्र आहे व सर्व इंद्रियांना चालवतो. पण मी कशाशीच बांधलेलोही नाही की कशापासून मुक्तही नाही. मी एक चिरकाळ टिकणारा आनंद आणि साक्षात मांगल्य आहे.

Sunday, February 22, 2009

निर्वाण षटकम्


मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं । न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः। चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। १ ।।

न च प्राणसंज्ञो न वै पंचवायुः । न वा सप्तधातुः न वा पञ्चकोशः।
न वाक्पाणिपादम् न चोपस्थपायु । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। २ ।।

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ । मदो नैव मे नैव मात्सर्यभावः।
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ३ ।।

न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं । न मन्त्रो न तीर्थो न वेदा न यज्ञ।
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ४ ।।

न मे मृत्युशंका न मे जातिभेदः । पिता नैव माता नैव न जन्मः।
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ५ ।।

अहं निर्विकल्पो निराकार रूपो । विभुत्वाच सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम्।
न चासङ्गत नैव मुक्तिर्न बन्धः । चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।। ६ ।।

Saturday, February 21, 2009

बोधवाक्य

'केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे' हे समर्थ रामदासांचे सुप्रसिद्ध वचन माझी आई दर दहा पंधरा दिवसांत एकदा तरी मला ऐकवायचीच. तिने सांगितलेले घरातले एखादे काम करणे आळसापोटी टाळण्यासाठी "मला ते येत नाही", "मी ते शिकलो नाही", "मी ते यापूर्वी कधी केलेले नाही","उगाच असं करायला गेलो आणि तसं झालं तर पंचाईत होईल" वगैरे सबबी मी पुढे करीत असे. त्यावर तिचे उत्तरही ठरलेले असे. "शिकला नसशील तर आता शिकून घे", "करायला घेतलेस की यायला लागेल","प्रत्येक गोष्ट तू कधी तरी पहिल्यांदा करणारच आहेस, आज हे काम कर", "असंच्या ऐवजी तसं होणार नाही याची आधी काळजी घे आणि तरीही तसं झालंच तर काय करायचं ते आपण तेंव्हा पाहू" वगैरे सांगितल्यावर मला ते काम करण्याशिवाय दुसरा पर्याय नसे. मात्र एकदा ते काम हाती घेतल्यावर ते फक्त यायलाच नव्हे तर मनापासून आवडू लागे.
मराठीमध्ये ब्लॉग सुरू करायला घेतला तेंव्हा साधारण अशीच परिस्थिती होती त्यामुळे लहानपणची ही आठवण जागी झाली. ब्लॉग या प्रकारासंबंधी कांहीच माहिती नव्हती आणि त्यातले कांहीसुद्धा येत तर नव्हतेच, कधी पूर्वी इंटरनेटवर काम केलेले नव्हते. बोट धरून चालवत घेऊन जाणाराही कोणी नव्हता. पण कामाला लागल्यानंतर त्यातून एक एक गोष्ट शिकून घेत, चुका करीत, त्या सुधारीत कसाबसा माझा हा ब्लॉग तयार तर झाला. एक झाल्यानंतर उत्साह वाढला आणि याहू ३६० वर दुसरा सुरू केला. त्या ठिकाणी एक बोधवाक्य द्यायचे असते, ते कोणते द्यावे याचा जास्त विचार करायची गरजच नव्हती.
'केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे।' हे मनांत घोळत असलेले वाक्य देऊन टाकले.
दोन तीन महिन्यांनी दासनवमी आली. तोपर्यंत मी आपल्या ब्लॉगवर थोडी थोडी माहिती देण्यास सुरुवात केली होती. "आपले बोधवचन आता धूळ खाऊ लागले आहे, ते कधी बदलणार?" अशा अर्थाचे संदेश याहूवर दिसू लागले होते. तेंव्हा समर्थ रामदासांचेच दुसरे सुप्रसिद्ध वचन "जे जे आपणासी ठावे ते इतरासी सांगावे, शाहाणे करून सोडावे सकळ जन " आपले बोधवाक्य बनवले. यांतील "शाहाणे करोन सोडावे" हा भाग आपल्या आंवाक्याबाहेरचा वाटत होता, पण पहिला अर्धा भाग अंमलात आणायचा थोडा तरी प्रयत्न करून पहावा असे ठरवले.
त्यानंतर एक गंभीर आजारपण उद्भवले. त्या दयनीय परिस्थितीत "कभी खुदपे कभी हालातपे रोना आया। " इतकेच सांगावेसे वाटले. थोडे बरे वाटू लागल्यावर पुन्हा धडपड करण्याची उमेद निर्माण झाली. तेंव्हा "लहरोंसे डरकर नैया पार नही होती। कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती। " हे बोधवाक्य घेऊन त्यापासून स्फूर्ती घेण्याचा प्रयत्न केला. कांही दिवसांनी मराठी ब्लॉगवर हिंदी बोधवाक्य कशाला असा विचार मनात आला तेंव्हा ते बदलून "व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, गांत पुढे मज जाणे, माझे जीवनगाणे। " हे बोधवाक्य निवडले.
पुढील दासनवमीला पुन्हा समर्थ रामदासस्वामींचे वचन घ्यावेसे वाटले. यावेळी "मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे । मना बोलणें नीच सोशीत जावे ॥ स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे । मना सर्व लोकांसि रे नीववावे ।। " हे निवडले. कुणीही कांहीही म्हंटले तरी आपण आपली शांतगंभीर वृत्ती सोडता कामा नये हा उपदेश समोर असला म्हणजे मनावर ताबा ठेवायला त्याचा उपयोग होतो. या सगळ्यांमध्ये कांहीतरी एक समान सूत्र आहे हे वाचकांच्या लक्षात आलेच असेल.

Friday, February 20, 2009

हा सागरी किनारा


गेली चाळीस वर्षे मी समुद्रकिनार्‍यावरील मुंबईनगरीत रहात आहे. त्यातील वीस वर्षे माझे ऑफीस अगदी सागरतटावर होते, समुद्रातल्या भरती ओहोटीच्या लाटांचे पार्श्वसंगीत दिवसभर सतत कानावर पडायचे आणि मान वळवून खिडकीच्या बाहेर नजर टाकली की त्यांचे दर्शन व्हायचे. असे असले तरी संधी मिळाली की किनार्‍यावर जाऊन अथांग समुद्राकडे पहातच रहावे असे अजूनही वाटते. मागच्या डिसेंबर महिन्यात आम्ही फ्लॉरिडामधल्या सेंट ऑगस्टीयन बीचवर सहलीसाठी गेलो होतो.

आमचे हॉटेल सागरकिनार्‍यावरच होते. केंव्हाही मनात आले की पांच मिनिटाच्या आत अगदी समुद्राच्या पाण्यापर्यंत पोचू शकत होतो. अर्थातच आम्ही जास्तीत जास्त वेळ किनार्‍यावरल्या वाळूतच काढला हे सांगायला नकोच. आपल्या कारवारजवळ अरबी समुद्राच्या आणि तामिळनाडूमध्ये बंगालच्या उपसागराच्या किनार्‍यावरले कांही लांब लचक बीच मी पाहिले होते. सेंट ऑगस्टीयन बीचसुध्दा असाच खूप दूरवर पसरला आहे. उत्तर आणि दक्षिणेला नजर पोचेपर्यंत सपाट वाळू पसरलेली आणि पूर्वेला अॅटलांटिक महासागराचे अथांग पाणी हे मनोहारी दृष्य थक्क करून टाकते. या जागी किंचित ग्रे कलरची छटा असलेली चाळणीने चाळून ठेवल्यासारखी बारीक पांढरी वाळू पसरली आहे. स्वच्छ पारदर्शक पाण्यातून पायाखालची वाळू स्पष्ट दिसते एवढेच नव्हे तर ओल्या वाळूत आपले प्रतिबिंब आरशात पाहिल्यासारखे पहाता येते. आमच्या सुदैवाने आम्हाला समुद्रावर इंद्रधनुष्य पहायला मिळाले. इतक्या वर्षात मुंबईला कधी मी ते पाहिल्याचे आठवत नाही. बहुधा पावसाळ्यात जेंव्हा आभाळात ढग येतात तेंव्हा सूर्यबिंब पूर्णपणे झाकून जात असेल आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात इंद्रधनुष्य दिसत नाही असे असेल. कुठेही इंद्रधनुष्याचे वाळूवर पडलेले प्रतिबिंब पाहण्याचा योग तर फारच दुर्मिळ असेल. आमच्या नशीबाने तेसुध्दा पहायला मिळाले.

समुद्रकिनारा खूपच मोठा असल्याने तिथे फिरायला आलेल्या लोकांची गर्दी वाटत नव्हती. भेळपुरी किंवा चणेफुटाणे विकणारे नव्हतेच. किनार्‍यावरल्या वाळूत कागदाचा एक कपटा किंवा प्लॅस्टिकचा एक बारकासा तुकडासुध्दा पडलेला नव्हता. समुद्राच्या पाण्याने स्वच्छ धुतलेल्या वाळूत जागोजागी शंखशिंपल्यांचे तुकडे, तुरळक जागी पाणवनस्पती आणि कबूतरे, चिमण्या, सीगल, पेलिकन वगैरे पक्ष्यांचे थवे वगैरे उठून दिसत होते. पक्ष्यांची पिले जेंव्हा आपली चिमुकली पावले पटपट टाकत तुरूतुरू धावत तेंव्हा त्यांच्याकडे पहातांना खूपच मजा वाटायची.

किनार्‍यावर येणारे कांही पर्यटक जय्यत तयारीनिशी आले होते. कदाचित त्यासाठी वेगवेगळे तयार किट्स मिळत असतील. पाण्यावर सर्फिंग करण्यासाठी कांही लोक लांबुळक्या चपट्या पट्ट्या (सर्फबोर्ड) खांद्यावर घेऊन खास अंगाला चिकटून बसणारा पेहराव करून येत होते आणि त्या पट्ट्याची दोरी कंबरेला बांधून घेऊन पाण्यात घुसत होते. बहुतेक जण नवशिकेच वाटत होते कारण ते मोठी लाट आली की धपाधप पडत होते आणि उठून पुन्हा बोर्डवर चढत होते. लहान लहान मुलेसुध्दा छोटे बोर्ड घेऊन कांठाकांठाने पाण्यात खेळत होती. किनार्‍यावर वाळूचे किल्ले बांधण्यासाठी प्लॅस्टिकची चिमुकली फावडी घेऊन त्याने वाळू खणून काढत होती. कोणी खेळण्यासाठी चेंडू आणले होते तर कोणी तबकड्या. बहुतेक लोकांकडे फोटो आणि व्हीडिओ रेकॉर्डिंगसाठी कॅमेरे होतेच, कांही लोकांनी ते स्टँडला लावून सूर्योदयाच्या बदलत्या दृष्यांचे सलग चित्रण केले.

एका ठिकाणी समुद्रात पन्नास साठ मीटर पर्यंत जाणारा पीयर बाधला आहे. त्यावरून फिरत फिरत थोडे खोल पाणी पाहता येते. निव्वळ हौस म्हणून मासे पकडणारे लोक गळ टाकून त्या पियरच्या कांठावर उभे राहतात आणि गळाला मासा लागला की त्याची दोरी खेचून त्याला बाहेर काढतात. माझ्या डोळ्यादेखतच दोघांच्या गळाला मासे लागले होते. त्यातला एक बहुधा बराच मोठा असावा. त्याला ओढतांना त्या पकडणार्‍याच्या हातातल्या फिशिंग रॉडचा आकार पार अर्धवर्तुळाकृती झाला होता आणि त्या माशाने एवढा जोराचा झटका दिला की त्याच्या ताणाने गळाला बांधलेली दोरीच तुटून गेली. दुसर्‍या माणसाच्या गळाला चांगला दोन फूट लांब शार्क मासा लागला होता. त्या माणसाने त्या माशाच्या तोंडातून गळाचा आकडा सोडवून घेतला आणि माशाला पाण्यात सोडून दिले. गळ बाहेर काढल्यानंतर त्याला लावलेले झिंगा मासे खाण्यासाठी खूप पक्षी आजूबाजूला भिरभिरत असतात.

समुद्रकिनार्‍यावर पाण्यात जाऊन समोरून येणार्‍या लाटांकडे पाहतांना वेळ कसा जातो ते कळतच नाही. प्रत्येक लाट वेगळा आकार घेऊन येते आणि येता येता आपला आकार बदलत असते. जेंव्हा ती आपल्या अंगावर येते आणि पायाखालची वाळू वाहून नेते तेंव्हा तर विलक्षण गंमत वाटते. वाळूतले शिंपले कितीही वेचले तरी पुरेसे वाटत नाहीत. पक्ष्यांचे थवे एकत्र उडतांना, तीरावर उतरतांना, पाण्यात सूर मारून शिकार करतांना पाहण्यात मजा वाटते. एक पक्षी बराच वेळ वाळूत फक्त एकाच पायावर स्तब्ध उभा होता. त्याला पाहून बकध्यान कशाला म्हणतात ते आठवले. जवळ जाताच त्याने पटकन दुमडून ठेवलेला दुसरा पाय खाली आणला आणि तो हवेत उडाला.

विशाल किनारा, अथांग समुद्र, त्यातल्या रुपेरी लाटा, मोकळी हवा, तुफान वारा, वेगवेगळ्या आकाराचे शंखशिंपले, पक्षी आणि माणसांचे असंख्य नमूने पाहता पाहता तीन दिवस भुर्रकन उडून गेले आणि परत फिरण्याची वेळ आली.

Thursday, February 19, 2009

समर्थ रामदास स्वामींचे पत्र (संपादित आवृत्ती ४ मार्च २०१३)


समर्थ रामदास स्वामींचे पत्र (Wikipedia मधून उद्धृत)
अखंड सावधान असावें । दुश्चित्त कदापि नसावें।
तजविजा करीत बसावें । एकांत स्थळी ॥ १॥
कांहीं उग्र स्थिति सांडावी । कांहीं सौम्यता धरावी।
चिंता लागावी परावी । अंतर्यामीं ॥ २॥
मागील अपराध क्षमावे । कारभारी हातीं धरावे।
सुखी करूनि सोडावे । कामाकडे ॥ ३॥
पाटवणी तुंब निघेना । तरी मग पाणी चालेना।
तैसें सज्जनांच्या मना । कळलें पाहिजे ॥ ४॥
जनाचा प्रवाह चालिला । म्हणजे कार्यभाग आटोपला।
जन ठायीं ठायीं तुंबला । म्हणजे खोटां ॥ ५॥
श्रेष्ठीं जें जें मिळविलें । त्यासाठीं भांडत बसलें।
मग जाणावें फावलें । गलिमांसी ॥ ६ ॥
ऐसें सहसा करूं नये । दोघे भांडतां तिस-यासी जय।
धीर धरोण महत्कार्य । समजून करावें ॥ ७ ॥
आधींच पडला धास्ती । म्हणजे कार्यभाग होय नास्ती।
याकारणें समस्तीं । बुद्धि शोधावी ॥ ८ ॥
राजी राखितां जग । मग कार्यभागाची लगबग।
ऐसें जाणोनियां सांग । समाधान राखावें ॥ ९ ॥
आधीं गाजवावे तडाके । मग भूमंडळ धाके।
ऐसें न होतां धक्के । राज्यास होती ॥ १० ॥
समय प्रसंग ओळखावा । राग निपटून काढावा।
आला तरी कळों न द्यावा । जनांमध्यें ॥ ११ ॥
राज्यामध्ये सकळ लोक । सलगी देऊन करावे सेवक।
लोकांचे मनामध्यें धाक । उपजोंचि नये ॥ १२ ॥
आहे तितुकें जतन करावें । पुढें आणिक मिळवावें।
माहाराष्ट्रराज्य करावें । जिकडे तिकडे ॥ १३ ॥
लोकीं हिंमत धरावी । शर्तीची तरवार करावी।
चढती वाढती पदवी । पावाल येणें ॥ १४ ॥
शिवराजास आठवावें । जीवित्व तृणवत् मानावें।
इहपरलोकी रहावें। कीतीर्रूपे ॥१५॥
शिवरायांचे आठवावे रूप । शिवरायांचा आठवावा प्रताप ॥
शिवरायाचा आठवावा साक्षेप । भूमंडळीं ॥१६॥
शिवरायांचे कैसें चालणें । शिवरायाचें कैसें बोलणे॥
शिवरायचे सलगी देणें । कैसे असें ॥१७॥
सकळ सुखांचा त्याग । करून साधिजे तो योग ॥
राज्यसाधनाची लगबग । कैसी असे ॥१८॥
त्याहूनि करावे विशेष । तरीच म्हणावे पुरुष ॥
या उपरी विशेष । काय लिहावें ॥१९॥


छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी हे समकालीन होते. छत्रपती स्वामीजींना गुरुस्थानी मानत होते असे कांही लोक म्हणतात. पण कांही लोकांना ते तितकेसे मान्य नाही. शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या प्रसंगी रामदास स्वामी त्या स्थळी उपस्थित होते असे उल्लेख निदान मी वाचलेल्या लोकप्रिय साहित्यात तरी वाचल्याचे मला आठवत नाही. कौरव व पांडवांना लहानपणी विशिष्ट शिक्षण देणारे गुरु द्रोणाचार्य किंवा दशरथ राजाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे वसिष्ठ ऋषी अशा प्रकारचे घनिष्ठ असे गुरु शिष्य नाते त्या दोघांमध्ये नसावे. त्या दोघांची कार्यक्षेत्रे वेगळी होती. राज्य स्थापन करण्याच्या, त्यात वाढ करण्याच्या आणि आपल्या अंमलाखालील मुलुखाचा कारभार सुव्यवस्थितपणे चालवण्याच्या धामधुमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज गुंतलेले असल्यामुळे त्यांची व रामदास स्वामींची प्रत्यक्ष गांठभेट नेहमी होत नसेल. पण समर्थ रामदास सगळ्या जगालाच उद्देशून चार उपदेशाच्या गोष्टी सांगत हिंडत असतांना शिवाजी महाराजांच्या कार्याकडे लक्ष ठेऊन होते व व समाजाचे प्रबोधन करून त्याद्वारे अप्रत्यक्षपणे त्यांना हातभार लावत होते असे दिसते.
त्यांनी लिहिलेली कांही पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. विकीपीडियावरून घेतलेले एक पत्र वर दिले आहे. या पत्रात त्यांनी राज्यकारभाराच्या दृष्टीने कांही सूचना किंवा उपदेश दिला आहे.'समर्थ रामदास स्वामींचे छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र' अशा मथळ्याखाली हे पत्र दिले आहे. मात्र "हे पत्र शिवाजी राजस लिहीले नसून ते संभाजी राजस लिहिले आहे." अशी दुरुस्ती खाली केलेली आहे. (असे २००९ साली वाचले होते) "शिवरायाचा आठवावा प्रताप। शिवरायाचा आठवावा साक्षेप।" वगैरे सुप्रसिध्द ओळी त्या वेळी त्यात दिसल्या नाहीत. (या ओळींसह पुढीलपाच ओव्या आता मला मिळाल्या आहेत आमि मूळ पत्रात आता त्या जोडल्या आहेत)
या पत्रामधील उपदेश महत्वाचा आहे आणि सर्वच राज्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल असा आहे.
वर दिलेले चित्र स्वामी समर्थांच्या वेबसाईटवर दिले आहे. रत्नागिरीजवळील शिवसमर्थगडावर हे भित्तीचित्र चितारलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज एकदा समर्थ रामदासस्वामींना भेटायला आलेले असतांना स्वामींनी त्यांना सहजच एक खडक फोडायला सांगितले. वरून सर्व बाजूंनी बंद दिसणारा तो खडक फोडल्यावर त्याच्या आंत थोडे पाणी निघाले, इतकेच नव्हे तर त्या पाण्यात एक जीवंत बेडूक सुद्धा होता. जगातील यच्चयावत् जीवांची काळजी परमेश्वर वाहतो आहे आणि प्रजेचे पालन करणा-या राजापेक्षा तो किती तरी श्रेष्ठ आहेहे यावरून महाराजांच्या निदर्शनास आले आणि त्यांच्या मनात कणभरही अहंकार उरला नाही. अशी कथा या चित्रामधील घटनेबद्दल सांगतात.

Wednesday, February 18, 2009

दासबोध


आज रामदासनवमी आहे. समर्थ रामदासांनी या दिवशी समाधी घेतली. यानिमित्त त्यांनी लिहिलेल्या दासबोधाची थोडी ओळख करून देत आहे. कांही इतर धार्मिक ग्रंथांप्रमाणे हा फक्त संन्यस्त वृत्तीने आध्यात्मिक विचार सांगणारा ग्रंथ नाही. यात अनेक प्राचीन धार्मिक ग्रंथांमधील विचारांचे सार आहे. दहा समासांचे एक दशक अशी वीस दशके त्यात आहंत. आत्मा परमात्मा वगैरेबद्दल सांगणा-या अध्यात्माच्या विषयांशिवाय मू्र्खलक्षणे, शिकवण आदि नांवाची दशके आहेत. त्यांत सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनात मार्गदर्शन करेल, अगदी आजच्या युगात उपयुक्त वाटेल असे खूप कांही यात आहे. यात काय काय समाविष्ट आहे ते समर्थांनी स्वतःच ग्रंथारंभलक्षणनाम समासात विस्तृतपणे दिले आहे. त्यामधील कांही ओव्या त्यांच्याच शब्दात खाली देत आहे. समर्थांनी सोपी भाषा वापरलेली आहे. ती समजायला कठीण वाटू नये असे मला वाटते. या ओव्या वाचल्यानेच पुढील ग्रंथात काय दिले असेल यासंबंधी उत्सुकता निर्माण होते. दासबोधातील कांही वेगवेगळे उतारे यापूर्वी वाचनात आले होते. पण पूर्ण ग्रंथ वाचायचा योग अजून आला नाही. समर्थांनी सांगितलेल्या महत्वाच्या गोष्टीपैकी जसजशा व जितक्या मला समजतील व आजच्या जीवनात उपयुक्त वाटतील त्या यथावकाश अधून मधून देण्याचा प्रयत्न करीन.


।। श्रीराम।।
श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिले जी येथ । श्रवण केलियाने प्राप्त । काय आहे ।।१।।
ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ।।२।। नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिले वैराग्याचे लक्षण । बहुधा अध्यात्मनिरोपण । निरोपिले ।।३।।
भक्तिचेनयोगे देव । निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राव । इये ग्रंथी ।।४।।
मुख्यभक्तीचा निश्चय । शुद्धज्ञानाचा निश्चय । आत्मस्थितीचा निश्चय । बोलिला असे ।।५।।
नाना किंत संवारले । नाना संशयो छेदिले । नाना आशंका फेडिले । नाना प्रश्न ।।१२।।
नाना ग्रंथांच्या संमती । उपनिषदे वेदांत श्रुती । आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेसहित ।। १५।।
नाना संमती अन्वये । म्हणोनि मिथ्या म्हणता नये । तथापि हे अनुभवासि ये । प्रत्यक्ष आता ।।१६।।
शिवगीता रामगीता । गुरुगीता गर्भगीता । उत्तरगीता अवधूतगीता । वेद आणि वेदांत ।।१८।।
भगवद्गीता ब्रह्मगीता । हंसगीता पांडवगीता । गणेशगीता यमगीता । उपनिषदे भागवत ।।१९।।
इत्यादिक नाना ग्रंथ । संमतीस बोलिले येथ । भगवद्वाक्ये यथार्थ । निश्चयेसी ।।२०।।
भगवद्वचनी अविश्वासे । ऐसा कवण पतित असे । भगवद्वाक्याविरहीत नसे । बोलणे येथीचे ।।२१।।
पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरे करी ।।२२।।
अभिमाने उठे मत्सर । मत्सरे ये तिरस्कार । पुढे क्रोधाचा विचार । प्रबळ बळे ।।२३।।
ऐसे अंतरी नासला । कामक्रोधे खवळला । अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ।।२४।।
आता श्रवण केलियाचे फळ । क्रिया पालटे तत्काळ । तुटे संशयाचे मूळ । येकसरां।।२८।।
मार्ग सापडे सुगम । नलगे साधन दुर्गम । सायुज्यमुक्तीचे वर्म । ठाई पडे ।।२९।।
नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथे ज्ञानप्राप्ती । ऐसी आहे फळश्रुती । इये ग्रंथी ।। ३० ।।
जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा । मत्सर धरी जो पुंसा । तयास तेचि प्राप्त ।। ३८।।

Sunday, February 15, 2009

सी एन एन च्या अंतरंगात


सी एन एन च्या अंतरंगात . . .(पूर्वार्ध)

पंचवीस तीस वर्षांपूर्वी एकदा हैद्राबादला गेलो असतांना त्या वेळी तिथे नव्यानेच उघडलेल्या ओबेरॉय हॉटेलात उतरलो होतो. परदेशी प्रवाशांसाठी ज्या खास सोयी तिथे केल्या होत्या त्यात एक प्रचंड आकाराची डिश अँटेना बसवून त्यावरून प्रत्येक खोलीतील टेलीव्हिजन सेटवर प्रमुख परदेशी चॅनेल्स दाखवण्याची व्यवस्थासुध्दा होती. तिथे मी पहिल्यांदा सीएनएनचे कार्यक्रम पाहिले आणि त्यातून मला आश्चर्याचे धक्क्यावर धक्के बसत गेले. दिवसाचे चोवीस तास टीव्हीवर फक्त बातम्या देणे कोणालाही शक्य असेल असे तेंव्हा मला वाटत नव्हते. सुरुवातीच्या काळात आम्हाला फक्त मुंबई दूरदर्शन दिसत असे आणि ते सुध्दा संध्याकाळचे कांही तासापुरतेच. बातम्या, माहिती, मनोरंजन, प्रसिध्दी, प्रचार, उपदेश वगैरे सर्वांसाठी त्यातच थोडा थोडा वेळ दिला जात असे. जाहिराती आणि प्रायोजित कार्यक्रम मात्र नव्हते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील वार्तापत्रांना प्रत्येकी फक्त दहा पंधरा मिनिटे मिळत. स्व.स्मिता पाटील आणि स्व.भक्ती बर्वे यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न निवेदिका असूनसुध्दा त्यांनी वाचलेल्या ठळक बातम्यांच्या मथळ्यानंतर पुढल्या सविस्तर बातम्या त्या काळी बहुतेक वेळा ऐकाव्याशा वाटत नसत. त्यामुळे दिवसाचे चोवीस तास फक्त बातम्या देणारे सीएनएन चॅनल हेच एक आश्चर्य होते.

त्या दिवसातले दूरदर्शन आणि सीएनएन यांच्या बातम्यांमध्ये जमीन आसमानाइतका फरक असायचा. दूरदर्शन केंद्राकडे असलेली मोजकी मोबाइल फोटोग्राफिक यंत्रे आधीपासून ठरवून केलेल्या कार्यक्रमांच्या जागी पाठवली जात. निरनिराळ्या सभा, संमेलने, खेळाचे सामने, मंत्र्यांचे दौरे वगैरे ठिकाणी जाऊन त्या जागी ठरलेल्या घटनांचे चित्रीकरण करून त्या परत जात आणि त्यावर प्रक्रिया केल्यानंतर ती हकीकत त्यानंतर जमेल तेंव्हा बातम्यांमध्ये दाखवण्यात येत असे. त्यामुळे मान्यवर पाहुण्यांचे हारतुरे घालून झालेले स्वागत, त्यांनी केलेले दीपप्रज्वलन, त्यांचे भाषण किंवा त्यांच्या हस्ते झालेला बक्षिससमारंभ अशा प्रकारच्या घटना तेवढ्या दृष्य स्वरूपात असत आणि इतर सर्व बातम्या निवेदिका चक्क वाचून दाखवत. रेडिओवरील बातम्या ऐकण्यापेक्षा त्या फारशा वेगळ्या नसायच्या. त्यातला सुध्दा बराच मोठा भाग कुठे तरी अमका असे म्हणाला आणि दुसरीकडे कुठे तरी तमक्याने असे सांगितले अशा प्रकारचा असायचा. या सांगोवांगीच्या प्रकाराला बातम्या कशाला म्हणायचे असाच प्रश्न अनेक वेळा मला पडत असे. सीएनएनच्या वार्ताहरांचे आणि त्यांना बातम्या पुरवणा-या वृत्तसंस्थांचे जाळे मात्र इतके घट्ट विणलेले होते की वादळ, भूकंप यासारख्या नैसर्गिक घटना असोत, अपघात वा दुर्घटना असोत किंवा खून, मारामा-या, दंगेधोपे वगैरे मानवनिर्मित घटना असोत, त्या जागी कांही क्षणातच त्यांचे वार्ताहर पोचून जात आणि घटना घडल्यानंतर थोड्याच वेळात सीएनएनवर त्या जागेची चलचित्रे दाखवायला सुरुवात होत असे. ठरवून झालेल्या कार्यक्रमांच्या जोडीने अकस्मात झालेल्या घटनांचेसुध्दा सचित्र वृत्तांत येत असल्याने त्या बातम्या कानांनी ऐकण्यापेक्षा डोळ्यांनी त्यांच्या संबंधातील दृष्ये पहाण्याचे वेगळे समाधान मिळत असे. आपण स्वतः त्या घटनास्थळी गेल्यासारखे वाटत असे.

आपल्या देशात कोणाच्या भावना कशामुळे केंव्हा दुखावल्या जातील आणि त्याचा परिपाक कशा प्रकारचे नवे प्रश्न निर्माण करण्यात होईल याचा भरंवसा नाही. त्याशिवाय विधीमंडळांचा हक्कभंग आणि न्यायालयाची अवज्ञा होण्याची धास्ती मनात असते. त्यामुळे दूरदर्शनवर कोठल्याही घटनेची बातमी देतांना त्यातील संबंधित पात्रांना 'अल्पसंख्यांक', 'बहुसंख्यांक', 'स्थानिक', 'परप्रांतीय', 'परभाषिक', 'परकीय', 'पुढारलेला', 'मागासलेला', 'बहुजनसमाज' अशा प्रकारचे बुरखे घालून त्यांचा उल्लेख केला जात असे. कांही अनाकलनीय कारणांपोटी कोठल्याही खाजगी व्यावसायिक संस्थेच्या किंवा त्याच्या प्रसिध्द उत्पादनाच्या नांवाचा साधा उल्लेख करणेसुध्दा टाळले जात असे. "अमक्या राज्यातल्या किंवा तमक्या शहरातल्या एका उद्योगसमूहाने या या क्षेत्रात प्रचंड कामगिरी करून जागतिक बाजारपेठेत आपले स्थान बळकट केले आहे." असे सांगतांना त्या जगप्रसिध्द झालेल्या कंपनीचे नांव भारतातील प्रेक्षकांपासून मात्र लपवले जात असे. तसेच अमक्या शहरातल्या एका कारखान्यात मोठी आग लागून त्यात दहा लोक मृत्युमुखी पडले." असे सांगितल्यामुळे त्या शहरात नोकरीसाठी गेलेल्या लक्षावधी लोकांच्या नातेवाईकांच्या जिवाला घोर लागत असे. 'फेविकॉल' हे विशेषनाम घेता न आल्यामुळे त्याचा उल्लेख करतांना तो 'चिपकानेवाला पदार्थ' असा करावा लागत असे. अशा सगळ्या बंधनांमुळे दूदर्शनवरल्या बातम्यांचे पुलंच्या शब्दात सांगायचे तर 'दुर्दर्शन' झाले होते. त्या काळी गाजलेल्या एका मार्मिक व्यंगचित्रात दूरदर्शनवरील निवेदिका "आता ऐका, सकाळच्या वर्तमानपत्रातल्या सेन्सॉर केलेल्या बातम्या." असे सांगतांना दाखवले होते.

सीएनएनच्या बातम्यांमध्ये असे आडपडदे नसायचे. कोणत्याही महत्वाच्या घटनेशी संबंधित व्यक्तींचे नांव गावच नव्हे तर त्याची साद्यंत माहिती, त्याच्या घरातली, शेजारी पाजारी राहणारी मंडळी, त्याचे सहकारी, मित्र, विरोधक, प्रतिस्पर्धी वगैरे सर्वांच्या मुलाखती वगैरेसह त्या व़त्ताच्या पाठोपाठ येत असे. त्यात विसंगती असणारच, प्रत्यक्ष जीवनातसुध्दा वेगवेगळ्या लोकांचे वेगळे अनुभव, वेगळे स्वार्थ, वेगळे विचार, वेगळी मते असतातच. सीएनएनवर होत असलेल्या चर्चांमध्ये सहभाग घेणारे लोक स्थानिक, राष्ट्रीय किंवा मित्रराष्ट्रांच्या धोरणावर बेधडक आणि सडकून टीका करत असत किंवा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या नांवाचा उल्लेख करून त्यावर विनोद करतांना मुळीच डगमगत नसत. दूरदर्शनसारख्या सरकारी विभागात अशा बाबतीत जास्तच काळजी घेतली जात असल्यामुळे हे सगळे दूरदर्शनवर दाखवणे निदान त्या काळात तरी कल्पनेच्या पलीकडले होते. यामुळे सीएनएनवरील कार्यक्रम खूप वेगळे, धक्कादायक आणि प्रेक्षणीय वाटत असत. कालांतराने भारतातच अनेक वाहिन्यांचे कार्यक्रम टेलिव्हिजनवर येऊ लागले आणि त्यात गुणात्मक तसेच संख्यात्मक सुधारणा होत गेली. तसेच सीएनएन व बीबीसीसह अनेक परदेशातून प्रसारित होणारे अनेक कार्यक्रमसुध्दा घरबसल्या पाहण्याची सोय झाली. रोजच्या सर्वसाधारण प्रकारच्या बातम्यांमध्ये त्यांत फारसे अंतर उरले नसले तरी आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घटना पाहण्यासाठी सीएनएनची आठवण येत असे.

न्यूयॉर्कमध्ये अकरा सप्टेंबरची घटना घडल्याची ब्रेकिंग न्यूज येताच मी आपल्या टीव्हीवर चॅनल बदलून सीएनएन प्रसारण लावले, त्या जागेवर पडलेला ढिगारा, उडत असलेला धुरळा आणि त्यातून जगल्या वाचलेल्या माणसांची धांवपळ यांची चलचित्रे दाखवणे तेवढ्यात सुरू झालेले होते आणि श्वास रोखून ती पहात असतांना अगदी डोळ्यादेखत कुठून तरी एक विमान आले आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या उभ्या असलेल्या दुस-या टॉवरला उध्वस्त करून कोसळतांना दिसले. कल्पितापेक्षाही भयंकर अशी ही भयाण घटना त्या दिवशी प्रत्यक्ष घडत असतांना जगभरातील कोट्यावधी लोकांनी हजारो मैल अंतरावरून घरबसल्या सीएनएनवर पाहिली होती. गेल्या वर्षी झालेल्या अमेरिकेतील निवडणुकीचे वारे वहायला लागल्यानंतर पुन्हा सीएनएन पहायला सुरुवात केली होती. मी अमेरिकेत पोचलो तेंव्हा तर टेलिव्हिजनवर प्रचाराची धुमश्चक्री चालली होती. सीएनएनवर रोज ती पाहतांना खूप मजा येत होती.
अशा सीएनएनचे मुख्यालय अॅटलांटा इथे आहे आणि पर्यटकांना भेट देण्यासारख्या येथील प्रमुख स्थळांमध्ये त्याचा समावेश असल्याने सीएनएन सेंटर आंतून पहायची मला खूप उत्सुकता होती.
.. . . . . . . . . .

सी एन एन च्या अंतरंगात . . .(उत्तरार्ध


सीएनएनचे मुख्यालय अॅटलांटा इथे आहे आणि पर्यटकांना भेट देण्यासारख्या तेथील प्रमुख स्थळांमध्ये त्याचा समावेश असल्याने सीएनएन सेंटर आंतून पहायची मला खूप उत्सुकता होती. डाउनटाउनमधील कोकाकोला म्यूजियमपासून ते जवळच असल्याने ते म्यूजियम पाहून लगेच चालत चालतच आम्ही सीएनएन सेंटरकडे गेलो. वीस पंचवीस वर्षांपूर्वी सीएनएनचा कार्यक्रम पहिल्यांदा पाहतांना जसा मला आश्चर्याचा धक्का बसला होता, त्याप्रमाणेच सीएनएन सेंटरच्या मुख्य दरवाजातून आत शिरताच समोर दिसणारे दृष्य विस्मित करणारे होते. मुंबईच्या नरीमन पॉइंट विभागातल्या गगनचुंबी ऑफीस ब्लॉक्ससारख्या चौकोनी ठोकळ्याच्या आकाराच्या या उत्तुंग इमारतीची अंतर्गत रचनासुध्दा तशीच असेल अशी माझी कल्पना होती. पण आंत येताच टेनिस कोर्टापेक्षा लांब, रुंद आणि सात आठ मजले इतकी उंच अशी अवाढव्य पोकळी समोर दिसत होती. त्या जागेत सगळीकडे दिव्यांचा लखलखाट मात्र होता. त्याच्या एका कोप-यात स्वागतकक्ष होते. सेंटरला भेट देणा-या पर्यटकांना त्याविषयीची माहिती देणे, तिकीटविक्री आणि रिझर्वेशन वगैरेसाठी दोन तीन काउंटर होते, त्याच्या समोर इच्छुक लोकांना रांगेत उभे राहण्यासाठी जागा होती आणि सिक्यूरिटी चेक करण्यासाठी खोल्या होत्या. त्याच्या पलीकडे सा-या मोकळ्या जागेत टेबले खुर्च्या मांडून दोन अडीचशे लोकांना बसण्याची व्यवस्था होती. तीन्ही बाजूंना अमेरिकन, मेक्सिकनपासून चिनी, जपानीपर्यंत सर्व प्रकारच्या खाद्यांचे अनेक स्टॉल होते. एकाद्या खूप मोठ्या मॉलच्या फूडकोर्टमध्ये आल्यासारखे तिथे गेल्यावर वाटत होते. इतर ठिकाणी असले फूडकोर्ट बहुधा मॉल्सच्या सर्वात वरच्या मजल्यावर किंवा तिथून बाहेर निघण्याच्या वाटेवर असतात, इथे आंत बाहेर करण्याचे मार्ग एकाच दरवाजातून आहेत. क्रिकेटच्या मैदानात लावतात तसे अवाढव्य आकाराचे स्क्रीन बाजूच्या भिंतींवर दुस-या वा तिस-या मजल्याइतक्या उंचीवर लावले होते आणि सीएनएनवर चाललेल्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण त्यावर होत होते. खाणेपिणे चालले असतांना बसल्या जागेवरून कोठूनही ते पाहता येईल अशी सोय करून ठेवली होती. आम्ही उगाचच बाहेरच्या एका टपरीत मिळाले ते अन्न पोटात ढकलून भूक भागवल्याचा आम्हाला पश्चात्ताप झाला. सीएनएन सेंटर पाहून झाल्यानंतर तिथल्या खाण्यापिण्याचा जरूर समाचार घ्यायचाच असा विचार करून काउंटरपाशी गेलो.

बहुतेक सर्व वस्तुसंग्रहालये किंवा प्रदर्शने जेवढा वेळ प्रेक्षकांसाठी उघडी असतात तेवढ्या वेळेत तिकीट काढून आंत गेल्यानंतर त्यातील कोणताही विभाग कुठल्याही क्रमाने हवा तेवढा वेळ पाहण्याची मुभा असते. परदेशात अनेक जागी फोटो किंवा व्हीडिओ शूटिंगला परवानगी असते, एवढेच नव्हे तर प्रवेशद्वारापाशीच त्यासाठी कॅमेरे विकत किंवा भाड्याने मिळतात. पूर्वी फोटो फिल्म्स मिळत असत, आता एसडी (फ्लॅश मेमरी) कार्डस मिळतात. त्यामुळे तिथे आलेले बहुतेक पर्यटक आपल्याला आवडलेल्या वस्तू किंवा दृष्यांचे चित्रीकरण करीत जागोजागी उभे असतांना दिसतात. कांही प्रदर्शनांची मांडणी मात्र जादूच्या गुहेसारखी केलेली असते. त्यात माणसाने गोंधळून हरवून जाऊ नये किंवा क्रमाक्रमाने त्यात मांडलेली दृष्ये पाहतांना त्यातून अपेक्षित परिणाम साधावा या कारणांसाठी आंत प्रवेश केल्यापासून बाहेर निघेपर्यंत एकाच वळणावळणाच्या मार्गिकेतून पुढे सरकत जावे लागते. पुढे गेल्यानंतर मागे वळून परत जाता येत नाही. आणीबाणीची परिस्थिती असेल तर थेट बाहेर पडणारे एक्झिट्स असतात. पण तिथेसुध्दा मुख्य दरवाजातून केंव्हाही आंत शिरता येते आणि वाटल्यास हळूहळू किंवा तरातरा पुढे सरकता येते. 'इनसाईड सीएनएन' हा मात्र एक वेगळ्याच प्रकारचा कार्यक्रम आहे. तो गटागटाने मार्गदर्शकाच्या साथीनेच पायी फिरत जाण्याचा तासभराचा कार्यक्रम आहे. त्यात कसल्याही प्रकारचे चित्रीकरण करणे निषिध्द आहे. सिनेमाचा खेळ किंवा विमानाचे उड्डाण यांच्या वेळा जशा ठरलेल्या असतात, त्याचप्रमाणे सीएनएनदर्शनासाठी ठरलेल्या वेळी एकेका ग्रुपला प्रवेश दिला जातो. आम्ही पोचलो तेंव्हा एक गट आंत जाण्याच्या तयारीत रांगेत उभा होता, पण त्यात जागा शिल्लक नसल्यामुळे आम्ही पुढच्या गटाचे आरक्षण केले आणि थोडा वेळ फुडकोर्टमध्ये काढून दिलेल्या वेळी हजर झालो.

दहशतवाद्यांच्या कारवाया सुरू झाल्यापासून अमेरिकेत सगळ्याच सार्वजनिक जागी कडक सुरक्षितता बाळगली जाते. सीएनएन सेंटरमधली तपासणी तर विमानतळावर असते तशासारखीच होती. डोक्यावरची कॅप, पायातले बूट, अंगावरचे डगले, कंबरेचा पट्टा, हांतातले घड्याळ, बोटातल्या अंगठ्या, खिशातला मोबाईल, पैशाचे पाकीट, किल्ल्यांचा जु़डगा वगैरे सगळे कांही काढून एका मोठ्या ट्रेमध्ये घालून ते एक्सरे मशीनमध्ये जाणा-या पट्ट्यावर ठेवायचे आणि दोन्ही हात वर धरून मेटल डिटेक्टरच्या चौकटीतून पलीकडे जायचे. त्यातून थो़डासा जरी पींपीं असा आवाज निघाला तर पाठीमागे परत जाऊन खिशात चुकून राहिलेली वस्तू काढून ती ट्रेमध्ये ठेवायची. गळ्यात, हातात, बोटात, कांनात, केसात वगैरे जागोजागी प्रयत्नपूर्वक अडकवलेली सगळी आभूषणे चारचौघांच्यादेखत काढून लंकेची पार्वती होणे महिलावर्गाला मुळीच पसंत नव्हते आणि एवढे दिव्य करून असे काय मोठे इथे पहायला मिळणार आहे हा भाव त्यांच्या नजरेत दिसत होता, पण इतक्या दूर येऊन आणि पैसे मोजून काढलेले महागाईचे तिकीट वाया जाऊ नये यासाठी त्यांना ते दिव्य करावे लागत होते.

एवढी साग्रसंगीत 'सुरक्षा जाँच' झाल्यानंतर आम्हाला एका महिला गाईडच्या हवाली केले गेले. तिने पहिल्यांदा सर्व पर्यटकांना एका अवाढव्य एस्केलेटरने सरळ आठ मजले उंचावर नेले. लिफ्टच्या बंद कपाटात घुसून वर खाली जाणे आणि उघड्या एस्केलेटरमधून चोहीकडे पहात वर जाणे यात मोठा फरक आहे. ते करतांना आपण स्पाइडरमॅनप्रमाणे सरसर वर चढून जात आहोत असा भास होत होता. आधी एका सभागृहात नेऊन सर्वांना सीएनएनबद्दल सर्वसाधारण माहिती देणारी एक छोटी फिल्म दाखवली गेली. त्यानंतर एक एक शिडी उतरत प्रत्येक मजल्यावर चाललेले काम कांचेच्या तावदानातून दाखवण्यात आले. प्रत्येक जागी त्या त्या ठिकाणी होत असलेल्या कामाची थो़डक्यात माहिती करून दिल्यानंतर त्याबद्दल कोणाला प्रश्न विचारायचे आहेत काय असे ती विचारायची. शाळेतले शिक्षक एक धडा शिकवून झाल्यानंतर कोणाला कांही शंका आहेत काय असे विचारतात, तसाच हा प्रकार होता. कोणी अवांतर प्रश्न विचारल्यास त्याची माहिती पुढल्या भागात मिळेल किंवा सीएनएनच्या वेबसाईटवर पहा असे सांगून ती त्याला कटवत होती, मात्र विषयाला अनुसरून असलेला प्रश्न नीट समजून घेऊन त्याचे समाधानकारक उत्तर ती देत होती.

सीएनएनचे अमेरिकन जनतेसाठी होणारे प्रसारण आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी असलेले भारतात दिसणारे प्रसारण यासाठी लागणारे काम संपूर्णपणे स्वायत्त असलेल्या दोन वेगवेगळ्या विभागातून केले जाते. आमच्या सीएनएन दर्शनाच्या कार्यक्रमाची व्याप्ती त्यापैकी फक्त अमेरिकेतल्या प्रसारणापुरती मर्यादित होती. टेलिव्हिजनवर अर्ध्या तासात संपणा-या एका एपिसोडचे शूटिंग तीन चार तास चालते आणि त्याच्या पूर्वतयारीसह निदान अर्धा दिवस त्यात मोडतो याचा मला अनुभव आहे. त्यानंतर होणारे एडिटिंग, मिक्सिंग वगैरे पोस्टप्रोसेसिंगसाठी लागणारा वेळ वेगळाच. यामुळे आज टेलिव्हिजनवर दिसणा-या कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग कांही दिवस आधी होऊन गेलेले असते. पण बातम्यांची गोष्ट वेगळी असते. आजकाल प्रसारणाचा वेग इतका वाढलेला आहे की सकाळी घडलेल्या घटनेची बातमी संध्याकाळपर्यंत शिळी होते, दुसरे दिवशी ती भूतकालात जाते आणि तिस-या दिवशीपर्यंत तिच्याशी संबंध नसलेल्या बहुतेक लोकांना तिचे विस्मरण होऊन गेलेले असते. यामुळे कोणतीही घटना घडल्यानंतर तिची बातमी लवकरात लवकर टीव्हीवर दाखवणे महत्वाचे असते. खेळ किंवा समारंभ यांचे वेळापत्रक आधीपासून ठरलेले असल्यामुळे त्याच्या चित्रीकरणाची परिपूर्ण व्यवस्था करणे शक्य असते, पण अवचित घडणा-या घटनांच्या सविस्तर बातम्या देण्यासाठी सतत सुसज्ज राहणे एवढेच करता येते. सीएनएनचा सारा डोलारा वृत्तप्रसारणावर आधारलेला असल्यामुळे या कामात जितकी कार्यक्षमता आणि तत्परता आणणे शक्य असेल तेवढी आणण्याचा प्रयत्न तिथे सतत केला जातो. तो कसा केला जातो याची छोटीशी झलक या कार्यक्रमात पर्यटकांना दाखवली जाते.

सीएनएन सेंटरची इमारत बांधतांनाच तिच्यातील अनेकविध दालनात काय चालले आहे हे बाहेरून दिसावे अशी व्यवस्था करून ठेवली आहे. प्रत्येक मजल्यावर लांबट आकाराचे मोठमोठे हॉल असून त्यात ओपन ऑफीस कन्सेप्टनुसार अर्ध्या उंचीची पार्टिशन्स घातली आहेत. चौकौनाच्या एका बाजूला पन्नास साठ फूट लांब कांचेची तावदाने लावलेली साउंडप्रूफ गॅलरी आहे. ती पुरुषभर उंचावर असल्यामुळे तिथे उभे राहून आतले संपूर्ण दृष्य दिसते, पण आत काम करत असलेल्या लोकांना प्रेक्षकांचा उपद्रव होत नाही. रोजच वीस पंचवीस वेगवेगळ्या गटात मिळून हजारभर प्रेक्षक तिथे येणार हे ठाऊक असल्यामुळे त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून आंतल्या सर्व कर्मचा-यांचे काम शांतपणे चाललेले असते. जगभरातून येत असलेले संदेश गोळा करून व त्यांचे संकलन करून प्रसारण करण्याच्या कामासाठी अनेक कुशल अधिका-यांची फौज कार्यरत असते. विषयानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्यांसाठी लहान लहान गट असतात. त्यातले संपादक, उपसंपादक, सहाय्यक वगैरेंना कामे वाटून दिलेली असतात. ते मिळालेल्या बातमीचा मजकूर लिहून त्याच्या व्हीडिओ क्लिप्स तयार करून देतात. चार पांच अनुभवी, तल्लख बुध्दीच्या आणि शांत प्रवृत्तीच्या अधिका-यांचे एक मंडळ या क्लिप्स पाहून त्यावर थोडीशी चर्चा करून त्यातले काय काय आणि किती प्रमाणात सांगायचे आणि दाखवायचे हे ठरवत असते. त्यांच्यात एकवाक्यता असतेच, शिवाय अंतिम निर्णय कुणाचा हे ठरलेले असते. त्याप्रमाणे तयार झालेले वृत्त नियंत्रण कक्षाकडे पाठवले जाते. प्रत्यक्षात चालेले प्रसारण कसे दिसते आहे याकडे त्या मंडळीचे लक्ष असतेच.

कांही विशेष कार्यक्रम एकादा विषय ठरवून त्यानुसार सवडीने तयार केले जातात. कदाचित तो कार्यक्रम आफ्रिकेतले जंगल किंवा अँटार्क्टिकाच्या बर्फाळ प्रदेशाबद्दल असेल, अवाढव्य उद्योगसमूहाबद्दल असेल किंवा इतिहासकाळात होऊन गेलेल्या काळाबद्दल असेल. त्यानुसार संशोधन करून शक्य तितक्या दृष्य स्वरूपातील माहिती गोळा करणे आणि त्यासाठी खास दृष्यांचे चित्रीकरण करणे, त्याचे संकलन वगैरेची कामे त्यातली तज्ञ मंडळी करीत असतात. मोठ्या आणि प्रसिध्द लोकांच्या मुलाखती घेण्याचे काम करणारी वेगळी टीम असते. कधी कधी त्या मान्यवरांना सीएनएनच्या स्टूडिओत बोलावले जाते, पण बहुतेक वेळी सीएनएनची टीम आपल्या साधनसामुग्रीसह त्यांना भेटायला जाते. कधी ही मुलाखत होऊन गेल्यानंतर दाखवली जाते, पण अनेक वेळा तिचे लाइव्ह टेलिकास्ट असते. त्या वेळी एका ठिकाणी चाललेली मुलाखत, त्याची माहिती देणारे स्टूडिओतले निवेदक आणि त्या मुलाखतीच्या अनुषंगाने दाखवण्यात येणारी इतर क्षणचित्रे या सर्वांचे मिश्रण करणे चालले असते. त्यातही बोलला जात असलेला प्रत्येक शब्द सबटायटल्सद्वारे दाखवला जात असतो. हे सारे काम करणारी तज्ञ आणि कमालीची कार्यक्षम मंडळी नियंत्रणकक्षात बसून हे काम करत असतात. त्यांचे दुरून दर्शन कांचेतून घडते.

एका डमी न्यूजरूममध्ये नेऊन आम्हाला तिथली अंतर्गत रचना दाखवली गेली. या भागात पार्श्वभूमीवर एक गडद हिरव्या रंगाचा पडदा लावलेला असतो. एका बाजूला ठेवलेल्या खुर्च्यांवर बसून वृत्तनिवेदक बातम्यांचे वाचन करतात. त्यांना दिसतील पण कॅमे-याच्या कक्षेत येणार नाहीत अशा जागी मॉनिटरवर त्यातले शब्द आणि वाक्ये उमटत असतात, ती वाचून हे निवेदक कॅमे-याकडे पाहून ते सांगत असतात. एकाच वेळी अनेक कॅमेरे वेगवेगळ्या बाजूने आणि झूम करून चित्रण करीत असतात, त्यातली चित्रे निवडून ती प्रक्षेपित केली जात असतात. स्टेजवरील दुस-या अर्ध्या भागात पडद्यासमोर मोकळी जागा असते. त्या ठिकाणी उभे राहून आणि मॉनिटरवर नजर ठेऊन निवेदक हवेतच हात वारे करीत असतात. आपल्याला मात्र पडद्यावरील एकादे चित्र किंवा नकाशातील जागा ते दाखवीत आहेत असा भास होतो. प्रत्यक्षात मागील हिरव्या रंगाचा पडदा अदृष्य होतो आणि तो भाग पारदर्शक होऊन जातो. स्टूडिओमधील छायाचित्र व रेकॉर्डेड किंवा दुसरीकडून येत असलेली क्लिप एकत्र दाखवली जात असल्यामुळे आपल्याला दोन्ही गोष्टी टीव्हीवर एकदम दिसतात. पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष घटना चालली आहे किंवा हवामानखात्याने दिलेली माहिती दिसत आहे आणि निवेदक पुढे उभे राहून आपल्याला ती दाखवते आहे असा आभास केला जातो.

दूरदर्शन आणि इतर कांही भारतीय स्टूडिओंमध्ये जाऊन तिथे चालत असलेले थोडेसे काम पाहण्याची संधी मला पूर्वी मिळाली असली तरी तिथे चालणा-या कामाचे एक अत्याधुनिक तंत्राने परिपूर्ण असे सर्वंकष दर्शन या इनसाइड सीएनएन टूरमध्ये मला घडले आणि थोडक्यात सांगायचे झाले तर ते पाहतांना भरपूर मजा आली.

Friday, February 13, 2009

ब्लॅक अँड व्हाइट


एका सायन्स एक्झिबिशनमध्ये 'दृष्टीभ्रम' या विषयावरील सुरेख प्रात्यक्षिके पाहिली. "दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं." या उक्तीची मजेदार उदाहरणे एक एक करून पहायची आणि त्यामागील शास्त्रीय कारणे समजावून घेऊन पुढे जायचे अशा पध्दतीने त्यांची मांडणी केलेली होती. त्यातल्या एका केबिनमध्ये थोडासा आडोसा करून अंधारात एक टेबल ठेवले होते. त्याच्या उजव्या व डाव्या भागावर दोन वेगळ्या दिव्यांच्या प्रकाशाचे झोत पाडले होते आणि मधोमध एक पडदा लावून त्या भागांना वेगवेगळे केले होते. टेबलावर ठेवलेले चित्र डाव्या बाजूला सरकवले की ते छान रंगीबेरंगी दिसायचे आणि तेच चित्र
उजव्या बाजूला सरकवले की पन्नास वर्षे पूर्वीचे पिवळे पडलेले कृष्णधवल छायाचित्र वाटायचे. प्रकाशलहरींच्या गुणधर्मांची थोडीफार ओळख असल्यामुळे मला त्याचे आश्चर्य वाटले नाही आणि त्याचे शास्त्रीय कारण फलक न वाचताच लक्षात आले होते. त्यामुळे माझ्या मनात वेगळेच विचार आले.

कांही लोक त्यांच्याकडे असलेल्या वस्तू, त्यांची माणसे आणि ते स्वतः यांच्याबद्दल भरभरून बोलत असतात. त्यांची तोंडभर प्रशंसा करतांना त्यातल्या चांगलेपणाचे बारकावे ते व्यवस्थित उलगडून दाखवतात. त्यांच्या कौतुक करण्याच्या कौशल्याचेच आपल्याला कौतुक वाटते. पण विषय बदलला की लगेच त्यांची चर्या बदलते. उत्तम कथाविषय असलेला एकादा चित्रपट पाहिलात कां असे विचारताच, "शी! त्यातला कसला तो टकल्या नायक आणि नकटी नायिका ?" असे उत्तर येते. एकादे अप्रतिम गाणे ऐकतांना त्यात कुठेतरी आलेली थोडीशी खरखर तेवढी त्यांना बोचते आणि कोणा हुषार माणसाला त्याच्या कर्तबगारीमुळे बढती मिळाल्याची बातमी ऐकून "त्याच्या मेव्हण्याच्या सासुरवाडीजवळ त्यांच्या चेअरमनच्या जावयाचे काका राहतात ना, म्हणून!" किंवा "चांगला आपल्या श्यामरावांना हा वरचा हुद्दा मिळायचा चान्स होता, पण हा मेला तडफडला ना मध्येच! " अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून येते. अशा
बोलण्यातून त्यांना कांही फायदा होत असेल किंवा त्यात त्यांचा कांही अंतस्थ हेतू असतो असेही दिसत नाही. त्यामुळे हे लोक असे कां वागतात याचे मला कोडे पडायचे.

एकरंगी प्रकाशकिरण (मोनोक्रोमॅटिक लाइट) या विषयावरचा तो प्रयोग पाहतांना मला या प्रश्नाचे उत्तर सापडले. सात रंगांच्या असंख्य छटांचे वेगवेगळ्या कंपनसंख्येचे किरण सूर्यप्रकाशात असतात. ते सर्व मिळून त्याचा पांढरा रंग बनतो. हे सारे किरण जेंव्हा लाल चुटुक रंगाच्या फुलावर किंवा हिरव्या गार पानावर पडतात तेंव्हा तेवढे रंग सोडून इतर सर्व रंगांचे प्रकाश किरण त्या वस्तूत शोषले जातात आणि अनुक्रमे फक्त तांबड्या व हिरव्या रंगांचे किरण तेवढे फूल आणि पानातून चहू बाजूंना परावर्तित होतात. तेच किरण आपल्या डोळ्यात पोचल्यामुळे आपल्याला त्यांच्या रंगांचा बोध होतो. पण फक्त पिवळ्या रंगाचे किरणच त्या गोष्टींवर पडले तर ते मात्र पूर्णपणे शोषले जातात आणि त्या वस्तू आपल्याला दिसतच नाहीत. त्यांच्या आजूबाजूला असलेल्या पांढ-या किंवा पिवळ्या रंगांच्या इतर गोष्टी पिवळ्या रंगांच्या किरणांना परावर्तित करतात त्यामुळे त्या आपल्याला व्यवस्थित दिसतात पण लाल व हिरव्या रंगाच्या वस्तू दिसत नसल्यामुळे त्यांचा बाह्य आकार तेवढा काळ्या रंगात दिसतो. काळा हा एक रंग नाही, त्यात प्रकाशकिरणांचा संपूर्ण अभाव असतो.

आत्मकेंद्रित प्रवृत्तीच्या लोकांच्या बाबतीत कांहीचे असेच घडते. आपल्या स्वतःच्या गडद अशा रंगात ते नेहमीच इतके डुंबलेले असतात की फक्त त्या रंगातल्या सर्व गोष्टी तेवढ्या त्यांना ठळकपणे दिसतात पण इतर कोणतेही रंग त्यांच्या मनापर्यंत पोचू शकत नाहीत. त्यामुळे ते स्वतःवर नेहमी खूष असतात पण इतरांचे चांगले गुण त्यांच्या ध्यानात येत नाहीत कारण ते त्यांना दिसतच नाहीत. आपला रंग सोडून इतर सगळ्या रंगातल्या गोष्टी त्यांना काळ्या दिसतात किंवा त्यांच्या लेखी त्या अस्तित्वातच नसतात.

अशा लोकांची ओळख पटणे तसे सोपे आहे. त्यांच्यासोबत तुम्ही बसले असतांना त्यांना कोणाचा फोन आला आणि तो गोपनीय वगैरे नसला तर त्या व्यक्ती तुमच्यादेखत त्यावर बोलतील. त्या काय बोलत आहेत ते तुम्हाला ऐकू येत असेल आणि पलीकडची व्यक्ती काय सांगत आहे याबद्दल कुतूहल वाटेल. पण फोन ठेवल्यानंतर त्याबद्दल अवाक्षरही न काढता "मी त्याला असं सांगितलं." असे म्हणून स्वतः बोललेली वाक्येच त्या पुन्हा तुम्हाला ऐकवतील. दुस-या बाजूच्या व्यक्तीने काय सांगितले याचे त्यांना महत्व वाटलेले नसते, त्यांनी ते नीट ऐकलेलेसुध्दा नसते आणि जेवढे ऐकले असेल त्यात सांगण्यासारखे कांही असेल असे त्यांना वाटत नाही. अशा लोकांबरोबर होणारा आपला संवाद हा बहुधा त्यांच्या बाजूने एकपात्री असतो. त्यातली आपली भूमिका फक्त श्रोत्याची असते आणि अशी दोन माणसे एकमेकांना भेटली तर तो दुहेरी एकपात्री संवाद ऐकतांना इतरांची खूप करमणूक होते.

आत्मकेंद्रित व्यक्तींना सिमेना पहायला, देवदर्शनाला किंवा प्रेक्षणीय स्थळी जायला असे कुठे ही जायचे असो, निघण्यापूर्वी पायाच्या नखापासून केसांच्या बटांपर्यंत त्या स्वतःला न्याहाळून घेतात, कोणता पोशाख घालायचा यावर दहादा विचार करून ते ठरवतात आणि आपण सर्वांग सुंदर चांगले दिसत आहोत याची मनोमन खात्री करून घेतात. आपण कांही तरी 'पाहण्या'साठी किंवा 'दर्शन घेण्या'साठी निघालो आहोत अशी त्या लोकांची भूमिका नसतेच. सिनेमातली पात्रे आपल्याला पाहण्यासाठी पडद्यावर येत आहेत, देवळातला देव आपले रूप पाहण्यासाठी खोळंबला आहे किंवा आपला नवा पोशाख पाहण्यासाठी मावळणारा सूर्य आसुसला आहे अशी त्यांची समजूत असते. पर्यटन करतांना बहुतेक वेळा त्यांच्या गळ्यात कॅमेरा असतो. आयुष्यात क्वचित पहायला मिळणारी सौंदर्यस्थळे छायाचित्रात सामावून घेऊन पुन्हा पुन्हा ती पहावीत अशी इच्छा मात्र त्यांना नसते. सूर्योदय आणि सूर्यास्त रोजच होत असले तरी एकाद्या निसर्गरम्य ठिकाणी ते पहाण्यात खास मजा असते. मोजके क्षण दिसणारे ते अद्भुत दृष्य डोळे भरून पाहून घ्यावे असे आपल्याला वाटते. पण ही मंडळी मात्र तो वेळ "अरे तू इथे उभा रहा, केस किती विस्कटले आहेत ते नीट कर, खिशातून काय डोकावते आहे बघ, पायाखाली काय पडलं आहे ते बाजूला कर, इकडे कॅमे-याकडे पहा." वगैरे सांगत एकमेकांचे फोटो काढून घेण्यात घालवतात. त्या चित्रांमधल्या एकाद्या कोप-यात 'मावळत्या दिनकरा'ला थोडीशी जागा मिळाली तर ते त्याचे नशीब !

या लोकांकडे गेलात तर ते आपले फोटोचे आल्बम नक्की दाखवतात. पण ते पाहतांना मला मात्र आपले हंसू आवरता येत नाही. त्यातल्या अथपासून इतीपर्यंत प्रत्येक पानावर त्यांची किंवा त्यांच्या बबड्या छबड्यांची दात विचकून हंसणारी थोबाडेच तेवढी दिसतात. पार्श्वभूमीवर कोठे प्रतापगडाचा बुरुज, महालक्ष्मीच्या देवळाचा कळस, घुमटाशिवाय ताजमहाल किंवा इंडिया गेटचा एक तुकडा दिसलाच तरी कॅमे-याचा फोकस चेहे-यावर असल्यामुळे ते प्रेक्षणीय स्थळ जेमतेम ओळखता येते. पण या महाभागांनी या स्थळांना भेट दिली होती याचा पुरावा जवळ बाळगणे आणि लोकांना तो दाखवणे एवढाच या आल्बमचा हेतू असतो. त्यांनी भेट दिल्यामुळे त्या सुप्रसिध्द जागांना अधिक महत्व प्राप्त झाले असाच त्यांच्या बोलण्याचा नूर असतो.

आत्मकेंद्रित लोकांचे वागणे आणि मोनोक्रोमॅटिक लाइटमध्ये दिसणारी चित्रे यातले साम्य लक्षात आल्यानंतर मी माझ्या संपर्कात येणा-या लोकांच्या वागण्याकडे त्या दृष्टीने पहायला लागलो. त्यातल्या बहुसंख्य व्यक्ती निदान कांही अंशी तरी कृष्णधवल जगातच वावरत असतात असे दिसते. कोठलीही गोष्ट आपली की परकी हे पाहून त्यानुसार ती चांगली वा वाईट, खरी की खोटी, बरोबर की चूक वगैरे दोनच श्रेणीत तिला घालण्याची सर्वांना घाई असते. त्रयस्थ नजरेने पाहिल्यास त्यातल्या अनेक छटा दिसतात हे सांगून कोणाला पटतच नाही. हे जग खरेच असे असते की हा सुध्दा माझा दृष्टीभ्रम आहे?

प्रेमदिन - व्हॅलेंटाईन डे



उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. इतिहासकाळात होऊन गेलेल्या एका ख्रिश्चन संताच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा दिवस पाळण्याची प्रथा सुरू झाली. या दिवशी आपल्या सगळ्याच प्रियजनांची आवर्जून आठवण काढावी असा उद्देश आधी त्यामागे होता. आपल्याला त्यात फारसे कांही वाटणार नाही. 'सातच्या आंत घरात' या चित्रपटातील मकरंद अनासपुरे याच्या शब्दांत सांगायचे तर "तुम्ही हे फादर्स डे आणि मदर्स डे पाळून जीवंतपणीच त्यांचे दिवस कसले घालता? आपल्याकडे प्रत्येक दिवसच फादर्स डे आणि मदर्स डे असतो." तसाच आपला प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे सुद्धा असतो. मात्र गेल्या कांही वर्षात, विशेषतः इंटरनेटचा प्रसार वाढल्यानंतर त्याला विमुक्त प्रणयाचे रूप आले आहे ते अजून तितकेसे सर्वमान्य झालेले नाही. पहायला गेलो तर राधा कृष्ण ते हीर रांझा, बाजीराव मस्तानी वगैरे सगळे आपलेच, पण वैयक्तिक आयुष्यात अशा जोड्या जोडणे म्हणजे लफडी, कुलंगडी व भानगडी. त्यामुळे कुठल्याशा सेंट व्हॅलेंटाईनच्या नांवाने दिवस साजरा करायचा!


प्रेमभावना काय असते याचे सुरेख वर्णन स्व.कवीवर्य कुसुमाग्रजांच्या शब्दात दिले आहे.



याच विषयावरील माझा दुसऱ्या स्थळावर लिहिलेला लेख खाली दिला आहे. दि.१२-०२-२०२०

प्रेम या भावनेची व्याप्ती प्रणयभावनेपेक्षा खूप विस्तृत आहे. लहान मुलांना त्यांचे आजी, आजोबा आणि असले तर पणजी, पणजोबा  अत्यंत प्रिय असतात तर वृध्दांना त्यांची नातवंडे, पणतवंडे लाडकी असतात. यांच्यामधल्या सगळ्या पिढ्यांमधील आप्तांचे आपल्याशी मधुर संबंध असतात. शेजारी पाजारी, मित्रमैत्रिणी, सहकारी वगैरे अनेक लोकांशी आपला स्नेह जुळतो. अनेक नेते, अभिनेते, खेळाडू, गायक, गायिका आणि इतर कलाकार आपल्याला अगदी मनापासून आवडतात, झी टीव्हीवरले लिटल चँप्स आपल्या गळ्यातले ताईत बनले होते ते आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेम वाटत होते म्हणूनच. इतकेच नव्हे तर ज्यांची नांवेसुध्दा आपल्याला ठाऊक नसतात आणि पुन्हा भेट होणे जवळ जवळ असंभव असते अशी कांही माणसे जीवनाच्या प्रवासात कुठल्याशा नाक्यावर भेटतात, त्यांच्याबद्दलसुध्दा मनात ओढ निर्माण होते. पशुपक्ष्यांचादेखील लळा लागतो. “भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे” असे पसायदान संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाकडे मागितले आहे. हे परस्परांचे मैत्र मनातल्या प्रेमभावनेमुळेच जडू शकते.

याचा अर्थ म्हणजे मांजराने उंदरावर प्रेम करावे काय असे यावर कांही लोक विचारतात. “घोडा जर गवतावर प्रेम करायला लागला तर त्याने खायचे काय” अशा अर्थाची म्हण हिंदीमध्ये आहे. विचारवंत लोकांना असा प्रश्न पडत नाही. वर दिलेल्या कवितेत कवीवर्य कुसुमाग्रज असे सांगतात, “ज्याला तारायचा आहे त्याच्यावर तर प्रेम करावेच, पण ज्याला मारायचे आहे त्याच्यावरसुध्दा करावे.” तारणे किंवा मारणे हे कर्तव्यानुसार ठरेल, पण शत्रूबद्दलसुध्दा मनात सूडबुध्दी, द्वेषबुध्दी बाळगायचे कारण नाही. महाभारतकालीन युध्दात कांही नीतीनियम असायचे. सूर्यास्त होताच युध्द थांबल्यावर शत्रूच्या गोटात जाऊन त्याची विचारपूस केली जात असे. युध्दात कामी आलेल्या शत्रूलासुध्दा आदराने वंदन केले जाई. कालमानानुसार आज असले नियम पाळता येण्यासारखे नाहीत, तरीही जिनिव्हा कन्व्हेन्शनप्रमाणे कांही संकेत घालून देण्यात आले आहेत. प्रेम ही दैवी भावनाच त्याच्या मुळाशी आहे.

माणसामाणसांनी परस्पर प्रेमबंधनात एकमेकांना गुंतवावे असा प्रचार इतिहासकाळातील ख्रिश्चन धर्मगुरू सेंट व्हॅलेंटाईन याने केला होता. त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी व्हॅलेंटाईन डे साजरा करणे सुरू झाले. पुढे त्याचे स्वरूप बदलत गेले. आजचे स्वरूप पाहता प्रेम या शब्दाचा अर्थच माणूस विसरत चालला आहे की काय अशी भीती संवेदनशील उदारमतवादी लोकांना वाटते आहे, तर हे सगळे भारतावर पाश्चिमात्य संस्कृती लादण्याचे कारस्थान आहे असा समज सनातनी विचाराच्या लोकांचा झाला आहे. यातून आपल्या मालाची विक्री वाढवून फायदा कमवायचा प्रयत्न व्यापारी करीत आहेत. एका बाजूच्या युवकांना धमाल मस्ती करायला एकादे निमित्य हवे असते, तर विरोधाचे निमित्य करून वेगळ्या प्रकारचा धिंगाणा घालायला दुसरे कांही लोक सदैव तयार असतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या कारणांनी दर वर्षी व्हॅलेंटाईन डे गाजतो. त्या सगळ्या कल्लोळात विसरली जात असेल तर ती आहे प्रेमभावना!

कुसुमाग्रजांच्या कवितेत वैश्विक प्रेमाचे गाणे असले तरी त्यात दिलेले एकूण एक दाखले श्रीकृष्णाच्या जीवनातल्या घटनांशी संबंधित आहेत. त्यामुळे कृष्णाचे नांवही न घेता त्याने सांगितलेल्या गीतेचा हा सारांश आहे असेसुध्दा म्हणता येईल. खाली दिलेल्या कवी मंगेश पाडगांवकरांच्या गाण्यात तुमच्या आमच्या ‘सेम’ असलेल्या प्रेमाचे मार्मिक दर्शन घडते.
प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

काय म्हणता ? या ओळी चिल्लर वटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात ?
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा,  तरीसुद्धा,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दुमधे इश्क म्हणून प्रेम करता येत;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कोन्वेंटमधे शिकलात तरी प्रेम करता येतं !

सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लगतात !
आठवतं ना ? तुमची आमची सोळा जेव्हा, सरली होती,
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो,
होडी सकट बुडता बुडता  वाचलो होतो !
बुडलो असतो तरीसुद्धा चाललं असतं;
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !
तुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं !
कारण, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !

प्रेमबीम झूट असतं म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं मानणारी माणसं भेटतात !
असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही;
पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का?
प्रेमाशिवाय अडलं का?”
त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !”

तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं खाल्लं असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल !

प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

Wednesday, February 11, 2009

टायटॅनिक जॉर्जिया मत्स्यालय


टायटॅनिक जॉर्जिया मत्स्यालय - भाग १

"तुम्ही माशांना कसे निरखून पहात आहात ते पहायला आलेल्या माशांच्या थव्यांकडे टक लावून त्यांना पाहण्यासाठी सिंगापूरला चला." अशा अर्थाची एक जाहिरात पूर्वी सिंगापूर एअरलाइन्सकडून केली जात असे. त्यासाठी सिंगापूरला जाण्याचा योग कांही अजून माझ्या आयुष्यात आला नाही, पण असंख्य माशांच्या डोळ्याला डोळा भिडवून त्यांना अमोरासमोर पाहण्याची अपूर्व संधी मला अॅटलांटा येथील टायटॅनिक एक्वेटिकच्या जॉर्जिया मत्स्यालयात मिळाली.

लहानपणी घडलेल्या मुंबईच्या पहिल्या भेटीत मी तिथल्या जेवढ्या प्रेक्षणीय जागा पाहिल्या होत्या त्यातले चौपाटीवरचे तारापोरवाला मत्स्यालय मला सर्वात जास्त आवडले होते. प्रिन्स ऑफ वेल्स म्यूजियममधल्या अनंत वस्तू मी तोंडाचा आ वासून पाहिल्या होत्या, पण पांचशे वर्षांपूर्वीचा पोशाख, पांच हजार वर्षांपूर्वीची आयुधे आणि पन्नास लाख वर्षांपूर्वीचे दगड यांचे ऐतिहासिक महत्व लहान वयात फारसे समजत नव्हते आणि ते मनाला विशेष मोहवत नव्हते. राणीबागेतले सजीव प्राणी त्यांच्यापेक्षा जास्त आवडले असले तरी वाघ, सिंह, हत्ती आदि कांही वन्य पशूंना मी त्यापूर्वी सर्कशीत अवघड कामे करतांना पाहिलेले होते त्या मानाने राणीबागेतल्या पिंज-यात त्यांना बसलेले किंवा नुसतेच उभे राहिलेले पाहण्यात तेवढी मजा वाटली नव्हती. आमच्या गांवातील विहिरीतल्या किंवा तळ्यातल्या गढूळ पाण्यात कधी तरी सुळकन बाजूने जातांना दिसलेली एकाद दुसरी मासोळी सोडल्यास मत्स्यावताराचे हे माझे पहिलेच साग्रसंगीत दर्शन होते. मत्स्यालयातल्या मोठमोठ्या फिशटँक्सच्या कांचेतून दिसणारे विविध आकारांचे, विविध रंगांचे मासे पाहतांना मन मोहून गेले होते. पुढे मुंबईला स्थाईक झाल्यानंतर माझ्याकडे जेवढे पाहुणे येऊन गेले, त्यातल्या बहुतेकांना मी आवर्जून ते मत्स्यालय दाखवले होते आणि त्या निमित्याने ते पुन्हा पुन्हा स्वतः पाहिले होते. पण टायटॅनिक जॉर्जिया मत्स्यालय पहाण्यातला अनुभव अभूतपूर्व आणि चित्तथरारक होता.

अॅटलांटाच्या डाउनटाउनमध्ये ऑलिंपिक पार्कच्या बाजूलाच या मत्स्यालयाची अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण इमारत आहे. तिच्या वेगळेपणामुळे ती दुरूनच ओळखता येते. हे मत्स्यालय जगातील सर्वात मोठे आहे किंवा जगात इतरत्र कोठेही दिसणार नाहीत इतके निरनिराळे मासे इथे पहायला मिळतील असा इथल्या लोकांचा दावा आहे. त्याप्रमाणे हे मत्स्यालय जगात सर्वात मोठे असो वा नसो आणि त्यात किती लाख मासे असतील हे माझ्या दृष्टीने एवढे महत्वाचे नाही. पण जे कांही पाहिले ते अचाट आणि माझ्या
कल्पनेच्या पलीकडले होते.

जॉर्जिया मत्स्यालयाच्या भव्य इमारतीत प्रवेश केल्यानंतर समोर एक अवाढव्य आकाराचे दालन आहे. याच दालनातून इतर सर्व दालनांकडे जाणा-या वेगवेगळ्या वाटा आहेत. एका बाजूला एकमेकात मिसळलेले दोन लंबवर्तुळाकृती चौथरे आहेत. त्यावर चार चार खुर्च्यांसह वीस पंचवीस टेबले मांडून सुमारे शंभर माणसांना बसण्याची सोय केली आहे. त्याच्या बाजूलाच कँटीनचा स्टॉल आहे, पण तिथली सर्व्हिस कमालीच्या संथगतीने चालते. दीड दोन हजार रुपयांचे तिकीट काढून आलेला माणूस तिथे कपभर चहासाठी रांगेत उभा रहायला आणि खुर्चीवर चकाट्या पिटत बसायला आलेला नसतो. त्यामुळे बहुतेक जागा दिवसभर रिकाम्याच दिसल्या आणि भूक लागल्यावर क्षुधाशांती करण्यासाठी किंवा फिरून थकवा आल्यास दोन चार मिनिटे बसून विश्रांती घेण्यासाठी जागा रिकामी होण्याची वाट पहावी लागली नाही.

महासागराची सफर (ओशन व्हॉयेजर) हा या मत्स्यालयातला सर्वात मोठा आणि महत्वाचा भाग आहे. या विशाल कृत्रिम तलावात साठ लाखाहून अधिक गॅलन इतके खारे पाणी भरलेले आहे. त्याला साडेचार हजार स्क्वेअर फूट इतके एकूण क्षेत्रफळ असलेल्या प्रचंड पारदर्शक खिडक्या ठेवल्या आहेत. आपल्या घरातल्या दिवाणखान्याची भिंत सुमारे दीडशे ते दोनशे स्क्वेअर फूट असते. अशा पंचवीस तीस भिंतींएवढ्या क्षेत्रफळातून आपल्याला महासागरातले दृष्य पहायची सोय आहे. यावरून त्याच्या भव्यतेचा अंदाज येईल. यात एक शंभर फूट लांब बोगदा आहे. त्यातून जातांना आपल्या दोन्ही बाजूंना आणि माथ्यावरसुध्दा पाणीच पाणी असल्यामुळे पाणबुड्याप्रमाणे आपण समुद्राच्या तळाशी जाऊन तिथले अवलोकन करत आहोत असा भास होतो. जिकडे तिकडे लहान मोठे मासे एकेकटे किंवा घोळक्याने स्वैर हिडत असतात. एका मोठ्या सभागृहासारख्या दालनात पडद्याच्या ठिकाणी सिनेमास्कोप पडद्यासारखा ६१ फूट रुंद आणि २३ फूट उंच असा प्रचंड पारदर्शक अॅक्रिलिकचा स्लॅब लावला आहे. समोर बसण्यासाठी खुर्च्यांच्या रांगा मांडून ठेवल्या आहेत, तसेच पडद्याजवळ उभे राहून पाहण्यासाठी भरपूर मोकळी जागाही आहे. इथे तर एकाच वेळी असंख्य मासे इकडून तिकडे जातांना दिसत असतात. जसे आपण त्यांना पहात असतो त्याचप्रमाणे तेसुध्दा आपल्याकडे पहात असतात आणि केंव्हा केंव्हा त्यांच्या भाषेत एकमेकांना कांही खाणाखुणासुध्दा करत असावेत असे वाटते. त्यातली एकादी मत्स्यसुंदरी कुणाकडे तरी एक तिरपा कटाक्ष टाकून "हा मेला माझ्याकडे कसा टकमक बघतो आहे!" अशी तक्रारसुध्दा आपल्या सवंगड्याकडे करत असेल. व्हेल शार्क या जातीचा मासा आकाराने सर्वात मोठा असतो. या दालनात कांही अवाढव्य व्हेल शार्कसुध्दा अगदी जवळून म्हणजे कांचेपलीकडे फक्त हातभर अंतरावरून जातांना पहायला मिळाले. लहानात लहान अगदी बोट भर आकाराच्या शेकडो माशांचे थवे विशिष्ट प्रकारचे फॉर्मेशन करून एका वेगाने एका दिशेने जात असलेले पहातांना खूप छान वाटतात. रंगसंगतीबद्दल तर पाहता मत्स्यसृष्टीमध्ये जेवढी विविधता दिसते त्याच्या एक दशांशसुध्दा प्राण्यांच्या जगात दिसणार नाही. फुलपाखरे तर रंगीबेरंगी असतातच, पक्ष्यांमध्ये पोपटच कित्येक रंगात दिसतात, पण जलचरांमधल्या वैविध्याला तोड नाही.
. . . . . .

टायटॅनिक जॉर्जिया मत्स्यालय - २


टायटॅनिक जॉर्जिया मत्स्यालयातले इतर भाग सुध्दा महासागराची सफर (ओशन व्हॉयेजर) या भागाइतके आकाराने विशाल नसले तरी अत्यंत प्रेक्षणीय आहेत. कोल्ड वॉटर क्वेस्ट या भागात आर्क्टिक आणि अँटार्क्टिक महासागरांमधल्या थंड गार पाण्यात आणि किना-यावरील खडकाळ भागात निवास करणा-या मत्स्य आणि प्राणीजीवनाची झलक दाखवली जाते. ऑस्ट्रेलियन सी ड्रॅगन, बेलुगा व्हेल, डॅम्सेल फिश आणि महाकाय स्पायडर क्रॅब यासारखे खास जीवजंतू या विभागात ठेवले आहेत. प्रचंड आकाराचा बेलुगा व्हेल हा एक सस्तन प्राणी आहे आणि स्पायडर क्रॅब या पंज्याइतक्या मोठ्या खेकड्याला कोळ्यासारखे आठ लांब पाय असतात. प्रत्येकी सात आठ फूट लांबीचे आठ अवयव आठ दिशांना वळवळवत पसरवणारा आणि वीतभर रुंद जबडा असलेला एक राक्षसी अष्टपाद ऑक्टोपस सुध्दा पहायला मिळाला. त्याच्या हातापायांच्या विळख्यात निदान वीस पंचवीस तरी मासे आणि खेकडे, कासवे यासारखे इतर लहान जीव येऊ शकले असते, पण ते सर्व जीव त्या सतत वळवळणा-या पायांच्या आसपास निर्धास्तपणे हिंडत होते. तो ऑक्टोपस कोणालाही इजा करत नव्हता. त्यामुळे हा प्राणी कॉमिक्समध्ये दाखवतात तसा भयावह मात्र वाटला नाही.

जॉर्जिया एक्स्प्लोअरर या विभागात जॉर्जिया राज्यातील स्थानिक जलाशयात आणि किनारपट्टीवर आढळणारे मासे, खेकडे, कासवे वगैरेंची माहिती मिळते. या भागात राहणा-या लोकांना ते प्राणी जवळून पहायला मजा वाटते. कांही छोट्या आणि मध्यम आकाराच्या माशांना उथळ अशा उघड्या टँक्समध्ये ठेवले आहे. त्यात कांही लहान शार्कदेखील होते. टँकच्या कांठावर उभे राहून काठाजवळ पोहत येणा-या माशांना स्पर्श करायला मुभा आहे. फक्त दोन बोटे पुढे करून मासाच्या पाठीला कसा हळुवार स्पर्श करावा याचे मार्गदर्शन करणारे फलक बाजूला लावले आहेत, तसेच त्यानंतर लगेच आपले हात स्वच्छ धुण्यासाठी पाण्याचे नळसुध्दा ठेवले आहेत.

जगातील सर्वच भागात इतिहासकाळापासून नद्यांच्या कांठाने संस्कृतींचे पाळणे हलत आले आहेत. आजच्या जगातसुध्दा मानवाच्या जीवनात नदीच्या पेयजलाचे अनन्यसाधारण महत्व आहेच. रिव्हरस्काउट या भागात पंचखंडातील नदीकांठावरील विविध प्राणी आणि मासे यांचे दर्शन घडते. वेगवेगळ्या प्रकारचे गोड पाण्यातले मासे त्यात आहेतच, विविध प्रकारचे प्राणीसुध्दा आहेत. त्यात अमेरिकेच्या या भागातल्या सुसरींचा प्रामुख्याने समावेश आहे. नदीच्या किना-यावरील लव्हाळी, झुडुपे, वेली वगैरेंनी होणारे घनदाट जंगल कांही जागी उभे केले आहे. कांही पक्षी जसे उन्हाळ्यात सैबेरियात जातात आणि हिंवाळ्यात भारतात येतात, त्याचप्रमाणे ऋतुमानानुसार उत्तर दक्षिण प्रवास करणारे कांही जातींचे मासे अमेरिकेत आहेत. नदीच्या प्रवाहाच्या दिशेने पोहत पुढे जाणे सोपे असते, पण परतीच्या प्रवासात हे मासे खळखळणा-या प्रवाहाच्या विरुध्द दिशेने जातातच, शिवाय वाटेत पडणारे बंधारे आणि लहानसहान धबधबेसुध्दा ते उंच उसळी मारून चढून वरच्या बाजूला जातात हे वाचून आश्चर्य वाटले. आमच्यासमोर असे उड्या मारण्याचे प्रात्यक्षिक झाले नाही, पण ज्या प्रकारचे अडथळे हे मासे ओलांडून जातात त्याचा सुरेख देखावा उभा केलेला होता आणि त्या माशांचे सचित्र वर्णन एका फलकावर दिले होते.

ट्रॉपिकल डायव्हर या भागात सागराच्या तळाशी मिळणारे शंखशिंपले वगैरेंचे सुरेख प्रदर्शन आहेच, सी हॉर्स, जॉ फिश यासारखे वैशिष्ट्यपूर्ण आकाराचे मासेसुध्दा आहेत. वाळूत अर्धे अंग लपवून त्यातून गवत उगवल्याप्रमाणे ताठ उभे राहणारे गार्डन ईलचे थवे पाहतांना खूप मजा वाटते. या विभागात एक मोठा 'कोरल रीफ' ठेवला आहे. कोरल या प्राण्यांची शरीरे एकामेकाला चिकटून त्यातून खवल्याखवल्यांचे जंगी खडक तयार होतात. तशातला एक अख्खा खडक एका काचेच्या तावदानाच्या मागे ठेवला आहे. त्याच्या आजूबाजूने मासे आणि समुद्रातले इतर लहान प्राणी लपंडाव खेळतांना दिसतात. यात कांही जीवंत कोरलदेखील आहेत. तसेच जेली फिश या आकारहीन जीवाचे दर्शन एका खिडकीत होते. निमो या नांवाने तुफान प्रसिध्दी मिळालेला लहान मुलांचा लाडका मासा ज्या जातीवर आधारलेला आहे त्या गॅरिबाल्डी नांवाच्या जातीचे केशरी रंगाचे सुंदर मासे सुध्दा इथे पहायला मिळतात. या विभागातील माशांच्या जाती, नाजुकपणा, सौंदर्य वगैरे लक्षात घेऊन त्यांना एकत्र न ठेवता या भागाची रचना एकाद्या आर्ट गॅलरीसारखी केली आहे. त्यामुळे त्यातल्या छोट्या छोट्या खिडक्यांमधून त्यांचे सौंदर्य लक्षपूर्वक पाहता येते.

या मत्स्यालयातले चतुर्मिती (4D) थिएटर हासुध्दा एक चमत्कार आहे. या थेटरात २५० प्रेक्षकांना बसण्याची सोय आहे. त्यात दिवसभर एका खास फिल्मचे खेळ चालले असतात, पण आपल्याला यातल्या एका खेळाचे आरक्षण करावे लागते आणि तो सुरू होण्यापूर्वी वेळेवर त्या प्रेक्षागृहाच्या दरवाजापाशी हजर रहावे लागते. निमोसारखाच दिसणारा डीपो नांवाचा मासा या मत्स्यालयाचा मॅस्कोट आहे. या सिनेमात हा डीपो आपल्याला सोबत घेऊन समुद्रातल्या कल्पनातीत अशा सुंदर सृष्टीत घेऊन जातो आणि तिचे मनोरम असे दर्शन घडवून आणतो. पण हे सारे रुक्ष अशा डॉक्युमेंटरीत न होता एका मजेदार गोष्टीतून घडत जाते. कलात्मकता, कल्पकता आणि एनिमेशनचे कौशल्य या सर्वांचाच सुरेख संगम यात झाला आहे. खास प्रकारचे चष्मे लावून त्रिमितीचा भास केला जातोच. त्यामुळे समोरच्या पडद्यावरले मासे पडद्यावर न राहता अगदी आपल्या आजूबाजूला वावरतांना दिसतात. एवढ्यावर हा अनुभव थांबत नाही. चहू बाजूंनी ऐकू येणारे विचित्र ध्वनि, हलणारी आसने आणि अंगावर उडणारे पाण्याचे शिंतोडे या सगळ्यांनी एक आगळी वेगळी वातावरणनिर्मिती होते आणि एक केवळ अपूर्व असा अनुभव घेऊन आपण बाहेर पडतो.
असे हे टायटॅनिक जॉर्जिया मत्स्यालय पहातांना डोळ्यांचे पारणे फिटतेच, एक वेगळा अनुभव घेतल्याची सुखद जाणीव होते. ज्या लोकांना मत्स्यजीवनाबद्दल जास्त कुतूहल असेल त्यांच्या मदतीसाठी महत्वाच्या माशांच्या जातींची चित्रे छापलेली प्लॅस्टिकची कार्डे ठेवली आहेत. ती हातात धरून टँक्समधल्या माशांचे निरीक्षण करत हिंडू शकतो. ते कार्ड पाहून समोर दिसणा-या कांही माशांच्या जाती ओळखण्यात एक मजा असते. या मत्स्यालयातल्या अतिप्रचंड टँकमधले पाणी इतके स्वच्छ आणि पारदर्शक कसे ठेवत असतील, यातल्या लक्षावधी माशांना कसे आणि कोणते अन्न खाऊ घालत असतील, सृष्टीच्या नियमानुसार यातले मोठे मासे लहान माशांना कां खात नाहीत आणि विशेषतः त्यांच्यातले शार्क किंवा पिरान्हासारखे खतरनाक मासे अहिंसक बनून कसे रहात असतील असे कांही प्रश्न हे प्रदर्शन पाहतांना पडले , पण त्यांची समर्पक उत्तरे अशा एका धांवत्या भेटीच मिळण्यासारखी नाहीत. 

Tuesday, February 10, 2009

कोकाकोलाचे गुपित


मी कॉलेजात गेल्यानंतर माझ्या 'कोकप्रेमी' मित्रांना हे पेय पितांना पहिल्यांदा पाहिले तेंव्हा साहजीकच त्या 'काळ्या पाण्या'त एवढे काय घातलेले असते त्याबद्दल त्यांना विचारले. "हे तर जगातले सर्वात मोठे गुपित आहे. स्कॉटलंड यार्डलासुध्दा ते अजून कळलेले नाही." असे उत्तर त्या प्रश्नाला मिळाले. खाजगी गुपिते ओळखणे हे कांही स्कॉटलंड यार्डचे काम नाही. लंडनमधल्या उल्हासनगरातल्या एकाद्या संशयिताच्या दुकानावर धाड घालून बनावट पेयविक्रीचा तपास करण्यासाठी कदाचित त्यांनी कोकचे रासायनिक पृथक्करण केलेही असले तरी त्याचे निष्कर्ष त्यांनी जगजाहीर केले नसणार. कोकाकोलामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी असतात हे गौडबंगाल शंभर वर्षाहून अधिक काळ कोणाला समजलेले नाही हे मात्र खरे.

आपल्या खाद्यपेयांमध्ये अमकी तमकी जीवनसत्वे किंवा क्षार असल्याचा दावा अनेक उत्पादक त्यांचा खप वाढवण्यासाठी करतांना दिसतात. कोकाकोलाच्या जाहिरातीत मात्र ते पेय अमाप उत्साह वाढवते एवढेच मनावर ठसवले जाते. यासाठी कोणत्या उत्साहवर्धक औषधीचा उपयोग केला जातो हे गुलदस्त्यातच ठेवले जाते. त्याचा उल्लेख कधी झालाच तर तो नकारात्मक असतो. भारतातल्या आणि अमेरिकेतल्यासुध्दा कांही भागात पूर्वीच्या काळात दारूबंदीचा प्रयोग होऊन गेला होता. त्या काळात कोकाकोलावर बंदी येऊ नये यासाठी त्यात मद्यार्काचा अंश नसल्याचे सांगून सिध्द केले गेले. कोणीही त्याचा कोकेनशी संबंध जोडू नये या दृष्टीने ते अंमली पदार्थापासून मुक्त असल्याचे सांगितले जाते. आजकाल मधुमेहाचे प्रमाण वाढले असल्यामुळे शर्करेचे प्रमाण नगण्य असलेला डाएट कोक निघाला आहे, एवढेच नव्हे तर झीरो कोक नांवाच्या उत्पादनात तर ऊर्जेचे प्रमाण अगदी चक्क शून्यभोपळा असते असेसुध्दा सांगतात.

कोकाकोला संग्रहालय पाहतांना तो बनवण्याची प्रक्रिया दाखवली जाते. त्यात पाण्याचे शुध्दीकरण केल्यानंतर त्यात कर्बद्विप्राणिल वायू विरघळवला जातो आणि त्यानंतर त्यात कोकाकोलाचा अर्क मिसळतात एवढेच दाखवतात. पण हा अर्क कसा तयार करतात याचे गुपित सांगत नाहीत. कोकाकोलाचा फॉर्म्युला गुप्त ठेवण्यातले कौशल्य हेच त्याच्या अमाप यशाचे गमक आहे असे या प्रदर्शनात हिंडतांना मनावर सारखे ठसवले जात असते. हा फॉर्म्यूला एका मोठ्या बँकेच्या लॉकरमध्ये कड्याकुलुपात सुरक्षित ठेवला आहे आणि कंपनीच्या मोजक्या सर्वोच्च पदाधिका-यांनाच तो पाहण्याची परवानगी आहे, कोकाकोला कंपनीत काम करणा-या सामान्य नोकरांनासुध्दा तो कधीच समजणार नाही अशी खास तरतूद केली आहे, यामुळेच आजवर कोणीही डुप्लिकेट कोक बनवू शकला नाही आणि कधीही बनवू शकणार नाही वगैरे सांगितले गेले.

मला मात्र हा सगळा बहुधा प्रचाराचा भाग वाटला. कोकाकोलाच्या एक अब्जाहून अधिक बाटल्या रोजच्या रोज विकल्या जातात. त्या कामासाठी शंभराहून अधिक देशातल्या हजारावर बॉटलिंग प्लँटमध्ये या बाटल्या भरल्या जातात. प्रत्येक बाटलीत एक चमचाभर अर्क घालायचा म्हंटले तरी हजारो पिपे भरतील एवढा अर्क त्यासाठी रोज निर्माण करावा लागत असेल. हे काम किती जागी केले जाते याबद्दल गुप्तता पाळली जात असली तरी त्याचा व्याप किती मोठा असेल याची कल्पना करता येईल. एवढे मोठे उत्पादन करण्याच्या कामात त्याचेवर देखरेख ठेवण्यासाठीच मोठ्या संख्येने तंत्रज्ञांची गरज पडते. त्या लोकांना यातील प्रक्रियांची संपूर्ण माहिती असावी लागते आणि नसली तरी काम करतांना ती होत जाते. कारखान्यातील कामे करणारी स्वयंचलित यंत्रे आज उपलब्ध असली तरी पन्नास वर्षांपूर्वी ती ऐकिवातसुध्दा नव्हती. त्या काळात देखील कोकाकोलाचा विस्तार जगभर झालेला होता. तेंव्हा त्यांच्या कारखान्यात काम करणा-या कांही हुशार लोकांना तरी थोडा अंदाज आल्याशिवाय राहिला नसता. त्याशिवाय शंभरावर वर्षांच्या इतिहासात कोकाकोला कंपनीच्या संचालकपदावर किती मंडळी येऊन गेली असतील. त्या सर्वांनी बँकेतला लॉकर उघडून त्यात ठेवलेला फॉर्म्यूलाचा कागद काढून वाचून पाठ केला असेल आणि त्याची एकही प्रत न काढता तो कागद पुन्हा लॉकरमध्ये सुरक्षित ठेवला असेल या गोष्टीवर विश्वास बसणे कठीण आहे.

याखेरीज दुसरी एक गोष्ट आहे. कोणत्याही वस्तूचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायचे झाल्यास त्यासाठी तितक्याच मोठ्या प्रमाणात कच्च्या मालाची गरज पडते. हिमालयातल्या एकाद्या वृक्षाची कंदमुळे किंवा रॉकी माउंटनमधल्या कोठल्याशा अज्ञात झाडाचे फळ अशा प्रकारचा दुर्मिळ पदार्थ हवा तितका मिळू शकणार नाही. कोकाकोलाचा अर्क बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल मुबलक प्रमाणात आणि वाजवी भावाने मिळत असणार. त्याची खरेदी मध्यस्थांमार्फत केली जात असली तरी त्या पदार्थांच्या बाजारात त्यांच्या मोठ्या ग्राहकांबद्दल कुणकुण ऐकू येत असेल. त्या मालाचा पुरवठा करणा-या मंडळींना आपले अंतिम ग्राहक कोण आहे याचा सुगावा लागणे हे त्यांच्या व्यवसायाच्या भवितव्याच्या दृष्टीने आवश्यक असते. कोकाकोला तरी याला अपवाद कसा ठरेल ? एकशे वीस वर्षांपूर्वी श्रीमान पेंबरटन यांनी शोधून काढलेला फॉर्म्यूलाच आजतागायत उपयोगात आणला जात आहे या त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवायचा झाला तर त्या काळात अॅटलांटासारख्या लहान शहरातल्या एका सामान्य वैद्याला कोणती द्रव्ये उपलब्ध असतील त्याचा विचार करता ती रोजच्या कामातल्या उपयोगातलीच असणार हे लक्षात येईल. संशोधन करायचेच म्हंटले तर ते शोधता येणे अशक्य वाटत नाही.

असे असले तरी कोकाकोलाच्या गुपिताचे मिथक कोकाकोलाप्रमाणेच इतका दीर्घ काळ टिकून राहिले आहे.

Monday, February 09, 2009

कोकाकोला म्यूजियम


डाउनटाउन अॅटलांटामध्ये म्हणजे या शहराच्या केंद्रीय भागात आजूबाजूला असलेल्या गगनचुंबी इमारतींच्या सान्निध्यात एका छोट्याशा पण वैशिष्ट्यपूर्ण इमारतीत कोकाकोला म्यूजियम ठेवले आहे. त्याच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच जॉन पेंबरटन या कोकाकोला द्रवाच्या 'संशोधका'चा पूर्णाकृतीपेक्षा मोठ्या आकाराचा पुतळा आहे. या सद्गृस्थाने शंभर वर्षांपेक्षाही पूर्वीच्या काळात सन १८८६ मध्ये पहिल्यांदा कोकाकोला हे आगळे वेगळे पेय आपल्या प्रयोगशाळेत तयार करून अॅटलांटामध्ये असलेल्या एका फार्मसीच्या दुकानात ते विकायला सुरुवात केली म्हणून पुतळ्याच्या बाजूला बसवलेल्या फलकावर त्याचे नांव 'संशोधक' असे लिहिले आहे. या शिल्पातील पेंबरटन महाशयांच्या हातात एक ग्लास असून बाजूला टेबलावर दुसरा ग्लास ठेवला आहे. त्यामुळे ही शिल्पकृती पूर्ण करण्यासाठी बाजूला कोणीतरी उभे रहायला हवे असे वाटते आणि बहुतेक पर्यटक कळत नकळत त्या जागी उभे राहून घेतातच.

अमेरिकेतल्या कोणत्याही संग्रहालयाप्रमाणेच हे म्यूजियम पाहण्यासाठीसुध्दा तिकीट काढावे लागते. तिकीट घेऊन आंत जाताच आपण एका अत्यंत कलात्मक सजावट केलेल्या एका सुंदर हॉलमध्ये प्रवेश करतो. डिसेंबरचा महिना असल्यामुळे आगामी ख्रिसमसच्या दृष्टीने हॉलला विशेष सजवले होते. वीस पंचवीस पर्यटक जमतांच एका सुहास्यवदनेने आम्हा सर्वांचे स्वागत करून दुस-या दालनात नेले. त्या ठिकाणी कोकाकोलाच्या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासाचे चित्रण दाखवणा-या शेकडो गोष्टी आणि चित्रे मांडून ठेवली होती. अगदी सुरुवातीपासून वापरण्यात आलेल्या बाटल्या, पेले, कॅन्स आणि ते वाहून नेणारी वाहने वगैरे त्यात होतेच, शिवाय वेळोवेळी असलेले मालक किंवा संचालक, कोकाकोलाचे भोक्ते असलेले नेते आणि नटनट्या, काळानुसार बदललेले त्यांचे पोशाख, ऑलिंपिक खेळापासून अनेक महत्वाच्या प्रसंगी असलेली कोकाकोलाची ठळक उपस्थिती वगैरे त-हेत-हेची माहिती आकर्षक रीतीने त्या चित्रांमध्ये दाखवली होती. कोकाकोलाची संपूर्ण कहाणी आमच्या त्या गाइडने मनोरंजक पध्दतीने सादर केली.

जॉन पेंबरटनने एका फार्मसीच्या दुकानात कोकाकोला विकायला सुरुवात केली होती त्या वेळी दररोज सरासरी फक्त नऊ पेले पेय विकले जात होते. पण त्याची चंव आणि उत्तेजकता लोकांना आवडली आणि त्याला अधिकाधिक मागणी येऊ लागली. ते लक्षात घेऊन कँडलर नांवाच्या उद्योजकाने ते पुरवण्याचे कारखाने उघडले आणि १९८५ पर्यंत ते शिकागो, डल्लास आणि लॉस एंजेलिसमध्येसुद्दा विकले जाऊ लागले. त्याच सुमारास ते विशिष्ट प्रकारच्या बाटलीत भरून विकण्याची कल्पना पुढे आली आणि त्याचा प्रसार अमेरिकेच्या कानाकोप-यात होऊन जिकडे तिकडे तो वाढत गेला. पहिल्या महायुध्दानंतर कोकाकोला कंपनीची मालकी वुडरफ यांच्याकडे आली आणि त्यांनी त्याची निर्यात करायला सुरुवात करून दुस-या महायुध्दानंतर त्याला जगभर नेऊन पोचवले. सन १९६० नंतर या कंपनीने कोकाकोलाच्या जोडीला फँटा, स्प्राइट वगैरे कांही इतर पेये बाजारात आणली. त्यानंतरच्या कालावधीत इतर देशातल्या कांही कंपन्या विकत घेऊन त्या बनवत असलेल्या पेयांची निर्मिती आणि विक्री सुरू केली. आज या इतर पेयांची संख्या चारशेच्या वर पोचली आहे.

कोकाकोलाची कहाणी सांगून झाल्यानंतर प्रवाशांना इतर दालनांत हव्या त्या क्रमाने जायला मोकळीक दिली जाते. त्यातल्या पहिल्या दालनांत एका बॉटलिंग प्लँटचे पूर्णाकृती मॉडेल म्हणून एक सजवलेला छोटा प्लँटच मांडून ठेवला आहे. त्यातल्या बाटल्या कन्व्हेयरवरून रांगेने पुढे जात राहतात , ऑटोमॅटिक फिलिंग स्टेशनवर त्या उचलून घेतल्या जातात, त्या ठिकाणी त्या एका चक्रात फिरवल्या जातात. फनेलखाली येताच त्यात पेय भरले जाते, झांकण लावले जाते आणि त्या पुन्हा कन्व्हेयरवरून पुढे जातात. बाजूला दुस-या यंत्रात पाणी पुनःपुन्हा गाळून शुध्द केले जाते आणि कोकाकोलाचा अर्क त्यात मिसळला जातो वगैरे दिसते. नवख्या लोकांना कांचेआड हे सगळे पाहतांना खूप मजा वाटते. सर्व जन्म यंत्रसामुग्री पाहण्यात गेला असल्यामुळे माझे लक्ष मात्र त्यात कोणत्या मेकॅनिझम वापरल्या असतील इकडे जात होते.

एका मध्यम आकाराच्या सभागृहात कोकाकोलाची जाहिरात करणा-या फिल्म्स एकापाठोपाठ दाखवल्या जात होत्या. ब्लॅक अँड व्हाईट पिक्चरच्या जमान्यापासून कलर टीव्हीपर्यंत सर्व प्रसारमाध्यमाचा उपयोग कोकाकोलाच्या जाहिरातींसाठी अत्यंत कल्पकतेने केला गेला आहे. गेल्या पन्नास साठ वर्षाहून अधिक काळातल्या विविध भाषांमधल्या उत्तमोत्तम आणि आकर्षक जाहिराती पहाण्याजोग्या होत्या. त्यात कार्टून्ससाठी वेगळा विभाग होता. या सिनेमांचा जेवढा भाग मी पाहिला त्यातल्या एका जाहिरातीत आपल्या राणी मुकर्जीचे पडद्यावर दर्शन झाले. आमीरखानच्या वेगवेगळ्या अवतारातल्या कांही ध्यानाकर्षक जाहिराती गेल्या तीन चार वर्षात आल्या होत्या, त्यातली एकादी जाहिरात पहायला मिळेल असे वाटले होते ते मात्र तेवढ्या वेळात झाले नाही.

एका दालनात आर्ट गॅलरी आहे. अनेक प्रसिध्द चित्रकारांनी काढलेली सुरेख चित्रे आणि मूर्ती वगैरे या दालनात मांडून ठेवल्या आहेत. त्यातल्या कांही चित्रात प्रामुख्याने तर कांहीत कोप-यात कोठे तरी कोकाकोला दिसायचा. एक विभाग पर्यटकांना सर्वात जास्त आवडत होता. या भागात प्रत्येकी सात आठ तोट्या जोडलेली सात आठ यंत्रे ठेवलेली होती आणि प्रत्येक तोटीतून वेगळे पेय मिळत होते. अमेरिका खंडातील विविध देशात तसेच युरोप, आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खंडातल्या प्रमुख देशात लोकप्रिय झालेल्या अनेक पेयांचे घोट घोट पिऊन त्यांची चंव पाहण्याची सर्व पर्यटकांना मुभा आहे. त्याच्या पलीकडे फक्त कोकाकोलाचेच तीन चार प्रकार देणारी अनेक यंत्रे होती. या सगळ्या पेयांच्या चंवी घेऊन बाहेर पडतांना प्रत्येक पर्यटकाला प्रवासात सोबत घेऊन जाण्यासाठी कोकाकोलाची एक छोटी बाटली भेट म्हणून देत होते. त्यामुळे या प्रदर्शनाला दिलेली भेट संपवून घरी जातांना प्रत्येकजण खुशीत असलेला दिसत होता.