Monday, May 18, 2009

ग्रँड युरोप - भाग २४ : जर्मनीतील प्रवास


दि.२५-०४-२००७ : जर्मनीतील प्रवास


स्विट्झर्लंडधून जर्मनीच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर एक फरक घडून आला। या देशात वाहनांच्या वेगाची कमाल मर्यादा ताशी फक्त नव्वद किलोमीटर एवढीच ठेवली आहे आणि जागोजागी छुपे कॅमेरे लावून हमरस्त्यावरून जाणा-या वाहनांचा वेग मोजला जात असतो. त्यामुळे वेगाने गाडी चालवण्याबद्दल भुर्दंड बसावा लागण्याच्या भीतीने आमचे चालक महाशय जास्तच जागरूक झाले. तसे ते आधीपासून आमची गाडी अत्यंत काळजीपूर्वक व सफाईने चालवीत होते. तरीही वाटेत कुठल्या तरी एका जागी ट्रॅफिक पोलिसाने त्यांना क्षुल्लक कारणावरून अडवून एक झटका दिलेला होता. त्याची पुनरावृत्ती व्हायला त्यांना नको होती आणि आम्हाला तर असला व्यत्यय असह्य झाला असता. त्यामुळे बाणासारखा सरळ आणि कुठेही कसलाही खाचखळगा नसलेला उत्तम रस्ता असूनसुद्धा मर्यादित वेग ठेऊन गाडी हाणावी लागत होती.ल्यूसर्नहून निघाल्यापासून कोलोनला पोचण्यापर्यंत आठ तासांचा प्रवास होता. त्यात कुकू क्लॉक फॅक्टरीमध्ये तासभर थांबणे झाले आणि दर दोन तासानंतर दहा पंधरा मिनिटे विश्रांती घेणे सक्तीचे होते. असे करून तो दिवस पूर्णपणे प्रवासातच गेला. म्हणजे जर्मनीचा उपयोग आम्ही स्विट्झरलंड आणि हॉलंड यांच्या दरम्यानचा एक कॉरीडॉर एवढाच केला असे म्हणावे लागेल. बर्लिन, फ्रँकफूर्ट, म्यूनिच यासारखी प्रसिद्ध शहरे या देशात असतांना त्यातील कोठल्याही महत्वाच्या शहराला स्पर्शही केला नाही. कदाचित जर्मनी हा विस्तृत देश असल्यामुळे बसने सगळीकडे फिरणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नसेल. म्हणजे जेवढा वेळ प्रवासात घालवायचा तेवढ्या प्रमाणात पहाणे होत नसेल. किंवा परदेशी लोकांपुढे आपल्या देशाचे प्रदर्शन मांडून त्यातून पैसे कमावणे जर्मन लोकांच्या स्वभावात फारसे बसत नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यास तितकेसे प्राधान्य त्या देशात मिळत नसेल. हा आपला माझा अंदाज.

आम्ही तेथील हायवेवरून धांवणारी वाहने आणि आजूबाजूच्या शेतातील पिके पहात मार्गक्रमण करीत होतो. ब्लॅक फॉरेस्ट संपल्यानंतर फारसे मोठे डोंगर किंवा घनदाट जंगल लागले नाही. बहुतेककडे सुपीक सपाट जमीन होती आणि त्यावर यांत्रिक शेती चालली होती. कुठे हिरवागार गालिचा पसरलेला दिसे तर कुठे पिवळ्याधमक फुलांनी तो सजवलेला दिसे. पण आतापर्यंत त्याचे नाविन्य राहिले नव्हते. मधून मधून लहान मोठी गांवे दिसत होती, पण त्यातील रस्त्यांच्या वरून किंवा खालून आमचा हायवे जात असल्याने कोठेही थांबण्याची गरज नव्हती. बहुतेक रहदारी वेगवेगळ्या मॉडेलच्या कार किंवा अवाढव्य आकाराचे ट्रक यांची होती. सगळे पंचवीस तीस चाके असलेले ट्रेलर होते. एवढेच नव्हे तर ते रिकामे झाल्यास त्यातील कांही चांके वर उचलून जमीनीला न टेकवण्याची यंत्रणा त्यांमध्ये दिसत होती. सर्व ट्रक संपूर्णपणे बंद होते. एकसुद्धा साधा चार चाकांचा उघडा ट्रक दृष्टीला पडला नाही. कन्स्ट्रक्शन कंपन्यांचे बांधकामाचे सामानसुद्धा सीलबंद गाड्यामधून नेले जात होते. त्यातील कचरा चुकूनही बाहेर आला तर त्यांना जबरदस्त दंड भरावा लागतो असे ऐकले. आपल्याकडील कचरा वाहणा-या गाड्या तर तो गांवभर मुक्तपणे उधळीत फिरत असतात आणि चुकून आपली गाडी त्या गाडीच्या मागे आली तर किती वैताग येतो त्याची प्रकर्षाने आठवण झाली. दर दोन तासांनी मिळणा-या विश्रांतीमध्ये त्या ठिकाणच्या स्टोअरमध्ये नवीन कोणती वस्तू दिसते ते पहात होतो आणि चॉकलेट, कुकीज, बिस्किटे असली चिटूर पिटूर खरेदी करीत होतो. त्यातच एका जागी कोणाच्या तरी सांगण्यावरून एक शँपेनची छोटीशी बाटलीही आली.

संध्याकाळपर्यंत आम्ही कोलोनला पोचलो. युरोपातील किंवा कदाचित जगातील सर्वात उंच असे हे चर्च असेल. पॅरिसचा आयफेल टॉवर बांधून होण्यापूर्वी म्हणजे एकोणीसाव्या शतकात हे कॅथेड्रल ही जगातील सर्वात उंच इमारत होती म्हणे. याच्या बांधकामाची सुरुवात बाराव्या शतकात झाली आणि ते पूर्ण व्हायला तब्बल सहा शतके लागली. इतके महत्वाचे हे स्थान पहायला पर्यटकांनी गर्दी केली असली तर नवल नाही. पण त्यांच्या सोयीसाठी कसलेही प्रयत्न तिथे केले जात असल्याचे दिसले नाही. अजून चांगला उजेड असूनसुद्धा आंत जाण्याची दारे केंव्हाच बंद होऊन गेली होती. त्या जागेची माहिती देणारा एखादा साधा बोर्डसुद्धा कोठे लावून ठेवलेला दिसला नाही. आम्ही आजूबाजूने फिरून व माना वर करकरून जेवढे दिसले तेवढे पाहून घेतले. हेच चर्च जर इटलीत किंवा इंग्लंडमध्ये असते तर त्या लोकांनी तिथे सोन्याची खाण उघडली असती असे मला वाटले. पिसाचा कलता मनोरा आणि लंडनचा सरळसोट बिगबेनचा टॉवर जगभर प्रसिद्ध आहेत, पण त्या दोन्हींपेक्षा अधिक भव्य आणि कलात्मक अशा कोलोन कॅथेड्रलचे नांव कितीशा लोकांनी ऐकले असेल?

. . . . . . . .(क्रमशः)

3 comments:

Girish said...

नमस्कार आनंद घारेकाका,

मी मिपावरील क्लिंटन.आपली युरोपवरील लेखमाला केवळ उत्तम आहे.सगळे लेख अजून वाचले नाहीत पण जेवढे वाचले त्यावरून मी स्वत: तिकडे आहे असे वाचताना वाटते.बाकी या लेखाविषयी एक बारीकशी शंका आहे.मी मागे डिस्कव्हरी चॅनेलवर जर्मनीतील ऑटोबान या हायवे विषयी एक कार्यक्रम बघितला होता.त्यात असे म्हटले होते की तुम्ही त्यावरून १३० किमी प्रतितास एवढ्या वेगाने जात असाल तरी आपली गाडी उजव्याच लेनमध्ये ठेवा कारण दुसरी एखादी गाडी तुम्हाला २०० किमी प्रतितास वेगाने येऊन डावीकडून ओलांडून जाईल.या लेखात आपण म्हणता की जर्मनीत रस्त्यावर गाड्यांचा वेग जास्तीतजास्त ९० किमी प्रतितास आहे.तेव्हा हे ऑटोबान सोडून इतर रस्त्यांविषयी लागू आहे असे वाटते.

Anand Ghare said...

ल्यूसर्नपासून कलोनपर्यंत ज्या हमरस्त्यावरून आमची बस गेली त्या रस्त्यावर अवजड वाहनांसाठी हा नियम होता. ही वाहने बहुतेक वेळ रस्त्याच्या डाव्या बाजूने जात. ओव्हरटेक करणारी कोणतीही कार २०० किलोमीटर एवढ्या सुसाट वेगाने गेली असे वाटले नाही. कांही अतीदृतगती महामार्गावर ते शक्य असेल. स्वातीताई किंवा अन्य जर्मनीवासी मिपाकरांच्या लेखनात कदाचित जर्मनीतील रस्त्यांवरील प्रवासाची माहिती सापडेल.

Anand Ghare said...

सॉरी. आमची बस रस्त्याच्या कडेने म्हणजे उजव्या बाजूनेच जात होती. भारत आणि युरोपमधील वाहतूक वेगळ्या प्रकारे होत असल्यामुळे घोटाळा झाला. आपण पाठवलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद