Sunday, May 10, 2009

ग्रँड युरोप - भाग १९ : ल्यूसर्नमधील जलविहार


दि.२३-०४-२००७ आठवा दिवस : ल्यूसर्नमधील जलविहार

माउंट टिटलिसहून परततांना ल्यूसर्न शहराचा धांवता दौरा केला. हे एक जुने पुराणे गांव आहे याच्या खुणा दाखवणा-या जुन्या इमारती अजून शाबूत आहेत. त्यात वांद्र्याच्या माउंट मेरीसारखी दोन उंच शिखरे असलेले एक जुन्या धर्तीचे कॅथेड्रल आहे, तसेच इथल्या रियस नदीवर एक सातशे वर्षे जुना 'चॅपेल ब्रिज' नांवाचा दोनशे मीटर लांबीचा लाकडी पूल आहे. आता हा पूल शोभेपुरताच उरला आहे आणि तिथे जुनी चित्रे मांडून ठेऊन त्याच्या शोभेत भर घातली आहे. आजही इथल्या जुन्या भागातील कांही घरे
लाकडांची बनवलेली आहेत. लाकडाचे खांब, लाकडाच्या तुळया, त्यावर लाकडाचे उतरते छप्पर, इतकेच नाही तर लाकडाच्या फळ्या ठोकून भिंती बनवलेल्या आणि कुठे खालची जमीनसुद्धा. त्याचे आगीपासून रक्षण करायची काय व्यवस्था असेल कोण जाणे. अशा प्रकारची घरे स्विट्झरलंडच्या पहाडावर तर अधिक संख्येने दिसतात. सारख्या आकारात कापलेल्या ओंडक्यांचे गठ्ठे कांही घरांच्या बाहेर व्यवस्थित रचून ठेवले होते.

ल्यूसर्न येथे एका छोट्याशा सार्वजनिक उद्यानात 'लायन मेमोरियल' ही एक प्रसिद्ध शिल्पकृती ठेवली आहे. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये बळी पडलेल्या फ्रान्सच्या राजघराण्याच्या स्विस गार्डसच्या स्मृतीप्रीत्यर्थ हे बनवले गेले. अत्यंत दयनीय अवस्थेतील एका जखमी सिंहाचे भव्य चित्र या ठिकाणी एका मोठ्या खडकात खोदलेले आहे. पराक्रमी आणि हिंस्र किंवा क्रूर समजल्या जाणा-या सिंहाच्या चेहे-यावर इतके दयनीय भाव मला तरी यापूर्वी कुठेच पहायला मिळाले नव्हते.

ल्यूसर्नचे सर्वात मोठे आकर्षण तिथला विस्तीर्ण तलाव. त्यात जलतरणक्रीडेच्या सगळ्या सोयी आहेतच, दिवसा किंवा रात्री नौकेतून फेरफटका मारण्याचीसुद्धा व्यवस्था आहे. माउंट टिटलिसवर दिवसभर बर्फात खेळून झाल्यानंतर श्रमपरिहारासाठी रात्रीच्या क्रूजचा कार्यक्रम आमच्यासाठी ठेवला होता. केसरीच्या दोन ग्रुपमधले मिळून सुमारे सत्तर प्रवासी होते. आमच्यासाठी एक वेगळी दुमजली स्टीमर घेतली होती. खालच्या मजल्यावर दाटीवाटीने टेबल खुर्च्या मांडलेल्या होत्या. थोडी मोकळी हवा खात बाहेरचे सौंदर्य
पहावे म्हणून आम्ही डेकवर गेलो. तिथेही थोड्या खुर्च्या होत्या. ल्यूसर्न शहर दूर दूर जातांना दिसत होते व जवळ तलावाचे नितळ पाणी, त्याच्या पलीकडे सभोवतालची हिरवी गर्द झाडी, त्यापलीकडे डोंगर, आणि दूरवर एक दोन बर्फाच्छादित शिखरे असे अनुपम दृष्य दिसत होते.

खास आमच्या मनोरंजनासाठी दोन स्थानिक कलाकार आणले होते. त्यातील एकाने गायनासाठी माईक हातात धरला आणि दुसरा स्वरवाद्य घेऊन उभा राहिला. आमच्यातल्याच एका उत्साही पर्यटकाने तालवाद्य वाजवायला घेतले व त्यावर आपल्या परीने ताल धरला. गाण्याचा मुळातला ताल समजण्यासारखा तरी होता की नाही कोण जाणे. गाण्यातला एकही शब्द कळत नव्हता आणि त्याचा भावही लक्षात येत नव्हता. त्यामुळे थोड्यात वेळात लोकांची आपसातली कुजबुज सुरू झाली आणि ती ऐकू यावी म्हणून अधिकाधिक मोठ्याने होत जाऊन त्याने गोंगाटाचे रूप घेतले. गायकवादकांना या गोष्टीची रोजची संवय असावी अशा निर्विकार वृत्तीने त्यांनी आपले काम चालू ठेवले. त्यामुळे एका तरी माणसाचे मनोरंजन झाले की नाही ते सांगता येणार नाही. "आम्ही स्विट्झर्लंडमधले लोकसंगीतसुद्धा ऐकले आहे." एवढी फुशारकी मारायची सोय तेवढी झाली.

रात्रीचे भोजन बोटीवरच घ्यायचे होते. खाद्यपदार्थ मांडून ठेवलेले पाहून काउंटरच्या जवळ बसलेले लोक उठून उभे राहिले. त्यांना पाहून बाकीचे लोक उठले. "लोकांनी घाई न करता वाट पहावी, एकेका टेबलावरील लोकांनी क्रमाक्रमाने येऊन जेवण वाढून घ्यावे." अशा सूचना आमचे मार्गदर्शक देत होते पण त्या कितीशा लोकांना ऐकू जाणार? अरुंद मार्गिकेमध्ये जितके लोक उभे राहू शकत होते तेवढे उभे राहून आपला नंबर लावीत होते. भारतीय पद्धतीचेच जेवण होते व त्यात नेहमीचेच पदार्थ होते. "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" म्हणत आम्ही चार घास खाऊन घेतले आणि पुन्हा डेकवर पळालो. आता सूर्यास्ताची वेळ होत होती व आभाळात वेगवेगळ्या रंगांचा खेळ चालला होता.

हळू हळू बाकीची मंडळीसुद्धा डेकवर आली. आता खुर्च्या बाजूला करून मधोमध मोकळी जागा केली. लाउडस्पीकरवर हिंदी, मराठी गाणी लावली आणि त्यावर नाच सुरू झाले. शास्त्रशुद्ध स्टेप्स घेत करायचा बॉल डान्स वगैरे आता कालबाह्य गोष्टी झाल्या आहेत. उडत्या चालीच्या गाण्याच्या जलद तालावर हात पाय झाडत कंबर लचकवत राहणे हेच मुख्य. एका उत्साही जोडप्याने पुढाकार घेऊन स्वतः नाचायला व बाकीच्यांना त्यात ओढायला सुरुवात केली. हळू हळू बहुतेक लोक त्यात सामील झाले. "मेहबूबा, मेहबूबा"
किंवा "ऐका दाजिबा ऐका दाजीबा" च्या तालावर उड्या मारून घेत होते. नौकेने तलावाला प्रदक्षिणा मारून परत फिरेपर्यंत नाचगाण्याचा जल्लोष चालू राहिला.
. . . . . . (क्रमशः)

No comments: