Sunday, May 24, 2009

ग्रँड युरोप - भाग २८ : बेल्जियम


दि.२७-०४-२००७ बारावा दिवस : बेल्जियम

कोकेनॉफ येथील ट्यूलिप गार्डन मधून बाहेर पडण्यासाठी पाय निघत नव्हता. पण ट्यूलिपच्या मनोहर विश्वातून पुन्हा आपल्या जगात परत जाणे भागच होते. त्यामुळे ठरलेली वेळ झाल्यावर आपल्या बसमध्ये येऊन पुढील प्रवास सुरू केला. थोड्याच वेळात नेदरलँड या छोट्या देशातून बाहेर पडून बेल्जियम या त्यापेक्षाही लहान देशात प्रवेश केला. या दोन्ही देशांचे क्षेत्रफळ अगदी कमी असले तरी तेथील लोकसंख्या एक कोटीच्या वर आहे. त्यांची गणना दाट वस्तीच्या प्रदेशात होते. लोकसंख्येच्या घनतेच्या दृष्टीने भारताचा क्रमांक जगातील सर्व देशांत एकतीसावा लागतो, तर नेदरलँड व बेल्जियम यांचे क्रमांक अनुक्रमे तेवीस व एकोणतीसावे लागतात. म्हणजेच हे दोन्ही देश या बाबतीत भारताच्यासुद्धा पुढे आहेत. त्यातीलही बहुसंख्य लोक शहरात राहतात. आल्प्स आणि ब्लॅक फॉरेस्टमधून फिरून या भागात आल्यावर लोकवस्तीमधील हा फरक जाणवण्यासारखा होताच.

ब्रिटिशांनी ज्या काळात भारतात पाऊल ठेवले तेंव्हाच त्यांच्या पुढे किंवा मागे पोर्तुगीज, फ्रेंच आणि डच लोकांनीदेखील इकडे येऊन आपापल्या वखारी स्थापन केल्या आणि आजूबाजूला हातपाय पसरायला सुरुवात केली. त्यामधूनच त्यांची साम्राज्ये निर्माण झाली. डच लोकांनी कांही काळ सिलोनवर म्हणजे आजच्या श्रीलंकेवर राज्य केले आणि अखेरीस जावा, सुमात्रा आदि त्या काळात ईस्ट इंडिया या नांवाने ओळखल्या जाणा-या आताच्या इंडोनेशियावर आपला जम बसवला होता. या सगळ्यात बेल्जियमचे नांव कुठे येत नाही, कारण त्या शतकात हा देश अस्तित्वातच आलेला नव्हता. तेंव्हा आलेले कांही डच लोक आताच्या बेल्जियममधील भागातून कदाचित आलेही असतील. बेल्जियममधील लोकांची स्वतंत्र भाषा नाही. उत्तरेकडील नेदरलंडजवळ राहणारे लोक डच भाषा बोलतात, तर दक्षिणेला फ्रान्सपासून जवळ राहणारे लोक फ्रेंच. जर्मनीच्या सीमेपासून जवळ राहणारे बरेच लोक जर्मनभाषीय आहेत. डच लोक बहुसंख्य आहेत, पण फ्रेंच लोकांची संख्या त्या खालोखाल आहे. आता आंतरराष्ट्रीय संस्था तिथे आल्याने इंग्लिश निदान समजणा-या लोकांची संख्याही मोठी आहे.

नद्या नाले, समुद्र आणि दलदल यामुळे पायदळातील शिपाई किंवा घोडेस्वार हॉलंडमध्ये जायला तितकेसे उत्सुक नसतील. यामुळे हॉलंडला कांही प्रमाणात नैसर्गिक संरक्षण मिळत होते. पण बेल्जियम मात्र तीन बाजूने फ्रान्स, प्रशिया आणि ऑस्ट्रिया या बलाढ्य साम्राज्यांच्या तडाख्यात सापडत असल्यामुळे त्याचे कांही भूभाग जिंकून या ना त्या साम्राज्यात सामील करून घेतले जात असत. त्यांच्या आपसातील अनेक लढायासुद्धा बेल्जियनच्या भूमीवर लढल्या गेल्या. यामुळे बेल्जियमला 'युरोपचे रणांगण' असे म्हंटले जाते. नेपोलियन बोनापार्टचा अखेरचा निर्णायक दारुण पराभव वॉटरलू या जागी झाला तेंव्हापासून 'वॉटरलू' या शब्दाचा अर्थच 'कायमची पुरती वाट लागणे' असा झाला आहे. ते वॉटरलू गांव बेल्जियममध्येच आहे. आजचा स्वतंत्र बेल्जियम देश सन १८३० मध्ये प्रथम अस्तित्वात आला आणि तेंव्हापासून आतापर्यंत मधला महायुद्धांचा काळ सोडून इतर काळात तो स्वतंत्र राहिला.

गेल्या शतकात या राष्ट्राने युरोपच्या राजकारणात महत्वाची कामगिरी बजावली आहे. पश्चिम युरोपातील देश व अमेरिका यांच्यामधील संयुक्त संरक्षणासाठी एक करार असून त्याचे पालन करण्यासाठी 'नाटो' ही शस्त्रास्त्राने सुसज्ज अशी समाईक संस्था आहे. तिचे मुख्य कार्यालय बेल्जियममधील ब्रुसेल्स इथे आहे. तसेच युरोपियन युनियनचे प्रमुख ठिकाण सुद्धा हेच आहे. एका अर्थाने ब्रुसेल्स ही आता केवळ बेल्जियमचीच नव्हे तर संपूर्ण युरोपची राजधानी बनली आहे असे म्हणता येईल कारण तेथील सैनिकी सामर्थ्य आणि अर्थकारण या दोन्हीचे नियंत्रण इथून होते. अर्थातच हे नियंत्रण येथील स्थानिक लोकांच्या हातात नाही.

ब्रूसेल्सला पोचल्यावर आम्ही थेट एटोमियम पहायला गेलो. १९५८ साली आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांचे एक संमेलन इथे भरले होते. त्या निमित्ताने ही वैशिष्ट्यपूर्ण इमारत आधी तात्पुरत्या कामासाठी म्हणून बांधली होती. पण ती लोकांना इतकी आवडली की आता ते ब्रूसेल्सचे एक कायम स्वरूपाचे गौरवस्थान आणि पर्यटकांसाठी आकर्षण बनले आहे. लोह या धातूच्या स्फटिकाची ही १६५ अब्जपटीने मोठी प्रतिकृती आहे. वैज्ञानिक परिभाषेत हा आकार बॉडी सेंटर्ड क्यूबिक या नांवाने ओळखला जातो. असे असंख्य स्फटिक एकाला एक जोडून लोखंडाच्या कोणत्याही वस्तूला तिचा आकार प्राप्त होतो.

मधोमध एक अणु व त्याच्या आठ बाजूला ठराविक अंतरावर आठ अणु अशी या स्फटिकाची रचना आहे. यातील प्रत्येक अणुसाठी १८ मीटर व्यासाचा पोलादाचा पोकळ गोल बनवला असून हे गोल तीन ते सवातीन मीटर व्यासाच्या नळ्यांनी एकमेकांना जोडलेले आहेत. प्रत्येक गोलाच्या आंत प्रदर्शनीय वस्तू ठेवलेल्या आहेत. संपूर्ण शिल्प १०२ मीटर उंच आहे. खालून सर्वात वरच्या गोलामध्ये जाण्यासाठी अत्यंत वेगवान लिफ्ट आहे. तसेच इतर गोलांमध्ये जाण्यासाठीसुद्धा लिफ्ट आहेतच. वरील गॅलरीमधून ब्रुसेल्स शहराचे विहंगम दृष्य दिसते. तसेच बाजूला असलेले मिनियुरोपसुद्धा इथून छान दिसते. आयफेल टॉवर, वेस्टमिन्स्टर यासारख्या युरोपमधील प्रसिद्ध इमारतींच्या छोट्या प्रतिकृती या जागी बांधलेल्या आहेत. त्या प्रत्यक्ष पहाणे मात्र आमच्या दौ-यामध्ये नव्हते. दोन दिवसापूर्वीच मदुरोडॅम पाहिले असल्यामुळे त्याचे फारसे वाटले नाही.

त्यानंतर ब्रुसेल्समधील जगप्रसिद्ध मॅनेकिन पिस पुतळा पहायला गेलो. तो ब्रुसेल्सच्या जुन्या भागात असल्यामुळे हमरस्त्यावर बसगाडी सोडून एका चौकात आलो. तेथील ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन घेऊन एका गल्लीतून चालत चालत एका छोट्याशा चौकात आलो. पुण्यातील कुठल्या तरी पेठेमधील गल्लीबोळांच्या चौकाएवढ्या जागेत एका कोप-यात पुरुष दीड पुरुष इतक्या उंचीच्या कट्ट्यावर हा हातभर उंचीचा रेखीव दगडी पुतळा ठेवला आहे. बाजूच्याच भिंतीवर त्याची एक ब्रॉंझमधील प्रतिकृती लावून ठेवली आहे. याबद्दल अनेक दंतकथा प्रसृत केल्या गेल्या आहेत. अनेक वेळा तो चोरून नेण्याचे प्रयत्न झाले पण ते यशस्वी झाले नाहीत म्हणे. या मुलाला सणासुदीला नवनवे कपडे करून घातले जातात. ते करण्यासाठी लोकांची रीघ लागलेली असते. आतापर्यंत आठशेच्या वर पूर्णपणे वेगवेगळ्या प्रकारची वस्त्रे त्या पुतळ्यावर चढवून झाली आहेत. एरवी मात्र तो नग्नावस्थेतच सारखा 'शू' करीत उभा असतो. पहात राहण्यासारखे फारसे कांही तिथे नसल्यामुळे एक नजर टाकली, फोटोबिटो काढले आणि बाजूलाच असलेल्या चॉकलेट विकणा-या मोठ्या दुकानात गेलो. आधी स्विट्झरलंडमध्ये चॉकलेटे घेतलेलीच होती. उरली सुरली हौस इथे पुरवून घेतली.

. . . . . . . (क्रमशः)

No comments: