Sunday, May 03, 2009

ग्रँड युरोप - भाग ११ : ऐतिहासिक व्हेनिस


दि.१९-०४-२००७ चौथा दिवस : ऐतिहासिक व्हेनिस


दोन हजार वर्षांपूर्वीच्या काळात युरोपमध्ये सर्वत्र रोमन साम्राज्याचा दबदबा होता व त्यामुळे रोम हे तिकडील सर्वात महत्वाचे शहर होते. त्या काळाची निशाणी दाखवणारी अवाढव्य वास्तुशिल्पे आजही पहायला मिळतात. गेल्या चार पांच शतकांपूर्वीपासून इंग्लंड व फ्रान्स हे देश आघाडीवर आले व त्यांनी जगभर आपली साम्राज्ये स्थापन केली. त्यामुळे लंडन व पॅरिस ही शहरे युरोपातीलच नव्हे तर जगातील अव्वल क्रमांकाची शहरे झाली. गेल्या शतकात झालेल्या दोन विश्वयुद्धांनंतर आता अमेरिकेने आपले वर्चस्व जगभर पसरवले आहे. पण मधल्या काळात म्हणजे सुमारे सातआठशे वर्षांपूर्वीच्या कालखंडात व्हेनिस हे युरोपातील सर्वात समृध्द शहर झाले होते. आजचा व्हेनिसचा आकार व तेथील लोकसंख्या पाहता यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.

हा मान व्हेनिसनगरीने मोठ्या साम्राज्याच्या विस्तारातून किंवा तलवारीच्या धारेच्या जोरावर मिळवला नव्हता तर तो तत्कालिन अर्थव्यवस्थेतून तिला प्राप्त झाला होता हे आणखी एक आश्चर्य म्हणावे लागेल. व्हेनिसच्या व आसमंतातील प्रदेशाच्या भौगोलिक रचनेमुळे एक नैसर्गिक बंदर बनण्यासाठी लागणा-या सर्व गोष्टी इथे उपलब्ध असल्याने फार पूर्वीपासून नौकानयनाचा विकास या ठिकाणी होत गेला. हजार वर्षापूर्वीच्या काळात व्हेनिसमधील रहिवाशांकडे तीन हजारावर नौका होत्या. त्यातील कांहींमधून मालाची
व प्रवाशांची वाहतूक होत असे तर कांही युद्धनौका होत्या. बहुतेक नौका या दोन्ही कामासाठी उपयुक्त अशा बनावटीच्या बनत असत.

समुद्रमार्गे होणारा व्यापार जसजसा वाढत गेला तसतसे व्हेनिसचे महत्व वाढले. आशिया खंडाबरोबर होणा-या व्यापारासाठी व्हेनिस हे युरोपचे प्रवेशद्वार बनले. त्यामुळे आसपासच्या भागातील धाडसी दर्यावर्दी, हुशार व्यापारी व नौकाबांधणीसाठी कुशल कारागीर हे सगळे तिकडे आकर्षिले गेले. त्यांनी अगणित संपत्ती कमावली व येथील विभागात खर्चही केली. या संपत्तीच्या संरक्षणासाठी कडवे लढवय्येही इथे गोळा झाले. आजूबाजूच्या प्रदेशातून सतत होत राहणा-या आक्रमणांमुळे सैनिकी प्रशिक्षणाची परंपराच या भागात राहणा-या लोकांत निर्माण झाली. ख्रिश्चन व मुस्लिम जगांतील झालेल्या धर्मयुद्धांच्या काळात तर व्हेनिसला आणखीनच अधिक महत्व प्राप्त झाले.

समुद्र व खाड्या यांच्यापासून मिळणा-या नैसर्गिक संरक्षणामुळे व्हेनिसच्या लोकांनी बरेच वेळा परचक्रापासून आपला बचाव करून घेतला आणि कधी कधी प्रतिहल्ले करून गमावलेल्या वस्तू पुन्हा परत मिळवून आणल्या. सेंट मार्क बॅसिलिकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्थापित केलेल्या अश्वाकृती पुतळ्यांचा याचे उदाहरण म्हणून उल्लेख करता येईल. पण दीर्घकालपर्यंत व्हेनिस हे एक मुख्य शहर व आजूबाजूचा थोडा भाग इतक्यापुरते मर्यादित असे एक लोकतांत्रिक राज्य राहिले. कधी त्यावर तुर्कस्तान, ऑस्ट्रिया, फ्रान्स आदि आजूबाजूच्या देशांचा अल्प काळासाठी अंमल बसत असे, पण संधी मिळताच तेथील लोक तो अंमल झुगारून देत व स्वतंत्रपणे राहू लागत.

यामुळे इतर देशांच्या राजधानीत दिसतात तसे राजा महाराजांचे भव्य राजवाडे, किल्ले वगैरे इथे नाहीत, पण सर्वसामान्य लोकच समृद्ध झाल्यामुळे त्यांनी अत्यंत सुंदर अशा इमारती इथे बांधल्या होत्या। अशा प्रकारचे अनेक वाडे आणि हवेल्या इथे दिसून येतात. या समृद्धीच्या आधारावर कलागुणांना आश्रय मिळाला व मध्ययुगातील अनेक सुप्रसिद्ध कलाकार इथे निपजले किंवा स्थिरावले.

युरोपमधील मध्ययुगातील वाङ्मयातसुद्धा व्हेनिसचा उल्लेख येतो. व्यापार उद्योग म्हंटल्यावर त्यासाठी भांडवल हवे व ते पुरवणारे सावकार आलेच. अशाच एका निर्दय यहुदी सावकाराचे 'शायलॉक' हे पात्र शेक्सपीयरच्या 'मर्चंट ऑफ व्हेनिस' या नाटकाने इतके प्रसिद्धीला आणले आहे की कोठल्याही निष्ठुर माणसासाठी त्याचे उदाहरण देण्यात येते. शेक्सपीयरचीच 'ऑथेल्लो' ही शोकांतिका व्हेनिसमध्येच घडलेली दाखवली आहे. या नाटकाच्या कथेवर आधारलेली अनेक नाटके व चित्रपट जगभर निघाले. कपटी मित्राच्या आगलाव्या बोलण्यावर विसंबून आपल्या प्रामाणिक पत्नीचा संशय घंणारा पति कसा सर्वनाशाला कारणीभूत होतो हे दाखवणारा 'ओंकारा' हा हिंदी चित्रपट ऑथेल्लोच्याच कथेवरून घेतला आहे.

व्हेनिसमध्ये फिरत असतांना या सगळ्या भूतकालाची आठवण जागी झाल्याखेरीज कशी राहील?

No comments: