Wednesday, May 27, 2009

ग्रँड युरोप - भाग ३१ : आयफेल टॉवर


दि.२८-०४-२००७ तेरावा दिवस : आयफेल टॉवर

आमच्या नौकाविहाराची सुरुवात आयफेल टॉवरच्या पायथ्याच्या अगदी जवळून झाली. जसजशी आमची नाव नदीमधून पुढे जात होती तसतसा तो उंच मनोरा लहान लहान होत दूरदूर जातांना दिसत होता आणि परत येतांना तो मोठा होत जवळ जवळ येतांना दिसत होता. सीन नदीचा प्रवाह या भागात चंद्रकोरीसारखा थोडासा बांकदार असल्यामुळे तो टॉवर वेगवेगळ्या कोनातूनही पहायला मिळाला. सकाळपासून पॅरिसमध्ये फिरतांना हा उत्तुंग मनोरा अधून मधून पार्श्वभूमीवर दिसत होताच. पॅरिस आणि आयफेल टॉवर यांचे अतूट नाते आहे. गेटवे ऑफ इंडिया हे जसे मुंबईचे आणि कुतुबमीनार हे दिल्लीचे प्रतीक झाले आहे तसेच आयफेल टॉवर हे सुद्धा पॅरिस शहराचे आंतरराष्ट्रीय प्रतीक झाले आहे.

फ्रान्समधील राज्यक्रांतीच्या शतकमहोत्सवाच्या निमित्ताने १८८९ साली पॅरिस येथे एक आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन भरवण्याचे ठरवले गेले. फ्रान्सने यंत्रोद्योगाच्या क्षेत्रात केलेली लक्षणीय प्रगती या निमित्ताने जगापुढे आणावी असा एक मुख्य उद्देश त्यामागे होता. त्या दृष्टीने विचार करता फ्रान्समधील लोकांच्या कर्तृत्वाचे एक नेत्रदीपक असे एक प्रतीक बनवून त्या ठिकाणी उभे करायचे ठरले. त्यासाठी समर्पक अशी भव्य व कल्पक कलाकृती बनवण्यासाठी निविदा मागवल्या गेल्यावर त्याला शेकडो प्रतिसाद आले. तज्ञांकरवी त्यांची छाननी होऊन गुस्ताव्ह आयफेल या तंत्रज्ञाने मांडलेली टॉवरची संकल्पना स्वीकारण्यात आली. पुढे हा मनोरा त्याच्याच नांवाने जगप्रसिद्ध झाला.

औद्योगिक प्रदर्शन हे मर्यादित काळापुरतेच भरवले जाणार असल्यामुळे त्यासाठी कायम स्वरूपाच्या प्रतीकाची जरूरी नव्हती. पण या मीनाराच्या बांधणीला येणा-या खर्चाचा विचार करता त्यासाठी वीस वर्षाचा करार करण्यात आला. गुस्ताव्ह आयफेल याने हा मीनार पहायला येणा-या लोकांकडून वीस वर्षे मिळेल तेवढे उत्पन्न घ्यावे आणि त्यानंतर तो मोडकळीला काढावा असे ठरले. अशा प्रकारचा लोखंडाचा सांगाडा बांधतांना त्याचे स्वतःचे वजन आणि सोसाट्याच्या वादळी वा-यामुळे त्यावर पडणारा भार यांचा विचार मुख्यतः केला जातो. यदाकदाचित एखादा भूकंपाचा धक्का बसला तरी त्यामुळे तो कोसळू नये यासाठी आवश्यक तो मजबूतपणाही त्याला दिलेला असतो. या गोष्टींचा त्याच्या वयोमानाबरोबर कांही संबंध नसल्यामुळे तो उभा केल्यानंतर त्याच्या मजबूतपणात कालानुसार फरक पडत नाही. गंज चढल्याने लोखंड क्षीण होत जाते या कारणाने फक्त ते लोखंड गंजणार नाही एवढे मात्र पहावे लागते. यामुळे वारंवार त्या मनो-याची कसून पहाणी करणे व गंजण्यापासून त्याचे संरक्षण करण्यासाठी खास रासायनिक रंगाची पुटे त्यावर चढवणे मात्र गरजेचे असते. अशा प्रकारची निगा राखत राहिल्यास कोणतीही लोखंडी वस्तू दीर्घ काळपर्यंत टिकू शकते.

करारानुसार आयफेल टॉवर पहिले वीस वर्षेपर्यंत टिकवला गेला, तोपर्यंत तो अत्यंत लोकप्रिय झाला होता. त्या काळात तो जगातील इतर सर्व इमारतींहून उंच असा पहिल्या क्रमांकाचा मनोरा होता. लक्षावधी लोक तो पाहण्यासाठी दुरून येऊन गर्दी करीत होते. तो फ्रान्सचा मानबिंदू झाला होता. अशा वेळी कोण त्याला पाडू देईल? उलट त्याची जास्तीत जास्त काळजी कशी घेता येईल यावर विचार आणि चर्चा सुरू झाल्या. दुस-या महायुद्धाच्या संपूर्ण कालखंडात पॅरिस शहर जर्मनीच्या ताब्यात होते. पण लढाईच्या धुमश्चक्रीमध्येही मित्रराष्ट्रांनी पॅरिस शहरावर फारशी बॉंबफेक केली नाही, आयफेल टॉवरला तर मुळीच धक्का लावला नाही. युद्धाच्या अखेरीस जर्मनीपुढे पराभवाचे सावट दिसू लागल्यावर निव्वळ सूडापोटी हा टॉवर नष्ट करण्याच्या आज्ञा हिटलरने दिल्या होत्या असे म्हणतात, पण तेथील सूज्ञ सेनाधिका-याने तसले अघोरी कृत्य केले नाही. अशा रीतीने या मनो-याला दुस-यांदा जीवनदान मिळाले.

या स्ट्रक्चरमधील प्रत्येक खांब त्याच्या माथ्यावरील संपूर्ण सांगाड्याचा भार पेलत असतो. त्यामुळे सरसकट सगळीकडे एकाच आकाराच्या जाडजूड खांब व तुळया वापरल्या तर वरील भागाचा खालील भागावरील भार त्याला असह्य होतो. दही दंडी फोडण्यासाठी मानवी उतरंड बनवतांना जसे सर्वात वजनदार भरभक्कम गडी खालच्या साखळीत, मध्यम बांध्याचे मधील भागात आणि लहान चणीचे गडी सर्वात वर पाठवतात, तशाच प्रकारे या मनो-यासाठी वापरलेले खांब व तुळया वरून खाली येता येता त्यांचे आकारमान वाढत जाते. या कारणाने असल्या उत्तुंग स्ट्रक्चरचे डिझाईन अतीशय काळजीपूर्वक रीत्या व बारकाईने आकडेमोडी करून करावे लागते. पॅरिसची कलाविषयक परंपरा लक्षात घेऊन तो दिसायलासुद्धा देखणा दिसला पाहिजे याची विशेष काळजी घेतलेली आहे. इंजिनीयरांना सौंदर्यदृष्टी नसते असे हा मनोरा पाहिल्यानंतर कोण म्हणेल?

औद्योगिक प्रदर्शनाची तारीख आधीपासून ठरलेली असल्यामुळे कसेही करून हा मनोरा दोन वर्षाच्या काळात पूर्ण करायचाच होता आणि त्याप्रमाणे तो वेळेवर पुरा झाला. अर्थातच तेंव्हा त्यासाठी भगीरथ प्रयत्न करावे लागले असणार. एकंदरीत सात हजार टनावर वजन भरेल इतक्या पंधरा हजारावर लोखंडाच्या विशिष्ट आकारांचे डिझाईन करून, त्यांची ड्रॉइंग्ज रेखाटून व ते भाग कारखान्यात तयार करून इथे आणले. त्यातील प्रत्येक भाग अचूक असणे अत्यंत आवश्यक होते. ते आकाराने सूतभर जरी लहान वा मोठे झाले असते तर त्यांची एकमेकाशी सांगड जुळली नसती किंवा परिणामी मनोरा वाकडा तिकडा दिसला असता. पंचवीस लक्ष इतके रिवेट ठोकून ते सगळे पुर्जे एकमेकांना जोडले. त्या जमान्यातील ज्या कामगारांनी हिंवाळ्यातील थंडीवा-यालासुद्धा न जुमानता इतक्या उंचीवर चढून हे जोडणीचे अवघड काम केले असेल त्यांची धन्य आहे.

हा मूळचा मनोरा तीनशे मीटर उंच आहे. स्कायस्क्रेपर्सच्या आजच्या जमान्यात त्याची तितकीशी नवलाई वाटणार नाही. टेलीव्हिजनचे प्रसारण सुरू झाल्यानंतर आणि उपग्रहाद्वारे ते करणे सुरू होण्यापूर्वीच्या मध्यंतरीच्या काळात जगभरातील सा-या शहरात त्यासाठी उंच मनोरे बांधण्यात आले. मुंबईमधील वरळी येथील दूरदर्शनचा टॉवरसुद्धा जवळ जवळ तितकाच उंच आहे, पण सौंदर्याच्या दृष्टीने तो आयफेल टॉवरच्या पासंगालाही पुरणार नाही. त्याची उभारणी करतांना हा उद्देश डोळ्यासमोर मुळी नव्हताच. सध्या तरी कॅनडामधील टोरोंटो येथील सी.एन.टॉवर ही जगातील सर्वात उंच इमारत मानली जाते. इतर देशांतसुद्धा उत्तुंग मनोरे आहेत. पॅरिसमध्ये मात्र आयफेल टॉवर हा उंच मनोरा आयता उपलब्ध असल्याने त्याच्याच माथ्यावर चोवीस मीटर उंचीचा खांब टीव्हीसाठी उभारला आहे.

रेडिओ व टेलीव्हिजनच्या कार्यक्रमांच्या प्रसरणाव्यतिरिक्त कांही विशेष कामांसाठी आयफेल टॉवरचा उपयोग करण्यात आला. कांही काळ त्यावर महाकाय बेढब जाहिराती लावण्यात आल्या होत्या, पण त्याने त्याच्या सौंदर्याला बाधा येत असल्याने सुदैवाने त्या काढून टाकल्या गेल्या. महायुद्धाच्या काळात जर्मन सैनिकांनी आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या माथ्यावर ऑब्झर्व्हेशन पोस्ट बसवले. कोणा गिर्यारोहकाने लिफ्ट वा जिन्याचा वापर न करता त्यावर चढून जाण्याचा विक्रम केला तर कोणी हातात पॅराशूट धरून त्यावरून खाली उडी मारण्याचा. पर्यटन क्षेत्रासाठी तर इथे सोन्याची खाण आहे. पर्यटकांना उंचावर नेऊन पॅरिस शहराचे विहंगम दृष्य दाखवले जाते. त्यांच्यासाठी या टॉवरमध्ये रेस्तरॉं उघडली आहेत. त्यांना आकर्षण वाटावे यासाठी सर्व प्रयत्न केले जातात आणि त्याचे परिणामस्वरूप इथे येऊन गेलेल्या लोकांची संख्या आतापर्यंत वीस कोटीहून जास्त झाली आहे! त्यापासून असंख्य लोकांना कांही भव्य दिव्य असे करण्याची प्रेरणा मिळाली असेल ती वेगळी!

असा हा आयफेल टॉवर पाहण्याचे कधीपासून मनात होते ते एकदाचे युरोपच्या या सहलीमध्ये साध्य झाले.

. . . . . . . (क्रमशः)

No comments: