Thursday, May 28, 2009

ग्रँड युरोप - भाग ३२ : डिस्नेलँड आणि लिडो शो


दि.२९-०४-२००७ चौदावा दिवस : डिस्नेलँड आणि लिडो शो

पहिल्या दिवशी पॅरिस शहर पाहून झाल्यावर दुसरा दिवस यापूर्वी कधी न पाहिलेल्या कांही खास गोष्टींसाठी ठेवलेला होता. सकाळी उठून तयार होऊन डिस्नेलँडला जायला निघालो. हे रिसॉर्ट शहरापासून दूर, सुमारे तासाभराच्या अंतरावर मोकळ्या जागेवरील निसर्गरम्य परिसरात वसवले आहे. या ठिकाणीसुद्धा पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असल्याने त्यांच्या सोयीसाठी अवाढव्य पार्किंगची व्यवस्था आहे. कार, बसेस, कॅरॅव्हॅन भरभरून येणा-या लोकांची रीघ लागली होती. त्यातले बहुतेक लोक दिवसभर तेथे घालवण्याच्या तयारीनेच आलेले होते. आम्हीसुद्धा चक्क जेवणाचे डबे आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या बरोबर घेऊन तिथे गेलो होतो.

वॉल्ट डिस्नेचे नांव कोणी ऐकले नसेल? गेल्या शतकात करमणुकीच्या क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून टाकणारी कामगिरी त्या माणसाने करून ठेवली आहे आणि त्याच्या पश्चातसुद्धा त्याची कीर्ती वाढतेच आहे. पूर्वीच्या काळातील नाटक, तमाशा, नौटंकी आदि सगळ्या करमणुकीच्या परंपरागत क्षेत्रात जीवंत माणसे रंगमंचावर येत असत. सिनेमाची सुरुवात झाल्यावर नट व नट्या पडद्यावर यायला लागल्या. यापासून वेगळी अशी कार्टून्सद्वारा मनोरंजन करण्याची कला सादर करून तिला अमाप लोकप्रियता मिळवण्यात वॉल्ट डिस्नेचा सिंहाचा वाटा आहे. एका खास कॅमेराद्वारे वेगाने छायाचित्रे घेऊन सजीव माणसाचा अभिनय टिपून घेता येतो व त्याच प्रकारे तो पुन्हा दाखवता येतो, पण निर्जीव कार्टून्सच्या हालचाली दाखवण्यासाठी थोड्या थोड्या फरकाने अनेक चित्रे काढून ती एकामागोमाग एक दाखवावी लागतात. त्यात पुन्हा मुद्राभिनय आणायचा असेल, चेप-यावरील बदलते भाव दाखवायचे असतील तर ते किती कठीण व किचकट काम असेल? आज संगणकाच्या सहाय्याने ते बरेच सोपे झाले आहे, पण वॉल्ट डिस्ने्या काळात तशी सोय कुठे होती? फार फार तर चित्रांचे ट्रेसिंग करता येणे त्या काळात शक्य होते. वेगवेगळे मुखवटे घालून माणसेच या हालचाली करत असणार अशी माझी समजूत होती.

वॉल्ट डिस्नेने नुसतीच हलणारी चित्रे दाखवली नाहीत तर त्यांमधून अद्भुत पात्रे निर्माण करून त्यांच्याकरवी मजेदार गोष्टी सांगितल्या. खरे तर कुठल्याच उंदराला मिकी माऊसप्रमाणे गोलाकार कान किंवा नाकाचा शेंडा नसतो की कुठल्याच बदकाला पंखाऐवजी दोन हांत नसतात. पण मिकी माऊस आणि डोनाल्ड डक यांचे बिळात राहणारा उंदीर व पाण्यावर तरंगणारे बदक यांचेबरोबर फक्त नांवापुरतेच संबंध आहेत. ते दोघे आणि मिनी, गूफी, अंकल स्क्रूज वगैरे सगळे लोक माणसांप्रमाणे चालतात, बोलतात, घरात रहातात, अंगात कपडे घालतात, पायात बूट चढवतात, मोटार चालवतात, ऑफिसला किंवा बाजारात जातात. त्यांचे चेहेरे विचित्र असले तरी माणसांप्रमाणेच प्रत्येकाचे निराळे व्यक्तीमत्व असते व त्यानुसार तो वागतो. मात्र ती काल्पनिक पात्रे असल्यामुळे मानव शरीराचे नियम त्यांना लागू पडत नाहीत. त्यांचे अंग इतके लवचीक आहे की ओढले तर छपरापर्यंत ताणले जाते आणि दाबले की इस्त्री केलेल्या कापडासारखे सपाट होते. कधी ते फुग्यासारखे टम्म फुगते तर कधी धुवून पिळलेल्या फडक्यासारखे दहा ठिकाणी पिरगळते. हे सगळे अफलातून चमत्कार पहातांना लहान मुले तर खिदळत राहतातच, मोठे लोकसुद्धा खुर्चीला चिकटून बसतात.

सिनेमाच्या माध्यमात प्रचंड यश मिळवल्यानंतर वॉल्ट डिस्नेने मनोरंजनाच्या क्षेत्रात एक नवा अध्याय जोडला. केवळ मौजमजा करण्यासाठी त्याने डिस्नेलँड या एका एम्यूजमेंट पार्कची निर्मिती केली. त्यात चित्रविचित्र आकाराच्या इमारती तर बांधल्याच पण लहानापासून थोरांपर्यंत सगळ्यांसाठी विलक्षण मनोरंजक तसेच चित्तथरारक खेळांची योजना केली. या कल्पनेला लोकांकडून कल्पनातीत प्रतिसाद मिळाला आणि अशा प्रकारच्या उद्यानांना मोठी मागणी निर्माण झाली. वॉल्ट डिस्नेच्या कंपनीने त्यानंतर फ्रान्स, जपान, हाँगकाँग वगैरे देशात स्वतःचे डिस्नेलँड उभारले आहेत. यापासून प्रेरणा घेऊन तयार केलेले एस्सेलवर्ल्डसारखे इतर पार्कसुद्धा अनेक ठिकाणी आहेत. पण डिल्नेलँडची सर कोणाला आली नाही आणि तितकी लोकमान्यताही कोणाला मिळाली नाही.

पॅरिसच्या डिस्नेलँडचे पांच मुख्य भाग आहेत. मेन स्ट्रीट यू.एस.ए, फ्रॉंटियरलँड, एड्व्हेंचरलँड, फँटसीलँड आणि डिस्कव्हरीलँड. हे सारे भाग एकमेकांना लागून आहेत. त्यात निरनिराळ्या प्रकारच्या करमणुकीच्या सोयी व खेळ आहेत. मेन स्ट्रीटवर मुख्यतः आकर्षक इमारतीमध्ये दुकाने थाटलेली आहेत. घोड्याच्या बगीमधून फेरफटका मारता येतो. रोज संध्याकाळी इथे एक अनुपम अशी मिरवणूक निघते. फ्रॉंटियरलँडमध्ये फँटमचा बंगला, थंडर माउंटन, इंडियन खेडे, नदीमधील होड्या वगैरे आहेत. एड्व्हेंचरलँडमध्ये कॅरीबियन सागरी चांचे, रॉबिनसन क्रूसोचे झाडावरील घर, अल्लाउद्दीनची गुहा यासारख्या जागा आहेत. फँटसीलँडमध्ये निद्रिस्तसुंदरीचा राजवाडा (स्लीपिंग ब्यूटीचा कॅसल), अलाइस (वंडरलँडमधील)चा भूलभुलैया, पिनोचिओ, पीटर पॅन, ड्रॅगन यासारख्या अद्भुत कृती आहेत. स्पेस माउंटन, ऑर्बिट्रॉन, लेजर ब्लास्ट, स्टार टूर यासारख्या धाडसाच्या सहली डिस्कव्हरीलँडमध्ये आहेत. एका वर्तुळाकृती मार्गावरून फिरणारी छोटीशी आगीनगाडी या सर्वांमधून सारखी फिरत असते. हनी आय श्रंक द क्राउड हा कार्यक्रम एका सभागृहात दाखवला जातो. छोटा चेतन हा चित्रपट पहातांना जसा एक खास चष्माघालावा लागत असे तसला चष्मा लावून हा चित्रपट पहायचा असतो. तो पहाता पहाता पडद्यावरील पात्रे राक्षसासारखी मोठी होऊन आपल्या अंगावर आल्यासारखी वाटतात.

एकंदरीत अठ्ठेचाळीस वैशिष्ट्यपूर्ण जागा या मायानगरीत आहेत. कुठे घोड्यावर, मोटारीत किंवा विमानात बसून फिरण्याच्या मेरी गो राउंड आहेत, त्यातसुद्धा एका पातळीवर गोल फिरणा-या, स्वतःभोवती गिरक्या घेत फिरणा-या किंवा वरखाली तिरक्या प्लेनमध्ये फिरवणा-या असे वेगवेगळे उपप्रकार, तर कुठे जायंट व्हीलमधले झुलते पाळणे आहेत. एखाद्या खडकाळ जमीनीवरून जीपगाडी भरधाव नेल्याने बसतील तसे दचके बसवणारे रोलर कोस्टर कोठे आहेत, तर तोफेच्या तोंडी दिल्याप्रमाणे एका सेकंदात वर उडवून वेगाने खाली आणणारी रॉकेटे आहेत. ज्यांच्या हाडांचे सांधे मजबूत असतील आणि हृदय धड़धाकट असेल त्यांना अनेक अभूतपूर्व असे अनुभव देणारे कांही प्रकार आहेत, तर लहान मुलांनासुद्धा भीती वाटू न देणारे साधे खेळ आहेत. त्यांना सिंड्रेला किंवा अलाईस यांच्या कल्पनारम्य विश्वात घेऊन जाण्यायाठी किती तरी तशा प्रकारची स्थाने बनवून ठेवलेली आहेत. आम्ही आपल्या वयोमानाला अनुसरून आणि वैद्यकीय सल्ला पाळून जमतील तेवढे अनुभव घेतले आणि इतर लोकांना धा़डसी कृत्ये करतांना बाजूला उभारून पाहून घेतले.

दुपारचे तीन वाजून गेल्यानंतर मुख्य रस्त्यावर आलो. तोपर्यंतच रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या फूटपाथवर बरीच गर्दी झालेली होती. त्यातच थोडीशी चेंगराचेंगरी करून जागा करून घेतली आणि चक्क जमीनीवर बसकण मारली. सगळ्या लोकांनी तेच केले होते कारण त्यांचे पायसुद्धा दिवसभराच्या फिरण्याने दुखू लागले असणार. चार वाजता सुरू होणा-या मिरवणुकीची सगळे लोक आतुरतेने वाट पहात होते. त्याप्रमाणे चार वाजता तिचे पडघम वाजायला लागले, पण सारे चित्ररथ तयार होऊन रस्त्यावर येऊन कासवाच्या गतीने सरकत आमच्यासमोर येईपर्यंत निदान अर्धा तास तरी वाट पहावी लागली. तो जसजसा जवळ येत गेला तसे सारेजण उत्साहाने उठून उभे राहिले.

ही मिरवणूक पाहणे हा एक अभूतपूर्व अनुभव होता. मिकी माऊस, डोनाल्ड डक आणि त्यांच्या कॉमिक्समधील चिपमंकसकट एकूण एक पात्रे तर त्यांत सामील झालेली होतीच, त्यांशिवाय सिंड्रेला, स्नोव्हाईट, स्लीपिंग ब्यूटी, ब्यूटी आणि बीस्ट, पिनॅचियो, अलाईस, लायन किंग इत्यादी सर्व परीकथांमधील वेगवेगळी पात्रे या मिरवणुकीमध्ये मिरवत होती. सजवलेल्या चित्ररथांमध्ये त्यांच्या गोष्टींमधील दृष्ये अत्यंत आकर्षक रीतीने मांडलेली होती आणि कांही पात्रे त्यावर बसलेली होती किंवा नाचत होती. त्याशिवाय प्रत्येक रथाच्या आगेमागे कांही पात्रे नातच बागडत चालत होती आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बाळगोपाळांशी हस्तांदोलन करीत त्यांना खाऊ वाटत होती. प्रत्येक पात्र चित्रात दिसतो तसा चित्रविचित्र पोशाख घालून आणि मुखवटे परिधान करून आल्याने सहज ओळखू येत होते आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत होत होते. फारसे राईड घेता न आल्याने मनाला जी थोडीशी रुखरुख वाटत होती ती या परेडनंतर कुठल्या कुठे पळून गेली.

दिवसभर डिस्नेलँडच्या परीकथेतील विश्वात घालवल्यानंतर रात्री चंप्स एलिसेजवरील लिडो शो पहायला गेलो. हे सुद्धा एक वेगळ्याच प्रकारचे जग होते. टाटा थिएटरची आठवण करून देईल अशा एका भव्य थिएटरात आम्ही प्रवेश केला. आत समोर एक विशाल मंच तर दिसत होता पण प्रेक्षकांसाठी रांगेत मांडलेल्या खुर्च्या नव्हत्या. त्याऐवजी जागोजागी छोटी छोटी टेबले मांडून त्याच्या बाजूला खुर्च्या ठेवलेल्या होत्या. म्हणजे खाणे पिणे करता करता मनोरंजनाची व्यवस्था होती तर. पण आम्ही तर रात्रीचे जेवण उरकून तिथे गेलो होतो. पुढे जाऊन पहाता रंगमंच बराचसा प्रेक्षागृहाच्या आंत आला होता व त्याच्या दोन्ही बाजूला मोकळी जागा होती. त्या जागेत लांबट टेबले ठेऊन आमच्या आसनांची व्यवस्था केलेली होती. आमच्यासाठी शँपेनची बाटली आणली गेली, पण तीनचार रसखान सोडल्यास इतरांनी कोका कोला पिणेच पसंत केले.

इथला रंगमंच अद्भुत प्रकारचा होता. पूर्वीच्या काळच्या मराठी नाटकांत अरण्य, राजवाडा, रस्ता वगैरेची चित्रे रंगवलेले भव्य पडदे पार्श्वभूमीवर सोडून त्याचा आभास निर्माण करीत असत. नंतरच्या काळात नेपथ्याच्या कलेचा व शास्त्राचा विकास झाला. त-हेत-हेचे सेट बनवण्यात येऊ लागले. 'तो मी नव्हेच' या नाटकाने फिरता रंगमंच आणला. दुस-या एका नाटकात सरकता रंगमंच आला. मिनिटभर स्टेजवर अंधार करून तेवढ्यात पटापट बदलता येण्याजोगे सेट आले. पण हे सगळे प्रयत्न प्राथमिक पातळीवरचे वाटावेत इतके प्रगत तंत्रज्ञान इथे पहायला मिळाले. पहाता पहाता मागचा भाग पुढे यायचा किंवा परत मागे जायचा, बाजूचे भाग सरकत जायचे. सपाट जागेच्या ऐवजी पाय-यांची उतरंड निर्माण व्हायची. समोरील स्टेजचा मधलाच भाग भूमातेने गिळून टाकल्यासारखा गडप व्हायचा. त्यानंतर जमीनीखालून एखादा कारंजा थुई थुई नाचत वर यायचा. कधी छतामधून पाळणा तरंगत तरंगत खाली यायचा. प्रकाशयोजनासुद्धा खूप वैविध्यपूर्ण होती. रंगांच्या छटा क्षणोक्षणी बदलत होत्याच. मध्येच एका बाजूला झोत जायचा. तेथून दुसरीकडे वळला की तोपर्यंत तिथले दृष्य पूर्णपणे बदललेले असायचे.

वेगवेगळ्या प्रकारचे नाच हा कार्यक्रमाचा मुख्य भाग होता. त्याखेरीज जादूचे प्रयोग, कसरती, जगलरी, मिमिक्री यासारखे ब-यापैकी आयटमसुद्धा अधूनमधून होत होते. आपल्या हिंदी सिनेमात पूर्वी क्लबडान्स असत, त्यानंतर कॅबरे आले, आता आयटम गर्ल्सचा धुडगुस चालला असतो. त्यात नट्यांच्या अंगावरील कपडे कमी कमी होत गेले. तरीही सेन्सॉरच्या थोड्या मर्यादा असतात. इथे मात्र कसलाच धरबंध नव्हता. कधी टॉपलेस, कधी बॉटमलेस तर कधी सगळेच लेस असलेल्या तरुणींचे घोळके मंचावर येत होते, तर अधून मधून झगमगीत कपड्याने त्यांचे सर्वांग झाकलेले असायचे. कधी डोक्यावर शिरपेच घालून त्यात तुरा खोवलेला, कधी मागच्या बाजूला कोंबड्यासारखे तुर्रेदार शेपूट लावलेले तर कधी पाठीला परीसारखे पंख चिकटवलेले. इतके विविध प्रकारचे कॉस्च्यूम! गाण्यांचे बोल मुळीच समजत नव्हते आणि डान्सच्या स्टेप्सबद्दल काडीचे ज्ञान नसल्याने मंचावर नक्की काय चालले आहे किंवा ते कशाबद्दल आहे याचा अंधुकसा अंदाजसुद्धा येत नव्हता. फक्त प्रत्येक आयटम पूर्वीच्या आयटमपेक्षा वेगळा होता एवढे समजत होते. हाही एक वेगळा अनुभव होता.

सभागृहातील बहुतेक टेबलांवर विराजमान झालेली युरोपियन जोडपी आपसात संवाद साधत असतांनाच हे सगळे अधून मधून निर्विकार नजरेने पहात असली तरी आम्हा भारतीय मंडळींना हे अगदीच नवीन होते. आमच्यातल्या कोणी भारतातल्या हॉटेलात जाऊन प्रत्यक्षातला कॅबरे कधी पाहिला असेल असे वाटत नव्हते. त्यातून सर्वांच्या अर्धांगिनी त्यांच्या शेजारी बसलेल्या. त्यामुळे जरासे अवघडल्यासारखेच होत होते. त्यातल्या एकीने समोरच्या गृहस्थाकडे पहात "तो पहा कसा आधाशासारखा त्या बायांकडे पहातो आहे." असे आपल्या नव-याच्या कानात कुजबुजल्यावर त्या बिचा-याला आता कुठे पहावे हा प्रश्न पडून तो गोंधळून गेला.

. . . . . . . .(क्रमशः)

No comments: