Thursday, May 07, 2009

ग्रँड युरोप - भाग १५ : लीस्टनस्टीनचे वडूज


दि.२२-०४-२००७ सातवा दिवस : लीस्टनस्टीनचे वडूज


आज आमच्या सहलीचा पहिला आठवडा पुरा होत होता. ऑस्ट्रियाला निरोप देऊन आता 'पृथ्वीवरील नंदनवन' असा लौकिक असलेल्या स्विट्झरलँडला जायचे म्हणून सगळ्यांनाच खूप उत्साह आला होता. दोन दिवस आल्प्स पर्वताच्या बाजूबाजूने जात होतो. आता त्याच्या माथ्यावर पोचण्यासाठी चढाई करायची होती. त्यासाठी सगळे जय्यत तयारीला लागले होते.

घाटामधल्या वळणावळणाच्या रस्त्यावरून झालेल्या तीन चार तासांच्या प्रवासानंतर 'वडूज' नांवाच्या गांवी पोचलो. पुण्याहून कात्रजचा घाट चढून साता-याकडे जातांना उंब्रज, वडूज वगैरे गांवे लागतात ते आठवले. पण इथं कंचेबी फेटेवाले नाईतर टोपीवाले पावने अजाबात दिसल्ये न्हाईत! आता इकडल्या वडूजच्या मानसांनी आपल्या म्हाराष्ट्रात येऊनशानी तिकडंबी येक वडूज वसवलं की काय याचं संशोधन का काय म्हंतात ते करायला पायजेल हाय!

तर हे 'वडूज' नांवाचे गांव चक्क 'लीस्टनस्टाईन' नांवाच्या एका देशाची राजधानी निघाली. मी तर ही दोन्ही नांवे पूर्वी कधी ऐकली नव्हती. आणि कशी ऐकणार? मी वर्तमानपत्र वाचायला लागल्यानंतर तिथली बातमी छापून येण्यासारखे कांही तिथे घडलेच नव्हते. या देशाचे क्षेत्रफळ आहे फक्त सुमारे दीडशे स्क्वेअर किलोमीटर. ते सुद्धा सगळे डोंगरद-यांनी भरलेले. लोकसंख्या फक्त ३३०००. आमच्या वाशीमध्ये याहून कितीतरी जास्त लोक रहात असतील. शिक्षणाची व्यवस्था म्हणायला फक्त शाळा. कॉलेजला जायचे असल्यास युरोपमध्ये कुठेही जा, त्याची सोय केली जाते. युरोपातील एक लोहमार्ग या देशातून आरपार जातो, त्यावरून दुस-या देशांच्या आगगाड्या धांवतात. पण त्यातील सुपरफास्ट गाड्या इथल्या स्टेशनांवर थांबतच नाहीत. हा एक डबल लँडलॉक्ड देश आहे. म्हणजे इथून समुद्रापर्यंत पोचण्यासाठी निदान दोन देशांच्या सरहदी पार कराव्या लागतात कारण याची सरहद्द एका बाजूने ऑस्ट्रिया व इतर सर्व बाजूने स्विट्झरलँडशी भिडली आहे व या दोन्ही देशांना स्वतःचा समुद्रकिनारा नाही.

हा देश गेली दोनशे वर्षे एक प्रिन्सिपालिटी आहे. अधून मधून इथे येऊन राहणारा एक प्रिन्स निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या सल्ल्यानुसार येथील राज्यकारभार पाहतो. पण त्याच्याकडे सैन्यदलच नाही. कदाचित म्हणून त्याला 'राजा' म्हणत नसतील! ट्रॅफिक कंट्रोल, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी थोडे पोलिस असावेत. मला तरी जाता येता ते कुठे दिसले नाहीत. परेड वगैरे करायला गेले असतील. हा देश स्वतंत्र असला तरी जवळ जवळ सगळ्या गोष्टींसाठी शेजारच्या स्विट्झर्लँडवर अवलंबून आहे. त्यांचे चलनसुद्धा
स्विस फ्रँक हेच आहे पण युरोसुद्धा कांही दुकानात चालतो. टपालाची तिकीटे मात्र स्वतःची आहेत. इथे अत्यंत कमी कर आकारले जातात. याचा फायदा घेण्यासाठी कांही मोठ्या कंपन्या इथून आपला व्यवहार चालवतात. मात्र अँकरबोल्ट या खास पद्धतीचे हार्डवेअर बनवणारी हिल्टी ही आघाडीची कंपनी आपले उत्पादनसुद्धा इथेच करते.

वडूज हे एक छोट्याशा हिल स्टेशनसारखे टुमदार शहर आहे. अगदी दार्जिलिंग किंवा गंगटोक इतके नसले तरी लोणावळा खंडाळ्याहून अधिक चढउतार असलेले रस्ते आहेत. तरीही इथे सायकली खूप दिसल्या. येथील शुद्ध हवेचा परिणाम असावा. या गांवाची सहल घडवणारी दोन डब्यांची एक छोटीशी आगगाडीसारखी दिसणारी ट्रॅम आहे. त्यात बसवून फिरवतांना गांवातील प्रमुख रस्ते, इमारती, मैदाने वगैरेंचे दर्शन घडते. शिवाय वाटेत थांबून आजूबाजूचे, विशेषतः खालच्या बाजूचे सृष्टीसौंदर्य पहाण्याचे एक दोन पॉइंटसुद्धा दाखवले. येथील प्रिन्सचे निवासस्थान डोंगरमाथ्यावर आहे. गांवातील बहुतेक जागेवरून ते दृष्टीस पडते. ज्या वेळी प्रिन्स इथे येतो त्या वेळी एक झेंडा उंचावून त्याची उपस्थिती दाखवली जाते. आम जनतेला हा राजवाडा पहायला परवानगी आहे की नाही ते माहीत नाही. आम्हाला तरी तो दुरूनच पहावा लागला.
. . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: